काही दिवसांपुर्वी मुलाला घेऊन ’बालोद्यानात’ गेले होते. एका मोठ्या बागेचा कोपरा या ’बालोद्यानासाठी’ दिलेला.. सहाजिकच चिकार गर्दी होती तिथे.. बालगोपाळ आणि त्यांचे पालक.. त्यातल्याच एका ’बाबांचा’ चेहरा मला खूप खूप ओळखीचा वाटत होता, पण नक्की आठवत नव्हते की यांना आपण कुठे पाहिले आहे. इतक्यात तेच माझ्याकडे पाहून ओळखीचे हसले आणि झटक्यात माझ्या डोक्यात प्रकाश पडला! ते आमच्या ऑफिसच्या सिक्युरिटी स्टाफ पैकी एक होते. यांच्या ड्युट्या कायम बदलत असतात ना त्यामुळे दर २-३ आठवड्यानीच हे लोक दिसतात एकदम, हे पटकन न ओळखण्याचे पहिले कारण! आणि सर्वात मोठं न ओळखण्याचं कारण म्हणजे ’युनिफॉर्म’!! हे लोक कायम त्यांच्या त्या टिपीकल युनिफॉर्म आणि टोपीमधे पहायचीच सवय ना! यांना साध्या नेहेमीच्या नॉर्मल कपड्यात कधी बघितलेलेच नाही!
"काय इकडे कुठे?" पटकन काहीही न सुचून मी अत्यंत बावळट प्रश्न विचारला! बागेत, त्यातूनही बालोद्यानात कशासाठी येतात लोक??
"काही नाही मॅडम, मुलींना घेऊन आलो बागेत. एरवी जमत नाही. दोन मुली आहेत.. ही एक आणि एक तिकडे झोपाळ्यावर गेली आहे."
"अच्छा" माझ्या चेहर्यावर पुन्हा बावळट हसू आलं. मुलगी मात्र चुणचुणीत होती.
मी मनात म्हणलं तो युनिफॉर्मच्या आत एक माणूसच आहे ना शेवटी? त्यालाही कुटुंब आहे, सुट्टी आहे. त्याला बागेत पाहिल्यावर आपल्याला इतकं आश्चर्य का वाटलं बुवा? ह्म्म. हा सगळा त्या युनिफॉर्मचा दोष आहे! हा ’युनिफॉर्म’ प्रकार सगळ्यांना कसं सरसकट एकसारखं करतो नाही? युनिफॉर्मच्या मागची व्यक्तिच विसरतो मग आपण. एकसारखे लेबल लागते .. ’सिक्युरिटीवाला’, ’वॉचमन’, ’ड्रायव्हर’ असे.
ड्रायव्हरवरून आठवलं की आमच्या ऑफिसच्या ड्रायव्हरना देखील पांढरा युनिफॉर्म आहे. त्यांनाही साध्या शर्ट-पँट मधे पाहिलं की पटकन ओळखायला येत नाही... सगळे सुशिक्षित, निर्व्यसनी आहेत. कपडेही टापटीप घालतात. त्यामुळे हा स्मार्ट दिसणारा माणूस ’ड्रायव्हर’ आहे यावर एक मिनिट विश्वास बसत नाही. सगळी ’युनिफॉर्म’ची किमया!
पण शाळेतही युनिफॉर्म असतोच की. तो खरं तर असतो २ कारणांसाठी. पहिलं की कमीजास्त परिस्थितीतली मुलं शाळेत शिकतात. त्यामुळे कोणाचे कपडे चांगले, कोणाचे इतके चांगले नाहीत.. त्यावरून मुलांच्या मनात नसत्या कल्पना निर्माण होऊ नयेत. आणि दुसरं म्हणजे शिक्षकांनींही सर्व मुलांना एकसमान वागवावं. अर्थात ’युनिफॉर्म’चा अर्थच ’एकसमान’ ना! ’गणवेश’ म्हणजे सर्व ’गण’ एका वेशात. त्यांच्यात कसल्याही कारणानी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून परिधान केलेला वेश. ती छोटी, अगदी बालवाडीतली मुलं कसली गोंडस दिसतात ना जेव्हा पहिल्यांदा युनिफॉर्म चढवतात तेव्हा. शाळा सुटल्यावर खरंच ओळखायला येत नाही आपलं मूल चटकन! खरोखर सगळी एकसारखीच दिसतात!
आणि युनिफॉर्म म्हणलं की आठवतात पोलिस! ’खाकी’ हा तर अख्खा सिनेमाच आला होता की त्यावर! साधा माणूस त्याचं वैयक्तिक सुखदु:ख विसरतो बहुदा एकदा तो युनिफॉर्म घातला की. एक प्रकारची ’पॉवर’ची जाणीव होते.. त्या युनिफॉर्मची ताकद असते ती. दुर्दैवानी पोलिसांनी या ताकदीचा फारच abuse केला आहे. ’पोलीसांच्या खाकी’चा ’पोलिसी खाक्या’ कधी झाला ते समजलेही नाही. त्यामुळे पोलिसांच्या युनिफ़ॉर्मला सामान्य माणूस शक्यतो टाळतोच.
पण अजूनही एका युनिफॉर्म बद्दल आदर टिकून आहे तो म्हणजे 'armed forces' च्या युनिफॉर्मचा. कसले स्मार्ट दिसतात ना ते सगळे लोक? आदरच वाटतो त्यांना पाहिलं की! माझ्या एका मैत्रिणीचा नवरा नेव्हीत आहे. त्यांचं प्रेमलग्न- आधी पेनफ़्रेंड्ज होते ते. याने त्याचा पहिला फोटो तिला दिला तोच त्या पांढर्याशुभ्र युनिफॉर्ममधला.. पाहताक्षणीच पाघळली ती! नंतरही competitive examचा अभ्यास करताना खूप टेन्शन आले, नैराश्य आले की त्याचा ’तो’ फोटो ती पहायची.. त्याने तिला खूप उत्साह वाटायचा म्हणे! यातला romanticismचा भाग सोडला, तरीही फार अतिशयोक्ति नाही असं माझं वैयक्तिक मत.. ऐटबाज, स्मार्ट, बघताक्षणी आदर वाटावा असे युनिफॉर्म आहेत आपल्या तिन्ही आर्म्ड फोर्सेसचे.. त्यांना निभावावी लागणारी ड्य़ुटी, मिळणारा माफक मोबदला आणि त्या बदल्यात ते चुकवणारी किंमत बघता त्यांच्या युनिफॉर्मला ’कडक सॅल्यूट’ करावासा वाटतो!
पण हे तर झाले बाह्य युनिफॉर्मबद्दल. काहीकाही लोकांना मनातल्यामनात उगाचच आपण युनिफॉर्म चढवलेले असतात. अमुक एक व्यक्ति म्हणजे अशीच असणार.. विशेषत: काहीकाही ’नाती’ ही अशी ’ब्रँडेड’ असतात. ’सासू’ म्हणलं की तिला ’टोमण्यांचा’ युनिफॉर्म आलाच, ’सून’ म्हणली की ’मॉडर्न, उलट उत्तरं देणारी, मुलाला कह्यात ठेवणारी, रीतीभाती न पाळणारी’ असा युनिफॉर्म घालूनच येते. एखादी सासू खरंच प्रेमळ असेल तरी सूनेच्या मनात तिच्या वागण्याबद्दल कायम शंका येणार की ही गोडगोड बोलून काही डाव तर साधत नाहीये ना? तसंच एखादी सून मनमोकळेपणानी सासरकडच्यांशी बोलली की ते चालत नाही त्या मंडळींना.. कारण ते ’युनिफॉर्मबाह्य’ वर्तन होतं ना? सूनेनी हसून-खेळून बोलता उपयोग नाही.. कारण तिने कायम आदराच्या, फॉर्मॅर्लिटीच्या युनिफॉर्ममधेच राहिलं पाहिजे ना? तसाच ’बॉस’नी नेहेमी ’खडूसपणाचा’ युनिफॉर्म चढवलेला असतो.. प्रेमळ बॉस मी तरी कथाकादंबर्यांमधेच पाहिलेत. मला एखादा प्रेमळ, माझ्या सर्व अडचणी समजून घेणारा बॉस मिळेल असं तरी वाटत नाही.. बॉस बहुदा बॉसगिरीचा युनिफॉर्म चढवतानाच खडूसगिरीचीही वस्त्रे चढवतो.. त्याच्या युनिफॉर्ममधे मात्र कधीही बदल होणार नाही अशी माझी पक्की खात्री आहे!
तर असे हे युनिफॉर्म- काही दिसणारे, काही न दिसणारे.. पण युनिफॉर्म परिधान केल्याबरोबर वर्तनही त्याप्रमाणे बदलणारे.. मला आज भेटलेला हा मुलींचा जबाबदार आणि प्रेमळ बाबा युनिफॉर्म चढवल्याबरोब्बर उद्या माझ्याशी तितकाच कडकपणे बोलेल आणि पार्किंगमधे गाडी नीट लावायला सांगेल!
युनिफॉर्म लई पावरबाज असतात बरं!
September 24, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
poonam,
mast lihil aahes :) boss baddal saheech!!!
malaa waaTat uniform is just a visible thing of a person's job profile. And its the demad of ur position/ designation that makes u behave in particular pattern!!!
’पोलीसांच्या खाकी’चा ’पोलिसी खाक्या’ कधी झाला ते समजलेही नाही...हे वाक्य छान लिहीलंय:-)
"मनातल्या" युनिफॉर्मविषयी मस्त लिहीलंयस.
लगे रहो...:-)
Poonam, mast lihilays.. choti choti observations chan sangitliyes.. :)
By the way, he maayboli var kadhi paste karnar?? :D :D
Chaan khulavla ahe vishay. Awadya apunko :)
Post a Comment