February 27, 2008

आईच्या हातचं!

सागर अधीरतेनी घरात आला.. त्याला प्रचंड भूक लागली होती. निधीनी आज प्रॉमिस केलं होतं त्याला.. ती आज त्याच्यासाठी खास असं त्याला आत्यंतिक प्रिय असं ’गोळ्याचं सांबार’ करणार होती जेवायला.. आहाऽऽ! गोळ्याचं सांबार!! आठवूनच त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. आईच्या हातची खास डिश होती ही आणि त्याची विशेष लाडकी.. निधीलाही त्याचं हे गोळ्याचं सांबार प्रेम ठाऊक होतं. म्हणूनच आज सुट्टीचा सकाळचा वेळ खास ते करण्यासाठी ठेवला होता..

"निधी.. आलो मी.. झालं? तयार आहे? बसायचं जेवायला?" सागरची उत्सुकता लपत नव्हती.
"हो, चला, मी घेतेच वाढायला.."

अक्षरश: दोन मिनिटात तो आलाच.. पानावर बसला.. बाऊलकडे त्याने आशेनी पाहिले आणि तो थबकला.. हे? हे काय केलंय?
"निधी.. ’हे’ गोळ्याचं सांबार आहे?"
निधीचाही चेहरा थोडा साशंकच होता.. सावरून घेत ती म्हणाली,
"हो, म्हणजे काय? हेच की. मी पुस्तकाप्रमाणे अगदी तंतोतंत केलंय हां.. असंच होतं त्यात.."
"बर बर असेल, खाऊन बघतो.. पण आईच्या सांबाराला असा रंग येत नाही काळपट म्हणून विचारलं गं.." सागर वरकरणी म्हणला खरा, पण मनात किडा वळवळाच.. हे कसलं सांबार? आईचं कसलं होतं सोनेरी.. त्यावर मस्त कोथिंबीर.. हे काय लाल दिसतंय चिकन सारखं? जाऊदे, बघूया तरी काय आहे ते.. त्याने पोळीचा तुकडा तोडला आणि सांबारात बुडवून खाल्ला.. बापरे!! तिखट, आंबट चवीनी त्याच्या जीभेवर हल्ला बोल केला.. आणि गोळे तर कच्चेच होते चक्क आतून.. हे काय आहे? हे सांबार? गोळ्याचं सांबार? इतकं भीषण?? आई! आईची प्रकर्षानी आठवण झाली त्याला..

इकडे निधी त्याच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत त्याच्याकडेच पहात उभी होती..
"कसं झालंय?" तिनी हळूच विचारलं.

सागरला तिचं मन मोडवेना.. इतकं खपून तिने हा प्रकार केवळ त्याला आवडतो म्हणून केला होता.. पण शेवटी ते गोळ्याचं सांबार होतं ना.. हे जे काही होतं त्याला सांबार म्हणणं म्हणजे जीभेलाही त्रास देणं होतं.. अखेर धीर करून तो म्हणाला,
"ह्म्म. हे वेगळ्याच पद्धतीचं गोळ्याचं सांबार झालंय गं.. म्हणजे असं नसतं मी खाल्लेलं..आई कसं करते माहिते का.."
त्याचं बोलणं अर्धवटच तोडत निधी म्हणाली, "माहिते मला तुझी आई कसं करते ते, पुन्हा सुरु करू नकोस.. मी कधीही कसंही काहीही केलं तरी तुला आवडतच नाही. तरी मी पुस्तकात बघूनच करते. अगदी तंतोतंत. आज फ़क्त चिंच आणि तिखट थोऽऽडंसं जास्त घातलंय.. तसंही तिखट खायची सवय असावी.. पचनाला बरं असतं.. पण तुला माझे चांगले हेतू कळतच नाहीत. सारखी तुलना करत असतोस.. इतकं सकाळपासून खपून केलं, त्याचं काही आहे का तुला?" निधीची गाडी रागावरून हळुहळु मुसमुसण्याकडे वळायला लागली..

हीनदीन झालेला सागर कसाबसा म्हणाला, "अगं पण राणी, तू खाऊन पाहिलंस का आहे? बरंच तिखट झालंय.. आणि गोळेही नीट शिजायला हवे होते अजून.. आपण असं करू, या पदार्थाचं नामकरण करू ओके?.. अं?.. हं! आपण याला म्हणू ’रस्सा-गोळे’!! चालेल? याला गोळ्याचं सांबार हे नाव नको गं प्लीज.. आयला.. बघता बघता सुगरण झालीस की तू निधी.. नवे नवे पदार्थ बनवायला लागलीस.. ग्रेट!"

निधीला यातली खोच कळली, तरी सागरची कोणत्याही प्रसंगात कॉमेडी आणण्याचं कसब पाहून तिला पुसटसं हसूही आलं! तिला स्वत:ला तिच्या पाककौशल्याचा अंदाज होताच की. सांबार खरंच काही खास नव्हतं झालं.

"असं का होतं रे? मी खरंच अगदी सांगितलं आहे तस्संच करते" निधीला स्वत:च्या पाककौशल्याची शंका यायला लागली..
"आता मी कसं सांगणार का चुकतं ते.. बरं, तू आईलाही विचारत नाहीस काही.. त्यांचे अनुभव असतात.. त्यात कमीपणा काय वाटतो तुला काय माहीत! बरं, पण आजच्या पोळ्या फर्स्टक्लास हां.. त्या रश्श्यामुळे सांगायचं राहिलंच.. चक्क तीन बोटानी तोडता आल्या.. मी म्हणलं नाही, तू एक्स्पर्ट होणार लवकरच.. ते ’सांबार’ एकदा जमलं की..." सांबार फसल्यामुळे सागर आज जास्तच हळवा झाला होता, न घाबरता निधीला मनसोक्त (शाब्दिक) चिमटे काढत होत..

त्यानंतरचं त्यांचं जेवण हे (पुष्कळ वेळा होई तसंच) पोळी-सॉस आणि पोळी-जॅम बरोबर झालं.
----------------------------------------------------------------------------------------------
पण हे दरवेळी असं का होतं तिला समजत नव्हतं. एखादा पदार्थ हौसेनी करायला घ्यावा आणि तो बिघडावा! किंवा, जमावा, पण त्याला ’ती’ चव येऊ नये! एकतर तिच्यापाशी वेळ कमी असायचा. त्यातून हौसेनी करतीये, तर तो पदार्थ पटकन जमून जावा अशी इच्छा असायची मनात. त्या घाईत, धांदलीत काहीतरी बिनसत होतं! तसं तिला तिच्या आईला, सासूबाईंना, गेलाबाजार शेजारणीला तरी नक्कीच विचारता आलं असतं याबद्दल, पण नेमका स्वत:चा ’ईगो’ आड येत होता! ईंजिनीयर झालेल्या हुशार मुलीला रोजचा स्वयंपाक जमू नये? छे! फारच लाजिरवाणी गोष्ट होती. आजकाल मुलगेही उत्तम स्वयंपाक करतात, मग तिला न जमण्यासारखं काय होतं त्यात? ’फ़ोडणी, मसाले, वाटण आणि मीठाचं प्रमाण जमलं की आलाच स्वयंपाक. त्यात काय मोठसं?’.. हे लाडकं मत होतं तिचं-’ अर्थातच लग्नाआधीचं!! फोडणीचं तेल, मसाल्यातले असंख्य घटक पदार्थ, वाटणासाठी लागणारे कष्ट आणि ’मीठ चवीप्रमाणे’ या दोन शब्दांनी तिची झोप उडवली होती!

नवीन सुरुवात असतांना सगळे सावळे गोंधळ अगदी साग्रसंगीत झाले.. आमटीला तूरीच्या डाळीऐवजी हरभर्‍याची डाळ शिजवणे, पोह्याची खीर बनवणे, कणिक एकतर सैल, किंवा अगदीऽऽऽ घट्ट (कडककडे झुकणारी) भिजणे, कूकरमधे पाणी घालणे, पण तांदूळात पाणी न घालणे, मीठाशी तर दुश्मनी असल्यासारखं ते विसरणे, किंवा दुप्पट घालणे हे तर रोजचच! पण बया धीराची. आणि हो, मुख्य म्हणजे सागर धीराचा. बायकोनी स्वयंपाकघराचं रणांगण केलेलं असतांना तो तिथून पळून गेला नाही हे विशेष. तो बिचारा तिच्या खांद्याला खांदा लावून तिनेच केलेले पदार्थ कसेबसे गिळत होता, पण तो होता तिथे. या त्याच्या पाठींब्यामुळे आणि स्वभावातल्या जिद्दीने निधी आता कुठे जरा रोजचा स्वयंपाक खाणेबल करायला लागली होती.

मग एके दिवशी निधीनी ठरवलं की आता ’नवी शिखरं पादाक्रांत करायची’. दोन-चार भाज्या, आमटी, पोहे-उपमा तिच्या मते तिला आता येत होता. आता काहीतरी गोड करायला पाहिजे.. काय करावं बरं? अचानक तिची ट्यूब पेटली! येस्स.. बेसनाचे लाडू! तिला प्रचंड आवडत असत. आणि त्यात ती एकतारी अन दोनतारी पाकाची कटकटही नव्हती! सोप्पा आणि आवडणारा पदार्थ. निधी तयारीला लागली. पुस्तक पाहिलं, तयारीही विशेष नव्हती. तूप विकत आणलं, बेसन होतं घरी.

मग एका शनिवारी दुपारी निधीबाई राहिल्या ओट्यापाशी उभ्या- बेसन ढवळत. भाजतीये, भाजतीये- त्याचा काही रंग लाल होईना. तिचा पेशन्स संपला आणि त्या कच्च्या बेसनातच दूध आणि साखर घातले. झालं, लाडू घडले, पण कच्चे आणि चिकट!

पण अशी हार मानेल ती निधी कसली?

पुढचा शनिवार. निधी पुन्हा बेसन भाजतीये. यावेळी हात लाल झाले तरी चालतील, पण बेसन(ची) लाल होईपर्यंत भाजायचं हे मनात ठामपणे ठरवलं होतं. बराऽऽऽच वेळ भाजल्यानंतर त्याचा रंग थोडाऽऽऽ बदलू लागला. पुस्तकातली ती ’गुलाबी होईपर्यंत भाजावे’ भानगड तिला काही उमजली नव्हती. पिवळं बेसन कितीही भाजलं तरी गुलाबी कसं होईल? काहीही! असो, पण रीझल्ट तरी उत्साहवर्धक होते. रंग पालटायला लागला होता. आता निधीला कळेना की किती लाल करायचे हे? आचेमुळे ते पटापट रंग बदलू लागले की! ’कच्चं नको’ असा विचार करत ती तसाच झारा हलवत राहिली आणि व्हायचं ते झालंच!!!!!!! गेल्या वेळी कच्चे म्हणून आणि या वेळी करपलेले म्हणून.. आस्वाद घेत खाता येतील असे बेसनाचे लाडू काही घडेनात.

आता मात्र निधी निराश झाली. ’इतकं मेलं राब राब राबतो त्या ओट्यापाशी, पण निर्धास्त होऊन जेवता येईल असं काही घडत नाही तिकडे.’ तिनी मधेच स्वत:चे हातही निरखले. ’या हातांनी मी ऑफिसमधे लीलया काम करते, तेच हात इकडे इतकं अपयश का देतात?’ विचार करकरूनही हाती उत्तर येईना. शेवटी तिने ठरवले, ’आपण एक ब्रेक घेऊया. खूप दिवस झाले, आईकडे गेलो नाही.. आता वीकेंडला रहायलाच जाऊ.." विचारानीच तिला थोडं बरं वाटलं.
--------------------------------------------------------------------------------------

लाडकी लेक आल्यामुळे आईचा उत्साह बघण्यासारखा होता. निधी शुक्रवारीच ऑफिसातून परस्पर आईकडे आली. आई, बाबा, धाकटी बहीण निशा सगळे कसे तिच्या आसपास होते, गप्पांना रंग चढला होता. इतक्यात आईनी शिर्‍याची बशी हातात ठेवली. निधी चकितच झाली. ती गप्पांत इतकी रंगली होती की आईनी रवा कधी भाजला आणि शीरा कधी केला, तिला कळलंच नाही!!
तिने चमचाभर खाल्ला.."आई, काय मस्त शीरा झालाय गं, अगदी नंबर वन! नेहेमीप्रमाणेच!"
बाबा आणि निशानीही निधीची ’री’ ओढली."लाडकी लेक आल्यामुळे बदाम-काजूही सढळ हातानी पडलेत हो.. नाहीतर आम्हाला नुस्त्या वेलदोड्याचा पुडीवर समाधान मानावे लागत होते इतके दिवस, काय निशा?"
"बघा ना बाबा.. ताई, बरं झालं तू आलीस.. आता आम्हाला मस्त मस्त खायला मिळेल एकएक.."
"चला! जसं काही अगदी वनवासातच आहात की नाही? तुमच्याही फर्माईशी करतेच की पूर्ण.. आता लेक माझी इतक्या दिवसांनी भेटतीये.. शीराच काय, ती म्हणेल ते करून घालीन.." आईनी प्रेमानी निधीच्या केसांवरून हात फिरवला..

त्या रात्री निधी आईशेजारी ओट्यापाशी उभी राहून आईच्या हालचाली निरखत होती. तिचं ते सगळं निगूतीनी करणं डोळे भरून पहात होती. शेवटी तिने न राहवून आईला विचारलंच,
"आई, आता मी पण स्वयंपाक करते, पण माझा कोणताच पदार्थ तुझ्यासारखा होत नाही, असं का गं?"
"अगं, केलं की येतं.. होईल सवय हळूहळू.. त्यात काय मोठंसं?"
"नाही गं आई.. मीही असाच विचार केला.. पण नाहीच होत.. रोजचा स्वयंपाक पण ठीकठीकच होतो.. भात, आमटी, कोशींबीरी असं किरकोळ जमतं, पण भाजीचं विचारू नकोस.. रोज वेगळी बनते.. स्पेशल पदार्थ करायला तर मी घाबरतेच." निधीचा चेहरा पडला.. "एकतर मला इतका कमी वेळ असतो. संध्याकाळची तयारी सकाळीच करून ठेवते. तरी काही ना काही कारणानी ऑफिसमधून यायला उशीर होतोच. आणि मग धावपळ नुसती. काहीतरी विसरतं तरी, नाहीतर जास्ती तरी होतं. पोळ्या बर्‍या झाल्या तर भाजी नाही, ती बरी तर पोळ्या करपल्या.. तरी सागर खूपच चांगला आहे गं, काहीच तक्रार नाही करत.. मधून मधून चेष्टा करतो, पण काय करणार.. कौतुक करावं असं नाहीच केलं मी काही अजून. तरी मी पुस्तकात बघूनच करते, आणि स्वत:चं डोकं थोडंच वापरते.. पण आई, बोटं चाटून खावं असं नाहीच जमत.. तुला कसं जमतं गं इतकं पर्फेक्ट सगळं? आज शीरा बघ.. कसला पटकन केलास.. आणि किती चविष्ट.."

आई मनोमन हसली. निधीचा अधीर स्वभाव तिला परिचित होताच. प्रत्येक गोष्टीत घाई आणि गडबड. पेशन्स नाही आणि चिकाटीही. अभ्यासात नेहेमी पुढे, नोकरी पण लगेच लागली आणि लग्न तर तिचं तिनेच ठरवलं होतं.. कुठे कशासाठी थांबायला लागलंच नाही.. आणि आता स्वयंपाकासारख्या ’क्षुल्लक’ गोष्टीसाठी इतकी धडपड करावी लागते म्हणजे काय?

ती म्हणाली, "सोना, अगं स्वयंपाक हे देखील शास्त्र आहे बाळा. तुझ्या अभ्यासाइतकंच क्लिष्ट. जो पदार्थ आपण करणार आहोत, त्याच्या आत्म्यात शिरावं लागतं, त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं.. हे घटक पदार्थ जितके महत्त्वाचे असतात, तितकंच असतं ते आपलं मन त्यात असणं. बघ, आज तू आलीस.. मी शीरा करत असताना तू आजूबाजूला होतीस, बाबा होते, निशू होती.. ह्या सगळ्या माझ्या माणसांवरचं प्रेमही त्या शिर्‍यात साखरेबरोबर पडलं, आणि शीरा आपोआपच गोड झाला.. एरवीपेक्षाही गोड.. आता तू पोळी-भाजी करतेस, पण निवांतपणा असतो का मनाला? ’आज तरी नीट होतंय का?, आज काय चुकणार आहे, आज तरी नको करपूदे बाबा, काय काय घालावं लागतं एका भाजीमधे, शी..’ असे मनात उद्गार काढत ते करणार.. करणार कसलं, उरकणारच. मग तुझं मनच त्यात नसेल, एक ड्यूटी, एक चॅलेंज म्हणून तू स्वयंपाक करत असशील तर तो सुरेख होईल का सोना? ही पाककला आपण आपल्या माणसांसाठी करतो, आपलं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून, त्यांनी पोटभर जेवावं म्हणून करतो.. त्यासाठी मनाचं समाधान आणि शांती हवीच.. आपण समाधानी असलो तर आपोआप ते जेवणही चविष्ट बनतं- मग ती साधी रोजची भाजी का असेना.. असा माझा आजवरचा अनुभव आहे.."
आईचं बोलणं ऐकून निधी काही न बोलता नुसती तिला बिलगली.
---------------------------------------------------------------------------
या नंतर साधारण पंधरा दिवस गेले असतील मधे. शनिवार सकाळ होती..सागर बँकेची वगैरे कामं उरकून आला घरी. घरात येताच एक मस्त वास आला कशाचातरी.. एक सुपरिचित वास.. आजकाल निधीचा स्वयंपाक बराच सुधारला होता.. म्हणजे चक्क चार दिवस झाले होते त्या अंबाडीच्या भाजीची वाट लागून.. "निधी, क्या पक रहा है? जबरी वास येतोय.."
निधीच्या चेहर्‍यावर पण हसू होते..
"ह्म्म. सरप्राईज! बघूया जमलंय का.."
तिने बोलता बोलता ताट वाढले..
"काय आहे काय? आयला! हे तर आईच्या हातच्या गोळ्याच्या सांबारासारखं दिसतंय!"
निधी नुसतीच गालतल्या गालात हसत होती.. सागरनी खाऊन पाहिले..
"आई शप्पत! सहीच.. निधी.. you have done it! मस्त झालंय.. खरंच.. म्हणजे आईच्या हाताच्या टेस्टच्या खूपच जवळ जातंय! थँक्स माय डियर! कसं काय जमलं तुला?"
"अंऽऽ.. थोडं माझ्या आईनी सांगितलं आणि थोडं तुझ्या!"
"काय? तू चक्क माझ्या आईला फोन केला होतास? याच्यासाठी? आज काय सूर्य पश्चिमेकडून उगवलाय की काय?"
लटके रागावत निधी म्हणाली,"इतकं काही नकोय हं बोलायला.. मी काय तुझ्या आईशी बोलत नाही का? केला मी त्यांना फोन आणि विचारली तुझ्या आवडत्या पदार्थाची कृति तर काही बिघडलं का? त्या गोड आहेत हां पण. त्यांनी मला अगदी डीटेलमधे सांगितलं कसं करायचं ते.. जमलंय ना?"
"अगदी! बर, आता तुला थोडंसं काढून ठेव आणि प्लीज ते पातेलंच इकडे दे मला.. आज बरेच दिवसांनी खूप आवडीचं असं काहीतरी मिळलंय.. ह्म्म्म! वा!" सागर बोटं चाटत म्हणाला..

निधी त्याच्याकडे प्रेमभरानी पहात होती. त्याला तसं मनापासून जेवतांना पाहून एक विलक्षण आनंद होत होता तिला. कधी एकदा आईला फोन करून हे सांगते असं झालं तिला..

समाप्त.

February 12, 2008

दिवे आगर

दिवे आगरबद्दल अनेक दिवसांपासून ऐकून होतो.. तिथे सापडलेला सोन्याचा गणपति आणि स्वच्छ किनारा.. सगळ्यांकडूनच कौतुक ऐकले होते.. त्याबरोबर हेही की तिकडे भरपूर गर्दी असते. हा दिवे आगर महिमा ऐकून तिकडे सुट्टी मिळाली की जायचेच असे ठरवले होते. त्याप्रमाणे डिसेंबरमधेच बूकिंग करून २४-२७ जानेवारीमधे दिवे आगरची एक सुंदर सफर करून आलो. जाण्याआधी रस्ता, रूट, तिकडे अजून पहाण्यालायक स्थळे यासाठी नेटवर बराच सर्च मारला होता. पण समाधानकारक माहिती नव्हती मिळाली. त्यासाठी आणि एका अप्रतिम ट्रिपची उजळणी म्हणूनही हा लेखनप्रपंच.

पुण्याहून दिवे आगरला स्वत:च्या चारचाकीनी सर्वात सोपा रस्ता म्हणजे ताम्हिणी घाटातून. घाट ओलांडून आपण थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येतो- माणगाव या ’जंक्शन’ला. माणगाव जंक्शन अशासाठी की इथूनच कोकणात जायला अनेक फाटे फुटतात. त्यातला आपण ’म्हसाळा’हा फाटा घ्यायचा- म्हसाळ्यावर तेव्हाही दिवे आगर दिसत नाही, आपण दिशा पकडायची श्रीवर्धनची. मग श्रीवर्धनच्या बरंच जवळ पोचल्यानंतर दिवे आगरला जायला अचानक फाटा लागतो आणि आलं आलं म्हणेपर्यंत दिवे आगर येतंच! पुणे-माणगाव साधारणपणे १२० कि.मी. आणि माणगाव-दिवे आगर साधारण ४५ कि.मी. असे आटोपशीर १७० कि.मीच्या आत आपण चार-साडेचार तासात एका रम्य ठिकाणी पोचतोही.

पण कधी नव्हे ते सुट्टीला बाहेर पडलो होतो म्हणून आम्ही जरा फिरून गेलो.. आम्ही उलटा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे गाठला. हायवेवर दुसर्‍या टोलनाक्याआधी ’पाली’ला जायला एक्झिट आहे.. ते घेतलं. पालीला बल्लाळेश्वराचं सुरेख दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. एका नयनमनोहर वळणावळणाच्या रस्त्यावरून आम्ही पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाला लागलो.. थोड्या वेळानी माणगाव आणि मग पुढे तोच रस्ता.. अर्थातच पुण्याहून उलटं गेल्यामुळे हे अंतर पडतं साधारण २३० कि.मी. पण चांगल्या रस्त्यांमुळे वेळ साधारण तेवढाच लागतो. सकाळी लवकर नाश्ता करून घराबाहेर पडले तर वाटेत एक चहा ब्रेक घेऊन गरम गरम जेवायला आपण दिवे आगरमधे असतो!

दिवे आगर हे श्रीवर्धन तालुक्यातील एक टुमदार गाव. गावाची लांबी साडेचार कि.मी आणि रुंदी दीड कि.मी. इतका छोटसा जीव याचा. हे गाव इतकं उजेडात कसं आलं? तर, गावात ग्रामदैवतासारखं एक गणपतिचं देऊळ आहे. जवळच्या ’बोर्ली-पंचतन’ या गावातल्या द्रौपदी धर्मा पाटील यांचीही बाग या देवळाच्या मागे आहे. तर पावसाळ्यानंतर, नव्हेंबर १९९७ मधे बागेत खताचं, झाडांना आळी करण्याचं काम चालू होतं. आणि असं खोदताना अचानक एका सुपारीच्या झाडाखाली ’खण’ असा आवाज झाला.. कसला आवाज म्हणताना काळजीपूर्वक खोदले असतां चक्क एक तांब्याची पेटी, साधारण जुन्या काळातल्या ’ट्रंक’ असतात ना, तशी मिळाली. तिच्याच एका कोपर्‍यात खोदताना पहार बसली होती. पेटीला कुलूप होतं. ’पेटी सापडली’ ही वार्ता त्या इवल्याश्या गावात वार्‍यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठीत मंडळी, पोलिस सगळे आले. सर्वांसमक्ष पेटीचं कुलूप तोडण्यात आलं. सर्वांनाच ’आत काय आहे?’ याची उत्सुकता.. खजिनाबिजिना असला तर? आणि खरंच एक खजीनाच लागला हाती. आत होता गणपतिचा शुद्ध सोन्याचा मुखवटा! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्या डब्यात होते गणपतिचे अलंकार!!! समस्त लोकांनी आश्चर्यानी तोंडात बोटं घातली. हे तर आक्रितच होतं. लोकांचे जथ्थेच्या जथ्थे आले हे पहायला.
आता खरंतर ’पुरलेलं धन’ सापडलं तर ती असते सरकारी मालमत्ता. हे असं ऐतिहासिक महत्त्व असणारं धन सरकारदरबारी नोंद होऊन जातं दिल्लीच्या अथवा कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात. आता हा मुखवटा आणि दागिने इतके लांब गेले तर पुन्हा पहायचे कधी? आणि जाणार कोण ते पहायला? मोठाच प्रश्न होता.. पण सापडली, त्यात एक वाट सापडली! असाही कायदा आहे म्हणे की जमिनीखाली ३ फूटांपर्यंत असं काही धन सापडल्यास त्याची मालकी मूळ मालकाकडेच रहाते. पण त्या खाली धन सापडलं, तर ते सरकारचं! आता पेटी तर लगेचच खाली सापडली होती. त्यामुळे तिची मालकी सुदैवानी द्रौपदी धर्मा पाटीलांकडेच राहिली. या कामी तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी बराच पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले- हा मुखवटा जिथे ठेवला आहे त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली- ’महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने’!!!

मुखवटा आहे कसा? तर त्याला मुकुट आहे.. आणि आपल्याकडे दिसतो तसा छोटा मुकुट नाही, तर दक्षिणेत दिसतो तसा उंच मुकुट आहे.. मुकुट, चेहर्‍याचा भाग, खांदे आणि सोंड असा साधारण २६ इंच लांबीचा मुखवटा आहे.. तो मूळ दगडी मूर्तीवर अगदी ’फिट्ट’ बसतो! सोबत जे अलंकार आहेत तेही दाक्षिणात्य पद्धतीचेच आहेत.. छोट्या मोहोरांसारखा हार, बिंदल्या वगैरे.. आणि हे दागिने मुखवट्यावर चढवण्यासाठी मुखवट्यावर योग्य जागी भोकंही पाडली आहेत! मुखवटा आणि दागिन्यांच्या कारागिरीवरून हे काम दक्षिणेतल्या सोनाराने केलं असावं असा अंदाज आहे. सोनं असं शुद्ध आहे की कित्येक हजार वर्ष जमिनीखाली पुरलेलं असूनही त्यावर एकही डाग नाही! सापडल्यावर केवळ रिठ्याच्या पाण्यानी मुखवटा साफ केला आणि तो पुन्हा झळाळू लागला. तेच दागिन्यांबाबतही. मुखवट्याचे वजन आहे १ किलो ३०० ग्रॅम आणि दागिने आहेत २८० ग्रॅम वजनाचे. हे सर्व तांब्याच्या पेटीत ठेवल्यामुळे हाती लागले. लोखंडी पेटी असती तर गंजली असती, लाकडी असती तर कुजली असती. तांब्याची असल्यामुळे त्याला गंज, कीड लागली नाही. झाकणावर कडी आहे , जेणेकरून ती पेटी खाली दोराच्या सहाय्यनी सोडता येईल. हा मुखवटा म्हणजे त्या काळी गावाची प्रतिष्ठा असेल. तो परकीयांच्या, शत्रूच्या हाती लागू नये म्हणून एवढा बंदोबस्त. अजून एक प्रश्न पडतो की ही पेटी आधी कशी काय सापडली नाही? तर ही पेटी ज्या झाडाखाली सापडली तिथे एक आंब्याचं झाड होतं- खूपच मोठा विस्तार होता त्याचा. ते झाड काढलं आणि तिथे सुपारीचं छोटं रोप लावलं. त्या रोपालाच खळं करतांना हे धन हाती लागलं. रोज संध्याकाळी मंदिरात आरती असते. नेहेमीच्या आरत्यांबरोबरच खास दिवे आगरच्या गणपतिची एक आरती असते, ती खूप श्रवणीय आहे. तिथे श्री. विजय ठोसर म्हणून एक गृहस्थ आहेत, ते ही गणपतिची कथा अगदी रंगवून सांगतात.

खुद्द दिवे आगर हे गाव अगदी टुमदार आहे. अप्रतिम, अस्पर्श आणि सुरक्षित समुद्रकिनारा हे त्याचं वैशिष्ट्य. किनाराही अगदी विस्तीर्ण आहे. किनार्‍यावर अजूनतरी भेळ, पेप्सी, लेज वाली मंडली नाहीयेत, त्यामुळे किनारा स्वच्छही आहे. संध्याकाळी, थोडं ऊन उतरल्यावर समुद्रावर यावं, पाण्यात मनसोक्त खेळावं, डोळे निवेस्तोवर सोनेरी रंगाची जादू पहावी आणि घरी अप्रतिम रुचकर जेवणाचा स्वाद घेण्यासाठी परतावं!

दिवे आगर हे तसं संपन्न गाव. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केळीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत, त्यामुळे दूध-दुभतंही पुष्कळ. घरं मोठी, घरामागे बागा आणि शेजारी परसू, गोठा, मोकळी जागा इत्यादि. इथे रहायची सोय ही अशी घरीच होते. कमर्शियल हॉटेलं वगैरे नाहीत. पाहुण्यांसाठी सर्व सोय़ीयुक्त वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत. आपले ’होस्ट’ आपल्या चहा, नाश्त्याची सोय करतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण मिळतं. अतिशय रुचकर, गरमागरम जेवण सगळ्यांकडे मिळतं. फ़क्त आधी सांगावं लागतं. दिवे आगरमधेच ’रूपनारायण’ हे विष्णूचे मंदिर आहे. एका अखंड शीळेतून ही मूर्ति घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. तसंच शंकराचं ’उत्तरेश्वर’ म्हणून एक देऊळ आहे. या दोन्ही मंदिरांची नव्याने बांधणी सुरु आहे. यासाठी शासनाकडून त्यांना अनुदानही मिळाले आहे. लवकरच दोन प्रशस्त आणि सुरेख मंदिरं ही गणपतिच्या देवळाबरोबीनी इथली आकर्षणं होणार आहेत.

दिवे आगरहून श्रीवर्धन १६ कि.मी आहे आणि त्याच दिशेनी हरिहरेश्वर आहे ३२ कि.मी. हरिहरेश्वराचा किनारा साहसी आहे, पण त्यामुळेच त्यावर आता जाऊ देत नाहीत. अनेक तरूण मुलांनी वेड्या साहसापायी तिथे जीव गमावला आहे. पण किनारा अगदी मनोहर आहे. शंकराचं दर्शन घेऊन श्रीवर्धनच्या किनार्‍यावर आपण जाऊ शकतो. श्रीवर्धनचा किनारा दिवे आगरसारखाच शांत आहे, फक्त लांबी कमी आहे. त्यामुळे तोही पोहायला लोकप्रिय आहे. श्रीवर्धन तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथे गर्दी असते. शिवाय ’स्टॉल’ही आहेत सर्व प्रकारचे. श्रीवर्धनहून परततांना अवश्य ’शेखाडी’मार्गेच दिवे आगरला परतावे. शेखाडी या गावाच्या मागेच समुद्र आहे, आणि तो पूर्ण रस्ता केवळ समुद्राकाठून दिवे आगरला थेट जातो.. ही अगदी परदेशात समुद्राच्या काठाची ’राईड’ असते तशीच आहे. केवळ सुरेख. सूर्यास्ताच्या वेळी गेलं तर ह्या अश्या अप्रतिम दृश्याचे आपण साक्षीदार होतो.. केवळ मंत्रमुग्ध!

तसंच, दिवे आगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्‍याजवळ पोचतो. हो, जवळच. किल्ल्याच्या आत पोचण्यासाठी अजून एक दिव्य करायला लागतं. ते म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून साधारण ५० फूटांवर आपण आलो की मोटर लाँचवरून आपली रवानगी साध्या होडीत होते आणि ही होडी किल्ल्याच्या पायर्‍यांपर्यंत आपल्याला पोचवते. येताना तसंच- आधी होडी, मग तिच्यातून लाँचमधे ट्रान्स्फर. आणि हे बर्‍यापैकी घाबरवणारं असतं बरंका. समुद्रामुळे होडी आणि लाँच सतत हेलकावे खात असतात. त्यातच आपण उड्या मारून इकडून तिकडे पटकन जायचे. परत पब्लिक इतका गोंधळ घालतं- मी आधी, मी आधी करत सगळे एकाच वेळी चढण्याची किंवा उतरण्याची घाई करतं. यामुळे होडी पलटी होण्याचीही शक्यता असते.

बाकी किल्ला मात्र प्राचीन स्थापत्यकलेची साक्ष आहे. हा एकमेव सागरी किल्ला आहे तो कायम अजिंक्य राहिला. पुरातत्व खात्यानी ’ऐतिहासिक वास्तू’ म्हणून तिकडे एक बोर्ड चिकटवला आहे. त्यानंतर काहीही केलेले नाही. आज ४०० वर्ष झाली, पण तिथे अजूनही बरेच अवशेष शिल्लक आहेत. गोड्या पाण्याचं तळं आहे. इथे थोडीशी डागडुजी केली, तर पुरातन वास्तूचे जतनही होईल आणि अजून लोक येतील.. पण सरकारी खाती इतकी जागरूक असती तर काय? असो! किल्ल्याच्या माहितीसाठी स्थानिक गाईड मिळतात आणि ते किल्ल्याची बर्‍यापैकी ओळख करून देतात.

तर आमची ही छोटी सफर फ़ारच सुरेख झाली. सर्वांनी आवर्जून दिवे आगरला भेट द्या. एक अनामिक मानसिक शांती मिळते तिथे. मात्र एक कळकळीची विनंति- समुद्र किनारा खराब करू नका, कचरा करू नका. किनारा स्वच्छ आहे, त्याला आपण तरी डाग लावायला नको. दिवे आगरमधे जागोजाग लिहिलेल्या या पाटीवरच्या सूचनांचे आपण पालन नक्कीच करूया. हॅपी जर्नी!