September 22, 2014

रूट्स भाग १

कथेचे शीर्षक: रूट्स

नॉयडामधल्या मे महिन्यातल्या असह्य उकाड्याच्या एका रविवारी अविनाश त्याच्या घरातल्या छोट्या टेरेस गार्डनमध्ये बागकाम करत होता. नवीन माती कुंड्यांमध्ये घालायची होती, जुनी एकसारखी करून परत वापरायची होती, खतं घालायची होती, एखाद-दुसरं नवीन रोप लावायचं होतं, जुनी वाळलेली रोपं काढून टाकायची होती अशी कितीतरी कामं होती. टेरेसभर पसारा झाला होता नुसता. गेल्या वर्षी लावलेल्या मोगर्याच्या दोन रोपांचा नुसता सांगाडाच उरला होता. ती त्याने समूळ उपटून बाजूला ठेवली होती आणि कुंडीतली माती साफ करत होता. इतक्यात साहिल खेळत खेळत त्याच्यापाशी आला. त्याची नजर टेरेसमधल्या सर्व पसार्याकडे गेली. त्या उपटलेल्या रोपांकडे लक्ष जाताच त्याला गंमत वाटली.
"बाबा, हे बघा, याला खाली पण झाड आलंय.." तो म्हणाला.
अविनाशला तंद्रीत आधी समजलंच नाही काही.
"अं? काय म्हणालास?"
"हे बघा ना बाबा, हे झाड. वर कशा नुसत्या काड्या आहेत. तशाच खाली पण आहेत.."
अविनाशने पाहिलं. साहिल त्या रोपाच्या मुळांबद्दल बोलत होता.
"अरे ती त्याची मुळं! झाड नाही काही ते. रूट्स शिकला आहेस ना तू? ही ती रूट्स. झाड मोठं मोठं होत जातं ना, तशी मातीखाली ही मुळंही लांब वाढतात आणि झाडाला स्ट्रॉंग करतात. समजलं?"
"पण ह्याची रूट्स नव्हती ना इतकी स्ट्रॉंग? असती तर हे झाड असं सुकलं नसतं.."

त्याची समज बघून अविनाशला आनंद झाला.. अनुजा नेहेमीच त्याच्या बागकामाच्या छंदाला वेळ जात नाही म्हणून केलेले उद्योग म्हणत असे. पण त्याला बागेची मनापासून आवड होती. कुंड्यांमधून का होईना, पण त्याच्या टेरेसमध्ये त्याने त्याची छोटीशी बाग फुलवली होती. साहिल मात्र दर वेळी तो बागेत काम करत असला, की आसपास घुटमळत असे, प्रश्न विचारत असे. त्याचं त्याला कौतुक होतं.

"मुळांचा दोष नसतो राजा. कधी माती खराब असते, कधी हवा चांगली नसते, कधीकधी रोपच चांगलं नसतं. मुळं आपलं काम चोख करत असतात. असेल तशा मातीत पाय रोवायचा प्रयत्न करत असतात..."

साहिलला यातलं बरचंसं काही कळलं नाही. त्याने एकदा बाबाच्या चेहर्याकडे पाहिलं आणि मग परत पळत आत गेला. अविनाशलाही आपण अकारण फिलॉसॉफिकल झालो असं वाटलं. तो स्वत:शीच हसला. त्याने परत मोर्चा बागेकडे वळवला.

अर्ध्या-पाऊण तासाने तो घरात आला तेव्हा चांगलाच घामाघुम झाला होता. आंघोळ करून अनुजाने केलेला मस्त चहा पीत थोडावेळ शांत बसावं असा त्याचा विचार होता. तो शॉवर घेऊन बाहेर येतोय, इतक्यात अनुजाने त्याच्या एका हातात चहाचा मग ठेवला.
"अरे वा! मनकवडी आहेस!"
"मनकवडी कशाला? आठ वर्ष संसार केल्यावर इतकं तर मला समजलंच आहे, की पतीदेवांना बागकाम
केल्यानंतर चहा लागतोच लागतो. तोही बायकोच्या हातचा..." ती हसतच म्हणाली. बोलता बोलता तिने त्याच्या दुसर्या हातात त्याचाच सेलफोन दिला.
"हे काय?" अविनाशने गोंधळून विचारले.
"तू बाहेर होतास तेव्हा बाबांचा फोन आला होता. त्यांचा आवाज थोडा गंभीर वाटला..."

चहाचा घोट घेताघेता काय झालं असेल याचा विचार करतच त्याने बाबांचा नंबर लावला. नेहेमीप्रमाणे आठ-दहा रिंग वाजल्यानंतरच बाबांचा विशिष्ट हॅलो ऐकू आला.
"बाबा, अवि बोलतोय. मगाशी फोन केला होतात ना.. बरे आहात ना? आई कशी आहे?" त्याने एकदम सरबत्ती केली..

"अरे हो हो. आम्ही ठीक आहोत. मी वेगळ्याच कारणाकरता फोन केला होता.." एवढं म्हणून ते थांबले.

"बाबा, बोला ना? काय झालंय?" अविनाश इकडे गोंधळला. बाबा असे आढेवेढे का घेत होते?

"अरे परवा अण्णाचा, सातार्याचा अण्णाकाका.. त्याचा फोन आला होता. सहा जूनचा मुहूर्त काढलाय. येताय ना तुम्ही?"

"बाबा.." अविनाश जरासा वैतागून काही बोलणार होता, इतक्यात बाबाच पुढे म्हणाले, "हे शेवटचंच. मग संपलंच सगळं. या रे. मी अजूलाही सांगितलंय. तो येतोय. तुम्हीही सगळे या. आणि हे बघ, अनुजाला रजा मिळत नसेल, तरी तू येच. साहिलला घेऊन ये बरोबर. त्याच्या शाळेला सुट्टीच आहे ना? आम्ही वाट बघतोय. सहा जून लक्षात ठेव रे. त्या आधी आणि नंतर दोन दिवस असे ठेवून या.. नाही म्हणू नकोस अवि.." त्यांच्या स्वरात अजीजी डोकावली आणि अविलाच कसंतरी झालं.

"बाबा, का तुम्ही त्या माणसांना इतकं धरून ठेवता हे मला अजूनही समजलं नाहीये.. "

"माणसं नव्हेत रे, आपलं गाव आहे ते.. निदान माझं तरी आहे."

"काहीही असो. मला हे काही पसंत नाही, मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे. आठवडाभर रजा पडते माझी आणि अजूचीही. पण तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही येतो. आम्हाला तिकडे अजून काहीतरी करायला भरीला पाडू नका.." त्याने निर्वाणीचं सांगून टाकलं.

"नाही रे बाबा. फक्त या, बस. मी करतो बाकी व्यवस्था. बाकी, आमचे साहिलबाबू कुठे आहेत? दे बरं त्याला फोन..." बाबांच्या स्वरातला आनंद लपत नव्हता. शेजारीच खेळणार्या साहिलला त्याने फोन दिला आणि तो विचारात गढून गेला..
**बघता बघता पुण्याला जायचा दिवस येऊन ठेपला. अजय, अविनाशचा धाकटा भाऊ दिल्लीत नोकरीनिमित्त रहात असे. दोघेही संगणक अभियंते होते. अजू अजून अविवाहित होता. अवि, साहिल आणि अजू तिघेही एकत्रच जाणार होते पुण्याला. तो आणि साहिल अजूला दिल्लीच्या विमानतळावर थेट भेटणार होते. अनुजाने ऑफिसला रजा टाकून यायची अजिबात गरज नाहीये हे अविनेच परस्पर ठरवलं होतं.

सर्व आवराआवर करून सामान टॅक्सीत टाकून अवि आणि साहिल दिल्लीकडे निघाले. अवि टॅक्सीत जरा सैलावून बसला. बाबांवर कितीही वैतागला, तरी पुण्याला जाण्याचं अप्रूप होतंच. आजीला भेटायचं ह्या कल्पनेने साहिललाही आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याच्या बडबडीला आणि प्रश्नांना गेल्या काही दिवसांपासून खंड नव्हता. नॉयडासारख्या कॉर्पोरेट शहरात अवि केवळ नोकरीसाठी रहात होता. पुण्यात तो आणि अजू जन्मापासून पार शिक्षण होईपर्यंत राहिले होते. शिवाय तिथे आई-बाबा होते, आजोळ होतं, इतर नातेवाईक होते, मित्र होते. पुण्याची ओढ नैसर्गिक होती. बाबांना पर्ह्याची अशीच ओढ असेल का? हा विचार येताच अवि चमकला. आपण अकारण त्यांच्यावर या बाबतीत वाद घालतो असंही त्याला प्रकर्षाने जाणवलं.

सातार्याजवळचं अगदी छोटं पर्हे हे बाबांचं जन्मगाव. ते खूपच लहान असताना त्यांच्या आई-बाबांचं निधन झालं होतं आणि मग अण्णाकाकाच्या वडिलांकडे ते रहात होते. पाचवीपर्यंत ते तिथेच होते. नंतर ते सातार्यातच वसतीगृहात राहिले. तिथेच राहून शिकले. बारावीनंतर कोणाच्यातरी सल्ल्याने परिक्षा देऊन पुण्यात एलआयसीत नोकरीला लागले, ते पार निवृत्त होईपर्यंत. बाबांचा सातार्यात अण्णाकाकाशी जुजबी संबंध होता, आणि पर्ह्याशी त्यांचा संपर्क सुटून कित्येक वर्ष झाली होती. तरी पर्ह्याचा विषय निघताच ते हळवे व्हायचे. त्यांनाही त्यांच्या बालपणीच्या गावाची ओढ असेल, जशी आपल्याला पुण्याची आहे हे त्याच्या आधी लक्षातच आले नव्हते. बाबांची बाजू कधी समजून घ्यावीशीच वाटली नव्हती. आता पुण्याला पोचलो की या विषयावर बाबांशी एकदा शांतपणे बोलायचे असा निर्णय त्याने घेऊन टाकला.

पुण्याला पोचायला बरीच रात्र झाली, नेहेमीच होत असे कारण विमानाच्या वेळा तशाच होत्या. एरवी आई झोपून टाकत असे. पण या वेळी तीही जागी होती. गेल्या वर्षी दिवाळीत पुण्याला आले होते. त्यानंतर आताच. आई-बाबांच्या चेहर्यावरचा आनंद लपत नव्हता. दुसर्या दिवशी शनिवार होता. हे तिघं उठतात तोवर जवळच राहणारे दोन्ही मामा, मामी, मामेभावंडं भेटायला आले. घर दणाणून गेलं. अजूसाठी मुली सुचवणं हा सर्व बायकांचा लाडका विषय होता. अजूला त्यानिमित्ताने चिडवणे हा तर सर्वांचा आवडीचा उद्योग. हास्यविनोदाला उधाण आलं. त्या गोंधळातही बाबा एरवीपेक्षा जास्त उत्साही दिसत आहेत हे अविनाशने टिपलं.

नाश्ता करून मामाकडची मंडळी गेली आणि सगळेच सैलावले. आईही साहिलला घेऊन जरा टेकली. बाबांनी वाटच बघत असल्याप्रमाणे विषयाला वाचा फोडली.
"बरं वाटलं रे आलात ते. आता मी कार्यक्रम सांगतो.. सोमवारी सकाळी आपण पहाटेच निघू. अजू, मामाकडून उद्याच तू जीप घेऊन ये. थेट अण्णाकडे जाऊ. तिथून पर्ह्याला. उद्यापासूनच जय्यत तयारी असणार आहे असं अण्णा म्हणालाय. एकेकाळी पर्ह्यात रहात होते, त्या बर्याच जणांशी संपर्क झाला आहे म्हणे. बरेच जण येणार आहेत. देवस्थानाचे ट्रस्टी आणि गावकरी असतीलच. वरच्या गावात देऊळ बांधून तयार आहे. आता

सोमवारी सोमेश्वराची पिंड आणि त्याच्यासमोरचा नंदी तेवढा काय तो आपल्या सर्वांच्या साक्षीने हलवायचा आहे. आपण सर्वांनीही थोडा हातभार लावूया नाहीतर नुसतेच सहभागी होऊया. नवीन मंदिरात पिंडीची विधिवत स्थापना झाली, की तिथेच प्रसादाचीही सोय करणार आहेत. तो घेऊन वाटलं तर लगेच परत येऊ. नाहीतर माझा विचार होता, की एक दिवस सातार्यात राहू.."

"अण्णाकाकाकडे?" अविला राहवलंच नाही.

"सातार्यात चांगल्यापैकी लॉज, हॉटेलं आहेत अवि." बाबा एकदम कडकपणे म्हणाले, तसं अवि वरमला. "अजिंक्यतारा पाहू, थोडं फिरू. साहिलबाबाला माझं कॉलेज दाखवतो, मग संध्याकाळ होईपर्यंत येऊ परत. पण तुम्हाला सातारा नको असेल तर हरकत नाही. सोमवारचा कार्यक्रम महत्त्वाचा. तो करून लगेच येऊ. मग एखाद दिवस राहून तुम्ही वाटलं तर जा लगेच परत दिल्लीला.."

"कशाला लगेच परतायच्या गोष्टी? रजा काढली आहेत ना रे आठवड्याची? रहा मग ठरल्याप्रमाणे. काही स्थळं आली आहेत. अजूला पसंत पडलं एखादं तर तो कार्यक्रम करता येईल.." आईने हस्तक्षेप केला.

"बरं. आईचंही बरोबर आहे. चालेल ना तुला अजू? आणि अवि तुला?"

"बाबा, असं काय विचारताय? राहतोय आम्ही ठरल्याप्रमाणे." अजूनं सांगून टाकलं.

"उतावीळ बघा कसा झालाय!" अविला थट्टा करायचा मोह आवरला नाही. सगळे हसले. अविनं पुढे विचारलं, "बाबा, तुम्हाला आठवतं का हो पर्हे?"

"अरे म्हणजे काय! माझं जन्म नाही का तिथला. घर तर सोमेश्वराच्या शेजारीच. सोमेश्वराच्या अंगणातच असू आम्ही सर्व वेळ. शाळा कशीबशी करायची आणि सोमेश्वर गाठायचा. तेव्हा तर देऊळही अगदी लहान आणि साधं होतं. अंगणही मातीचं. पक्कं देऊळ पुष्कळ उशीरा बांधलं. वडाला पार, अंगणात फरश्याही नंतरच्याच. माझ्या आठवणीत ते छोटं देऊळच आहे. आईला मी कधी पाहिलंच नाही. मला जन्म देऊन गेली बिचारी. वडिल कसल्यातरी आजाराने नंतर गेले. त्यांचा चेहरा अगदी अंधुक आठवतो. फोटो वगैरेची पद्धत नव्हती तेव्हा.. त्यामुळे तो सोमेश्वरच माझे आई-वडिल.."

"अण्णाकाकाकडे रहात होता ना तुम्ही?"

"रहात होतो म्हणजे काय, खायला-झोपायला मिळायचं, इतकंच. कुटुंब मोठं. अण्णाचे वडिल आणि माझे वडिल असे दोघंच भाऊ. चार आत्या होत्या. बाबा गेल्यानंतर सगळं त्या काकांवर पडलं. काकू चांगलं वागत नसे. अण्णा आणि त्याचे अजून वरचे दोघे भाऊ तू पाहिलेच आहेस. सगळे तसे आडदांड होते. मी एकटा सापडायचो त्यांना. म्हणून शक्य तितका वेळ मी घराबाहेर काढायचो. मी आणि माझे मित्र असे मिळून आम्ही

सोमेश्वराच्या अंगणात खेळत असू. सोमेश्वराच्या आशीर्वादाने अभ्यासात बरा होतो. थोडी शिष्यवृत्ती मिळाली म्हणून पाचवीपासून होस्टेलवर राहिलो सातार्याला. मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत परत काकांकडे जायचं म्हणजे नकोसं व्हायचं, पण दुसरा आसराच नव्हता. आत्यांची लग्न झालेली. त्यांना भाच्याला सासरी ठेवून घेण्याइतका अधिकार नव्हता. आईच्या आई-वडिलांना भीती, की याला ठेवून घेतला, तर आईवेगळ्या मुलाचा भार आपल्यावरच पडेल. म्हणून तेही दुरावले. ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच पुण्यात कायम नोकरी लागली आणि आता परत काकाकडे जायला नको या विचारानेच मला सुटल्यासारखं झालं.."

बाबांचं बालपण किती दु:खद गेलं आहे याची अवि-अजूला माहिती होती, पण अचानक आज ते सगळंच अंगावर आलं. तुलनेनं आपलं असलेलं प्रेमळ, सुरक्षित बालपण आणि आता साहिलवर तर दु:खाची सावलीही पडणार नाही अशी असलेली परिस्थिती.. या पार्श्वभूमीवर बाबांचं दु: आणखीनच गडद झालं.

"बाबा, तरीही तुम्हाला पर्ह्याला जावंसं वाटतंय?"

"त्या सोमेश्वरासाठीच रे. तो परिसर, ते देऊळ हाच काय तो माझा ठेवा आहे. तुम्हाला आजवर कधी एकदाही मी पर्ह्याला जायचा आग्रह केला का? पण आता ते देऊळच नवीन विस्तारित नदीपात्रात बुडणार आहे. जिथे माझ्या आयुष्याची सुरूवात झाली, ते तुम्हाला एकदा तरी दाखवावंसं वाटतंय रे. एकदा शेवटचं काय ते डोळे भरून मीही साठवून घेतो. मग तीही नाळ कापली जाईल." बाबा एकदम गप्प झाले.

"ओके बाबा. तुम्ही म्हणाल तसं करू आपण. आता जास्त विचार करू नका. आणि मी या आधी जी काही चिडचिड केली, त्यासाठी सॉरी.." अवि मनापासून म्हणाला.
**

सोमवारी पहाटे सहालाच सगळेजण सातार्याला निघाले. साहिलनेही काहीही तक्रार करता पटपट आवरलं. बाबा जास्त काही बोलत नव्हते, पण पर्ह्याला जायची त्यांची ओढ त्यांच्या चेहर्यावरून आणि देहबोलीमधून स्पष्ट दिसत होती. आईला बाबांची जरा चिंताच वाटत होती. पण आजवर दिली तशी फारसा निषेध नोंदवता निमूटपणे त्यांना साथ द्यायची हे तिनं ठरवलं होतं. अवि-अजू त्या दिवसापासून जरासे गंभीर झाले होते. कोणीच काही फारसं बोलत नव्हतं. कारणं वेगवेगळी असली तरी पर्ह्याला काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.

वाटेत चहा-नाश्ता घेऊन अण्णाकाकाच्या इमारतीपाशी त्यांची गाडी पोचली तेव्हा नऊ वाजायचेच होते. सातारा आता एक गाव नसून शहरच झालं आहे असं अविला वाटलं. सातार्यातही तो फारसा आलाच नव्हता. सगळे सज्जनगडावर दोनदा गेले होते तेव्हा आणि एकदा कासला गेले होते तेव्हा असेच ओझरते एकदोनदा अण्णाकाकाकडे तासभर आले होते. बाबांनी जाणूनबुजून त्यांची या नातेवाईकांशी ओळख तर राहील, पण संबंध जिव्हाळा किंवा तिटकारा यापैकी कोणत्याच टोकाला पोचणार नाहीत याची काळजी घेतली आहे, हे त्याला बाबांच्या परवाच्या बोलण्याच्या पार्श्वभूमीवरून जाणवले. त्यांच्या परीने बाबांनी आपल्यावर जमेल तशी सावली धरली आहे हे ही त्याला झटक्यात जाणवले. बाबांबद्दल त्याच्या मनात कृतज्ञता दाटून आली. साधे सरळमार्गी, काहीसे सामान्य असलेले बाबा याबाबतीत त्याला एका प्रचंड मोठ्या वटवृक्षासारखे भासले.क्रमश:

0 comments: