April 13, 2010

सुखद धक्का

रकारी कार्यालयात येणारे तापदायक अनुभव आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आले असतील. म्हणूनच आज मुद्दाम एक आलेला सुखद अनुभव लिहावासा वाटतोय (न जाणो पुन्हा असा अनुभव येईल न येईल..)

तर, काही दिवसांपूर्वी माझी आख्खीच्या आख्खी पर्स चोरीला गेली. ती हरवल्याची पोलिस कम्प्लेन्ट मात्र टिपिकल सरकारी अनुभव होता हां- ते परत कधीतरी! असो, तर पर्समध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा सत्रासेसाठ वस्तू होत्या आणि सुमारे पावणेदोनहजार महत्त्वाच्या वस्तू होत्या. त्या सत्राशेसाठांमध्ये अर्थातच होता माझा वाहतूक परवाना. तो माझे ’फोटो प्रूफ’ कम ’रहाण्याचा दाखला’ असा असल्यामुळे आणि पुण्यनगरीत रोजच वाहनाशिवाय तरणोपाय नसल्याने, डुप्लिकेट वाहतूक परवाना काढणे याला पर्याय नव्हता.

आरटीओमध्ये शेवटची मला वाटतं चार वर्षापूर्वी गेले होते, चारचाकी परवान्यासाठी. त्यानंतर वर्तमानपत्रातच उल्लेख वाचले होते- कारभार सुधारत आहे, बिघडत आहे वगैरे वगैरे. जाण्याआधी अनेकांनी सल्ले दिले, कशाला भानगडीत पडत्येस? सरळ एजंट गाठ, काम होऊन जाईल वगैरे. पण पोलिसांच्या आलेल्या दिव्य आणि एकमेवाद्वितीय अनुभवानंतर ठरवलं होतं की जमतील ते सर्व सरकारी कारभार बघूच या. म्हटलं, चौकशी तरी करू, नाहीच जमलं काही, तर एजंट आहेच!

मग शुद्ध मराठीत अर्ज लिहिला. माझ्याकडे माझ्या नवर्‍याचा व्यवस्थितपणामुळे हरवलेल्या परवान्याची प्रत होती. ती घेतली. शिवाय मध्यंतरी घर बदललं होतं, तर त्या घराच्या पत्त्याचे प्रूफही सोबत घेतलं, की एकात एक पत्ताही बदलून मिळेल. हे सगळं माझ्या सुवाच्य अक्षरातल्या अर्जाला जोडलं आणि बिचकत बिचकतच आरटीओत पाऊल ठेवलं.

आत गेल्यागेल्या एजंटांनी चक्क गराडा घातला-’काय काम होतं मॅडम? सगळं करून देतो’, ’मी मदत करतो मॅडम’, अगदी इंग्लिशमधलं 'Can I help you Madam' ही कानावर पडलं! पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून प्रत्यक्ष कार्यालयात शिरले. समोरच ’चौकशी’कक्षात चक्क एक नव्हे तर दोन माणसं बसलेली! शुभशकूनच! नाहीतर ’चौकशी’ची चौकशी करायचीच वेळ येते नेहेमी, खात्रीसाठी गाठा एसटी स्टँड! तर चौकशी-काकांना विचारलं, की असाअसा डुप्लिकेट परवाना हवाय, काय करावं लागेल? त्यांनी सरकारी स्थितप्रज्ञपणाने ’बघू काय कागदपत्र आणली आहेत?’ असं विचारताच मी सगळे दस्तावेज त्यांच्या हवाली केले. सर्वप्रथम त्यांनी काय केलं, तर माझ्या सुंदर अक्षरातल्या अर्जाकडे कटाक्ष टाकून ’हे कशाला? च्यक! हे नाही लागत’ असं म्हणत आधी तो बाजूला ठेवला. माझा चेहरा पडला. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत समोर अंगुलीनिर्देश करत एक खिडकी दाखवली, आणि म्हणाले, ’त्या खिडकीत अर्ज मिळेल, तो भरा. बरोबर आणलेले कागद जोडा आणि मागे बी ब्लॉकमध्ये तो भरा.’ बास? इतकंच? ’हो, फोटो काढायला लागेल, ते सगळं तिथेच होईल (आता जा).’

मी आदेश आल्याप्रमाणे खिडकीतून छापिल अर्ज घेतला. आवश्यक ती माहिती, आवश्यक ते कागद जोडले आणि बी ब्लॉकमध्ये गेले. इथे मात्र ’आरटीओ क्या चीझ होती है’ची झलक दिसली!

प्रचंड गर्दी!! अगणित घोळके!! लोक नक्की काय करत होते कोण जाणे. मान बगळ्यासारखी उंच करून गर्दीचे कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि समजलं की ’लर्निंग लायसन्स’साठी ही एवढी जत्रा! मग म्हटलं बरोबर आहे. एजंट, त्यांच्या ब्यागा, शिक्के, स्टँप पॅड, अर्ज, अनेक प्रकारचे दाखले, तरूण मुलं/मुली, त्यांचे पालक आणि आरटीओचे कर्मचारी!! हा गोंधळ प्रत्येक खिडकीपाशी (अशा चार). आणि हे चित्र मी किमान बारा वर्षांपूर्वी घेतलेल्या शिकाऊ परवान्याच्यावेळीही अगदी असंच होतं, त्यामुळे ह्या कन्सिस्टन्सीबद्दल आरटीओचं कौतुक करावं तितकं कमीच! ’आपल्याला नाही ब्वा त्या गोंधळात जायचं’ असं म्हणत तिकडे पाठ फिरवली. ’मग आपल्याला नक्की कोणत्या गोंधळात जायचंय’ हा प्रश्न राहिलाच. त्याचं उत्तर समोरच्या रांगेने दिलं. डुप्लिकेट, पत्ता बदल, नाव बदल, नूतनीकरण, जुना देऊन नवीन घेणे- आदि, म्हणजेच, शिकाऊ आणि पर्मनन्ट परवाना सोडल्यास जेजे काही म्हणून परवान्यात होऊ शकते, ते सगळे ह्या खिडकीत होत होते. एकाच खिडकीत.

खिडकीला कामकाजाच्या वेळा, जेवणाच्या वेळा, जोडायच्या कागदपत्रांची यादी, परवाना तयार झाल्यानंतर कोणत्या नंबरच्या खिडकीत, किती वाजता, किती दिवसांनी मिळेल अशी सर्व माहिती ठळक अक्षरात चिकटवलेली होती. जास्त काही बोलायचं, विचारायचं कामच नव्हतं. तरी, मी एका कर्मचार्‍याला गाठलं, आणि माहिती काढली. काम सोपं होतं, फक्त तीन रांगांत उभं रहायचं होतं आणि माझ्यापुढे साधारण वीस माणसं आणि ते एजंट असल्याकारणाने, त्यांच्या हातात प्रत्येकी आठ अर्ज असे किरकोळ गणित होते. एकच बरं की मी जिथे उभी होते, तिथे सावली होती. मोठा श्वास घेऊन हरिहरि करत मी रांगेत उभी राहिले.

ज्या बाई खिडकी लढवत होत्या, त्या मात्र एकदम सुपरफास्ट निघाल्या. नक्की काय कारण झाले, मला समजले नाही, पण माझ्या पुढच्या काही एजंट लोकांना त्यांनी एका फटक्यात रांगेतून खारिज करून टाकले- त्यांचे अर्ज अपूर्ण होते म्हणे. त्यामुळे फटकन रांग पुढे सरकली. रांगेत सर्व म्हणजे सर्व एजंट होते, माझा अर्ज मीच घेऊन आलेली मी एकटीच! आणि बाईही एकटीच! त्यामुळे की काय, पण मी खिडकीपाशी पोचल्यावर आतमधल्या बाईंचा आवाज एकदम मृदू झाला. ’डुप्लिकेट परवाना हवाय? पत्ताही बदलायचाय? तुमचाच? या मग आत!’ मी चाट! जिथे वाग्बाण अपेक्षित होते, तिथे स्वागतास फुलांच्या पायघड्या वगैरे? आनंदातिशयाने, आश्चर्याने, मी ’आत’ गेले. तिथे अजून एक बाई होत्या, त्यांनी माझ्या अर्जाची छाननी केली आणि शेजारी बसलेल्या माणसाकडे माझा अर्ज देऊन मला नुसतीच खूण केली. आता खूणेचा अर्थ मी काय समजायचा? हे लोक एकतर कमी बोलतात किंवा खेकसतात! जावं कुठे? त्या माणसाची मान खाली. मनापासून काम करत होता तो. इथे ’एक्सक्यूज मी’ वगैरे ऐकायलाच येत नाहीत कोणाला, त्यामुळे मी थेट मुद्द्यालाच हात घातला. ’मला त्या बाईंनी पाठवलंय.’ त्याने माझ्याकडे पाहिलं. मग बाईंकडे पाहिलं. मग म्हणाला, ’रांगेत उभ्या रहा.’ राहिले. दुसरा उपाय होता?

ह्या रांगेत थोडी कमी गर्दी आणि सरकतही होती पटापट. शुल्क घ्यायची रांग ही. मी रीतसर रांगेमधून परत त्याच माणसासमोर आले. त्याने संगणाकात पाहून शुल्क सांगितले. ते भरले. ’आता?’ - त्यालाच विचारलं. ’पलिकडे फोटो काढा’ असं करड्या आणि मोजक्या भाषेत उत्तर आलं.

’पलिकडे’ किती सापेक्ष आहे हो. कशाच्या, कोणाच्या पलिकडे? इथे तर काही सूचनाफलकही नव्हते. पण यावेळेपत्तोर मी बरीच धीट झाले असल्याकारणाने मी बिनधास्त एका खोलीत शिरले. सुदैवाने, हीच ती ’पलिकडची’ खोली निघाली. तिथे संगणकासमोर एक वेबकॅम आणि ईलेक्ट्रॉनिक सहीसाठी ई-पेन आणि पॅड होते. मला गहिवरून आले. वेबकॅम अजून एका सरकारी कचेरीत पाहिला होता. पण ई-सही??? ते पाहून मला आरटीओवर, सरकारवर एकदम प्रेम-बिम दाटून आले. ’फोटो काढायचाय ना? बसा..’ अगत्याचं आमंत्रणही आलं. बसले स्टूलावर. समोर पडद्यावर मीच! तो लगेच क्लिक करणारच होता. म्हटलं थांब रे बाबा. उन्हातान्हातून आलेली मी, रांगेत उभं राहून दममेली मी- असाच फोटो घेणार होय रे? वेट! पर्समधून कंगवा काढून पटकन फिरवला, चेहरा हसरा केला आणि म्हटलं, शूट, आपलं क्लिक! ते त्यानं केलं. इतकं करूनही फोटो ’वॉन्टेड’च आला की! मला जाम वाईट वाटलं. माझा चेहरा पडला. पण आपला मॅन्यूफॅक्चरिंग फॉल्टच असा आहे, काय करणार? माझा चेहरा हसरा करण्याची जबाबदारी घेतली त्याने. म्हटला ’जा. झालं. दहा दिवसांनी नवीन स्मार्ट कार्ड अमूक नंबरच्या खिडकीवरून घेऊन जा!’ माझा विश्वासच बसेना. काय? काम झालं? विना कटकट, विना एजंट, विना चहापाणी/ चिरिमिरी??? हवेत तरंगतच मी बाहेर पडले.

दहा दिवसांनंतर अजून बोनस चार दिवस होऊन गेल्यावर मी परत आरटीओत! परत एजंट सरसावले. परत मी दुर्लक्ष करीत सांगितलेल्या खिडकीवर गेले. परत रांग! ही सगळीकडे असतेच. पण रांगेत कामं होत असली तर तिचा त्रास होत नाही. हळूहळू माझा नंबर आला. पावती दिली. थोडी शोधाशोध आणि स्मार्ट कार्ड माझ्या हातात!! मला स्वत:चाच अभिमान वगैरे वाटायला लागला.

आप्तेष्टांना मी जेव्हा सांगितले, की मी माझे माझे जाऊन डुप्लिकेट लायसन्स घेऊन आले, तेव्हा त्यांच्या भुवया फूटभर उंच उडलेल्या पाहिल्या मी चक्क!! ’काय? एजंटाशिवाय, पैसे चारल्याशिवाय काम झालं?’ असा सूर प्रत्येकाने लावला. पण त्यांच्या जागी मी असते, तर माझेही नक्की तेच झाले असते. आज जवळजवळ सगळ्या सरकारी कार्यालयात आपल्यासारखे लोक पाऊल ठेवायलाच कचरतात- याचं कारण एकही काम सरळ होईल याचा मुळीच भरवसा नाही! सरकारी कर्मचार्‍यांचा अनागोंदी कारभार, काम करण्याचे पराकोटीचे औदासिन्य, काम करतोय म्हणजे उपकार करतोय असे बोलणे, वेळेवर हजर नसणे, एजंटांवर अवाजवी अवलंबून असणे आणि त्यामुळे एजंटांचे फावणे आणि सरकरी कामकाजाच्या कचाट्यात, जंजाळात समोरच्या व्यक्तीला गुरफटवून टाकणे- सामान्य माणूस घाबरेल नाही तर नवल. त्यामुळेच ’कटकट नको, एजंट करेल सगळं’ असं म्हणत सुटका शोधली जाते. मी गेले तिथेही शिकावू परवान्यासाठी उमेदवारांपेक्षा एजंटच जास्त होतेच की. पण कामाच्या, प्रोसीजरच्या सुस्पष्ट सूचना, शंकांचं निरसन करणारे आणि नीट बोलणारे दोनचार कर्मचारी, काम करण्याच्या बदल्यात सतत पुढे हात न करणे अशी माफक नियमावली प्रत्येक सरकारी विभागाने पाळली, तर नागरिक किती सुखी होतील. यासाठी मात्र आपणही थोडे प्रयत्न करायला हवेत मात्र. योग्य कागदपत्र, योग्य दाखले आणि मुख्य म्हणजे थोडा वेळ द्यावा लागेल. विनाअडथळा, विनामनस्ताप आणि विनाएजंट असं माझं जसं काम झाल तसं सगळ्यांचंच होवो. माझा अनुभव वैयक्तिक न रहाता, सार्वत्रिक व्हावा अशी इच्छा. ह्या अनुभवामधून शिकून किमान एकाने तरी एजंटाविना सरकारी काम तडीस नेलं तरी खूप झालं असं म्हणेन मी. अच्छे कामोंकी शुरूआत घरसेही होती है! :-)

14 comments:

THE PROPHET said...

>>मात्र आपणही थोडे प्रयत्न करायला हवेत मात्र. योग्य कागदपत्र, योग्य दाखले आणि मुख्य म्हणजे थोडा वेळ द्यावा लागेल.

-अगदी बरोबर आहे तुमचा म्हणणं..माझा स्वानुभव आहे...मी बिना एजंट पासपोर्ट काढलाय ...हां पोलिसांनी थोडी दिरंगाई केली...पण चालतं.

शिरीष said...

भुकंपाला धक्का हे हलके फुलके नांव देणे कितपत योग्य आहे...?

आमच्या १००% सरकारी कामे पैशे दिल्याबिगर व्हत नायत असं म्हंनाऱ्या माज्या बायकोला ३ वर्सापूर्वी आमी हाच अनुभव घडविला म्हंजे काय काय करायचे ते समजावून सांगितले आणि ती अर्ध्या तासात सर्व सोपस्कार पार पाडून १ नया पैसाही कोणाला देता येऊन इतकीच खूष झाली होती...

त्यामुळे आपला अनुभव वाचून "निशाणी पायाचा अंगठा" हे पुन्हा कोणालातरी सिद्ध झाल्याचे पाहण्याचे वाचनसुख लाभले...

नियम क्रमांक १, कोणत्याही एजंटाला जुमानायचे नाही... गरज लागल्यास तिथला मराठी लेखनिक वापरा पण काम स्वतःच करा... असे केलेले काम तेथिल कर्मचाऱ्यांना आवडते असा अनुभव आहे...

अनिकेत वैद्य said...

नमस्कार,
मी पुणे RTO मधून ३ मित्रांना डुप्लिकेट लायसन्स काढून दिलं आहे. एजंटच्या मदतीशिवाय.
थोडा त्रास झाला. पण सर्व पद्धत, आवश्यक कागदपत्रे माहीती करून घेतली अन वेळेत काम झाल.
एकही पैसा जादा न देता.

साधक said...

इथे खूप हसलो.
>>’हे कशाला? च्यक! हे नाही लागत
>>पलिकडे’ किती सापेक्ष आहे हो. कशाच्या, कोणाच्या पलिकडे? इथे तर काही सूचनाफलकही नव्हते. पण यावेळेपत्तोर मी बरीच धीट झाले असल्याकारणाने मी बिनधास्त एका खोलीत शिरले.


मस्त लेख. सुखद अनुभव बारिक सारिक गोष्टी सांगुन अजून रंगवायला पाहिजे होता.

भानस said...

sahich ga... :)
ithe marathi font load kelela naslyane ase lihitey... :(. lekha mastach.
me swata saadesatara varshe Sarkaari Nokari keli aahe. jar yogya ti kagadpatre aastil va niyamanusar ( barechda he niyam atishay vedpatasarkhe astaat- khare ter murkhasarkhe mhanaychey... pan... nailaaj aahe na... ) astil ter thodasa dheer dharala ki kaam nakkich hote. barechda lok swatala katkat nako mhanun Agentsna dhartaat ani khapar matra sarkari nokaranvar fodtaat. bin paishane kaame hotaat he nakki. pratyek sarkari nokar haa paise khanarach asanaar hi samjut karun ghetlyane lok praytnach karat nahit.... :(

poonam said...

मनापासून धन्यवाद प्रॉफेट, शिरिष, साधक, अनिकेत, भानस

खरंय भानस, टाळी एका हाताने वाजत नाही. लोक पुरेसे प्रयत्न करत नाहीत आणि सरकारी लोक पुरेशी फ़िकिर करत नाहीत. मधल्यामधे नेहेमीच एजंटाचे फावते.

पण माझ्यासारखे लोक आहेत हे पाहून खूप बरं वाटलं. आपण आपल्या ओळखीच्या लोकांनाही असंच प्रोत्साहन देत राहू. आपण सजग झालो, तर सिस्टिमही कदाचित चांगला प्रतिसाद देईल! आमेन! :)

तृप्ती said...

छान लिहिलं आहेस. मी सहसा अशी कामं श्रीरामपूरला केली आहेत. तिथे माझे संपूर्ण नाव वाचले की कामं होतात :फिदी:

~Cindi

अभिलाष मेहेन्दळे said...

सरकारी काम विना-एजंट झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन पूनम! असले सुखद अनुभव आमच्या वाटेला कधी आलेच नाहीत :( एक दोन अनुभवांचा इतका धसका घेतलाय की पुन्हा प्रयत्न करयला पाय धजावत नाहीत.

बऱ्याच दिवसानी लिहिलस. मजा आली वाचून.

Deep said...

sahiye Poonam :) aata mi hi maaze duplicate navhe tar smart card banvun gheto vina agent!

Anonymous said...

Masta hmm Poonam. Malahi agadi sukhad dhakka basala vachatana :) Aani tujhya khusakhushit shailit ha anubhav vachayala khoop maja aali.
-'ago'

पूनम छत्रे said...

धन्यवाद सिंडी, अभिलाष, दीप, अगो :)

अभिलाष, परत एकदा पक्का निश्चय करून प्रयत्न करा. अर्थात, सरकारी कामात कोणतीच हमी देता येत नाही, तरीही, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता... शुभेच्छा :)

Anonymous said...

Very Nice article

Neha said...

छान लेख होता. वाचून उगाचच भारतीय असल्याचा अभिमान वगैरे वाटला. :)

Mandar Kulkarni (मंदार कुलकर्णी) said...

Hi,

Nice article.... I have made my license, passport without agent and I keep on saying the same thing to my friends... It not not a question of money or effort, but of the mindset !!!