July 9, 2025

Personality Trade Mark

 

#PCWrites  आजच्या वर्तमानपत्रात बातमी आली आहे- एम एस धोनीने “कॅप्टन कूल” या त्याच्या विशेषणावर “ट्रेडमार्क” मिळावा असा अर्ज केला आहे. Personality Trade Mark हा ट्रेडमार्कचा एक नवीन प्रकार आहे. 

 


 

त्याआधी ट्रेडमार्क म्हणजे काय, ते समजून घ्या. ट्रेडमार्क, म्हणजे मराठीत नाममुद्रा, अर्थात सोप्या इंग्रजीत, logo. हजारो लोगो आपल्या आसपास आपण रोज बघतो. पार्ले-जी, ब्रुक बॉंड चहा, आयफोन, किया मोटर्स…इ. प्रत्येक नामवंत सेवा किंवा उत्पादन यांची एक मालक कंपनी असते आणि तिच्या अनेक सेवा किंवा उत्पादने असतात. मुख्य कंपनीचा लोगो एक असतो आणि प्रत्येक सेवेचा वेगवेगळा. उदा. फेसबुक, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम प्रत्येकाचा आपापला लोगो आहे आणि त्यांची मालक कंपनी ’मेटा’ हिचाही स्वतंत्र लोगो आहे. याला कायद्याच्या भाषेत ट्रेडमार्क म्हणतात. ती कंपनीची आणि पर्यायाने त्या उत्पादन/सेवेच्या गुणवत्तेची ओळख असते.

मग, Personality Trade Mark म्हणजे काय? अनेक सेलेब्रिटी याच कंपनीच्या विविध उत्पादने आणि सेवांची जाहिरात करतात, म्हणजेच ते त्यांचे ’Brand Ambassador” होतात. त्यांनी आपल्या उत्पादनाची जाहिरात करावी यासाठी त्या कंपन्या रग्गड पैसेही मोजतात. का? कारण त्यांना खात्री असते, की या सेलिब्रिटीने आपले उत्पादन endorse केल्यामुळे आपल्या उत्पादनाचा खप वाढेल. जनता अनुकरणप्रिय असते. उदा. विराट कोहली MRF Tyre ची जाहिरात करतो. ’हे टायर्स माझ्यासारखेच मजबूत आणि भरवशाच्या लायक आहेत’ तत्सम काहीतरी तो बोलतो. आता आपला ’हीरो’ म्हणतोय, की हे टायर चांगले आहेत, तर आपणही आपल्या चारचाकीला हेच टायर बसवू, असा विचार लोक करतात! आणखी एखादी हीरोइन एखादा साबण, शॅम्प, लोशन वापरते आणि ’तुम्हाला माझ्यासारखं सुंदर दिसायचं असेल, तर हे वापरा’ म्हणते. मग असंख्य तरुणी ते उत्पादन वापरतात. असा हा परस्पर फायद्याचा मामला असतो. सेलेब्रिटीला पैसे मिळतात, कंपनीच्या उत्पादनाचा खप वाढतो आणि तिलाही पैसे मिळतात.  

पण फेक बातम्या, फेक अकाउंट्स असतात, तशीच फेक उत्पादनेही असतात. म्हणजेच, established brand ची भ्रष्ट नक्कल करायची आणि ती मूळ उत्पादनासारखी दिसेल अशी तयार करून लोकांना विकून त्यांची फसवणूक करायची. आजकाल AI tools मुळे फोटोंचे morphing, superimposing अतिशय बेमालूमपणे करता येते. शंकाही येत नाही, की हे ओरिजिनल नाहीये. म्हणून तर सेलेब्रिटींचे फोटो खुशाल कोणत्याही लोकल उत्पादनावर चिकटवून त्यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. यात सेलेब्रिटीला पैसे मिळत नाहीत, त्याची परवानगी घेतलेली नसते, खुशाल त्याच्या नावावर उत्पादन खपवले जाते आणि लोकही फसतात! आपल्या नावाचा असा परवानगीविना आणि मोबदल्याविना गैरवापर केला जाऊ नये, यासाठी आता हे सेलिब्रिटी जागरूक झाले आहेत. अमिताभ बच्चनचा आवाज किंवा चेहरा वापरून असंख्य उत्पादने आणि सेवा खपवली गेली आहेत. आता बच्चनने त्यावर अर्ज करून बंदी आणली आहे. त्याचप्रमाणे, अनिल कपूरचा ’झकास’, जॅकी श्रॉफचा  ’भिडू’ यांवरही बंदी आहे.

धोनीचेही हेच म्हणणे आहे. मैदानावर, कसोटीच्या क्षणी थंड डोक्याने विचार करणे ही त्याची खासियत आहे. म्हणूनच, तो ’कॅप्टन कूल’ या नावाने प्रसिद्ध आहे. आता एखाद्या कंपनीने एखादे कोल्डड्रिंक तयार केले. ते कुठे केले आहे, कोणती रसायने वापरली आहेत, पाणी कोणते वापरले आहे, पेयाचा दर्जा काय आहे याची काहीही विश्वासार्ह माहिती नाही. आणि, तिने थेट धोनीचे चित्र आणि “कॅप्टन कूलही हेच ड्रिंक पितो, तुम्हीही प्या” अशी जाहिरात केली तर काय काय होऊ शकतं पहा :-

धोनीचे वेडगळ फॅन्स केवळ ती जाहिरात पाहून ते ड्रिंक पिऊ शकतात.

ड्रिंक चांगल्या दर्जाचं नसल्यामुळे ते पिऊन त्यांची तब्येत ढासळू शकते.

त्यांना इस्पितळात भरती व्हायला लागू शकतं. औषधे घ्यायला लागू शकतात.

आणि, ’ह्यॅ, धोनी नाय आपला… त्याच्यामुळे मेलो असतो मी’ म्हणून धोनीची निष्कारण बदनामी होऊ शकते!

बिचाऱ्या धोनीला कल्पनाही नाही, की आपल्या नावाचा असा परस्पर गैरवापर झाला आहे, लोकांचा जीव धोक्यात आला आहे आणि आपले फॅन्सही कमी झाले आहेत! हे होऊ नये, विनापरवानगी कोणीही आपल्या व्यक्तीविशेषाचा गैरवापर करू नये, म्हणून धोनीने या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. जो योग्यच आहे.

Btw, Prada ने कोल्हापुरी चप्पलच्या डिझाइनची चोरी करून आपल्या कोल्हापुरी चपलेला मिळालेल्या Geographical Indication (GI) चा भंग केला, म्हणून तिच्यावर कारवाई झाली, हे तुम्ही वाचलं असेलच. 

तर, वर उल्लेख केलेले ट्रेड मार्क, कॉपीराईट, जीआय हे सगळे बौद्धिक संपदा कायद्यांखाली येतात. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा. विशेषत: कृत्रिम प्रज्ञेच्या वापराचा सुळसुळाट झाल्यामुळे मूळ, ओरिजिनल निर्मिती कमीच होत आहे, पण जी आहे, तीही सुरक्षित रहात नाहीये. त्यामुळे सर्वांनीच डोळे उघडे ठेवून हे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यायला हवी.

काही शंका असतील, तर विचारा.

    

 

 

 

 

 

 

 

July 3, 2025

धूमधाम

 

“रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है”चा अनुवाद “Don’t teach you father how to make babies” असा कोणीतरी केलेला काल रात्री वाचला आणि तेव्हापासून माझे डोळे जे विस्फारलेले आहेत, ते अजूनही तसेच आहेत 🙄😆 असा का अनुवाद केलाय? हे कोणते “भाव” पकडले आहेत? हे मला अजूनही कळलेलं नाहीये!🫣 बर, जरा कॉन्टेक्स्ट देते. 
 

 
 
हे (ऍमॅझॉन प्राइमवरच्या) “धूम धाम” नावाच्या सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमधले एक वाक्य आहे. ते त्या शेवटच्या पंधरा मिनिटात कमीतकमी पंधरा-वीस वेळा म्हणलं जातं. सिनेमा हिंदी आहे, त्यामुळे माझं इंग्रजी सब-टायटल्सकडे लक्षच नव्हतं. पण सारखं सारखं स्क्रीनवर “बेबीज” दिसायला लागलं आणि बाळसदृश तर पडद्यावर काही दिसत नव्हतं, म्हणून नीट पाहिलं, तर हे!!! 😂😂
हे नवऱ्याला सांगितलं, तर तो फार सिरियसली माझ्याकडे बघत म्हणाला, “असा वाक्प्रचार खरंच आहे इंग्लिशमध्ये!” हाच तो माझे डोळे विस्फारण्याचा क्षण! 😐 आईशप्पथ सांगते, मला नव्हतं माहित. आणि जरी माहित असतं, तरी “रिश्ते में…” च्या अनुवादासाठी मी तो नसता वापरला! आधीच सिनेमा इतका पांचट आहे, त्यात याची भर नसती घातली मी! 😜😆
हां, btw, सिनेमा खरोखर अतिशय आचरट आहे. यमीचा सिनेमा (Yami Gautam) म्हणून आमच्या “ह्यांनी” लगेचच पाहिला आणि मला “तूही बघ” म्हणून आग्रह केला. (यांनी आग्रह केला, म्हणल्यावरच मला कळायला हवं होतं, की हा सिनेमा आपण पहायचा नाहीये! पण नाही. अजूनही भाबडी आशा आड येते! 😛)
सिनेमात यमीने का ही ही केलेलं आहे. यमी सतत डोळे मोठमोठे करते, शिव्या देते, हाणामारी करते… निव्वळ आचरट. हां, अधूनमधून सुंदरही दिसते, ते मान्य करायलाच हवं 😄 प्रतीक गांधी मात्र माझ्यासाठी एकदम सर्प्राइज. छान शोभला आहे. स्क्रीन प्रेझेन्स मस्त वाटला त्याचा ☺️👍 सिनेमाचं “वेगळेपण” म्हणजे, हीरोचे अंगप्रदर्शन आहे! 😜 यावरूनच सिनेमाची पातळी लक्षात यावी. (शिवाय, “साठे” आणि “भिडे” नावाचे पोलिस घेतलेत, पण त्यांची पात्र वठवणाऱ्यांना मराठी येत नाही, ’बिडे’ म्हणतो तो सतत 😡)
पण तरी सिनेमा दोन तास आचरट मनोरंजन करतो, फार पातळी सोडत नाही. समाधान मानून घ्यायचा हाच एक निकष उरला आहे सध्या!😛 हां, सबटायटल्स देखील मनोरंजन करतात, हाही एक प्लस पॉइंट! 😁
खरोखर करायला काहीही नसेल, ओटीटीवरच्या इंटेन्स ड्रामामधून ब्रेक हवा असेल, तर बघायला हरकत नाही. आग्रह मात्र नाही हं! 😜

June 6, 2025

मराठी रिसेप्शन

 

लग्नात आताशा पंगतीतलं जेवण, जिलबी-मसालेभात-अळूची भाजी हा टिपिकल मराठी मेन्यू मागे पडला आहे, पंजाबी पदार्थांनी अतीक्रमण केलं आहे, अशी चर्चा एका फेसबुक समूहात सुरू असताना, मला आठवलं, ते मराठी लग्नांमधलं रिसेप्शन!

मराठी, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लग्नांमध्ये रिसेप्शनची पद्धतच कमी होती. वर अथवा वधूपिता खूपच मोठ्या हुद्द्यावर असतील (म्हणजे, ते नोकरदार असतील, असंच अध्याहृत होतं! तेव्हा मराठी माणूस व्यवसाय करत नव्हता), तर त्यांच्या ऑफिसच्या लोकांसाठी रिसेप्शन असायचं. अर्थातच, रिसेप्शनला अगदी सख्ख्या नातेवाइकांनाच बोलावणं असायचं. सीमांतपूजन आणि लग्न इथे झाडून सर्व नातेवाइकांनी हजेरी लावल्यावर रिसेप्शन मात्र ’खास’ लोकांसाठीच असायचं. रिसेप्शनला जाणं, म्हणजे आपणही कोणीतरी खास, वेगळे आहोत, असं वाटायचं.

रिसेप्शनसाठी सहसा वधू शालू नेसायची. तोही लाल किंवा डाळिंबी रंगाचा. शालू नसेल, तर मोठ्या काठाची कांजीवरम फिक्स. मोस्टली मरून किंवा ब्राउन! वर १००% सूटातच असायचा, काळा किंवा निळा, आणि लाल टाय. वधूचा हिरवा चुडा, मंगळसूत्र ठसठशीत उठून दिसायचं. मुंडावळ्या, हार, कुंकू यांना फाटा असायचा. त्यामुळे वधू-वर वेगळेच दिसायचे, थोडे मोकळेही वागायचे. रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांना वाकून नमस्कार नसायचा, कारण ते ’गेस्ट’ असायचे ना, त्यामुळे वधू दोन्ही हात जोडून नमस्कार करायची, तर वर शेक-हॅंड करायचा. बाबा लोकांचे बॉसही ’मिसेस’ना घेऊन प्रेमाने यायचे, कलीग्जही उगाच इंग्रजी झाडायचे आणि हे सगळे लोक परग्रहवासी असल्यासारखे ’घरातले’ लोक त्यांना थोडं अंतर राखून कौतुकाने न्याहाळायचे. त्यातही एखादी स्मार्ट मुलगी असली किंवा शायनिंग मारणारा मुलगा असला, तर बायकांच्या चौकस नजरा त्यांचं ’मूल्यमापन’ करायच्या.

आणि रिस्पेशनचा मेन्यूही फिक्स. रिसेप्शनला कधीच पूर्ण जेवण/ ताट नसायचं. सकाळी पक्वान्नाचं जेवण झालेलं असल्यामुळे, आता परत इतकं कोणी जेवत नाही / खर्च कमी / ऑफिसातल्या पाहुण्यांना हात बरबटत जेवण नको, खायला सुटसुटीत पदार्थ हवेत अशी कारणं असतील. किंवा तिन्ही असतील! पण मेन्यू मात्र दोनच पाहिलेत मी-

मेन्यू १ :- उपम्याची मूद, त्यावर भुरभुरलेली बारिक शेव, कोथिंबीर आणि लिंबाची फोड + बटाट्याचे वेफर्स + नारळाची बर्फी.

मेन्यू २ :- दोन बटाटेवडे, खोबऱ्याची चटणी + बटाट्याचे वेफर्स + दोन साखर लावलेले कोरडे गुलाबजाम!

 



 

अल्टिमेट, परफेक्ट मेन्यू होते हे. ती नारळाची बर्फी तर सुपर्ब असायची. मोठ्ठी, जाडी, चौकोनी, मऊ आणि कडक यांच्यामधली, पिवळ्या रंगाची… आहाहा. उपमा सोडला, तर बाकी सगळेच पदार्थ नवलाईचे. वेफर्स पाकिटात मिळत नव्हते, वडे चौकाचौकात तळले जात नव्हते आणि गुलाबजाम तर घरीच, तेही सणासुदीलाच केले जायचे. त्यामुळे एक तर रिसेप्शनचे अपरूप आणि त्यात मिळणाऱ्या ’डिश’चे डबल अपरूप! ही आख्खी डिश आपल्याला एकट्याला मिळणार आहे, या कल्पनेनेच बच्चे कंपनी खूश व्हायची. भर उन्हाळ्यात लग्न असेल, तर सुरूवातीला क्वचित पन्हंही असायचं. And who can forget, वधू-वर आणि दोघांनी शेअर केलेलं एकच गोल्डस्पॉट! हा एक फोटो प्रत्येक लग्न/ रिसेप्शनमध्ये असणारच आहे!

वेलकम ड्रिंक, चाटचे काउन्टर, डोसा काउन्टर, तवा काउन्टर, अनेक भाज्या, दाल, राइस, मिठाया, तंदूर, पान, आइसक्रीम… हळूहळू एकेक पदार्थ वाढत गेले, रिसेप्शनही लग्नाच्या हॉलवर नाही, तर ’लॉन’वर व्हायला लागली, सरसकट सर्वांनाच रिसेप्शनला बोलावणी यायला लागली, साधेपणातली डिग्निटी लयाला गेली आणि मराठी रिसेप्शनमधला awe संपला.

भपका, बडेजाव, नको इतके फोटो, व्हिडिओ, रील, खाण्यातले चॉइस आपण बदलू शकू का, माहित नाही, पण किमान मेन्यू आणि वधू-वरांचे पोशाख तरी पूर्णपणे मराठी असायला हवेत, असं वाटतं.          

**** 

 

Content, mine. Original. 

Photos from the internet.