September 23, 2008

(करतायत) डायटींग!

’मायबोली’ या संकेतस्थळावर या वर्षी नेहेमीप्रमाणेच धूमधामीत गणेशोत्सव साजरा केला गेला. अनेक स्पर्धांचंही तेव्हा आयोजन केलं होतं. यातलीच एक स्पर्धा होती कथास्पर्धा- ’सुरुवात आमची, कथा तुमची’! यामधे कथेची सुरुवात दिली होती आणि हवी तितकी पात्र, घटना आणि स्थळं त्यामधे घालून आणि कल्पनाशक्ति लढवून आपल्याला कथा संपवायची होती. या स्पर्धेत मी भाग घेतला होता. ती ही कथा..

सुरुवात अशी होती:

आता मात्र ठरवलं... बास झालं.... जेव्हा आरश्यामधे ही स्वतःची प्रतिमा मावेनाशी झाली तेव्हा काहीतरी केलंच पाहिजे... अगदी ६० नाही पण निदान ७०/७५ पर्यंत खाली उतरलंच पाहिजे... (वजन हो..!!) अगदी चवळीची शेंग नाही पण निदान मटारची किंवा शेवग्याची शेंग तरी व्हायचा प्रयत्न केलाच पाहिजे.. तसही बरेच दिवसांपासून त्या कोपर्‍यावर उघडलेल्या हेल्थ क्लब च्या आत जाऊन "बघायचंच" होतं... एकदा ठरलं आणि तयारी पण जोरात सुरू झाली.. मॉल मधे जाऊन Nike चे t-shirts, Rebok ची track pant, Adidas चे shoes आणले.. (सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे ना !!), आयपॉड मधे गाणी भरली, recharge केला, Cover आणालं, हेल्थ कल्ब मधे जाऊन नाव नोंदवलं, nutrionist ची appointment घेतली आणि ह्या खुषीत येता येता फक्त १ पायनॅपल संडे खाल्लं..प्रथम ग्रासे का काय म्हणतात तसं nutrionist नी सांगितलं नुसत्या व्यायामाने काय होणार "जिव्हानियंत्रण" हवं (हा आपला माझा शब्द... हल्लीच्या इंग्रजाळलेल्या मुलांना काय येणार असं शुद्ध मराठी) डाएट च्या नावाखाली दिवस भर उपवास (तरी सकाळी खाल्लेले २ पेढे आणि थोडे चिप्स सांगितले नाही instructor ला) २० मिनीटं ट्रेड मिल, त्यानंतर १५ मिनिटं स्टेपर, सगळी स्नायू हलवून टाकणारे स्ट्रेचेस आणि हे सगळं करूनही वर कोक, ज्यूस न पिता भयंकर रंगाचा बीट आणि गाजराचा रस... कसं व्हायचं आपलं????????????
--------------------------------

आणि ही माझी कथा:

(करतायत) डायटींग!

आईगं, अंग काय ठणकतंय! त्या मेल्या इन्स्ट्रकटरला काय जातंय सांगायला-ट्रेडमिलवर २० मिनिटं पळवलंन मेल्यानं! आणि नंतर गाजराचा रस दिला प्यायला. 'आता १ वाजेपर्यंत काही नाही, दुपारी दिड पोळी, भाजी, आमटी, अर्धी वाटी भात आणि एक वाटी ताक' इतकंच अशी तंबीही दिली. ह्यॅ! मी एका कानाने ऐकलं आणि दुसर्‍याने दिलं सोडून! एवढुसं खाऊन बारीक व्हायचंय की काय! अय्या! विसरलेच. बारीक व्हायचं आहेच की..

कशीबशी घरी आले, तो पोह्यांचा खमंग वास आला. सकाळची नाश्त्याची वेळ. सगळ्यांची धावपळीची. मिनी-चिंटू एकमेकांवर ओरडत आवरत होते, 'हे' नेहेमीप्रमाणे पेपर उघडून बसले होते. मी जिमला जाऊन आले, कोणी विचारलंही नाही, 'कसा गेला पहिला दिवस?' मी मिनी, चिंटूला अजूनही रोज विचारते उत्सुकतेनी, 'काय केलं दिवसभर?'- बालवाडीपासून जे सुरु केलं, ते अगदी अजूनही विचारते. पण मला कोणी विचारत नाही! या विचारानी भयंकर विमनस्कता आली आणि वाटीभर पोहे खाऊन झाल्यावरच ती गेली. तसे अजून चालले असते म्हणा, पण गाजराच्या रसानी तोंडाची चवच गेली बाई.

सगळ्यांना घराबाहेर घालवून- म्हणजे आपापल्या उद्योगांना हं, नाहीतर म्हणाल सगळ्यांना घराबाहेर हाकलण्याइतकी विमनस्कता आली की काय व्यायामानी! छे, इतकं काही मी व्यायामाचं मनावर घेतलं नाहीये काही. तर सगळे कामाला गेले आणि मी नि सखूबाई इतकेच उरलो. सखूलाही मी दळण, भाजी, किराणा आणायला पिटाळलं आणि जरा सोफ्यावर टेकले.

आईगं, काय वेदना या. मांड्या भरून आल्या. हात तर अगदी उचलवत नाहीये. समोरच यांना ऑफिसतर्फे कसलंतरी बक्षिस म्हणून फोटोफ्रेम मिळाली होती ती दिसली जिच्यामुळे मला हे जिम सुरु करावं लागलं! काहीतरीच मेली बक्षिसं! बाहेरून पुस्तकासारखी दिसणारी, उघडली की दोन फोटो शेजारी शेजारी लावता येईल अशी. सध्या डावीकडे हृथिक रोशन होता आणि उजवीकडे होती कोणीतरी फटाकडी. फ्रेम उघडून पाहिल्याबरोब्बर हे म्हणाले, "हेच फोटो बरे दिसत आहेत यात, मुलं मोठी झाली आता, माझे केस-बिस गेलेत आणि तू काही एका फ्रेममधे मावशील असं वाटत नाही!"
आणि हे खड्या आवाजात मुलांसमोर!!!!!!!!
इतके क्लेश झाले मनाला! म्हटलं, "तीळतीळ झिजले मी तुमच्या संसारासाठी अन् शेवटी ऐकायला लागलं हे!"
तर, "तीळतीळ झिजलीस ना म्हणूनच.. तोळातोळा तरी झिजायला हवं होतंस, मग तुझा फोटो फिट्ट बसला असता इथे!" असं म्हणाले वर आणि गडगडाटी हसले! मुलंही लगेच त्यांच्याबरोबर सामिल!
असं बोचणारं बोलतात बघा येताजाता. पण मी ही काही कमी नाही, म्हणजे तशी कमी नाहीच्चे, पण होईन कमी. असं काही डायट करते की बघाच!

त्या रात्री सगळे जेवायला बसले. सुरुवात केली पालक सूपनी. मग भाकरी, पातळ आमटी आणि लाल भोपळ्याची भाजी. साधा भात आणि ताक. विविध प्रकारचे आंबट चेहरे करत, जमेल तितक्या प्रकारानी नाकं मुरडत मंडळी कशीबशी जेवली.

दुसरा दिवस. नाश्त्याला काकडी, बीट, टमॅटोचे काप, त्यावर मिरपूड आणि मीठ असं मोठा बाऊलभरून, आणि अर्धा कप दूध. चहा/कॉफी बंद! हे सगळ्यांनाच हं. अपेक्षेनुसार मिनी आणि चिंटूनी दंगा केला. हेही मोठे डोळे करून बघत होते. म्हटलं, "हे बघा, मी डायटवर आहे, आणि माझ्यासाठी वेगळे, तुमच्यासाठी वेगळे असे पदार्थ करायला मला जमायचे नाही. माझी अवस्था झालीये तशी तुमची होऊ नये यासाठी, आणि मला वजन कमी करायचं आहेच, त्यासाठी हेच खाणं आपल्यासर्वांसाठी योग्य आहे. बघा, दोन महिन्यात कसे हेल्दी होऊ आपण. मी बारिक, तुम्ही सशक्त! मग मस्तपैकी ग्रूप फोटो काढून त्या फ्रेममधे लावता येईल आपल्याला.." फ्रेमचे शल्य असे सहजासहजी मनातून जाणार नव्हतेच. माझ वजन कमी करायला बघता काय बच्चमजी.

मी धडाकाच लावला. सखूलाही ट्रेन केले. भोपळा, दोडका, दुधी, पडवळ या आमच्या घरी आत्तापर्यंत न आलेल्या भाज्या फ्रीजमधे विराजमान झाल्या. सकाळी गाजराचा किंवा दुधीचा रस मस्ट. जेवणात भाकरी किंवा फुलके. ताक हवं तितकं. भात अगदी कमी. उकडलेली कडधान्य, काकडी, टमॅटो, मुळा, पालक, माठ, शेपू हवे तितके. आमटी मूगाच्या डाळीची. पात्तळ. खा पाहिजे तितकं. पण खायचं हेच. खाऊचे डबे गायबच करून टाकले. दृष्टीसच पडले नाहीत, तर मोह तरी कसा होईल? कूकरीचे टीव्हीवरचे शो बघणं बंद केलं. 'आस्था' चॅनलवरचे रामदेवबाबा माझं अराध्य दैवत झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेच डायट इतर तिघांनाही लागू केलं. कळूदे कळूदे, त्यांनाही 'यातना', 'वेदना', 'मोह टाळणे म्हणजे काय असते' ते सगSSSSSSSळं कळूदे जरा.

असा कसाबसा आठवडा काढला. देवा! हे सगळं करताना जीभेला काय त्रास झाला माझं मला ठाऊक. मधेच चमचमीत पदार्थांचे वास यायचे अचानक, डोळ्यासमोर गोड पदार्थ फिरायचे, दुपारी ११ आणि संध्याकाळी ६ यावेळा तर अमानुष! जे समोर येईल (त्याला) ते खावं वाटायचं. पण नाही! ती फ्रेम खुणावायची. जिम चालू होतंच. यांचे, मुलांचे चेहरे दिवसागणिक पडलेले, ओढलेले दिसू लागले. गोली तो निशानेपे लगी थी. आता मात्रा कधीही लागू पडणार होती. मी वाटच बघत होते.

एका संध्याकाळी मिनी कॉलेजातून येतानाच बटाटेवडे घेऊन आली. ती यायच्या आधी तो वेड लावणारा खमंग वास आत आला. मी काही बोलायच्या आतच ती म्हणाली, "आई, आज राहूदे गं डायट. कंटाळा आला बघ ते घास-फूस खाऊन. मस्त वडे खाऊ. खरंतर मी बाहेर एकटीच खाऊन येणार होते, पण तुझा दु:खी चेहरा डोळ्यासमोर आला. चिंटू, बाबाही किती दिवस उपाशी असल्यासारखे दिसत आहेत. मग ठरवलं, lets celebrate one week of dieting आणि दोन डझनभर वडे आणलेत बघ. घे घे, आम्ही काही बोलणार नाही तुला.."

इतक्यात हे देखील आलेच, चिंटू घरीच होता.
मी मुद्दामच दु:खी चेहरा करत म्हटले,"मिनी, माझ्यामुळे तुम्हालाही त्रास होतोय ना गं! अगं पण तुमच्या भल्याचंही मलाच बघायला हवं ना. उद्या माझ्यासारखी तूही जाड झालीस तर? बाबांचं वय होतंय, चिंटूचं वाढतंय.. तुम्हाला डायट फूड खावंच लागेल. यातच सगळ्यांचं भलं आहे... आण ते वडे, देऊन टाकू आपण सखूला.."

आता चिंटू-मिनीचा पेशन्सच संपला. एकतर जेवण मनासारखं मिळत नव्हतं. बेचव जेवून वैताग आला होता. आणि वर हे वडे चक्क देऊन टाकायचे? सर्वथा अशक्य!
"आई नाही हां. अजिबात नाही, एक तर तुझ्यामुळे आम्हालाही बोरींग जेवावं लागतंय. हे वडे मुळीच कोणाला द्यायचे नाहीयेत. हे हेल्दी फूडचंही बघू आपण नंतर, आधी वडे. मला जर वडे मिळाले नाहीत तर वेड लागेल आता.." चिंटू बरळायला लागला.

हा हा हा! मनातून हास्याच्या उकळ्या फुटल्या मला. पण करूण नजरेनी मी ह्यांच्याकडे पाहिलं.
"अहो, बघा ना मुलं कसं करत आहेत ते. आता असं अरबटचरबट खाणं बंद केलंय आपण. यानीच वजन वाढतं हो. मग माझ्यासारखे व्हाल, कुठे बाहेर फिरायची चोरी होईल, एकएक नसते रोग पाठीशी लागतील.." अजून बरीच मोठी लिस्ट होती, पण यांनी मला अडवलं.

"तू पण जरा जास्तच करतेस हं. अगं डायट करायचं म्हणजे इतकं नाही काही, अधूनमधूम जीभेलाही विरंगुळा हवाच की. तू म्हणजे एकदम मनावरच घेतलंस, वर आम्हालाही त्यात ओढलंस. मी काय म्हणतो, की हे डायट तसं आहे उत्तमच, पण आपण थोडं शिथील करूया ते. म्हणजे खरंतर तू आम्हाला त्यात नको धरूस.. तू तुझं तुझं चालू ठेव ना.. आम्ही आहोत मस्त fit and fine.."

अस्सं! आता मात्र ब्रम्हास्त्र काढायची वेळ झाली होती.
माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहायला लागले..
"तुम्हीही घ्या त्यांची बाजू. इतकी वर्ष तुम्हाला पाहिजे ते खाऊ घातलं, कधी टाळाटाळ केली नाही आणि जरा एक आठवडा माझ्यासाठी भाज्याबिज्या खाव्या लागल्या, तर लग्गेच माघार घेताय ना? कधी माझ्यासोबत नसता तुम्ही. सगळा संसार माझा एकटीचाच, खस्ता मीच काढायच्या, सोसायचंही मीच. तुम्ही फक्त चांगल्या प्रसंगी येणार. हेच ना २२ वर्षांच्या संसाराचं फळ?"

हे चांगलेच बावरले."अगं, अगं, रडतेस काय? साध्या वड्यांवरून इतकं टोक काय गाठतेस? अगं डायट करावंच, उत्तमच ते तब्येतीसाठी. पण त्यालाही तारतम्य असावं ना. हे डायट फूड खाऊन खरंतर चमचमीत खायची इच्छा अजूनच जागृत होते बघ. आपण असं करूया का.. एक दिवस डायट फूड, एक दिवस असलं मस्त काहीतरी आणि बाकी दिवस नेहेमीचं साधं जेवण- असा आठवडा प्लॅन करूया का? तूही सगळं खा, आम्हीही खातो. पण तू जरा जास्त नियंत्रण ठेव, आणि व्यायाम चालू ठेव. काय? कशी वाटते आयडीया मिनी-चिंटू?"

आता कुठे हे पटण्यासारखं बोलले काहीतरी. मिनी-चिंटूनी आज्ञाधारकासारख्या माना हलवल्या. मिनी म्हणाली,
"हो आई, मी तुला कध्धी कध्धी चिडवणार नाही, तू मस्त मस्त पदार्थ कर आधीसारखेच. प्लीज.."

ह्म्म. आता फायनल एन्ट्रीची वेळ झाली.
"बरं, तुम्ही बोलता त्यातही तथ्य आहे. मी तुम्हाला उगाच वेठीला धरायला नको होतं. करते बंद ते डायट फूड रोजचे. पण व्यायाम आणि नियंत्रित खाणं हे मी तरी आचरणात आणणारे. याची जाणीव करून दिल्याबद्दल त्या फ्रेमवाल्यांचे आभारच मानले पाहिजेत.."

"त्यावरून आठवलं.. आपल्या कॅमेर्‍याला सेल्फटायमर आहे की.. चिंटू आण रे कॅमेरा.. आठवड्याच्या उपासानंतरच्या सेलीब्रेशनचा फोटो काढलाच पाहिजे.. सगळ्यांनी वडे हातात धरूया, आणि हाच फोटो फ्रेममधे लावूया.. घे गं, दोन वडे घे तूही..."

आणि हसत हसत डायटची फ्रेम फ्रीझ झाली!

September 8, 2008

आवडत्या कविता

संवेदनी सुरु केलेला आवडत्या कवितांचा खो माझ्याकडे गायत्री (http://manmaitra.blogspot.com/) कडून आला. आभार गायत्री.

कविता हा एक अत्यंत सुंदर साहित्यिक आविष्कार. कित्येक भावना, कित्येक छटा मोजक्या शब्दात बांधून त्याला लयही देणे हे एक हाडाचा कविच करू जाणो. या भावनांच्या हिंदोळ्यात आपण आनंदानी हरवून जायचे फक्त.

पहिली कविता महाराष्ट्राचे काव्यदैवत- 'ग. दि. मा' यांची! अत्यंत सोपे शब्द, गहन आशय, पर्फेक्ट जुळणारी यमकं, एकाही शब्दाशी तडजोड न करता मांडलेली कल्पना... यांच्या काव्याबद्दल काय नि किती लिहायचं! त्यांचीच एक कविता ’दोन श्वान’! अगदी सोपी कविता, तसं म्हटलं तर उपदेशपरच आहे. पण असा सहजी उपदेश कोणी करत असेल तर नक्कीच ऐकायला आवडेल बुवा!

दोन श्वान

एका वटवृक्षाखाली बसूनीया दोन श्वान
एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान

एक वये वाढलेले, एक पिल्लू चिमुकले
वृद्ध-बालकात काही होते भाषण चालले

"कुणाठाई आढळले तुला जीवनात सुख?
"वृद्ध बालकास विचारी, त्याचे चाटूनीया मुख

"मला वाटते आजोबा, सुख माझ्या शेपटात
सदाचाच झटतो मी त्यात धराया मुखात

माझ्या जवळी असून नाही मज गवसत
उगाचच राहतो मी माझ्या भोवती फिरत"

अजाण त्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून
क्षणभरी वृद्ध श्वान बसे लोचन मिटून

"कुणाठाई सापडले तुम्हा जीवनात सुख
तुम्ही वयाने वडील, श्वान संघाचे नायक"

नातवाच्या या प्रश्नाला देई जाणता उत्तर
"तुझे बोलणे बालका बिनचूक बरोबर

परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी
आत्मप्रदक्षिणा येते त्याच्या कपाळी शेवटी

घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग!"
-----------------------------

दुसरा नंबर संदीप खरेचा. कवितेचं नाव आहे ’करार’. ही कविता वाचता वाचताच घश्यात आवंढा दाटून येतो, संदीपचा आवाज आपोआप कानात ऐकू येतो- एक दु:खी कविता, तिच्या आर्ततेसकट डोळ्यासमोर येते..

करार...

चल आता बोलून घेऊ! बोलून घेऊ थोडे!
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे!
संपत आलाय पाऊसकाळ! विरत चाललेत मेघ!
विजेचीही आता सतत उठत नाही रेघ!
मृद्गंधाने आवरून घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसार्‍यांची ही मिटण्याची वेळ!
सावळ्या सावळ्या हवेत थोडं मिसळत चाललंय उन्हं!
खळखळणारी नदी आता वाहते जपून जपून!

चल आता बोलून घेऊ! बोलून घेऊ थोडे!
लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे!
मनामधला कोपरा चाचपून घे नीट!
लपले असतील अजून कोठे चुकार शब्द धीट!
नजरा, आठवण, शपथा.. सार्‍यांस उन्हं द्यायला हवे!
जाण्याआधी ओले मन वाळायला तर हवे!

हळवी बिळवी होऊन पाहू नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे
भेटण्याआधी निश्चित असते जेव्हा वेळ जायची!
समजूतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची!
एकदम कर पाठ आणि मन कोरे!
भेटलो ते ही बरे झाले! चाललो ते ही बरे!
मी हे घेतो आवरून सारे! तू ही सावरून जा!
तळहातीच्या रेशांमधल्या वळणावरून जा!
खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे!
’करार पूर्ण झाला’ अशी सही तेवढी दे!
--------------------------

आणि मोह आवरत नाही, म्हणून तिसरी कविता- नवोदित कवि- वैभव जोशीची. नवोदित असला तरी वैभव अत्यंत प्रतिभावान आहे, सोप्या शब्दात मोठा आशय मांडणे ही त्याची खासियत आहे. त्याची ही कविता प्रत्येकाला काही काळ अंतर्मुख करते, आणि दर वेळी वाचली की एक नवीन अर्थ उलगडून दाखवते. (या कवितेला ’स्टार माझा’ या चॅनलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काव्यस्पर्धेत प्रथम पारितोषिकही मिळाले आहे.) ही कविता- ’डोह’

डोह

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही
एखादा डोह असू द्यावा अथांग..

कुठल्याही क्षणी हक्कानं जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अश्या अंतरावर बसून बघत रहावं..
आपण डोहाकडे
डोहानी आपल्याकडे..

ना आपलया चेहर्‍यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नसतील तर कसला अपेक्षाभंग?

डोळ्यांनीच विचारावं त्याला
हा स्थायी स्वभाव कुठून मिळाला..?
हलकेच एखादं पान आपल्याकडे सरकवत
त्याने दाखवून द्यावं..
बरीच आंतरिक उर्मी आहे
पण तळाला..

अश्या वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं
हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही
प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही
------------------------------------------

माझा खो संदीप ( http://atakmatak.blogspot.com/) आणि मीनु (http://meenuz.blogspot.com/) ला