June 13, 2016

ते एक वर्ष- २

मुंबईत दाखलमाझं पदवी, पद्व्युत्तर आणि व्यावसायिक शिक्षण अगदी सुरळीतपणे पार पडलं. पण बरंच काही सुरळीत पार पडलं की धक्के बसणं नैसर्गिक न्यायाचं असतं. त्या अनुसार शिक्षण झाल्यानंतर टक्केटोणपे खायला सुरूवात झाली. नोकरीचा शोध. जिथे इन्टर्नशिप केली होती, तिथून नकार आला. हे म्हणजे सर्व सोय बघून शेजारच्या बालमित्राबरोबर ’प्रेमविवाह’ करायचा असं ठरवल्यानंतर बालमित्राने ’मला लग्नच करायचं नाही’ असं डिक्लेअर केल्यासारखं होतं. जिथे मी इन्टर्नशिप केली तिथून नकार येईल अशी अपेक्षाच नव्हती. पण त्यांना ट्रेनीच हवे होते, पर्मनन्ट पोझिशन नको होती. ओके. वडील म्हणाले करा पायपीट, मारा चकरा, बघा जग कसं असतं ते. चक्क पेपरातून, व्यावसायिक मॅगझिन्समधून ’नोकरी’ विषयक जाहिराती पाहून अर्ज द्यायला लागले. इकडे अर्ज दिला, की तिकडे लगेच कॉल यायचा. अशी आठेक स्थळं तरी पाहिली पुण्यात. मुलगी (म्हणजे मी) सर्वांना पसंत होते, पण याद्या करतेवेळी मुलाचे काका किंवा मावशीचे मिस्टर हमखास शिंकायचे. की नकार! काही कारणाने नोकरी मिळतच नव्हती. एक दिवस वडिलांना मुंबईतलं स्थळ मिळालं. पाठवला अर्ज, कॉल आला. मग मात्र धाबं दणाणलं. इथून चक्क होकार आला तर? वडील म्हणाले, त्यांच्याकडून ऑफर आली तर घे. रहा पुण्याबाहेर. तोही अनुभव घे. मी हो म्हणाले. म्हणजे नाही म्हणायची टापही नव्हती आणि तसं तीव्रतेने नाही म्हणावं असं वाटलंही नाही. ऑफिस होतं अंधेरीला. दादरपर्यंत पुण्याहून ट्रेन जाते. पुढे कसं जायचं? वडील म्हणाले तोंड उघडायचं, विचारायचं. डोळे आणि कान उघडे ठेवायचे. पाच-दहा लाख लोक रोज प्रवास करतात लोकलमधून. आपल्याला का नाही येणार? ते भाबडे होते, की त्यांचा माझ्यावर जरा जास्तच विश्वास होता याचं उत्तर मला अजूनही माहित नाही. मी हरवले असते तर? मला कोणी पळवलं असतं तर? मी परतच आले नसते तर?- हे प्रश्न त्यांना पडले नाहीत का? का ते आत्ता वाटतायेत तसेच वेडगळ तेव्हाही त्यांना वाटले काय माहित! असो. देव पाठीशी होता. मुंबईवाले भले होते. आणि तुमचं नशीब बांधलेलं असतं असं म्हणतातच ना. पुण्यात अक्षरश: कंपन्यांचे उंबरठे झिजवले. पण मुंबईत सहज नोकरी मिळाली. कुठेही चुकले नाही. गांगरले नाही. घाबरले नाही. मला कोणी गंडवलं नाही. गैरफायदा घेतला नाही. काऽऽही नाही. ती कायनात की काय ती एकत्र आली होती; म्हणत होती- हिला त्रास देऊ नका रे. हिला इथवर सुखरूप पोचवा. तरच ती नोकरीला येईल. (मग एकदा मुंबईत आली की दाखवू हिसका!) असो. ऑफिस शोधलं, मुलाखत उत्तम झाली, लोक चांगले वाटले, पगार बरा होता. फक्त राहण्याचा प्रश्न होता. तोही मिटला. कायनात कायनात म्हणाले ना… आईच्या ऑफिसातल्या मैत्रिणीची मुलगी काहीच महिन्यांपूर्वी चकाल्यात नोकरीला लागली होती आणि पार्ल्यात पीजी म्हणून रहात होती. तिथेच समोरच्या बिल्डिंगमध्ये पीजीसाठी जागा रिकामी होती. ’जोशी’ यांच्याकडे. वडिल म्हणाले, चला भरा कपडे. 

इथे खूप वेळा ’वडिल म्हणाले, वडिल म्हणाले’ झालंय ना? ह्म्म. वडिलांनीच माझ्या शिक्षणाचे आणि करियरचे निर्णय घेतले. प्रथमपासून मी अभ्यासात चांगली होते. ज्या शाखेला गेले असते, तिथे चमकले असते. पण त्यामुळे माझा फार गोंधळ व्हायचा. वडील अर्थातच मला पूर्ण ओळखून होते. त्यामुळे ते निर्णय घेत गेले आणि ते चुकीचे नसतील या विश्वासाने मीही त्यांनी सांगितलं तसं करत गेले. ते सांगतात ते ऐकणं आणि तसं करणं जास्त सोपं आणि सोयीचंही होतं माझ्यासाठी.

असो. तर अंधेरीत नोकरी. पार्ल्यात घर. मुंबई असूनही लोकलचा प्रवास नाही! बसचा प्रवास, २० मिनिटात ऑफिस! सुख सुख म्हणतात ते हेच! सामान घेऊन जोशी आजींकडे दाखल झालो. आजींकडे आणखी एकच मुलगी होती. एकूण तिघींची सोय होती. टिपिकल घर. पुढे मोठी सामायिक बाल्कनी, मग व्हरांडा टाईप बंद खोली, एक मोठी खोली, मग स्वयंपाकघर आणि बाथरूम- आगगाडीचा डबा. सामान ठेवायला फडताळ. झोपायला गादी. सोडायला वडील आले होते. सामान लावलं. मी तशी मजेत होते. एक्सायटेड होते. नवी जागा, उद्यापासून नवी नोकरी, एक नवं न अनुभवलेलं आयुष्य... ’नीट रहा’- वडिलांनी निरोप घेतला आणि निश्चयी पावलं टाकत गेलेच कंपाऊंडबाहेर. इथे पहिली जाणीव झाली. एकटेपणाची. पोटात खड्डा पडला. पाय कापायला लागले. अचानक प्रचंड रडू आलं. मी मुंबईत आले होते.   

****

Disclaimer- Fact and fiction are intertwined together in this work.     

4 comments:

Bob said...

छान!

rahul hodage said...

मस्त! अजुन पुढेही आहे का? म्हणजे वातावरण निर्मीती तरी जबरदस्त होती म्हणून विचारलं.

poonam said...

धन्यवाद बॉब, राहुल.

राहुल- हो आणखी पुढे आहे ना. बरेच भाग होतील. सध्या तिसरा टाकलाय.

श्रद्धा said...

Poonam,
Mast Chaluye.. keep it up :)