March 21, 2016

शतशब्दकथा
आपल्याकडे मराठीमध्ये “कथा” हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. अनेक विषय, अनेक प्रकारची मांडणी या प्रकारात होऊ शकते. कथाविषय नक्की काय असावा याचे काही ठोकताळे नसले तरीही काही काळ एका वेगळ्या विश्वात नेणा-या कथा सर्वांनाच वाचायला आवडतात.

याच कथाप्रकारातला एक नवा प्रकार म्हणजे “शतशब्दकथा”. नावावरूनच स्पष्ट होतं की या कथा आहेत ’शत’ म्हणजेच शंभर शब्दांच्या. यांनाच “लघुत्तमकथा” असंही एक नाव आहे. इंग्रजी साहित्यामध्ये हा कथाप्रकार बराच लोकप्रिय आहे. Tiny Tales, Terribly Tiny Tales, Nano Tales अशा नावांनी विविध विषयांवरच्या छोट्या, खूप छोट्या कथा लिहिल्या जातात. या कथांना काही नियम असतात. पहिलाच म्हणजे, ’शत’शब्दकथा असेल तर ती ’शत’ शब्दांचीच हवी. त्यात परत चीटिंग करायचं नाही. “Terribly Tiny Tale” असेल तर ती खूपच छोटी, म्हणजे अगदी दोन-तीन वाक्यांचीच हवी. अर्थातच, हिचा शेवट अनपेक्षित, अपारंपरिक असेल तर ती चटकन आवडते, पण धक्कातंत्र आवश्यक नाही.   

मी गेले काही वर्ष कथा लिहिते आहे. लघुकथांपासून दीर्घकथांपर्यंत प्रवास आपसूक झाला. पण लघुत्तमकथांपर्यंत आले नव्हते. याचं कारण म्हणजे मी मुळात स्वभावाने अतिशय बडबडी. माझी शैली वर्णनात्मक, verbose. मुद्दा ’विस्तारपूर्वक’ मांडायला मला मनापासून आवडतं! एकदा अचानक फेसबुकवर TTT दिसल्या. अतिशय आवडल्या. आपणही असं काही लिहू शकू का, हा किडा वळवळायला लागला. एका स्पर्धेच्या निमित्ताने एक लघुत्तम कथा लिहून पाहिली. कथेला बक्षिस मिळालं नाही, पण मला एक वेगळी ’किक’ मिळाली.

या माझ्या काही लघुत्तमकथा... या काही सर्वोत्तम कथा नाहीयेत याची मला नम्र जाणीव आहे. सुधारणेसाठी भरपूर वाव आहे हेही कबूल आहे. पण तरीही स्वान्तसुखाय लिहिलेल्या या कथा एक वेगळ्याच विश्वात नेतात हेही मी मान्य करते. कथेचं बीज अवघ्या शंबर शब्दांत शीर्षकासकट बसवायचं ही कल्पनाच एकदम रोमांचक असते. अजूनतरी कथांमध्ये धक्क्यासाठी भूतं, खून आणावेत असं मला वाटलं नाहीते. रोजच्या घटनांमध्येही कितीतरी नाट्य असतं आणि तेही या कथांचा विषय होऊ शकतं हेही या निमित्ताने जाणवलं.

प्रस्तावना केवढी झाली! (स्वभाव आड येतो तो असा!) मला या कथा लिहिताना एक आगळा आनंद झाला, तुम्हाला वाचताना थोडा तरी होईल अशी आशा करते!
******************

“आस्तिक”
“मी पूजा करते, पण देवाची नाही.” ऑफिसमध्ये लंचटेबलवर रंगलेल्या ’आस्तिक-नास्तिक’ चर्चेत तिनेही भाग घेतला. त्यावर झालेल्या प्रश्नार्थक चेह-यांना मात्र तिनं उत्तर दिलं नाही. अकरा तासांची नोकरी, पाच वर्षाचा मुलगा आणि सांसारिक अपेक्षा यांचा तोल ती सांभाळत होती ती पूजेच्याच तर बळावर! गूढ हसत ती परत कामाला लागली.

रात्री मुलाला झोपवल्यानंतर,

नव-याशी गप्पा मारल्यानंतर,

दुस-या दिवसाची तयारी झाल्यानंतर,

तिने ’पूजे’ला सुरूवात केली. हात जोडले. डोळे मिटले.

तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर मोबाईलचा चार्जर, मिक्सरचं भांडं, फ्रीज आणि वॉशिंग मशीन आले. तिने त्यांना मनोभावे नमस्कार केला. ’आज केलंत तसं सहकार्य उद्याही करा’ अशी प्रार्थना केली आणि मगच स्वत:चं शिणलेलं शरीर तिनं गादीवर टेकवलं.
**************


“Made for each other”

“आता उद्या मी मरूनच जातो. म्हणजे एकदाच्या तुझ्या तक्रारी संपतील!”
नेहेमीप्रमाणे कोणत्यातरी छोट्या कारणावरून वाद सुरू झाला होता आणि नेहेमीप्रमाणे तो हाताबाहेर चालला होता.

“छे! इतक्यात कुठली माझी सुटका व्हायला. आणखी बरंच छळायचंय तुला मला!” तिनेही त्रागा केला.

तिचं उत्तर ऐकताच त्याने तिच्याकडे बघितलं. नजरानजर झाली. अचानक दोघांनाही हसू फुटलं.
आपल्याला एकमेकांशिवाय तरणोपाय नाही हे नेहेमीप्रमाणे पुन्हा एकदा त्यांना कळून चुकलं!
**************

Best Friends

कित्ती वर्षांनी तिला ’ती’ दिसली. तिच्या लग्नानंतर पहिल्यांदाच. आठ वर्ष तरी झाली असतील.
नव-याबरोबर चालत होती. तिच्या पुढे पंधरा-वीस पावलांवर होती. तिला पाहून किती काय आठवायला लागलं. त्या न संपणा-या गप्पा, आवडते हीरो, गाणी, पुस्तकं… त्यांचे विषय एकच असायचे.

तिला चकितच करू या विचाराने ती झरझर चालत तिच्यामागे पोचली. त्या दोघांनाही पत्ताच नव्हता. आपल्याआपल्या गप्पांतच मश्गूल! ती क्षणभर थबकली. ’काय बोलतायेत इतकं?’

“सारखा अपमान, टोमणे, प्रत्येक गोष्टीत खोट काढतात. मला कसं वागावं हेच समजत नाही. तू फिरतीवर असतोस. तुझ्यासमोरचं वागणं वेगळं, तुझ्यापाठीमागचं वेगळं. तुझ्यापाशी तक्रार करायलाही नको वाटतं मला…”

तिने सुस्कारा सोडला. 

आजही त्यांचे विषय एकच होते.
*********** 

तिची जागा
ती तिच्या नव्या मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये बसली होती. गप्पा रंगत होत्या. हळूहळू आपणही त्यांच्यातल्या  होत आहोत असं तिला जाणवत होतं. ती आनंदात होती.

इतक्यात तिचं लक्ष कोप-यातल्या टेबलकडे गेलं. तिथे तिचा सगळा जुना ग्रूप चिल-आऊट करत बसला होता. तिचे जीवाभावाचे यार-दोस्त होते ते एकेकाळी. त्यातल्या प्रत्येकाला ती त्यांच्या आवडी-निवडी, गुण-दोषांसकट ओळखत होती.

तिला राहवलंच नाही. दुरावा विसरून Instinctively उठून ती त्यांच्यापाशी गेली. तिचं भेटणं अनपेक्षित होतं, तरी सर्वांनी तिचं स्वागत केलं. “कशी आहेस?” “काय करतेस?”ची देवाणघेवाण झाली.

आणि मग शांतताच पसरली. बरंच काही बोलणारी शांतता.

तिच्या लक्षात आलं- तिथे बसायला जागा नव्हती. दुस-या टेबलवरची खुर्ची तिची वाट बघत होती.
*********

7 comments:

Ash said...

he khUp aawadala

poonam said...

Thanks Ash!

poonam said...
This comment has been removed by the author.
संपदा कोल्हटकर said...

गोष्टी मस्तच आहेत.
विशेषत: प्रस्तावनेत दिल्याप्रमाणे उगीचंच भूतं, स्वप्न असं न करता रोजच्या घटनांवर आधारित असल्यामुळे जास्त आवडल्या.

Unknown said...

mastach :)

poonam said...

धन्यवाद संपदा आणि अननोन :)

Shraddha Bukdane said...

उत्तम जमलय, पण या स्टोरी नाही वाटत. स्टोरी मधील passage किंवा एखादा incidence वाट्टो