Showing newest posts with label ललित. Show older posts
Showing newest posts with label ललित. Show older posts

March 9, 2010

लकी ड्रेस

ध्या दहावी-बारावीच्या परिक्षा चालू आहेत, त्यावरून अचानक एक मजा आठवली- लकी ड्रेसची. हा लकी ड्रेस काय प्रकार आहे माहित असेलच ना? तो ड्रेस घातला की सगळं चांगलं होतं, परिक्षेत उत्तम मार्क मिळतात, दुष्ट वठणीवर येतात, मुलाखतीत पास होऊन नोकरी मिळते, दुश्मनांचं खच्चीकरण होतं वगैरे वगैरे..

खरंतर हे एक फॅडच. नक्की कधी सुरू झालं आठवत नाही मला.. पण दहावीच्या परिक्षेच्या वेळीच असणार.. कारण त्या आधी शाळेच्या गणवेषामुळे साधे ड्रेसही घालणं होत नसे, लकी कुठचे घालायला! मला आठवतंय, दहावीच्या परिक्षेतलं ते एक एकमेव आकर्षण होतं- की परिक्षाभर वेगवेगळे ड्रेस घालता येतील!! एरवी गणवेषात घुसमटलेले विद्यार्थी नेहेमीच्या कपड्यात मोकळा श्वास घेतील! तर त्या परिक्षेला माझ्या वर्गात बसणारी आमच्या शाळेतलीच एक मुलगी सलग तीनचार दिवस एकच ड्रेस घालून आली.. एक तर मार्च महिन्याचे दिवस.. पेपरची वेळ अतिशय रम्य- सकाळी ११ ते सुपारी २. त्यात टेन्शनही. ह्या सगळ्या काँबीनेशनमध्ये तीनतीन दिवस एकच ड्रेस??? त्यावेळी मी फारच इनोसन्ट होते, त्यामुळे लोकांना विचारायचे चक्क अशा विचित्र वागण्याची कारणं- त्याप्रमाणे मी प्रचंड कुतुहलाने विचारलंही तिला, की का गं बाई असं? तेव्हा मी पहिल्यांदा ऐकले ते शब्द- ’अगं हा माझा लकी ड्रेस आहे. हा ड्रेस घातला की मला पेपर सोप्पे जातात. त्यामुळे परिक्षा आहे तोवर हाच ड्रेस!’ आईशप्पथ! मला फार भारी प्रकार वाटला होता तो. असे ड्रेसबिस असतात लकीबिकी! वॉव!! (पण म्हणून रोज????- रात्री धुवत असेल, उन्हाळा आहे, वाळत असेल वगैरे मीच माझ्या मनाशी प्रश्नोत्तराचा खेळ खेळले आणि ’लकी ड्रेस’ कन्सेप्टमध्ये रंगून गेले..)

माझा कोणता बरं आहे लकी ड्रेस?- संध्याकाळी मी कप्प्यासमोर! एकतर शाळेमुळे कपडे फारसे लागतच नसत. फारतर दहाबारा ड्रेस असतील माझ्याकडे तेव्हा.. त्यांच्याकडे टक लावून बघत, शोध घेत बसले की हा ड्रेस घातला होता तेव्हा काय बरं झालं होतं? तो घातला होता तेव्हा टीचरने कौतुक केलं होतं का वगैरे? पण काही आठवेचना!! शेवटी तो नाद सोडला.

कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र भरपूर कपडे आले. त्यामुळे त्यांची वर्गवारी करणं सोपं पडलं- हा अनलकी- हा घातला तेव्हा मैत्रिणीशी भांडण झालं होतं, हा लकी- हा घातला तेव्हा ’तो’ पहिल्यांदा बोलला वगैरे.. त्यामुळे बारावीच्या परिक्षेच्या आधीच अभ्यासाबरोबरच प्लॅनिंग कोणत्या दिवशी कोणता ड्रेस घालायचा याचंही झालं होतं. त्यात कॉलेजमध्ये जाऊन अक्कलेत वाढ झाल्याने, ’एकच ड्रेस लकी नसतो काही, एक रंग असतो लकी’ असा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे एकाच लकी ड्रेसवरची संक्रांत टळली होती.. त्या ऐवजी एकाच ’लकी’ रंगाचे अनेक कपडे कपटात आले, हा भाग वेगळा. कॉलेजमध्ये असताना सतत कोणती ना कोणती परिक्षा चालू आणि सतत नवीन कपडेही घेणं चालू. त्यामुळे सतत लकी ड्रेस बदलायला लागले! मग अनेक फॅडांसारखंच तेही मागे पडलं..

नंतर काही वर्षांनी मी मुंबईत रहात होते नोकरीनिमित्त पेईंग गेस्ट म्हणून, तेव्हा एका नवीन मुलीची ओळख झाली.. तिला नुकतीच नोकरी लागली होती म्हणून आमच्या रूमवर आली होती रहायला.. एकीकडे ओळख, गप्पा करता करता ती सामान लावत होती आणि तिने काढला तिच्या बॅगेतून तिचा तो लकी ड्रेस! तो हातात येताच तिची कळी एकदम खुलली. "हा माझा लकी ड्रेस आहे.. हा मी जेव्हा जेव्हा घालते, तेव्हा तेव्हा मला हमखास चांगली बातमी कळते.. मी इथे शिकायला आले, तेव्हा एन्ट्रन्स एक्झामला हाच ड्रेस होता, आणि परवा इन्टरव्ह्यूलाही हाच घातला होता मुद्दाम.. तसा झालाय आता जुना, पण तरी माझा लकी ड्रेस हाच!" इतक्या आत्मीयतेने ती त्या ड्रेसकडे पाहून बोलत होती, की मला खूप गंमत वाटली- हा प्रकार अजूनही चालू आहे बघून.

नंतर परत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मी परत पुण्याला आले, संसारात, मुलात, नोकरीत अडकले. एक सुरूवातीला अगदी मनासारखी असलेली नोकरी हळूहळू आपले रंग दाखवू लागली.. खूपच कंटाळा आला होता त्या मॅनेजमेन्टचा. बाहेर पडायची संधीच शोधत होते. आणि अशात नवीन नोकरी अगदी चालून वगैरे आली.. पगार, बाकी अटी, कामाचा स्कोप- सगळंच चांगलं होतं. इन्टरव्ह्यूला गेले, तेव्हा थोडी धाकधूक होती- इतकी आखूड शिंगी बहुदूधी गाय हाती लागत्ये की नाही- याची. पण मुलाखत झकास झाली. अजून एक मुलगी होती स्पर्धेत, पण मला मिळाला जॉब! हे इतकं अचानक, अकल्पितपणे घडलं होतं की मी काही वेळ चक्रावलेल्या अवस्थेतच होते. त्यामुळे देवाला हात जोडताना, घरी कळवताना वगैरे आपसूक लक्ष गेलं- आज कोणता ड्रेस घातलाय?- याकडे! बस्स, हाच माझा नक्की लक्की ड्रेस- आत्तापर्यंतचा सर्वात लकी.

आपसूकच त्या ड्रेसला मी खूपच जपायला लागले. काही स्पेशल ओकेजन असेल तरच तो घालायला लागले. तो ड्रेस कधीही नुसता कपाटात दिसला तरी उगाचच छान वाटायचं. अशातच ऑफिसमध्ये एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग आली. मीटिंग वादळी होणार अशी चिन्ह होती. तयारी जय्यत होती. माझ्यावर एक मोठी जबाबदारी होती मीटिंगमध्ये, त्यामुळे चिकार टेन्शनही होतं डोक्यावर. त्या दिवशी अर्थातच मी माझा ’तो’ लकी ड्रेस घातला! लंचपूर्वी मीटिंग होती. जे जे अपेक्षित होतं, ते ते सर्व घडलं मीटिंगेत. पण ते अपेक्षित होतं, त्यामुळे फारसे धक्केबिक्के बसले नाहीत. ’सिच्युएशन अंडर कन्ट्रोल’ होती. मीटिंग व्यवस्थित पार पडली एकदाची. आम्ही सर्वांनीच मोठे मोकळे श्वास घेतले. कागदपत्रांची आवराआवर करून केबिनमध्ये आले, तर लक्षात आलं, की सकाळी डबा आणायचाच विसरल्ये! मग एक भन्नाट कल्पना आली डोक्यात- घरीच जाऊया. डबा खाऊ आणि निवांत येऊ दोन तासाने ऑफिसला. तडक बॉसची परवानगी घेतली आणि घरी आले. सावकाशपणे मीटिंगमधले क्षण, मी दिलेली उत्तरं वगैरे आठवत जेवले. घरी असल्याने दोन घास जास्तच गेले.. लगबगीने ऑफिसला निघाले.. मन अजूनही तरंगतच होते आणि खाडकन एका क्षणात जमिनीवर आले!

हो. लिटरली जमिनीवर. माझ्या दुचाकीला काटकोनातून येणार्‍या दुचाकीने धडक दिली होती आणि मी चक्क जमिनीवर फेकले गेले होते. हे इतक्या पटकन झालं की मला त्यातलं गांभीर्यच कळलं नाही तेव्हा. त्या मुलांनी माझी दुचाकी उचलली आणि पसार झाले. मी दुचाकीचा आधार घेऊन उठले आणि स्वत:ला तपासलं. हात-पाय-डोकं सगळं धड होतं. काहीही मोडलं नव्हतं, दुखत नव्हतं.. अरे! मग ड्रेसवर हे रक्त??? संपूर्ण ड्रेसवर रक्त कुठून आलं? ..येतंय अजूनही? तेव्हा लक्षात आलं- हनुवटी फाटली होती आणि त्यातून प्रचंड रक्त जात होतं!

एक क्षण पॅनिक झाले. एव्हाना रस्त्यावरचे दोन लोक माझ्या मदतीला आले. मी स्थळ ठरवून पडल्यासारखी एका हॉस्पिटलच्या दरातच आडवी झाले होते. त्यामुळे लगेचच ओपीडीत दाखल झाले. त्यांनीही झटपट माझी तपासणी केली, हनुवटीला टाके घातले वगैरे आणि अर्ध्या तासात मी परत एकदा ठीकही झाले होते. पण माझा ड्रेस? तो माझा लकी ड्रेस? ज्यामुळे मला नोकरी मिळाली, अनेक मीटिंगांमध्ये मी छाप वगैरे पाडलेली? पार वाट लागली होती त्याची. रक्ताने तर माखलेला होताच, पण रस्त्यावरची धूळ, माती, दुचाकीचं ऑईल- मस्त मेकप झाला होता त्याचा! मला त्याही स्थितीत हसू आलं! आता नवीन लकी ड्रेस शोधायला लागणार की! :-)

अर्थात, तो ड्रेस स्वच्छ झाल्यानंतर व्यवस्थित झाला. त्याच्या अंगावर पडलेले सर्व डग गेले. आधीसारखाच सुंदर दिसू लागला. पण अपघात झाल्या झाल्या माझ्या मनातून तो खूपच उतरला होता- माझी काहीही चूक नसताना ध्यानीमनी नसताना मी पडते काय, लागतं काय? हा कसला आलाय डोंबलाचा लकी? लकी असता तर असं झालंच नसतं.. वगैरे.. रागच आला होता त्याचा. वाटलं देऊनच टाकू याला कोणालातरी.. अगदी नजरेसमोर नको तो..

पण आज बरेच दिवस झाले ह्या घटनेला तरी अजूनही तो ड्रेस माझ्याकडे आहे, मी तो प्रेमाने वापरते आणि विचारांती तोच माझा लकी ड्रेस आहे हे मला पटलंही आहे. तो ड्रेस होता म्हणूनच मला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. फक्त हनुवटीवर सुटका झाली. हात-पाय तर धड होतेच, पण किती धोका होता? जबड्याला, दातांना, ओठाला, डोळ्याला? सुदैवाने सगळं अगदी व्यवस्थित होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी दुचाकीवर एकटी होते. माझ्याबरोबर नेहेमीसारखा माझा लहान मुलगा असता तर?? बापरे! विचार करवत नाही. हे सगळं टळलं ते देवाच्या कृपेने आणि त्या लकी ड्रेसमुळेच!

खरंतर तुम्हाला-मला हे पक्कं माहित आहे, की जे व्हायचं ते होणारच असतं. असे लकी/ अनलकी ड्रेस घालून म्हणा किंवा अजून कोणत्याही मार्गाने म्हणा, एखादी घटना काही होत नाही किंवा टळतही नाही. पण त्या निमित्ताने भाबड्या मनाची समजूत घालता येते. प्यूअर फॅक्ट्सच्यापलिकडेही काही अस्तित्वात आहे यावर विश्वास बसतो. जसं दुर्दैवाचं, नशीबाचं खापर फोडायला आपण नेहेमीच कोणालातरी अथवा कशालातरी वेठीला धरतो, तसंच चांगल्या गोष्टींचं क्रेडीट द्यायलाही कोणाला/ कशालातरी शोधायला काय हरकत आहे? म्हणूनच I am still fond of my lucky dress :-)

February 5, 2010

मुक्ती!

दोन दिवसांपूर्वी आईचा सकाळी सकाळी फोन आला-"आजीला कालपासून खूपच बरं नाहीये, असंबद्ध बोलणं चालू झालंय आणि तुझं नाव घेत आहे, तर भेटून जा.." अर्थातच धावतपळत मी गेले.. आजीला बघताच एक क्षण विश्वासच बसला नाही.. तिला मी हाक मारली, तर डोळे पूर्ण ब्लँक! मग पाच क्षण विचार करून तिने मला हाक मारली आणि जवळ घेतलं.. (म्हणजे स्मृती ठीक होती, त्यातही मला दिलासा मिळाला..) मला घट्ट पकडलं होतं तिने आणि म्हणाली, "मी बरी होणारे!"

मी खरोखर थक्क झाले!

आज माझी आजी नव्वद वर्षाची आहे. वाचनाचा प्रचंड नाद.. अजूनही तिच्या दोन लायब्रर्‍या आहेत! परवा परवापर्यंत रोजचं वर्तमानपत्र वाचत होती.. पण अचानक काहीच त्रास होत नसताना हे असं व्हायला लागलं- डॉक्टरचं म्हणणं की तिला काहीही होत नाहीये, फक्त वयोमानानुसार मेन्दूचा रक्तपुरवठा कमी झालाय, त्यामुळे हे असंबद्ध बोलणं- काय काय नाही बोलत ती? पार लहानपणापासूनच्या आठवणी, ती माणसं, त्यावेळेच्या जागा, ठिकाणं कधीकधी नुसतीच आवाज काढते- तिला भानही नसतं की आपण काही बोलतोय याचं.. फार चुटपुटल्यासारखं झालं मला तिची अवस्था पाहून..

माझी आजी म्हणजे एक अजब व्यक्तीमत्त्व! ’आजी’ साधारणपणे खूप मायाळू वगैरे असते असं मी दुर्दैवाने फक्त ऐकून आहे.. म्हणजे आजीने आम्हा नातवंडांवर प्रेम केलं, पण ती कायम एक अंतर ठेवूनच राहिली.. झोकून देऊन प्रेम, स्वत:ला विसरून, नि:स्वार्थ प्रेम असं करायचा स्वभावच नाही तिचा.. कायमच स्वत:चा आब राखून, स्वत:ची ’पोझिशन मेन्टेन’ करून होती ती..

तिचा जन्म, बालपण आणि तारूण्य ब्रिटिशकालीन. त्या काळात तिचे वडील सरकारी अधिकारी होते.. मोठ्या बंगल्यात रहायचे- तिला अजून पाच बहिणी आणि दोन भाऊ. ह्या सर्व बहिणींची लग्न सुस्थळी झाली. पण माझी आजी सर्वात नशीबवान. माझे आजोबा अतिशय देखणे, गोरेपान, राजबिंडे. पेशाने संस्कृतचे शिक्षक, त्यामुळे खूप मान होता त्यांना, आणि त्यामुळे आजीलाही. आजोबांच्या नोकरीमुळे ते पुण्यात रहात, आणि सासर सातारा. ती कधीच सासरी राहिली नाही.. त्यामुळे त्या काळी रूढ असलेला सासुरवास कधीच नाही झाला.. अर्थात असं ऐकून आहे की तिची सासू, म्हणजे माझ्या वडीलांची आजी अगदी गरीब स्वभावाची होती. त्यामुळे एकत्र रहात असते, तरी सासुरवास नसता केला त्यांनी.. एनीवे, सो त्या बाबतीत लकी. कायम स्वातंत्र्य- घराची सर्व सूत्र हिच्याकडे. आजोबांच्या प्रोत्साहनामुळे पुढे शिकलीही. आजोबांनी तिच्या सर्व हौशी पुरवल्या. ह्याच काळात तिच्या बहिणींचेही संसार सुरू होते. जवळजवळ प्रत्येक बहिणीच्या वाट्याला काही ना काही सांसारिक आपत्ति, अडचणी आल्या.. पण सुदैवाने आजीला कसलीच झळ पोचली नाही- या सर्वामुळे एक प्रकारचा ताठा तिच्यात आला- बहिणींपेक्षा मी वयाने नाही, तर मानाने, सुखानेही श्रेष्ठ आहे- असा.. त्याचवेळी इकडे सासरीही तीन जावांमध्ये हिचंच सर्वात बरं चाललेलं होतं, त्यामुळे त्या श्रेष्ठत्त्वावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं झालं.. आणि हाच आब तिने आयुष्यभर राखला.. त्याकाळीही आजीने पोळ्यासाठी बाई ठेवली होती ह्याचं मला आत्ताही कौतुक वाटतं! मला आठवतंय की मी खूप लहान असताना, माझे आई-वडील, मी आणि माझी बहिण वडीलांच्या नवीन नोकरीमुळे कायमचे पुण्यात आलो रहायला आजी-आजोबांबरोबर. वाड्यातलं ते छोटं घर, तीन खोल्यांचं. माणसं सहा. अडचणच व्हायची. त्यातही माझ्या आजीचं स्वत:च वेगळं असं एकटीचं गोदरेजचं कपाट होतं- आजही आहे ते. आजतागायत मला त्यात काय, कुठे आहे माहित नाहीये! मला आणि बहिणीला एक एक कप्पा कपड्यांसाठी आणि दोघीत मिळून एकच अभ्यासाचं टेबल आणि त्याच्या आजूबाजूचे खण होते पुस्तकांसाठी.. नंतर अभ्यास वाढल्यानंतर ती तेवढी जागा पुरायची नाही पुस्तकांना. एकदा तर मी चक्क भांडणही केलं होतं आजीच्या कपाटातल्या एका कप्प्यासाठी.. पण नव्हता मिळाला तो मला, इतकी आजीला आपली प्रायव्हसी प्रिय!

तिला आम्ही चार नातवंडं- आम्ही दोघी बहिणी आणि माझे दोन आत्तेभाऊ. आमचे रूढ लाड तिने केले.. म्हणजे वाढदिवसाला पैसे/ खेळणी, आम्हाला गोष्टी सांगितल्या, पत्त्याचे डाव शिकवले, जुन्यापान्या आठवणी सांगितल्या.. माझी आई नोकरी करत असताना मला जेवायला वाढलं, आई-वडील गावाला गेल्यावर आम्हाला सांभाळलं- सगळं केलं. पण ह्यापेक्षा जास्त पण असतं ना एक काहीतरी? नातवंडांचा जिव्हाळा? त्यासाठी आम्ही क्वालिफाय नाही झालो कधी. असो.

मी सर्वात लहान असल्याने मी तिच्या सर्वाधिक संपर्कात आले. आणि हळूहळू समज वाढली तसं हे सगळं लक्षात यायला लागलं. आणि सर्वात खटकली ती तिची माझ्या आईशी असलेली वागणूक! सतत कुरबूर चालू आहे, अगदी अजूनही. तिला नक्की काय पसंत पडलं नाही आईमधलं हे मला अजूनही नाही कळलेलं- पण ते बहुधा ’कोणाची सत्ता’वरून असावं. कारण तिने स्वयंपाक करण्यातून कधीचीच निवृत्ती घेतली असली, तरी स्वयंपाकघरातून कधीच ती बाहेर आली नाही. अगदी आत्ताही तिला स्वयंपाकघरात कोणत्या डब्यात काय आहे, नवीन काय केलंय, काय संपलंय हे सगळं ठाऊक आहे. त्यामुळे आईवर सतत लक्ष. ती काय करत आहे, यावर, कुठे जात आहे यावर, कोणाशी काय बोलतेय, यावर, तिने काय आणलंय यावरही. बर जेवणावळी, केळवणं, डोहाळजेवणं सगळी आईच्या जीवावर! पण तिने काय करायचं हे तीच ठरवणार. त्यात बदल नाही. आत्तापर्यंतच्या आईच्या एकाही पदार्थाला तिने नावाजलेले मी ऐकले नाही. उलट अजूनही आमटीत चिंच घालायची की आमसूल अशा फुटकळ गोष्टींवरही घरी वाद झालेले आहेत!! त्यातही मऊ लागलं की कोपरानेही खणतात त्यातली गत- आई ऐकत गेली आणि ही गाजवत गेली.. हे सगळं मला कळत होतं आणि त्यामुळे आजीच्या कर्तृत्त्वाचा अभिमान वाटण्याऐवजी, तिच्या पुस्तकवाचनाचं कौतुक वाटण्याऐवजी, तिच्या टीपिकल सासूपणाबद्दल एक अढीच बसली मनात. आईने तिचं सगळं ऐकलं, ती म्हणेल तेते करत गेली, सतत रीपोर्ट केलं, तिच्या मनासारखं व्हावं याची शक्य तितकी काळजी घेतली तरी एकदाही आजीचं समाधान कसं काय झालं नाही याचं नवल वाटतं आणि रागही येतो.. मी आईला तर कित्ती वेळा म्हटलं असेल, की का इतकं करत्येस? तर ’भोग आपले’ म्हणून तिने कायमच विषय मिटवला..

आज आजी इतकी थकली.. मध्ये पाय अधू झाला, कंबरेचं एक मोठं ऑपरेशन झालं- धावाधाव करायला कोण होतं? आईच ना? माझे वडील पहिल्यापासूनच यातून अलिप्त- कदाचित सासू-सूनेच्या भानगडीत पडायला नको म्हणूनही असेल.. त्यामुळे आजीच्या तोंडी सतत आईचंच नाव! प्रचंड अटेन्शनसीकर आहे ती आणि तिला आईच लागते सर्व लाड पुरवायला.. आईही थकली आता, तिचंही वय झालंय. आणि दुर्दैवाने तिला नाहीये कोणी सून अशी पळापळ करायला.. तिचा विचार कोण करेल? आजीने धड असतानाही तिने कधी नाही केला.. आता काय करेल?

इतकं संपन्न आणि प्रदीर्घ आयुष्य जगलीये माझी आजी.. आणि अगदी एक वर्षापर्यंत अत्यंत आरोग्यपूर्णही.. तिची एकही इच्छा अशी नाही जी अपूर्ण राहिली. तिच्या मुलांचं, नातवंडांचं, पतवंडांचं देवकृपेने उत्तम चालू आहे. आईरूपाने सेवेत खंड नाही. पैशाचंही पाठबळ लाभलं. चिकार वाचलं, बघितलं, भ्रमण केलं. त्यामुळेच अजूनही, ’मी बरी होणारे’ हे मी ऐकलं आणि खरंच थक्क झाले!

कसली ही जीवनेच्छा? आता अजून काय राहिलं असेल अपूर्ण ज्यामुळे संभ्रमावस्थेतही ’मला जगायचंय’ची इच्छा अजूनही कायम आहे? संपूर्ण सुखी, तृप्त आयुष्य जगून झाल्यानंतरदेखील कोणता तो चिवट दोर आहे ज्यापासून नाही मिळत याही वयात मुक्ती? जीवाचे हाल सोसत, वेळाकाळाचं भान नाही, अंगावरच्या कपड्याचं भान नाही, जेवलोय की नाही हेही जिथे लक्षात नाही, पूर्ण परावलंबित्व असताना कोणती अशी आशा आहे जी मृत्यू स्वीकारण्यापासून रोखतेय? अर्थातच तिच्या वाट्याला जितकं आयुष्य आहे तितकं ती जगेलच, पण विधात्याची, विधीलिखिताची गंमत वाटते.. एक पूर्ण जीवन जगलेला आत्माही तर पंचतत्त्वात विलीन होण्यासाठी उत्सुक नसेल, तर आत्म्याच्या मुक्तीसाठी खरंच कोण देवाला मनापासून आळवत असेल?

January 27, 2010

मुद्दागुद्दी!

गुद्दागुद्दी’ हा शब्द आपण ऐकलाय.. ही मुद्दागुद्दी काय आहे? तर, मुद्दागुद्दी म्हणजे भांडण सुरू करायचं मुद्यावरून आणि संपवायचं गुद्दागुद्दीवर! आपण साधं नळावरचं भांडण घेऊया.. वाद होतो सुरू.. का? कारण मध्येच कोणीतरी घुसलेलं असतं. हा मूळ मुद्दा. पण ह्यावरून जी ’बाच्याबाची’ सुरू होते की बस रे बस.. पार चारित्र्यहननच!! त्या अवधीत सहज पन्नास लोक बादल्या भरून जातात.. सो, मुद्दा राहतो बाजूला.. उगाच एकमेकांची उणीदुणी काढायची, पार वाडवडीलांच्या कुळाचा उद्धार करायचा, पोराबाळांचं अपयश उगाळायचं, कधीतरी पाच वर्षापूर्वी झालेल्या एकमेकांच्या चुका उकरून काढायच्या... आणि शेवटी बोलायला काही उरलं नाही की हात उगारायचा!! मूळ मुद्द्यातलं पाणी एव्हाना येऊन गेलेलं असतं बिचारं.. पुढच्यामागच्या लायनीतल्या लोकांचं पाणीही भरून झालेलं असतं आणि ते भरता भरता टीपीही बरा झालेला असतो.. भांडणारे बसतात उद्यापर्यंत बोंबलत! (खरंच!!) (आता लोक सूज्ञ झालेत.. पाणी ठरलेल्या वेळात जातं हे ठाऊक झालंय, त्यामुळे ते गेलं की मग भांडतात! भांडण सोडायचं नाही- त्या मुद्द्याला मात्र चिकटून आहेत!)

नळावरचं भांडण मेटॅफॉरिकली घेऊया.. अशी अनेक उदाहरणं सगळीकडे दिसतात.. बस/लोकल/रांगेत घुसणारी माणसं- तेवढ्यापुरतं सोडून देतो का आपण? घुसणारा माणूस मागे गेला तरी त्याच्याकडे डेडली कटाक्ष, ’नकोच मिळूदे त्याला तिकिट’ सारख्या इच्छा.. आपण तरी कुठे लिमिट पाळतो? डोक्यात एकदा रक्त उसळलं की उतरायचं नाव घेत नाही लवकर.. मग उगाच खुसपटं काढत रहायची काही ना काही.. अशाने मग समोरच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? का त्याने केली ती चूक? आणि आपण करतो तो शहाणपणा?

हीच गम्मत लहान मुलांच्या भांडणात पडणार्‍या पालकांची.. मुलं एकमेकांशी भांडतात आणि त्याच्या तक्रारी पालकांपर्यंत पोचतात.. मग मुलांचं भांडण रहातं बाजूला आणि खेळ रंगतो पालकांचाच! ’तुझ्या पोराकडून काय अपेक्षा करणार रे! बापच असा, तर तो तरी काय करणार? खानदानाची सवय!’ ’आई घरात मुलाला काही शिकवेल तर मूल धड वागेल ना? संस्कारच नाहीत ह्यांना काही! आमच्या लोकॅलिटीत अगदी शोभत नाहीत!’ वगैरे वगैरे! पार इज्जत के फालुदे- दोन्ही बाजू एकमेकांच्या करतात.. त्यांचं भांडण संपेस्तोवर पोरांनी आपसातलं भांडण मिटवून पुढच्या भांडणाची तयारी केलेली असते! मुलांचं एकेकाळी भांडण झालं होतं म्हणून वर्षानुवर्ष एकमेकांचं तोंड न पाहिलेले पालक मला ठाऊक आहेत! नको त्या वेळी नको त्या गोष्टींचा बादरायण संबंध लावून आयुष्यभराचं एकमेकांसमोर हसं करून घेतात हे लोक.. त्याऐवजी पोरांच्या भांडणात न पडण्याचा सूज्ञणा वेळीच दाखवला असता तर??

आणि आंतरजालावरच्या भांडणाचं तर काय सांगावं! ही तर भांडण उकरून काढण्याची एक आयतीच सोय झालीये! इथे आपण एकमेकांना दिसत नाही, भेटायची शक्यता नाही! समोरासमोर असू, तर कसं भांडण करायच्या आधी थोडा तरी सारासार विचार करायला वेळ असतो.. आंतरजालावर भीतीच नाही कशाची! जे मनात आलं, लिहून टाकलं.. त्याचा आणि लिहिलेल्या मुद्द्याचा काहीच संबंध नसतो.. काढायची असते ती चिडचिड बाहेर.. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडून ’तुझ्याकडून बाकी काय अपेक्षा करणार म्हणा, तुला विचारण्यातच काही अर्थ नाही’ अशी वाक्य पडतात.. अजून एक अचाट प्रकार म्हणजे आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळावर दोन तथाकथित मित्र असतात. ते एकमेकांना नुस्त्या आयडीनेच नाही, तर थोडेफार पर्सनलीही ओळखत असतात.. त्यातल्या एकाला दुसर्‍याचं काहीतरी पटत नसतं.. पण ते तो त्याला मोकळेपणाने नाही सांगत.. तो काय करतो? ते सांगण्यासाठी अजून एक आयडेंटीटी निर्माण करतो.. आणि त्या आयडीने पहिल्या त्याच्या सोकॉल्ड मित्रावर वाट्टेल ते शरसंधान करतो.. वरताण म्हणून त्याच्या परिचित आयडीने मित्राला सहानुभूतीही देतो -’काय लोक तुला सतावतात ना?’ म्हणून!!!! म्हणजे एकच व्यक्ती त्रास देते, आणि खांद्यावर हातही ठेवते! विकृत लोक असतात हे, जाऊदे..

तर, मुद्दा असा होता, की तुम्हाला मुद्दा पटत नाही की माणूस पटत नाही? प्रत्येकाचं प्रत्येकाशी घट्ट कसं जमेल? प्रत्येक न प्रत्येक मत कसं जुळेल? थोडे मतभेद, मतांतरे असणारच.. आणि मैत्री जर तितकीच मोकळी असेल तर ती आमनेसामने कळवावीत.. त्यात कोणीच वाईट वाटून घ्यायचे किंवा ईगो प्रॉब्लेम करण्याचे काय कारण? मतभेद आहेत ते व्यक्त करण्याच्याही रीती आहेत, संकेत आहेत.. ते व्यक्त करावेत, समोरच्याचं ऐकून घ्यावं- त्याने आपली स्वत:ची मतंही तपासून होतात आणि विषय संपवावा.. पण तसं होत नाही.. एकदा रसवंती वाहू लागली, की कायकाय जुनंपानं बादरायण संबंध लावूनही न जुळणारं असं काहीतरी बोलण्याबोलण्यातून बाहेर पडतं आणि मतभेदाचे वाद आणि वादाचं भांडण होऊन संबंध मात्र चिघळतात.. आणि एकदा हे संबंध बिघडले की मात्र ते सांधूनही सांधत नाहीत..

मतभेदांच्याही पुढे जाऊन मैत्री करता येते- हे ज्यांना कळले ते खरे सुखी.. इन्ग्रजीमध्ये दोन सुप्रसिद्ध वाक्य आहेत- A friend is the one who knows everything about you and still loves you आणि We may agree to disagree! वकीलांचे तसे असते म्हणतात- कोर्टात जे वकील एकमेकांसमोर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात, तेच संध्याकाळी एकत्र गप्पा मारताना दिसतील. अशीलातर्फे भांडण हा त्यांच्या व्यवसाय आहे.. एकमेकांशी भांडण असायलाच पाहिजे असं नाही!

पण मुद्द्यावरून गुद्द्यावर घसरलं की समजायचं आता सगळं संपलं.. कदाचित एरवी काही तोडगा निघूही शकला असता, पण गुद्दागुद्दी आली- मग ती शारीरिक असो वा शाब्दिक की कोणालाच सारासार विचार रहात नाही, आणि मुद्दे बासनात गुंडाळून पडतात. तर पुन्हा एकदा मुद्दा असा, की मुद्दा सोडू नका, शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे! पण तो प्रतिष्ठेचाही करणं इतकं आवश्यक आहे का याच्या विचार करूया.. सौहार्द्राचे अनेक मार्ग खुले असताना कशाला ह्या मुद्दागुद्दीत परस्परमैत्रीला चूड लावायची?

November 26, 2009

कोणाला फरक पडतो?

२६/११च्या निमित्तानं खरंच हा प्रश्न विचारावासा वाटतो- खरंच फरक पडतो का तुम्हाला? तुम्ही- राजकारणी, मंत्री आणि मीडीयाचे प्रतिनिधी.

आज त्या हल्ल्याला एक वर्ष झालं, त्यानिमित्तानं संपूर्ण भारतदेश परत एकदा ते दु:खद, संतापजनक क्षण जगतोय- तो सुरेक्षेमधला ढिलेपणा, हलगर्जीपणा, सामान्यांचे आणि पोलिसांचे मृत्यू, तब्बल तीन दिवस चाललेला संहार, अतिरेक्यांनी मुंबईच्या नाकावर टिच्चून केलेली विटंबना..

त्यानंतर पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. कसाबचा खटला चालू आहे, शेजारचे राष्ट्र आज एक आणि उद्या एक बोलत, आपल्याला झुलवत ठेवत बाकी बलाढ्य देशांकडून कोट्यवधी डोलर्सचा निधी मिळवत परत अतिरेकी कारवायांना उत्तेजन देत आहेच. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बसली आणि कालांतराने परत एकदा ढासळलीही. नेत्यांनी भाषणं ठोकली सवयीनी.. त्यांना त्याचा दाह कळला का तरी? मीडीया त्यावेळी बाईटसाठी वेडी झाली, जीवावर उदार झाली, माणूसकी विसरली. शेवटी पुढे आला तो सामान्य माणूसच- असा माणूस ज्याला चेहरा नाही, पण संवेदना आहेत. आज तोच माणूस शांततेसाठी मेणबत्त्या लावेल, तर पोलिस निधीसाठी एक दिवसाचा पगार देईल.

पण ज्यांना ठोस काही करता येईल त्यांनी काय केले हो ह्या काळात? अगदीच काही नाही असं नाही- दोन निवडणूका केल्या ना- आधी लोकसभा, मग विधानसभा. त्यात सर्व शक्ती पणाला लावली. अमूक मंत्री पडावा म्हणून केलेली फिल्डींग, तमूक उभा रहावा म्हणून वापरलेलं दबावतंत्र, जागांची गणितं, करोडोंचे व्यवहार! ह्या सगळ्यात देशाचा स्वाभिमान, लोकांची सुरक्षितता कुठे लक्षात ठेवणार? आणि हे केवळ सत्ताधारी पक्षासाठी नाही, विरोधी पक्षाने काय केले? त्यांना नक्की विरोध कशाला करावा हे तरी उमगतंय का? ह्या देशातल्या सध्याच्या राजकारण्यांनी कधीतरी 'देश' ही प्रायॉरिटी ठेवली का हो? ठेवली असती, तर आज ही वेळ आली असती का? अन्य देशांनी काही विधानं केली, तर निषेध पत्रकं काढण्याशिवाय काय केलं आपण? देश आतून सुधारण्यासाठी कोणी साधा ठरावही पुढे केला नाही? आजही पोलिस खात्यात हजारो पदं रिक्त आहेत, पोलिस महासंचालक कोण?- ह्यावरही राजकारण शिजत आहे- खरंच कोणाला काय पडलंय? लाखो-करोडोंच्या पैशात हे अक्षरशः लोळतात, पण देशाच्या सैनिकासाठी, सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलिस दलासाठी पुरेशी शस्त्रास्त्रही उपलब्ध करून देऊ शकत नाही आपण? त्यावेळी नाही आणि त्यानंतरही नाही? मग कशाच्या जोरावर हे लोक श्रद्धांजली सभांचं आयोजन करतात?

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरवण्यात आलेला पत्रकार आज मोठमोठे लेख लिहिल, ते दिवस, त्या घटना सगळं परत जिवंत करेल. पण वर्षभर तो काय करत होता? कोणत्या वृत्तपत्राने, टीव्ही चॅनेलने 'सुरक्षा' ह्या विषयावर पाठपुरावा केला? प्रसारमाध्यमांनी का नाही वर्षभर युवकांची जागृती मोहिम राबवली? का नाही लोकशाहीमधले दबावतंत्राचे हत्यार वापरून उगवत्या पीढीची ऊर्जा मंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पाडण्यात खर्ची घातली? लोकशाहीचा प्रमुख घटक म्हणून किती ताकद आहे त्यांच्याकडे ती कशात वापरली?- नको ते बाईट्स घेण्यात, सासू-सून छळात, फालतू स्टींग ऑपरेशन्समध्ये, मांजर आडवं गेलं की काय कराल? -यांमध्ये? का नाही ते पुढाकार घेत कोणत्या विधायक चळवळीत? २४ तास तुमचे कारखाने बातम्या बाहेर काढत असता, तुम्हाला कोणालाच ह्या एका विषयाची लाट उठवता आली नाही? आज मारे पानपानभर लिहाल, म्हणजे जबाबदारी संपली का? मीडीया ही राजकारणासारखीच केवळ पैश्यांचाच गणिताला बघून वार्तांकन करते यासारखं कोणतं दुर्दैव असणार?

खरंच कोणालाच काहीच फरक पडेनासा झालाय? पैसा पैसा पैसा.. इतका गैरमार्गाचा पैसा घेऊन काय करणार? असा पैसा, जो तुम्ही स्वतःला विकून उभा केलाय? असं म्हणतात की ह्या जन्मात जी पापं केली आहेत, ती ह्याच जन्मात फेडून जावं लागतं. खरंच असतं का हो असं? कारण ह्यांची पापं इतकी मोठी आहेत, की तीही ती पैसा फेकून पुण्यात बदलून घेतील. 'वजीर' नावाचा एक चित्रपट होता, त्यात शेवटी अशोक सराफाचं पात्र- माजी मुख्यमंत्री- अशा अवस्थेला पोचतो, की अगदी एकटा, एकाकी पडतो, कोणीही ओळखत नाही त्याला! पण हे आजच्या जगात शक्य नाही, कारण देवाची लाठी बसणार तरी कोणाच्या पाठी? सगळेच चोर. ह्या लोकांना कधीच मनातही शरम वाटत नाही का? आपण काय करतोय? ह्याचा परिणाम काय होणारे? किती भयानक खेळ चालू आहे हा?

आणि दु:ख म्हणजे ह्याची झळ त्यांना कधीच बसत नाही, भरडला जातो तो केवळ सामान्य माणूस- असा माणूस ज्याच्याकडे कोणतंही 'बॅकिंग' नाही, 'कनेक्शन' नाही- जो आपलं ज्ञान, कौशल्य वापरून केवळ एक चांगलं स्वच्छ आयुष्य जगू पहातोय! पण त्याला तसं जगू दिलं जात नाही. ज्यांच्या हातात सर्व बदल करण्याची शक्ती आहे, बळ आहे, ते स्वतःची अक्कल विकून बसलेत आणि जे काही करू पहात आहेत, त्यांचं आयुष्य म्हणजे एक न संपणारी शिक्षा झालीये!

तोच हा सामान्य माणूस. आज हळहळेल, व्याकूळ होईल, सरकारला शिव्या हासडेल आणि दोन मिनिटे शांतीसाठी प्रार्थना करेल.
सत्ताधारी नेहेमीप्रमाणेच निष्क्रीय रहातील, अजून भ्रष्टाचार करण्याच्या वाटा शोधतील आणि दोन मिनिटे शांतीसाठी प्रार्थना करेल.
बातमीवाले बातमी देतील 'देशवासी कटू आठवणीत शोकाकूल'.

करण्यासारखं जे काही आहे, ते कोणीच करणार नाही. २६/११ नंतर अजून एखादी तारीख येईल, अजून एक, अजून एक. निष्क्रीयपणा आणि बातम्या त्याच रहातील.
असं म्हणेन, की दुर्दैवाने जे गेले, ते सुटले. आम्ही बाष्कळ बडबड करणारे वाट बघतोय आमच्या सुटकेची.

November 6, 2009

क्रश!

रवा दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर रांगेत उभी होते.. बरीच मोठी रांग होती, हळूहळू पुढे सरकत होती.. माझ्या पुढचा एक माणूस सोडून त्याच्या पुढचा माणसाकडे माझं लक्ष गेलं आणि मला तो उगाचच ओळखीचा वाटायला लागला.. बराच ताण दिला मेन्दूला, पण काही ट्यूब पेटेना.. इतक्यात रांग पुढे सरकली, त्याचा नंबर आला, आणि आम्हीही पुढे सरकलो.. माझ्या गाडीत इंधन टाकून झालं, तोवर तो अजून पंपावरच होता.. मोबाईल कानाला होता.. बोलता बोलता त्याने सहजच मागे वळून पाहिलं आणि मला त्याचा संपूर्ण चेहरा दिसला! आणि क्लिक!!! येस्स्स्स! आठवला..

बापरे! मी कितीऽऽऽऽऽऽ वर्ष मागे गेले.. पार शाळेत- आठवीत. आमच्या शाळेने फोकडान्स स्पर्धेत भाग घेतला होता.. आधी गॅदरिंगमध्येच बसवलेला नाच अजून मोठ्या प्रमाणात बसवणार होत्या बाई.. त्या बाईही नवीनच लागल्या होत्या शाळेत.. हा त्यांच्या मुलीचा मित्र- तेव्हा बहुधा अकरावीला होता.. शाळेआधी तालमी असायच्या तेव्हा बाईंची मुलगी यायची त्यांना मदत करायला- नाचाच्या स्ट्पेस वगैरेसाठी.. तेव्हा हाही यायचा तिच्याबरोबर टेपरेकॉर्डर, माईकसाठी मदत वगैरे करायला.. आधी बहुतेक फक्त मदत म्हणून, आणि नंतर इथे बर्‍याच मुली आहेत, म्हणून नंतरही येत राहिला. आधीच तो दिसायला हँडसम वगैरे, त्यातून कॉलेजकुमार आणि आमचं टीनएज!! आम्हा तमाम (बहुधा) २४ मुलींचा (बहुतांश पहिला) (सामूहिक) क्रश एकाचवेळी झाला तो!! लख्ख आठवतात ते दिवस.. शाळेला तर लवकर जायचोच आम्ही, पण वेळ मिळाला की त्याच गप्पा.. ’आज तो तिच्याकडे बघत होता’, ’आज त्याने मस्त शर्ट घातलाय ना..’, ’आज टीचरकडे त्याचं लक्षच नव्हतं’, ’जरा जास्तच भावखाऊ आहे ना..’, ’तो ’तिच्याशी’ बोलला अगं काल, नाहीतरी त्याच्या पुढे पुढे करायचीच ती!’ इथे बाईंची मुलगी आमच्या खिजगणतीतही नव्हती हा..

फोकडान्सच्या अगदी आदल्या दिवशी रंगीत तालीम होती- ड्रेपरी आणि आमचं आकर्षण म्हणजे मेकप! शिवाय ’तो’ असणार प्रॅक्टीस बघायला, म्हणून जास्तच काळजीपूर्वक रंगरंगोटी केलेली प्रत्येकीने! आणि जसा सामूहिक क्रश झाला, तसाच सामूहिक प्रेमभंगही!! तो चक्क त्या दिवशी त्याच्या अजून एक मैत्रिणीबरोबर आला!! मैत्रिण एकदम मस्त होती (हे तेव्हा मान्य करणं जडच गेलं होतं, हा भाग वेगळा!). ती आता त्याची बायकोच झालीच ह्या खात्रीने आम्हीच आमचे पत्ते कट करून टाकले!! लगेच काहीकाही मुलींनी शहाणपणा करत ’मला नाहीतरी तो जादाच वाटत होता’ वगैरे म्हणत ’आम्ही कशा शहाण्या’ वगैरे ठसवण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांनाच सगळं ठाऊक होतं!

असो! त्याला बघितल्याबरोब्बर कुठलं कुठलं कायकाय आठवलं! आता मी त्याच्याकडे पाहिलं. अगदी मुद्दाम- असं काय होतं बरं त्याच्यात? आज पाहिलं, तर काहीच नाही सापडलं.. नेहेमीसारखाच साधा माणूस होता.. जिथे मी गृहिणी झाले, तिथे तोही गृहस्थ झालाच की! (मनात त्याचं वयही काढून पाहिलं ;-)) हे जाणवल्यानंतर मात्र थोडीश्शी निराशा झाली हं.. म्हणजे जो आपला ’फर्स्ट क्रश’ होता, तो तसाच हँडसम हंक न रहाता, साधा बाईकवर फिरणारा, नोकरीबिकरी करणारा, भाजी-बिजी आणणारा, पेट्रोल भरायला येणारा सामान्य माणूसच असावा ना? हाय रे दैवा वगैरे.. :-)

त्यावरून आठवलं- थोडी मोठी असेन तेव्हा, पण असाच महा-क्रश होता ’मिलिंद सोमण’वर! हाऽऽऽऽय! वगैरे.. पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा मस्त लांब केस होते त्याचे, काय स्माईल होतं, मधूबरोबरचं अफेयर, ’तो’ फोटो- एकदम फॉर्मात होता.. स्विमिंग चॅम्प असल्याने बांधेसूद शरीर, उंची, देखणा चेहरा, किलर हास्य- आहाहा! कोणत्याही मुलीच्या ’स्वप्नातला राजकुमार’ लेबलखाली पर्रफेक्ट! आणि अगदी तितकं ’आहा’ नसलं, तरी अगदी आत्तापर्यंत मला मिलिंद सोमण आवडायचा.. ह्म्म.. म्हणजे अजूनही आवडतो, पण जरास्सा, बारीकसा भ्रमनिरास झाला ’गंध’ पाहिल्यानंतर- त्याचं मराठी ऐकल्यानंतर! लूक्सच्या बाबतीत प्रश्नच नाही.. साहेब चाळीशीत पोचूनदेखील असे फिट की अजूनही बघऽऽत रहावे! पण त्यांनी मराठी बोलू नये बाबा.. कसलं ते इन्ग्रजाळलेलं, मुद्दाम प्रयत्न करून बोललेलं मराठी? बर्‍याच जणांनी त्याचंही कौतुक केलं म्हणा, पण ’सोमण’ असून ऍक्सेन्टेड मराठी? अंहं, मला तरी पटलं नाही..

असो, ह्या दोन्ही क्रशांमुळे आज ’आपण किती येडचाप होतो’ हे परत एकदा सिद्ध झालं म्हणा, तरी मस्त फ्रेश वाटलं. त्या निमित्ताने मी कुठे कुठे फिरून आले- तो पहिला क्रश- आत्ता तो सामान्य असला, तरी एकेकाळी तो आमचा हीरो होता, हे नाकारता येणार का? पाच मिनिटात त्याने किती जुन्या गल्लीत नेऊन आणलं मला! त्या निमित्तनं शाळेतले नाच, त्यावेळचं सळसळतं वातावरण, कमेन्ट्स, नाचात जावं म्हणून बाईंची केलेली भलावण, मैत्रिणीला दिलेला पाठींबा, तिच्यासाठी बाईंची केलेली मनधरणी.., कायकाय आठवलं! आज त्यातल्या कित्येक मैत्रिणींच्या अजूनही टचमध्ये आहे, तर त्यातल्या अजून कितीतरी कुठेकुठे गेल्यात काय माहिती? टीचर भेटतात, त्यांचं वय झालेलं मात्र सहन होत नाही!

मिलिंद सोमणने तर कॉलेजमध्ये नेलं मला.. अजूनही आठवतंय- त्याचा ’तो’ बहुचर्चित फोटो- इतका घाबरत घाबरत, लाजत लाजत पाहिला होता, आणि अक्षरश: क्षणभर बघून धडधडत्या काळजाने गप्पकन ते पान बंद करून टाकलं होतं.. मधु सप्रेचं लग्न झाल्यानंतर ’आता त्याचं कसं होणार’ वाटून बरेच दिवस अस्वस्थ होते.. ’कुठे तो, कुठे आपण’ असे प्रॅक्टीकल विचारही केला नाही तेव्हा.. कम ऑन, मिलिंदचा प्रेमभंग, म्हणजे मला त्याच्याइतकं वाईट वाटणारच ना! ज्यांना तो आवडायचा नाही, त्यांच्याशी वाद घालघालून तो कसा बेस्ट आहे हे पटवण्यात अनेक तासही घालवले.. त्याकाळी त्याची आलेली प्रत्येक मुलाखत ऐकली, वाचली, बघितली होती..

हे क्रश म्हणजे तरी काय होते? मिलिंद सोमणतर अप्राप्यच, पण ’तो’ मुलगाही.. त्याचा ’तसा’ विचार कधी नव्हता केलेला.. तेवढी अक्कल, समज नव्हतीच तेव्हा.. पण अडोलसन्समध्ये पदार्पण आपण केलंय ही जाणीव त्याच्यामुळे झाली हे नक्की. हे काहीतरी वेगळं आहे, वेगळं असतं हे कळलं होतं.. कसल्या हुरहुरत्या गोड भावना त्या.. त्या परत आठवतानाही मज्जा वाटली.. वाह! काय साधे सोपे मस्त अन्कॉम्प्लिकेटेड दिवस होते ना ते.. जुन्या गोष्टींचं असंच असतं ना? कोणत्या क्षणी कोणती जुनी वस्तू, आठवण, माणूस आपल्या कोर्‍या मनासमोर येईल आणि कोणत्या गावाला आपल्याला घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही! त्यात्या क्रशच्या निमित्तानं मस्त ट्रीप टू द नॉस्टॅलजिया लेन झाली.. त्या क्रशांचं पुढे काही झालं नाही, तरी ह्या ट्रीपसाठीतरी त्यांचे आभारच!

September 30, 2009

आणि चित्रकार जन्मला!!

खोटं नाही सांगत, अगदी देवाशप्पथ! गेले काही दिवस घरात जे चित्रमय वातावरण होतं, ते पाहून नक्कीच आपल्या घरी पुढ्च्या पिढीचे ’राजा रविवर्मा’ किंवा ’रवि परांजपे’ जन्मलेत अशी आमची धारणा होत चालली आहे! आज घरातला एकही असा पाठकोरा कागद नाही, ज्यावर ’सीनसीनरी’ चितारली गेलेली नाही! आधी अशा प्रत्येक कागदाची होडी व्हायची, तेव्हा मला वाटायचं, की लेक नेव्हीत जाणार वाट्टं.. मग हरेक कागदाचं विमान व्हायला लागलं, तेव्हा वाटलं, छे! नेव्ही काय, वायूदलच! आता मात्र खात्री पटलीच आहे- चित्रकार!

हे सगळं झालं पुण्यात आणि जगभरात धिंगाणा घालणार्‍या स्वाईन फ्ल्यूमुळे!! त्याचा उद्रेक झाला, शाळेमधल्या मुलांच्या माध्यमामधून तो भराभर पसरतोय असं लक्षात आल्यानंतर शाळा साधारण दहा दिवस बंद केल्या. त्याच दरम्यान पाळणाघरही बंद झालं, सिनेमागृहही बंद, सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका, बाहेरगावी जाऊ नका असे सल्ले!! शेवटी अक्षरश: आग्र्यात अडकलेल्या संभाजीराजेंसारखी अवस्था झाली माझ्या मुलाची (आणि समस्त बालचमूचीही). बिल्डींगमध्येही मुलं खाली येईनात खेळायला.. दिवसभर करणार तरी काय? टीव्ही जो एरवी कितीही पाहिला तरी अजून हवा असतो, तो अशावेळी मुळीच नको असतो, किंवा पाहिला तरी जेमतेम तासभर. अभ्यास तर कधीच नको असतो, तरी अगदीच वेळ जाईना, म्हणून उत्साहाने तोही करून झाला थोडावेळ. आता पुढे?

इतक्यात एक ’बालमित्र’ हाती आलं, आणि टाईमपास म्हणून त्याने ते रंगवलं! कर्मधर्मसंयोगाने त्यात फारच सुरेख रंग भरले गेले.. आम्हीही उत्साहाच्या भरात त्याचं भरपूर कौतुक केलं! हीच ती वेळ आमच्या चित्रकाराच्या जन्माची!! (छ्या! नक्की वेळ पहायची राहून गेली, नाहीतर पत्रिकाच केली असती ;)) मग विचारू नका.. रद्दी उपसून सर्व ’बालमित्र’ बाहेर आले.. ’आज संध्याकाळी कोणतं, उद्या सकाळी कोणतं’ वगैरे वाटण्या करून झाल्या आणि स्वारी गुपचूप रंगवायला बसलीही!

जिथे आमच्या घरात सतत माझे लेकाला उद्देशून ’हे करू नकोस’, ’ते काय करतोयेस आता?’, ’काय उद्योग चाललेत रे?’ आणि त्याचे सतत कोणतेनाकोणतेतरी आवाज असायचे- त्याच्या उद्योगांचे किंवा मी नकारघंटा वाजवल्याने रडण्याचे तरी नक्कीच- तिथे घरात शांतता नांदू लागली. बराच वेळ घर शांत राहिलं की पक्कं समजावं- स्वारी चित्रकलेत बुडालीये! घरातली सर्व पुस्तकं, वर्तमानपत्र अशा पद्धतीने रंगली. आणि आता पुन्हा ’आता मी काय करू’च्या पाढा सुरू होणार, अगदी त्याच वेळी ’मायबोली’वर गणेशोत्सव सुरू झाला आणि त्यात चक्क लहान मुलांची चित्रकला स्पर्धा होती. चला! आमचे अजून ३-४ दिवस तरी नक्की गुंतले ह्या समाधानात मी असतानाच एकदम जाणवलं की हा मुलगा आत्तापर्यंत केवळ रंगकाम करतोय.. स्वत: चित्र काढून मग ते रंगवायचं इतकं मन अजून रमत नाहीये!

मग काय! त्याला ’तू चित्र काढ’ हे पटवून देण्यातच २ दिवस गेले! स्वत: चित्र काढणं अवघड ना! दिलेलं चित्र रंगवणं सोपं आणि लेकाला बरोब्बर तेच हवं! पण अनेक आमिषं दाखवून केलं एकदाचं तयार चित्र काढायला! पण चित्र काढायचं तरी कशाचं? गहनच प्रश्न! तेव्हा बाबांनी एन्ट्री घेतली रिंगणात! ’बघच कसं फर्स्टक्लास शिकवतो तुला’ असं म्हणाले ते, आणि मी तिथून निघालेच. बाबांचं शिकवणं म्हणजे एकदम सिस्टीमॅटीक!! पुस्तकामधून बघून चित्र काढायचं. त्यासाठी वीस पुस्तकं पाहिली, त्यातलं एकच बरं वाटलं ते निवडलं. ते निरखून, पारखून घेतलं. त्यात टेकडी, तलाव. नाव, घर, देऊळ वगैरे होतं- त्यात त्यांनी किती जागा कुठे सोडलीये वगैरे पट्टीने मोजून ते चित्र काढायचं असं त्यांनी याला बजावलं! इथे मुलाला पट्टीने सरळ रेघ ओढता येत नाही, तो अंतर कसलं मोजतोय? पण बाबा हार थोडीच जातात? त्यांनी त्याला पट्टी वाचायला शिकवली.. इतके सेंटीमीटर, तितके मिलीमीटर वगैरे.. (काय करणार? स्वाईन फ्ल्यूमुळे बाबाही घरीच होते. चार दिवस त्यांचाही वेळ जात नव्हता) लेकाने निमूटपणे सगळं ऐकलं, बाबा म्हणतात तसं चित्र काढलं, रंगवलं आणि गप्प बसला. छानच काढलं होतं, त्याच्या मानाने तर उत्तमच, अगदी योग्य अंतर, उत्तम रंगसंगती, जे जिथे पाहिजे तिथे आणि तसंच. मी त्याला विचारलं ’हेच देऊया ना स्पर्धेला?’ तर हळूच म्हणाला, ’थांब, मी अजून एक चित्र काढतो..’

दुसर्‍या दिवशी एक चित्र काढून रंगवलं आणि म्हणाला, ’आई, हेच चित्र द्यायचं स्पर्धेला..’. मी चित्रावरून नजर फिरवली.. साधंच चित्र होतं- डोंगर, तळं, झाडं, सूर्य आणि पक्षी- त्याचं तर पेटंट चित्र! पण तरीही थोडं निराळं होतं.. ह्या चित्रात प्रपोर्शन तर चुकलंच होतं, पार गंडलं होतं म्हणूया.. पण तरीही त्यातला साधेपणा आकर्षित करत होता. रंगही छान भरले होते. एक प्रकारचा शांतपणा जाणवला मला त्या चित्रात.. हे असं चित्र जे त्याच्या मनातलं होतं, त्याची स्वत:ची अभिव्यक्ती होती. बाबांना अजूनही वाटत होतं की ते पहिलंच शास्त्रशुद्ध चित्र स्पर्धेला द्यावं, शेवटी हो-नाही करता हे नवं चित्रच दिलं.

’मायबोली’वरचे लोक जितके talented, त्यांची मुलं त्यांच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे.. एकसे एक चित्र सगळी.. यापुढे आपल्या चित्राचा टीकाव लागणार नाही हे माहित असूनही, हौस म्हणून लेकाचं चित्रही दिलं.. धाकधुक होतीच.. आणि एक सुखद धक्का बसला.. ते चित्र खूप जणांनी उचलून धरलं.. खूप लोकांनी ह्या छोट्या चित्रकाराचं मनापासून कौतुक केलं.. कोणी त्या चित्राची खिल्ली नाही उडवली, उलट त्याला शाबासकी दिली.. लेक तर हरखलाच, पण आमचे डोळे मात्र पाणावले.. साधेपणा, सच्चाई, निरागसता हे कोणत्याही माध्यमात उठून दिसतात हेच खरं!!



इतकं प्रोत्साहन बघता आता लेकाला चित्रकलेच्या शिकवणीला घातलं आहे.. बघूया पुढे काय होतं ते.. माझ्या दृष्टीने सध्या तो किमान काही वेळ एका जागी कोणतेही लांडे उद्योग न करता बसतो हे सुद्धा खूप दिलाश्याचं आहे.. त्यासाठीतरी त्याला चित्रकलेची गोडी लागावी अशी प्रार्थना मी देवाकडे करते!

August 5, 2009

फ्रेन्डशिप डे!

नुकताच फ्रेन्डशिप डे मोठ्या धामधुमीत सगळीकडे साजरा झाला. ’मैत्री दिवस’- काय मस्त संकल्पना आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींना ’आपली मैत्री अशीच अखंड राहो’ असं म्हणणं माझ्या दृष्टीने खूपच गोड कल्पना. आता ते फॅड आहे, की अजून काही, हा प्रत्येकाचा प्रश्न. पण ज्यांना मित्र लाभत नाहीत, काही ना काही कारणाने दीर्घ मैत्रीत खंड पडतो, अशा लोकांना विचारा मैत्रीदिनाचे महत्त्व.. मित्र-मैत्रिणींशिवाय जीवन अपूर्ण. कितीही नातेवाईक असले, गोतावळा असला, तरी या कम्पूची जागा तितकीच स्पेशल. आज माझे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. कालापरत्वे नवे नवे होतही आहेत, पण मैत्री दिवसाच्या दिवशी मला तीव्रपणे आठवतात ते माझे दुरावलेले मैत्र.

असं म्हणतात की योग्य तो शेजारी आणि उत्तम असा मित्र ज्यांना मिळतो ते लोक भाग्यवान. मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत मी थोडी सुदैवी आणि दुर्दैवीही. सुदैवी अशासाठी, की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला अनेक मित्र-मैत्रिणी भेटले, त्यांच्या सहवासात ते ते दिवस अगदी मजेत गेले.. पण दुर्दैवी अशासाठी, की अशी माझी एकही मैत्रीण नाही, एकही मित्र नाही जो मला खरोखर एक व्यक्ती म्हणून ओळखतो. a friend is supposed to know you inside out and still love you as a friend . पण माझ्या मित्र-मैत्रिणी होत गेल्या, तश्याच दुरावतही गेल्या.. भांडणामुळे नाही, तर कालौघातच.. कोणाशीच ती नाळ इतकी घट्ट बांधली नाही गेली दुर्दैवाने, जी काळाच्या कसोटीवर परखली गेली.. शाळा संपली, त्या बरोबरीने तेव्हाच्या मैत्रिणीही. कॉलेज संपलं आणि करीयरच्या मार्गी लागता, तोही ग्रूप सुटला.. नोकरीमध्ये सगळीच नाती तेवढ्यापुरती. तिथे निरपेक्ष मैत्रीची काय अपेक्षा ठेवणार? बिल्डींगमध्ये, कचेरीत, मुलाच्या शाळेनिमित्त झालेल्या ओळखीत, आंतरजालावरच्या ओळखी- रोज अनेक लोकांशी बोलणं होत, प्रसंगी हास्यविनोदही.. पण ह्या सगळ्यांशी माझी खरंच मैत्री आहे का, की काही काळापुरती झालेली ओळख? यातल्या जवळजवळ सगळ्यांशीच माझे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत, तरी यातली कोणती ’मैत्री’ टिकेल- खरंच माहीत नाही.

कॉलेजजीवनात जेव्हा आपण आपल्या मित्र-मैत्रिणिंबद्दल सर्वात जास्त हळवे, पझेसिव्ह असतो, त्याच वेळी माझ्या बेस्ट फ्रेन्डने तिच्या तेव्हा नवीनच झालेल्या मित्रावरून वाद घातला होता.. अजून एक मैत्रीण जिच्यासोबत मी अक्षरश: ’इनसेपरेबल’ होते, ती बघता बघता कोणत्याच ठोस कारणाशिवाय दुरावली ती दुरावलीच. त्यानंतर आम्ही आमची मैत्री पुन्हा जोडण्याचे अगदी जाणूनबुजून प्रयत्न केले, पण एकडा तडा गेला तो गेलाच. ह्य दोन्ही अनुभवांनंतर माझ्या जीवश्चकंठश्च मैत्रीच्या संकल्पनेवरचा विश्वासच उडाला. निरपेक्ष मैत्री, घट्ट मैत्री, बेस्ट फ्रेन्ड्ज वगैरे माझे तरी कोणी होऊ शकत नाही, ही खूणगाठ मी मनाशी बांधली.. आणि पुढच्या आयुष्यात वेळोवेळी ती गाठ पक्कीही झाली.. एखादीशी जरा सूर जुळताहेत असं वाटलं, की काही ना काही होणारच हे ठरलेलंच. बरं, ह्या दुराव्यामागे माझे भलतेच हट्ट, अपेक्षा आहेत, तिचं विचित्र वागणं आहे, असंही नाही! मग ती मैत्रीही तितकीच तकलादू होती का? तर, तसंही नाही. त्या वेळात आम्ही त्या मैत्रीच्या नात्यामध्ये पूर्ण गुरफटलो होतो. आणि तरीही, दुरावा आला हेही तितकंच खरं. तरी पण स्वभाव! निखळ मैत्रीची भुरळ कोणाला नाही पडत? नकळतपणे नवीन नवीन गुंत्यात अडकायला, आणि न चुकता त्यात ठेचकाळायला अजूनही नेमाने होतंच. आता वयाच्या ह्या टप्प्यावर इतके अनुभव आल्यानंतर त्याच ओढीने मैत्री होणंही मुश्किल.. अनुभवाने एक अलिप्तता आलेली आहे, पण एक सल ठेवूनच.

अजून एक अपेश आहे, ते कधी होऊच न शकलेल्या मैत्रांचं.. आपल्या सभोती अनेक लोक असतात, त्यांचा सहवास, मैत्री ही आपल्याला हवीहवीशी असते.. आपल्या नकळतच आपण त्यांच्याशी मैत्री करायची इच्छा बाळगून असतो.. पण कोणासमोर आपण मैत्रीचा हात पुढे केल्यावर त्याला तितका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असेही नाही. ती नातं तसंच अर्धवट राहतं- ना धड मैत्रीचं, ना परकंही.. ओळख-अनोळखच्या सीमेवर. नकळतच विचार केला जातो, की आपली मैत्री असती, तर आपलंच आयुष्य किती समृद्ध झालं असतं.. पण म्हणतात ना, मैत्री ’केली’ जात नाही, ती ’होते’ आपोआपच.

कथा-कादंबर्‍यांमध्ये, सिनेमात, आसपास बालमैत्रिणी, बालमित्र, फॅमिली फ्रेन्ड्ज वगैरे पाहिले, की मला फार छान वाटतं.. त्या लोकांच्या नशीबाचा मला हेवा वाटतो. त्यांचा स्वत:चा असा हक्काचा ग्रूप असतो जो फक्त मौजमजेसाठी नाही, तर अडी-अडचणीलादेखील हक्काने त्यांच्या मागे उभा असतो.. कित्येक असे प्रश्न असतात जे आपले आई-वडील, नातेवाईक समजून घेऊ शकतीलच असं नाही, त्यासाठी मित्रच हवेत.. ते त्यांना लाभलेले असतात.. त्यांची मैत्री चिरकाल टीको, ही माझी मनापासूनची सदिच्छा.. अजून कोणतातरी असाच एखादा दिवस मला कदाचित फॅड वाटेलदेखील, पण मनातला हळवा कोपरा ज्या मैत्रीसाठी आसूसलेलाच राहिला, त्यासाठी ’मैत्री दिवस’ माझ्यासाठी तरी फॅड नाही! Cheers to the spirit of friendship!

July 7, 2009

वाडा!

पल्या पिढीपैकी बर्‍याच जणांचं बालपण वाड्यात किंवा चाळीत गेलं असेल. माझंही लहानपण आमच्या वाड्यात सुखाने गेलं..’आमचा वाडा’ म्हणत्ये मी.. म्हणजे कोणाला वाटेल की आमच्या मालकीचाच होता की काय! नाही, नाही आम्ही साधे भाडेकरू होतो, वाड्यातल्या इतर सहा भाडेकरूप्रमाणेच. मूळ बिर्‍हाड माझ्या आजी-आजोबांचं, पार १९५१ पासून. माझ्या वडीलांचं आणि आत्याचं शिक्षण, लग्न, त्यांच्या मुलांची बारशी सगळं इथेच. मग नोकरीनिमित्त आई-वडीलांनी पुण्याबाहेर काही वर्षं काढली आणि मी चार वर्षाची असताना पुन्हा आलो आम्ही ’आमच्या’ खराडे वाड्यात.

वाडा होता चांगलाच ऐसपैस, पण घरं लहान, तीन खोल्यांची. अंगणच भलं मोठं.. दोन भागात विखुरलेलं- मध्ये आणि आजूबाजूने घरं. घरांना भिंती कमी आणि खिडक्यांना जास्त- त्याजी गजाच्या.. त्यामुळे नुसती मान उंच केली, की शेजारघरी काय चालू आहे ते दिसायचं.. वाड्याला एन्ट्रीला भलामोठा दिंडी दरवाजा.. त्यामुळे तो लावला की ’व्होल वावर इज आवर्स’!! सर्वांचा मुक्काम घराबाहेरील अंगणातच. उन्हाळ्यात तर गाद्या घालून रात्रीही अंगणात!! या अंगणाने हरेक कुटुंबातील लग्न, मुंजी, बारशी पाहिली.. फक्त बिर्‍हाडकरूंची नाहीत, तर त्यांच्या नातेवाईकांचीदेखील!!

वाड्यात भरपूर मुलं होती.. आणि कोणाचं आजोळ म्हणून, कोणाचं बहिणीचं घर म्हणून अशी येणारी पाहुणी मुलंही सतत असायची.. त्यामुळे खेळगड्यांची कमी कधीच जाणवली नाही. त्यातून उपटणारे रुसवे-फुगवे, राग, मत्सर, भांडणंही अगदी सर्रास! त्यामुळे माझ्याच वयाच्या मृणालपेक्षा मला जास्त मार्क पडले, की मृणाल गीताला ’पूनम वाईट आहे, तिच्याशी बोलू नकोस’ अशी चिठ्ठी पाठवायची आणि त्याचंच प्रायश्चित्त म्हणून की काय, पण मृणालची आई मला त्यांच्या गावच्या जत्रेतून माळही आणायची! अंगण खूपच मोठं असल्याने मैदानी खेळ तर आम्ही चिकारच खेळलो.. लंगडी, डॉजबॉल, लपाछपी, डबडा ऐसपैस मध्ये तर तासनतास जायचे. तसंच दुपारच्या वेळात व्यापार, पट, सागगगोटे, अगदी स्टार ट्रेकही.. शेजारणींच्या पदार्थांची देवाणघेवाण, सगळ्यांनी मिळून केलेले सांडगे-पापड, एकमेकांच्या मुलांचे लाड.. अगदी साधं-सरळ, अकृत्रिम जिव्हाळ्याचं वातावरण होतं ते..

वाड्याचे मूळ मालक श्री. खराडे यांचं वाड्यावर अतिशय प्रेम. भाडेकरूंनाही त्यांनी आपुलकीने वागवलं. रहायचं भाडं फक्त द्यावं लागायचं, बाकी सगळं श्री. खराडेच पहायचे.. अर दोन वर्षांनी सर्व घरांना रंग, किरकोळ दुरुस्ती काही असेल- भिंतीला क्रॅक गेलेत, फरशी उखडली आहे- सगळं मालक स्वखर्चाने करत! त्यांना नुसतं सांगायचं. बरं, त्यांना त्रास नको, म्हणून आपण हे स्वत: केलं, तर ते त्यांना अजिबात आवडायचं/ चालायचं नाही! दर ठराविक काळाने नारळ उतरवायला माणूस, बागेची देखभाल करायला माळी, सार्वजनिक मोरी साफ करायला भंगी, वाडा झाडायला झाडूवाली बाई- सगळे त्यांनी नेमले होते. त्यामुळे सर्व भाडेकरू सुखात होते. आधी तर चक्क मातीचं अंगण होतं, पण १९६१च्या पूरानंतर फरशी घातली.. पूराच्यावेळी परिस्थिती गंभीर होती.. बारा फूट पाणी होतं वाड्यात.. वर्षाचं धान्य, चुलीचं लाकूड- भाडेकरूंचं फार नुकसान झालं! पण मालकांनी आपल्या वरच्या मजल्यावरच्या घरात सगळ्यांना ठेवून घेतलं, धीर दिला.

या वाड्यात आम्ही रहायला आलो, तोपर्यंत मूळ खराडे आजोबा गेले होते, आणि त्यांचा मुलगा सर्व कारभार पहात होता.. खरं तर पहात नव्हता, असंच म्हणावं लागेल.. सध्याचे खराडे काका कायमचे मुंबईला स्थाईक झाले होते आणि अगदी क्वचित वाड्यावर येत. जुन्या माणसांबरोबरच जुने दिवस, आपुलकीही संपली होती. आता देखभाल-दुरुस्ती ही भाडेकरूंनाच करायला लागत होती. मालक महिन्यातून एकदा भाडं घ्यायला यायचे.. नंतर तर तेही यायचे बंद झाले, त्यांचा माणूस यायचा फक्त. जुन्या काळाचे मजबूत बांधकाम होते, म्हणूनच वाडा तग घरून होता. किरकोळ दुरुस्तीव्यतिरिक्त काही करायला लागत नव्हते, पण हळूहळू एक उदास कळा यायला लागली होती वाड्याला..

एका पावसाळ्यात एक दुर्घटना घडली. आमच्या वाड्याला लागून तांबोळकर वाडा होता. त्याचं ओनरशिपचं काम सुरू झालं होतं. त्यामुळे पाडापाडी चालू होती. त्यांची आणि आमच्या राहत्या घराची एक भिंत चिकटलेल्या. त्यांनी तिकडची भिंत पाडली आणि आमच्या भिंतीला टेकूच नाही दिला!! झालं! त्याच रात्री मी आणि आजी झोपायचो त्या खोलीतलं छात चक्क खाली आलं! पहाटे ३चा सुमार. प्रचंड आवाज करत छत खचलं! छतावर तुळया होता.. वीटा, माती, तुळया- सगळं आमच्या अंगावरच चक्क धाडधाड आवाज करत येत होतं!! काळोखी अपरात्र, त्यात काही कळायच्या आतच हे असं काहीतरी! भान येईपर्यंत आम्हा दोघींच्या नाका-तोंडात माती, आजीच्या डोक्याला आणि माझ्या नाकावर वीटा पडलेल्या.. एकच बरं झालं त्यात की खोलीतल्या गोदरेजच्या कपाटावर एक तुळई पडल्यामुळे माझ्या आजीचा कपाळमोक्ष वाचला, नाहीतर तिचा काळ आला होता! पुढे ते सगळं निस्तरलं, त्या बिल्डरने सगळं पुन्हा बांधून दिलं, पण हा प्रसंग अजूनही आठवला की शहारा येतो अंगावर.

या प्रसंगानंतर आमचं घर मजेशीर दिसायला लागलं- एक खोली नवीन, प्लास्टर केलेली चकाचक, आणि दोन तश्याच जुन्या- मातीचा गिलावा असलेल्या.. शिवाय शेजारीच ओनरशिप झालं, आता आपलं कधी होणार? असे वेध लागायला लागले -एकाएकी हे घर जुनं, अपुरं वाटायला लागलं. एव्हाना कॉलेजमध्ये पाऊल पडलं होतं, शिंगं फुटली होती. कॉलेजम्ध्ये मित्र झाले होते, शाळेत नव्हत्या अश्या टोटली नवीन मैत्रिणीही झाल्या होत्या- या सगळ्यांना ’घर जुनं’ म्हणून घरी बोलवायला संकोच वाटायला लागला.. वाडासंस्कृतीनुसार प्रातर्विधी करण्यासाठी घराबाहेर काही अंतर जावं लागायचं- यामुळे मैत्रिणीला घरी रहायला बोलावता येत नाही, म्हणून आईकडे कटकट व्हायला लागली होती.. ’नवीन घर असतं ओनरशिपचं तर काय मज्जा असती, पण आपलं वाड्यातलं जुनं-पुराणं घर’ ही जणीव सतत मनात घर करून रहायला लागली..

आणि ते वारं ओळखूनच की काय, पण मुंबईहून ’आपल्या वाड्याचंही ओनरशिप होणार’ अशी बातमी आली!! पुरुष माणसांनी सावधपणे आणि मुलांनी आनंदात या बातमीचं स्वागत केलं.. कोणाला किती जागा मिळणार, कोण किती खोल्यांचा ब्लोक घेणार- चर्चा रंगू लागल्या.. मुलं तर आपल्या खोलीची सजावटही करू लागली मनातल्यामनात.. आणि एक दिवस फुगा फुटला! ज्या बिल्डरला ते काम देणार होतो, तोच बँकरप्ट झाला! सगळं पुन्हा थंडावलं.. असे दोन बिल्डर झाले- आले नी गेले- काही ना काही कारणाने त्यांना आमच्या वाड्याचं काम हाती घेता आलं नाही.. वाड्यातली जुनी-जाणती ’थोरल्या खराडेंची’ पुण्याई म्हणून या गोष्टीकडे पहात होते.. नवीन, आधुनिक घराचं सगळ्यांनाच आकर्षण जरी असलं, तरी तो वाडा पडणार, संबंध पूर्वीसारखे रहाणार नाहीत याची चमत्कारिक जाणीव उगाचच सगळ्यांना व्हायला लागली होती..

एक दिवस अजून एका बिल्डरची बातमी आली. त्याने आल्या आल्या वाड्यात एक मोठी पूजा केली- थोरल्या खराडे आजोबांच्या आशीर्वादासाठी म्हणे! आणि त्यामुळेच की काय, पण पटापट सगळी सूत्र फिरली. प्लॅन संमत झाले, ज्या लोकांना जागा नको होत्या, त्यांना त्यांच्या मनासारखा मोबदला मिळाला. आमच्यासारखे भाडेकरू जे परत त्या जागी येणार होते त्यांना पर्यायी जागा मिळाली.. हळूहळू एक एक जण वाडा सोडून जाऊ लागला आणि वाड्यामधली शांतता एकदम अंगावर यायला लागली.. वाडा खरोखर उदास भासू लागला.. एकेमेकांचे जड अंत:करणाने, पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घेतले गेले.. आणि अश्याच एका दिवशी आम्हीही बस्तान हलवलं!

नवीन घरात थोडं स्थिर झालो, आणि त्याच वेळी ’टायटॅनिक’ हा चित्रपट ’अलका’ला लागला. तूफान चालत होता सिनेमा.. मी आणि माझे वडील पहायला गेलो, ऍडव्हान्स बूकिंग केलं.. खेळ सुरू व्हायला बराच अवकाश होता.. मला राहवेना.. बाबांच्या मागे लागलागून आम्ही वाड्यापाशी आलो!

भकास! एकच शब्द सुचतो मला.. दिंडी दरवाजा अजून तग धरून होता.. इकडे तिकडे बघतच आत शिरलो.. आणि ते दृष्य अगदी अंगावर आलं.. आमचं घर जमीनदोस्त झालं होतं.. नारळाच्या झाडापाशी खोल खणलं होतं किमान दहा फूट तरी.. त्याची मूळं इतकी प्रचंड विस्तारली होती खाली.. जणू अजून एक वृक्षच जमिनीखाली तयार झालाय.. मध्यभागातली दोन मजली घरं होती, ती उतरवत होते.. लाकूड मजबूत आणि चांगलं होतं- तुळया सगळ्या एका जागी मोळी बांधल्यासारख्या एकत्र ठेवलेल्या.. खिडक्या उतरवलेल्या, त्यांचे गज वेगळे केलेले.. एकेकाळची नांदती घरं आता लाकूड, वीटा, लोखंड आणि इतर कचरा- अशी विभागली गेली होती.. करकरीत संध्याकाळची वेळ आणि वाड्याचं हे रूप- मला भयानक भिती वाटली, खूप रडू आलं, मी बाबांचा चटकन हात धरला.. ’आईगं! किती वाईट दिसतोय वाडा!’ खिन्न असून ते म्हणाले, ’पाडायला सांगितला आपणच, हे अटळ आहे.. इथे नवीन इमारत उभी राहिली, की सगळं विसरशील’.

पण मी नाही विसरले, अजूनही. त्यानंतर आम्ही दोन वर्षांनी त्याच जागेवर बांधलेल्या नवीन, कोर्‍या, सेल्फ-कन्टेन्ड ब्लॉक मध्ये रहायला आलो, त्यानंतर मी मुंबईला राहिले एक वर्ष, लग्नानंतर तर चक्क बंगल्यात आले.. या घरांत रमले नाही, ती आवडली नाहीत असं काही नाही, उलट सोय, हवेशीरपणा, मोकळीक सगळंच होतं, पण मनात अजूनही आहे तो वाडाच.. एरवी दिसत नाही तो, पण स्वप्नात जेव्हा जेव्हा घर येतं, तेव्हा मी चक्क वाड्यातल्या त्या आमच्या जुन्या छोट्या घरात असते, नेहेमीच. आताची माणसं, जी तेव्हा माझ्या आयुष्यात नव्हती, तीही तिथेच निवांत विसावलेली दिसतात अंगणात.. तेव्हाच्या घटना, नवीन-जुन्या आठवणी, काही झालेले, न झालेले प्रसंग, सगळ्यांना एक रूप येतं स्वप्नात- वाड्याच्या पार्श्वभूमीवर.. तेव्हाचे खेळगडी, त्यामानाने तरूण आजी, आई-बाबा आणि आताचे लोक सगळे त्या वाड्याने आपल्यात सामावून घेतलेले दिसतात मला.. तेव्हा छोटी, अडचणीची वाटणारी जागा आता इतकी माणसं असूनदेखील ऊबदार, मायाळू असते..

माझं घर तर वाड्यात होतंच, पण आमचा वाडाही मनात ’घर’ करून बसलाय माझ्या, कायमचाच!!

June 2, 2009

अक्षरवार्ता

मायबोली मराठी भाषेवर समस्त मराठी लोकांचे अतिशय प्रेम. कितीही वाद त्यामध्ये आले, ओरड झाली, की 'मराठीला घरघर लागली', तरी सध्याचे मराठी पुस्तकांच्या विक्रीचे आणि लोकप्रियतेचे आकडे बघता, मायबोलीच्या जीवात जीव नक्कीच आला असेल. भाषेचा विस्तार जितका बोलण्यामधून होतो, तितकीच भाषेची समृद्धी ही त्या भाषेच्या साहित्याच्या प्रसारामधून होते. आपल्या मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्यकृतींची परंपरा फार जुनी. एकाहून एक सरस लेखक आणि कवी आपल्याला मिळाले आणि त्यांनी पुस्तकांच्या माध्यमामधून मराठी माणसाची वाचनाची भूक शमवली, तृप्त केली.

मध्यंतरीच्या काळात 'सकस, दर्जेदार असं काही हल्ली वाचायलाच मिळत नाही' अशी तक्रार वारंवार ऐकू येत असे.'ई-बूक' ही संकल्पनाही रूढ होऊ पहात होती. पण कालांतराने 'हातात पुस्तक घेऊन, कोर्‍या पानाचा वास अनुभवत पुस्तक वाचण्यात' जी मजा आहे, ती ई-बूकमध्ये नाही, हे पुस्तकप्रेमींना उमजले. मराठी पुस्तक हातात घेऊन वाचणे हेही 'ओल्ड-फॅशन्ड' राहिले नाही.

आता हळूहळू दिवस बदलत आहेत. एखादं पुस्तक एखाद्याने वाचलं नसेल तर 'अजूऽऽऽन हे पुस्तक वाचलं नाहीस???' असे विचारून त्याच्या हातात ते पुस्तक द्यायचे दिवस आहेत हे. अनेक विषयांवरची, अनेक जुन्या-नव्या, प्रस्थापित-नवोदित लेखकांची पुस्तकं पुन्हा बाजारात येत आहेत, आणि तूफान खपतही आहेत! पुस्तक प्रदर्शनांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहेत!! मराठी लेखकांना, प्रकाशकांना याहून दिलाश्याची आणि आनंदाची बाब कोणती असेल? जुनी, जुन्या काळची पुस्तकं अजूनही जोमाने पंचविसावी, तिसावी आवृत्तीरूपात खपतात, तर प्रसंगोचित एखाद्या कवीचे, लेखकाचे पुस्तक पुन्हा नवीन स्वरूपात उपलब्ध आहे, म्हणून उत्सुकतेने घेतले जाते. नवीन वाचकवर्ग तयार होत असतो, जोही या पुस्तकांचा गुणग्राहक असतो. एकंदर, मराठी पुस्तकांना सतत मागणी आहे.

एखादा माणूस जर खरा पुस्तकप्रेमी असेल, तर त्याची ही वाचनभूक दिवसागणिक वाढतच जाते. मग होतं काय, की कधीतरी एक 'वाचन ब्लॉक' येतो. खूप पुस्तकं वाचली, तरी 'जबरदस्त', 'झपाटून टाकणारे', 'स्फूर्तीदायक' असे पुस्तक अनेक दिवसात वाचलेलं नसतं. कोणतं पुस्तक वाचलं, की 'ती स्फूर्ती' मिळेल, 'तो मूड' येईल हे कोणताच वाचक सांगू शकणार नाही म्हणा, कारण एकेक पुस्तक वाचायचे देखील 'दिवस' असतात. एकेकाळी ज्या पुस्तकाची पारायणं केली, ते आता हातातही धरवत नाही, तर एखादं पुस्तक आपण या आधी का नाही वाचलं ही चुटपुट कायम लागून रहाते. अनेक वेळेला हे समजत नाही की 'आता यानंतर कोणतं पुस्तक वाचावं?' पुष्कळदा मित्र, नातेवाईक यांनी सुचवलेली पुस्तकं आपल्या 'टाईपची' नसतात. एखादं पुस्तक अगदी उत्सुकतेने हातात घ्यावं आणि घोर अपेक्षाभंग व्हावा, हे तर आपण सगळ्यांनी किमान एकदा तरी अनुभवलं असेलच.

अशा वेळी, कोणी एखाद्या पुस्तकाचा 'स्नीक प्रीव्ह्यू' आपल्याला दिला, त्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी त्यात थोडं डोकावू दिलं, तर काय मजा येईल ना? असाच एक उपक्रम सध्या 'मायबोली' या मराठी संकेतस्थळावर सध्या चालू आहे- 'अक्षरवार्ता!'. डॉ. चिन्मय दामले हे हा उपक्रम चालवत आहेत. 'समकालीन', 'ग्रंथाली' 'राजहंस' इत्यादी या आघाडीच्या प्रकाशन संस्थांच्या नवीन पुस्तकांविषयी ते या उपक्रमाअंतर्गत माहिती करून देतात. थोडंसं पुस्तकाविषयी प्रास्ताविक, आणि चक्क पुस्तकामधली काही पानंही ते आपल्याला वाचायला देतात. यातलं पुस्तकांचं वैविध्य वाखाणण्याजोगं आहे.. अगदी आत्ताच आलेल्या डॉ. प्रकाश आमटेंचं 'प्रकाशवाटा', कै. विजय तेंडुलकर यांच्या जयंतीला प्रकाशित झालेलं, ''तें' दिवस', , गानसरस्वती किशोरी आमोणकरांचा सांगितिक प्रवास- 'स्वरार्थरमणी रागरससिद्धांत', 'अमूल'कर्ते श्री. वर्गीस कुरियन यांचं 'स्वप्नं' अशी नामांकित व्यक्तिमत्त्वांच्या पुस्तकांची ओळख आपल्याला या उपक्रमात झालेली आहे, आणि यापुढेही होत राहील. विशेष म्हणजे, ही सर्व पुस्तकं मायबोलीच्या 'खरेदी विभागातही' उपलब्ध आहेत.

जगभर पसरलेल्या मराठी वाचकापर्यंत नवीन आणि उत्तम पुस्तकं पोचावीत, यासाठी डॉ. चिन्मय मनापासून प्रयत्न करत आहेत, याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार. या उपक्रमाचे यश आपल्याही हाती आहे. ही पुस्तकं पाहून, आपल्याला वाचावीशी वाटली, तर अवश्य ती विकत घेऊया, आणि एक उत्तम वाचनीय अनुभव आपल्या शिदोरीत जमा करूया.

May 14, 2009

लिमिटेड ममता!

पाळणाघर म्हणा, अथवा डेकेअर अथवा कोणतंही नाव द्या- आपण कामाला जाताना मुलाला अन्य कोणाकडे सोपवणं हे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही आईसाठी एक अवघड काम! त्या पाळणाघराची बाई आपल्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष देईल ना, त्याला नीट खायला-प्यायला देईल ना, त्याला झोपवेल ना, त्याला बरं नसलं तर औषध-पाणी करेल ना? हजार प्रश्न! माझ्यावरही माझ्या आठ महिन्यांच्या मुलाला पाळणाघरात ठेवायची वेळ आली, तेव्हा माझीही अवस्था फार बिकट झाली होती. एक तर आम्ही राहतो, त्या भागात हे एकच पाळणाघर. त्यामुळे इथे आपलं, किंवा आपल्या मुलाचं पटलं नाही तर??? हा यक्षप्रश्न! बिचकत बिचकतच मी त्या पाळणाघरात चौकशी करण्यासाठी गेले.

’पाळणाघर’ म्हटल्यावर आपल्या घरी आलेल्या बायकांची मनस्थिती कशी असते, हे ’काकूंना’ माहिती असणारच ना! थोडंसं हसून स्वागत केलं तर आलेल्या बाईला धीरच येईल, हे काय वेगळं सांगायला हवं? पण बाईंचा चेहरा कोरा! "मी गेली वीस वर्ष पाळणाघर चालवत आहे. सगळीच मुलं थोडा त्रास देतात, नंतर रुळतात. ठेवा तुम्ही मुलाला. त्याचं खाणंपिणं, कपडे, सगळं पाठवा सोबत. दोन दिवस रडेल, मग राहील. अगदीच आक्रस्ताळा असेल, तर सांगेन तुम्हाला. पण जरा रडला, तर मऊ पडू नका.." बाई रोखठोक!

मला तसाही पर्याय नव्हताच. निमूटपणे सर्व सूचना मनात साठवून घेत लेक दुसर्‍या दिवसापासून काकूंकडे जायला लागला. या बाबतीत तो अगदीच गुणी. त्याला माणसांची आवडच. त्यामुळे जरी लहान असला, तरी त्याला तिथे सरावायला काहीच वेळ लागला नाही- या गोष्टीचं मला, आमच्या घरातल्यांना इतकं कौतुक! पण काकू निर्विकार! "रहातात हो मुलं, सांगितलं होतं मी तुम्हाला.." इतकंच म्हणून त्यांनी विषयावर पडदा पाडला. यथावकाश, लेक मोठा व्हायला लागला, शीशूशाळा, प्लेग्रूप इत्यादींबरोबर पाळणाघर अर्थातच चालू होतं. त्याला कळायला लागलं, तसं तिकडचं एकएक सांगू लागला.. तिथल्या मुलांबद्दल, त्यांचे खेळ, भांडाभांडी, खाऊबद्दल वगैरे. काकूंकडे मुलं चिकारच होती. त्यातली काही अगदी तान्ही होती- अगदी तीन महिन्यापासूनची. त्यातल काही मुलं कधीमधी काकूंच्या कडेवर, मांडीवर दिसत. एरवी त्या मुलांपासून लांबच असायच्या.. मुलांना बघायला दोन ’ताया’ होत्या. त्याच मुलांचं बघायच्या, काकू सूपरव्हिजन करायच्या. फार क्वचित कोणत्याही मुलाचं कौतुक केलं असेल त्यांनी. माझा लेक त्या पंगतीत असावा असं मला वाटायचं, कारण तो खरंच काहीच त्रास देत नसे. पण, तो इतका भाग्यवान नव्हता, हेच खरं!

काकूंनी पाळणाघर चालू केलं, त्या अर्थी त्यांना मुलांची थोडी तरी आवड असेल असा माझा तरी समज होता. मुलांना सांभाळणं, त्यांचं सगळं व्यवस्थित करणं हे निव्वळ व्यावसायिक होऊ शकत नाही. या ’व्यवसायात’ human touch असावाच लागतो- अशी माझी मतं काकूंचं वागणं बघता चुटकीसरशी बदलली. एकूण मुलगा तिथे रहात होता. प्रेम, ममता जरी तिथे नव्हती, तरी दुर्लक्षही नव्हतं. मुलांवर लक्षं असायचं त्यांचं, पण त्यांनी कधी ते फारसं अंगाला लावूनही घेतलं नाही, एक प्रकारचा कोरडेपणा म्हणा, की अलिप्तपणाच अनुभवला त्यांच्या वागण्यातून. मुलांमध्ये बसावं, त्यांना गोष्टी सांगाव्यात, त्यांना खेळ वगैरे शिकवावे, किंवा नुसतं त्यांच्या विश्वात रममाण तरी व्हावं वगैरे त्यांना पटण्यासारखं नव्हतं. मुलं नुसतीच त्यांचे आई-वडील येईस्तोवर पाळणाघरात असायची- ना आनंदी, ना दु:खी, नुसतीच वाट पहाणारी. पाळणाघर बदलावं असा विचार अनेक वेळा मनात आला. पण सर्वांना सोयीचं पडेल असं पाळणाघर जवळ नव्हतं आणि लांबून का होईना, पण मुलावर लक्ष रहातंय म्हणून तो तिथेच जात राहिला.

आणि एक दिवस सोडायला गेल्यावर काकूंच्या काकांनी सांगितलं, की काकूंची तब्येत बरी नाहीये, त्यांचं पोटाचं ऑपरेशन करावं लागणार आहे, तर उद्यापासून पाळणाघर बंद राहील! त्यांच्या तब्येतीची चिंता वाटलीच, पण व्यक्तीगत स्वार्थापायी ’मुलाचं काय करायचं?’ ही मोठी चिंता मानेवर बसली. दुसरं घरापासून बरंच लांब असलेलं पाळणाघराबद्दल ऐकून होते. ’लांब’ म्हणून त्याचा विचार कधी केला नव्हता. पण आता इलाज नव्हता, म्हणून जाऊन आले तिकडे. मुद्दाम लेकाला सोबत घेऊन गेले होते. त्याला ती जागा आवडली, कारण तिथे sand pit, doll's house होतं, आणि मला ते चालवणार्‍या मावशी आवडल्या कारण त्या छान बोलल्या. दुसर्‍या दिवसापासून मुलाचं ते रूटीन सुरू झालं! तो तिथेही लगेचच रुळला. उन्हाळी सुट्टी असल्याने खूप मुलंही होती, दोन ओळखीचीही निघाली, त्यामुळे गडी खुशही झाला!

काही दिवसांनंतर असं वाटलं की काकूंच्या तब्येतीची चौकशी करावी. त्यांचं ऑपरेशन होऊन साधारण एक महिना झाला होता. थोडी तब्येत सुधारली असेल, हिंडत्या-फिरत्या झाल्या असतील या अंदाजाने मी आणि लेक गेलो विचारपूस करायला एका संध्याकाळी. दार काकूंनीच उघडलं. दार उघडल्याबरोब्बर पुन्हा चेहरा गूढ! मी मुलाच्या निमित्ताने आज पाच वर्ष जातेय त्यांच्याकडे.. पण आजवर मला त्यांच्या चेहर्‍याकडे बघून, त्यांना मुलं आणि त्यांच्या आया आलेल्या आवडतात/ चालतात की नाही याचा पत्ता लागलेला नाही!!

मी गेल्यागेल्याच तब्येतीची चौकशी केल्यानंतर त्यांना थोडं हायसं वाटलं! मग स्वत:बद्दल बोलू लागल्या.. ऑपरेशन, नंतरची काळजी, औषधं, पथ्य सगळंच.. मग म्हणाल्या, ’आता पाळणाघर बंदच ठेवणार आहे. मुलांना बघायचं म्हणजे फार त्रास होतो.. फार लक्ष द्याव लागतं. आता मुलं (त्यांना दोन मुलगे) म्हणत आहेत, इतकी वर्ष दुसर्‍यांच्या मुलांना पाहिलंस, आता जरा स्वत:च्या मुलांकडे बघ!’ ही हिन्ट मी घेतली आणि ’तब्येतीची काळजी घ्या’ असं सांगून त्यांचा निरोप घेतला!

बाहेर पडले तेव्हा माझं डोकं गरगरत होतं. चहापाण्याची मी त्यांच्याकडून अपेक्षा करतच नव्हते, पण जी काही दहा मिनिटं आम्ही त्यांच्याकडे होतो तेव्हा त्यांनी साधी चौकशी, की ’अचानक पाळणाघर बंद करावं लागलं, तुमच्या मुलाची काय सोय केली आहेत आता तुम्ही?’ केली नाही! माझा मुलगा निदान मोठा तरी आहे, पण जी वर्षा-दोन वर्षांची मुलं होती, त्यांना दुसर्‍या जागी रुळायला किती वेळ लागला असेल? त्यांची कसलीच जबाबदारी नव्हती हेही मान्य, पण किमान उपचार म्हणून एक साधी चौकशीही नाही? आणि सर्वात चाट मी अजून एका गोष्टीने पडले.. माझा मुलगा माझ्या बरोबर होता, तोच तर आमच्यामधला मूळ दुवा होता.. नाहीतर कशाला माझा आणि त्यांचा संबंध येणार होता? पण माझ्या मुलाची एका शब्दाने चौकशीही केली नाही!! रोज जात होता तो त्यांच्याकडे, पण त्याच्याकडे ढुंकून पाहिलंही नाही त्यांनी! प्रेम, माया नाही पण साधा शिष्टाचारही नाही? इतकं मश्गूल असावं एखाद्याने आपल्याचमध्ये? इथे येताजाता ओळखीच्या मुलाशीही आपण एखाददुसरा शब्द बोलतो, त्याच्या गालाला हात लावतो, काहीतरी gesture दाखवतो.. इथे माझा मुलगा जवळजवळ त्यांच्या डोळ्यादेखत मोठा झाला होता.. त्याच्याशी ’सुट्टीचा काय करतोस आता? शाळा कधी सुरू?’ असे निरर्थकच, म्हटले तर, पण आवश्यक असे प्रश्नही नाहीत?? त्यांचा आणि माझ्या मुलाचा आता संबंध संपला, पाळणाघर आता बंद झालं म्हणून इतकं टोक? जी काही बांधिलकी होती, ती केवळ पाळणाघराच्या वेळात आणि पैशापुरतीच होती? इतकी लिमिटेड?

प्रचंड अस्वस्थ झाले मी तिथून बाहेर पडले तेव्हा. माणसांचे अजब नमूने नेहेमीच अनुभवायला मिळतात आपल्याला, पण एक पाळणाघर चालवणारी बाई असं वागू शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं! शेवटी, मला गरज असताना त्यांनी माझ्या मुलाला त्यांच्याकडे ठेवून घेतलं, दिलेल्या पैशाचा मोबदला व्यवस्थित चुकवला असंच म्हणायचं. पैशाने त्यांचं लक्ष माझ्या मुलासाठी मी विकत घेतलं होतं हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं! त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करून मी तो विषय कायमचा संपवून टाकला!

April 30, 2009

आता मी काय करू??

हानपणी आपण सगळ्यांनीच ती राक्षसाची गोष्ट वाचली असेल.. त्याला काम करण्याचा रोग होता.. त्याला सतत काम द्यायला लागायचे, तो त्याच्या मालकाला सतत विचारायचा- "मालक, आता मी काय करू?" आणि मालकाने काम दिले नाही, तर तो त्याला चक्क मारून टाकायचा! लांबचलांब असलेल्या शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरूवात झाली, की हा ’आता मी काय करू?’ राक्षस तमाम मुलांच्या अंगात शिरतो! सुट्टी म्हणजे आराम असे कितीही म्हटले, तरी मुलांना कुठे स्वस्थ बसवतंय? त्यांना आवर्जून सांगितलं की आता लवकर उठू नका, की हमखास मुलं सकाळी रोजच्या वेळेच्याही आधीच उठणार! आणि मग होते सुरू भुणभुण- "आई, आता मी काय करू?" बरं, आई देईल ते एकही उत्तर त्यावेळी पसंत पडत नाही! हे आपलं विचारायचं म्हणून विचारायचं असतं, एक फॉर्मॅलिटी म्हणून! कारण आई म्हणाली- बॉल खेळ, की, आत्ता काय बॉल खेळायची वेळ आहे का? बरं बाबा, मग ठोकळे लाव, पत्ते खेळ, टीव्ही बघ- नाही! नाही!! नाही!!! काहीही पसंत पडत नाही! आई जर कशोशीने टाळत असेल मुलाला उन्हात खेळायला पाठवायला, तर मुलाला तेच हवं असतं! ’हे’ कर म्हटलं, की ’त्यापेक्षा ते करतो’, ’ते’ कर की ’हेच बरंय’ आणि सरतेशेवटी काहीच पसंत न पडून "आता मी काय करू???"

सर्वात अडचणीचं ठरतं ते तीन ते आठ वयाच्या मुलांचं. ही मुलं तशी एकटी कोणाकडे, कुठे जाण्याइतकी मोठी नसतात. पण त्यांना ’बोअर’ तर होत असतंच. तशी उन्हाळी शिबिरं अनेक असतात, पण सगळी तासादोन तासाची. रिकाम्या मुलांची दिवसभराची जबाबदारी कोण ’माईका लाल’ आपणहोऊन घेईल? तर, यांना दिवसभराचा काय उद्योग शोधायचा हा प्रश्न उरतोच! एरवी ज्या वेळेत मुलं शाळेला जातात, तो वेळ तर त्यांचा जाता जात नाही! मग घरात एखादं भावंडं असेल, किंवा शेजारी पाजारी त्याच वयाची मुलं असतील, तर जरा तरी वेळ जातो.. पण एकेकटी मुलं पार कोमेजून जातात बिचारी! त्यातून आई नोकरी करणारी असेल, तर जास्तीच. कारण त्या मुलांना दोन तासांच्या शिबीराला कोण ने-आण करणार? नाईलाजाने, दिवसभर पाळणाघरात रहायला लागतं, त्यामुळे मुलं नाखुश! पाळणघरातल्या मावशी काही हुंदडू देत नाहीत, की आवाज करू देत नाहीत. बाहेर ऊन इतकं असतं, की अंगण असलं तरी खेळता येत नाही. अर्थात, जी मुलं घरी असतात, तीही काही कमी त्रास देत नाहीत म्हणा! घरभर आवाज, पसारा, ओरडाआरडा.. मग आईचा आवाज.. मधेच लाईट जातात, अन आवडतं कार्टून, आवडती गेम बंद पडते.. मग रुसवेफुगवे! चालू असतो कल्ला! आणि इतकं सगळं असतानाही, प्रश्न येतोच, "आई, आता मी काय करू?"

सहज मी विचार केला, आपणही लहान असताना असेच होतो का? इतकं लहानपणाचं आठवत नाही खरं, पण मुलं चिकार होती आसपास.. आणि बहिणीच्या मागे मी सतत असायचे हे ही आठवतंय. तिची फार चिडचिडही व्हायची- माझं शेपूट कायमच बिचारीच्या मागे! पण काही असो, भातुकली, पत्ते, व्यापार, पुस्तक वाचन यात वेळ जायचा खरा. दुपारी आंबे खाऊन झकास झोप, संध्याकाळी लपंडाव, डबडा ऐसपैस, लगोरी, लंगडी.. रात्री परत आंबे.. मग मध्येच कधीतरी पर्वतीला जायची टूम, पोहायला जायची मोहिम, कधी बागेत किंवा असच काहीतरी.. मोठ्या मुलांमध्ये आम्ही चिल्लीपिल्लीही धमाल करायचो.. आईच्या मागे भुणभुण केल्याचं आठवत तरी नाहीये!

मग आताच्या मुलांचा का बरं वेळ जात नाही? त्यांना जास्त ऑप्शन आहेत, म्हणून का? मुलांना टीव्ही, काँप्यूटर, व्हिडीयो गेम्स- कितीही द्या, पुरत नाहीत. ही मुलं हुशारही आहेतच.. एकाच गोष्टीत तासनतास रमत नाहीत.. आपसात खेळतात, पण दिवसचे दिवस नाही.. काहीतरी कुठेतरी खटके उडतात, की इवलं तोंड करून येतात घरी, "आई, आता मी काय करू?" या प्रश्नासकटच! घरातल्या माणसांचाही पेशन्स संपला आहे मुलांच्या कलाने घ्यायचा? आई-बाबांना वेळ नाही, आजी-आजोबाही निवृत्त असले, तरी त्यांनी स्वत:च्या वेळाची व्यवस्थित आखणी केलेली असते. मुलं "आता मी काय करू" वरवर म्हणत असतील, पण त्यांना "आई/ बाबा, मला वेळ देता थोडा?" असं तर विचारायचं नसेल? पण वेळच सापडत नाही ना! मुलांना शाळेला सुट्टी असते, तशी आई-बाबांना ऑफिसाची उन्हाळी सुट्टी असती तर किती बरं झालं असतं! एरवी मुलांना वेळ देता येत नाही म्हणून हळहळणारे पालक मुलांसोबत मूल होऊन नक्कीच राहिले असते. पण अशी सुट्टी हे एक विशफुल थिंकिंगच!

त्याऐवजी, पालक काही ना काही मार्ग शोधतात, मुलांना कुठे ना कुठे गुंतवून ठेवतात, जमेल तसे त्यांच्यातच एक मूल होऊन खेळतात. सध्याच्या काळाचे ’बाबा’ही मुलांच्या गोष्टीत सहभाग घेतात.. मुलाच रिकामा वेळ सत्कारणी लागावा ही धडपड सगळेच आपल्या परीने करतात..

सध्या तरी सुट्टीचा एक महिना संपला आहे. एकापाठोपाठ एक उद्योग मागे लावून दिल्याने हे दिवस तरी गेले.. आता अजून एकच महिना! मे महिना आजी-आजोबांकडे, एखाद्या छोट्या ट्रिपमध्ये करत घालवायचा.. जमलं तर एखाद्या छंदवर्गात अडकवायचं मुलाला.. मुलगा मोठा होऊन, आपापलं वाचू शकत नाही, एखाद्या घराजवळच्या ठिकाणी आपापला जाऊ शकत नाही, तोवर अश्या कसरती करत रहायचं! अश्या वेळी "आई, आता मी काय करू?" हा प्रश्न कधीही कानावर पडेल याची तयारी ठेवायची आणि स्वत:ची पूर्ण कल्पकता लढवून दर वेळी एखादं नवं, त्याला पटेल असं उत्तरही द्यायचं! सुट्टी झिंदाबाद!

February 24, 2009

सलाम!

' Give them chance, not charity' 'त्यांना नको आहे दया, हवी आहे एक संधी'




'आनंदवन' हे नाव आपल्या सर्वांनाच परिचयाचं. वंदनीय बाबा आमटेंनी अतिशय धाडसाने आणि कल्पनातीत परिश्रमाने समाजातल्या वाळीत टाकलेल्या माणसांना खरोखर जीवदान दिलं. पण हे कार्य नुसतं सुरू करून ते थांबले नाहीत. कुष्ठरोगी, अपंग, अंध, आणि आता एड्जबाधित रुग्ण या सगळ्यांना त्यांनी आपलसं केलं. ही सगळी सर्वप्रथम 'माणसं' आहेत आणि माणूस म्हणून जगण्याचा त्यांना हक्क आहे हे त्यांनी जाणलं आणि उभं राहिलं 'आनंदवन'. ज्या लोकांना जगाने त्यांच्या अपंगत्वाकडे, रोगाकडे पाहून बहिष्कृत केलं, त्यांना आनंदवनाने आपलसं केलं. आनंदवन हे एक गाव आहे. इथला प्रत्येक माणूस हा त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या अपंगत्वावर मात करून काही ना काही उद्योग करतो, आपलं आयुष्य आपल्या हिंमतीवर जगतो, आपलं योगदान देऊन जगतो. त्या लोकांना खरंच नको असते दया, हवा असतो फक्त थोडा विश्वास आणि एक संधी.. आपलं कौशल्य दाखवण्याची.



या संकल्पनेतूनच जन्म झाला 'स्वरानंदवन'चा! आनंदवना जन्मलेली, किंवा तिथे आलेली अनाथ, अपंग, अंध, मूकबधीर मुलं, तरूण मिळून एकमेवाद्वितीय असा हा दृकश्राव्य कार्यक्रम करतात- 'स्वरानंदवन'. या कार्यक्रमातली १००हून जास्त सहभागी मुलं ही लौकिकदृष्ट्या अपंग आहेत. पोलियो, अस्थिव्यंग, अंधत्व, अपंगत्वाने गांजलेली आहेत. पण एका धाग्याने बांधलेली आहेत- तो म्हणजे संगीत! संगीत म्हणजे सूर, लय, ताल- अशी लय, असा ताल जो आपणा सर्वांमध्ये लपलेला असतो. संगीत म्हणजे केवळ गाणं नव्हे, तर तालाची, लयीची जाणीव.. देवदयेने ही जाणीव या सर्व मुलांना अगदी उत्तम आहे.. किमान संगीत तरी माणसाचं शरीर बघून रुजत नाही, ही देवाची कृपाच! 'स्वरानंदवन' या कार्यक्रमामध्ये या मुलांची गाणी, नृत्य, नकला आपल्याला बघायला, ऐकायला मिळतात. लौकिकदृष्ट्या ही मुलं 'सूराला चिकटून' गात नसतील, पण आज प्रचंड जनसमूहासमोर ते आत्मविश्वासाने उभं राहू शकतात. त्यांच्यासमोर न बिचकता आपली कला दाखवू शकतात. एक वेळ त्यांच्या जीवनात अशी आली होती की त्यांच्या सख्ख्या लोकांनीही त्यांना दूर लोटले आहे, किंवा काहींना तर 'आपली माणसं' म्हणजे काय हेच ठाऊक नाही! अश्या दुर्लक्षित, उपेक्षित मुलांना कुठून मिळतं इतकं धैर्य? कुठून संचारतं त्यांच्यात इतकं बळ? तर, स्वत:च्या वैगुण्याची जाणीव असूनही त्यांना त्याची लाज वाटत नाही, आणि आपल्या वैगुण्यावर मात करायची प्रबळ इच्छा त्यांना आहे, त्यामुळेच ते आपल्यासमोर निर्भयपणे उभे राहू शकतात! 'ठीक आहे, नाही दिसत आम्हाला तुमचं जग, पण आम्हाला आमच्या कल्पनेच्या जगात मुक्त विहरायला काहीच आडकाठी नाही, ना?' 'मी धावू शकत नाही, पण मला जमेल तसं, माझ्या पायावर चालू तर शकतो ना?' 'माझ्या तबल्याचे बोल ऐकता ऐकता, तुम्ही माझ्या दृष्टीहीनतेला विसरता ना?' असे प्रश्न जणू ते आपल्याला विचारत आहेत असा भास होतो. केवळ दिसायला अपंग, पण मनानी अभंग!


स्वरानंदवनातले हे स्वर आपल्याला आंतरबाह्य भिजवून टाकतात. त्यांचा आत्मविश्वास पाहून आपण थक्क होतो. आणि हा आत्मविश्वास, ही जिद्द त्यांना त्यांच्या हिंमतीवर जगण्याचं एक साधनही मिळवून देते. ही मुलं हौसेखतर, हसतखेळत हा कार्यक्रम करत नाहीत, तर आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण शक्ती पणाला लावून प्रत्येक सादरीकरण अगदी 'प्रोफेशनली' करतात. अंध मुलं गातात, हे एकवेळ सोपं, पण नाचतात? तेही सुरातालावर? आणि तेही एका जागी उभे राहून वगैरे नाही, तर व्यवस्थित सामुहिक नृत्य करतात! वेगवेगळे फॉर्मेशन्स घेऊन!! कसे शिकले असतील ते? कसा अंदाज घेतला असेल हालचालींचा? त्यांच्या शिक्षकांचं खरं कौतुक की त्यांनी या मुलांमध्ये ही जिद्द निर्माण केली. चुका झाल्या असतीलच, कदाचित नैराश्यही आलं असेल, पण त्याच्यापलिकडे ही मुलं पोचली हे किती स्पृहणीय!


खरे विस्मयचकित तर आपण पुढे होतो.. संपूर्णत: कर्ण आणि त्यामुळे मूकबधीर असलेली मुलं जेव्हा पॉप गाण्यावर थिरकतात तेव्हा! या मुलांना गाणं ऐकायला येत नाही, शंका आल्यास विचारता येत नाही, तरी इतक्या लयबद्ध हालचाली कश्या करतात? जे गाणं ऐकायलाच येत नाही, त्यावर नाच कसा करू शकतात? तेही त्या गाण्यांच्या बीट्सवर? कसं शक्य आहे? तर, ते गाणं जेव्हा आपल्यासारख्या सामान्यजनांच्या कानावर पडत असतं, तेव्हा ती मुलं फक्त त्यांच्या शिक्षकांकडे नजर ठेवून असतात. शिक्षकांच्या खुणेबरहुकुम ते शिकवलेल्या हालचाली करतात. आपल्याला एक क्षणही शंका येत नाही, की ही मुलं ऐकू-बोलू शकत नाहीत!


हे असे अनुभव, आपण स्वत: एक माणूस म्हणून किती अपंग आहोत हेच शिकवून जातात जणू. कोण ठरवतं अपंगत्व? केवळ दोन हात, पाय, डोळे आहेत म्हणून आपण निर्व्यंग? छोट्या छोट्या गोष्टीत होणारे आपले मानापमान, रुसवेफुगवे, अहमहमिका, स्पर्धा, मी-मी पणा, तक्रारी- या मानसिक व्यंगांचं काय? खुट्ट झालं की आपला मूड जातो, तब्येत बिघडते, कसंनुसं होतं, जीव गुदमरतो..! पण आपल्याला कल्पनाही येणार नाही अश्या ठिकाणी, अश्या अवस्थेत आज लोक रहात आहेत. आणि नुसतेच रहात नाहीयेत, तर त्यातून मार्ग काढत आहेत, जिद्दीने कार्यरत रहात आहेत. त्यांना बघितलं की अपंग शब्द उच्चारायचीही लाज वाटते. त्यांच्याही आयुष्यात नक्कीच अशी वेळ आली असेल, की तेही खचले असतील, देवाला दोष दिला असेल की 'मीच का सापडलो तुला?' पण कार्यक्रमाचा निवेदक जे म्हणाला ते ऐकून डोळ्यात पाणी येतं.. तो म्हणाला, 'उलट आम्ही देवाचे आभार मानतो की त्याने आमच्यात काही ना काही उणीव ठेवली, कारण त्यामुळेच आम्ही 'आनंदवनात' आलो, विकासभाऊंनी (डॉ. विकास आमटे) आम्हाला आयुष्य दिलं, आयुष्य जगायला कारण दिलं, एक दिशा दिली, एक प्रेरणा, एक ध्येय दिलं.' इतकं मोठं मन! अपंगत्वाचा उल्लेखही नाही, आहे तो स्वीकार. आणि देवावरची तरीही अतूट असलेली श्रद्धा! ना कुठली कटूता, ना खेद ना राग.


आपल्यासारखे तथाकथित निर्व्यंग, सशक्त लोक एकच करू शकतो- त्यांना सलाम!

(फोटो सौजन्य: डॉ. शीतल आमटे)

January 21, 2009

स्वयंशिस्त!

मी ट्रॅफिकचे नियम पाळते!’ हे लवकरच एक विनोदी वाक्य होईल असं वाटायला लागलंय, कारण रोजच सरळसरळ ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करून गाड्या हाकणारे अनेक वीर मला घडोघडी दिसतात. ’लाल दिव्याला थांबायचं असतं’ हे शाळेत पहिल्या इयत्तेत शिकलेलं बहुधा अख्ख्या रस्त्यावर मला एकटीलाच आठवत असतं, कारण अक्षरश: एखाद्या सिग्नलला लाल दिवा पाहून मी एकटीच थांबलेली असते.. माझ्या पुढचे, मागचे सगळे निघून जातात! त्यांचं काही बिघडत नाही, मग एकटी मीच ट्रॅफिकचे नियम पाळून विनोदीपणा नाही का करत?

धावपळ कोणाला चुकली आहे? ऑफिसमधले पंचिंग मशिन मला एकटीलाच काय, तर तमाम नोकरदारांना सकाळी उठल्यापासूनच दिसत असतं. पण ते काहीही करून गाठण्यासाठी लोक पाच मिनिटं लवकर आवरून निघण्याऐवजी ट्रॅफिक नियम का तोडतात? अर्थात, काही महाभाग केवळ उद्दामपणा करून दिवसाच्या कोणत्याही प्रहरी नियमबियम पाळायच्या भानगडीत कधीच पडत नाहीत. रस्ता जेव्हा आपण एक जबाबदार नागरिक म्हणून वापरतो, तेव्हा तो योग्यपणे वापरणे ही आपली जबाबदारी नाही का? फक्त वाहतूकीसंबंधात पाहिलं, तर सिग्नल न पाळणे हा खूनाइतकाच गंभीर गुन्हा नाही का? सध्या वाहनचालकांचा बेदरकारपणा इतका वाढला आहे की मागून जोरजोरात हॉर्न वाजवणे, ओरडाआरडा करणे, प्रसंगी शिव्याही देणे हे सर्रास घडू लागलंय- आणि कोणाला? तर, लाल सिग्नल आहे म्हणून एखाद्या थांबलेल्यालाच! नंतर असे कटाक्ष मिळतात की जणू लाल दिव्याला थांबणं म्हणजे अडाणीपणाचं लक्षण! ’थांबलाय का? जा आणि मुख्य म्हणजे आम्हाला जाऊद्या!’ ही परिस्थिती ओळखून प्रशासनाने ट्रॅफिक वॉर्डन नेमले, तर लोकांनी चक्क त्यांच्याच अंगावर गाड्या घालून त्यांना जखमी केले!! म्हणजे, खरोखर आता खूनच पडायचे बाकी राहिलेत? कश्यापायी? तर साधे वाहतूकीचे नियम पाळावेत ’सभ्य’ जनतेने म्हणून?

कहर म्हणजे एरवी या सिग्नलना न जुमानणारे लोक मोबाईलची रिंग वाजली, एखादा ओळखीचा चेहरा दिसला की कच्चकन ब्रेक दाबून भर रस्त्यामध्ये वाट्टेल तिथे थांबतात. चौकामधला मोठा लाल दिवा यांना दिसत नाही, पण भर गर्दीतले मित्र, मैत्रिणी मात्र लग्गेच दिसतात. मग आपण कुठे आहोत, किती लोक आपल्या आसपास आहेत याचा काहीही विचार न करता जागच्याजागी थांबलेच! रस्त्यामधे येणार्‍या तमाम देवळांपाशी थांबून नमस्कार टेकवला नाही, तर केवढं पाप वाढेल, त्यामुळे तिथेही थांबणं आलंच. आता देवळंच रस्त्यांच्यामधे बांधली आहेत, त्याला हे भक्त तरी काय करणार? भर रस्त्यामधे असलं तरी हरकत नाही, पण बाकी लोकांची गैरसोय करून नमस्कार हा केलाच पाहिजे. ज्या लोकांना याचा त्रास होतो, तेच पापी, घोर अज्ञानी!

पीएमपीएल बसेसबद्दल म्या पामराने काय बोलावे? ’मला अभिमान आहे मी वाहतूकीचे नियम पाळतो’ इतकं छापिल खोटं केवळ तेच बोलू शकतात. पुढे असलेल्या दुचाकीस्वाराला मागून दाबणे, सिग्नल तोडणे, बीआरटीसारख्या मार्गावरही सुसाट गाडी हाकणे, बस ही स्टॉपवर न थांबवता त्याच्या आसपास कुठेही थांबवणे हे तर रोजचेच! साधे झेब्रा क्रॉसिंगवर गाडी न थांबवणे हे पथ्य पळत नाहीत म्हणून बसचालक दंड भरतात, पण गाडी पुढेच थांबवणार! हे बरे असे सहा आसनी रिक्षा चालक. दिसलं ग्राहक की थांब! रिक्षा भरणं महत्त्वाचं, मग कुठेही, कसंही थांबून ती भरली तरी चालेल. यासर्वामधे वाहतूकीचे नियम कुठे येतात? या पायी किती वाहनस्वार रोज बळी पडतात याची पर्वा कोणाला आहे? तरूण, तरूणी आपले जीव गमावत आहेत, याची खन्त आणि जाणीव परिवहन खात्याला का होत नाहीये?

..कारण इतक्या वाईट परिस्थितीला ’मामा फॅक्टर’ तितकाच कारणीभूत आहे. फार काळापासून चिरीमिरी घेऊन त्यांनी अनेक नियमांचं उल्लंघन डोळ्याआड केलं, वाहनचालकांना डोक्यावर बसवलं, कितीतरी गोष्टींकडे काणाडोळा केला.. आणि आता शहरातली एकूणच वाहनसंख्या हाताबाहेर गेल्यानंतर यांना थोडी जाग आली आहे. पण परिस्थिती कधीच हाताबाहेर गेली आहे. रस्ते नुसतेच मोठे करून, किंवा बससाठी वेगळे मार्ग करून, किंवा फ्लायओव्हर बांधून काय साधणार आहे? मुळात जी वाहतूक शिस्त आहे ती नागरिकांमध्ये बाणवण्यासाठी परिवहन खात्याने काय केले आहे? साधा परवानाही ते कोणतीही परिक्षा न घेता, पैसे दिले की देतात.. आता चौकाचौकात ट्रॅफिक वॉर्डन, हवालदार वगैरे उभे असतात, पण लोक त्यांनाही जुमानत नाहीयेत, कारण त्यांना माहीत आहे, की जरी पकडले गेलो, तरी प्रकरण मिटवता येतयंच. त्यातूनही हवालदार आहे म्हणून लाल दिव्याला थांबणारे, त्याची पाठ फिरली की पुन्हा कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वाकडे होतातच.

सध्या सगळ्यांनाच आपापल्या जबाबदारीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सगळीकडेच नागरीकांच्या भावनांचा कडेलोट झाला. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काय केले पाहिजे हे सल्ले चौकाचौकात चर्चिले गेले. पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपले काय कर्तव्य आहे याचा विचार किती जणांनी केला? सार्वजनिक ठिकाणी योग्य असे वर्तन आपले आहे का याचा विचार किती जण करतात? सर्वच जागी स्वयंशिस्तीची आवश्यकता असताना पोकळ गप्पा मारणारेच जास्त का दिसतात? साधे वाहतूकीचे, सार्वजनिक स्वच्छतेचे नियम आपण पाळत नाही. पण देशाची प्रगति ’आमच्याकडे हे असलंच’ असं म्हणत होत नाही. नुसती हळहळ काय कामाची? यासाठी प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. सुरूवात तरी शिस्तीने, कायद्याच्या कडक अंमलबजावणीने करावी लागेल. सरकारी कारभार कडक झाला की हळूहळू नागरीकांमध्येही चांगल्या सवयी भिनतात. हे अवघड आहे, पण होण्यासारखे आहे. घडोघडी अमेरिकेची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. ट्रॅफिकची शिस्त का घेत नाही आपण त्यांच्याकडून?

आपण सर्वांनीच थोडा वेळ स्वत:शीच विचार केला, आणि तसे आचरणही केले, तर बरेच काही साध्य होण्यासारखे आहे! देशातले सर्व नाही, तरी किमान सुशिक्षित नागरिक जेव्हा सुधारतील तो दिवस खरा सोनियाचा होईल.

January 3, 2009

शुभेच्छा!

वीन वर्षाचे आपण नुकतेच स्वागत केले.. (नवीन इंग्रजी वर्षाचे, असे म्हणूया :)) त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचे मोबाईलचे इनबॉक्स, ईमेलचे इनबॉक्स, अगदी ऑरकूटवरचे स्क्रॅपबूकही शुभेच्छांनी भरून, वाहून गेले असेल.. हा एक नवीन ट्रेन्ड झालाय हल्ली. इन्टरनेट आणि मोबाईलने आपल्या जीवनात अनेक बदल आणले. त्यातलाच हाही.. लोकांचा संपर्कात अगदी सहज राहता येतं, एकाच वेळी अनेक लोकांशी संपर्क साधता येतो. ईमेल तसे नवीन होते, तेव्हा आठवा ’फॉरवर्ड मेल’ यांची संख्या! वेड लागल्यासारखे असे मेल्स आपल्याला यायचे, आणि आपणही लोकांना अश्या मेल्स पुढे पाठवायचो. कालांतरानी याचा ओघ कमी झाला, पण त्याची जागा आता फॉरवर्ड एसएमएसने घेतली, इतकंच! इकडे चलनातले दहा पैसे कधीचेच नामशेष झाले, पण मोबाईल कंपन्या चक्क दहा, चाळीस वगैरे पैश्यात एकमेकांच्या संपर्कात रहाण्याची सोय देत आहेत, आणि त्याचा फायदा त्यांच्या ’टार्गेट कस्टमर’, अर्थातच तरूण वर्गाने घेतला नाही, तरच नवल! अर्थातच मोबाईल कंपन्यांच्या जाहिराती आकर्षक असतातच. ’फ्रेंड्ज ग्रूप कॉल्स फक्त १० पैश्यात’, ’रात्री ११ ते सकाळी ६ फुकट एसएमएस’, ’रोमिंगचे दर ३०%ने घटले’, इत्यादि. मोठमोठ्या कंपन्यांमधे कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठीही मोबाईल कंपन्या मुद्दाम स्पेशल ’टॅरिफ प्लॅन्स’ देतात, त्यायोगे कर्मचारी एकमेकांमध्ये जवळपास फुकट बोलू शकतात.

या सगळ्याचाच परिपाक म्हणजे एकमेकांना एसएमएस करणं- वेळ जात नसला की, कारण आहे म्हणून, कारण नाही म्हणून, ठावठिकाणा कुठे आहे हे समजावं म्हणून, आणि सध्याचं कारण म्हणजे ’कोणतातरी सण आहे किंवा महत्त्वाचा दिवस आहे, म्हणून त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी’! भारतात तर काय, सणांची रेलचेलच! दर महिन्यात काही ना काही आहेच, नसेल तर पाश्चिमात्य देशाकडून आयात केलेला कोणतातरी ’डे’ आहेच. फेब्रुवारीत सण नाही, पण व्हॅलेंटाईन डे सारखा प्रेमीजनांचा जागतिक महत्त्व असलेला अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो, त्या दिवशी प्रिय व्यक्तिला समोरासमोर काही बोलण्यापेक्षा, एसएमएस करणं सोयीच, नाही का? मे महिन्यात अजून काहीच नाही, तर ’मदर्स डे’! एरवी आईला कामाशिवाय हाक न मारणारे आपण, त्या दिवशी मात्र ’मातेची थोरवी’ सांगणारा एसएमएस तिलाच करायला कसे विसरू? हे पुरत नसतील, तर फादर्स डे, बॉस डे, फ्रेंडशिप डे, नवीन वर्षाचा पहिला दिवस, वर्षाचा शेवटचा दिवस, नोकरीतला पहिला/ शेवटचा दिवस, लग्नाचा वाढदिवस, नुसता स्वत:चा, आणि शेकडो मित्रमैत्रिणींचे वाढदिवस हेही वर्षभरात हजर आहेतच. बघा, कित्ती कारणं आहेत एकमेकांना एसएमएस करण्याची! या दिवशी तुम्ही तुमच्या ऍड्रेसबूक मधल्या लोकांना एक तरी एसएमएस करत नसाल, तर उपयोग काय तुमच्या मोबाईलचा? (फक्त इनकमिंग कॉल्स घेता वाटतं? लब्बाड!)

तर या संधीचा सगळेच फायदा घेत आहेत असं मोबाईल सर्व्हिस देणार्‍या कंपन्यांच्या लक्षात आले. लोक ’एसएमएस’ या सुविधेचे अगदी गुलाम जरी झाले नाहीत, तरी तो प्रकार त्यांना आवडू लागला. ’स्वस्तात संपर्क’ ही कल्पना तशी मोहक आहेच. मग या कंपन्यांनी हळूच काय केलं? लोक एसएमएस केल्याशिवाय राहू शकणार नाहीत, अशी खात्री पटल्यावर त्यांनी वर्ष्भरातले हे ’स्पेशल दिवस’ कोणते याची यादी केली. या दिवशी हमखास एसएमएस यांचा ओघ प्रचंड वाढतो असे हे दिवस होते. त्यांनी बारीक अक्षरात हळूच मग या दिवशी एसएमएसचे शुल्क वाढवले. जर एरवी फुकट असतील, तर त्या दिवशी एक रुपया, जर एरवी एक रुपया असेल, तर त्या दिवशी दोन रुपये असे. पण आपण रुपया दोन रुपयांच्या कितीतरी पुढे आलो असल्याने, एसएमएसच्या संख्येत फारसा फरक पडला नाही! एक तर सर्व ग्राहकांना असं बिलिंग होतंय हे समजायलाच एक महिना जावा लागला. पण तोपर्यंत दुसरा ’स्पेशल दिवस’ येऊन उभा ठाकला होता ना! आधीच्या सर्व स्पेशल दिवसांना आपले एसएमएस जाणार आणि आता एक रुपया घेतात म्हणल्यावर एसएमएस करायचे नाहीत होय! इभ्रत, इज्जतका सवाल होता है भाई! लोकांनी अर्धा डोळा एसएमएस बिलवर ठेवून दीड डोळ्याने एसएमएस केलेच, फारतर ५-१० लोक गाळले असतील यादीतून! पण लोकांपर्यंत आपला एसएमएस जाणं महत्त्वाचं! त्यामुळे स्पेशल दिवसांना ढीगभर एसएमएस येणं चालू राहिलंच, किंबहुना वाढलंच!

मेलमधल्या शुभेच्छांचं एक बरं असतं, त्याचा आपल्याला ’ऍलर्ट’तरी मिळत नाही. आपण जेव्हा मेलबॉक्स उघडू, तेव्हा मेल्सचा पाऊस पडेल. हे एकवेळ चालतं, पण एसएमएसचा ऍलर्ट टोन मात्र वेळीअवेळी वाजतो! आता यावर उपाय म्हणून मोबाईल ऑफ ठेवणे, किंवा सायलेंट ठेवणे हा सोपा आहेच, पण अश्या वेळी नेमका महत्त्वाचा, खरोखरच्या कामाचा एखादा एसएमएस किंवा कॉल येतोच! आणि तो आला आहे, असं आपल्याला जेव्हा वाटतं, तेव्हा नेमका असा ’शुभेच्छुक एसएमएस’ असतो, हो की नाही? शुभेच्छा द्याव्यातच, छान वाटतं, हे मीही कबूल करते. पण असे वीसेक मेसेजेस आले, की शुभेच्छांमधली गंमत थोडी कमी होते, असं मला वाटतं. नंतर नंतर तर चक्क अश्या मेसेजेसकडे ’असेल कोणाचातरी एसएमएस, बघू नंतर’ असं म्हणत बघण्याचाही कंटाळा केला जातो असा माझा अनुभव आहे. कधीकधी एसएमएसच्या प्रचंड ट्रॅफिकमुळे दुसर्‍या दिवसापर्यंत ते मेसेजेस येत रहातात, तोवर तर ती शुभेच्छा द्यायची वेळही निघून गेलेली असते!

अर्थात, अश्या ’स्पेशल दिवशी’ मला एकही एसएमएस किंवा इमेल आली नाही, तर मला वाईट वाटेल असंही मी कबूल करते. तेव्हा, हे लिखाण फार मनावर घेऊन कोणी शुभेच्छांचे एसएमएस किंवा मेल करणं सोडू नका, फक्त थोडे तारतम्य बाळगा असं सांगायचं होतं. शुभेच्छांकडे कोणाचं दुर्लक्ष होऊ नये, इतकीच छोटीशी ’शुभ-इच्छा’. हे वर्ष आपल्या सर्वांनाच शांततामय जावो!

December 2, 2008

जबाबदार वार्तांकन!

जबाबदार वार्तांकन म्हणजे काय? जी घटना झाली आहे तिचा सर्व कोनांमधून सांगोपांग आढावा घेऊन तो लोकांसमोर आणणे. हे मुळात कशासाठी? तर, अनेक गोष्टी या सामान्य जनतपासून लपवल्या जातात, किंवा लपतात. तर आपल्या आसपास काय चालले आहे हे सर्वांना समजावे, अन्याय असेल तर त्याला योग्य ती वाचा फोडली जावी, काही चांगले असेल तर ते सर्वदूर पोहोचावे हा उद्देश्य. परंतु, हे आज साध्य झाले आहे का?

फार पूर्वी, जेव्हा दूरदर्शन हे एकच माध्यम होतं, तेव्हा सरकारी बातम्या जे खाद्य देतील ते आणि तेवढंच आम जनतेला चघळायला मिळायचं. पण, टीव्ही चॅनल खुले झाले, खासगी झाले आणि हे दृष्य बघताबघता बदलले. काही काही टीव्ही चॅनलनी फक्त बातम्या प्रक्षेपित करायला सुरुवात केली. सुरुवातीला हे खूपच ’एक्सायटींग’ वगैरे होते. २४ तास बातम्या! कधीही पहा- दिवसरात्र देश-विदेशच्या बातम्या. पण २४ तास सारखे दाखवायचे तरी काय?- असा प्रश्न भेडसावू लागला! त्यामुळे, एका छोट्या घटनेचीही बातमी व्हायला लागली, बातमी नसेल तर ती खूबीने बातमी करता येऊ लागली. मग अगदी ’गावात कुत्री फार झाली आहेत’ पासून ’अमूक मंत्री सकाळच्या नाश्त्याला सफरचंदाचाच रस पीतात’ पर्यंत कशाचीही बातमी ’ब्रेकिंग न्यूज’ या नावाखाली चालू लागली. हे सर्व खपून गेले, लोकांनी याकडे बातमी कमी आणि करममणूक जास्ती या नजरेने पाहून सवय करून घेतली. अनेक मोठ्मोठ्या समूहांच्या, वृत्तपत्रांच्या, कॉर्पोरेट हाऊसेसच्या वृत्तवाहिन्या एकापाठोपाठ एक सुरू झाल्या आणि ’आम्ही वेगळे आहोत’ असे म्हणत सगळे एकमेकांचाच कित्ता गिरवायला लागले.

पण हे कुठपर्यंत? ’चॅनल चालू राहणं महत्त्वाचं, मग कशाचीही बातमी केली तरी चालेल’ असं म्हणत या वाहिन्यांच्या चालक-मालकांनी अक्षरश: स्वत:ची सदसदविवेकबुद्धी विकली. मुंबईचा दहशतवादी हल्ला हा तर सगळ्याचाच कळस होता. पहिली गोष्ट म्हणजे हा हल्ला इतका धक्कादायक होता, की पहिले काही तास या बातमीवर विश्वासच बसला नाही. परंतु वृत्तवाहिन्यांच्या कृपेने सगळेच ’लाईव्ह’ दिसत असल्याने रक्ताचे सडे, बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी उभे असलेले पोलिस, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे, कोणते अधिकारी कुठे निघाले आहेत आणि ’आता या क्षणी तुम्हाला काय वाटत आहे?’ असे संतापजनक प्रश्न- हे सगळे सगळे दिसले. जसे तुम्हा आम्हाला दिसले, तसेच दहशतवाद्यांच्या खबर्‍यांना आणि त्यांना मदत करणार्‍यांनाही दिसले. जे लोक सॅटेलाईट फोन वापरत होते, त्यांच्याशी संपर्क साधण्यात काय अडचण असणार होती? कोणते फोर्सेस मदतीला येत आहेत, कधी येत आहेत, कुठे आहेत- सर्व लाईव्ह खबरी द्यायला न्यूज चॅनल होतेच ना तत्पर! तरी पण यांना आपण देशहिताविरुद्ध चुकून काहीतरी करत आहोत याचा संशयही आला नाही! ’वार्तांकनात मीच कसा पुढे, माझाच चॅनल कसा सगळ्या बातम्या देतो, ’कोणाला काय वाटतंय’ हे कसं मलाच माहिती....’ या दर्पोक्त्यांमुळे आपण किती संवेदनशील बातम्या दहशतवाद्यांना बसल्या बसल्या पुरवतोय हे यांच्या ध्यानातही आले नाही! बरं, यांच्या नाही, तर किमान सरकारच्या तरी आले. म्हणून यांना ’लाईव्ह’ प्रक्षेपण करायला बंदी घातली, तरी यांना त्यातले गांभीर्य कळू नये???? यांनी या बंदीचीही बातमीच केली!!! ’आम्ही सगळेच नाही दाखवू शकत आत्ता, कारण देशहिताचा प्रश्न आहे, पण आमचे लोक इथेच आहेत, इथून असा गोळीबार होतोय, तिकडून अशी आग लागलीये’... करत पुन्हा सुरूच! कहर म्हणजे एक मिनिट उशीराचे प्रक्षेपण करून यांनी ’लाईव्ह’ कव्हरेजवरही पळवाट काढली!

कोणाचे किती नुकसान झाले, याला हे न्यूज चॅनल स्वत: साक्षीदार आहेत. अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मृत्यूला हेच जबाबदार आहेत असं म्हणलं जातं. हे विधान जरा अतिरंजित वाटले, तरी झटकन नाकारावे असेही नाही! परंतु, दुसर्‍या दिवशी चर्चगेटला गोळीबाराची अफवा पसरवण्यात मात्र केवळ न्यूज चॅनलचाच हात होता! इतके एकेकाळचे निर्भिड आणि डॅशिंग पत्रकार आता या वाहिन्यांवर काम करतात, एकालाही मनातूनसुद्धा स्वत:च्या या उलट्या कर्तृत्त्वाची शरम वाटली नसेल का? खातरजमा न करता बातम्या द्यायच्या आणि मग माफी मागायची? पोलिसांना, यंत्रणेला, सामान्य माणसाला वेठीला धरायचे तरी किती?
आता ही मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे की वृत्तवाहिन्यांना आचारसंहिता असावी. कोणत्या बातम्या लाईव्ह दाखवायच्या आणि कोणत्या नाही हे सरकारने ठरवावे. हाच मुळात खटकणारा मुद्दा आहे. या वृत्तवाहिन्यांमधे एकसे एक विद्वान, ’परदेशात’ शिकलेले, खडतर जागी जाऊन, राहून वार्तांकन केलेले असे अतिरथी महारथी आहेत, तर यांना स्वत:च्या जबाबदारीवर एक साधी आचारसंहिता नाही करता येत? तीही यांना कोणीतरी करून द्यावी लागते? कशासाठी? तर त्यातल्या पळवाटा शोधून काढण्यासाठी? यांच्या वृत्तवाहिनीचा मूळ उद्देश्याशी जरी ते प्रामाणिक राहिले तरी कितीतरी सकारात्मक बदल होतील. आज आसपास कितीतरी बातम्या आहेत, त्यांच्यावर काम करा ना. आज सामान्य माणूस कित्येक चिंतांखाली दडपून गेला आहे, त्याला वाचा फोडा. सरकारी यंत्रणेचा हस्तक्षेप नको असेल, तर त्यांच्याशी सहकार्य करा. लोकशाहीचा चौथा स्तंभ स्वत:ला म्हणवून घ्यायला आपण लायक आहोत का हा प्रश्न या माध्यामाशी निगडीत असलेल्या प्रत्येकानी स्वत:च्या मनालाच विचारला तरी बरेच काही साध्य होईल.

November 11, 2008

असूया!


दुसर्‍याचं भलं व्हावं म्हणून वाटते ती तळमळ;
अन दुसर्‍याचं भलं झालं, की वाटते ती मळमळ!’

ही ग्राफिटी माहिती असेल, ही वाचल्यानंतर पटकन एक स्मित चेहर्‍यावर आलंही असेल, पण कधी विचार केलाय, हे किती खरं आहे याचा? मी जेव्हा ही ग्राफिटी प्रथम वाचली तेव्हा यातला शाब्दिक खेळ क्षणभर आवडून गेला. पण गेल्या अनेक दिवसातल्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही ग्राफिटी मी आज परत मेलमधल्या फॉरवर्डमधे वाचली, तेव्हा त्यातले सत्य मनाला भिडले, टोचलेही!

दुसर्‍याचं भलं व्हावं असं खरंच मनापासून किती जणांना वाटत असतं? उलट त्याचं भलं चाललं नाहीये, म्हणूनच तळमळ वाटत असते का? एकदा त्याचं भलं झालं की तळमळ संपते आणि मळमळायला का लागतं? तळमळ आंतरिक असते ना? दुसर्‍याच्या सुखात आपलं सुख, समाधान शोधणारे किती जण राहिलेत जगामध्ये? एखाद्याने काही चांगलं काम केलं असेल, तर मोकळ्या मनाने कौतुक करणारेही सापडत नाहीत सध्या. उलट, ’अरे, तुला कसं हे जमलं? तुला हे येतं, असं येतं हे माहीतच नव्हतं!’, असं उपहासात्मक, त्याची लायकी काढणारं ’कौतुक’ मात्र केलं जातं.

खरंच, कौतुकाचे चार शब्द इतके महाग असतात आपल्याला? मुक्त हस्ते, मोकळ्या मनाने कौतुक करणं इतकं अवघड असतं? जे आपल्याला येत नाही ते दुसर्‍याला आलं तर लगेच त्याच्याबद्दल असूया वाटायला लागते? त्याचं निर्भेळ यश दिसत नाही, त्यातली खुसपटं का काढली जातात? दोन गोड शब्द त्याचा हुरूप वाढवू शकतात याची जणीव का होत नाही? आपणही त्याच्याकडून काही शिकू शकतो हे का समजत नाही? जो वेळ त्याच्यावर धुसफुसण्यात जातो, तोच वेळ नवीन काही शिकण्यात का सदुपयोगी लागत नाही? ’दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही’ ही म्हण खोटी का नाही ठरू शकत? बर, नेहेमी सगळ्यांना चांगलंच म्हटलं पाहिजे असंही नाही, जे चूक आहे ते चूकच, पण ती चूक दाखवायचीही एक पद्धत असते. मुळात त्याने चूक सुधारावी ही इच्छा असेल, तरच व्यवस्थितपणे त्याच्यापर्यंत ती पोचवली जाईल ना! पण इच्छा असते ती एखाद्याला नामोहरम करायची, त्याच्यातला उत्साह संपवण्याची..

खरंतर हा कोण्या एकाचा दोष नाही, हा तर मनुष्यस्वभाव! असूया, हेवा या भावना खरंतर आपल्या स्वत:च्याच प्रगतिसाठी उपयुक्त. माणूस जे आहे त्यात समाधानी राहिला, तर त्याची प्रगती कशी होणार? त्याला उन्नतिसाठी झगडलं पाहिजेच. पण हे झगडणं स्वत:शी हवं ना? ’त्याच्याकडे काय आहे जे माझ्याकडे नाही?’ असा विचार केला, तर आपण स्वत:मध्ये कितीतरी बदल आणू शकतो. पण असूया द्वेषाचं रूप कधी घेते समजतही नाही. ’त्याच्याकडे आलंच कसं, जे माझ्याकडे नाही?’ असं संतप्त रूप घेऊन जे आहे, तेही संपवण्याचं तो काम करतो.

कधी असूया असते वैयक्तिक- दोघांमधली, आपसातली.. ही अशी असूया परवडली. किमान आपल्याला माहीत तरी असतं, आपली गाठ कोणाशी आहे ते! मात्र कधीकधी आपला ज्यांच्याशी कधी संबंधही आला नाहीये असे लोकही आपल्याशी कारण नसताना वैर बाळगून आहेत हे जेव्हा समजतं तेव्हा सुन्न व्हायला होतं. तंत्रज्ञान जसजसं पुढे गेलं, तसतसं त्याचे तोटेही दाखवत गेलं.. माणसं जशी एका टीचकीच्या अंतरावर आली, तितकीच ती vulnerableही झाली. इंटरनेटला चेहरा नाही, त्यामुळे एरवी ते स्पष्टपणे, रोखठोकपणे बोलता, करता येणं शक्य झालं नसतं, तेही सहज जमू लागलं.. आणि असूया, हेवेदावे, गैरसमज निर्माण होणे आणि करणे म्हणजे दोन टीचक्यांचे खेळ झाले. यांकडे कितीही दुर्लक्ष केले, आयडीज ब्लॉक केले, इग्नोअर केले, तरी मन:स्ताप टळतो का? आभासी जग सत्य जगावर पकड घ्यायला लागतं आणि कधीतरी आपलं आपल्यालाच नवल वाटायला लागतं, ’मी खरंच इतकी वाईट आहे का, की माझ्या आनंदात कोणालाच आनंद वाटत नाही?’ कल्पना करू शकता, फार भयानक असतो हा विचार.

सर्वात क्लेषकारक असते मात्र आपल्या लोकांची असूया. आपण ज्यांना आपले मित्र मानतो, आपले हितचिंतक मानतो त्यांचे आपल्याबद्दलचे खरे विचार जेव्हा अचानक आपल्या समोर येतात, तेव्हा मात्र अतीव दु:ख होतं. कौतुकाचे दोन शब्दही उत्स्फूर्तपणे आपली माणसं आपल्यासाठी देऊ शकत नसतील, तर खरंच आपण त्यांना ’आपली’ म्हणू शकतो का? का, ती ’आपली’ कधी नसतातच? आपल्यालाच हौस असते गोतावळा जमवण्याची आणि येईलजाईल त्याला ’आपला’ असं लेबल चिकटवण्याची? चार खरोखरचे हितचिंतक आसपास असणं आजकाल खरंच चैनीची गोष्ट झालीये!

देवकृपेने, मला आजपर्यंत कोणाचीच, कश्याहीबद्दल असूया वाटलेली नाही, कोणाचं कौतुक करण्यात मी कचरत नाही आणि मला त्यात कमीपणाही वाटत नाही. देवाशी हीच प्रार्थना की हे शब्द, या भावना माझ्यापासून दूरच राहोत. आणि शक्य असेल तर बाकीच्यांपासूनही...

September 8, 2008

आवडत्या कविता

संवेदनी सुरु केलेला आवडत्या कवितांचा खो माझ्याकडे गायत्री (http://manmaitra.blogspot.com/) कडून आला. आभार गायत्री.

कविता हा एक अत्यंत सुंदर साहित्यिक आविष्कार. कित्येक भावना, कित्येक छटा मोजक्या शब्दात बांधून त्याला लयही देणे हे एक हाडाचा कविच करू जाणो. या भावनांच्या हिंदोळ्यात आपण आनंदानी हरवून जायचे फक्त.

पहिली कविता महाराष्ट्राचे काव्यदैवत- 'ग. दि. मा' यांची! अत्यंत सोपे शब्द, गहन आशय, पर्फेक्ट जुळणारी यमकं, एकाही शब्दाशी तडजोड न करता मांडलेली कल्पना... यांच्या काव्याबद्दल काय नि किती लिहायचं! त्यांचीच एक कविता ’दोन श्वान’! अगदी सोपी कविता, तसं म्हटलं तर उपदेशपरच आहे. पण असा सहजी उपदेश कोणी करत असेल तर नक्कीच ऐकायला आवडेल बुवा!

दोन श्वान

एका वटवृक्षाखाली बसूनीया दोन श्वान
एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान

एक वये वाढलेले, एक पिल्लू चिमुकले
वृद्ध-बालकात काही होते भाषण चालले

"कुणाठाई आढळले तुला जीवनात सुख?
"वृद्ध बालकास विचारी, त्याचे चाटूनीया मुख

"मला वाटते आजोबा, सुख माझ्या शेपटात
सदाचाच झटतो मी त्यात धराया मुखात

माझ्या जवळी असून नाही मज गवसत
उगाचच राहतो मी माझ्या भोवती फिरत"

अजाण त्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून
क्षणभरी वृद्ध श्वान बसे लोचन मिटून

"कुणाठाई सापडले तुम्हा जीवनात सुख
तुम्ही वयाने वडील, श्वान संघाचे नायक"

नातवाच्या या प्रश्नाला देई जाणता उत्तर
"तुझे बोलणे बालका बिनचूक बरोबर

परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी
आत्मप्रदक्षिणा येते त्याच्या कपाळी शेवटी

घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग!"
-----------------------------

दुसरा नंबर संदीप खरेचा. कवितेचं नाव आहे ’करार’. ही कविता वाचता वाचताच घश्यात आवंढा दाटून येतो, संदीपचा आवाज आपोआप कानात ऐकू येतो- एक दु:खी कविता, तिच्या आर्ततेसकट डोळ्यासमोर येते..

करार...

चल आता बोलून घेऊ! बोलून घेऊ थोडे!
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे!
संपत आलाय पाऊसकाळ! विरत चाललेत मेघ!
विजेचीही आता सतत उठत नाही रेघ!
मृद्गंधाने आवरून घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसार्‍यांची ही मिटण्याची वेळ!
सावळ्या सावळ्या हवेत थोडं मिसळत चाललंय उन्हं!
खळखळणारी नदी आता वाहते जपून जपून!

चल आता बोलून घेऊ! बोलून घेऊ थोडे!
लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे!
मनामधला कोपरा चाचपून घे नीट!
लपले असतील अजून कोठे चुकार शब्द धीट!
नजरा, आठवण, शपथा.. सार्‍यांस उन्हं द्यायला हवे!
जाण्याआधी ओले मन वाळायला तर हवे!

हळवी बिळवी होऊन पाहू नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे
भेटण्याआधी निश्चित असते जेव्हा वेळ जायची!
समजूतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची!
एकदम कर पाठ आणि मन कोरे!
भेटलो ते ही बरे झाले! चाललो ते ही बरे!
मी हे घेतो आवरून सारे! तू ही सावरून जा!
तळहातीच्या रेशांमधल्या वळणावरून जा!
खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे!
’करार पूर्ण झाला’ अशी सही तेवढी दे!
--------------------------

आणि मोह आवरत नाही, म्हणून तिसरी कविता- नवोदित कवि- वैभव जोशीची. नवोदित असला तरी वैभव अत्यंत प्रतिभावान आहे, सोप्या शब्दात मोठा आशय मांडणे ही त्याची खासियत आहे. त्याची ही कविता प्रत्येकाला काही काळ अंतर्मुख करते, आणि दर वेळी वाचली की एक नवीन अर्थ उलगडून दाखवते. (या कवितेला ’स्टार माझा’ या चॅनलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काव्यस्पर्धेत प्रथम पारितोषिकही मिळाले आहे.) ही कविता- ’डोह’

डोह

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही
एखादा डोह असू द्यावा अथांग..

कुठल्याही क्षणी हक्कानं जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अश्या अंतरावर बसून बघत रहावं..
आपण डोहाकडे
डोहानी आपल्याकडे..

ना आपलया चेहर्‍यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नसतील तर कसला अपेक्षाभंग?

डोळ्यांनीच विचारावं त्याला
हा स्थायी स्वभाव कुठून मिळाला..?
हलकेच एखादं पान आपल्याकडे सरकवत
त्याने दाखवून द्यावं..
बरीच आंतरिक उर्मी आहे
पण तळाला..

अश्या वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं
हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही
प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही
------------------------------------------

माझा खो संदीप ( http://atakmatak.blogspot.com/) आणि मीनु (http://meenuz.blogspot.com/) ला

July 16, 2008

भिशी

यावेळी माझंच नाव येऊदे बाई, मागची अगदी थोडक्यात हुकली’, ’माझंच नाव काढ गं, तुला बक्षिस देईन छानपैकी’ अशी वाक्य मागून येत होती. सगळ्यांची उत्कंठा अगदी ताणली वगैरे गेली होती..

प्रसंग आहे खूप खूप वर्षांपूर्वीचा- माझ्या मावशीकडे असलेल्या भिशीचा! भिशी हा प्रकार मी पहिल्यांदाच बघत होते. दिवसभर मावशी एकदम उत्साहात आणि गडबडीत होती. संध्याकाळी तिच्या कॉलनीतल्याच तिच्या मैत्रिणी नटूनथटून वगैरे आल्या. गप्पा, हास्यकल्लोळ आणि अर्थातच मस्तपैकी चटपटीत खाणं झालं. आणि शेवटी तो क्षण आला- पुढची भिशी काढण्याचा!! मी ’पाहुणी’ म्हणून तो ’सन्मान’ माझ्याकडे आला. मावशीनी एका मोठ्या तसराळ्यात चिठ्ठ्या टाकून आणल्या आणि मला एक उचलायला सांगितली. मी पटकन एक उचलली आणि त्यावरचं नाव वाचलं. अचानकच मोठे आवाज आले बायकांचे, जिला भिशी लागली होती तिचा आनंदाचा चित्कार, जिला ’आपल्यालाच भिशी लागावी’ अशी इच्छा होती, तिचा अपेक्षाभंगाचा आवाज वगैरे आणि जनरल कोलाहल. मग कॅलेंडर आणून भिशीची तारीख ठरली, त्यावर उहापोह झाला, जोरात ठासून ती तारीख सगळ्या बायकांना सांगून भिशी संपलीच एकदम. इतकी वर्ष झाली तरी हा प्रसंग अगदी लख्ख आठवतोय मला. माझी आई अश्या कोणत्याच भिशीत नव्हती. आणि आम्ही ’कॉलनीतही’ रहात नव्हतो. आम्ही आपले एका साध्या वाड्यातले भाडेकरू होतो.

मी घरी आल्यावर आईनी मला ’भिशी लागल्याचा इतका आनंद त्या बाईला का झाला?’ याच्यातली गंमत किंवा ’क्रक्स’ सांगितला- जिला भिशी लागते तिला त्या सर्व बायकांनी एक ठराविक रक्कम द्यायची असते, त्यामुळे त्या दिवशी ती बाई खूपच श्रीमंत होऊन जाते, तिला पाहिजे ते ती त्या पैश्यातून विकत घेऊ शकते म्हणूनच प्रत्येक बाईची अशी दिली ख्वाहिश असते की पुढची भिशी आपल्यालाच लागावी! हे ज्ञानामृत ऐकून मी धन्य झाले होते. सहाजिकच मी आईला विचारलं की तू का नाही असल्या भिशीत, तर माझ्या आईनी सिक्सरच ठोकला होता. ती सहजपणे म्हणाली, "मला जे हवंय ते मी बाबांना सांगते आणायला, त्यासाठी भिशी कशाला हवी? माझ्या मैत्रिणींनी कधीही यावं माझ्याकडे गप्पा मारायला, पैसे घेऊन नको." तेव्हा मला ’मैत्रीत व्यवहार’ वगैरे फारसं कळलं नव्हतं, पण आईची फिलॉसॉफी एकदम पटूनच गेली होती.

कालांतरानी आमच्याकडे ’नातेवाईकांची भिशी’ सुरु झाली. म्हणजे काय तर आजीच्या सर्व बहिणी, आणि त्यांच्या मुली आणि सूना यांची भिशी. ’वरचेवर भेटी होत नाहीत, आता कार्य पण नाहीत कोणाकडे, भिशीच्या निमित्तानी भेटूया’ असं मारे प्रीएँबल ठरलं भिशीचं. पहिल्या दोन-तीनच भिश्या काय त्या सुरळीत पार पडल्या असतील. पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’! एकेकीचे निरोप यायला लागले- ’जमत नाहीये यायला’चे, कोणतीही भिशीची तारीख ठरवली तरी किमान दोघींना त्यात काहीतरी प्रॉब्लेम असायचाच, मग आरोप-प्रत्यारोप, गटबाजी आणि भरीसभर की हिशोबाचे गोंधळ- कोणी, कोणाला, किती पैसे द्यायचे आहेत वगैरे.. मला वाटतं एक पूर्ण राऊंड न करताच ती भिशी बंद पडली. सगळ्यांनीच एकमेकींना पैसे देऊन ती मिटवूनच टाकली. मूळ भिशीचा- भेटण्याचा हेतू आणि नेहेमीच्या भिशीचा- पैसे घालवून पैसे मिळवण्याचा हेतूच असफल झाला! असो. नातेवाईकांमधे हे नेहेमीचे घोळ असतातच नाहीतरी.

त्यानंतर मी एक अफलातून भिशी ऐकली होती- ’सोन्याची भिशी’! या भिशीचे ’स्टेक’ अर्थातच ’हाय’ होते. नेहेमीची भिशी १०० रुपयांची असली तर ही किमान ५०० रुपयांची! पद्धत तीच, पण जिला भिशी लागेल तिने जमलेल्या पैश्यातून सोनंच घ्यायचं हा नियम आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या भिशीत तो दागिना घालून यायचा! ऐकून मी चाट पडले होते! जर महिन्याला ५०० रुपये केवळ एका भिशीसाठी या बायका घालू शकत असतील तर साहजिकच यांच्या सांपत्तिक स्थितिवर संशय यायचं कारण नाही. यांना दागिनेही कमी नसणारच. तरीही अश्या भिश्यात भाग घेवून दागिन्यांचं प्रदर्शन करण्याची हौस मात्र दांडगी! मला वाटतं, पण सोन्याचे भाव अस्मानाला भिडल्यानंतर एकतर अश्या भिश्या बंद झाल्या असाव्यात किंवा ’स्टेक’ तरी किमान रु. १००० चा झाला असावा. सध्याचे रहाणीमान बघता दुसर्‍या शक्यतेची शक्यताच जास्त!

मीही एका भिशीची सदस्या आहे, पण आमची आहे ’शाळेची भिशी’. या भिशीतल्या आम्ही बायका रुढार्थानी मैत्रिणी नाही. आमची रीस्पेक्टीव्ह मुलं एकाच शाळेत आहेत आणि एकमेकांचे दोस्त आहेत. ’त्यांच्या आया’ म्हणून आमची ओळख झाली आणि पुढे मैत्री. या भिशीमधे मुलांचा अभ्यास, एकूण शालेय प्रगति आणि त्यांचा दंगा हाच मेन अजेंडा. आम्ही राहतो त्या भागातली अनेक मुलं एकाच शाळेत जातात, त्यामुळे आमची अशी भिशी जमून गेली. यात कटाक्षाने आम्ही पैसे आणलेले नाहीत. दुपारच्या वेळी चहाला भेटायचे, गप्पा मारायच्या. मुलं एकमेकांचे दोस्तच असल्यामुळे ती रमतात, धुडगूस घालतात आणि आम्हालाही गप्पा मारू देतात हाही फायदा. बालवाडीपासून मैत्री असेल तर ती सर्वात जास्त टिकते म्हणतात. बघू, या मुलांची टिकते का ते!

’महिला बचत गट’हीही एक प्रकारची भिशीच. पण याला भिशी म्हणणं अजिबातच योग्य ठरणार नाही. स्वत:च्या, आपल्या समाजातल्या घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं विधायक काम ते, पण त्याची रूपरेशा भिशीसारखीच. दर महिन्याला जमेल तितकी लहान रक्कम सर्व बचत गटातल्या बायकांनी जमा करायची आणि ते पैसे गुंतवून त्याच्या व्याजावर व्यवसाय करायचा. ज्यांना ’पैसे बाजूला काढून ठेवणं’ ही चैन परवडत नाही, त्या मुद्दाम प्रयत्न करून पैसे जमवतात, त्यांच्याच कोणत्यातरी उद्योगात गुंतवतात आणि त्याचा फायदा सर्वांनाच मिळतो. भिशीसारखे ते पैसे व्यक्तिगत चैनीसाठी न वापरता संपूर्ण गटासाठी वापरले जातात.

मध्यमवर्गातील बायका ’माफक मजा’ म्हणून भिशीकडे बघतात, तर उच्चभ्रू, श्रीमंत बायकांच्या जीवनाचाच तो एक भाग आहे. बायकांना एकत्र जमून गप्पा मारायची, नवनवीन पदार्थ बनवायची, मिरवायची हौस असतेच. भिशीची कल्पना जिने प्रथम आणली तिला बरोब्बर बायकांची ही नस कळली होती. त्याबरोबरच मिळणार्‍या पैश्याचं प्रलोभन!! बायका या कल्पनेनी ’सोल्ड आऊट’ झाल्या यात काय नवल! एका बिल्डींगमधल्या, एकाच कंपनीतल्या नवर्‍यांच्या बायका, मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी असे वेगवेगळे ग्रूप असतात भिशीचे. काही भिशी ग्रूप जाणूनबुजून काही वेगळेपणा आणायचा प्रयत्न करतात, पण त्यांची संख्या कमीच. बहुतांश भिश्यांमधे गप्पा, गॉसिप आणि नातेवाईकांच्या तक्रारी मांडायला एक व्यासपीठ हेच चालतं. एखादीनी नवीन कल्पना मांडली तर तिची खिल्ली उडवली जाते, किंवा ’कोणी सांगितल्यात नसत्या उठाठेवी’ असं म्हणलं जातं. बायका एकत्र जमून कितीतरी गोष्टी करू शकतात. पण दुर्दैवानी सुरुवातीला ’या निमित्ताने तरी नियमितपणे भेटत राहू’ अशी सुरु झालेली भिशी शेवटी व्यवहार आणि कुचाळक्यांचं रूप धारण करते.

पण म्हणजे बायकांनी मजा करूच नये का? जर एकत्र जमून हसलं, बोललं तर काय बिघडलं?- असं कोणी विचारेल. बिघडलं काहीच नाही, उलट बायकांना असा विरंगुळा हवाच. पण एकत्र यायला पैशाचं बंधन कशाला हवं? नुसतं भेटता येतं की. आपण हळदीकुंकू करतो तेव्हा पैसे असतात का त्यामधे? तसंच दर महिन्याला हळदीकुंकू आहे असं समजून भेटावं. बरं, पैसे हवेच असतील तर जमवलेले पैसे कपडे, दागिने, शोभेच्या वस्तू यांमधेच न खर्च करता कोणत्याही समाजपयोगी कामासाठी वापरावेत. एक/दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणा, अनाथाश्रम/ वृद्धश्रम यांना मदत म्हणा.. गरजू, चांगल्या संस्था काही कमी नाहीत आपल्याकडे, कमी आहे ती तळमळ आणि इच्छा! ’साधीसुधी भिशी ती काय आणि तिने काय तीर मारायचेत’ हा सूर!

अनेक प्रश्नांबद्दल आपण म्हणतो तसेच याहीबद्दल म्हणते, ’हे कधी बदलणार?’

June 18, 2008

साम्य

डीच महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीला मुलगी झाली म्हणून हॉस्पिटलमधे भेटायला गेले होते. बेटी होती एक दिवसाचीच, पण थेट आईसारखी दिसत होती! आता काही लोक म्हणतील हे जरा जास्तच होतंय.., ’कोणासारखं दिसतं’ वगैरे टीपीकल बायकी विषय आहेत, पहिल्याच दिवशी ’कोणासारखं दिसतं’ वगैरे काही कळत नाही, बाळाचा चेहरा रोज बदलतो! मीही सहमत आहे. म्हणूनच तेव्हा लिहिलं नाही...

या बाळीचं मागच्या आठवड्यात बारसं झालं. तेव्हा ती दोन महिन्याची झाली होती, पण साम्य तेच. अगदी माझ्या मैत्रिणीची कॉपी! या बाळीला चार वर्षाची मोठी बहिण पण आहे, आणि गंमत म्हणजे तीही जन्मल्यापासून तिच्या आईसारखीच दिसते! अगदी विश्वास बसणार नाही अश्या डीट्टो कॉप्या आहेत एकमेकींच्या!! इतकी गंमत वाटली बघून.. मी चेष्टेत म्हणाले मैत्रिणीच्या नवर्‍याला ’तुला कॉम्प्लेक्स येत असेल ना घरी? एक तर घरी तीन तीन स्त्रीया, आणि त्याही अगदी एकमेकींसारख्या दिसणार्‍या’!!

गंमतीचा भाग सोडला, तरीही आपल्याला हे ’साम्य’ शोधायची सवय असतेच, जास्तकरून बायकांना. मूल जन्मलं रे जन्मलं की ’कोणासारखं दिसतं बाळ?’ हा पहिल्या तीन प्रश्नांतला एक प्रश्न हमखास असतो, हो की नाही? आता ते बाळ कोणासारखं का दिसेना, काय फरक पडतो? पण हे साम्य ’ट्रेस’ करण्यात एक वेगळीच गंमत असते, नाही? अगदी एक-दोन दिवसातली बाळं पाहिली, तर ९०% वेळा काहीही कळत नाही, ते कोणासारखं दिसतं ते. ते तर बिचारं दूध-शी-शू सोडून डोळेही उघडत नाही.. तरीपण ’डोळे अगदी आजीसारखे आहेत’, ’रंग अगदी आजोळवर गेलाय’, ’कपाळपट्टी थेट आजोबांसारखी’, ’नाक अगदी आईसारखं आहे सरळ झालंय..’ वगैरे शेरे त्याच्या उशाशी बसून समस्त बायकामंडळी आवर्जून टाकत असतात.

यथावकाश बाळ मोठं व्हायला लागतं. त्याचा आवाज घरात दुमदुमायला लागतो. त्याने भोकाड पसरलं की त्याची आई वैतागते आणि ’अगदी तिकडच्यांवर गेलाय, पाच मिनिटं काही धीर धरवत नाही..’ असा शेरा येतोच. एखादी जागरणानी दमलेली आजी म्हणते, ’इथे आम्हाला दमवतंय, त्याच्या हक्काच्या घरी गेलं की बरोब्बर झोपेल बघ.’ या बाळाच्या निमित्तानी ’तिकडच्या घरची खुपणारी साम्यस्थळं’ हुडकून त्यावार टीप्पणी करायला अनायसेच संधी मिळते. मग बाळ पुढे सरकायला लागतं. आता सरकताना पुढे जायच्या नादात सगळीच बाळं आधी मागे सरकतात, हे एक ’पेडीयाट्रिक सत्य’ आहे.. तरीपण बाळ असं मागे सरकलं, तर लग्गेच सासूबाई, ’बघतेस का, अगदी त्याच्या बापावर गेलाय.. हा अगदी अस्संच करायचा बघ तान्हा असताना..!’ असं म्हणणारच! यातूनच ’मातृमुखी मुलगा’ आणि ’पितृमुखी मुलगी’ जास्त भाग्यवान असतात अश्या संकल्पना रुजल्या असाव्यात. जुळी असतील तर अजूनच धमाल.. ती अगदी एकमेकांसारखी दिसतात आणि तरीही त्यातलं एक आईवर आणि एक वडीलांवर गेलं आहे असाही अजब निष्कर्ष निघू शकतो!!

बाळ मोठं होत असताना प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांचे गुण-अवगुण सगळ्याचंच कौतुक होत असतं- रडणं, जागरणं, मोठा आवाज, हसण्याची लकब, रांगणं आणि दिसणं तर आहेच. सतत कुठे ना कुठे त्या बाळाचं आणि घरातल्या व्यक्तींबरोबरचं साम्य शोधलं जात असतं.. जणू काही हे त्या घरातलंच आहे, घरातल्यांचंच आहे हे याही प्रकारे ठसवण्याची अजून एक पद्धत असावी ही. आणि मुलं तर मुळातच अनुकरणशील.. तीही घरातल्या मंडळींच्या एकएक सवयी, लकबी पटापट आत्मसात करतात आणि हे साम्य अजूनच बळकट होत जातं..

काही वर्ष सरतात. बाळ ’बाळ’ रहात नाही. पटापट मोठं होतं. आणि अचानक कोणत्यातरी कौटुंबिक सामारंभात अनेक वर्षांनी या बाळाच्या आई किंवा वडीलांच्या बर्‍याच आत्या, काकवा, मावश्या एकत्र जमतात. या बाळाला तर बहुदा त्यांनी त्याच्या जन्मानंतर पहिल्यांदा आणि त्यानंतर एकदम आत्ताच १०-१२ वर्षांनी पाहिलेलं असतं. त्यामुळे ’अगंबाई, केवढा/ढी मोठा/ मोठी झाली/ला ही/हा.. कस्से दिवस जातात काही कळतंच नाही बाई!’ असे उद्गार हमखास निघतात. ’ते’ बाळ जर ’मुलगा’ असेल, तर जरासे सोपे होते. शालेय प्रगतिच्या पुढे ’आजी मंडळाला’ फारसा इन्टरेस्ट नसतो. पण ’ते’ बाळ जर ’मुलगी’ असेल तर अगदी जवळ घेऊन जोरदार निरीक्षण आणि स्पेशल टीप्पण्या होतात बरंका. ’बरं झालं रंगरूप आमच्या शैलाचं घेतलंय, दिसतेय चांगली मुलगी, मोठी झाली की मागण्यांचा पाऊस पडेल..’, किंवा ’हुशार आहे म्हणे, पण चेहरा अगदी बापावर हो, नाजूकपणा म्हणून नाही काही.. वडीलांची बुद्धी आणि आईचा चेहरा घेतला असता तर?’, किंवा, ’हिला पाहिली आणि अगदी ताईची आठवण झाली मला’ म्हणत एखादी मावशी त्या मुलीच्या आजीची आठवण काढून डोळ्याला रुमाल लावते.. आणि हे अगदी सुशिक्षित घरातही होते हे विशेष. पुरावा म्हणून कोणतंही लग्नघराचं माजघर गाठा. सर्व मंडळी सुविद्य, संपन्न असली तरी तरूण मुलींचं बोलणं, दिसणं, वागणं अगदी मायक्रोस्कोपखाली असतं, आणि त्याची सुरुवात तिच्या दिसण्याच्या साम्यापासून होते.

संपूर्ण जगामधे एकसारखे चेहरे असलेली सात माणसं असतात म्हणे. आता ही उर्वरित सहा माणसं कुठे शोधत बसणार? (याला अर्थातच हिंदी सिनेमा अपवाद! एक गाणं गायलं की हीरो किंवा हीरॉईनची डिट्टो कॉपी समोर हज्जर!!) उलट आपल्या चेहरेपट्टीचं मूल आपल्या डोळ्यासमोरच असतं की! अर्थात काही काही मुलं एकदम ’अपक्ष उमेदवार’ही असतात. आई-वडील सोडून पणजी, आत्या अश्या लोकांची चेहरेपट्टी आवडते त्यांना. खैर, त्याने काही बिघडत नाही म्हणा. ’मूल का हवे?’ असा प्रश्न विचारला, तर बाकी कोणतीही फिलॉसॉफिकल उत्तरं यायच्या आधी एक उत्तर नक्की येईल, ’माझे बालपण अनुभवता यावे म्हणून!’. आपण स्वत: तान्हे असताना आपण कसे असतो हे आपल्याला आठवत नसते.. ते लहानपण आपण आपल्या मुलांमधे शोधतो, अनुभवतो. आपल्या हाडामांसाचं मूल मोठं होताना बघणं यात काय सुख आहे, नाही? आणि त्यात ते मूल आपल्यासारखं दिसत असेल तर अजूनच मज्जा!

हे तर सामान्य माणसांचं झालं. पण ’पब्लिक फिगर्स’ही यापासून लांब नाहीत. कोणत्याही बड्या उद्योगपतिनी आपला मुलगा/ मुलगी व्यवसायात आणली, की त्या मुलाचं/ मुलीचं कर्तॄत्व लोकांसमोर नंतर येतं, आधी येतं ते दिसणं. कर्मचारी वर्गात कमालीची उत्सुकता असते हे जाणून घेण्यात की नवीन मालक मोठ्या मालकांपैकी कोणासारखे दिसतात, त्यांच्यासारखेच वागतात का, कामाची पद्धत त्यांच्यासारखीच आहे का आधुनिक आहेत वगैरे..

सर्वात जास्त कंपॅरिझन होते ती सिने नटनट्या आणि त्यांची मुलं यांमधे. अभिषेकचं पदार्पण झालं तेव्हा अमिताभची त्याला सर नाही म्हणून उडवून लावलं होतं, ह्रिथिक तर राकेश रोशनसारखाच सुमार आहे अशी अफवाही उठवली होती- ह्या दोघांनीही सगळेच प्रश्न नंतर निकालात काढले हा भाग वेगळा! सैफ अली खान तर शर्मिला टागोरची स्त्री प्रतिमा म्हणून हेटाळला गेला बिचारा आणि करिष्मा कपूरला ’साडीतला रणधीर कपूर’ सकट काय काय ऐकून घ्यावे लागले! मात्र एके काळच्या ’दिक की धडकन’ सिनेतारकांच्या मुलींनी पार निराशा केली. डींपलच्या दोन्ही मुली, ड्रीमगर्ल हेमामालिनीच्या दोन्ही मुली, तनुजाच्या दोन्ही मुली.. अरारारा!! काय यांच्या आयांचं सौंदर्य आणि काय या! काजोल आणि अजय देवगणनी लग्न केल्यानंतर ’यांची मुलं कशी होतील, देवा तूच बघ रे बाबा!’ अशी अनेकांनी हताश देवाची करूणा भाकली होती म्हणे!

या चेहर्‍यातल्या साम्याचा मी माझ्यापुरता पण एक उपयोग करून घेते. सहसा कोणी नवीन व्यक्ति भेटली, जास्त करून ऑफिसमधे, तर त्या व्यक्तिचा चेहरा मी मला माहीत असलेल्या साधारण तश्याच दिसणार्‍या व्यक्तिबरोबर चिकटवून टाकते, म्हणजे तो आठवला की हाही आपोआप आठवतो! जसं की देशपांडे (आडनावं बदलली आहेत) बुटका आणि टकलू आहे, हे लक्षात होते. काही दिवसांनी रसाळशी ओळख झाल्यावर, तोही तसाच बुटका आणि टकलू आहे हे झटकन लक्षात आले, चेहरेपट्टीत काय तो फरक. आणि गंमत म्हणजे हल्लीच पाटीलही ’देशपांडे कॅटॅगरी’तलेच आहेत असं जाणवलं! इथे ऑफिसमधे इतकी माणसं रोज दिसतात/ भेटतात, या पद्धतीमुळे मला माणसं लक्षात ठेवणं सोपं जातं. ’साम्या’चा असाही उपयोग माझ्यासाठी!

हे साम्य हुडकणं हा मनुष्यस्वभाव आहे. त्यामागे नक्की काय कारण आहे/ असेल हे खूप विचार करूनदेखीलही मला उमजले नाहीये. ’कम्फर्ट फॅक्टर’ हे एकच कारण मला सापडलं. जे नवीन नातं तयार होतं, ते या साम्यामुळे जास्त बळकट होत असावं. हे साम्य शोधण्याची पण एक वेगळीच मजा असते. काही दिवसांनी तर मुलांमुळे त्यांचे आई-बाबाच एकसारखे दिसायला लागतात! विश्वास नाही बसत? आसपास नजर फिरवून पहा.. हे असं एकमेकांमधे ’एकरूप’ झालेलं कुटुंब पाहिलं की खरंच देवाची आणि त्या ’निर्णायक’ डीएनएची कमाल वाटते, जो बाळाला त्याचा चेहरा देतो!

निसर्गाचे एकएक आवाक करतील असे चमत्कार आहेत, पण हा चमत्कार तर अगदी आसपासच जवळपास रोजच घडत असतो, याची गंमत नाही वाटत?