June 12, 2007

बूमरँग (२)

भाग २:-

जनीकांत त्याच्या आलिशान बंगल्यातल्या आलिशान खोलीतल्या आलिशान पलंगावर पसरला होता.. तळमळत होता बिचारा.. नजर दर मिनिटाला शेजारीच पडलेल्या मोबाईलवर जात होती.. पण तो काही वाजत नव्हता.. त्याला आठवले, ८च दिवसांपूर्वी तो किती खुश होता.. त्याच्या स्वप्नातली सुंदरी त्याच्या समोर उभी होती.. स्वर्गातली अप्सराच जणू.. त्याची उर्वशी.. पुरता खुळावला होता तो तिच्यापायी.. आणि तीही गोड हसून त्याच्याकडे पाही, गोड बोले, मोठ्ठे डोळे उघडमीट करे.. हाय! शेवटी त्याने तिला लग्नाचे विचारलेच! घरी आई-बाबा भडकतील याची पूर्ण कल्पना होती त्याला.. पण उर्वशीला त्यांनी एकदा बघीतले की त्यांचा राग कुठल्याकुठे पळून जाईल.. अशी खात्री होती त्याला..

त्याने उर्वशीला ’तो’ प्रश्न विचारताच ती अश्शी लाजली होती की बास! ती लग्ग्ग्ग्गेच ’हो’ म्हणेल अशी अपेक्षा होती बिचार्‍याची.. पण तिने २ दिवस मागून घेतले होते.. त्याला आधी झेपलच नव्हतं ते.. तो.. स्वत: ’रजनीकांत फातर्फेकर’ एका मुलीला लग्नाचं विचारत होता.. आणि ती चक्क ’२ दिवसांनी सांगते’ म्हणाली होती! पण मग त्याला ते ही आवडले होते! माय गॉड.. काय अदा आहे, काय लाजते ही मुलगी या जमान्यातही.. वॉव.. रजनी पार घायाळ!

त्यानंतर २ दिवसांनी भेटली होती त्याची ऊ त्याला.. पण बिचारीचा चेहरा पार सुकला होता.. त्याला पाहून तिच्या डोळ्यात चक्क पाणीच आले.. अरे! ही का रडतीये? हिचा नकार आहे की काय?
"रजनी!!!" ऊ नी एक गोड हाक मारली आणि रुमाल डोळ्याला!
"काय झालं प्रिये? तुझ्या डोळ्यात पाणी का? तुला कोणते दु:ख आहे सांग.. माझ्यापासून काही लपवू नकोस लाडके.."
"रजनी.. आय ऍम सॉरी रजनी.. तू मला लग्नाबद्दल विचारलस.. मला तर आकाशच ठेंगण झालं होतं रजू.. पऽऽऽऽऽण..."
"पण काय राणी?" रजनीला राहवेना
"रजू.." मुसमुसतच ऊ म्हणाली, "रजू, आईचा आपल्या लग्नाला विरोध आहे रे!"
"काऽऽऽऽऽय?? पण काऽऽऽऽऽऽ?????" रजनी पुरता गोंधळला.. उर्वशीच्या आईने त्याला पाहिलंही नव्हतं आणि चक्क नकार!
"प्रिये, का विरोध आहे तुझ्या आईचा? तिला सांगितलस ना मी ’कोण’ आहे ते?"
"हो रे राजा.. आधी तेच सांगितलं मी! पण मॉम्स काही ऐकायच्या मूडमधेच नाहिये! चक्क आणि टोटल नाहीच म्हणाली रे ती.. कित्ती कित्ती मनधरणी केली मी तिची.. पण काही ऐकलच नाही तिने माझं.. कारण काय म्हणली माहित्ये? म्हणाली फातर्फेकर खूप मोठी असामी आहे.. आपली उडी नाही तितकी.. तू तो नाद सोड!"
"असं म्हणाली?"
"बघ ना रजू.. असं म्हणाली.. आणि इतकंच नाही, तर म्हणाली की आता रजनीला भेटायचंही नाही, बोलायचं नाही..." इतकं म्हणून ऊ पुन्हा अश्रू गाळायला लागली..रजनीकांत हे ऐकून हतबद्धच झाला!!! हे असं कोणी आपल्याला, आपल्याविषयी म्हणेल अशी अपेक्षाच नव्हती त्याला..

या गोष्टीला २ दिवस झाले. खरंच ऊचा फोन नाही, की मेसेज नाही.. बोलणं दूर, भेटणं तर अशक्यच!! तळमळत होता बिचारा! आता काय करावे असा विचार करत होता.. चक्क रजनीकांत फातर्फेकरला नकार! हे पचनीच पडत नव्हते त्याच्याकडे! काय नव्हतं त्याच्याकडे आज? तो स्वत: हुशार होता, श्रीमंत तर होताच, सरळमार्गी होता, निर्व्यसनी होता.. वडीलांनी उच्च आदर्श, उच्च विचार त्याच्यापुढे ठेवले होते.. ते तो पाळत होता, त्यावरून चालत होता.. फ़क्त प्रेमात पडला होता इतकंच. ज्या सुंदरीवर तो भाळला होता तिच्याशी लग्न करायची इच्छा होती त्याची.. काय हा इतका मोठा गुन्हा होता? का? का नकार द्यावा त्याला ऊच्या आईने? केवळ तो खूप म्हणजे खूपच श्रीमंत होता म्हणून?? हॉऊ इस इट पॉसिबल??

रजनीला चैन पडेना.. या प्रश्नाचे उत्तर मिळवायचेच या निश्चयाने तो उठला.. त्याने उर्वशीला फोन लावला.. ऊचा उदास आवाज आला..
"हाय रजू.. कसा आहेस तू?"
"ऊ डार्लिंग.. मी अजिबात चांगला नाहिये.. आणि माझी खात्री आहे की तूही माझ्यासारखीच दु:खी आहेस.."
"हो रे रजू.. मॉम्सनी मला अगदी कोंडून ठेवलं आहे रे.. मोबाईलपण तिच्याकडेच असतो, आत्ताही इथे चुकूनच राहिलाय तिने म्हणून तुझ्याशी बोलता तरी आलं! रजूऽऽऽऽ अजून एक वाईट बातमी द्यायची आहे तुला.."
"आता काय झालं राणी?"
"रजू.. मॉम्स माझं लग्न दुसरीकडे ठरवतीये.."
"काऽऽऽऽऽऽय? हे कसं शक्य आहे ऊ???"
"हे असंच आहे रजू.. माझ्या मॉम्सनी एकदा ठरवलं की ठरवलं.. रजू आता तूच मला इथून सोडवू शकतोस रजू.. मला नाही रहायचं इथे.. मुझे यहाँसे ले चलो.." ऊचे हुंदके पुन्हा सुरु झाले..

आता मात्र रजनी पुरता हबकला.. हे सगळं सहन होईना त्याला.. हे असं का घडत होतं, का झालं होतं? "मैं आ रहा हूँ ऊ.." असे म्हणून त्याने फोन कट केला..

ऊनी फोन बंद करून शेजारीच बसलेल्या सुप्रियाला टाळी दिली.. दोघींना मनापासून, गदगदून हसू आलं! सगळं कसं प्लॅन प्रमाणे फ़िट्ट चालू होतं! आता रजनी पेटून उठणार होता, सुप्रियाकडे येणार होता, त्यांच्या प्रेमाची साक्ष देणार होता, तो कसा ऊशिवाय जगू शकणार नाही हे पटवणार होता, आणि शेवटी सुप्रियाची परवानगी घेणारच होता त्यांच्या लग्नासाठी! मग? मग ऊ रजनीची बायको होऊन त्यांच्याकडे ऐश्वर्यात दिवस घालवणार होती! फातर्फेकर आणि परिवाराला कोण विचारतंय.. रजनीसुद्धा त्यांना काही बोलू देणार नव्हता..

दोघी आतूरतेनी रजनीची वाट पहायला लागल्या..

पण त्याला इतका वेळ का लागत होता? त्यांच्या अंदाजानुसार रजनी अर्ध्या तासात यायला हवा होता.. पण ३ तास झाले की.. रजनीकांतची होंडा सिटी काही त्यांच्याकडे येईना.. दोघी अंमळ काळजीत पडल्या..

पण आला.. आला एकदाचा रजनी.. हुश्श्श्श!!

सुप्रिया प्रथमच पहात होती त्याला.. बरा होता की दिसायला.. उंचापुरा, सावळा, स्मार्ट.. आणि श्रीमंत तर होताच होता!!! सुप्रियानी मनातल्यामनात ऊच्या निवडीचे कौतुक केले.. अगदी ’लाखोंमें एक’ जावई मिळाला होता तिला..

रजनीचा चेहरा खूप गंभीर होता.. असणारच ना.. सुप्रियानीदेखील प्रसंगानुरुप रागीट चेहरा केला..

"नमस्कार आई.. मी रजनीकांत फातर्फेकर."
"तू? तू इथे का आला आहेस? आधी चालता हो इथून.."

"आई रागावू नका इतक्या.. माझं ऐकून तरी घ्या.."

"हे बघ, मला तुझं काहीएक ऐकायचे नाहीये! तुमचं आणि आमचं जमणं शक्य नाहीये.. मी उर्वशीला योग्य असं स्थळ पाहिलंय.. ते प्रेमबिम मला काही ऐकायचं नाहीये.. तू तिला विसरावस हे उत्तम!"

"तेच सांगायला आलोय मी आई.. मी तुमच्या मोठेपणासमोर आणि साधेपणासमोर नतमस्तक आहे. जगात पैश्याला महत्त्व न देणारे लोक पण असतात हे मला केवळ तुमच्यामुळे समजले.. आमच्या ’फातर्फेकर’ नावाला तुम्ही भुलला नाहीत, आमची श्रीमंती पाहिली नाहीत.. अहो, ’फातर्फेकरांचा’ मुलगा एखाद्या मुलीला मागणी घालतोय म्हणल्यावर मुलीकडच्या क्षणभरही विचार केला नसता होकार द्यायला.. पण तुम्ही तश्या नाही.. तुम्ही असामान्य आहात.. तुम्हाला तुमच्या आणि आमच्या स्टेटसमधली दरी जाणवली, आणि त्यातून कायकाय प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतील तेही.. ऊशी फोन झाल्यानंतर मी प्रचंड संतापलो होतो.. पण माझ्या वडीलांनी केलेल्या संस्कारांनी मला वाचवलं.. माझ्या वडीलांनी माझ्यापुढे कायमच उच्च आदर्श ठेवले, मोठ्यांना योग्य तो सन्मान द्यायला शिकवलं, त्यांच्या विचारांनी पुढे जायला शिकवलं.. म्हणून मी थोडा थांबलो.. विचार केला.. म्हणलं तुम्ही बोलताय त्यात तथ्य आहे खरं.. ’फातर्फेकरांना’ नाकारून तुम्ही एखादा गरीब, असातसा, सामान्य मुलगा तुमच्या लाडक्या लेकीसाठी का बरं पाहिला असेल? तेव्हा माझ्या लक्षात आलं.. "

रजनी क्षणभर थांबला.. सुप्रियाला जाणवले की काहीतरी चुकतंय.. संभाषण कुठल्यातरी चुकीच्या दिशेनी जात आहे.. पण तिला बोलायला रजनीनी संधीच दिली नाही..

"तेव्हा मला जाणवली, आई, तुमच्या उच्च विचारांची खोली.. तुमची महानता कळली मला.. पैसा काय आज आहे, उद्या नाही.. वाडवडिलांपासून आलेला पैसा काय कोणाकडेही असेल.. पण तो टिकवायला तुमच्या अंगात धमक हवी.. त्यासाठी तुमच्या अंगीही कष्ट करायची तयारी हवी, जिद्द हवी.. मी माझ्या वडिलांच्या पैश्यावर आरामाचं आयुष्य जगत होतो आई.. पण तुम्ही माझ्या डोळ्यात अंजन घातलत.. मला माझ्या स्वत्वाची जाणीव करून दिलीत.. तुमचे लाख लाख आभार.. स्वत: गरीबीत राहिल्याशिवाय, कमी पैश्यात जगल्याशिवाय पैश्याचं मोल माझ्यासारख्या श्रीमंताला कसं कळणार? म्हणूनच आई मी सगळं सोडून तुमच्याकडे आलोय- सगळ्याचा त्याग केलाय मी आई- वडिलांचा पैसा, प्रॉपर्टी, घर, गाडी सगळंच.. मी तुमच्यासारखाच कमी पैसेवाला झालोय आई.. आता फ़क्त मी आणि उर्वशी.. मी तिच्या प्रेमाच्या बळावर भरपूर कष्ट घेईन.. आम्ही पै-पै साठवू आणि स्वबळावर श्रीमंत होऊ.. भले आमच्याकडे पैसा नसेल, पण प्रेम असेल.. आणि असतील तुमचे आशीर्वाद.."

इतकं बोलून रजनीकांत सुप्रियाच्या पायाशी वाकला.. अर्थातच आशीर्वाद घ्यायला.. पण सुप्रियाच चक्कर येऊन पडण्याच्या बेतात होती!


समाप्त!

2 comments:

Anonymous said...

सुप्रिया चक्कर येऊन पडण्याच्या बेतात होती...नंतर काय झाले असेल? लग्न झाले असेल का? की नाही? झाले असेल तर नंतरचा आयुष्याचा राडा कोणी आणि कसा निस्तरला असेल? प्रश्नांचं मोहोळ फुटलंय डोस्क्यात! :-)

भोगवादी, चंगळवादी संस्कृतीचं दर्शन घडवणारी लघुकथा छान लिहिली आहेस:-)

Parag said...

Poonam... Kay lihilas he? :(
Sorry.. Pan ajibat nahi avadali he goshta... Rather tuzya kadun expected navhati..
Maayboli var takali nahis tech bara kelas..
Tu tuzya adhicha goshti n sarkhya goshti parat lihayla laag baghu.. he asa marathi serial types nako... mala he vachun te char divas sasu che athavala.. :((((