August 27, 2007

स्वीकार

कालपासून अंजली बघत होती.. तेजस शाळेचं काहीतरी घेऊन बसला होता.. काल संध्याकाळी खेळून आला तो त्याच्या खोलीतच होता.. आजही.. नक्की झालंय तरी काय म्हणून अंजली डोकावली.. तर तेजस खाली बसला होता.. workbook उघडं होतं, आणि रंगीत कागद पसरले होते.. तिची चाहूल लागली तशी त्याने तिची नजर चुकवली आणि पसारा आवरायला लागला..
"काय रे, काय करत आहेस?"
"काही नाही"
"मग हे काय आहे? शाळेचं काही आहे का?"
"च्यक"
"मी मदत करू का काही?"
"नको. बाबा करतील.."
अंजलीला थोडं हसू आलं आणि त्याच्याबद्दल खूप मायाही वाटली..
"बाबा कालही उशीरा आले आणि अजून २ दिवस असेच उशीरा येणारेत ते.."
"हो?" तेजसचा आशंकित स्वर.. हे उद्या शाळेत द्यायला हवंच होतं.." मला सांगितलं नाही त्यांनी"
"बरं, आपण त्यांना फोन करूया का? तूच विचार.. चालेल?" विजयला फोन झाला.. त्यानेच सांगितलं तेजसला की यायला वेळ लागेल.. आता तेजसकडे पर्यायच उरला नाही.. अंजलीनी मग फ़ार प्रश्न विचारले नाहीत. तिच्या चेहेर्‍यावर तिचे नेहेमीचे स्मित आले..
"तू मला सांगतोस का? मी मदत करते तुला या वेळी. मग next time बाबाच करतील, चालेल?"
"हं.. हा peacock आहे ना त्याचे feathers वेगवेगळ्या colors मधे चिकटवायचे आहेत.. हे color papers आहेत ना त्यानी..मला cut करता येत नाहियेत हे papers ."
"हो? अरे हे सोप्पं आहे.. आपण करूया.. कोणते colors वापरूया?"
" blue, green आणि pink ?"
"ए pink ? पण peacock कधी pink असतो का? आपण त्यापेक्षा violet वापरूया?"
"हं चालेल" असं एकदा ठरल्यानंतर अंजलीनी पटापट कागद कापले आणि तेजसचा peacock एकदम colorful केला.. पूर्ण झाल्यावर तेजसलाही आवडला तो. तिच्याकडे पाहून हसला थोडा आणि नीटपणे ते पुस्तक त्याने दप्तरात ठेवले.
२ महिन्यानंतर आज प्रथमच अंजलीला एका बुरुज थोऽऽडा ढासळल्यासारखा वाटला.. पण सहाजिकच होतं ते.. तेजसला इतका वेळ लागणार होताच.. आणि आज त्याने तिला त्याचं काही करू दिलं म्हणजे उद्याही देईलच अशीही खात्री नव्हती..
आज जेवायला पुन्हा ते दोघच होते. पण काल तेजस टीव्हीसमोरच होता.. आज तिने chance घ्यायचे ठरवले.. पानं dining table वर घेऊन तिने तेजसला हाक मारली.. तोही काही न बोलता table वर बसला.. अंजलीला खूपच बरं वाटलं.. त्याच्याशी शाळेविषयीच बोलत राहिली ती मग, आणि तिच्या प्रश्नांना हो नाही करत तेजसचं चिमणीसारखं जेवण पटकन संपलं.. आवरून तिने विजयला फोन केला.. त्याला यायला अजून थोडा वेळ होता..

सहज ती तेजसच्या खोलीत गेली.. तसाच झोपला होता तो.. पांघरूण घेतलं नव्हतं, दिवा चालू होता.. तिला खूप वाईट वाटलं.. अजून त्याला थोपटून झोपवण्याची परवानगी दिली नव्हती त्यानी.. त्याच्या जवळ गेली ती.. इतका निरागस चेहरा दिसत होता त्याचा.. त्याच्या केसातून हात फ़िरवायचा मोह कष्टाने आवरून तिने त्याच्या अंगावर पांघरूण घातले.. मागे फ़िरली आणि तिची नजर समोरच असलेल्या त्या तिघांच्या फोटोवर गेली.. किती हसरा फोटो होता तो.. विजय, तेजस आणि अपर्णा.. तिनेच हा फोटो विजयला तेजसच्या खोलीत ठेवायला दिला होता.. तेजस अगदी विजयसारखा होता दिसायला.. अपर्णासारखा असता तर कसा दिसला असता? तिला imagine करता येईना.. पण तिच्या चेहेर्‍यावर पुन्हा स्मित आलं आणि ती झोपायला गेली..

अपर्णा जाऊन आता जवळजवळ ८ महिने झाले होते.. आणि ती घरात येऊन २ महिने.. अपर्णा गेल्यानंतर काही महिन्यातच विजयने दुसरं लग्न केले म्हणून त्याच्या घरचे सगळे नाराज होते आणि काहीसे shock मधेही.. विजयचं आणि तिच ऑफिस एकाच कॉम्प्लेक्स मधे होतं. त्याच्या ऑफिस मधली स्वाती तिची मैत्रिण.. अपर्णाचा अचानक accidental मृत्यु झाल्याचं तिच्याकडूनच कळलं होतं तिला.. आणि मग त्या नंतर ३च महिन्यानी स्वातीनी तिला विचारलं होतं विजयशी लग्नाबद्दल्- केवळ एक proposal म्हणून.. सचिन जाऊन ५ वर्ष झाली होती.. तिचे आईवडील, भाऊ योग्य स्थळ आलं तर पहात होतेच. पण या गोष्टी थोड्या नाजूकच. त्यामुळे हळुहळूच चालू होतं सगळं.. व्यवस्थित माहिती कधी मिळत नव्हती, कधी ती व्यक्ती पसंत पडत नव्हती.. विजय बद्दल तो काही problem नव्हता.. पण त्याने ३च महिन्यात पुनर्लग्नाचा विचार करावा याबद्दल आधी आश्चर्य आणि शंका दोन्ही वाटलं तिला.. पण स्वातीनी तिला assure केलं की विजय इतका विचारी आणि चांगला आहे की नक्कीच त्यामागे काही कारण असेल.. तो पुनर्लग्न करायला तयार आहे.. तू सर्वच बाबतीत त्याला सूट आहेस.. एकदा भेट तरी.. बरं कॉम्प्लेक्स एकच असल्यामुळे भेटणही शक्य होतं कधीही.. एकदा भेटून पाहू म्हणून तिने होकार दिला.. स्वाती विजयशीही बोलली होती.. त्याप्रमाणे ते भेटले..विजयचा चेहरा पार उतरला होता आणि ते सहाजिकही होतं. त्याने लगेच क्लीयर केले की त्याला लग्न करायचे आहे ते केवळ त्याच्या मुलासाठी- तेजससाठी.. तेजस ५ वर्षाचा होता फ़क्त. अपर्णाच्या अचानक मृत्युचा परिणाम सर्वात जास्त त्या छोट्या जीवावर झाला होता.. सकाळी आई आहे आणि घरी परत येतो तोवर ती या जगातूनच गेलेली.. हे इतकं मोठं सत्य पचवण्याचं त्याचं वयच नव्हतं! आणि नंतर आलेले नातेवाईकांचे अनुभव- विजयची आई काही वर्षापूर्वी गेली होती, भावाच्या बायकोनी त्याला घरी घेऊन जायला नकार दिला.. त्याच्या मावश्यांकडेही काही ना काही अडचणी होत्या.. तेजसची जबाबदारी पूर्ण वेळ घ्यायला कोणी तयार नव्हतं.. विजय स्वत:च कोलमडून पडलेला.. तेजसला निरपेक्ष प्रेम देणारी माणसच नव्हती.. उत्साहानी सळसळणारा मुलगा अबोल, कुढा झाला होता.. विजयची सावली बनला होता.. त्याच्याकडे पाहून विजयच्या पोटात तुटायचे.. पुनर्लग्नाचा विचार तेव्हाच त्याच्या मनात आला होता.. पण जिथे सख्खे नातेवाईकच पाठ फ़िरवून गेले तिथे एखादी परकी बाई तेजसला आपलं मानेल? इतक्यातच स्वातीने अंजलीबद्दल सांगीतलं. त्यांची भेट झाल्यावर, एकमेकांशी बोलल्यावर बर्‍याच शंका फ़िटल्या.. दोघांनाही परस्परांबद्दल विश्वास वाटला, कळकळ पटली.

प्रश्न होता तो तेजसचाच. त्याला हे समजावून सांगणं, त्याला ते पटणं अवघड होतच. त्यातून मावश्यांनी कान भरायचं काम केलं होतच. बरोबरची मुलं, त्यांच्या बुध्दीला झेपेल असे त्यांनी लावलेले अर्थ, आणि स्वत: तेजसचे निरनिराळे विचार.. त्याला ही 'नवी आई' अजिबात, मुळीच नको होती.. प्रचंड संशय, राग होता तिच्याबद्दल.. विजय आणि अंजलीची एकमेकांबद्दल खात्री पटल्यावर तो तिला घरी घेऊन आला होता.. तेजसला भेटायला, घर बघायला.. तेजसला कसंबसं समजावलं होतं त्याने.. पण तो खूपसा चिडलेला, खूपसा रुसलेला होता.. अंजली समजू शकत होती त्याची अवस्था..
"तेजू, ही अंजली.."
"तू माझी नवी आई होणारेस? मला नकोय नवी आई.." विजय चमकलाच.. त्याने सावरून घ्यायचा प्रयत्न केला.. पण अंजलीनी अडवले त्याला.. तेजसचा राग बाहेर पडू द्यायला हवा होता..
"तेजस, मी तुझी आई व्हायला नाही आले. तुझी आई तीच आहे- अपर्णा.. मी तुझी friend म्हणून आले तर चालेल ना?"
तेजसला काय बोलाव कळेचना.. ही तर आई होणार नाही म्हणते.. मग आता?
"हे बघ, तुझी आई आता नाही आपल्यात, पण तू छोटा आहेस ना अजून, मग तुझ्याकडे पाहणार कोण? बाबा आहेत, पण त्यांना इतकंसं जमत नाही ना? म्हणून मी येणार आहे.. आपण हळुहळू friends होऊ, ओके?" हे खरं होतं- बाबा करायचे सगळं, पण त्यांना नीट यायचं नाही काही आईसारखं.. आणि गीताकाकूंचा स्वयंपाक काहीतरीच असायचा.. पण म्हणून..
"मला खूप friends आहेत, तू नकोस मला"
"हो, पण माझ्याइतकी मोठी friend आहे का तुला? नाही ना.. सगळे कसे काकू, मावशी, ताई आहेत की नाही? मीच तुझी एकटी big friend होईन.. तू मला अंजलीच म्हण हं?"
तेजसचे सगळे defences अंजलीनी खोडून टाकले. तेजसलाही मनातून आवडली ती थोडीथोडी.. पण फ़ार नाही, थोडीच. तसंही बाबा आणणार होतेच तिला घरात..
मग ती घरी यायला लागली आणि स्वत:ला त्या घराशी, तेजसची familiarise करायचा प्रयत्न करायला लागली.. घराचा, विजयचा अंदाज येत होता.. पण तेजस! दगडी भिंत झाला होता.. तिच्यासमोर यायचाच नाही तो, बोलायची, गप्पा मारायची वेळ दूरच.. पण विजय तिला धीर द्यायचा.. त्या दोघांनी असं ठरवलं होतं की विजयनी तिची बाजू त्याच्यासमोर घ्यायची नाही, तिच्याबद्दल तेजसशी काहीच बोलायचं नाही.. म्हणजे त्यांचे संबंध तरी नीट राहतील, आणि तेजस स्वत:च तिला evaluate करू शकेल..

विजय-अंजलीनी रजिस्टर लग्न केले. स्वाती होतीच, विजयचा भाऊ-भावजय, अंजलीचे आई-वडील, भाऊ-भावजय, त्यांची मुलंही होते. विजयची भावजय खुश होती त्यादिवशी.. तेजसची जबाबदारी तिच्यावर येणार नव्हती आता.. नंतर सगळेच बाहेर गेले जेवायला.. तेजस चेहरा पाडून आला.. आई गेलीच, पण बाबाही आता आपले राहिले नाहीत असं उगाचच वाटत होतं त्याला.. पण बाबा तर नेहेमीसारखेच वागत होते. त्या अंजलीच्या भावाच्या मुलांबरोबर खेळायची खूप इच्छा होत होती त्याला, पण आज आपला मूड नाहिये अशी स्वत:ची समजूत घालून तो खुर्चीवरून हललाच नाही.. विजयच्या बाबांना फ़ारसं पसंत नव्हत हे सगळ.. अपर्णाच्या घरचे लोक येणं शक्यच नव्हतं.. एकूण खेळीमेळीत जेवण पार पडलं..

घरी अंजलीचं सामान पाहून तेजसला पुन्हा एकदा खूप उदास वाटलं आणि खूप रडू यायला लागलं. तो एकटाच त्याच्या खोलीत बसला खूप वेळ आणि तिथेच त्याला झोप लागली. उठून बाहेर आला तर अंजली सफ़ाईनी किचनमधे वावरत होती.. विजय तिथेच काहीतरी वाचत होता.. मधूनच गप्पा मारत होते ते दोघं.. किती नॉर्मल वाटत होतं सगळं. काही महिन्यांपूर्वीसारखंच! तो विजयजवळ जाऊन बसला..

"तेजस तुला दूध देऊ?"
"हो"
"तू मला सांगतोस का की कसं आवडतं तुला दूध- गरम की कोमट, त्यात काय घालू, बरोबर बिस्किट खाणार का.."
"बाबांना माहीत आहे.. ते देतील.."
"बरं त्यांना सांगूदेत.."
"अरे पण सांग ना तू.. जे विचारतीये ते.."
"का, तुम्ही देत होतात ना मला.. का आता तुम्ही माझं काहीच नाही करणार?"
"असं नाही तेजस. अंजू नवी आहे ना.. तिला आपण नको का सांगायला?"
"मी नाही सांगणार काही.. मला नकोच काही तिचं" पुन्हा रागावून तेजस बॉल घेऊन खेळायला गेला बाहेर.. विजय आणि अंजली दोघेही हिरमुसले.

संध्याकाळी तेजस घरी आला, तेव्हा मस्त उपम्याचा वास सुटला होता घरात. त्याला खूपच भूक लागली.. आल्या आल्या तो त्याच्या खोलीत शिरला.. विजयला अंजूनी खूण केली..

"तेजस, तुला भूक लागली असेल ना? चल, हातपाय धुवून घे पटकन. मग मी तुला काहीतरी सांगणार आहे.."
तेजसचा चेहरा प्रश्नार्थक झाला, पण त्याने विजयचं ऐकलं. विजयच्या हातात त्या तिघांचा फोटो होता, बागेत काढलेला.. तो त्याने तेजसच्या टेबलवर ठेवला..
"तेजू, रोज संध्याकाळी जसं देवाला नमस्कार करतोस, तसाच आईलाही नमस्कार करायचा.. बेटा, आईलाही वाटतच ना की तेजूनी शहण्यासारखं वागावं.. बाबांवर, अंजूवर रागावू नये.."
"बाबा, सॉरी".. तेजसला रडू आलं.. विजयनी त्याला जवळ घेतलं आणि त्याचेही डोळे पाणावले.. अंजू पहात होती.. ही फोटोची कल्पना तिचीच होती.. कोणत्यातरी निमित्तानी तेजसचा सर्व राग, सर्व confusions बाहेर यावीत, तो नॉर्मल व्हावा त्यासाठीचा प्रयत्न होता तो. अपर्णाची जागा घ्यायला आली नाहिये ती हेही तेजसला समजलं असतं. त्याची insecurity दूर करणं फ़ार महत्त्वाचं होतं सध्या..थोड्या वेळानी दोघंही बाहेर आले. अंजूनी गरम गरम उपमा केला होता आणि गुलाबजाम. तेजस व्यवस्थित जेवला आणि लगेच झोपला..

अंजू वर्तमानात आली. अजूनही तेजस शक्यतो अंजूसमोर येण्याचं टाळायचाच. आला तर कामापुरतं बोलायचा.. अंजूलाही कळलं होतं ते. त्यामुळे अजूनही विजयच तेजसचं सगळं करायचा.. तेजसचा अभ्यास खूप मागे पडला होता या मधल्या काळात. शाळेत जाऊन टीचर्सना भेटणं, वर्गातल्या मुलांच्या वह्या आणणं, त्या उतरवणं, तो अभ्यास त्याच्याकडून करून घेणं हे सगळं खरंतर अंजूला करायचं होतं, पण तेजस तिला अजून publicly accept करायला तयार नव्हता.. ही आपली 'नवी आई' हे सांगायची लाज वाटत होती त्याला.. पर्यायानी विजयवर फ़ारच ताण येत होता.. तेजसला समजत होतं, पण हट्टीपणा करत होता तो मुद्दाम.

मग अंजूनी वेगळा मार्ग निवडला.. गीताकाकू आधी फ़क्त पोळ्या करायच्या, मधल्या काळात त्यांनी स्वयंपाकाची जबाबदारी घेतली होती, पण पुन्हा अंजूच करायला लागली सगळं. त्यांच्याकडूनच तिला अपर्णाबद्दलही बरीच माहिती कळली, तेजसच्या खाण्यापिण्याचा आवडी कळल्या.. त्याप्रमाणे घरात नवनवीन पदार्थ घडू लागले, तेजसला घरी छान खाऊ मिळायला लागला.. त्याचा खुललेला चेहरा पाहून अंजूलाही बरं वाटायचं. हळुहळू, पण निश्चितपणे तेजस तिला स्वीकारत होता..

"तेजस, तुझे मित्र येत नाहित आपल्याकडे कधी.. बोलाव ना त्यांना खेळायला.. तुझ्याकडे किती games आहेत, मी काहीतरी खायलाही करीन.."
"वरद आणि अनिश येऊदेत? जवळच राहतात ते.. "
"अरे बोलाव ना या रविवारी मग.."
"चालेल. पण तू खायला काय करशील? बटाटेवडे येतात तुला? आणि wafers ?"
"अरे येतात की, चालेल.. आपण केलेच नाहित नाही का? ओके, डन मग.."

तेजसलाही समजत होतं.. मावशीनी सांगीतलं तशी नाहिचे ही अंजू.. आपल्याला काहीच त्रास देत नाही.. उलट सगळं करते नीट.. जेवण तर मस्तच. आणि नवे कपडे, खेळही पहिल्यासारखेच मिळतात. बागेत, बाहेर जातो आपण तेव्हा मस्त वाटतं- बाबा, आपण आणि अंजू- एक family , आधीसारखीच.. आणि ही आल्यानंतर बाबाही काही लांब वगैरे गेले नाहियेत आपल्यापासून.. नेहेमीसारखच बोलतात की आपल्याशी.. उलट थोडे बरे दिसतात. मधूनच शिट्टीवर गाणंही म्हणतात आधीसारखच.. आईची खूप आठवण येते, पण ती नाहीच येणार परत कधी.. अंजू छान आहे मग, ना? कधीकधी वाटतं की तिच्याशी खूप भांडावं, पण तिचं हसू पाहून नको वाटतं. तिचे हात खूप मऊ आहेत ना? मस्त वाटलं तिने त्या दिवशी रस्त्यावर हात धरला तेव्हा.. ती आपला रागराग करत असती तर अशी छान वागली नसती.. आपले friends पुन्हा यायला लागलेत, आणि मावशी, काकू पण येतात मधून मधून. ते तिच्याकडचे लोक पण चांगले आहेत. आपल्याशी छान वागतात. सगळं पुन्हा आधीसारखं होतय असच वाटतय. तिला नुसतं अंजू म्हणायलाही काहीतरीच वाटतं पण..काय म्हणूया बरं तिला.....?

एक दिवस तेजस शाळेतून घरी आला.. आवरून जेवायला किचन मधे आला. अंजूचा चेहरा वेगळाच दिसत होता..
"तेजू, आज आपापलं जेवशील? सगळं आहे इथे.."
"तुला काय झालंय?"
"जरा बरं वाटत नाहिये सकाळपासून, मी झोपते थोडा वेळ, चालेल?"
रोज ती तेजससाठी थांबायची जेवायला..
"तुला नाही जेवायचं?"
"नाही, भूकच नाही, मी झोपते. तू नीट जेव हं, आणि आवरीन मी सगळं नंतर" इतकं बोलून अंजू खोलीत गेली.
संध्याकाळचे ५ वाजले तरी अंजू झोपलेलीच! आता मात्र तेजस अस्वस्थ झाला. अंजूच्या आसपास वावरण्याची, काहीतरी कामं करायची त्या आवाजांची, त्याच्याशी काहीतरी बोलायची चाहूल असायची रोज.. तिचं मधूनच गुणगुणणे, कधी फोन, टीव्हीचा आवाज.. आज काहीच नव्हतं, सगळं कसं शांत शांत. त्याला दूध प्यायचं होतं, ग्राऊंडला खेळायला जायचं होत., पण ही उठलीच नाही.. तेजस हळूच तिच्या खोलीत आला.. पांघरूण ओढून झोपली होती.. तिचा चेहरा असा काही दिसत होता की तेजसला तिला उठवावसं वाटलं नाही.. त्याने विजयला फोन केला.. विजय तासानी आला घरी..
"अंजू, अगं काय झालं तुला, उठतेस ना? काय होतंय तुला?"
"अं? किती वाजले? आईगं!"
"अगं काय होतंय तुला? ६ वाजून गेले.. दुपारपासून झोपलीच आहेस? तेजसनी फोन केला मला.. ताप आहे वाटतं खूप.. बापरे.. थांब चेक करतो.. क्रोसिन नाही का घेतलीस?"
अंजू काहीच बोलली नाही, पटकन बाथरूम मधे गेली, तिला मोठी उलटी झाली.. आता मात्र विजयही घाबरला.. त्याने तिला कॉफी केली आणि डॉक्टरकडे घेऊन गेला.. अंजूला कसलंतरी infection झालं होतं, त्याचा ताप होता.. आणि उलटीमुळे अशक्तपणा आला होता खूप.. काळजीचं काही कारण नव्हतं, औषध घेऊन आणि पूर्ण विश्रांतीनंतर बरी झाली असती ती.. विजयला हुश्श झालं. घरी येताना तो इडली सांबार घेऊन आला, भात लावला.. अंजूला त्याने जेवायला घातलं आणि गोळ्या देऊन झोपवलं..

एका वर्षात त्याच्या जीवनात किती मोठे बदल झाले होते.. अपर्णाचा तो धक्कादायक मृत्यू, पुनर्लग्न म्हणजे जुगारच होता, पण अंजू तर अक्षरश: Godsent होती.. तेजसची सर्व प्रकारे काळजी घेतली तिनी, एका शब्दाने कधी तक्रार केली नाही, त्याला, आपल्याला, कसं सहजी आपलं म्हणलं.. हिला काही झालं असतं तर....... विजयला ती कल्पनाही सहन होईना..

या सगळ्यात तेजसकडे त्याचं लक्षच गेलं नव्हतं.. तो ग्राऊंडला जाऊन आला आणि घरी एकटाच थांबला होता त्यांची वाट बघत.. तेजस अंजू झोपली होती त्याच खोलीत एका कोपर्‍यात बसला होता तिच्याकडे बघत.. डोळ्यात पाणी..
"तेजू?"
"बाबा.. काय झालंय तिला?"
"अरे ताप आलाय.. डॉक्टर म्हणले की विश्रांती घेतली की बरी होईल.."
"नक्की ना?"
"हो रे, अगदी नक्की"
"म्हणजे ती मरून नाही ना जाणार आता आईसारखी?" तेजस विजयला मिठी मारून रडायला लागला.. आसपास सतत वावरणारी अंजू अशी गलितगात्र पाहिलीच नव्हती त्यानी.. एक प्रचंड insecurity आली त्याला.. आईसारखीच त्याला अंजूची खूपच सवय झाली होती.. ती त्याला सोडून गेली असती तर..
"अरे, नाही बाळ.. हे बघ, माझ्याकडे बघ.. रडू नकोस. नाही, काही होणार नाहिये तिला हं."
"हो बाबा, मी देवाला नमस्कार करताना म्हणलो आहे की अंजूमम्मी मला खूप आवडते, मला, बाबांना हवीये ती.. तिलाही तुझ्याकडे बोलावू नकोस आईसारखं.."

अंजूमम्मी!! अंजूला चक्क मम्मी म्हणत होता तेजस.. finally त्याच्या मनातली सगळी किल्मिषं दूर झाली होती, त्यानी तिचा स्वीकार केला असल्याचं indication होतं ते..
"असं काही होणार नाही तेजू.. आपण दोघं मिळून अंजूमम्मीची काळजी घेऊ हं.. मग कशी खडखडीत बरी होईल ती बघ!"
"हो बाबा..बाबा मी शहाण्या मुलासारखा वागीन, त्रास देणार नाही, पण तिला काही नको व्हायला.."
"नाही बेटा.. इतका शहाणा मुलगा आमचा असल्यावर तिला कसं काही होईल?" दोघांच्याही चेहर्‍यावर एक समाधानी स्मित होतं..
... आणि ग्लानीत असलेल्या अंजूच्याही!!


समाप्त

August 20, 2007

’गुंडाळलेलं’ प्रेम!

मच्या घराजवळ हल्ली सर्रास सर्व residential एरिय़ाजवळ असते तशी ’चौपाटी’ आहे बरंका.. भेळ, पाणीपुरी, ज्यूस, सॅंडविच, दाबेली, डोसा ई दुकानं ओळीनी आहेत बरीच. ओघानी तिथे पार्किंगही भरपूर असतं. तर परवा तिथून जाताना एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर पडताना मला दिसले. चालतचालत, एकमेकांशी काहीही न बोलता सरळ ते त्यांच्या दुचाकीकडे गेले.. मुलीच्या पूर्ण चेहर्‍यावर स्कार्फ गुंडाळलेला.. फक्त डोळे उघडे, आणि मुलाचा चेहरा तर चक्क हेल्मेटखाली! मला इतकी गंमत वाटली! आणि सवयीप्रमाणे ’थोडे’ प्रश्न पडले!
१) ज्या अर्थी चेहर्‍याचा इतका ’बंदोबस्त’ केला आहे, त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड आहे! मग हे प्रेम त्यांना १० मिनिटं तरी ’मोकळा श्वास’ घेऊ देतं ना?
२) यांनी पाणीपुरी, किंवा तत्सम जे काय ते.. कसं खाल्लं असेल? तेव्हा तरी ही आवरणं दूर केली होती की नाही? का फक्त वासच घेतला?
३) रस्त्यावर सध्या इतकी गर्दी असते की साधं बोलतानाही एकमेकांशी ओरडून बोलावं लागतं, तर हे दोघं ’प्रेमाचे हळुवार कोमल बोल’ कसे बोलत असतील एकमेकांशी? का त्यांची मनंच बोलतात? (आमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, तरी अजूनही सगळं स्पष्टपणेच बोलायला लागतं, त्यामुळे असं ’ मनं समजून घेणार्‍या’ लोकांचा मला जाम हेवा वाटतो!)
४) जे काही दोनचार शब्द बोलत असतील ते एकमेकांना ऐकू कसे जात असतील?
५) प्रेमात ’डोळ्याची भाषा’ असते म्हणतात.. त्यावरच यांचं भागतं का? बाकीचा चेहरा लागत नाही का ही भाषा बोलायला?
ईत्यादि!

पण मला सांगा, हे नुसते चेहरे लपवून काही होतं का हो? (साधी पाणीपुरीही धड खाता येत नाही! ) त्या मुलीच्या ड्रेसवरून, पर्सवरून, अगदी तिने घातलेल्या सॅंडलवरूनही तिला सहज ओळखता येईल.. आणि मुलाकडे तर आख्खी दुचाकीच.. त्याच्या नंबरप्लेटवरून त्याला लांबूनही ओळखता येईल की. ते ज्या कोणापासून लपत आहेत ते काय इतके मूर्ख असतील का की येणार्‍याजाणार्‍या लोकांच्या फक्त तोंडाकडेच पहातील? बाकी काही दिसत नाही त्यांना असं यांना वाटतं का? प्रेमात ते दोघं आंधळे असतील हो, बाकी लोक कसे असतील, नाही का?

आणि हे तोंडं लपवून प्रेम करणं किती अनरोमॅंटिक आहे नाही? ’तिचा’ चेहरा कायम झाकलेला, त्यामुळे तिनी कोणती हेअरस्टाईल केली आहे, कानात काय घातले आहे, लिपस्टिकची शेड तिला चांगली दिसत आहे का.. हे त्याला कळणारच नाही.. आणि कळले नाही तर तो तारीफ तरी कशाची करणार? स्वानुभवावरून सांगते, की अशी प्रेयसीची तारीफ सुरुवातीला तरी करणं आत्यंतिक गरजेचं असतं बरंका.. नंतर संसाररथाला जुंपल्यानंतर खोटं बोलवत नाही हो! आणि खोटं तरी किती काळ बोलणार ना? प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, याच नियमानुसार प्रेमिकेच्या तोंडावळ्याची तारीफ करण्याची देखील एक वेळ असते... ती हीच.. नुकती प्रेमात पडल्याची. आणि नेमक्या त्याच वेळी ती बुरख्यात, आपलं फडक्यात! हाय रे दैवा! तसंच, तारीफ ऐकणं हे कोणत्याही वयोगटातल्या स्त्रीचं आवडतं काम. तीच तिला चक्क प्रेमात पडूनही ऐकायला मिळत नसेल तर काय उपयोग??

आणि ती? तिलाही वाटत नसेल का, की आपला बॉयफ़्रेन्ड किती ’हॅन्डसम’ दिसतो ते आपल्या मैत्रिणींना सांगावं? पण तो तर हेल्मेटखाली! त्याला दाढी चांगली दिसते की नाही, अभिषेक (बच्चन हो!) सारखी ’स्टबल’ चांगली दिसते, की फ़्रेंचकट बरा दिसतो, की अजिबात दाढी नकोच, नुस्ती मिशीच बरी, का पूर्ण ’क्लीनशेव्हन लूक’च बेस्ट याबद्दलची बहुमोल मतं ती कधी देणार? आणि तीच बरोबरही कशी आहेत हे त्याला पटवून देणार?

किमान या दोघांनी एकमेकांना प्रेमात पडण्यापुर्वी तरी नीट बघितलं असेल अशी आशा ठेवूया आपण. कारण त्यानंतर ’कोणीतरी पाहील’ या भितीनी हे, म्हणजे यांचे चेहरे लपलेलेच! मग थोड्या दिवसांनी चेहर्‍याचे ’फायनर डीटेल्स’ विसरायला होत असतील का हो? म्हणजे बघा हं.. मला तरी असं होतं.. एखादा चेहरा २-३ वेळाच पाहिला असेल आणि नंतर बराच काळ तो पाहिलाच नाही, तर तो चेहरा मनात थोडा धूसर होतो की नाही? आणि मग आपण त्याला ’आपल्या मनात असतं’ त्याप्रमाणे बघतो. असंच यांचं होत नसेल ना? अशक्य नाही! मग स्वप्नात पण तसंच दिसत असेल का? म्हणजे तिला वाटत असेल की तो ’सेम ह्रिथिक’ सारखा दिसतो.. त्यामुळे तिच्या स्वप्नात त्याच्याऐवजी ह्रिथिकच येत असेल का हो? मग तर बाप्पा, त्याच्या स्वप्नात कोणकोण येत असेल याची आपण कल्पनाही न केलेली बरी, ना?

आणि सर्वात महत्त्वाचं- हे एकमेकांना भेटल्यावर ओळखत कसे असतील? समजा, त्यांची भेटायची एक ’क्ष’ जागा आहे. त्या जागेवर ती रोज उभी असते त्याची वाट बघत. त्याला तो तिचा नेहेमीचा स्कार्फ परिचित आहे. एखाददिवशी तिने स्कार्फ बदलला, नवा गुंडाळला, तर तो तिला ओळखणारच नाही की! ती समोर असेल, पण त्याला दिसणारच नाही ना! ती नाहीये बघितल्यावर हा पटकन मनात म्हणेल... ’आज का बरं नाही आली ही? तिच्या भावानी आम्हाला इतका बंदोबस्त करूनही ओळखले तर नसेल काल?’ किंवा, सीनारीयो नंबर दोन: तिचा तोच स्कार्फ गुंडाळून त्याची गंमत करण्यासाठी तिची बहीण, किंवा मैत्रिण गेली एखाद्या दिवशी सहज तर? हा पठ्ठ्या तिच्यासमोर जाऊन उभा राहील आणि खूण करेल मागे बसायची.. ती बिचारी स्कार्फ काढायचा प्रयत्न करेल, तर हा भडकेल, घाबरेल आणि इकडेतिकडे न बघता पटकन तिला बसवेल की मागे आणि वेगळ्याच मुलीबरोबर हिंडेल! ही बिचारी मागून सांगायचा प्रयत्न करेल की ’ती मी नव्हेच’, पण त्याला कुठे ऐकू जायला? ’डोळ्यांची’ भाषा सुरु व्हायला वेळ असेल ना थोडा..निदान पाणीपुरीचा स्टॉल गाठेपर्यंततरी? आणि अजून एक सीनारीयो नंबर तीन- एखाददिवस उलटं झालं तर? त्याचा एखादा निरोप सांगायला त्याचीच बाईक घेऊन त्याचा मित्र आला त्या ’क्ष’ जागी तर? ही पण मागेपुढे न बघता बसली आपली मागे लगेच! तो कसला बावरेल ना? तिला ’वहिनी’ म्हणावं, की नावानी हाक मारावी, हेल्मेट काढावं की नाही, काढायचं झाल्यास सुरक्षित जागा कोणती.. वगैरे वगैरे वगैरे...

थोडक्यात हे गुंडाळलेलं प्रेमप्रकरण मला तरी फार कन्फ्यूजिंग वाटतंय बुवा! यात प्रेम कमी आणि भानगडीच जास्ती दिसताहेत. अरे, करता ना प्रेम, मग चेहरे का लपवता? लोक बघतील म्हणून? पण सच्च्या प्रेमिकांना लोकांची पर्वा कधीपासून वाटायला लागली? उलट असे चेहरे लपवले की लोकांचं लक्ष जास्त जातं.. माझ्यासारखे ’चौफेर लक्ष’ असणार्‍या जिज्ञासूंचं तर नक्कीच! जितकं सहजपणे वावराल, तितकं लोकांच्या नजरेत यायचा नाहीत.. कधी कळणार लोकांना, सहजपणे प्रेम करून, ते सफलही करायच्या युक्त्या? ;-)

August 7, 2007

मोकळीक

निधीनी घेतलेल्या सुंदर उखाण्यानी निधी-अभयचा गृहप्रवेश झाला. घरात हास्याचे फ़वारे ऊडत होते, लगबग चालू होती नीलाची. मनासारखी सून मिळाली होती याचं समाधान होतं. घरात बरेच पाहुणे होते. उद्याच सत्यनारायण होता.. त्याची तयारी, सगळ्यांची जेवणं.. गडबड होती. बाहेरच्याच खोलीत दीवाणावर आक्का बसल्या होत्या मावशींशी बोलत. ’बस्तान हलवलं’, ’देवच सोडवेल’ वगैरे काहीतरी नीलाला ऐकू आलं. साधारणपणे काय बोलणं चालू असेल दोघींचं असा अंदाज आला तिला आणि तिच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी आली. पण आत्ता काहीच बोलायची वेळही नव्हती आणि प्रसंगही. कार्य मनासारखं पार पडलं होतं, सून आवडली होती.. आता पुढचं पुढे..

४-५ दिवस झाले. निधी-अभय गावाला गेले होते, घरातले पाहुणेही गेले. घरात आता ते तिघंच राहिले- नीला, अशोक आणि आक्का. एके दिवशी दुपारी नीलानी पुढची खोली आवरायला घेतली. टीव्हीच्या खालच्या कपाटात बरंच सटरफटर सामान होतं ते तिने साफ़ केलं, अजून २ कप्पे रिकामे केले. आक्का बघत होत्याच.
"काय गं, काय करतेस?"
"आक्का, या कपाटात तुमची औषधं, तुरळक सामान, तुमची पुस्तकं वगैरे ठेवतीये. कपड्याचं कपाट आतच राहूदे.. पण हे रोज लागणारं सामान इथे असूदे. अजून काही असेल तर सांगा.."
"पण हा खटाटोप कशासाठी?" सगळं समजूनही आक्कांनी मुद्दाम विचारलं.
आता स्पष्ट बोलायलाच हवं होतं, नाहीतर आक्का फाटे फोडत बसल्या असत्या हे अनुभवानी माहीत होतं तिला.
"आता अभय-निधीला ती खोली लागेल."
"हो गं बाई! आता माझं चंबूगबाळं त्या खोलीत राहून कसं चालेल? आण की, कपड्यांचं कपाटही बाहेर आण.. त्या खोलीत अडचण कशाला उगाच? पण इथली शोभा जाईल नाही? आधीच मी म्हातारी इथे पथारी पसरणार.. त्यातून माझ्याहूनही म्हातारं कपाट नको इथे.." आक्कांनी कारण नसताना आकांततांडव करायला सुरुवात केली. पण नीलाकडे ऐकून घेण्याशिवाय पर्यायच नव्हता.

४ खोल्यांच्या ब्लॉक मधे २ संसार आणि ५ माणसं बसवायची म्हणजे थोडीफार ऍडजस्टमेन्ट सगळ्यांनाच करायला लागणार होती.. समजून घेऊन सगळ्यांनी ती केलीही असती. आक्कांनाही हे समजत नव्हतं असं नाही. पण गप्प बसून ऐकणार्‍या नव्हत्याच त्या. स्वभावाला औषध नाही! सुस्कारा टाकून ती पुढच्या कामाला लागली..

अभय-निधी परत आले. अभय ऑफिसला जायला लागला, निधी ४ दिवसांनी रुजू होणार होती. नीला एके दुपारी नेहेमीप्रमाणे तिच्या ’मनोरंजन केंद्रात’ गेली. घरी निधी आणि आक्का दोघीच. परत आली तर घरात अंधार, शांतता.. आक्का दिसत नव्हत्या, निधी तिच्या खोलीत होती, जवळजवळ रडण्याच्या बेतात. नीलाला काही समजेनाच एकदम..
"निधी, काय झालं? अशी का बसलीस? दिवा नाही लावलास?"
निधीचं लक्षच नव्हतं.."अं? सॉरी आई, मी विसरलेच"
"बरं बरं, असूदे. पण अशी का बसलीस? बरं वाटत नाहीये का?" नीलाला तिच्याबद्दल खूप माया वाटली..
"नाही तसं काही नाही.." निधीला काहीतरी सांगायचं होतं बहुतेक, पण कळत नव्हतं सासूला कसं सांगावं ते.. ती रागावलेलीही होती, गोंधळलेलीही..
नीलाला अंदाज आला.."काय झालं निधी? आक्का काही बोलल्या का?"
निधीला एकदम सुटल्यासारखं झालं. ती सांगावं की नाही या संभ्रमात होती, पण नीलानीच विचारल्यावर तिने मनाचा हिय्या केला..
"अं.. हो. तुम्ही गेल्यावर त्या आल्या इथे. मी आमच्या ट्रिपच्या सामानाची आवराआवर करत होते. इकडच्यातिकडच्या गप्पा मारत होतो आम्ही. बोलता बोलता त्यांनी माझं शिक्षण, पगार सगळं विचारलं आई.. अगदी माझ्या बाबांचादेखील.. लग्नात किती खर्च आला, दागिन्यांवर किती खर्च आला.. मला आधी काही वाटलं नाही, मी सांगितलं सगळं.. पण नंतर आई त्यांनी माझ्या.. म्हणजे आमच्या हनीमूनबद्दल चौकश्या.."निधीला लाजही वाटत होती, धक्काही बसला होता आणि रागही आला होता. सासूजवळ आजेसासूबद्दल बोलणार तरी काय? पण आता बोलायला सुरुवात केलीच होती.. "हे असे प्रश्न त्यांच्याकडून.. आणि त्यांचा टोनही.. मला हे सगळं फार विचित्र वाटलं.."
नीलाला समजलंच काय झालं असेल ते. ती गंभीर झाली..नीलानी निधीचा हात हातात घेतला. तिच्याकडे पहात ती म्हणाली,"बरं झालं, मला लगेच सांगितलस ते. पुन्हा असं होणार नाही असं बघू आपण."

रात्रीचे ८.३० झाले होते. नीला पानं घेत होती. आक्का टेबलपाशीच बसल्या होत्या. सहज चौकशी करत आहोत असं दाखवत त्यांनी हळूच नीलाला विचारलं,
"आज अजून आले नाहीत हे दोघं, जेवायची वेळ झाली."
"ते बाहेर जेवून, नंतर नाटक बघून येत आहेत."
आक्कांनी नापासंतीनी मान उडवली.
"वाढतच चाललंय हं मुलांचं. आत्ता ४ दिवसापुर्वीच तर सिनेमा पाहिला की.."
नीला काहीच बोलली नाही, आपलं काम करत राहिली. मग आक्काच पुढे म्हणाल्या,"सून घरात येऊनही तुझ्यापाठचं स्वयंपाकघर काही सुटत नाही बघ.."
नीला त्यांना ओळखून होती. त्या पद्धतशीरपणे तिच्या मनात निधीबिषयी काहीबाही भरवायच्या प्रयत्नात होत्या. एरवी कधी ’तिला काम पडतं’ हे त्यांच्या तोंडातून आलं नसतं! ती एका शब्दानेही पुढे बोलली नाही.
आक्काच सारवासारव करत पुढे म्हणाल्या,"हे रात्री-अपरात्री येतात.. माझी झोपमोड होते गं, म्हणून म्हणलं, बाकी काही नाही."एक तरी तक्रार करायचा हक्क बजावलाच आक्कांनी.
"बरं मी सांगते अभयला तुमची झोपमोड होणार नाही असं पहायला."

त्या दिवशी रविवार असूनही घरात गडबड होती. आक्कांना पटकन अंदाज येईना.. कशाबद्दल चाललं असावं हे? त्यांनी निमूटपणे हातात जपमाळ घेतली आणि कानोसा घेऊ लागल्या. अभय आणि अशोक बाहेर पडलेले कळले त्यांना आणि त्यांना आश्चर्यच वाटले.. हल्ली अभय निधीबरोबरच जायचा बाहेर, किंवा एकटा.. आणि या दोघी स्वयंपाकघरात काय करत होत्या? त्या गेल्या स्वयंपाकघरात..
नीला निधीला म्हणत होती, "बघ गं, इतक्या भाज्या पुरतील का?"
निधीनी अंदाज घेतला, "आई, टॉमॅटो थोडा जास्त लागेल ना? आणि हे इथे उकळले, आता काय करू?"
"उकळले का? झाकण ठेव मग, पुन्हा ५ मिनिटानी काढ.."
आक्कांना अजूनही कळेना, पण निधी काहीतरी करत होती एवढं लक्षात आलं त्यांच्या.
"निधी काही नवीन करतीये का? म्हणजे प्रयोग का आमच्यावर आज?" प्रश्न खेळीमेळीचा वाटत असला, तरी त्यातला खवचटपणा लपत नव्हता.. निधीचा चेहरा उतरला.
नीला म्हणली,"निधी आज पिझ्झा करतीये, आणि रसगुल्लेही. आज यांच्या लग्नाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस.."
"हो का? माझ्या काही लक्षात आले नाही हो. मग आज नाही का बाहेर जायचे जेवायला? एरवी तर सारखे जाता की. उगाच घरात घोळ.."
"आक्का, ती करतीये ना हौसेनी.."
"पण मला नको हो तो पिझ्झाबिझ्झा.. मला काही तो चावायचा नाही.." तटकन नीलाला तोडून टाकत त्या म्हणाल्या.. नीलाला अपेक्षित होतंच ते.
"तुमच्यासाठी रोजचा स्वयंपाक केलाय आधीच" तिनी विषयच संपवला.
आक्का थोड्या वरमल्या."हो का? पण मला त्या पिझ्झ्याची भाजी दे हो थोडी.. पाहीन तरी कशी चव असते ते. आणि एक रसगुल्लाही खाईन. पण काय गं, अभय आणि अशोक कुठे गेलेत?"

इतक्यात अशोक-अभय आलेच. अभयच्या हातात मोठं खोकं होतं. या तिघीही बाहेर आल्या.
"नीला, हे घे पेढे. देवासमोर ठेवा. छान मिळाला नाही अभय?"
"हो, मस्त डील मिळालं निधी. बरोबर ’सीडीमन’ मिळाला गिफ्ट म्हणून." निधीही खुश झाली.
अशोक म्हणाला, "चला मग अभय, जागेवर ठेवा त्याला. सगळी कनेक्शन नीट बसत आहेत ना पहा, नाहीतर वेळीच ईलेक्ट्रिकलवाल्याला बोलवायला लागेल. केबलची वायर आहे ना आत? त्यांचा माणूस संध्याकाळी येईल तेव्हा घरी रहा, काही शंका असतील तर विचारता येतील त्याला"
आक्कांना आता राहवले नाही.."अरे पण आहे काय त्यात?"
"आजी, मी नवा टीव्ही घेतलाय.."
"अगंबाई! नवा टीव्ही! कशासाठी? आणि ठेवणार कुठे तो?"
"आमच्या खोलीत."आक्कांचा पारा पुन्हा चढला. "बरोबर. मी बाहेरची खोली अडवून ठेवली आहे ना.. रात्री-बेरात्री तुम्हाला तिकडचा टीव्ही नाही लावता येत. पण मग तोच नाही का हलवायचा आत? लग्गेच नवा कशाला आणायचा? मी नसते आले हो तुमच्या खोलीत, सोडून दिलं असतं टीव्ही पहाणं"
"पण आईला पहायचा असतो ना टीव्ही, आणि मी आणला तर काय झालं?"
"हो रे बाबा, तू काय कमावता आहेस. काहीही करायला मोकळा आहेस.. आणा, टीव्ही आणा, अजून कायकाय आणा.." बडबडत त्या बाहेर गेल्या..
अभय चिडलाच होता. तो नीलापाशी आला."असं काय करते गं ही! काही चुकलं का टीव्ही आणला तर? तिलाच त्रास होतो आवाजाचा म्हणून आणला. आणि आई आम्हाला नको का गं थोडं स्वातंत्र्य? दर वेळी असं काहीतरी बोलून ती सगळ्या मूडचा पचका करते!"
"तुला माहीत आहे ना त्यांचा स्वभाव अभय? हे आपल्याला नवीन आहे का? चल, तू उगाच मूड खराब करू नकोस. निधीनी सकाळपासून खपून कायकाय केले आहे बघ.. चल, जेवून घेऊया." नीलानी पुन्हा एकदा विषय मिटवायचे काम केले. पण आक्कांचे वागणे तिलाही खटकले होतेच. एक बरं झालं की अशोकसमोरच हे झालं, नाहीतर कधीकधी नीला अतिशयोक्ति करते की काय असं वाटायचं त्याला!

आक्कांचा हे वागणं कोणालाच नवीन नसलं तरी दर वेळी ते टोचत होतं हेही तितकच खरं. त्यांचा स्वभावच तिरका होता. ’आपला शब्द शेवटचा’ असला पाहिजे याकडे त्यांनी आयुष्यभर लक्ष दिलं. नशीबानी सून त्यांना गरीब मिळाली- त्यांच्या सत्तेला तिने कधी आक्षेप घेतला नाही. त्यांचे यजमान आणि अशोक दोघेही घरच्या बाबतीत अलिप्तच. त्यामुळे त्यांना कधीच कुठेच आडकाठी आली नाही. खोचक बोलायचं, प्रत्येक बाबतीत खुसपट काढायचं, कधी कोणाच्या मनाची पर्वा करायची नाही आणि सर्व म्हणजे सर्व बाबतीत, अगदी खासगी बाबतीतही नाक खुपसायचं असा स्वभाव! मात्र नातसून घरात आली आणि आपलं घरातलं स्थान डळमळीत होतंय की काय असं वाटायला लागलं त्यांना. अगदी खोलीही सोडावी लागली हे तर फारच लागलं त्यांना. एक तर वयामुळे थोडं नमतं घ्यावं लागत होतंच. त्यातून घरचे त्यांचं बोलणंही फारसं मनावर घेत नव्हते. नीला तर चक्क दुर्लक्षच करत होती त्यांच्याकडे- म्हणजे त्यांचं जेवण, पथ्य बघायची, पण बाकी एक अक्षरही बोलायची नाही. अभयशी तर पहिल्यापासूनच त्यांचे खटके उडायचे. एकूणात आता आयुष्यभर कधीच न केलेली तडजोड करावी लागणार अशी चिन्हं होती!

रात्रीचे सव्वाअकरा-साडेअकरा झाले असतील. नीलाचा गाढ झोप लागली होती आणि इतक्यात दाणकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला. नीला खाडकन झोपेतून जागी झाली. अशोकलाही जाग आली. बाहेरून अभयचाही आवाज आला. दोघेही पॅसेजमधे आले तर अभय त्याच्या खोलीच्या दारात उभा आणि बाहेर चक्क आक्का! हातात पाण्याचा तांब्या. फुलपात्र खाली पडलं होतं त्याचा आवाज झाला होता. नीलाला वेगळीच शंका आली.
"आक्का, या वेळी तुम्ही अभयच्या खोलीबाहेर काय करताय?"
आक्का घाबरल्या होत्या. गुळमुळीत उत्तर दिलं त्यांनी, "काही नाही गं, जरा पाणी प्यायला उठले होते."
"तांब्या-भांडं तर तुमच्या उश्याशी ठेवलं होतं."
"हो गं, पण असंच झोप येईना.."
"म्हणून तुम्ही अभयच्या खोलीपाशी आलात??" नीलाचा आवाज तीक्ष्ण झाला..
"तसं नाही गं, शतपावली घालत होते..."
"हातात तांब्या धरून?"
"नाही, यांच्या खोलीतून आवाज येत होते.."
"शीऽऽ!!" नीलाला शिसारी आली. अशोक-अभयच्या चेहर्‍यावरचे भावही झरझर पालटले!
हे बघून मात्र आक्कांनी सूर बदलला.
"देवा! तूच बघ रे बाबा. या घरात आता शतपावलीही घालता येत नाही रे मला मोकळेपणी!"
आता मात्र अशोकही गप्प बसला नाही."आक्का बास कर आता. जाऊन झोप, आणि झोप आली नाही तर स्वस्थ पडून रहा."

दुसर्‍या दिवशीपासून नीला कामाला लागली. अशोकला तिने कल्पना दिली ती काय करणारे याची, परवानगी मागायची वेळ आता गेलेली होती. कालच्या प्रसंगानंतर बरेच दिवस डोक्यात असलेल्या कल्पनेला आता प्रत्यक्षात आणायचे ठरवले तिने. २-३ दिवसात काम झालं तिचं. त्या दिवशी रात्री जेवायच्या टेबलवर हे चौघं होते. आक्का बाहेर असल्या तरी कान त्यांचे आतच होते नेहेमीप्रमाणे. नीलानी बोलायला सुरुवात केली.
"अभय, मी परवा वाघोलीकरांना भेटून आले. आपल्याच बिल्डींगमधे तुमच्या लग्नासाठी आपण त्यांचा रिकामा फ्लॅट वापरला होता बघ, ते! ते त्यांची जागा भाड्यानी द्यायला तयार आहेत. येत्या १ तारखेपासून तू आणि निधी त्यांच्या घरात रहायला जा."

अभय आणि निधीला अनपेक्षितच होतं हे! दोघांनाही धक्का बसला.
"आई, अहो, असं अचानक?"
"हो ना आई, असं एकदम काय?"
"आपण आधी पण बोललो होतो अभय याबद्दल. तुझं लग्न ठरलं तेव्हाच मी म्हणलं होतं तुम्हाला की तुम्ही वेगळे रहा. पण तेव्हा तुम्ही विरोध केलात, तडजोड करू म्हणालात, म्हणून तेव्हा काही बोलले नाही मी."
आक्कांमुळे घरात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत याची नीलाला खात्री होती.. आणि परवाचा प्रसंग तर कहर होता.
"पण आमची काहीच तक्रार नाहीये आई" नीलाला एकदम गहिवरून आलं. किती गुणी मुलं होती खरंच!
"तसं नाही रे बाळांनो. पण हे इथे तिसर्‍या मजल्यावर तर घर आहे. आणि वेगळं घर केलं तर लगेच काय आपण वेगळे होतो का? मला निधीचे सगळे सणवार, हौसमौज करायची आहे अजून!"
"मग हे असं काय आई?"
"अरे, त्यानिमित्तानी तुम्हाला थोडी मोकळीक मिळेल, थोडे स्वातंत्र्य मिळेल. हेच तर दिवस आहेत. त्यात सतत कोणाचीतरी आपल्यावर नजर आहे, कारण नसताना टोमणे ऐकायला लागत आहेत, वातावरण गढूळ आहे.. कशाला असं रहायचं? आमचे दिवस वेगळे होते, आम्ही केलं सहन.. सतत नजरकैदेत, जरा म्हणून मनमोकळेपणा नाही कधी मिळाला. आमचं जे झालं ते झालं. पण तुमचे हे दिवस पुन्हा यायचे नाहीत. सुदैवानी वाघोलीकर लगेच तयार झालेही. त्यामुळे बाकीही काही बदलणार नाही रे. अगदी स्वयंपाकघरही नका करू वर. पण रहायला मात्र जा तिथे. माझा आग्रहच समजा. आणि मुलांनो, गैरसमज करून घेऊ नका रे.." नीलाला पुढे बोलवेना. खूप खूप भरून आलं तिला.

पुढचे काही दिवस खूप गडबड होती मग घरात. निधीनी थोडीफार खरेदी केली, नीलानेही माळ्यावरचं जास्तीचं सामान काढलं, अभय करार करून आला वाघोलीकरांबरोबर. आणि एका रविवारी रात्री जेवणं झाल्यावर सगळं सामान त्यांनी वर नेलं. फार काही नव्हतंच, पण जे काही होते ते सगळ्यांनी मिळून लावूनही टाकलं. नीला आणि अशोक अबोलपणेच जिना उतरले. दरवाजा उघडून आत येतात तर आक्का पुढच्या खोलीत नाहीत!

आक्कांनी पुढच्या खोलीतलं आपलं सामान भराभर ’त्यांच्या’ खोलीत हलवलंदेखील होतं आणि त्यांना तिथे गाढ झोपही लागली होती!


समाप्त