November 7, 2007

हौस!

णासुदीचे दिवस! खरेदीची झुंबड, आणि ’आमच्याकडेच खरेदीला या’ असं आमंत्रण देणार्‍या जाहिरातींचे तर पेवच! रोजची वर्तमानपत्र, साप्ताहिकं, नियतकालिकं, मासिकं- सगळीच सुमारे एक महिना आधी या जाहिरातींनी सजलेली. सध्या पुण्यात ’कमी वजनाच्या दागिन्यांचं’ वेड आलांय. म्हणजे असे दागिने पुर्वीही मिळायचेच, पण प्रमाण कमी होतं. आणि तेव्हा तरी ’कमी वजनाचे कसले आलेत सोन्याचे दागिने’ म्हणून नाक मुरडणार्‍या बायकाच जास्त होत्या. मात्र वेगानी बदलणार्‍या फॅशन्स, सोन्याचे वाढलेले भाव आणि चोरीमारीची भिती अश्या कारणांमुळे या दागिन्यांची मागणी हळूहळू वाढली. याचाच फायदा उठवून इथे हल्लीच एक भलं मोठं दुकान थाटामाटात सुरु झालं. सर्व दागिने एक किंवा दोन ग्रॅम वजनाचे! काय नव्हतं त्या दुकानात? डोक्यापासून पायापर्यंत घातले जाणारे सर्व दागिने, असंख्य डिझाईन्स, कमी किंमत आणि प्रचंड जाहिरातबाजी- रोज वर्तमानपत्रात जाहिराती, शहरातल्या मोक्याच्या जागा पाहून लावलेली होर्डींग्स, फुकट वाटलेली पत्रकं.. अजून काय हवं होतं? दुकान धडाधड चालू लागलं.. इतकं की त्याच परिसरात बघता बघता तीन दुकानं उभी राहिली त्याची.. एकदम चकाचक, वातानुकुलित, प्रत्येक दुकानाची खासीयत वेगळी, विभाग वेगळा.. कोणालाही भुरळ पडावे असे!

आम्ही मैत्रिणीही एकदा कुतुहल म्हणून त्या दुकानात जाऊन आलो. खरंच असंख्य डीझाईन्स होती, स्टाफ तत्पर होता.. पण का कोण जाणे, ते दागिने आम्हाला नाहीच आवडले. एक ग्रॅम्च्या जाडजाड पाटल्या, किंवा लांबच्यालांब मंगळसूत्र, किंवा नेकलेस.. इतकं चकचकीत होतं सगळं! म्हणलेच आहे ना ’चकाकतं ते सर्व सोनं नसतंच’. आणि हे तर सांगून सवरून पितळ होतं ज्यावर सोन्याचा पत्रा चढवला होता. उजेडात तर कळतच होतं की ते सोन्याचे नाही.. काहीच न घेता आम्ही परत आलो.. मनात नवल करत की ही दुकानं चालतातच कशी? डोळ्याला दिसतंय की या दागिन्याचा दर्जा हलका आहे, तरी बायका हे का घेतात? सरळ खोटं का नाही घालत? त्याला पुन्हा एक अन दोन ग्रॅमचा मुलामा कशाला?

या प्रश्नाचं उत्तर अचानक सापडलं.

नेहेमीप्रमाणे आम्ही मैत्रिणी भेटलो होतो, यातल्याच आम्ही चौघी त्या दुकानाला भेट देऊन आलो होतो. त्यातल्याच एकीनी सुरुवात केली,
"अगं, माझ्या कामवाल्या बाईच्या मुलीच लग्न आहे पुढच्या महिन्यात. मुलगी चांगली शिकलेली आहे हं, बारावी झालीये आणि कुठेतरी नोकरीही करते. हिच्या घरचं तसं बरंय.. त्यामुळे हिने मुलीला सगळे पैसे साठवून ठेवायला सांगितले होते.. पुढे लग्नात उपयोगी पडतील म्हणून.. तर लग्न ठरल्यानंतर मायलेकी गेल्या होत्या चक्क माहित्ये ’त्या’ दुकानात आणि तिने त्या साठवलेल्या पैश्यातून घेतल्या चार बांगड्या आणि गळ्यातलं. मला दाखवायला घेऊन आली होती.. तिच्या सासरकडचे पण तिथूनच तिला मंगळसूत्र घेणार आहेत. इतकी खुश होती.. मी म्हणलं तिला की अगं हे सोनं नसतं, माहित आहे ना तुला? तर काय म्हणली ठाऊक आहे? मी तर गप्पच झाले नंतर! म्हणाली, ’बाई म्हाईत हाय हो, सांगत्यातच की सगळं ते, काही लपूनछपून नाहीये.. पण दिसतं तरी कसं बगा की झ्याक.. आनि येक ग्रॅम तर येक ग्रॅम, पर पोरीच्या अंगावर सोनं तर चढलं.. आमाला कुठं परवडनार बाई खर्‍या सोन्याचं दागिनं? आमच्या हाती काचंच्याच बांगड्या अन गळ्यात काळी पोत. पर आमालाबी हौस आहे की.. आता थोडक्या पैश्यात बसतंय ओ हे, तर घेतलं. मुली आमच्या बगतात ना, बायका कश्या सजलेल्या असतात बाहिर.. मग त्यांना बी वाटतंयच की, की आपन बी दागिनं घालावेत.. आमचीबी हौस होते ना बाई.. आता बगा की.. या पंधराशेला चार बांगड्या अन पंधराशेचंच गळ्यातलं.. अन त्याचं कानतलं बी हाये मॅचिंग.. अडीच हजारात सांगा काय येतंय वो खरं सोनं.. आमच्यासारख्यास्नी ते दुकान म्हन्जी लाटरीच हाय बगा!"

ती सांगत असतानाच अजून एकीला आठवलं,
"हो गं, आमच्या ऑफिसमधल्या एका क्लर्कनीही त्याच्या बायकोसाठी अश्याच बांगड्या घेतल्या होत्या.. अगदी एक ग्रॅमच्या नाही, पण काहीतरी दहा ग्रॅममधे झाल्या होत्या. तेव्हा तोही म्हणाला होता की ’परवडत नाही म्हणून बायकोचं मन किती मारू? सोन्याचे भाव रोज वाढतायेत.. मग आम्ही कधी करायचे दागिने?’"

"आणि हे दागिने कधीही परत करता येतात माहित्ये? पन्नास टक्के पैसे परत कधीही आलात तरी आणि एक्स्चेंज केले तर पंचाहत्तर टक्के सवलत पण असते.. त्यामुळे अजूनच आकर्षण आहे त्यांचं.."

"अगं हो, आम्च्या ओळखीच्या एक आजी आहेत. त्यांनाही दागिन्यांची खूप हौस आहे. आणि अस्सल सोन्याचे दागिने पण आहेत त्यांच्याकडे. पण त्याही आजकाल ’दिवस चांगले नाहीत’ म्हणून असेच दागिने घालतात. अधूनमधून खरे, अधूनमधून हे.. मस्त व्हरायटी झालीये त्यांच्याकडे!"

"बघ की म्हणजे ज्यांना परवडत नाही अश्यांसाठी तर मजाच, पण ज्यांच्याकडे भरपूर दागिने आहेत, पण ते लॉकरमधे अडकलेले आहेत त्यांनाही हे दागिने घ्यायला हरकत नाही, नाही का? सगळीकडे मिरवता येतील, हौसही भागेल आणि हरवले, तुटले तरी चिंता नाही.. लगेच दुकान गाठून एक्स्चेंज!!"

यावर हशा पसरला. खरंच हौसेला मोल नाही! काहीही करून, पळवाटा शोधून आपण बायका आपली हौस पुरवतोच, नाही? त्यातच तर खरी मजा.

ही दिवाळी आपलीही मनात धरलेली हौस पुरवणारी जावो हीच सदिच्छा!

शुभ दिपावली!

3 comments:

कोहम said...

chaan....avadala lekhan...visheshataha...kaamavalya baaincha bhag...

HAREKRISHNAJI said...

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

Anonymous said...

चांगली पोस्ट आहे:-)
ते दागिने बेन्टेक्सचे होते का?