May 30, 2007

पंजाबीड्रेस आणि आई..

माझे आई-वडील नुकतेच ऑस्ट्रेलियाला जाऊन आले. सुमारे दोन महिने आधी त्यांनी टूर बूक केली होती. तेव्हाच त्यांना माहितीपत्रक, ’काय करायचे, काय करायचे नाही, काय पहायचे’ इत्यादी असलेली एक भलीमोठी यादी दिली होती. त्यात असे लिहिले होते की समस्त महिलावर्गाने पंजाबी ड्रेस किंवा जीन्स अथवा पॅंट, किंवा तत्सम कपडे घालणे आवश्यक आहे. थोडक्यात, साडी नेसू नये!!

बापरे!! ही म्हणजे आमच्या आईची पंचाईत!! आईने आयुष्यात कधीही साडीशिवाय दुसरे काही परिधान केलेले नाही! आणि आता हे ३ आठवडे साडी नेसायचीच नाही??!!

आमच्या आईला तर तसंही ’खुट्ट’ झालं की टेन्शन येतं.. आता तर काय.. "हे असे नियम कसे काय करू शकतात? मग काय भारतीय बायकांनी ऑस्ट्रेलियाला जायचंच नाही की काय? या वयात काय ड्रेस घालायचे का आम्ही? त्या ओढण्या सांभाळायच्या म्हणजे एक अजून त्रास.. आणि कोणी ओळखीचे भेटले तर काय म्हणतील?" वगैरे वगैरे वगैरे!

माझ्या बाबांची मस्त करमणूक होत होती हे सगळं ऐकून. ते जाणार होते तेव्हा तिथे थंडीचा मौसम असणार होता. त्यामुळे शक्यतो पाय लपेटले जातील असे कपडे घालणे आवश्यक होते. हे आईला बाबांनी सांगायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायच्या मूड मधे नव्हती. शेवटी बाबांनी तिला विचारलेच.. "मग आता तू पंजाबी ड्रेस घालणार नाहीस म्हणून टूर रद्द करू का? का मी एकटाच जाऊ? सांगतो सगळ्यांना ’मंडळी’ ड्रेस घालत नाहीत त्यामुळे टूरला आल्या नाहीत असं." हे इतकं ऐकल्यानंतर आई थोडी शांत झाली.

खरं तर पंजाबी ड्रेस ’आई लोकांनी’ घालणं यात काहीच नवल, विशेष राहिलेले नाही. मध्यमवयीन बायका सर्रास हा वेष घालतात. एकट्या, किंवा मुलींबरोबर जाऊन व्यवस्थित निवड करून मनासारखे ड्रेस घालतात. छान दिसतात. ’या बाईला इतकी मोठी मुलगी आहे?’ असा प्रश्न पडावा इतक्या तरूण दिसतात. सुटसुटीत, सांभाळायला सोपा असा हा ड्रेस. साडी सारखा घोळ नाही.. फ़ॉल, पिको, मॅचिंग ब्लाऊज, त्याचं ते फ़िटींग.. ती टेलरशी वादावादी.. मग तो ठरल्या तारखेला देणार नाही.. साडी घेऊन नेसेपर्यंत किती वेळ जातो मधे! कंटाळा येतो.. त्यापेक्षा ड्रेस तयार मिळतात.. बाजारात जायचे, विकत आणायचा, संध्याकाळी घालायचाही!

पण हे आमच्या आईला कधीही पटलं नाही. तिचं साड्यांवर अतिशय प्रेम. सर्व प्रकारच्या साड्या, अगदी साध्या कॉटनच्या साडीपासून पैठणी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या साड्या तिच्याकडे आहेत, आणि त्यात दरवर्षी हौसेनी भर पडतच असते. त्यातून कॉटन कलकत्ता सर्वात जास्त प्रिय! दर वेळी त्या साड्यांना स्टार्च, इस्त्री वगैरे अगदी प्रेमानी करते ती! त्यामुळे सुटसुटीत, सोपे मार्ग वगैरे माहित नाहीत, असले तरी मान्य नाहीत.

खरं तर तिने पंजाबी ड्रेस हा प्रकारच कधी वापरला नाही.. अगदी लहान असताना त्यावेळी तर परकर-पोलके घालायची पद्धत होती, नंतर अगदी थोडे दिवस स्कर्ट-ब्लाऊज आणि मग थेट साडीच!! आईला शाळेत दहावीत युनिफ़ॉर्म म्हणून चक्क साडी होती.. आणि शाळेत साडी आहेच, तर घरीही आजीनी तिला नेसायला साड्याच आणल्या. ती एकटीच अशी नाही, तिच्याबरोबरीच्या सगळ्याच मुली त्यावेळी साडीच नेसत रोज.. कॉलेजला जाईपर्यंत तर साडीची सवयच झाली. दुसरं काही घालावं अशी इच्छाच झाली नाही कधी. लग्न झाल्यानंतर ती आधी मुंबईला आणि नंतर १० वर्ष तर चक्क चंडीगढ मधे होती. तो तर काय पंजाबीच भाग. गुबगुबीत पंजाबीणीही ड्रेस मधे. तरीही आमच्या आईला कधीही तो प्रकार कधीच घालायचा मोह कसा काय झाला नाही याचे मला आश्चर्यच वाटते.

तर लहानपणापासून कायम म्हणजे कायम- दिवसा, रात्री, सर्व छोट्यामोठ्या प्रवासात, ट्रीप्सना, सहलींना आईला आम्ही साडीतच पाहिलेलं. कधीही गंमत म्हणून, सहज म्हणूनही तिने ड्रेस घातला नाही.. आणि आता ती ३ आठवडे फ़क्त ड्रेसच घालणार म्हणल्यावर आमच्या मनात एकच विचार.. ’आई ड्रेसमधे कशी दिसेल?’ :-)

मग काय फ़र्मानं निघाली- मी, माझी बहीण आणि मावशी- तुमचे असतील, नसतील ते सर्व ’ढगळ, सैल, तोकडे नसलेले, लांबरुंद असलेले, चुडीदार नसलेले, सलवारी असलेले, गळे लहान असलेले, स्लीव्हलेस नसलेले आणि शक्यतो कॉटनचे’ असे सर्व ड्रेस त्यांच्या ओढण्यांसकट आणून द्या!!! या अटींमधे खरं तर आमचे किती ड्रेस बसणार होते देवच जाणे. सध्या चुडीदारची फ़ॅशन असल्यामुळे माझे बहुतांश ड्रेस तसलेच. माझी बहीण ’खूपच जास्त व्यवस्थित’ असल्यामुळे तिच्याकडे असलेल्या सलवारी आणि त्याच्या मॅचिंग ओढण्या यांचा मेळ असतोच असे नाही. मावशी जरा मॉड आहे आमची. तिचे ड्रेस थोडे भडक, थोडे फॅशनेबल असतात- ते तर आमच्या आईला चुकूनही पसंत पडायचे नाहीत.. असं करता करता आमचे तिघींचे मिळून १५ एक ड्रेस आम्ही आईच्या सुपूर्त केले.

मग ट्रायल! ’सगळे ड्रेस घालून पहा, नीट होत आहेत ना पहा’ असं आम्ही सांगितल्यामुळे आई रोज २-३ ड्रेस घालून पहायला लागली. ते करता करता चक्क ’सवय व्हावी म्हणून’ त्यात वावरायलाही लागली. (एक दिवस आई स्वयंपाकघरात ड्रेस मधे वावरत असताना बाबांनी ओळखलंच नाही आईला. थेट स्वयंपाकघरात कोण बाई आली असा विचार करत बसले होते काही वेळ! :-) ) वावरता वावरता आईला ड्रेसच्या सोयीची महत्ता पटली. पटकन खाली बसता येतंय, झटकन हात वर करता येतोय, कोणी आलं दारावर तर लगेच बघता येतय.. हे जाणवू लागलं. तरीसुद्धा आई म्हणत होती की रात्री हॉटेलमधे नेसायला साड्या घेऊन जाते म्हणून! आम्ही डोक्याला हातच लावला!! तिघींनी सर्व कौशल्य पणाला लावून आईचा तो बेत हाणून पाडला वर अजून २-३ ड्रेस दिले- थोडे जुने- रात्री घालायला म्हणून!

ड्रेसची सवय होईपर्यंत ऑस्ट्रेलियाला गेलेही आई-बाबा. टूर ठरल्याप्रमाणे नीट पार पडत होती. अधून मधून फोन करत होते ते. आम्हाला एकच उत्सुकता- आईचं आणि ड्रेसचं जमतय की नाही? :-)

आई-बाबा परत आले. आम्ही संध्याकाळी वार्ता घ्यायला हजर! पहिला प्रश्न- कसे आहात? दुसरा- आई, ड्रेस मधे छान वाटतं ना? आई खुश दिसत होती, त्या अर्थी तिचं आणि ड्रेसचं जमलं होतं! आम्ही आगाऊपणे बाबांना विचारलं "बाबा आई छान दिसते की नाही ड्रेसमधे?" बाबापण ’होऽऽऽ’ म्हणाले. आई नुसतीच हसली. दुसर्‍या दिवशी फोटो आले. आई खरच छान दिसत होती ड्रेसमधे. आई मुळात बारिक आहेच. त्यामुळे तिला ड्रेस शोभून दिसत होते. असाही साक्षात्कार झाला की ड्रेस घातल्यामुळे आईच्या आणि माझ्यामधे असलेलं साम्य जास्तच लक्षात येतंय! त्यामुळे मला आई ड्रेसमधे जास्तच आवडली :-)

मग आमचं पुन्हा आईला चिडवणं सुरु झालं.. आई इतके दिवस घातलेसच की नाही ड्रेस? मग आता इथेही घाल की, काय फ़रक पडतो? होईल आपोआप सवय. बाबा पण ’हो’ म्हणाले. लगेच बाजारात जाऊन आईसाठी ५-६ ड्रेस घेऊन या असंही म्हणाले. पण आमच्या अपेक्षेप्रमाणे आई ठामपणे ’नाही’च म्हणाली. कधीतरी गंमत म्हणून घालणं वेगळं, आणि रोज घालणं वेगळं. त्यामुळे नकोच असं म्हणाली. आम्ही खट्टू झालो थोड्या.

नंतर रात्री सहज विचार करत होते की खरंच आई रोज ड्रेसमधे वावरायला लागली तर कशी दिसेल ना? थोडे दिवस सवय होईपर्यंत तरी आई ही ’आई’ वाटणारच नाही! :-) आई म्हणजे कशी कॉटनची साडी नेसलेली, कंबरेला पदर खोचून कामं उरकणारी अशीच डोळ्यासमोर येते. माझ्याबरोबर बाजारात जाऊन स्वत:साठी ड्रेस आणणारी, नवीन फॅशनबद्दल बोलणारी अशी आई स्वीकारायला मनातून जरा वेळच लागला असता!! विचार फारच बालीश होता माझा, पण चमकून गेला खरा!

रात्री मला स्वप्न पडलं.. मी, बहीण आणि आई कोणत्यातरी ’प्रचंड महत्त्वाच्या विषयावर’ चर्चा करतोय, गप्पा मारतोय असं काहीतरी.. नीट आठवत नाही की काय बोलत होतो, पण एक मात्र नक्की.. स्वप्नात आईने साडीच नेसली होती! :-)

10 comments:

Anonymous said...

घरोघरी मातीच्या चुली! :-)
वातावरण आणि प्रसंग जरा ओळखीचे वाटले.
मस्त लिहीलंयस! :-)

Anonymous said...

"एक दिवस आई स्वयंपाकघरात ड्रेस मधे वावरत असताना बाबांनी ओळखलंच नाही आईला. थेट स्वयंपाकघरात कोण बाई आली असा विचार करत बसले होते काही वेळ!"......

फुल HHPV :-)

अपर्णा said...

पूनम, अगदी अगदी. माझी आई पण आत्ता दार्जिलिंगला गेली होती तेव्हा हाच प्रकार झाला. किती समजावलं आईला तरीही तिने एकही ड्रेस नेला नाही बरोबर. सगळ्या साड्या घेऊन गेली :)

vivek said...

माझ्याही आईला आता कुठेतरी पाठवलं पाहिजे, म्हणजे तरी ती ड्रेस मधे कशी दिसते ते कळेल. छान लिहिलं आहेस. तू जे काही लिहितेस ते आसपासच घडतंय किंवा घडून गेलंय असं वाटतं. अगदी "घरगुती" लिखाण. घरगुती जेवणाइतकंच चविष्ट :-)

Kamini Phadnis Kembhavi said...

स्वप्नात आईने साडीच नेसली होती! :-)

Vaishali Hinge said...

ajach mee haa ch vichaar karat hote aani tujhyaa blog var vaachyalkaa milaale,
aataa pudhachyaa mahinyaat aai ikade yenaar aahe aani dress ghalanaar naahee mhanaalii ..baghu aataa (पन आई माझ्या ही स्वप्नात साडीतच होती):)

Vaidehi Bhave said...

khup chan lihileys..lahansach ani bahutek marathi manasanchya gharatla prasang..pan mast sadar kelays...keep it up...

Prajakta said...

mastach!!!!....agadi majhya aai chi aathvan jhali..ti pan asheech...:)

श्रद्धा said...

माझी आई अगदी अशीच आहे. पंजाबमधील वास्तव्य सोडले तर बाकी तिचा 'साडीच नेसण्याचा इतिहास' तुमच्या आईसारखाच आहे. आई अमेरिकेला गेली होती तरी तिने एकदाही ड्रेस घातला नाही. उलट आल्यावर तिच्या अगदी घरातल्या साड्यांचेही अमेरिकनसुद्धा कसे कौतुक करत होते, ते आम्हाला खडसावून सांगत होती. :-|

बाकी 'साडीशिवाय आई "आई" वाटणार नाही' - १००% मान्य! :)

मनोहरपी said...

माझी आई सुद्धा नेहमी साडीच नसते. जवळपास वयाच्या ४५ नंतर तिने पहिल्यांदा पंजाबी ड्रेस घातला. तो प्रसंग तसा धक्का देणारा होता. मी तो शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला. पण इथे पोस्ट करणे योग्य होईल का नाही ही शंका आहे. पण घरोघरी मातीच्या चुली हे मात्र पटले.