May 1, 2018

Kia Ora New Zealand- भाग २



ऑकलंड
भारतातून न्यु झीलंडला विमानाने जाण्याकरता मुंबई-ऑलकंड किंवा मुंबई-क्राईस्टचर्च असे पर्याय आहेत. कोणती विमान कंपनी आहे त्यानुसार मधले थांबे आणि विमानप्रवासाकरता लागणारा वेळ बदलतात. आमचा प्रवास पुणे-मुंबई-बॅंकॉक-सिडनी-ऑकलंड असा खूप लांबचा होता. प्रचंड एक्साईट होऊन निघालो. सुरूवातच एकदम छान झाली. मुंबईची फ्लाईट वेळेवर निघाली. बॅंकोक, सिडनी हे थांबेही अगदी वेळेवर पार पडले. आता उरलेला सिडनी-ऑकलंड हा प्रवास अवघ्या तीन तासांचा. एव्हाना प्रवास करून कंटाळा आला होता, आणि आता न्यु झीलंडमध्ये प्रवेश करण्याकरता अगदी आतूर झालो होतो. तीनच तासात आपलं ड्रीम डेस्टिनेशन येणार याची एक्साईटमेन्टही होती; आणि माशी शिंकली!
सिडनीचं विमान एकदम वेळेवर निघालं, आकाशात स्थिरावलं आणि अचानक घोषणा झाली… आपण विमान परत सिडनीला नेतोय! च्यामारी, हे काय? आमच्या कपाळाला आठ्या! पण आश्चर्य म्हणजे, समस्त गोरे निर्विकार! एकानेही विचारलं नाही, ’का बाबा?’ आम्हीच एका स्टुवर्डला थांबवून विचारलं, की झालंय काय? तर तो म्हणाला, कूलिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे! गंमत बघा, आकाशात वेळेवर उडालेलं विमान कोणतीही इमर्जन्सी नसताना, कोणतीही टेररिस्ट थ्रेट नसताता, कोणतीही मेडिकल कन्डिशन नसताता केवळ टेक्निकॅलिटीवर चक्क रिवर्स नेत होते!! अहो, हा चेक विमान हवेत झेपावण्यापूर्वी करायचा असतो ना? असो. आमचं कोण ऐकणार होतं? विमान एक तास न्यु झीलंडच्या दिशेने गेलं आणि परत निघालं! L बर, परत गेल्यावर एक तास आम्ही नुसतेच विमानात. फक्त घोषणा- चेकिंग सुरू आहे. मग सांगितलं, चला एअरपोर्टवर, वेळ लागणार आहे! आलो निमूट, दुसरं करणार काय? तिथे चक्क तीन तास गेले. आमचं सगळं पुढचं नियोजन बोंबललं. पण नाईलाज को क्या इलाज? शेवटी एकदा एकूण सहा तासांच्या डीलेनंतर परत एकदा आम्ही सिडनी- ऑकलंड प्रवास सुरू केला.
न्यु झीलंडच्या एरपोर्टवर आणखी एक महत्त्वाची फॉर्मॅलिटी पूर्ण करायची होती. न्यु झीलंड हा एक बेट-देश आहे आणि या देशाला आपल्या नैसर्गिक संपत्तीचा आणि वारशाचा अभिमान आहे. त्यामुळेच, परदेशातून येणा-या प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची कसून चाचणी केली जाते. या देशात काही पदार्थ आणायला पूर्ण बंदी आहे, तर काही पदार्थ तुमच्याबरोबर असतील, तर तुम्ही ते ’डिक्लेअर’ करणं अपेक्षित आहे.
१)      कोणत्याही प्रकारची माती या देशात नेता येत नाही. सामानात नमुन्यादाखल असलेली माती तर चालत नाहीच, पण पायातल्या बुटांवरही वाजवीपेक्षा जास्त माती असलेली चालत नाही. सामानात पादत्राणांचा एखादा जास्तीचा जोड असेल, तर त्याचाही तळवा ’स्वच्छ’ असावा लागतो. तो तसा नसेल, तर ते बूट विमानतळावर ठेवून घेतले जाऊ शकतात!
२)      कोणत्याही प्रकारच्या ’बिया’ (ज्या जमिनीत रुजल्या तर त्यांच्यापासून झाड उगवू शकतं) या देशात तुम्ही नेऊ शकत नाही. यात वाळवलेल्या बिया, सुकामेव्यातल्या बिया आणि ताजी फळंही समाविष्ट आहेत.
३)      कोणत्याही प्रकारची दुग्ध उत्पादनं, जसे की दुधाची भुकटी, खवा, तूप, मलई बर्फी, दूध इ. आणायला परवानगी नाही.
आपण प्रवासाला जातो, तेव्हा ’खाऊ’ म्हणून आपल्याकडे सहसा लाडू असतात (पण लाडवात तूप असतं), चिवडा असतो (त्यात असतात दाणे), इन्स्टन्ट चहाचे पाऊच असतात (त्यात असते दुधाची भुकटी). मग हे असे पदार्थ न्यायचेच नाहीत? तर, तसं नाही. कोणताही खाद्यपदार्थ पदार्थ नेऊ शकतो. तो नेताना दोन पथ्य पाळायची:-
१)      शक्यतो खाऊ ब्रॅन्डेड आणि पॅक्ड असावा. कारण त्यावर त्याचे घटकपदार्थ लिहिलेले असतात. म्हणजेच अधिका-यांना शंका आली, तर ते घटक ते वाचू शकतात.
२)      घरगुती खाऊ नेला असेल, तर विमानातच, उतरण्यापूर्वी एक फॉर्म दिलेला असतो, त्यावर तुम्ही काय काय नेलं आहे हे रीतसर ’डिक्लेअर’ करून टाकायचं. त्या फॉर्मवर असे प्रश्न असतात- Are you carrying any seeds or nuts? आमच्याकडे दाण्याची चिक्की होती, म्हणून आम्ही ’Yes’ वर खूण केली. विमानातून उतरल्यानंतर जेव्हा हा फॉर्म देऊन परत एकदा तपासणी झाली, तेव्हा फॉर्म वाचून अधिका-याने विचारलं, कोणत्या बिया आहेत? मी ’peanuts in an energy bar’ असं सांगितलं. त्याचं समाधान झालं. चिक्की आमच्याकडेच राहिली.  
३)      कटाक्षाने एक पाळायचं, की काहीही लपवायचं नाही. जे जे नेलं असेल ते ते सगळं घोषित करून टाकायचं. पुष्कळदा ते फक्त फॉर्म वाचून सोडून देतात. कधीकधी सामान उघडून दाखवायला सांगतात. पण लपवालपवी करून पुढे निघालो आणि त्यांना शंका आली, तर भर विमानतळावर सर्वांसमोर आपली झडती घेतली जाऊ शकते. त्यात आक्षेपार्ह काही सापडलं, तर ते सामान ते फेकून तर देतातच, पण क्वचित दंडही होऊ शकतो. त्यांच्याकडे प्रशिक्षित असे ’स्निफर डॉग्ज’ असतात. त्यामुळे त्यांच्यापासून काहीच लपू शकत नाही.

आता या कुत्र्यांची आणि आमची गंमत सांगते. आम्ही ह्या सर्व तपासणीतून बाहेर आलो. सामान घेऊन चालायला लागलो आणि एक कुत्रा लागला की आमच्या मागे! अधिकारीही चक्रावले, कारण आम्ही सगळंच डिक्लेअर केलं होतं आणि त्यांचं समाधानही झालं होतं. पण कुत्र्याला आमच्या सामानातली एक ’सॅक’ फारच आवडली होती. तिची परत कसून तपासणी झाली. सगळं सामान काढलं, सॅक पूर्ण उलटीपालटी केली, तरी त्यात काहीच सापडलं नाही. तरी कुत्रा का थांबवतोय? मग लक्षात आलं! आम्हाला विमानात खायला ’संत्र’ दिलं होतं. ते आम्ही तिथेच खाल्लं होतं, पण ती पिशवी आमच्या सामानात होती, तिला संत्र्याचा वास येत होता! संत्र हे ’बी’वर्गीय फळ असल्याने, ते न्यु झीलंडमध्ये आणायची परवानगी नाही. कुत्र्याला याचं ट्रेनिंग दिलेलं होतं! वास येत असल्यामुळे तो आम्हाला अडवत होता. शेवटी अधिका-याने ती रिकामी पिशवी त्याला दाखवली, त्याच्यासमोरच ती टाकून दिली… त्यानंतर कुठे श्वानभाऊंनी आमची वाट सोडली. त्याची कर्तव्यदक्षता पाहून आम्ही थक्क झालो! अधिका-यांनीही त्याला शाबासकी आणि खाऊ दिला आणि आम्हाला अनेकदा ’सॉरी’ म्हणाले. त्या इमानदार प्राण्याचा फोटो काढायची तीव्र इच्छा माझ्या मुलाला झाली होती, पण तो काही फारसा ’फ्रेन्डली’ दिसत नव्हता, त्यामुळे तो बेत रद्द करून अखेर आम्ही न्यु झीलंडच्या भूमीत पाय ठेवला!
*****
ऑकलंड हे न्यु झीलंडमधलं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं बंदर-शहर आहे. न्यु झीलंडच्या एकूण ४७ लाख लोकसंख्येपैकी १७ लाख लोक एकट्या ऑकलंडमध्ये राहतात! ऑकलंडमध्ये मूलनिवासी माओरी, युरोपियन, अमेरिकन, भारतीय आणि अन्य एशियन लोक अगदी गुण्यागोविंद्याने राहतात. ऑकलंडचा भूभाग एकेकाळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या जमिनीवरचा आहे, त्यामुळे शहरात तीव्र चढ-उतार आहेत. ऑकलंडला खूप मोठी दोन व्यावसायिक बंदरं आहेत. गंमत म्हणजे, एक बंदर पॅसिफिक महासागरात आहे, तर एक तास्मान समुद्रात! प्रचंड गजबज असलेल्या या शहरात पार्किंगची आणि एकूणच रहिवासाची समस्या तीव्र आहे. कामकाजाच्या दिवसात शक्यतो लोकांना बस-ट्रेनने प्रवास करण्याकरता प्रोत्साहन दिलं जातं. नवीन लोकसंख्येला सामावून घेण्याकरता ठिकठिकाणी नवी बांधकामंही चालू आहेत. इतके दिवस छोटी, टुमदार स्वतंत्र घरं बांधली जात असत, पण आता तिथेही उंच इमारती बांधल्या जात आहेत. हे शहर राहण्याच्या दृष्टीने महाग आहे, तरीही इथे     मिळणा-या व्यावसायिक संधींमुळे समस्त नव्या-जुन्या न्यु झीलंडवासियांचा ओढा याच शहराकडे आहे हेही खरं!
ऑकलंडमध्ये आम्ही ’ऑकलंड दर्शन’ बसने फिरलो. ड्रायव्हर-कम-गाईड बाईने बस चालवता चालवता अनेक सुंदर स्थळं दाखवली, त्यांची माहिती सांगितली, काही ठिकाणी उतरवून फिरायला मोकळा वेळ दिला. नावाजलेले ऑकलंडचे विद्यापीठ, हार्बर ब्रिज, ऑकलंड आर्ट गॅलरी, एक्वेरियम, बागा अगदी पाहण्यासारखे आहेत. बंदरावरून समोरच ’रांगिटोटो’ नावाचं बेट दिसतं, जे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेच तयार झालेलं आहे. आज तिथे कोणताही धोका नाही त्यामुळे ज्वालामुखी झालेल्या या प्रदेशाच्या अर्ध्या दिवसाच्या सहली तिथे जातात. ही एक वेगळी सहल करायला आम्हाला आवडली असती, पण आम्हाला आधी त्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही, त्यामुळे आमची ही सहल हुकली. बंदरावर जेट्टीच्या काठाने अनेक छोटी रेस्टॉरंट्स आहेत. सकाळी गेलात, तर बोटीनं आलेले ताजे मासे तिथे ताबडतोब भाजून खायला मिळू शकतात. आम्ही दुपारी गेलो होतो, त्यामुळे ते काही खायला मिळाले नाहीत, पण नुसतं जेट्टीच्या काठाने हिंडण, बोटींची आणि जहाजांची ये-जा बघणं हाही एक मस्त अनुभव होता. ऑकलंडचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे स्काय टॉवर. ३२८ मीटर उंची असलेला हा टॉवर ऑकलंडची शान आहे. शहरात कुठूनही हा टॉवर दिसतो आणि स्कायलाईनवर अतिशय मोहकही दिसतो. टॉवरच्या आत वर ५०व्या मजल्यापासून वेगवेगळ्या  लेव्हल्सवर फिरतं रेस्टॉरंन्ट, कॅफे, स्कायवॉक, बंजी जंपिंग अशा सुविधा आहेत. याची रचना गोल असल्यामुळे संपूर्ण शहराचा नजारा दिसतो. तिथे स्कायवॉक करावासा वाटत होता. टॉवरच्या आत एका ठिकाणी जमिनीवर फरशीऐवजी काच आहे आणि काचेतून थेट खालचा रस्ताच दिसतो. संपूर्ण सुरक्षित काचेवर उभं राहतानाही पोटात गोळा आला, त्यामुळे स्कायवॉकचा विचार सोडला. त्या ऐवजी कॅफेमध्ये गरमागरम हॉट चॉकलेट पीत समोर पसरलेल्या समुद्राकडे निवांत बघत बसलो.
पुण्याहून निघून आता किती तास झाले होते, याचा हिशोबच करावा लागत होता. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात उगाचच वेळ गेला होता. प्रचंड दमणूक झाली होती. तरी आता ते सगळं मागे पडलं होतं. आता स्काय टॉवरमध्ये फारच मस्त वाटत होतं… अंत भला तो सब भला असं म्हणतो ना, अगदी तसंच… आपण एका अतिशय गजबजलेल्या शहराच्या मध्यात, खूप उंचावर बसलो आहोत, आजूबाजूला गर्दी असली तरी ती त्रासदायक नाही, आपल्यालाही कोणतं व्यवधान नाही, अनेक महिने पाहिलेलं न्यु झीलंडचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आणि आपण आज ऑकलंडसारखं महत्त्वाचं शहर थोडं का होईना फिरलो आहोत याची सुखद जाणीव होत होती. काही वेळ आम्ही तसेच नि:शब्द बसून राहिलो. असे अगदी मोजके क्षण असतात, जेव्हा मनात काठोकाठ केवळ आनंद भरून राहिलेला असतो. ती वेळ त्यापैकी एक होती.
**** 
क्रमश: 

(या लेखाचा काही भाग ’मेनका, २०१८ च्या मार्चच्या अंकात पूर्वप्रकाशित झालेला आहे.)

0 comments: