June 18, 2007

बूमरँग(२)- दुसरा शेवट

भाग २

प्रिय वाचक, ’बूमरँग’चा दुसरा शेवटही लिहीत आहे. ’बूमरँग’या नावाशी तो अर्थातच जुळणारा आहे.. शेवट असाही होऊ शकतो असे मला वाटले.. तुम्हाला काय वाटले तेही कळवा..

जनीकांत त्याच्या आलिशान बंगल्यातल्या आलिशान खोलीतल्या आलिशान पलंगावर पसरला होता.. तळमळत होता बिचारा.. नजर दर मिनिटाला शेजारीच पडलेल्या मोबाईलवर जात होती.. पण तो काही वाजत नव्हता.. त्याला आठवले, आठच दिवसांपूर्वी तो किती खुश होता.. त्याच्या स्वप्नातली सुंदरी त्याच्या समोर उभी होती.. स्वर्गातली अप्सराच जणू.. त्याची उर्वशी.. पुरता खुळावला होता तो तिच्यापायी.. आणि तीही गोड हसून त्याच्याकडे पाही, गोड बोले, मोठ्ठे डोळे उघडमीट करे.. हाय! शेवटी त्याने तिला लग्नाचे विचारलेच! घरी आई-बाबा भडकतील याची पूर्ण कल्पना होती त्याला.. पण उर्वशीला त्यांनी एकदा बघीतले की त्यांचा राग कुठल्याकुठे पळून जाईल.. अशी खात्री होती त्याला..

त्याने उर्वशीला ’तो’ प्रश्न विचारताच ती अश्शी लाजली होती की बास! ती लग्ग्ग्ग्गेच ’हो’ म्हणेल अशी अपेक्षा होती बिचार्‍याची.. पण तिने २ दिवस मागून घेतले होते.. त्याला आधी झेपलच नव्हतं ते.. तो.. ’रजनीकांत फातर्फेकर’ एका मुलीला लग्नाचं विचारत होता.. आणि ती चक्क ’२ दिवसांनी सांगते’ म्हणाली होती! पण मग त्याला ते ही आवडले होते! माय गॉड.. काय अदा आहे, काय लाजते ही मुलगी या जमान्यातही.. वॉऽऽऽऽऽव.. रजनी पार घायाळ!

त्यानंतर २ दिवसांनी भेटली होती त्याची ऊ त्याला.. पण बिचारीचा चेहरा पार सुकला होता.. त्याला पाहून तिच्या डोळ्यात चक्क पाणीच आले.. अरे! ही का रडतीये? हिचा नकार आहे की काय?
"रजनी!!!" ऊ नी एक गोड हाक मारली आणि रुमाल डोळ्याला!
"काय झालं प्रिये? तुझ्या डोळ्यात पाणी का? तुला कोणते दु:ख आहे सांग.. माझ्यापासून काही लपवू नकोस लाडके.."
"रजनी.. आय ऍम सॉरी रजनी.. तू मला लग्नाबद्दल विचारलस.. मला तर आकाशच ठेंगण झालं होतं रजू.. पऽऽऽऽऽण..."
"पण काय राणी?" रजनीला राहवेना
"रजू.." मुसमुसतच ऊ म्हणाली, "रजू, आईचा आपल्या लग्नाला विरोध आहे रे!"
"काऽऽऽऽऽय?? पण काऽऽऽऽऽऽ?????" रजनी पुरता गोंधळला..
उर्वशीच्या आईने त्याला पाहिलंही नव्हतं आणि चक्क नकार!
"प्रिये, का विरोध आहे तुझ्या आईचा? तिला सांगितलस ना मी ’कोण’ आहे ते?"
"हो रे राजा.. आधी तेच सांगितलं मी! पण मॉम्स काही ऐकायच्या मूडमधेच नाहिये! चक्क आणि टोटल नाहीच म्हणाली रे ती.. कित्ती कित्ती मनधरणी केली मी तिची.. पण काही ऐकलच नाही तिने माझं.. कारण काय म्हणली माहित्ये? म्हणाली फातर्फेकर खूप मोठी असामी आहे.. आपली उडी नाही तितकी.. तू तो नाद सोड!"
"असं म्हणाली?"
"बघ ना रजू.. असं म्हणाली.. आणि इतकंच नाही, तर म्हणाली की आता रजनीला भेटायचंही नाही, बोलायचं नाही..." इतकं म्हणून ऊ पुन्हा अश्रू गाळायला लागली..रजनीकांत हे ऐकून हतबद्धच झाला!!! हे असं कोणी आपल्याला, आपल्याविषयी म्हणेल अशी अपेक्षाच नव्हती त्याला..

या घटनेला २ दिवस झाले. खरंच ऊचा फोन नाही, की मेसेज नाही.. बोलणं दूर, भेटणं तर अशक्यच!! तळमळत होता बिचारा! आता काय करावे असा विचार करत होता.. चक्क रजनीकांत फातर्फेकरला नकार! हे पचनीच पडत नव्हते त्याच्याकडे! काय नव्हतं त्याच्याकडे आज? तो स्वत: हुशार होता, श्रीमंत तर होताच, सरळमार्गी होता, निर्व्यसनी होता.. वडीलांनी उच्च आदर्श, उच्च विचार त्याच्यापुढे ठेवले होते.. ते तो पाळत होता, त्यावरून चालत होता.. फ़क्त प्रेमात पडला होता इतकंच. ज्या सुंदरीवर तो भाळला होता तिच्याशी लग्न करायची इच्छा होती त्याची.. काय हा इतका मोठा गुन्हा होता? का? का नकार द्यावा त्याला ऊच्या आईने? केवळ तो खूप म्हणजे खूपच श्रीमंत होता म्हणून?? हॉऊ इज इट पॉसिबल??

रजनीला चैन पडेना.. या प्रश्नाचे उत्तर मिळवायचेच या निश्चयाने तो उठला.. त्याने उर्वशीला फोन लावला.. ऊचा उदास आवाज आला..
"हाय रजू.. कसा आहेस तू?"
"ऊ डार्लिंग.. मी अजिबात चांगला नाहिये.. आणि माझी खात्री आहे की तूही माझ्यासारखीच दु:खी आहेस.."
"हो रे रजू.. मॉम्सनी मला अगदी कोंडून ठेवलं आहे रे.. मोबाईलपण तिच्याकडेच असतो, आत्ताही मला चुकूनच दिलाय तिने म्हणून तुझ्याशी बोलता तरी आलं! रजूऽऽऽऽ अजून एक वाईट बातमी द्यायची आहे तुला.."
"आता काय झालं राणी?"
"रजू.. मॉम्स माझं लग्न दुसरीकडे ठरवतीये.."
"काऽऽऽऽऽऽय? हे कसं शक्य आहे ऊ???"
"हे असंच आहे रजू.. माझ्या मॉम्सनी एकदा ठरवलं की ठरवलं.. रजू आता तूच मला इथून सोडवू शकतोस रजू.. मला नाही रहायचं इथे.. मुझे यहाँसे ले चलो.."

ऊचे हुंदके पुन्हा सुरु झाले..आता मात्र रजनी पुरता हबकला.. हे सगळं सहन होईना त्याला.. हे असं का घडत होतं, का झालं होतं?
"मैं आ रहा हूँ ऊ.." असे म्हणून त्याने फोन कट केला..

ऊनी फोन बंद करून शेजारीच बसलेल्या सुप्रियाला टाळी दिली.. दोघींना मनापासून, गदगदून हसू आलं! सगळं कसं प्लॅन प्रमाणे फ़िट्ट चालू होतं! आता रजनी पेटून उठणार होता, सुप्रियाकडे येणार होता, त्यांच्या प्रेमाची साक्ष देणार होता, तो कसा ऊशिवाय जगू शकणार नाही हे पटवणार होता, आणि शेवटी सुप्रियाची परवानगी घेणारच होता त्यांच्या लग्नासाठी! मग? मग ऊ रजनीची बायको होऊन त्यांच्याकडे ऐश्वर्यात दिवस घालवणार होती! फातर्फेकर आणि परिवाराला कोण विचारतंय.. रजनीसुद्धा त्यांना काही बोलू देणार नव्हता..

दोघी आतूरतेनी रजनीची वाट पहायला लागल्या..

पण त्याला इतका वेळ का लागत होता? त्यांच्या अंदाजानुसार रजनी अर्ध्या तासात यायला हवा होता.. पण ३ तास झाले की.. रजनीकांतची होंडा सिटी काही त्यांच्याकडे येईना.. दोघी अंमळ काळजीत पडल्या..

पण आला.. आला एकदाचा रजनी.. हुश्श्श्श!!

सुप्रिया प्रथमच पहात होती त्याला.. बरा होता की दिसायला.. उंचापुरा, सावळा, स्मार्ट.. आणि श्रीमंत तर होताच होता!!! सुप्रियानी मनातल्यामनात ऊच्या निवडीचे कौतुक केले.. अगदी ’लाखोंमें एक’ जावई मिळाला होता तिला..

रजनीचा चेहरा खूप गंभीर होता.. असणारच ना.. सुप्रियानीदेखील प्रसंगानुरुप रागीट चेहरा केला..

"नमस्कार आई.. मी रजनीकांत फातर्फेकर."
"तू? तू इथे का आला आहेस? आधी चालता हो इथून.."
"आई रागावू नका इतक्या.. माझं ऐकून तरी घ्या.."
"हे बघ, मला तुझं काहीएक ऐकायचे नाहीये! तुमचं आणि आमचं जमणं शक्य नाहीये.. मी उर्वशीला योग्य असं स्थळ पाहिलंय.. ते प्रेमबिम मला काही ऐकायचं नाहीये.. तू तिला विसरावस हे उत्तम!"

"तेच सांगायला आलोय मी आई.. मी तुमच्या मोठेपणासमोर आणि साधेपणासमोर नतमस्तक आहे. आमच्या 'फातर्फेकर' नावाला तुम्ही भुलला नाहीत, आमची श्रीमंती पाहिली नाहीत.. अहो, फातर्फेकरांचा मुलगा एखाद्या मुलीला मागणी घालतोय म्हणल्यावर मुलीकडच्या लोकांनी एरवी विचारही केला नसता होकार द्यायला.. पण तुम्ही तश्या नाही.. तुम्ही सामान्य नाही.. तुम्ही तुमच्या कुवतीचा आधी विचार केलात.. तुम्हाला आमच्यासारखं बडं घराणं आणि स्थळ झेपण्यासारखं नाही हे तुम्ही आधीच मान्य केलंत.. नसती स्वप्न उर्वशीला दाखवली नाहीत.. अश्या विभिन्न स्टेटसच्या लोकांनी लग्न केलं तर कायकाय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे तुम्हाला बरोब्बर कळलं.. कदाचित ऊ आमच्या घरी रुळणार नाही, माझ्या घरचे तिला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाहीत हे तुम्हाला जाणवलं.. काय हा तुमचा मोठेपणा.. माझ्या वडीलांनी माझ्यापुढे कायमच उच्च आदर्श ठेवले, मोठ्यांचा मान राखायला शिकवलं, त्यांना योग्य तो सन्मान द्यायला शिकवलं, त्यांच्या विचारांनी पुढे जायला शिकवलं.."

रजनी क्षणभर थांबला.. सुप्रियाला जाणवले की काहीतरी चुकतंय.. संभाषण कुठल्यातरी चुकीच्या दिशेनी जात आहे.. पण ती बोलायच्या आधीच रजनी पुढे बोलू लागला..

"म्हणूनच उर्वशीशी मी फोनवर बोललो, त्यानंतर थोडा विचार केला.. रागाच्या भरात मी काही चुकीचे तर करत नाहीये ना.. असं म्हणून थोडा थांबलो.. आई, मी खरंच भारावून गेलो आहे तुमच्या विचारांच्या खोलीमुळे. तुमच्याइतकी प्रगल्भता आम्हाला कधी येणार? मला तुमच्या उच्च विचारांची खोली कळली आहे आई.. मला मान्य आहे तुमचा निर्णय.. खरंय.. आमचे आणि तुमचे जमणे शक्य नाही.. पुढे जाऊन जटील प्रश्न निर्माण होण्यापेक्षा.. आत्ताच, इथेच, या क्षणीच आम्ही आमच्या प्रेमाची आहुति दिलेली बरी.. काही दिवस जड जाईल.. पण आम्ही तरून जाऊ त्यातून.. तुम्ही उर्वशीसाठी तुमच्या कुवतीप्रमाणे स्थळ पाहिले आहे, तिथेच ती सुखानी राहील.. तिच्या सुखासाठी मी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे आई.. मी उर्वशीला विसरेन.. हो, माझा निर्णय पक्का आहे.. तुमच्या व्यवहारीपणामुळे आणि दूरदृष्टीमुळेच मी हा कठोर निर्णय घेऊ शकलो आई.. तुमच्या इच्छेविरुद्ध मी नाही करणार तिच्याशी लग्न..आणि ही काळ्या दगडावरची रेघ समजा! मी निघतो.. तुम्ही तिला समजवा.. दिल्या घरी सुखी राहील ती.. येतो मी आई.. आशीर्वाद द्या.."

रजनीकांत ताडताड बोलून निघून गेला.. सुप्रिया तो गेलेल्या दिशेला पहात राहिली..

समाप्त!

2 comments:

Abhijit said...

pahilaa shevaT malaa jast samarpak waTalaa! Keep writing:-)

Deep said...

पुनम,
मे बी आता तू हा प्रतीसाद वाचणार नाहीस तरीही..

पहिला 'शेवट' पहिल्यांदा वाचल्याने तो आवडला खरच!!
आणी आता जेंव्हा हा दुसरा शेवट वाचतोय तो मला जास्त 'पटतोय' (आवडणं आणी पटण ह्यात फरक आहे :) )
खरतर पहिल्या शेवटात सुखान्त कदाचितच झाला असता. पण दुसरया शेवटात सुरुवातच नसल्याने "काळाच्या ओघात" ते दोघही सुखी होतील! ('उ' च माहीत नाही... तरीही जास्त पैसा म्हणजेच सुख अस जर ती मानत असेल तर थोड्याकाळा साठी का होईना... ती होइल सुखी..)

बाकी तो मुलगा>>रजनीकांत फातर्फेकर [खरच काय नाव आहे ईईई!] येडच्यापच आहे! एवढा सेंटी..??? का? केवळ मुलीवर भाळला म्हणून?? की 'हे' संस्कार झालेच नाहीत?? असो बास झाले की नाही प्रश्न आता?
[नाहीतर कमेन्ट/ प्रतीसादाचीच एक पोस्ट व्हायची हाहा...]:)दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"