June 17, 2016

ते एक वर्ष- ३


ऑफिस ऑफिस

मी सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. तेव्हा जबरदस्त आयटी बूम होता. अनेक स्टार्ट-अप्स उगवत होते. त्यात एकात माझीही वर्णी लागली- अर्थात फायनॅन्स डिपार्टमेन्टमध्ये. कंपनीचे सरळसरळ दोन भाग होते- एक भाग ज्यात एमडी आणि अन्य एक डायरेक्टर होते, एचारचे दोन लोक- विकास (हा व्हीपी) आणि अरुंधती (त्याची अत्यंत आगाऊ आणि स्वत:ला शहाणी समजणारी ज्युनिअर), अकाऊंट्स-फायनॅन्सचे तीन (डिपार्टमेन्ट हेड- सुनिथा, नीलेश आणि मी) आणि एक सुंदर रिसेप्शनिस्ट (रेवा) आणि दोन ऑफिस बॉईज किशोर आणि सुब्बू- असे दहा आणि दुसरा भाग म्हणजे टेक्निकल डायरेक्टर आणि त्याच्या हाताखाली अजून पंधराएक संगणक अभियंते. छोटा संसार होता. ऑफिस मोठं होतं, पुष्कळ रिकामी क्युबिकल्सही होती. कंपनी तळमजला आणि बेसमेन्ट अशी होती- हे मात्र माझ्यासाठी सॉलिड नवलाचं होतं! पुण्यात ’वरच्या मजल्यावरची’ ऑफिसेस पाहिली होती. पण जिना ’उतरून’ खाली ऑफिस हे मला फार भारी वाटलं होतं. वॉल-टू-वॉल कार्पेट आणि सेन्ट्रल एसी असलेली ती जागा माझ्यासाठी एक वेगळ्या ग्रहावरचं जगच होती. 

दोन भागांचं ड्रेसिंगही अतिशय विसंगत होतं. पहिल्या भागातले लोक एकदम टिपटॉप, वेलग्रूम्ड असायचे नेहेमीच. सूट्स, टाय्ज, चकचक बूट. रेवा तर फक्त शॉपर्स स्टॉपचे कपडे घालायची. माझी इमिजिएट बॉस सुनिथा तमीळ होती. ती जरीच्या नाहीतर सिल्कच्या साड्या नेसायची कायम. अरुंधती कूल ट्रेन्डी शर्ट्स-ट्राऊझर्समध्ये. किशोर आणि सुब्बूला तर युनिफॉर्मच होता. हा तळमजला. बेसमेन्टमधले सोळा मात्र तू कळकट का मी अशा चढाओढीत असायचे. दाढ्या वाढलेल्या, बर्म्युडा, चुरगाळलेले जीन्स-टीशर्ट्स असा नॉर्मल पेहराव. ’आम्ही किती काम करतो बघा’ हा शोऑफ असायचा. टीडीही असाच रहायचा. खरं तर एमडी आणि टीडी मित्र. पण स्वभाव, वागणं एकदम भिन्न. एमडीचे पैसे आणि टीडीचं डोकं अशी सरळ विभागणी होती. तू तुझं बघ, माझ्या कामात ढवळाढवळ करू नको असं एकमेकांना निक्षून सांगितलं असावं त्यांनी. 

वरचे आणि खालचे सर्व लोक पक्के बॉम्बेआईट्स होते. इथेच जन्मलेले किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत आलेले आणि सरावलेले. इथली लाईफस्टाईल, इथला कूल कोशन्ट अंगी अगदी मुरलेला, किंवा आव तरी आणायला जमत होता त्यांना मस्तपैकी. आणि यात मी कुठे होते? माझं बावळट सदाशिव पेठी ध्यान होतं! काय कपडे होते माझे! एक तर शिवलेले पंजाबी ड्रेस मी घालायचे. (जीन्स घालायला तळमजल्याला परवानगी नव्हती.) नव्वद टक्के कपडे हस्तकलामधल्या हॅन्डलूम कॉटनचे. उर्वरित प्रिन्टेड टॉप्स आणि प्लेन सलवार-ओढणी कॅटॅगरीत. केसांचा जन्मसावित्री पोनी. हातात घड्याळ, दुसरा तसाच. कानात टॉप्स, डूल एकही नाही. सगळे कपडे डिसेन्ट होते, चांगले होते. पण फॅशनच्या नावाने शून्य. एकाच प्रकाराचे सगळे ड्रेस. अर्थात म्या बावळटाला हे जाणवलंही नव्हतं. रेवाने मला एकदा विचारलं, तू वेगळं काही घालत नाहीस का? मी म्हणाले, जीन्स घालते की. ती म्हणाली, तसं नाही. ड्रेसेसमध्ये वेगळं. मी घालते तसे. तेव्हा कुठे माझी ट्युब पेटली. पण इतकी जवळीक होऊन बोलायला सहज तीनेक महिने झाले होते तोवर. मी लोकांना पहायचे, मनातल्या मनात- काय मस्त कपडे आहेत हे असं म्हणायचेही. पण स्वत: तसं काही करावं, घालावं याचा विचारही कधी डोक्यात आला नाही.   

माझं काम म्हणजे सुनिथा जेजे सांगेल तेते करायचं- कंपनी लहान होती. अकाऊंट्स, फायनॅन्स आणि लीगल सगळं सुनिथाच पहायची. तिचा भार हलका करायला मी आणि नीलेश. माझ्याकडे फायनॅन्स आणि लीगल होतं. कॅश, पगार, रोजचा हिशोब नीलेशकडे. ऍडव्हायजर म्हणून एक शहा वकील होते. त्यांच्या सल्ल्यानेच एमडीचे पैसे हलायचे. मी जॉईन झाले आणि काही दिवसांतच कंपनीमध्ये महत्त्वाच्या वाटाघाटी चालू झाल्या. सुनिथा, शहा, मी आणि एमडी अशा आमच्या सतत मीटिंग्ज चालू होत्या. आम्ही कागदपत्र तयार करत होतो. मला खूप शिकायला मिळत होतं, शिकलेलं आचरणात आणत होते. शहा या बाबतीत एकदम प्रोफेशनल होते. सुनिथा, शहा आणि मी आमचा मेळ बसत होता हळूहळू. वाटाघाटी अंतिम स्टेजला आल्या आणि अचानक एक दिवस एमडीच्या घरी मीटिंग आहे आणि आपल्याला त्याच्या घरी जायचं आहे असं सुनिथाने सांगितलं. माझ्या पोटात गोळा. एकदम घरीच? 

मुंबईला गेल्यापासून मला माझ्या आत असलेल्या आणखी एका मुलीचा शोध लागला होता. आपल्याला संपूर्णत: अपरिचित प्रसंगाला सामोरं जायचं आहे असा आदेश मेंदूने देताच ती मुलगी आतल्याआत एकदम थंडगार पडत असे, पण त्याचवेळी बाहेरच्या मला घाम फुटत असे. परिणामत: मी एकदम गप्प होत असे. आताही तसंच झालं. खरंतर मला टेन्शन यायचं काय कारण होतं? एमडींच्या घरीच तर जायचं होतं. शहा, सुनिथा आणि आणखी काही मोठे लोकही तिथेच येणार होते. मला सुनिथाची असिस्टंट म्हणून काम होतं फक्त. तरी… तरी या आधी कधीही न अनुभवलेली कसलीतरी भीती माझ्या मनाची पकड घ्यायची आणि मला बंद बधीर करून टाकायची हे मात्र खरं. 

हा भाग खूप मोठा होतोय. मीटिंगची गंमत पुढच्या भागात…
****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

0 comments: