January 5, 2016

फेसबुक किडा

तीन मिनिटं झाली, च्यायला अजून एकही ’लाईक’ नाही?

एक तर या होपलेस जागी असलेल्या या गाण्याबजावण्याच्या मैफिलीला आलो. तेसुद्धा शनिवारी संध्याकाळी. बरोबर फॅमिलीमॅन आहे हे दिसावं म्हणून बायको आणि मुलगी. मग मुलीची ही मोठी बॅग. थंडी म्हणून आणखी एक सॅक. लांबून यायचं म्हणून फोर व्हीलर आणली, २ किलोमीटर लांब पार्क केली, गर्दीतून कसंबसं आत शिरलो, गर्दीमध्येच बसायला चांगली जागा मिळवली आणि तरीही ’feeling happy’ म्हणत फेसबुक स्टेटस अपडेट केलं तरी अजून एकही लाईक नाही? साले हरामी दोस्त. एक बीयरचा ग्लास टाकला असता तर आत्तापर्यंत, ’कुठे बसलाय्स? येऊ का?’ म्हणून पंचवीस मेसेज पडले असते. पण या गाण्यात कोणाला इन्टरेस्ट नाही.

मला तरी कुठाय? पण कंपनीमध्ये इम्प्रेशन मारायला बरं असतं. नुस्त्या दारू पार्ट्यांमध्ये नाही तर कल्चरल प्रोग्राम्सलाही मी जातो असं दिसतं. बायकोलाही जरा बरं वाटतं एक संध्याकाळ तिच्याबरोबर घालवली की.
झालं गाणं सुरू. सुरू म्हणजे आऽऽऽ करत बसेल आता खूप वेळ. मग कोणतेतरी पिया, रैन, बालम वगैरे शब्द घेऊन तेच गात बसेल अर्धा तास. लोकही च्यायला वावा करतात. बायकोही. काय कळतं त्यांना कोण जाणे. पण जाऊदे. याचा फोटो टाकतो. ’feeling satisfied at Sangeet Samaroh’! या स्टेटसला नक्की येणार लाईक्स. साले कमेन्ट्स नाही करणार कोणी. कारण त्यांना यातलं काय समजतं? पण लाईक नक्की. हां या गाणार्याचं नाव आणि राग नोट केला आणि लक्षात ठेवला की झालं. सोमवारी लंचमध्ये किंवा टीम मीटिंग संपल्यावर हे फेकायचं एकेकाच्या तोंडावर.

अजून एकही लाईक नाही? काय चाल्लंय काय? च्यायला वीस मिनिटं मी याला सोसतोय आणि माझ्या सो कॉल्ड फ्रेन्ड्जना एक साधं बटण दाबता येत नाही?

मरूदे. मेल्स चेक करून घेतो. असं चारचौघांत बसून ईमेल्स चेक केल्या की आपण कोणीतरी इम्पॉर्टन्ट आहोत असं शेजारच्यांना वाटतं. बायकोलाही ’आपण किती काम करतो’ याची खात्री पटते. आज सालं कोण ईमेल करणार पण? एकही ईमेल नाहीये. ठीके. व्हॉट्सॅप. हां इथे पडीक आहेत साले. करेक्ट. आज आऊटिंगला गेलेत नाही का? हजारो फोटो येतील आता तिथले. श्या. उगाच झक मारली आणि आलो आज इथे. सोमवारी आपलं कोण कौतुक ऐकणार? सगळे या आऊटिंगचीच वर्णनं ऐकवत बसतील.

पण मीही कच्च्या गुरूचा चेला नाहीये. पोरगी आता कंटाळेल. मग बायको तिला माझ्याकडे देईल. मग १५-२० मिनिटं बाहेर नेऊन तिला खायला दिलं की आत येऊन बायकोला घेऊन बाहेर पडायचं. बायकोला तासभराचं गाण्याचं इंजेक्शन दिलं की पुरतं सहामहिने तरी ते एक बरंय. या गच्च गिचमिड लोकॅलिटीमधून बाहेर पडून बायको-मुलीला घेऊन आमच्या एरियामधल्या एखाद्या पॉश रेस्टॉरन्टमध्ये जाईन. माझी सुटका होईल, पोरीची ऐश, बायकोही खुश. हे आऊटिंगवाले नाहीत, तर I will bathe in limelight on Monday because my status update will be saying ‘a wonderful musical concert, quiet dinner with family, quality time with kid. A perfect weekend’!

************

नोव्हेंबरपासून पुण्यामध्ये अनेक सांगीतिक मैफिली होतात. त्यापैकी काही मैफिलींना / कार्यक्रमांना गेलो होतो. अशा कार्यक्रमांसाठी पुष्कळ गर्दी असते. पण संगीताचा आस्वाद घेण्यासाठी किती लोक येतात आणि ’आम्ही इथे जातो’ हे नुसतं दाखवण्यासाठी किती लोक येतात असा प्रश्न कधीकधी पडतो. हातामध्ये स्मार्टफोन असणं ही प्राणवायूइतकी प्राथमिक गरज झालेली आहे बर्‍याच लोकांची. हे बघून अतिशय अस्वस्थ झाले आणि हे लिहावंसं वाटलं.