नचिकेतची शाळा आज संपली.. शाळा म्हणजे प्लेग्रुप.. गेले दीड वर्ष या शाळेत जात होता तो.. तिचा आज शेवटचा दिवस होता.. मुलं खूप मजेत होती.. कारण हा सगळाच आठवडा 'फन वीक' होता.. रोज काही ना काही खाऊ मिळत होता, वेगेवेगळ्या गोष्टी चालू होत्या शाळेत- एक दिवस स्पोर्ट्स डे, एक दिवस बाहुलीचं लग्न, एक दिवस कुकिंग, आणि आज शेवटचा दिवस- आईबाबांना भेटणं, त्यांना मुलाच्या प्रगतिबद्दल सांगणं आणि निरोप देणं! सर्व शिक्षिकांच्या डोळ्यात पाणी होतं..
मुळात प्लेग्रूप मधे जाणारी मुलं असतात अडीच ते साडेतीन वर्षांची.. नचिकेतला तर आम्ही तो सव्वादोन वर्षाचा असतानाच शाळेत घातलं होतं.. या वयाची मुलं प्रचंड hyperactive असतात.. 'तिसरं आणि विसरं' ही म्हण सार्थ करतात.. मनात प्रचंड कुतूहल, एक प्रकारची अस्वस्थताच.. शेकडो, एकापाठोपाठ येणारे प्रश्न, कधीकधी आपल्यालाही निरुत्तर करणारे, आणि कु्तूहलापोटी केलेले अक्षरश: उपद्व्याप!
या मुलांना control करणं, त्यांना काही शिकवणं, त्यांची ऊर्जा मार्गी लावणं हे खरं कौशल्याचं आणि पेशन्सचच काम. एक मूल कोणाचं काही ऐकायच्या मनस्थितित नसतं, पण शेजारचा मुलगाही तसंच करतोय म्हणल्यावर तो आपोआप imitate करायला लागतो. 'समूह शिस्त' मुलांमधे literally works! तसंच घरातल्या लोकांचं ऐकायचं नाही, पण टीचरचं ऐकायचं.. टीचर वाक्यम् प्रमाण! टीचर म्हणजे दैवत. आईला टीचरसारख काही येत नाही हा ठाम विश्वास. त्यामुळे गोड बोलून त्या चिमुरड्या मुलांना handle करणार्या टीचर्सचबद्दल मला खूपच आदर वाटतो!
नचिकेतला शाळेत घातलं तेव्हा त्याला बरंच बोलता येत होतं.. पण शब्दसंग्रह, शब्दसंपत्ति खरी वाढली ती शाळेमुळेच. पहिल्या वर्षी आमची त्याच्याकडून अभ्यासाची अजिबात अपेक्षा नव्हती.. त्याचा वेळ सत्कारणी लागावा, त्याने काही शिकावं इतकच.. पण लवकरच तो छोटी गाणी शिकला, मूड असेल तर म्हणायलाही लागला घरात. शाळा मनापासून आवडू लागली.. इतकी की एखाद्या दिवशी सुट्टी असेल तर 'आज शाळा का नाही' हे समजावता समजावता मला नाकी नऊ यायचे!
मागच्या वर्षी जून महिन्यात त्याची ही शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरु झाली.. आता तो तसा मोठा झाला होता आणि कळतही बरच होतं.. शाळेत हा एकदम comfortable! अगदी सवयीची असल्यासारखं वावरायचा.. नवी मुलं होती त्यातली काही काही मुलं खूप म्हणजे खूपच रडायची, ऐकायची नाहित काहीच, आईला चिकटून असायची.. अश्या वेळी नचिकेत अगदी आपणहोऊन 'ये आपण खेळू, रडू नकोस' वगैरे म्हणायचा.. टीचर त्याबद्दल त्याचं खूप कौतुक करायच्या.. पण जितका समजूतदार तितकाच खोडकरही.. शाळा सरावाची, गाणी माहितीची, टीचरांना तर गोड बोलून कधीच आपलसं केलेलं.. मग काय, हा आणि असेच अजून काही २-४ चेहरे मिळून वर्गात दंगा करायचे. शिक्षेची भीती घातली की लगेच एवढेसे चेहेरे करायचे, की पुन्हा सुरु.. सर्व उपक्रमात हा पुढे.. gathering , गोपाळकाला, रंगपंचमी.. प्रगति मात्र लक्षात येईल अशी चांगली होती.. टीचर म्हणल्या होत्याच की गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या प्रगतित खूप फरक जाणवेल तुम्हाला.. आता साभिनय गाणी, आवाजात चढ-उतार, ईंग्लिशचे ज्ञान.. सगळेच वाढले..
ही शाळा फ़क्त प्लेग्रुपपुरतीच होती.. त्यामुळे jr kg साठी नवी शाळा पाहिली, त्यात त्याची admission ही झाली.. सगळ्याच बरोबरीच्या मुलांच्या वेगवेगळ्या शाळांमधे admissions झाल्या.. करता करता शाळेचे शेवटचे दिवस जवळ आले. हे दीड वर्ष कसं गेलं खरच समजलं नाही..
शेवटच्या दिवशी माझ्याप्रमाणेच बाकी पालकही आले होते. सगळ्यांनाच काहीतरी चुकल्यासारखं होत होतं.. टीचर प्रत्येकाला आवर्जून सांगत होत्या- मुलांना नंतरही भेटायला आणा.. त्यांची प्रगती कळवत राहा.. मी त्यांना भेटले तेव्हा नचिकेतचं खूप कौतुक केलं त्यांनी.. well behaved boy, will do very well in future .. असं म्हणाल्या.. अर्थात हे कमीजास्त फरकाने सगळ्यांनाच सांगत असणार त्या.. पण ते ऐकून मला मात्र भरून आलं.. ही शाळा छोटी होती, शिस्त असली तरी कडक नव्हती, शक्यतो मुलांना सांभाळून घेत होते, मुलंही लहानच होती त्यामुळे त्यांच्या उपद्व्यापांचे प्रमाण कमी होते.. नवी शाळा मोठी होती, जास्त professional होती.. तिथे मुलांचे individual कौतुक कोण करतय.. लक्ष दिलं तरी प्रेमानी जवळ घेणं कमीच मोठ्या शाळांत.. कसं होईल माझ्या मुलाचं, टिकाव लागेल ना त्याचा.. सुरक्षित वातावरणातून एकदम बाहेर पडल्यावर गोंधळायचा तर नाही ना.. एक ना दोन.. हजार शंका आणि mixed feelings! त्याचं बालपण, निरागसता संपल्यासारख वाटायला लागलं उगाच.. तो खरच मोठा होणार हे पचनी पडत नव्हतं!
शेवटी सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो.. बाहेर पडल्यावर त्याला म्हणले.."नचि, ही शाळा संपली आता.. इथे पुन्हा नाही यायचं!" तर तो मजेत म्हणला.. "मग काय झालं आई.. संपली तर संपली.. मोठी शाळा आहे ना.. तिथे जायचं.. तिथे माझ्याबरोबर सार्थक (अजून एक मित्र) पण आहे.. मज्जा ना?"
खुशीत होता.. माझीच वाक्य मलाच ऐकवत होता.. खरच मोठ्या शाळेत जाण्याइतका मोठा आणि समजूतदार झाला होता आणि मी मात्र उगाच नको त्या गोष्टींचा विचार करत होते.. ही शाळाही एकेकाळी नवीच होती ना.. इथे रमला तसा तिथेही रमेल.. मुलांचं आयुष्य किती सहज, साधं असतं ना? त्यांचा मनासारखच innocent , निर्मळ.. नको त्या emotions ची ओझी त्यांच्यावर नसतात हे फ़ार बरं असतं.. ही शाळा आपल्याला सोडायची आहे, पुढे मोठ्या शाळेत जायचे आहे.. खूप शिकायचे आहे.. जे अपरिहार्य आहे ते सहजपणे स्वीकारणं केवळ मुलांनाच जमतं, नाही?
आणि असंही नाही की तो ही शाळा, या टीचर विसरेल.. त्यांची आठवण, बोलायची पद्धत, शिकवलेली गाणी त्याला कायम लक्षात राहतील.. पुन्हा जेव्हा त्या टीचर भेटतील तेव्हा तो उत्साहानी त्यांना नव्या शाळेबद्दल सांगेल, स्वत:बद्दल सांगेल.. त्यांनाही त्याची प्रगति ऐकून खूप आनंद होईल.. मी मात्र कदाचित "तुमची शाळा किती छान होती, त्यात कसा रमला होता" हे जुनंच बोलत राहिन.. तो मोठा झालाय, हळुहळू स्वतंत्र होतोय हे accept करणं माझ्यातल्या 'आई'ला मान्य करणं काही दिवस तरी अवघडच जाईल!
May 18, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
mastach!
Nachiket che bhavvishwa far chhan rangavale aahes!!
I can imagine myself in the same condition 1 year down the line :)
Post a Comment