August 9, 2011

ऍटिट्यूड!


डदामाजी काळेगोरे असतात, हे मान्यच आहे. पण ते काळे नेमके जेव्हा आपल्याच वाट्याला येतात ना, तेव्हा हताश व्हायला होते खरे! मराठी पुस्तक विक्रेत्या दुकानांचे हे काही अनुभव-

पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकातल्या एका नामांकित दुकानात (तिथली सगळीच दुकानं नामांकित आहेत म्हणा!) शिरायचा प्रयत्न करत होते. हो, प्रयत्नच. कारण, पहिली पायरी चढताच, "काय हवंय" अशी पृच्छा झाली. लेखकाचं नाव सांगितलं. ते त्या माणसाला ठाऊक असल्याने मला दुकानाच्या आत जाण्याची परवानगी मिळाली. आत गेले. नेमकं मला हवं असलेलं पुस्तक नव्हतं. पण आत आलोच आहोत, तर बाकीची पुस्तकं चाळू असा विचारच (कृती करायला वेळच दिला नाही त्यांनी!) करत होते, तोवर अजून एक पृच्छा आली, "किती वेळ लागणार आहे तुम्हाला?"

"आं?" मला प्रश्नाचं प्रयोजनचं समजलं नाही. टायमर वगैरे असतो की काय ह्यांच्या दुकानात?

"दुकान बंद करायचं आहे."

घड्याळात पाहिलं. दुपारच्या एकावर काटा टेकत होता. काय वक्तशीरपणा! वा! दुकानाचं शटर निम्मं खाली केलेलंही होतं, मीच बाहेर जायची काय ती वाट होती. दुकानात ग्राहक आहे, कदाचित त्यांना हवं ते पुस्तक नसलं, तरी ते इतर काही खरेदी करु शकतात वगैरे विचार त्यांच्या मनातही आले नसतील. ’ग्राहकांचा संतोष’ वगैरे तर गेलाच कुठल्या कुठे. एक वाजला, शटर डाऊन.
अर्थातच त्यांनी आपल्याला हाकललं हे समजेपर्यंत मी बाहेर पडलेली होते.

आता हट्टाला पेटले. आख्खा चौक पडला आहे. कुठे ना कुठेतरी हे पुस्तक मिळणारच. शेजारच्याच दुकानात शिरले. त्यांनी अजूनतरी शटर खाली ओढलेलं नव्हतं. लेखकाचं नाव विचारताच, ’संपलंय, समोर बघा’ असं खात्रीशीर उत्तर मिळालं. समोर गेले. समोरच्या खात्रीशीर ठिकाणी ’आम्ही नाही ठेवत असली पुस्तकं’ असं तुच्छ उत्तर मिळालं. शेजारी गेले. ’नाही हो’ ऐकायला आलं. अजून पलिकडे ’आम्ही फक्त शैक्षणिक आणि धार्मिक पुस्तकं ठेवतो, कादंबर्‍या तुम्हाला त्या अमूक दुकानात मिळलील’ म्हणत त्यांनी परत शटर डऊन केलेल्या दुकान क्रमांक एकाकडे मला ढकललं. ह्या रिंगणाला अर्थातच काही अर्थ नव्हता, तेव्हा तो नाद सोडला.

पण पुस्तक घ्यायचा निश्चय कायम होता. त्यामुळे तो सगळाच भाग सोडून, शहराच्या दुसर्‍या भागात उभं असलेल्या एक उच्चभ्रू दुकानात शिरले. हे दुकान एकदम नामांकित. इथे पुस्तकांवर, लेखकांवर वगैरे अनेक चर्चा, परिसंवाद होतात, विक्रमी पुस्तक विक्री होते वगैरे. अर्थात ते पुस्तक इथे मिळणारच ह्याची खात्री होती. आणि ते होतंही. ते हातात घेऊन दुकानभर फिरले, मनभरून पुस्तकं पाहिली, हाताळली. कोऽऽणी टोकलं नाही. समाधानाने काऊंटरला आले. पैसे दिले. दुकानदार घुटमळला. "मॅडम सुट्टे नाहीयेत." मीही पर्स ढुंढाळली. माझ्याकडे इतके सुट्टे नव्हतेच. मग आता? तोही माझ्याकडे नुसता पहात होता. अरे! किराणामालाच्या दुकानात असते, तर त्याने नक्की पोर्‍याला पिटाळून सुट्टे आणवले असते. पण इथे कसली हालचालच नाही! केवळ सुट्टे पैसे नाहीत, म्हणून तो मला पुस्तक देऊ शकत नव्हता! त्याला त्याची रुपायाचीही खंत वाटत नव्हती आणि! क्षणभर मोह झाला, की त्यालाच म्हणावं, ’कीप द चेन्ज’. पण म्हणलं, कशासाठी? इतकं भारी दुकान चालवता, मोठी आब राखून आहात प्रकाशकांमध्ये? पण काय तुमचा ऍटिट्यूड? ग्राहक पैसे देतोय, पुस्तक विकत घेतोय, पण केवळ परत द्यायला पैसे नाहीत म्हणून पुस्तक विक्री करणार नाही तुम्ही? आणि त्याचं काहीही वाटत नाही तुम्हाला? चेहरे निर्विकार असलेले कसले हे लोक पुस्तकं विकायला बसतात हो? कमाल वाटली. अर्थातच तिथूनही बाहेर पडले. रिकाम्या हातानेच.

मिशन पुस्तक चालूच. आता अजून एक नव्यानेच उघडलेलं चकाचक दुकान. सर्व माहिती संगणकावर. पुस्तकांना बारकोड इत्यादी. ’पुस्तक आहे का?’ असे विचारल्यावर तिने संगणक तपासून पाहिले, पुस्तक होते. पण ते त्या भव्य दुकानात कुठे होते? ते मात्र तिला माहित नव्हते! शोधायला अजून दोन मदतनीस आणि दहा मिनिटं लागली. मान्य आहे, की ती कदाचित नवीन असेल, कदाचित पुस्तक मांडणी बदलली असेल, शेकड्याने पुस्तकं असताना, नेमके पुस्तक शोधायला वेळ लागणारच, वगैरे. पण तरीही, कुठेतरी हिरमुसायला होतंच.

आपण ग्रंथालयात जातो. शासकीय ग्रंथालय असेल, तर इमातरीपासूनच सगळं एकदम भव्यदिव्य असतं. पुस्तकांनी खच्चून भरलेली कपाटं पाहिली, की कधी एकदा त्या पुस्तकांना हाताळतोय असं होतं. मात्र हमखास अशा ग्रंथालयांचा ग्रंथपाल हा निरिच्छ आणि पुस्तकद्वेषी असतो. मनात कुठेतरी वाटून जातंच ना, की हे देखील पुस्तकप्रेमी असते, तर न्याय्य झालं असतं, नाही? पुस्तकं विकणं, ग्रंथपाल असणं म्हणजे नुसता कोरडा व्यवहार असतो का? पैसे किंवा पुस्तक दिले, आणि विषय मिटला, असं? असे कित्येकांना अनुभवही आले असतील, की त्यांना उत्साही पुस्तकप्रेमी विक्रेते भेटले आहेत आणि त्यांचा तो सर्वच वेळ खूप खूप आनंदात गेला आहे. ते पुस्तक कधीही उघडले, की तो पुस्तक विक्रेता त्यांना हमखास आठवत असेल, त्याच्यासोबत झालेल्या गप्पा, अजून पुस्तकांबद्दल माहिती, किस्से वगैरेही आठवत असतीलच. मग पुढच्या वेळी, पुस्तक घ्यायला ते त्याच दुकानात जाणार. तो विक्रेता त्याच उत्साहाने त्यांना पुस्तकं दाखवणार, वर ’हेही बघा हो, सुरेख लिहिलं आहे’ वगैरे म्हणणार. त्याच्यावर भरवसा ठेवून तेही अजून काही खरेदी करणार.. किती आनंददायक प्रवास आहे सगळा!

आमच्या वाट्याला मात्र ’शीरापुरी, पुढच्या घरी’ हेच! तरीदेखील परत पुस्तकखरेदीच्या वेळी हे सर्व अनुभव गाठीशी बांधून एका नव्या दुकानावर स्वारी करणारच! त्यांचा ऍटिट्यूड काय आहे हे पाहण्यासाठी!

10 comments:

चिंतातुरपंत धडपडे said...

तुम्ही म्हणता आहात ते अगदी खरे आहे. मी काही तुमच्या इतका पुस्तक प्रेमी नसेन पण जेवा केव्हा मी अप्पा बळवंत चौकात गेलो आहे तेव्हा दुसरी पुस्तक बघायचा मोह आवरत नाही. पण पुस्तकांची किमत नपरवडणारी असल्यामूळे पुस्तक नाही घातले तर ह्या पुस्तक विक्रेत्यांचे तोंड बघून झाक मारलीये आणि ह्या दुकानात आलो असे वाटायला लागते.त्या मानाने मुंबईच्या पुस्तक पुस्तक विक्रेत्यांचा अनुभव चांगला आहे

Naniwadekar said...

> कधी एकदा त्या पुस्तकांना हाताळतोय असं होतं. मात्र हमखास अशा ग्रंथालयांचा ग्रंथपाल हा निरिच्छ आणि पुस्तकद्वेषी असतो.
>---------

पुस्तकाची पाने फाडणे आणि घरी नेणे, या भारतीय सुसंस्काराचा चटका बसलेले ग्रंथपालही असतात. पुण्यात Film Archives वाल्या संस्थेत 'गीत कोश' कुलुपात बन्दिस्त आहेत. गीत-कोश-कार 'हमराज़' यांनी मला त्यातल्या एका माहितीचा शोध घेण्याबद्‌दल मेल पाठवली. म्हणून मी गेलो तर तिथल्या बाई संशयानीच वागताहेत. मी त्यांची बाज़ू समज़ू शकतो, कारण महत्त्वाची पानं गहाळ झाल्याचा त्यांना अनुभव आहे. 'हमराज़' यांच्या एका माहितीबद्दल मला संशय आहे, आणि त्यांच्या कामासाठीच मी आलो आहे, हे सांगितल्यावर मुश्किलीनी मला तो कोश हातात मिळाला. माझ्याज़वळ कोश आहे, पण तो पुण्यात नाही. ही माहिती त्या बाईंना कशी असणार?

का कोण ज़ाणे, पण पुस्तक चोरणे हा प्रकार इंग्लंड-अमेरिकेत ज़वळपास नाहीच. आपण भारतीय लोक मात्र पुस्तक चोरणे आणि निदान मुख्य पाने स्वत:साठी फाडणे यात आघाडीवर आहोत.

तृप्ती said...

:)

ekikaDe maraaThee pustakanna vaachak naahee asaa oraDaa hoto aaNi dusareekaDe he ase pustak vikrete :(

श्रद्धा said...

तुम्हाला काय वाटत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. पुण्यात तर असे अनुभव येणे गृहीत धरूनच चालायचे, मग वाईट वाटणे वगैरे प्रश्नच येत नाही.
फक्त त्या पुस्तक खरेदीचा राग बिचाऱ्या पुस्तकावर निघाला नाही म्हणजे मिळवलं. ;)

poonam said...

श्री. धडपडे, नानिवडेकर, तृप्ती, श्रद्धा- धन्यवाद.

धडपडे, श्रद्धा- हा पुण्या-मुंबईचा फरक असेल असे वाटत नाही. पुण्यात सुखद अनुभवही आले आहेत, आणि कदाचित मुंबईत मख्ख पुस्तकविक्रेतेही असतीलच की. पुस्तकावर मात्र राग निघत नाही- त्याच्यासाठीच तर इतकी धडपड केली ना! :)

नानिवडेकर- खरंय. दोन्ही बाजू असतात. पूर्वानुभवामुळे ग्रंथपालाची वागणूक बरोबर असेल कदाचित.

विनायक पंडित said...

फार फार वाईट वाटलं पूनम तुमचा अनुभव वाचून! सरासरी असा अनुभव येतो असं म्हणायला जागा आहे.मुंबईतसुद्धा एका तरूण, डॅशिंग पुस्तकविक्रेता कम् प्रकाशकाच्या दुकानात मला हवे असलेले कुठलेच पुस्तक नव्हते मग मी मुद्दाम अतिशय लोकप्रिय विनोदी लेखकांची पुस्तकं विचारली, दुकानातून बाहेर पडलो.’तो’स्वत:च दुकानात होता हे मला बाहेर पडता पडता दिसलं आणि ऐकू आलं, ’ही तीच तीच पुस्तकं अजून किती वर्षं वाचणार हे!’ म्हणजे या लोकांना प्राथमिक मॅनर्ससुद्धा नाहीत असं दिसतं.
नेटवरून डाऊनलोड किंवा विकत घेणं हे पर्याय लोकप्रिय होणार यात नवल नाही!

अपर्णा said...

attitude एकदम चपखल नाव आहे या लेखाला...आणि वर म्हटल्या प्रमाणे मुंबईमध्ये तरी असे अनुभव आले नाहीयेत...पण व्यक्ती तितक्या प्रकृती आणि काय?

aativas said...

'फक्त दहा मिनिटे इथे थांबायची परवानगी आहे'; 'सुट्टे पैसे असतील तरच प्रवेश करा' ... अशा पाट्या अजून पुस्तकाच्या दुकानांत कशा नाहीत अस मला आश्चर्य वाटत ..... पण अर्थात पाटीची गरज नाही म्हणा! तस वागलं की झाल!

poonam said...

धन्यवाद विनायक, अपर्णा, आतिवास.

आपण हे अनुभव प्रातिनिधिक नसून तुरळक आहेत असं समजून पुढे जावे असं वाटायला लागलंय. आशा वेडी असते का खरंच? :)

भानस said...

ग्राहक देवो भव! हा मुळी प्रकारच नाही त्यांच्या पुस्तकात मग काय होणार गं.एक म्हणजे एकला दुकान बंद झालेच पाहीजे. गिर्‍हाईकाचा संतोष वगैरे लाड नकोत. :(

मुंबईत खास करून ठाण्यात तरी मला असा अनुभव सुदैवाने कधीच आला नाही. दादरला राहत असताना, शारदा सिनेमागृहाच्या इमारतीतच सार्वजनिक वाचनालय आहे.अगदी लहानपणापासून मी जाई. तिथले सगळे ग्रंथपाल फार हुशार व पुस्तकप्रेमी होते. मात्र पाने फाडल्याचे, रेघोट्या अगदी सर्रास आढळून येत.