शनिवार संध्याकाळचे साडेसात वाजलेले.. घरी, नाशिकला फोन करायची वेळ झालेली. हे त्यांचं ठरलेले रूटीन होते. दर शनिवारी रात्री घरी फोन करायचा. वीकेंडला घरी नसतील तर शुक्रवारी रात्री करायचा आणि वीकेंडच्या कार्यक्रमाची कल्पना द्यायची. पण आजकाल शमा घरी फोन करायला फारशी उत्सुक नसायची. रूटीन म्हणून उरकायची आपलं. तिने फोन लावला, अभि ऐकत होता..
"हं आई, कशी आहेस? बाबा? आणि सीमाताई, पमाताई, मुलं?"
या नंतर दोन मिनिटं ’हं’, ’हो का?’, ’अरे वा’, ’खरंय गं’, वगैरे झालं. मग,
"नाही, या वीकेंडला नाही जात आहोत कुठे. मागच्या वीकेंडला गेलो होतो ना तिथे दगदग बरीच झाली, मग आता यावेळी घरचीच कामं. पुढच्या शनिवारी बहुतेक असेलच एकाकडे गेटटूगेदर. चल मग, ठेवू? हो, अभिचं चालू आहे रूटीन. हो, काळजी घेते मी आणि तुम्हीही घ्या..बाय"
फोन ठेवून ती तशीच शांत बसली. अभिनी विचारल,
"काय गं?"
"उं?"
"लवकर झाला फोन? तुमच्या गप्पा रंगत नाहीयेत बरेच दिवस बघतोय मी.."
"हं, काय तेचतेच बोलायचं? इथलं नवीन काही सांगितलं तर तिला रसच नसतो. मग खुशाली कळली की झालं. नाहीतर गाडी आपोआप तिच्या आवडत्या विषयावर आणते ती. आणि त्यावर मला काही बोलायची इच्छा नाहीये.. फार चर्विचरण करून झालंय त्यावर. त्यापेक्षा फोन ठेवलेलाच बरा.."
अभिनी खांदे उडवले फक्त. पण मनातून तो अस्वस्थ झाला. शमाशी त्यालाही बोलायचं होतंच. पण शमा ’त्याबद्दल’ काहीच ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नसायची. त्याने दोनचार वेळा प्रयत्न केला होता. उलट पर्यवसान भांडणात व्हायचं. ते सगळं टाळण्यासाठी आपोआप ’तो’ विषय भिजत पडला होता.
यानंतर काही वीकेंड्ज नेहेमीप्रमाणेच गेले.. कधी आऊटींग, कधी पार्टी, नाहीतर कधी घरीच- एखादा सिनेमा, बाकी कामं यात. मग एका गुरुवारी बातमी आली- त्यांच्या मैत्रिणीला- पल्लवीला मुलगा झाला होता. संध्याकाळी सगळेच जाऊन बघून आले बाळ. नेमके पल्लवीचे आई-बाबा व्हिजा प्रॉब्लेम्समुळे येऊ शकले नव्हते, त्यांना यायला अजून पंधरा दिवस तरी अवकाश होता.. तोवर थोडी थोडी जबाबदारी सगळ्या मैत्रिणींनी वाटून घेतली.
शमा एका संध्याकाळी खीर करत होती. नक्की कृति आठवत नव्हती, तरी शमा आठवून आठवून खीरीचं एकएक साहित्य गोळा करत होती.. सहजच मन त्या जुन्या दिवसात गेलं जेव्हा आई तिच्या तायांसाठी खीर करायची. दोघींनाही खीरी आवडत नसत, कशीबशी संपवायच्या. आणि मग उरलेली आपण अगदी आनंदानी चाटूनपुसून खायचो. आई कौतुकानी हसायची आणि म्हणायची,’तुलाही तुझी वेळ आली की भरपूर करून घालीन हो, खा तेव्हा पाहिजे तितकी’. शमाला आठवूनच हसू आले. ’खरंच, आई किती उत्साहानी करेल ना आपलं सगळं. पण मग आपल्या बाळालाही ’त्याच्यासारखं’ झालं तर? आपली फॅमिली हिस्टरी तर तसंच सांगते ना? पुनरावृत्ति झाली तर? आपल्या बळाबद्दल सहन करू शकू आपण पुन्हा एकवार सगळं ते? आणि आई-बाबा तरी सहन करू शकतील? पुन्हा एकदा त्या वेदना, ते दु:ख, निराशेचे काळे ढग.. अंहं, नकोच ते. आपण घेतलेला निर्णयच योग्य वाटतोय..
मानेला जोरात हिसका देत, मनातले सगळे उलटसुलट विचार पुन्हा एकदा बाजूला झटकत शमानी अभिसाठी वाटी भरली.
"अभि, ते खाऊन बघ ना.."
अभिनी पदार्थ ओळखला नाही, दूधाचं काहीतरी दिसत होतं.
"बापरे! प्रयोग का? काय आहे हे?"
"ए असं काय रे! खसखशीची खीर आहे.. खाऊन तर बघ.. आई खूप छान करते. या दिवसात खायची असते म्हणून पल्लवीसाठी खास केली आहे. कशी लागतीये? आठवून आठवून केलीये."
जरा साशंकतेनेच अभिनी एक चमचा चाखला.
"मस्त लागतीये की. वेगळीच आहे. आधी केली नाहीस कधी.. अजून आहे का?"
शमाला मनापासून हसायला आलं..,"अरे हे काय पक्वान्न आहे का सारखं करायला? बाळंतिणीचं खाणं आहे ते- पौष्टिक.. आवडली ना?"
त्याबद्दलच पुढच्या फोनवर शमा आईला सांगत होती,
"आई, तू करतेस ना तशी खसखशीची खीर मी तिला नेली होती, आणि तिला खूप आवडली. अभिला पण आवडली.. आता पुन्हा नेईन."
"हो, आळीवाची पण चांगली असते ना या दिवसात? पण इथे मिळतात का ते माहित नाही गं. तिची आई आणेल बहुदा. किंवा सांगीन मी तिला तिच्या आईला आणायला सांगायला."
"आई, हो गं, बघू. काय घाई आहे?"
"सध्या नको वाटतंय."
"हो, ते झालंच. बरं, बघते."
"तुलाच सांगणार ना गं मी आई, असं काय करतेस?"
"तुला माहित आहे की काय आणि कसं झालंय ते.."
"हो."
"नाही"
"हो, बघू."
"बरं. तू जास्त विचार नको करूस. रडू नकोस आई, प्लीज.."
"चल, ठेवते. हो, काही लागलं तर विचारीन तुला. चल, अच्छा."
सुस्कारा टाकत शमा अभिच्या शेजारी बसली. हळूहळू तुटक झालेल्या संभाषणावरून अभिला जाणवलं की पुन्हा शमाचा मूड गेलाय.
"काय झालं? काय म्हणत होती आई?"
"काही नाही, तेच.. तुला मी कधी करू खीर? आम्हाला नातवंडं कधी दाखवताय?"
अभिच्या मनात आलं, आता विषय अनायसे छेडला गेलाय, तर आपणही शमाच्या मनातलं जाणून घेऊया.. हलके हसून तो म्हणाला,
"मग, कधी दाखवूया?"
"ओ अभि, तू पण!" शमा वैतागली..
"शमा, काय होतंय तुला? मला असं वाटतं की तुझ्या ’आत्ता, इतक्यात नको’ला काहीतरी कारण आहे. आणि ते तू मला सांगत नाहीयेस. मी तुला पाहिलंय शमा छोट्या बाळांना खेळवताना, थोड्या मोठ्या मुलांना गोष्टी सांगताना, त्यांच्याबरोबर रमतेस तू, खुश असतेस.. त्यांच्यासाठी खाऊ करायला आवडतो तुला.. हेच बघ आता पल्लवीसाठी कायकाय करत आहेस तू हौसेनी.. मग जेव्हा ’आपलं बाळ’ हा विषय निघतो तेव्हा अशी मिटून, आक्रसून का जातेस? लग्नाला चार वर्ष होतील आपल्या, आणि मलाही वाटतं that now is the right time to start a family. आणि मला असं वाटलंही नव्हतं की तुझा त्याला विरोध आहे. तुला लहान मुलं इतकी आवडतात, की frankly speaking, I had not expected तू ’अजून थांबू’ म्हणशील. मागे एकदोनदा मी विषय काढला तर तू उडवून लावलंस, आणि एकदा तर चक्क भांडण झालं आपलं. मग मीही पुढे काही बोललो नाही, पण I need to know, my dear, if there's a problem, if there's any reason behind it. And knowing you, I am sure, there is. मग, तू मला सांगणार नाहीस का? काय होतं तुला?"
अभि अगदी कळकळीनी विचारत होता. पाहता पाहता शमाचे डोळे भरून आले. त्या खोलखोल दाबून टाकलेल्या आठवणी उफाळून वर आल्या. मनात कोंडून ठेवलेली सगळी भिती, सगळे प्रश्न, सगळे किन्तूपरन्तु त्याच्याशी बोलून टाकावेसे वाटले. तसंही मनावरचं हे ओझं दिवसेंदिवस पेलणं अवघड होत चाललं होतं.
ती त्याच्या कुशीत शिरली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
"अभि काय सांगू तुला? तू मला वेडी म्हणशील, किंवा चक्क मला हसशीलही. पण माझ्या मनात लहान मुलांबद्दल एक भिती आहे. ती मोठी जबाबदारी आपल्याला समजेल की नाही, पेलवेल की नाही असं सतत वाटतं. आणि त्यालाही एक कारण आहे..
शमाच्या मनाचा बांध अखेर फुटला.. ती स्वत:हूनच मन मोकळं करायला लागली अभिपाशी.
"तुला माहित आहेच, सीमाताई आणि पमाताई माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. त्यांची लग्न झाली तेव्हा मी तर शाळेत होते- सीमाताईचं लग्न झाले तेव्हा मी सहावीत होते आणि सातवीत असताना पमाताईचं लग्न झालं. लगेचच सीमाताई पहिल्या बाळंतपणाला घरी आली. नक्की काय झालं, कशामुळे झालं कळायचं माझं वय नव्हतं तेव्हा, पण सीमाताईला मुलगा झाला, आणि त्याच्या फुफ्फुसात जन्मजात दोष होता. तो श्वास नाही घेऊ शकायचा. इनक्युबेटरमधे ठेवला होता, पण त्यातच त्याला कावीळ झाली आणि तो गेलाच बिचारा लगेच. तुला माहित्ये, ताईचं बाळ म्हणून मी इतकी खुश होते तेव्हा. पहिल्या दिवसापासून मी हॉस्पिटलमधे ठाण मांडून बसले होते त्याच्या शेजारी. ते इनक्युबेटरमधे होतं तेव्हाही बाबांबरोबर मी जायचे तिथे. ते बाळ असं गेलेलं सहनच नाही झालं मला. मी इतकी लहान होते तेव्हा की कोणी मला काही सांगितलं देखील नाही की नक्की काय झालं ते. मी आपली माझ्या बुद्धीप्रमाणे तर्क लढवले. पण मला पक्कं आठवतंय, नंतर कित्येक दिवस मला ते छोटं बाळ डोळ्यासमोर सतत दिसायचं- त्याला लावलेलं ऑक्सिजन मास्क, ती पिवळ्य़ा बल्बची पेटी, त्याचे कृश हातपाय.. त्याचा रडताना आवजही यायचा नाही माहित्ये इतकं छोटं होतं ते.. कुठेही लक्ष लागायचं नाही.. अजूनही त्याचा चेहरा मला आठवतो, आणि खूप भिती वाटते कसलीतरी."
शमा पुन्हा रडायला लागली. अभिनी तिच्या हातावर हात ठेवून तिला थोडा दिलासा दिला.
"आणि हे असंच काहीतरी पमाताईच्या बाबतीतही झालं. सीमाताई परत जाते न जाते तोवर पमाताई घरी आली. तिचं एक मिसकॅरेज झालं होतं, आणि मग पुढे दोन-तीन वर्षं मूलच झालं नाही तिला. आमच्या आईला फार टेन्शन असायचं तेव्हा.. या सगळ्याचा खूप वाईट परिणाम झाला रे माझ्यावर. छोटं बाळ असलं की घर कसं कौतुकात नहातं. पण दुर्दैवानी तेव्हा आमच्या घरात ’मूल’ यासंबंधी कायम गंभीर चर्चा चालू असायची. नुसते आई-बाबा नाहीत, तर कित्येक नातेवाईक, शेजारीपाजारी.. सारखं तेच. पुढे सगळं ठीक झालं.. सीमाताईला प्रसाद आणि प्रेरणा झाले, पमाताईला ज्योती.. पण माझ्या मनात भिती बसलीच आहे. अभि, दोन वेळा आमच्या फॅमिलीत असं झालं आहे.. असं माझ्याबाबतीतही काहीतरी घडेल असं सारखं वाटतं मला.. आणि मी खरंच नाही सहन करू शकणार ते. हौसेनी जीव जन्माला घालायचा आणि त्याचं सगळं नीट नसेल तर? आणि ते जरी सगळं व्यवस्थित असलं, पण आपण त्याच्यावर चांगले संस्कार नाही करू शकलो तर? ती आमच्या शेजारी रहाणारी कुलकर्णी काकूंची राणी अशीच पळून गेली माहित्ये कोण्या लफंग्याबरोबर.. किंवा आपलं मूल नीट शिकलंच नाही तर? वाया गेलं तर? जबाबदारी आपलीच असेल ना रे? आणि ती नाही झेपली आपल्याला तर? नकोच ते."
हताशपणे ती पुढे म्हणाली,
"मग मी घातलीये समजूत मनाची. आपण या समृद्ध देशात रहातोय. इथे तुझ्या आणि माझ्या करीयरला भरपूर स्कोप मिळेल. कितीतरी गोष्टी आहेत बघायला, फिरायला, त्या पाहू. मित्र-मैत्रिणी आहेत येणारेजाणारे.. बस, पुष्कळ झालं.. त्या अज्ञात दु:खापेक्षा हे नक्कीच चांगलं! हो ना?"
सगळं भडाभडा बोलून टाकल्यावर शमाला एकदम थकल्यासारखं झालं. तिनी एक मोठ्ठा सुस्कारा सोडला.
अभिला आत्ता कुठे शमाच्या मनातली उलथापालथ कळली. एक मिनिट त्यालाही सीमाताई आणि पमाताईचं ऐकून धक्का बसला. या सगळ्याची त्याला काहीच कल्पना नव्हती.
"ओह! बापरे, खूपच अवघड होतं शमाला तुला गं हे सगळं. लहान, अपरिपक्व वयात असे मोठे आघात झाले की त्याचे दूरगामी परिणाम होतात. पण म्हणून आयुष्य थांबत नाही ना राणी.. तूच बघ, तुझ्या दोन्ही बहिणींच्या मनावर त्याचे किती दीर्घ परिणाम झाले असतील.. जे काही झालं ते अगदी दुर्दैवी होतं, पण त्या सावरल्याच ना.. त्यांचा संसार पुढे मार्गी लागलाच ना? आज त्या त्यांच्या मुलांसोबत सुखी आहेत ना? तू खूप लहान असल्यामुळे तुला खूप खोलवर भिडलं ते.. पण त्या दोघींना पुढे संसार करायचा होता ना.. त्या तशाच शॉक मधे कुढत बसल्या असत्या तर? सुदैवानी त्या त्या वळणावर थांबल्या नाहीत.. पुढे गेल्या आणि सुखी झाल्या..आणि त्याच शहाणपण आहे, नाही का?"
"सगळं पटतं अभि, आणि प्रॅक्टीकली विचार केला तर ते बरोबरही आहे. देव न करो, पण त्या तिथेच थांबल्या असत्या तर नक्कीच जास्त दु:खी झाल्या असत्या. मी त्यांना कुठलाच दोष देत नाहीये.. पण मी जेव्हाजेव्हा ’माझ्या मुलाचा’ विचार करते तेव्हा सगळ्या नको त्या आठवणीच उफाळून येतात, एक प्रकारची अनामिक भिती वाटायला लागते आणि मग वाटतं नकोच ती रिस्क घेणं.. न जाणो माझ्या बाळाचं असं काही झालं तर??"
"पण अगं रिस्क कशात नसते? आपला आपल्यावर विश्वास नाहीये का? व्हायचं असलं तर कधीही काहीही होऊ शकतं, पण म्हणून जगणंच नाकारायचं का शमा? भविष्य कोणाला कळलंय? पण जे आपल्या हातात आहे ते तरी करू शकतो ना आपण? मेडीकल प्रॉब्लेम्स वर तोडगा काढायला आज सायन्स इतकं प्रगत झालंय, की काहीच इन्क्युरेबल राहिलेलं नाहीये. आता राहिला संस्कारांचा भाग, तर आपण इतके चांगले असताना आपलं बाळही गुणीच होईल ना? त्यात काय शंका? आणि या सगळ्यात तू मला विसरत आहेस शमा. असा एकतर्फी निर्णय घेताना माझा विचार नाही केलास तू?"
शमा थबकली. खरंच की. किती मोठी चूक करत होती ती. तिच्या मेन्टल ब्लॉक्समुळे ती अभिला गृहित धरत नव्हती का? अभिच्याही ममतेला, त्या ’बाप’ असण्याच्या भावनेला तितकंच महत्त्व होतं ना.. ती तिच्याच मनाचे गंड कुरवाळत बसली होती. अभिचा यात काय दोष होता? तिच्या मनात इतकी उलथापालथ होत असताना अभिचा क्षणभरही विचार तिने करू नये!!! खरंतर अभिला विश्वासात घेऊन तिने आधीच सांगायला हवं होतं ना! तिला खूपच अपराधी वाटायला लागलं.
"अभि, सॉरी रे.. खरंच काय मूर्खपणा माझा.. मी या भितीमुळे सारासार विचारच करेनासा झालीये. किती एकांगी झालीये मी! शी!! ओह गॉड!! अभि, मला थोडा वेळ देशील प्लीज? फार फार कन्फ्यूजन झालंय.. काही सुधरत नाहीये या क्षणी मला!"
अभि समजूतीनी हसला.
"शमा, जास्त विचार नको करूस. ऑलरेडी तुझं मन शिणलंय. हे बघ, आता आपल्याला कळलंय की प्रॉब्लेम काय आणि कुठे आहे. आता आपण यावर मार्ग काढू शकू ना? ’मूल होणं’ हा प्रॉब्लेम नसून ’अनिश्चिततेची भिती’ हा त्रास आहे. ’कोणीतरी म्हणतंय’ म्हणून मूल नकोय आपल्याला.. आपल्याला ते आपल्यासाठी हवंय, हो ना? मग त्यासाठी आपल्या मनाची पूर्ण तयारीही करायला हवीये आपण. तुझ्या मनावर खूप परिणाम झालाय, न कळत्या वयात गंभीर आघात झाल्यामुळे तू तो कप्पा बंदच करून टाकला आहेस. तू तुझी भिती कोणापाशी बोलून दाखवली नाहीस.. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्या बद्दल विचार करतेस तेव्हा भितीव्यतिरिक्त तुला काहीच जाणवत नाही.. तर त्यावर आधी उपचार करूया आपण. आपण एखाद्या चांगल्या थेरपिस्टला दाखवूया.. त्यानी तुला खूप मदत होईल. आणि बाकी काळजी सोड, किंवा माझ्यावर सोपव ती. मी आहेच ना तुझ्या सोबत कायम? काय वेडी आहेस गं? हे कशाला मनात ठेवलंस इतकं? माझ्यावर विश्वास नव्हता?"
"तसं कसं म्हणू अभि? पण माझ्याच मनात इतकं द्वंद्व होतं सारखं की तुला कशाला त्रास द्यायचा असं वाटायचं मला.."
"त्रास! आयला! इथे माझा जीव दमला हा विचार करून की हिला स्त्रीमुक्तीवाली चावली की काय.. ’कशा चूल अन मूलात अडकताय, बाहेर पडा’ वगैरे! कसलं हलकं वाटतंय मलाही, काय सांगू तुला? बघ, हे आधी बोलली असतीस तर आत्तापर्यंत एक मूल होऊन कदाचित दुसर्याचीही चाहूल लागली असती.." अभि मूड हलका करायला म्हणाला..
"चल, काहीतरीच बोलतोस!" शमालाही एकदम हसू आलं. "पण खूप मोकळं वाटतंय अभि आता. खरंच यावर काही मार्ग निघू शकेल का रे? मलाही हे ओझं नकोय रे आता. त्यातून सुटका हवीये आणि ती मिळेल असा विश्वास वाटतोय. केवळ तुझ्यामुळे. आपण घेऊ शक्य ती सर्व ट्रीटमेन्ट. मला यातून बाहेर पडायचंय अभि."
तिचा सकारात्मक विचार बघून अभिला खूप समाधान वाटलं. त्याने तिला त्याच्या मिठीत घेतलं.
समाप्त!
(या नावाचीच, हेच कथाबीज असलेली कथा मी आधी ’मायबोलीवर’ लिहिली होती, पण ती कथा अजून चांगली लिहिता येईल असे वाटून पुन्हा संपूर्णपणे नव्याने लिहिली आणि इथे पोस्ट केली आहे. जुनी कथा इथे बघता येईल:
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125182.html?1177426814 )
November 27, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
मलाही असच वाटल कि ह्याच स्वरुपाची कथा मी आधीसुद्धा वाचली होती. माझ्या मते त्या कथेमध्ये शमाचा mental block तिची मॆत्रिण काढते. कथा बीज चांगले आहे आणि मांडणीसुद्धा पण तरीही मला आधीची कथा जास्त आवडली.
Hi Poonam,
Nice story...keeping up with your record :)..Your short stories are touching...keep it up.
हाय पूनम, ही सुध्दा कथा आवडली, तुझे एक एक विषय सुध्दा अगदी वास्तवाला धरुन असतात. छान.
....वैशाली
Post a Comment