March 21, 2017

लिरिकवाला गाना- चन्ना मेरेया

’प्रेमभंग’ हा किती दु:खी करणारा शब्द आहे ना! इंग्रजीत तर त्याला “heartbreak” असा शब्द आहे! तुटलेलं, भंगलेलं हृदय…कोणाचा तरी प्रेमभंग झालेला आहे, s/he is heartbroken असं ऐकलं की ’आईग्गं, च्च्च” असे शब्द आपोआप उमटतात, माहित नसलेल्या व्यक्तीबद्दलही सहानुभूति वाटायला लागते, ती किती दु:खी असेल, तिला किती एकटेपणा वाटत असेल याची कल्पना येऊन आपणही दोन उसासे सोडतो.

प्रेम ही जितकी प्राचीन भावना, तितकेच प्रेमभंगाचे दु:खही. सांगा ना, किती लोकांचं प्रेम खरंच संपूर्ण यशस्वी होतं? आपल्याला कोणीतरी आवडतं आहे हे कबूल करेपर्यंत त्यात अनेक “पण” अलगद प्रवेश करतात. आपण कोणालातरी आवडतो आहोत ही सुखद जाणीव होईपर्यंत समोरून एकेक अवास्तव अपेक्षा पुढे यायला लागतात. स्वभाव असतात, ईगो असतात, परिस्थिती असते… प्रेमाच्या वाटेत शत्रूच जास्त असतात…

एकतर्फी प्रेम हे तर प्रेमभंगाचं सर्वात मोठं कारण! एखाद्यावर जीव तोडून प्रेम करावं, पण त्या व्यक्तीला आपल्याबद्दलचं प्रेम reciprocate करता येऊ नये यापरतं दु:खद काय असावं?! चूक कोणाचीच नसते. पण, ती व्यक्ती त्या अर्थाने नाहीच प्रेम करू शकत, तिचं chemical programming नाहीच तिला ती परवानगी देत… काय करणार? ती काही दुष्ट नसते, निष्ठुर नसते… पण ती प्रेमही करू शकत नसते. मग ही पहिली व्यक्ती तडफडते, खूप प्रयत्न करते, आशा ठेवते, अपेक्षा ठेवते… आणि अखेर हरते! एक क्षण असा येतो की मग त्या व्यक्तीचं स्वत्व तिला म्हणतं, चल… आपलं काम आपण केलं. प्रामाणिकपणे प्रेम केलं, ते सफल व्हावं म्हणून मनापासून प्रयत्न केले… ते प्रेम समोरच्याकडे पोचलं, पण परत आलं नाही… प्रयत्न केले, पण चीज झालं नाही… हरकत नाही. आता आपलं काम संपलं. निघूया इथून. आपल्यापाशी आपल्या प्रेमाची तिजोरी आहे, काठोकाठ भरलेली. तिच्यापाशी आपल्या आठवणींचं घबाड नसेल एखादवेळी, पण छोटीशी पूंजी तरी असेलच की नाही? असेल, नक्की असेल. अरे, आपणही प्रेम केलंय, जीव देऊन जीव लावला आहे… तो असा वाया कसा जाईल?

अगदी याच भावना मांडल्या आहेत अमिताभ भट्टाचार्यने या गाण्यात, या कडव्यात. त्याचं तिच्यावर प्रेम आहे, ’सारी हदे पार करे’वालं प्रेम. पण ती प्रतिसाद देऊ शकत नाही… तिचा जीव जडलाय दुस-याच कोणावर तरी आणि आता ती त्याच्याशी लग्नही करतेय. असुदे. ती सुखी आहे ना? आनंदात आहे ना? हेच तर हवं होतं… हां, ती आपल्याबरोबर आनंदात असायला हवी ही तमन्ना होती… नाही झाली पूर्ण. ओके. लेट्स फेस इट, निघूया. आपण जातोय हे तिलाही डाचतंय. पण आता आपलं निघणं अपरिहार्य आहे. जाता जाता थोडं काहीतरी जुनं आठवूया. मला खात्री आहे, तिलाही त्या मोमेन्ट्स आठवतील. आणि आता निरोपाच्या वेळी रडणं नको… छान आठवणी काढू आणि निरोपाची वेळही साजरी करू…    

अमिताभ म्हणतो,

मेहेफिल में तेरी हम ना रहे तो, गम तो नही है गम तो नही है
किस्से हमारे नजदिकियों के, कम तो नही है कम तो नही है
कितनी दफा सुबह को मेरी तेरे आंगन में बैठे मैने शाम किया…

काय कमाल आहे ना ही तिसरी ओळ! चित्रदर्शी. प्रीतमच्या देखरेखीखाली अरिजित सिंग ती अशी चढवून गातो की अक्षरश: डोळ्यासमोर सूर्य उगवताना आणि मावळताना दिसतो… ते दोघं शेजारी शेजारी बसले आहेत… एकमेकांच्या सहवासात वेळ कसा जातोय समजतही नाहीये… बोलता बोलता, एकमेकांना समजून घेता घेता, एकमेकांना अनुभवताना वेळ कमी पडतोय… असे कित्येक दिवस, असे शेकडो लाखो करोडो क्षण एकमेकांचे झाले आहेत. तो म्हणतोय, ते क्षण आपले आहेत, केवळ आपले. त्यामुळे आता तुझ्या आयुष्यात मी नसलो आणि माझ्या आयुष्यात तू नसलीस, तरी हे क्षण आपलेच राहणार आहेत. अनादी काळापर्यंत. माझा ज्याच्यावर जीव आहे ते माणूस माझ्यादेखत दुस-याचं होतंय. कोसळवून टाकणारा क्षण आहे हा. तरी मी रडणार नाही, तुझी ही मोमेन्ट खराब करणार नाही. तुला त्या भूतकाळातल्या सुंदर क्षणांमध्ये मी बंदिस्त करून ठेवलं आहे. तेच आठवत मी माझ्या स्वत:च्या वाटेवर निघालो आहे…

प्रेमभंगाचं दु:ख हे उध्वस्त करणारं दु:ख असतं. त्यातून सहजपणे सावरता येतही नाही. पण ती जखम चिघळवत ठेवण्यापेक्षा, तिची हळूवार देखभाल करावी, तिचा प्रेमानं सांभाळ करावा… या भावनेनं हे गाणं ऐकलं की आपोआपच शांत शांत वाटत जातं…

अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना

मेरे जिक्र का जुबां पे सुवाद रखना...

याच गाण्याची ही युट्युब लिंक-

2 comments:

Unknown said...

रिअल टेस्ट ऑफ सॉंग! इतके सेन्सिटिव्ह विषय प्लिज हाताळू नका. वाचल्या शिवाय राहवत हि नाही आणि वाचाल कि खुपत.

poonam said...

Thanks Rahul! I take this as a compliment! :)