परवा रस्त्यावरच्या भयंकर वाहतूकीत अचानक एक ’एम-८०’ दिसली.. आता एम-८० दिसणं यात नवल ते काय.. पण एम-८० ही माझी दुखती नस आहे, तिचं माझ्या मनात एक खास स्थान आहे.. त्यामुळे, ती दिसताच एक जुनं शल्य उफाळून आलं.
माझी पहिली दुचाकी मला मिळाली मी बी.कॉमच्या दुसर्या वर्षाला असताना.. ती सुद्धा मी एक महत्त्वाची स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणून. वडीलांनी आधीच कबूल केलं होतं की ही परीक्षा मी पास झाले तर ते मला दुचाकी घेणार.. (त्यांना काय माहीत, मी खरंच पास होईन!! त्यांचं सोडा, मलाही रीझल्ट बघून एक मिनिट विश्वास बसला नव्हता...) तर, अश्या रीतीने आम्ही माझी पहिली ’सनी’ घ्यायला बजाजच्या वाकडेवाडीच्या त्या भल्यामोठ्या शोरूममधे पोचलो. तिथे पहाणी करत असतां असं लक्षात आले की आम्ही घ्यायला आलेली ’सनी’ रु. ९५००/- ला आहे आणि ’एम-८०’ आहे रु. १३,५००/- ला.. मी हे वाचून खूपच खुश झाले एकदम.. मला का कोणजाणे पण पहिल्यापासूनच त्या एम-८०चं फार आकर्षण! माझ्या आत्तेभावाकडे जुनी एम-५० होती.. तो तिचं इतकं कौतुक करायचा की तिच्यापुढे एम-८० तर अगदी उच्च-बिच्च होती. एम-८० म्हणजे ’गीयरची गाडी’. खटाखट गीयर बदलत स्पीडमधे ती चालवतांना उगाच फार मोठं-बिठं, ग्रेट-बिट झाल्यासारखं वाटणार. मी फार आशेनी विचारलं बाबांना, "आपण सनी ऐवजी एम-८०च घेऊया का? पैसेही खूप जास्त नाहीयेत.." माझ्या वडीलांना ना, ठरवलेल्या कोणत्याही गोष्टीत कोणत्याही कारणानी बदल केलेला अजिबात पसंत नसतो. माझा हा प्रश्न ऐकून ते वैतागलेच एकदम. "आता ठरवलंय ना एकदा की सनी घ्यायची.. हे काय मधेच? काही नाही एम-८० वगैरे.. सनी हवीय का सांग, नाहीतर जाऊया.." खरंतर माझी अशी रास्त अपेक्षा होती की त्यांनी माझ्या प्रस्तावाचा विचार तरी करावा.. शेवटी एम-८० काही कोणती आलतू-फालतू गाडी नव्हती.. गीयरची गाडी होती! पण त्यांनी चक्क धुडकावूनच टाकलं मला.. वर, ठरवलेली गाडीही हाती पडेल याची शाश्वती वाटेना.. काहीसं घाबरून, पुष्कळसं खट्टू होऊन, ’काय हो असं करता’ म्हणत, माफक निषेध नोंदवत मी शेवटी सनीला मान्यता दिली.
अर्थात या सनीवरही मी चिकार प्रेम केलं, तिला भरपूर फिरवलं, तिची काळजीही घेतली. पण ती शेवटी नाजूकच. एम-८० सारखी दणदणीत थोडीच होती? मध्यंतरी तर एम-८०ची फॅशन आल्यासारखी माझ्या पाच-सहा मित्रमैत्रिणींनी एम-८०च घेतल्या आणि प्रत्येकवेळी मी मनातल्यामनात हिरमुसत गेले. मित्रांकडे ’तू मला शिकवशील का’ असं विचारायची हिम्मत नव्हती.. प्रचंड संकोच, भिती, ’कोणी पाहिलं तर???’ असे बरेच घोळ होते त्यात.. मैत्रिणीला विचारलं एका तर ती म्हणाली, ’मला माझ्या बाबांनी शिकवली. मला नाही अशी शिकवता येणार तुला.. अगं चालवायला लागली की येते आपोआप.’ खूपच मस्का मारल्यावर मग शेवटी एकदाची ती तयार झाली मला रोज एका क्लासहून दुसर्या क्लासला जाताना एम-८० चालवायला द्यायला..
पहिल्याच दिवशी तिने मला किक मारायची कशी ते शिकवलं. ती काय सनीसारखी सोपी किक नव्हती.. चांगली जोरात किक मारायला लागायची. आश्चर्य म्हणजे मला पहिल्याच फटक्यात किक मारायला जमली. माझ्या अंगावर लगेच मूठभर मास चढलं. मग तिने ते सुप्रसिद्ध गीयर समजावून दिले.. क्लच दाबून ते कसे बदलायचे वगैरे.. तेही सोपं वाटलं मला.. पण गडबड झाली ती ब्रेकमधे.. ब्रेक पायात असतो एम-८०चा हे मला पटकन झेपलंच नाही.. उत्साहाच्या भरात मी नुसतीच ’हो हो’ म्हणले. या आणि इतक्याच माफक ’ज्ञानावर’ मी एम-८०आरूढ झाले. मैत्रिण माझ्या शेजारून माझ्या सनीवर, मला सूचना देत.. हं, किक मारली, पहिला गीयर टाकला, आणि सुरु.. आई शप्पथ! मी चक्क एम-८० चालवत होते.. माझी स्वप्नातली गाडी!!!! मग चक्क पहिला गीयर बदलून दुसराही टाकला.. एवढं करेपर्यंत मधे एक क्रॉस लेन आली. रस्त्यावरची गर्दी काही माझ्यासाठी थांबणारी नव्हती. आता स्पीड कमी करणं आवश्यक होतं, गीयर बदलला नसता तरी चाललं असतं, पण ब्रेक लावायलाच हवा होता. सकाळची वेळ.. रस्त्यावर स्कूटरी, सायकली होत्याच.. मैत्रिण मागून ओरडत होती चक्क.. ’अगं ब्रेक दाब, ब्रेक पायात आहे’.. मी इतकी गांगरले होते की या पायातल्या ब्रेकचा लोच्या माझ्या लक्षातच येईना.. मी आपला क्लचच जीव खाऊन दाबत्ये.. आणि काय.. येऊन धडकला की एक सायकलवाला.. चांगली जोरदार धडक! तोही पडला आणि मीही.. गाडीसकट.. मैत्रिण आत्तापर्यंत ’अगं ब्रेक दाब पायातला’ हे चक्क बोंबलून सांगत होती, पण काहीच उपयोग नाही झाला.. प्रचंड चिडली ती.. सहाजिकच ना.. तिची गाडी नवीन होती.. आणि ब्रेक न लावण्याचा गाढवपणा मी केला होता!! मी कशीबशी उठले. एम-८० बंद पडली होती या धक्क्यानी, सायकलवाला मला शिव्या घालून आपल्या वाटेला लागला होता. मी सुदैवानी गाडीला काही झालं नव्हतं मोठं..स्क्रॅचेस होते फक्त. मैत्रिण इतकी चिडली होती (आणि कदाचित घाबरलीही असेल), की माझ्याशी एक शब्दही बोलली नाही.. मी तर इतकी शरमिंदी झाले होते की सनी घेऊन तडक घरीच गेले.. उजव्या पायाला लागलंही होतं हा भाग वेगळा!!
या नंतर माझी काय टाप पुन्हा एम-८० शिकायची! निमूटपणे आपली सनीसारख्याच नॉन-गीयर, ऍटोमॅटिक गाड्या चालवत राहिले.. हां, स्वप्नात मात्र चिकार वेळा एम-८० चालवली.. खोटं वाटेल, पण मला खरंच पडायचं स्वप्न की मी एम-८० चालवतीये.. गीयर बदलतीये आणि हो, ब्रेकही लावतीये योग्य त्या वेळी!!!
कालांतरानी नवर्यानी चारचाकी घेतली. तो निष्णात आहे ती हाकायला. त्याच्याच आग्रहामुळे मी चारचाकी शिकायला एका क्लासमधे गेले. तिथे त्या माझ्या शिक्षकाने पहिलाच प्रश्न विचारला, ’कधी गीयरची दुचाकी चालवली आहे?’ माझा चेहरा साफ पडला.. मग पुढे सहानुभूतिने तोच म्हणाला, ’ठीक आहे, तसं काही नाही, येईल तुम्हालाही.. सराव करा मात्र.’ तेव्हा चारचाकी उत्साहानी शिकले. घरी रात्री रोज प्रॅक्टिसही करायचो, लायसन्सही मिळालं. पण मधे काही कारणानी गॅप पडली आणि मी चक्क विसरलेच चारचाकी कशी चालवतात ते! वाटायचं, काय कटकट आहे- एका हातात गीयर, एका हातात स्टीयरींग, एका पायात क्लच आणि दुसर्या पायात ब्रेकही आणि ऍक्सिलेटरही!! देवा! त्यातून आमच्या घरी जाणारे सर्व रस्ते चढावर.. त्यामुळे ती ’हाफ-क्लच’चीही सारखी भानगड! तो ब्रेक, गीयर आणि ऍक्सीलेटरचा मेळ काही माझ्याच्यानी जमेनाच. गाडी बिचारी सारखी आचके देत बंद पडू लागली. मग वैतागून चारचाकी(ही) काही आपल्याला येत नाही असं म्हणत निमूट बसले.
’पण अशी विसरलेच कशी मी चारचाकी चालवायला???’ या प्रश्नाचा खल करता मला असा साक्षात्कार झाला, की मला गीयरची दुचाकी येत नाही ना, त्यामुळेच मला ती गीयरची चारचाकीही येत नाही. आता, ज्यांना एम-८० येते त्यांना कसं कधी गीयर बदलायचा, कधी क्लच दाबायचा सगळं आपोआप जमतं. मधे कितीही गॅप पडली तरी एकदा गीयरची गाडी शिकली की शिकलीच ना.. विसरणं शक्यच नाही. ते काम माझ्यासारख्या नॉन-गीयरवाल्यांचं. तेव्हाच जर मला वडीलांनी एम-८० घेऊन दिली असती तर? तेव्हाच मला ’सनी नको, एम-८०च पाहिजे’ असा हट्ट करायची सुबुद्धी झाली असती तर?? तेव्हाच जरका मी धड ब्रेक मारून नीट एम-८० शिकले असते तर??? तर, मी तेव्हाही मनसोक्त एम-८० वर फिरले असते, घरी चारचाकी आल्यानंतर कॉन्फिडंटली ती चालवली असती, (एका गीयरच्या गाडीऐवजी दुसरी गीयरची गाडी चालवली असती- हाय काय अन नाय काय) आज कदाचित मी शानसे चारचाकी घेऊन ऑफिसला आले असते, आम्ही लांबवरच्या ट्रीप्सना जाऊ शकलो असतो, नवर्यापुढे ’मी तुझ्यापेक्षा चांगली गाडी चालवते’ अशी शेखी मिरवली असती, मनासारखं शॉपिंग करून मी ते चारचाकीतून घरी आणलं असतं, त्या फालतू नॉनगीयर गाड्यांकडे पाहून एक तुच्छ कटाक्ष टाकला असता... असं बरंच काही झालं असतं.. नाही का?
आज पुन्हा मला मी एम-८० चालवतीये असं स्वप्न पडणार बहुतेक!
January 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
17 comments:
mast lihila aahe.
reminded me of the 1st time i drove the M50 - tht was my first 2-wheeler :)
mee pan traffic madhe asaach gaangarlo hoto tevha, the only good thing was tht i didnt fall.
gammat mhanje, although i have driven a car in US (auto-geared), i am yet to drive a car in India - kasa jamel, maahit naahi. hopefully, 2 haat aani 2 paayaan-ch gear stick, steering, clutch, accelerator/brake barobar coordination jamel...
ur post also reminded me of the time when i 'earned' my bike :)
chhaan lihila aahe!
p.s. mee lihitaanaa 'arey-turey kela aahe, 'aapan' mhanat baslo naahiye - tari chu.bhu.dyaa.ghyaa.
:-)))
zabaradast post zalaye! mazi diwasachi suruvaat changalya post ne zali aaj. :D
poonam :) mi pahilee gadich M-80 shikale ani tula jas m80 baddal akarshan hot, tas mala Hero Honda street baddal. job suru zalyawar pahili mi Street ghetali ni ajun hi chalawate. jabaree gadi aahe!
baki gear wali gadi yet nasel tar Car shikayala problem kharach yeto ka???
केतन, सर्किट, स्नेहल.. धन्स! :)
केतन, ब्लॉगविश्वात फॉमॅलिटीज कशाला? आणि मी तितकी मोठीही नाहीये.. :) अरे-तुरे वेलकम आहे!
सर्किट! :) खूप मोठी compliment आहे ही! खूप खूप थँक्स! :)
स्नेहल, स्ट्रीट!!! फार कमी गाड्या होत्या त्या.. तू अजूनही चालवतेस??? सहीये! गीयरची दुचाकी म्हणजे ’बेसिक’ कोर्स असतो असं माझं अजूनही मत आहे. बेसिक न करता थेट ऍडव्हान्स कोर्स कसा करू शकतं कोणी? :)
तुमचे परत एकदा आभार! :)
humm.. mi pan mitrachi kinetic spark shikalo pahilyanda ani mag direct Hero Honda.. pan majhyakade college la asatana kuthalich gadi navhati.. sayakalach vaparayacho tenvha mala suddha aapan laal chutuk rangachi m-80 chalavato aahot asa svapna padayachi :P
Abhi
माझं नेमकं उलट झालं. मी गाडी चालवायला शिकले तीच बजाज सुपर. (अवजड स्कूटर) डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला तीच घेऊन जायचे कॉलेजमध्ये. बाकीच्या मुलींच्या सनी वगैरे छान नाजूक गाड्या पाहून मला हिरमुसायला व्हायचं. मग मी त्या स्कूटरने दोन अपघात केले. :-)
नंतर मला आपसूक कायनेटिक प्राईड मिळाली.
मस्त लिहिलं आहेस बाकी.
MAST LIHILA AAHES.
EK VEGALI GOSHT SANGATO MI 18 VARSHACHA ZALYAVAR AADHI CHARCHAKI AANI NANTAR DUCHAKI SHIKALO....
mala ajunahi gear chi duchaki chalavata yet nahi karan maza pahila ani akheracha prem mhanaje kinetic honda, pan charchaki vahan gear sakat anandane chalavato, tevha tulahi try karayla harakat nahi char chaki punha...
:), maja vatli vachoon. aata automatic gear chya gadya yet aahet, tevha char-chaki chalavayache swapn poorn vhyala harkat nahi ;)
अभि, श्र, राकेश, कोहम, नंदन.. धन्यवाद! :)
अभि, एम८० म्हणली की लालचुटूकच येते ना डोळ्यापुढे?? त्यात निळा, ग्रे असे रंग होते, पण स्वप्नातली एम-८० लालच! :)
श्रद्धा, लकी आहेस, डायरेक्ट स्कूटरच शिकलीस ते! :)
राकेश, असं करणारा तू एकटाच असशील बहुदा! :)
कोहम, खरं तर रोज नेटानी चालवली तर येईल पुन्हा, पण ट्रॅफ़िकची अवस्था बघता, नकोच वाटते.
नंदन, भारतातही ऑटोमॅटिक चारचाक्या मिळायला लागल्या? सहीच :) हा ऑप्शन बरा आहे ती गीयरची मारामारी करण्यापेक्षा ;)
तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार!
chhaan lihilaay lekh! mala paN bike havi hotee collegela asatana. nahee miLaalee. tee nokri laglyawar ghetli.
aso! m80 sod, tu ekda bullet chi kick maroon paha:-)
masta lihilay ki :)
M80 aaNi gaav yaamch natahi far javalach hot.
gavaakdachyaa rastyavr tighana ghevun janayche karamat M80 ch karu shakat hoti aadhee :)
mee matr direct 4 stroke bike shikaloy. tyamaule M80 nahi chalavale kadhee.
haa scooter chalavale aahe ekada donada aaNi padalay ekadaa jorat. :)
mag ata ekhadee juni M80 ghevun shik baghu. tujh swapn pur hoil :)
mag aataa jamatye kaa gear waalee gaaDee chaalawaayalaa ???????
chhaan aahe lekh ....... :)
आता चारचाकीपण विदाउट गियर येत आहेत. तेव्हा हिरमुसून जायचे कारण नाही.
बाकी पोस्ट मस्त.
Poonam tu lekhika honyaevaji dusara kahi jhali asashil tar mala manapasun hya goshticha dukha hoil. Me jawal jawal saglya goshti vachalya. Kharach halkya fulkya aani majedar aahet. Ashich lihit raha aani amache manoranjan karat raha.
Shatashah Dhannyawad!
hey poonam
khup awadali tujhi katha
majha pan same experience ahe car baddal cha :)
atta paryant me tujhya baryach katha vachalya ani tya paiki khup goshti agadi day to day routine madhalyach vatatat ani mag apalyala tasa kahi anubhav ala ki punha tujhi katha athavate ani me lagech navaryala sangate poonam chya goshtit pan asach hot :)
या गोष्टीला मी 5 star rating दिले! मी जेव्हा १८ झालो, तेव्हा घरचे बाइक घेऊन द्यायला तयारच नव्हते. शेवटी मी आधी चार चाकी शिकलो. खूप हट्ट केल्यावर ५ वर्ष स्कूटी वापरून झल्यानंतर पल्सर घेऊन द्यायचा ठरला. पण गाडी मिळण्याच्या दिवशी पंचाईत. बाइक येती कोणाला. घरी आई आणि वडील दोगेही कायनेटिक चलवायचे. केव्हा कार. मित्रांना सर्प्राइज़ द्यायचा होता, म्हणून त्यांना ही कोणाला मदतीला बोलावू शकत नव्हतो. शेवटी गचके खात खात आणली कशी तरी घरी माझी पहिली बाइक.
शेवटी तुम्ही M80/bike शिकलात की नाही ?
Post a Comment