October 31, 2007

प्लॅनिंग!

मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीकडे भिशी होती, सगळ्या जमलो होतो.. हा आमचा ग्रूप आमच्या respective मुलांमुळे जमला आहे. आमच्या सर्वांची मुलं एकाच बालवाडीत. त्यामुळे रोज आणता-सोडतांना, शाळेच्या वेगेवेगळ्या उपक्रमात सहभागी होताना ओळखी झाल्या आणि त्यातून ही भिशी सुरु झाली. तिथे माझी खूप जास्त मैत्री नसलेली, पण मला माहित असलेली अशीच अजून एक ओळखीची होती. तिची मुलगीही माझ्या मुलाच्याच शाळेत होती, पण नंतर आमचा फारसा काँटॅक्ट नव्हता. मला खूपच दिवसांनी ती दिसत होती. आम्ही एकमेकींकडे बघून हसलो. तिला कमीतकमी सातवा महिना तरी होता. ते बघून मीच संभाषणाला सुरुवात केली..
"अभिनंदन. कधी आहे तारीख?"
"नोव्हेंबरचा तिसरा आठवडा.. दिवाळीनंतर कधीही खरंतर.."
"अरे वा, सीझनही छान आहे.."
या नंतरचं तिचं संभाषण मला सर्वस्वी अनपेक्षित होतं हं.. मी हे बोलायचाच अवकाश, तिची गाडी भरधाव सुटली..
"हो गं, मस्त सीझन आहे, मलाही काही त्रास नाही. अगं तनु (तिची मोठी मुलगी- तनुश्री) ऐन मे मधली. छे, एप्रिल मधे मला काय त्रास झाला माहिते.. एका जागी बसवायचं नाही, नुस्ती अस्वस्थता सारखी.. आणि तनु झाल्यावर तर तिला धड दुपट्यात गुंडाळताही यायचं नाही की टोपडं घालता यायचं नाही.. बिचारीला रॅश उठले होते गर्मीमुळे. यावेळी तो काही प्रश्न नाही. बाळाला मस्तपैकी गुरगटवून लपेटता येईल, आणि मलाही चांगल्या हवेमुळे काही त्रास होत नाहीये..भरपूर खातीये, लाड करून घेतीये.. दिवाळीचा फराळ वगैरे, मस्त आयतं बसून खाणारे.."

मला हे इतकं अनपेक्षित होतं की यावर काय बोलावं हे पटकन समजलंच नाही. आणि ती वेळही आली नाही, कारण बाई पुढे बोलत सुटल्या होत्या..

"खरंतर आमचं तसं प्लॅनिंगच होतं यावेळी. पहिल्या मुलाच्या वेळी आपल्याला खरंच काय समजत असतं गं? हिच्या मे महिन्याच्या जन्मामुळे कायकाय झालंय सांगू? शाळांचं माहित आहेच ना तुला.. ज्युनिअर केजीत ऍडमिशन घ्यायची म्हणजे जून मधे साडेतीन पूर्ण हवीत. हिला आधी तीनच वर्षाची असल्यामुळे प्रवेश नाही आणि या वर्षी मिळाली, पण वर्गात सर्वात मोठी आहे.. चार पूर्ण झाली ना मे मधे.. तेव्हाच म्हणलं सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात जन्मलेली मुलं किती सुखी ना.. सगळं कसं विनासायास होतं त्यांचं.. शाळेत वर्षं वाया जात नाही, आणि सगळी मुलं पण एकाच वयाची.. आणि वाढदिवसही मस्त साजरा करता येतो. आमचा तोही प्रॉब्लेमच झालाय ना.. मे महिन्यात शाळेला सुट्टी. सुट्टीत बरोबरची मुलंही गावाला वगैरे जातात.. त्यामुळे शाळेत तर नाहीच, पण घरीही बोलावलं तरी मुलंच नसतात जास्त. इतके दिवस काही कळत नव्हतं, पण या वर्षी बाईसाहेब रुसून बसल्या होत्या चक्क.. कशीबशी समजूत घातली आणि नव्या शाळेत दुसर्‍याच दिवशी नवा फ्रॉक घालून वाढदिवस सेलीब्रेट केला तेव्हाच ऐकलंन तिनं."

तनुबद्दल मला सहानुभूति वाटायला लागली.. हिचं चालू होतंच..

"हे सगळं लक्षात आल्यावर ठरवलंच मग आम्ही की दुसरं मूल हे सप्टेंबर नंतर पण डिसेंबरच्या आत व्हायला हवं. आणि तसंच झालं बाई.. आता नोव्हेंबर.. तेही दिवाळीनंतर.. म्हणजे कसलीच चिंता नाही.. शाळाप्रवेश, वाढदिवस सगळं कसं निर्विघ्न पार पडेल." एकदाची गप्प होऊन समाधानानी हसली ती.

कसलं परफेक्ट प्लॅनिंग होतं नाही.. मी एकाचवेळी सर्द आणि इम्प्रेस झाले!!!!

आता ही इतकं सगळं बोललीच आहे, तर आपणही थोडा भोचकपणा करायला काय हरकत आहे असं वाटून मी तिला विचारलं,
"मग आता काय पाहिजे- मुलगा की मुलगी?"

तत्काळ उत्तर दिलंच तिनी, "मुलगा झाला तर मस्त होईल ना.. एक मुलगी, एक मुलगा.. चौकोनी कुटुंब होईल आमचं.. तसं काय मुलगी झाली तर काय वाईट नाही वाटणार.. आता तो जमाना नाही राहिलाय.. दोन्ही सारखंच.. पण असं वाटतं खरं की मुलगा झाला तर अजून चांगलं- अगदी परफेक्ट फॅमिली! आणि माहित्ये सासूबाई, आई- दोघी म्हणत आहेत की लक्षणंही तशीच आहेत- तिखट खातीये, आरामसे आवरते माझं- अगदी राजेशाही लक्षणं- मुलाचीच गं. तनुच्यावेळी अशी चपळ होते मी शेवटपर्यंत आणि भरपूर गोड खायचे, चटकमटकही काही नाही खाल्लं.. आणि आता गोडाचं काही दिसलं तरी नको वाटतं.. तनुपेक्षा अगदी विरुद्ध लक्षणं आहेत, त्यामुळे मुलगाच होणार असं वाटतंय.." ती स्वत:वरच खुश होत म्हणाली.

मला वाटून गेलंच की, काय ना, नेमकं इथे तिला प्लॅनिंग नाही करता आलं, देवानी तो तरी सस्पेन्स ठेवलाय त्याच्या हातात, नाहीतर हिने नक्कीच मुलगा कसा हवा, उंची, रंग, आवाज- सगळं प्लॅन करून ठेवलं असतं!!

मी आमच्या त्या कॉमन मैत्रिणीला सांगून ठेवलंय- हिचा रीझल्ट लागला की मलाही कळव. मी पण जाणार आहे हॉस्पिटलमधे.. तिचं परफेक्ट बाळ पहायची मलाही उत्सुकता आहे..

October 15, 2007

जे जे उत्तम

"पुस्तक वाचतांना अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर कदाचित ते तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करायचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे."

-----------------------------------------------------------------------
डॉ. नरेंद्र जाधव यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक ’आमचा बाप आन आम्ही’ यातला हा उतारा..

"'तुम्ही भारतातून बाहेर पडू शकता, पण भारत काही तुमच्या मनातून बाहेर पडू शकत नाही' असे म्हणतात ते सर्वार्थानी खरे आहे. प्रत्येक परदेशस्थ भारतीयाच्या मनात विरंगुळ्याच्या क्षणी असतो तो आपला देश. अनिवासी भारतीय एकत्र आल्यानंतर, कित्येकदा, आपल्या देशाला दूषणे देताना दिसतात. मात्र त्यामागे, आपण आपल्या देशात नाही याचे त्यांना वाटणारे वैषम्य किंवा वैफल्य असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. आपल्या परदेशी रहाण्याचे स्वत:शी समर्थन करणे किंवा स्वत:ची समजूत काढणे ही भूमिका बहुतांशी त्यामागे दडलेली असते.

जी गोष्ट देशाची, तीच आपल्या मनात वसलेल्या वस्तीची. प्रत्येकाच्या मनात लहानपणापासून एक वस्ती घर करून असते. या वस्तीतल्या घटना जिवंत असतात- एखाद्या चित्रपटाप्रमाणे सलग तुम्ही त्या पाहू शकता. त्या वस्तीतल्या लोकांचे वय वाढत नाही- त्यांना तुमच्या मनानी चिरतारूण्य बहाल केलेले असते. तुम्ही आज सकाळी काय खाले हे चटकन आठवणार नाही. मात्र ’त्या’ वस्तीतले प्रसंग, व्यक्ती, त्यांचे संभाषण किंवा कोणाबरोबर तुम्ही कुठे-काय खाल्ले याचा तुम्हाला विसर पडू शकत नाही. या वस्तीबद्दल इतरांना काही अप्रूप वाटो अथवा न वाटो, त्याचा विचार करण्याची तुम्हाला गरज भासत नाही. वर्तमानात जगत असताना ’भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा’ अशी अतीव आपुलकीची भावना आपल्या मनातल्या वस्तीबद्दल असते. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात साध्या आमटीसाठी अन्नसत्याग्रह पुकारला तो काही एका य:कश्चित खाद्यपदार्थासाठी नव्हता, तर तो होता त्यांच्या मनातल्या वस्तीसाठी! न्यूयॉर्कमधे ७७व्या मजल्यावरच्या एका उपहारगृहात उत्कृष्ट कॉफी मिळते म्हणून एखाद्या जुन्या मित्राला घेऊन जावे तर तो रुईया कॉलेजजवळच्या ’मणी’मध्ये जी कॉफी मिळते तशी झकास कॉफी जगात कुठेही मिळत नाही हे छातीठोकपणे तुम्हाला सांगू शकतो. दोष त्याचा नाही. भूतकाळापासून मनात दडलेली वस्ती, कळत-नकळत, वर्तमानात डोकावत असते, बोलकी होत असते हेच खरे!"

-------------------------------------------------------------------

डॉ. जाधव आणि त्यांची भावंडे आज अथक परिश्रम आणि अभ्यासामुळे उच्च पदावर पोचली आहेत. त्यांच्या वडीलांच्या प्रोत्साहनाचा फार मोठा भाग आहे यात. ते म्हणतात की ’वडाळ्याच्या त्या वस्तीत कितीतरी मुलं होती, आज ती का वर नाही येऊ शकली? किंवा, आम्ही भावंडं वर का येऊ शकलो?- कारण आमच्याकडे ’आमचा बाप’ होता!’ वास्तविक ते ज्या परिस्थितीतून वर आले, त्यात काहीच अभिमानास्पद नाही.. सर्व भावंडांचं बालपण जिथे गेलं ती होती अगदी साधी वडाळ्याची दलित वस्ती. मात्र, डॉ. जाधव कधीही हे लपवायचा प्रयत्न करत नाहीत, हे मला खूपच भावले. आणि त्याहीपेक्षा, या उतार्‍यातले अक्षर अन अक्षर पटलेय मला.. बालपणीची वस्ती.. कधीही तो विचार केला की नॉस्टाल्जिक व्हायला होतेच.. (यावर एक वेगळा ब्लॉग होऊ शकेल, पण ते नंतर कधीतरी!!)

या स्तुत्य उपक्रमाचा जनक ’नंदन’ याचे विशेष आभार. आणि मला यात सामावून घेतल्याबद्दल ’स्वाती’, ’पराग’ आणि ’अनु’ चे स्पेशल धन्यवाद! हा उपक्रम पुढे नेण्याची जबाबदारी मी आता यांच्याकडे देते:

मिलिंद (http://milindchhatre.blogspot.com)
देवीदास (http://akbrahms.blogspot.com)
मीनु (http://meenuz.blogspot.com)
संदीप (http://atakmatak.blogspot.com)
हरेकृष्णाजी(http://harekrishnaji.blogspot.com)

October 8, 2007

परतफेड

भिरामचे नाव पुकारले गेले आणि केतकी भानावर आली. गेला काही वेळ ती तिच्याच विश्वात हरवली होती. वास्तवात येताच पटकन तिने स्वत:चा चेहरा ठीक केला. अभिरामचा अवॉर्ड घेतानाचा फोटो काढला. हे अवॉर्ड म्हणजे अभिरामच्या कष्टांचं जाहीर कौतुक होतं. कंपनीच्या ६००० लोकांमधे फ़क्त २० जण असे होते, आणि त्यात अभि एक होता. त्याच्या सार्थ अभिमान वाटला तिला.

नंतरच्या डिनरला पुन्हा एकदा केतन तिच्या समोर आला, पण तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. खरं तर त्याला तिने इथे कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी पाहिले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला होता. त्यांची औपचारिक ओळख अभिरामच्याच एका कॉमन मित्राने करून दिली होती. त्याला तिथे असं समोरच पाहून आधी तिचा विश्वासच बसला नव्हता, पण निरखून पाहिल्यावर तिची खात्री पटली. हो, केतन गोखलेच होता तो. त्याच्या नावाबरोबरच त्या कटू आठवणीही उफाळून वर आल्या होत्या आणि तिच्या मनाची ती जखम पुन्हा एकदा भळभळून वाहू लागली होती.

केतकी बुद्धीनी जितकी हुशार होती, तितकीच रूपानी सामान्य होती. तिला दिसण्यावरून अगदी लहानपणापासून टोमणे ऐकायला लागत असत. ’लग्नाच्या बाजारात हुशारीला काय किंमत? तिथे रूपवान मुलींनाच मागणी’.. असे ती कायम ऐकत आली होती. तारुण्यसुलभ भावनेनी आपल्यालाही एक जीवाभावाचं माणूस मिळावं असं तिलाही वाटायचं.. पण परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर आपल्याशी कोणी लग्न करायला तयार होईल याच्या आशा जवळजवळ मावळल्या होत्या तिच्या. ईंजिनीयर होऊन ती एमटेकच्या पूर्वपरीक्षेची तयारी करायला लागेपर्यंत तिनी जगाचा पुष्कळ अनुभव घेतला. तिचे आई-वडील स्थळं बघत होते, आणि तीही यांत्रिकपणे ’दाखवून’ घेत होती, पण गाडी त्यापुढे जात नव्हती. अश्यातच केतन गोखलेचे स्थळ तिला आले होते.

केतन त्याच्या आईवडीलांबरोबर त्यांच्याकडे ’चहा-पोहे’ साठी आला होता. बघताक्षणीच केतनची छाप पडली होती सगळ्यांवर. केतनची personality impressive होती. उंच, देखणा, बडबड्या केतन तिला आवडला एकदम, पण ती त्याला, त्याच्या घरच्यांना आवडणं कसं शक्य होतं? खाणेपीणे, हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर ती मंडळी गेली. मनातून सगळे त्यांचा ’नकार’ धरूनच चालले होते. आणि अचानक केतनचा फोन आला होता- तिच्याशी बोलायला.. सगळे चकितच झाले होते. एक ’बघायला’ आलेला मुलगा लगेचच फोन करतो म्हणजे आपण त्याला ’पसंत’ आहोत असे केतकीला वाटणे सहाजिक होते. त्याच्याशी बोलताना केतकी आपसूक खुलली होती. केतन तिला म्हणाला होता ’तुझा आवाज फार गोड आहे, ऐकत रहावासा वाटतो.’ हे असलं बोलणं तिने ऐकलच नव्हतं कधी. ती सातव्या आसमानात होती. तेव्हाच केतननी पुन्हा भेटूया का असे विचारले, नव्हे जवळजवळ ठरवूनच टाकले. यावेळी ते बाहेर भेटले. त्याने तिची पुस्तकांची आवड मुद्दाम लक्षात ठेवली होती आणि तिच्यासाठी एक पुस्तक आणले होते. खूप बोलत होता तो.. नंतरही रोज फोन करून तो त्याच्याविषयी सांगायचा, आणि तिच्याविषयी जाणून घेत होता.. केतकी खूपच खुश होती. तिने तिला आणि केतनला कल्पून त्यांच्या पुढील आयुष्याची अगणित स्वप्न रंगवली..

पण तिचे आई-बाबा मात्र अस्वस्थ झाले होते. मुलं भेटत होती, बोलत होती, पण गोखल्यांकडून पुढच्या हालचाली होईनात. शेवटी त्यांनीच गोखल्यांकडे फोन केला आणि ’मुलांची पसंती आहे, आता पुढच्या गोष्टी कधी ठरवायला येऊ’ असेच विचारले. गोखल्यांनी २ दिवस मुदत मागितली. यानंतर मात्र केतनचे फोन एकदम बंद झाले. दोनाचे चार दिवस झाले, तिकडून कसलाच निरोप आला नाही. आणि आली ती गोखल्यांची चिठ्ठी! ’आपला योग दिसत नाही, क्षमस्व!’ इतकंच!!!

एव्हाना केतकीच्या आई-बाबांना कल्पना आली होती की असेच काहीसे असणार, पण केतकीला फार मोठा धक्का बसला. नक्की कुठे काय बिनसलं तिला अंदाजच येईना. केतन आणि ती किती खुश होते, तास चे तास कसे सरायचे कळायचं नाही ते बोलत असताना. आणि त्यालाही ती आवडली असणारच ना? त्याशिवाय का तो इतका बोलायचा तिच्याशी? मग हे ’योग नाही’ काय? रुढार्थानी त्याने तिची फसवणूक केली नव्हती, पण तिच्या मनाशी खेळला होता तो. arranged marriage मधे एका मुलीशी सतत बोलणं म्हणजे तिच्या अपेक्षा उंचावणं होतंच. तिला सहजपणे ’नकार’ देताना त्यालाही काहीच वाटले नव्हते? त्याला ती थोडीशीही आवडली नव्हती? इतकं व्यावहारिक होतं हे सगळं?

केतकीचं या सगळ्यावरचं मनंच उडालं.. तिने आई-बाबांना निक्षून सांगितले की आता यापुढे ’चहापोहे’ बंद. आई-बाबांनाही मुलीच्या मनाची कल्पना आली. त्यांनी थोडे दिवसतरी हे कार्यक्रम स्थगित करायचे ठरवले.

यानंतर केतकीचा स्वत:च्या दिसण्याबद्दलचा न्यूनगंड अजूनच वाढला. लग्न आपल्यासाठी नाही असे तिने मनाला समजावले आणि तिने स्वत:ला अभ्यासाला जुंपले. अश्याताच तिला एका मोठ्या कंपनीत नोकरीची ऑफ़र आली. लग्नाची शाश्वती नाही, किमान स्वत:च्या पायावर तरी उभं रहायला हवे असा विचार करून तिने ती घेतली.

आणि तिथे तिला अभिराम भेटला. अभिराम तिला बराच सीनीयर होता. अतिशय हुशार, मितभाषी, कामाला वाहून घेतलेला आणि मदतीस तत्पर अशी अभिरामची ख्यातीच होती. त्याच्या हाताखाली काम करायला मिळावं म्हणून बाकी लोक धडपडायचे. मात्र ती त्याच्याशीच काय, तर इतर टीममेट्सशीही कामापुरतच बोलायची. अभिरामनेही तिच्यात कामाव्यतिरिक्त काहीही interest दाखवला नाही. प्रोजेक्ट मोठं होतं. आधी शिकावू म्हणून रुजू झालेली ती, हळुहळू महत्त्वाची कामंही करायला लागली. अभिरामनी तिची हुशारी जोखली आणि तिला अजून जबाबदारीची कामं देत गेला.

दोन वर्षांनी अभिरामला दुसर्‍या अजून मोठ्या कंपनीची ऑफ़र आली आणि तो तिकडे गेला. अभिराम गेल्यानंतर केतकीला जरा चुकचुकल्यासारखे झाले, त्याच्याबद्दल मनात आदर होता तिला. अतिशय संयमी वागणं, मृदू पण ठाम बोलणं.. एक ’आयडीयल’ माणूस होता तो. आणि त्यानंतर अचानक त्याची मेल आली होती.. लग्नाचं विचारलं होतं त्यानी.. अगदी थेट. केतकीला आधी गोंधळायलाच झालं आणि मग चक्क मनातल्यामनात हसू आलं. अभिरामचा स्वभावच असा होता. प्रामाणिक, सरळ. लपावाछपवी नाही, आतबाहेर नाही. अभिराम दिसायला अगदी साधा होता.. किरकोळ शरीरयष्टी, चष्मा आणि साधी रहाणी. सच्चेपणा तर जाणवायचाच. पण त्याला असं का बरं वाटलं होतं तिच्याबद्दल? ती दिसायला सामान्य, थोडी हुशार, कष्टाळू.. थोडक्यात सांगायचं तर अभिरामसारखीच होती की ती खूपशी!

अभिराम तिच्या गुणांकडे पाहू शकला होता. त्याला केतकीचा चांगुलपणा आणि innocence जाणवला होता. त्याची खात्री होती की ते एकमेकांना उत्तमपणे समजू शकले असते. आणि गेली २ वर्षं आनंदानी संसार चालू होता त्यांचा. केतकीचा shy स्वभाव अभिरामच्या संगतीत फ़ुलला होता. तिच्यातला न्यूनगंड कमी होऊन तिला थोडा आत्मविश्वास आला होता. अभिराम आणि ती एक ideal match होते. professionally केतकीचं बस्तान तिच्या कंपनीत बसलं होतं आणि अभिरामची तर उत्तरोत्तर प्रगति होत होतीच.

आणि आज अचानक केतन तिच्या समोर आला होता! त्याने तिला नाकारण्याचे कारण तिला आज ’दिसले’ होते. त्याची बायको दिसायला अगदी देखणी होती, हजारात उठून दिसेल अशी.. तिचे मन विषादानी भरले.

डिनर चालू असताना अभिरामला सतत कोणीतरी भेटत होते, त्यामुळे ती एकटीच जेवत होती. काहीतरी घ्यायला ती बूफ़ेटेबलपाशी गेली आणि संधी साधून केतन तिच्याशी बोलायला आला. ती जरा नर्व्हस झाली. तिला नक्की कसे react व्हावे कळेना पटकन.. आज इतक्या वर्षानी त्याला समोर पाहिल्यावर त्याच्याबद्दल घृणाच वाटली तिला खूप..
"हाय. कशी आहेस?"
"मजेत."
"Abhiram is brilliant. आम्ही वेगवेगळ्या locationsला आहोत त्यामुळे आधी भेट नाही झाली. But I have heard a lot about him."

केतन अगदी सहजपणे बोलत होता. जशी काही त्यांची खूप जुनी ओळख होती.. केतकीला जरासा रागच आला. अचानक केतन म्हणाला,
"Actually, I am sorry about that whole incident."

आता मात्र केतकीच्या तो डोक्यात गेला.. आज, इतक्या वर्षांनी त्याला माफ़ी अशी casually मागावीशी वाटत होती? ते सुद्धा ती समोर आली म्हणून.. तोंडदेखली.. त्याला खरंच ’त्याचं काही चुकलं’ असं वाटत असतं तर त्याने तेव्हाच, त्या प्रसंगानंतरच तिला हे सांगितलं नसतं? कशासाठी करत होता तो इतका नाटकीपणा? आपल्या सारख्या ’सामान्य’ मुलीला अभिरामसारखा brilliant नवरा मिळाला म्हणून त्याला आश्चर्य वाटत होतं की काय? शक्य तितकं तोडून टाकत ती म्हणाली,

"Sorry? नक्की कशाकशाबद्दल sorry म्हणणार आहेस? राहूदे. On the contrary, please accept my thanks!"

केतन चक्रावला! त्याच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून केतकीला हसू आलं. ती थेट त्याच्याकडे पहात म्हणाली..
"हो, खरंच.. कारण त्याशिवाय मला अभिराम भेटला नसता!!"

केतनला काही समजायच्या आतच केतकीने त्याच्याकडे पाठ फ़िरवली होती आणि ती अभिरामच्या दिशेने जायला लागली होती.