December 27, 2007

नवीन वर्षाचे कॅलेंडर!

वीन वर्षाची चाहूल कशाने लागते? अर्थातच नवीन वर्षाच्या कॅलेंडरमुळे! नवीन वर्षाचे संकल्प, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी होणार्‍या पार्ट्या, हे सगळं कॅलेंडरपाठून येतं. साधारण १५ डिसेंबरपासून विविध दिनदर्शिका बाजारात येतात, जे नवीन वर्षाच्या भेटी देतात, त्यांच्याकडूनही कॅलेंडरं यायला लागतात.

मराठी मनांत कॅलेंडर आणि ’कालनिर्णय’ हे एक अपरिहार्य समीकरण झालंय. सुमंगल प्रकाशनची ही एक साधी दिनदर्शिका.. पण योग्य जाहिरातबाजी, अचूक टायमिंग आणि ’भिंतीवरी कालनिर्णय असावे’ या कॅप्शनमुळे ’कालनिर्णय’ला पूर्ण वर्षभराचा व्यवसाय केवळ एका महिन्यात मिळाला. कालानुरूप त्यांच्या जाहिरातीत बदलही झाले- ’कालनिर्णय द्या ना, कालनिर्णय घ्या ना’ पासून ’कालनिर्णय नसेल तर भिंत ओकीबोकी दिसते’ पर्यंत! मराठीनंतर गुजराथी आणि काही दक्षिणभारतीय भाषेतही हे कॅलेंडर आले. मग चक्क कॅलेंडरंही विविध ’साईझ’मधे उपलब्ध करून दिली ’सुमंगल’नी.. अगदी चारचाकीमधे लावण्यासाठी हाताच्या पंज्यात मावेल अश्या आकाराचं.. ते पूर्ण ऑफिसमधे नजरेच्या एका टप्प्यात दिसेल असं दोन फूट बाय एक फूटाचंही. मग आली खास परदेशस्थ लोकांसाठी असलेली ’इंटरनेट आवृत्ती’. आता तर अशी परिस्थिती आहे, की परदेशी रहाणार्‍या प्रत्येक मराठी कुटुंबाकडे तिकडे आपली मराठी संस्कृति जपण्यासाठी का होईना, पण ’कालनिर्णय’ नक्कीच असते. योगायोगानी बरीच परदेशस्थ मंडळी तिकडे त्यावेळी सुट्टीचा मौसम असल्यामुळे वर्षाखेर भारतात येतात आणि त्यांना आणि त्यांच्या तिकडच्या मित्रमंडळींसाठी ’कालनिर्णय’ आवर्जून नेतात.

हळूहळू पण निश्चितपणे कालनिर्णयनी इतकी लोकप्रियता गाठली की त्यांच्या स्पर्धकांनाही त्या जाहिरातबाजीची दखल घ्यावी लागली. मग ’महालक्ष्मी दिनदर्शिका’ तितक्याच धडाक्यानी आणि नामवंत, लोकप्रिय अभिनेत्री घेऊन आपलीही जाहिरात करायला लागली. इतर दिनदर्शिकाही स्पर्धेत उतरल्या.

या सर्वामुळे अर्थातच आपला सगळ्यांचां ’उपभोक्ता’ किंवा ’कन्झ्यूमर’ म्हणून फायदाच झाला. त्या बारा पानांवर, प्रत्येक दिवसाच्या चौकटीवर अक्षरश: ’माहितीचा भडीमार’ होऊ लागला. रोजची तिथी, तारीख, अमक्याची पुण्यतिथी, अमक्याची जयंती, रोजची रास, चंद्रोदय, सूर्योदय, सूर्यास्त.. एक ना अनेक.. बरं ती पानामागची जागा सुद्धा का म्हणून मोकळी सोडून वाया जाऊ द्यायची? मग आलेच त्यात ’नामवंत साहित्यकारांचे’ लेख, राशीभविष्य, पाककृति, ’स्वयंपाकघरातल्या टीप्स’, ’हे करून पहा’, ’वहिनीचा सल्ला’, ’रेल्वेचे टाईमटेबल’, ’पुस्तक परिक्षण’, ’योगाभ्यास’, ’उपयुक्त वनौषधी’ वगैरे वगैरे वगैरे..

ही तर झाली ’तिथी, वार’ दाखवणारी ’स्वयंपाकघरातली कॅलेंडरं’. पण ही काही दीवाणखान्यात शोभत नाहीत काही. तिथे पाहिजेत चकचकीत, गुळगुळीत कागदावर छापलेली, सुंदर चित्र (सुमारे पाऊण पान असलेली- शक्यतो सुंदर तरूणींची, तारीख दिसली नाही तरी चालेल) अश्या टाईपची ’कॅलेंडर्स’! पुष्कळ मोठ्या कंपन्या आजकाल या ’दीवाणखाना कॅटॅगरीत’ बसतील अशी कॅलेंडर्स काढतात. त्यांची आकर्षक छपाई आणि चित्र असलेली कॅलेंडर्स मोठ्या दिमाखात सर्वांचं लक्ष वेधून घेतात आणि अनायसेच त्या कंपनीची जाहिरात होते. ’एल.आय.सी’ अर्थातच ’जीवन बीमा निगम’ची कॅलेंडरं पाहिली आहेत? सरकारी कंपनीला अजिबातच शोभणार नाहीत असे सुरेख फोटो असतात कोणत्यातरी ’थीम’वर त्या कॅलेंडरवर दरवर्षी. तसंच काही औषधांच्या कंपन्या, जसं की ’हिमालय’ वगैरेंची कॅलेंडरं पण सुरेख असतात- त्यात गोंडस बाळं असतात आणि बाजूला अर्थातच त्यांच्या प्रॉडक्ट्सची जाहिरातही!

काही काही बॅंका/ कारखाने/ कंपन्या नित्यनियमानी दरवर्षी त्यांची टिपीकल प्रचंड मोठ्या तारखा असलेली कॅलेंडरं काढतात. त्यावर बाकी काऽऽऽऽही नसतं. एक रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या काय त्या ’लाल’ रंगात असतात. बाकी ठळक काळी शाई असलेल्या तारखा फक्त. कोपर्‍यात, रिकाम्या चौकोनात मिळते मग ’पौर्णिमा’, ’अमावस्या’, ’चतुर्थी’, त्या महिन्यातले आलेले महत्त्वाचे ’सण’ आदींना जागा. काही काही कार्यालयं मुद्दाम त्यांच्या कामगारांसाठी कॅलेंडर काढतात.. ही बहुतकरून ’देवीदेवतांचे फोटो’ असलेली असतात. कामगारांना नवीन वर्षाची छोटी भेट म्हणूनही दिल्यासारखं होतं, आणि घरी तसंही कॅलेंडर लागतच ना! डायर्‍या वगैरे लाड मोठ्या ’साहेब’ लोकांचे. कामगारांसाठी कॅलेंडर उत्तम! तसंच आजकाल वृत्तपत्रही स्वत:ची कॅलेंडरं काढतात.. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रोजच्या दैनिकाबरोबर दिनदर्शिकाही! ’कम्झ्यूमर लॉयल्टी’ अशीच ’बिल्ड’ होते बरं!

सध्याचं अतिशय चर्चेतलं म्हणजे ’किंगफिशर’चं ’स्विमसूट स्पेशल’ कॅलेंडर! गेली ३ वर्षं हे कॅलेंडर येतंय.. याची ’थीम’ एकच.. ’स्विमसूट’ मधल्या सुंदर्‍या.. अर्थातच या कॅलेंडरच्या अगदी कमी प्रति ते काढतात आणि काही काही अतिमहत्त्वाच्या लोकांनाच गिफ्ट करतात. या कॅलेंडरवर आपला फोटो येण्यासाठी कित्येक नवीन, उगवत्या मॉडेल्स बरीच ’फील्डींग’ करतात असं ऐकीवात आहे. २००८चं हे कॅलेंडर सध्या नेटवर फिरत आहे. मी पाहिलं.. ठीकच वाटलं मला.. चोवीस फोटो आहेत, त्यातले अगदी मोजके म्हणजे ३-४च ’हॉट’ वगैरे आहेत. बाकीचे अगदीच ’ठाकठीक’..

बरं, कोणतंही कॅलेंडर हातात आलं की तुम्ही काय बघता आधी? मी आधी बघते की माझा वाढदिवस कोणत्या दिवशी आहे, मग त्यानंतर सर्वच आप्तांचे वाढदिवस, काहींच्या लग्नाचे वाढदिवस कोणत्या वारी येत आहेत ते.. शनिवार-रविवारला जोडून एखादा वाढदिवस असला तर सुट्टीचं, पार्टीचं प्लॅनिंग लग्गेचच सुरु होतं माझं! मग अर्थातच सर्व महत्त्वाचे सण कधी आहेत- गुढीपाडवा, गणपति, दसरा, दिवाळी वगैरे.. म्हणजे रजा कधीकधी घ्याव्या लागणार आहेत याचे हिशोब सुरु.. मग सार्वजनिक सुट्ट्या कधी आहेत.. २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर हे या दृष्टीने फार महत्त्वाचे माझ्यासाठी. यांना जोडून एखादी सुट्टी असेल अजून एखादी तर सोनेपे सुहागा! थोडक्यात काय, की कॅलेंडर ’कालनिर्णय’चं असो की ’किंगफिशर’चं, माझ्यासारख्या नोकरी करणार्‍या संसारी बाईला त्यात सुट्ट्या कधी आहेत हेच जास्त महत्त्वाचं वाटतं! (अरे, पाहिलंत का? २००८ मधे २६ जानेवारी शनिवारी आहे.. म्हणजे मला ’लॉंग वीकेंड’! सही! कुठेतरी जवळ फिरायला जाता येईल.. चला, चौकशीला लागलं पाहिजे.. )

तर, मित्रहो, तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा! नवीन वर्ष सुखसमृद्धीचं, भरभराटीचं तर जावोच, पण नवीन वर्षाच्या तुमच्याकडच्या सर्व दिनदर्शिकांवर सुंदर चित्र असोत, (’किंगफिशर’ सारखं एखादं ’नेत्रसुखद’ कॅलेंडर तुमच्या private viewing साठी तुम्हाला मिळो,) ती माहितीपूर्ण असोत, मनोरंजक असोत आणि भरपूर सुट्ट्यायुक्त असोत हीच तुमच्यासाठी शुभेच्छा! विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर!

10 comments:

Tulip said...

wow.. mast ekdam. navya varshachi agdi 'havaa' ch nirman kelis calenders muLe. baki milyach kay mat ahe kingfisher chya models chya 'thikthak' pana baddal:p:)))

Abhijit Dharmadhikari said...

navin varshaachya shubhechha deNyaachee hee paddhat aawaDalee:-)

Happy New Year to you:-)

Devidas Deshpande said...

मी कालही कॉमेंट टाकायचा प्रयत्न करत होतो. मात्र काल तांत्रिक अडचणींमुळे ते शक्यच झाले नाही. लेखासाठी छान विषय निवडलात. वेगळा आहे आणि जिव्हाळ्याचाही.
खास करून कालनिर्णयबाबत बोलायचे तर १९९३-९४ पर्यंत तरी कालनिर्णयच्या पहिल्या पानामागे पुलंचा लेख आवर्जून असायचा. तो वाचल्याशिवाय नव्या वर्षाची सुरवातच होत नसे. अन्य अनेक कॅलेंडर असले तरी दिनदर्शिका एकच...कालनिर्णय. एरवी दिवाळीच्या खरेदीपासूनच कॅलेंडरची मागणी सुरू होते. या सगळ्या कॅलेंडर्सपेक्षा विविध बँका आणि दुकानांच्या, कंपन्यांच्या कॅलेंडर्सची मजा वेगळी असायची.

नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Deepak said...

वा! मस्तच लिहिलय ...!... भिंतीवर कालनिर्णय असो वा महालक्ष्मी ... त्यातील सुट्ट्यांची माहिती ही मात्र नेहमीच आकर्षणाची बाब.. शिवाय पाठीमागच्यापानावरील लेख.. हे करुन पहा .. ते करुन पहा... गाड्यांचे वेळापत्रक... राशी भविष्य वगैरे वगैरे हे सुध्दा आहेच की ..!

किंगफिशरचे "नेत्रसुखद" कॅलेंडरही पाहुन झाले !
आयडिया मोबाईल कंपनीचे खास ग्राहकांच्या नावाने छापलेले कॅलेंडरही परवा पाहण्यात आले ... मला मात्र [अजुन तरी] मिळाले नाही .. :-( ... कदाचित ते त्यांच्या "गोल्ड मेंबर्स" साठी वगैरे असेल ..!

Anonymous said...

chhanach zalay.

mala aajach mobile sathi kalnirnay chi wap aawrutti milali. v ha lekh vachla. patala sagal.

पूनम छत्रे said...

सगळ्यांना खास धन्यवाद :)
एक मस्त गोष्ट सांगते- आजच मला भीमसेन जोशींच्या भावमुद्रा असलेलं खास सवाई गंधर्व महोत्सवात काढलेलं कॅलेंडर मिळालं ऑफ़िसच्या कृपेनी!! :))) सही ना? मी ते अगदी माझ्यासमोरच्या भिंतीवर लावलं आहे :) आता पूर्ण वर्ष कसं ’संगीतमय’ जाईल.. काय एकसे बढकर एक मुद्रा आहेत त्यांच्या!

अशी कॅलेंडर्स असतील तर ’किंगफिशर’ को मारो गोली :) क्या बोल्ते? :)

संदीप चित्रे said...

पूनम,
अगं, आम्ही इथे कालनिर्णयचे यू.एस. एडिशन आणले होते एकदा. खरेतर ते बरोबर होते पण इथली देवळं भारतातलेच कॅलेंडर वापरतात ! त्यामुळे नुसते गोंधळ व्हायचे  लेख छानच आहे.
भीमसेनजींचे अजून एक कॅलेंडर मिळवू शकशील का? इथे कसे मागवायचे ते मी पाहीन. ये बोल्ते 

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anand Sarolkar said...

Happy New year to you too...me pan saglyat ajha majha Birthday kadhi ahe te baghto navin calender madhe :) Outlook cha calender kasla boring vatata na ya saglyansamor ;)

सर्किट said...

वा! छान लिहीलंयेस. विषयही अगदी करेक्ट निवडला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!