April 30, 2012

पिंड


गुरुजींनी भाताच्या मुदी करून ठेवल्या. आता त्यांची साग्रसंगीत पूजा सुरू झाली. ती उरकली की घेऊन जायचे पिंड मागे घाटावर. मग ती आत्तापर्यंतची सर्वात नकोशी वाटणारी वेळ येणार. काकस्पर्श! मिळेल का तिला मुक्ती? एवढं सगळं मागे ठेवून गेलेली ही सवाष्ण, एका क्षणात भरल्या संसारातून उठून निघून गेली. तिला स्वत:लाही तिच्या मृत्यूची कल्पना नव्हती. शक्य होतं का हिला सहजी मुक्ती मिळणं? काय काय सांगावं लागेल पिंडाला, केवळ तिला मुक्ती मिळावी ह्यासाठी? आणि नाहीच शिवला कावळा तर किती वेळ थांबायचं? अर्धा तास फार तर. नंतर दर्भाच्या कावळ्यावर समाधान मिळवायचं... एकापाठोपाठ एक प्रश्न पडतही होते आणि निकालातही काढले जात होते. गेले दहा दिवस ह्यावर विचार करायलाही फुरसत मिळाली नव्हती. आता गुरुजी सांगतात ते सगळं यंत्रवत करताना मनात हे एकेक यायला लागलं होतं, एखाद्या घुसमटून टाकणाऱ्या वावटळीसारखं.

’आज पहिल्यांदाच मी माझी चूक कबूल करतो शोभा! तुझा आणि पल्लवीचा अपराधी आहे मी. राजनच्या बाबतीत माझी निवड साफ चुकली. काय भूल पडली त्या वेळी, पण स्थळाच्या ऐकीव माहितीवर आणि राजनच्या रंगरूपाची मोहिनी पडल्यासारखी झाली आणि हट्टाने पल्लवीचं लग्न तिथे लावून दिलं. ह्या हट्टाची किंमत बिचाऱ्या पोरीला आता आयुष्यभर भोगावी लागणार आहे. माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत हे ओझं मी माझ्या डोक्यावरच घेऊन जगणार. पण ह्या बाबतीत तू मला एकदाही टोकलं नाहीस, की बोल लावला नाहीस. विद्ध शरीर आणि मनानं पल्लवी परत आल्यानंतर ’देवाची मर्जी आणि तिचं नशीब’ इतकंच म्हणून तू आरोपप्रत्यारोपांच्या फेऱ्यांतून मला सोडवलंस. तिच्यापाठी भक्कमपणे उभी राहिलीस. लोकांनी मला कधी तोंडावर, कधी पाठीवर दोष दिला, पण एक अवाक्षरही काढलं नाहीस तू. पण आता जाणवतंय मला ते. उघड बोलली नाहीस, तरी लेकीची काळजी तुझं मन कुरतडत असणार. वेळोवेळी वयोमानामुळे तुझ्या-माझ्या शरीराच्या अनेक चाचण्या झाल्या. तशाच मनाच्या झाल्या असत्या तर? तुझं मन वरवर घट्ट दिसत असलं तरी आतून पोखरलं गेलंय हे मला थोडं आधी समजलं असतं तर? मी करंटा असा, की तू त्याबद्दल काही बोलत नाहीस म्हटल्यावर मीही त्यावर सोयिस्कर मौन बाळगणंच पसंत केलं. त्यामुळेच असं ध्यानीमनी नसताना मृत्यू गाठू शकला तुला. कमकुवत मन असलेलं शरीर त्याला काय प्रतिकार करणार? असं काही असेल तर मी वचन देतो, पल्लवीचं सगळं नीट बस्तान बसवेन. मिकुच्या भविष्याचीही आपल्यातलीच तरतूद करून ठेवतो वेगळी. आणि हो, एखादा चांगला मुलगा मिळाला तर तिचं लग्नंही लावून देईन परत. ह्यावेळी मात्र कसून चौकशी करेन. खरंतर तुझ्यासमोरच तिचा संसार सुरू व्हायला हवा होता.. मला अतिशय पश्चात्ताप होतोय सगळ्याचा शोभा. मला माफ कर. पल्लूसाठी मला जेजे शक्य आहे तेते सगळं करेन शोभा. तुला मुक्ती मिळो!’ 

’आई! अनावर आठवण येतेय गं तुझी. माझ्यापाठी त्या कठीण काळात सतत उभी राहिलीस आणि मला खंबीर केलंस आणि आता अशी अचानक आधार काढून घेऊन कशी गेलीस? पांगळ्या माणसाची कुबडीच काढून घेतल्यासारखं वाटतंय आता. आता आता कुठे मी माझं दु:ख एका कप्प्यात गाडून नव्याने सुरूवात करायला बघत होते.. आता फार एकटं असल्यासारखं वाटतंय. बाबांशी माझं संभाषण तर फक्त कामापुरतं,  मिकु नासमज, दादा-वहिनी तर सगळ्यातूनच अलिप्त आणि त्यांच्या संसारात गुंग, सर्व मैत्रिणी आपल्याच संसारात गुंग! आणि आता तूही नाहीस! फार एकटी पडले गं मी आता. पण आई, माझ्यामुळेच झालं का गं तुझं असं? मी अशी सतत कुढतरडत बसलेली, अबोल, घुमी, राजनने माझं स्वत्वच मारून टाकलं! मला बघून तुला सतत अपयश दिसत असेल ना? ’हिचं कसं होणार पुढे?’ म्हणून मनोमन खंतावत असशील. मला एकेक उद्योगामध्ये मुद्दाम गुंतवत ठेवलंस तू. नोकरीत मी नीट लक्ष देऊन काम करेन, आपल्या पायावर उभी राहीन ह्याकडे तुझं लक्ष होतं नेहेमीच. मिकुची मला तुझ्यामुळे काहीच चिंता नव्हती. पण आई, तू गेलीस आणि वास्तवाकडे प्रथमच डोळे उघडून पाहिलं, पहायलाच लागलं. काही पर्यायच नव्हता. एका मुलीची आई असूनही तुझ्याच पंखाखाली आसरा घेतला होता मी. पण तू जशी माझी खंबीर, हसतमुख, शांत आई झालीस तशी मी मिकुची आई व्हायचा प्रयत्न करेन. तू माझी अजिबात काळजी करू नकोस. आणि बाबांचीही. खरंतर माझं आणि बाबांचं बोलणं उपचारापुरतंच होतं, तुझ्या मार्फत. पण आता मी त्यांच्याकडेही नीट लक्ष देईन आई. करेन मी. खरंच. काळजी करू नकोस. मनातलं सगळं विसरून मी त्यांचं सगळं मनापासून करेन. तू तुझा जीव नको अडकवूस माझ्यात.’

’तुझी फार इच्छा होती ना, की आपलं छोटं घर जरा नीट बांधून घ्यावं? बरेच दिवस झाले, एका बिल्डरची ऑफर आली होती. तो बहुतेक अजूनही तयार होईल. त्या पडक्या घरातून मी वेळीच बाहेर पडलो, पण तुला तिथेच रहावं लागलं. बाबांनी कधीच काहीच मनावर घेतलं नाही- ना पल्लूचं परत येणं, ना तिच्या लग्नासाठी परत हालचाल, ना मी वेगळं घर करणं. तूही त्यांच्या वागण्यावर सतत उगाच पांघरूण घालत राहिलीस. त्यांना शक्य नव्हतं का आपल्या बंगल्याची डागडुजी करणं? तो सत्तर वर्षांपूर्वी जेव्हा बांधला त्यानंतर त्याला रंग नाही की स्वच्छता नाही. पण त्यांनी कधीच काहीच कोणासाठी केलं नाही.. ना त्या घरासाठी, ना तुझ्यासाठी ना आमच्यासाठी! नाहीतरी उमाही आमच्या ह्या भाड्याच्या घरात रहायला खुश नाहीचे. एक बाबांसाठी आणि एक माझ्यासाठी असे दोन फ्लॅट आपल्याकडे घेऊन बाकी सगळे विकता येतील. आठ फ्लॅट्सची एक बिल्डिंग होईल. नाव मात्र तुझंच देऊया- ’शोभा’. तुला रहायला मिळालं नाही, तरी अशा प्रकारे तुझं नवीन घराचं स्वप्नदेखील साकार होईल आणि सगळ्यांची सोयही होईल.’ 

गुरुजींचं मंत्रोच्चारण करून झालं. आता एकेक जण येऊन पिंडाल हळद-कुंकू वहायला यायला लागला, नमस्कार करू लागला. ’ती’ वेळ जवळ येऊ लागली. कावळा शिवेल की नाही? बहुतेक नाहीच. समस्त जमलेल्या लोकांची हीच भावना होती. एरवीही बायका संसारात गुंतलेल्या असतात. ही तर आपल्याच समस्यांमध्ये अडकलेली. नवरा विक्षिप्त, पदरात मुलगी असलेली घटस्फोटित मुलगी, घरापासून दुरावलेले मुलगा-सून. कोणत्या आगाडीवर समाधान मिळवलेलं की कावळा शिवून जाईल पटकन? बिचारीला सुख असं लाभलंच नाही कधी!

गुरूजींनी पिंडाचं सूप तिच्या नवऱ्याला उचलायला सांगितलं. ते घेऊन सगळे मागे घाटावर गेले. तिथे बरेच कावळे जमा झाले होते. अजून दोन-तीन पिंड ठेवलेली होती. म्हणजे कावळ्यांची पोटं भरलेली होती! आता कशाला शिवतात ते हे पिंड? आता तर खात्रीच झाली. सर्वांनी मनोमन दर्भाच्या कावळ्याची तयारी केली. 

घाटावर इतर पिंडांच्या शेजारीच तिचा पिंड ठेवला गेला, आणि तो ठेवेपर्यंतच कावळ्यांनी अक्षरश: त्याच्यावर झेप घेतली. एक क्षण सगळेच अवाक झाले. जिच्या सर्वच इच्छा अपुऱ्या राहिल्या होत्या तिच्या पिंडाला कावळ्यांनी शिवून एका क्षणात मुक्ती दिली होती! म्हणजे मग नक्की कशावर विश्वास ठेवायचा? आत्ता डोळ्यासमोर जे झालं त्यावर की आयुष्यभर मन मारत जगलेल्या तरीही हसतमुख पाहिलेल्या शोभावर? का आपल्यालाच वाटत होतं की ती मनातून आनंदी नाहीये? ती खरंतर जे आहे त्यातच संतुष्ट होती का? तिचा पिंडच तसा होता का? का कावळ्यांना अजून भूक होती? योग्य वेळेला हे पिंड समोर आले आणि तुटून पडले ते? शोभा अंतर्यामी दु:खी होतीच; आज कावळ्यांचंच वागणं विचित्र होतं, असं समजायचं का? उलटसुलट विचारांच्या आवर्तनात समस्त लोक सापडले.

’म्हणजे शोभा, मनातूनही तू मला दोष कधीच दिला नव्हतास का? पल्लवीच्या प्रारब्धाचाच दोष होता, आणि त्यासाठी मी केवळ निमित्त ठरलो असाच तुझा ठाम विश्वास होता ना? तुझं मन त्या बाबतीत एकदम स्वच्छ होतं ना? मी उगाचच ते माझ्यावर ओढवून घेतलं का मग? तुलाही कबूल होतं ना की मी चुकलो नाही ते? हो हो. सगळा पल्लवीच्या नशीबाचेच भोग गं. मी कोणतंही स्थळ पसंत केलं असतं तरी हेच घडलं असतं तिच्याबाबतीत- असाच विचार तूही केलास ना? म्हणूनच मला कधी उणंदुणं बोलली नाहीस तू. बरोबर आहे. माझी चूक नव्हतीच. असती, तर आत्ता कावळा शिवला नसता. पण शिवला. म्हणजे तुझ्यालेखी माझा दोष नव्हताच. हो ना शोभा?’

’आई! म्हणजे काय? तुला माझ्याबद्दल काहीच काळजी नव्हती? तू वरून शांत होतीस तशीच आतूनही होतीस? तुला माझ्या, मिकुच्या भवितव्याशी काहीच सोयरसुतक नव्हतं? माझ्यात तुझा जीव अडकलेला नव्हता? मी मारे दु:खात होते, की माझ्या चिंतेने तू आतून खंगत होतीस आणि त्यामुळेच तू अशी अचानक गेलीस. पण हा कावळा! शिवला बघ किती चटकन. ह्याचाच अर्थ तू संपूर्ण तृप्त होतीस. तुला माझी काडीचीही चिंता नव्हती. असती, तर कावळा शिवला असता का गं? आत्ता ह्या क्षणी मी मेले, तर माझ्या पिंडाला नाही शिवणार कावळा, कारण माझ्यानंतर माझ्या मिकुचं कसं होईल ह्या चिंतेने मी तडफडेन. पण तुला ही काळजी वाटलीच नाही का कधी आई? तू मला धीर द्यायचीस, जुनं विसरायला सांगायचीस ते वरवर होतं का फक्त? तुला माझी, माझ्या संसाराची झालेली वाताहात आतवर टोचलीच नाही का कधी? म्हणजे तू बाबांसारखीच होतीस आई. काहीही मनाला लावून न घेणारी! तुला ओळखलंच नाही मी आई!’

’अरे बापरे! उगाच बोलून बसलो का ते मी घराचं? आई, तुला ते जुनाट, पडकं घरच प्रिय होतं का? तुला खरंच नको होतं नवीन चकचकीत, आधुनिक घर? आम्ही राहतो तसं? बरोबर. नकोच असणार. नाहीतर तू कधीतरी बाबांपाशी उल्लेख केला असतास, त्यांच्या मागे हट्ट केला असतास आणि घरात सुधारणा केल्या असत्यास. पण इतक्या वर्षात काहीच झालं नाही तसं. ह्याचा अर्थ तुझ्याही ते मनात नव्हतं. आणि मला आपलं वाटायचं की बाबांपुढे तुझं काही चालत नाही! मग नाही मी ती कटकट अंगावर घेत. हा ब्लॉक तर माझाच आहे. बाबा म्हणाले तर पुढे-मागे कधी ते घर विकता येईल. नाहीच काही केलं त्यांनी तर बघेन मी. पल्लवीला मात्र वाटा द्यावा लागेल. तो देईन. कोर्टाची भानगड वगैरे नको. तिचं लग्न झालं मध्यंतरी तर नाही देणार अर्थात. ते बघू. पण आई तुला खरंच हौस नव्हती चांगल्या घराची?’

कावळा शिवल्या शिवल्या गुरूजींनी तेवढी समाधानाने मान डोलावली. ’अशी चटकन सुटका आपली व्हायला हवी. तेवढ्यासाठी हवी तेवढी पुण्यकर्म करायला तयार आहे भगवंता’ अशी त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि सौ. शोभा सुरेश कुलकर्णी ह्यांच्या आत्मतत्त्वात विलीन झालेल्या आत्म्याला मनापासून वंदन केलं.

-समाप्त.



17 comments:

  1. बापरे.. कसला ट्विस्ट आहे !! मानवी मनाचं यथार्थ चित्रण !

    ReplyDelete
  2. माणसं आणि त्यांची मनं .. एक विचित्र दर्शन असतं मरणाच्या प्रसंगातलं .. तुम्ही अचूक टिपलं आहे ते!

    ReplyDelete
  3. Marmik!! Shevati smashanbhumitach kharaa maanus baaher yeto !! Pratyek jan soyiskar rityaa kamit kami adchanichaa marg gheun moklaa hoto. Kathaa maatra aawadli haa, jamun geli aahe bhattee mojkyaa shabdaat aanee tyaahunhi between-the-lines far kaahee (Fe. Bu. war wachli hi
    ).

    ReplyDelete
  4. धन्यवाद हेरंब, आतिवास, अरविंद.

    अरविंद- फ़े.बुवर म्हणजे फेसबुकवर का? तिथे मी नाही टाकलेली ही कथा. कुठे सापडली? जरा खुलासा कराल का कृपया?

    ReplyDelete
  5. Excellent! Khupach chan ahe katha! FB var Heramb ne link share keli ahe, tyamule vachayla milali. Thanks Heramb. Poonam: Vel zala ki tumchya ankhin hi katha ahet tya vachun kadhin... Khupach prabhavi hoti hi. Thanks.

    ReplyDelete
  6. पूनम, मी तुमच्या ब्लॉगची लिंक माझ्या फेबु वॉलवर टाकली होती. ती अरविंदने वाचली आणि ब्लॉगवर कमेंट दिली.

    ReplyDelete
  7. अतिशय मार्मिक !
    स्वार्थी मानवी मनाचं यथार्थ वर्णन !
    भयंकर ट्विस्ट !!

    ReplyDelete
  8. कथा आवडली. माझे आई वडिल एकापाठोपाठ वर्षाच्या आत हल्लीच गेले त्यामुळे वाचताना जीव गलबलून जात होता. कधी कधी वाटतं, मानवी मनाचा गुंता मनोव्यापार न उलगडणारा. कधी कधी वाटतं, सुखाची व्याख्या कळेपर्यंत आयुष्यंच संपून जात असावं.

    ReplyDelete
  9. धन्यवाद राहुल, दीपक, मोहना :)

    हेरंब, लिंक फेसबुकवर शेअर केल्याबद्दल धन्यवाद! :)

    ReplyDelete
  10. खंर हे इथे लिहिणे योग्य नाही.. पण आपल्याशी संपर्क साधायसाठी आपला इमेल आयडी किंवा दूरध्वनी क्रमांक मिळेल का प्लीज ?? माझा इमेल आयडी आपल्याला ब्लॉगर कडून कळलाच असेल... नाही तर हेरंब ओक , दीपक परुळेकर किंवा अतिवास मला पियू या नावाने ओळखतात...

    ReplyDelete
  11. धन्यवाद पराग, पियु.
    पियु, तुमच्याशी संपर्क साधते ईमेलमधून.

    ReplyDelete
  12. सुरेख चित्रण केले आहेस मानवी मनाचे. :) आवडली कथा.

    ReplyDelete
  13. आवडली कथा. एकाच प्रसंगात तिघांचे बदलते मनोव्यापार वाचून आचंबित व्हायला झाले.

    ReplyDelete
  14. धन्यवाद प्राची, तृप्ती.

    ReplyDelete
  15. सशक्त कथानक , अचूक शब्दनिवड ह्यामुळे कथेवरची पकड शेवटपर्यंत सुटू दिली नाही. अशी कथा लिहिणे आपल्याला काही जमणे नाही.
    आता वेळ मिळेल तश्या तुमच्या बाकीच्या कथा वाचून काढतो.

    ReplyDelete
  16. मरण,माणस,मन आणि माणूसपण सगळ विलक्षण!

    ReplyDelete