September 29, 2014

प्रतीकप्रतीक
लेखिका- मृणालिनी वनारसे
मेनका प्रकाशन

प्रतीक महानगराजवळ असलेल्या पण अजूनही खेडेपण जपून असलेल्या टाकळी नावाच्या गावात राहणा-या प्रतीक नावाच्या मुलाची ही गोष्ट. प्रतीकला एके दिवशी खेळता खेळता ओढ्याच्या काठावरच्या मातीत पुरलं गेलेलं एक पुरातन नाणं सापडतं. अडीच हजार वर्षापूर्वीचं हे नाणं प्रतीकला कुठे कुठे घेऊन जातं? अत्यंत संवेदनशील आणि संस्कारशील वयात त्याला मिळालेलं हे नाणं त्याच्या अनुभवाच्या, मनाच्या, समजूतीच्या कक्षा कसा वाढवतं याचा सुंदर प्रवास म्हणजे ’प्रतीक’. 

प्रतीकला आणि त्याच्या मित्रांना सापडलेल्या नाण्याचं कौतुक आहे, पण त्या नाण्याचा प्रवास कसा रोचक आहे; इतकंच नाही तर तो ऐतिहासिक दृष्टिनेही कसा महत्त्वाचा आहे हे समजण्याचं त्यांचं वयही नाही आणि कुवतही. हे नाणं जुनं असलं तरी आजच्या जमान्यात चालत नाही; ते वाण्याला दिलं तर त्याची चिक्कीही मिळणार नाही हेच त्यांच्या दृष्टीने हिरमोड करणारं सत्य! रूढार्थाने कोणत्याही शहरी चकचकाटाने अस्पर्श असलेल्या या मुलांसमोर घरची बेताची परिस्थिती, शिक्षणात तसा कमीच असलेला रस, शेती उठलेली गावं, कमी होणारी नैसर्गिक साधनं अशा अनेक प्रश्नांची उत्तर त्यांच्या समजूतीप्रमाणे काढायच्या विवंचनेत पडायला लागली आहेत. तरीही त्यांची मनं मात्र अजूनही कोवळी आहेत. पाठांतरापेक्षाही त्यांना गाणी, गोष्टी, कहाण्या यांच्यात रुची आहे. 

ते नाणं तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वीचं कुंतल जनपदाचं आहे हे प्रतीकला समजतं ते मीनलमुळे. मीनल ही गावातल्या ’बामन’ दांपत्य सीमामावशी आणि वसंतकाकांची भाची. मीनल पुरातत्वाची विद्यार्थिनी आहे, पीएचडी करते आहे. साधारण पंचविशीची मीनल हुशार तर आहेच, पण अतिशय मेहनती, उत्साही आणि सहृदय आहे. तिच्यात एक अंगभूत maturity आहे आणि तिचे विचार स्पष्ट आहेत. सीमामावशीकडच्या एका शिबिरात तिची आणि प्रतीकची भेट होते. प्रतीक आणि त्याच्या वयाच्या अनेक मुलांमध्ये जो एक निरागस उत्साह, कुतुहल असतं ते तिला खूप आवडतं. 

मीनलला त्या नाण्याचं गांभीर्य समजतं. तिच्या निमित्ताने आपल्यालाही कितीतरी प्रश्न पडतात. मुळात आपले पूर्वज भटके होते. चांगल्या हवामानच्या शोधात, चांगल्या खाण्याच्या शोधात ते एका प्रदेशातून दुस-या प्रदेशात सतत स्थलांतर करत. प्राण्यांची भीती, नैसर्गिक आपत्ती ही कारणंही होतीच. त्यानंतर माणूस नदीच्या काठापाशी स्थिरावला, शेती करू लागला. भटकं आयुष्य सोडून टोळीने एकाच जागी स्थायिक व्हावं असं त्याला का वाटलं असेल? शेती काही बारमाही नसते. पीकं आलटून पालटून येतात. कोणत्या ऋतूमध्ये काय पिकतं याचा शोध लागण्यासाठी किती शेतीचक्र फिरायला लागली असतील? तरीही त्याला शेतीचं आकर्षण वाटलं आणि तो पर्यंत मुक्त, सर्वांच्या मालकीची असलेली जमिन त्या नंतर बांधली गेली. तिच्यावर मालकीहक्क प्रस्थापित झाले. हळूहळू धान्याच्या बदल्यात कामं करणे, एका धान्याच्या बदल्यात दुसरे असे व्यवहार सुरू झाले. या नंतर कुठे नाणी आली. पण आली आणि बघता बघता सगळंच बदललं. आत्तापर्यंतचं सर्वात ताकदवान चलन म्हणजे नाणी; सगळीकडे चालणारं म्हणून चलन. माणूस यानंतर स्थिरावलाच. शेती, कुटुंब, गाव, राजा, मालकी, हक्क हे सगळं आपसूक एकानंतर एक घडत गेलं. संपत्ती, धन, नाणी ज्यांच्याकडे जास्त ते अधिक ताकदवान हे समीकरण झालं. तो एक काळ आणि आजचा काळ. जिथे पैसा हेच सर्वस्व. पैसा असेल तर काहीही विकत घेता येतं. पैसा नसेल तर तुमची किंमत शून्य.

शहरं फुगली, तशी धनाढ्य लोकांची नजर गावांवर पडली. जो शेतकरी आधीच बेभरवशी शेतीने ग्रस्त आहे त्याला एकरकमी लाखो पैसे देऊन त्याची जमिन मिळवायची. जे सहज देणार नाहीत त्यांच्यावर दबाव टाकायचा. शेतजमिनींवर टाऊनशिप्स बांधायच्या, माती उपसून बांधकामात वापरायची, ओढे, नाले, नद्यांची पात्र बुजवायची नाहीतर वळवायची. पैसा पाहिजे फक्त. निसर्गाचा मग विचार करायचा नाही. नवीन शहरं निर्माण करायची. तिथे नवी बांधकामं करायची, नवीन वसाहती वसवायचे, नवीन उद्योग उभारायचे आणि खूप पैसा निर्माण करायचा. इतका पैसा आहे तर तो सगळ्यांनाच मिळूदे. त्याचा छनछन आवाज सर्वांनाच आवडतो. एक बारिकशा प्रश्नाचा आवाज तेवढा दबतो तो हा की अजून तरी पैसा झाडावर उगवत नाही. उद्या तुमच्याकडे पैसे असतील पण बाजारात विकत घ्यायलाही अन्न आणि पाणी नसेल तर तुम्ही खाल काय? नोटा की नाणी? 

मीनलच्या वैचारिक साखळीतून आपण अलगद या आवर्तनात पोचतो आणि मग आपल्याला जाणवते ती या पैशाची भयानकता. मीनलच्या या प्रवासात तिच्या बरोबर तिचा आवडता मित्र आहे- अनिकेत. अनिकेत आजच्या बुद्धीमान तरूणाचे प्रतिनिधित्व करतो. अनिकेत कॉम्प्युटर इंजिनियर आहे. खूप पैसा कमावतो. विचारही करतो. खेडेगावात तो कधीही राहिलेला नाही. पण तिथलं जीवन त्याला आकर्षून घेतं. केवळ जीवनावश्यकच वस्तू आणि गोष्टी वापरून माणूस जगू शकतो हे सत्य त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतं ते टाकळीतच. माणसांना हाताळण्याचं कौशल्य अनिकेतकडे आहे. प्रतीकचे आई-वडिल, प्रतीकचे मित्र, सीमामावशी-वसंतकाका आणि खुद्द मीनल यांना अनिकेत सहजपणे समजून घेऊ शकतो. त्यांना प्रश्न विचारता विचारता त्याला स्वत:ची उत्तरं सापडतात. ती शाश्वत आहेत का? संपूर्ण आहेत का? जे त्याला सापडलं आहे ते कायम टिकणार आहे का? माहित नाही. पण आज अशी कोणती गोष्ट आहे जी चिरकाल टिकू शकेल? मग जे जसं आहे तेच घुसमटीविना का जगू नये?

प्रतीकच्या नशीबाने त्याला इतके गहन प्रश्न पडत नाहीत. तो आठवीत गेला आहे. तेरा-चौदा वर्षांच्या मुलांमध्ये असलेला अनेक विषयांबद्दलचा गोंधळ प्रतीकच्याही मनात आहे. परिस्थिती त्याच्यासमोरच आहे. वडिलांची गेलेली नोकरी, शेतीवर असलेला पुढा-यांचा डोळा, नवीन मुंबईची तहान शमवण्यासाठी त्यांचं गाव उठवून त्या जागी उभं होणारं धरण, शहराचं आकर्षण, भविष्यात आपण काय करायचं आहे याचा गोंधळ.. त्याच्या लहानग्या मेंदूला शिणवण्यासाठी इतके प्रश्न खूप आहेत. त्यातच मीनलताई त्याला त्या नाण्याच्या बळावर थेट दिल्लीला घेऊन जाते. आपल्या गावाबाहेरही न पडलेल्या प्रतीकसाठी हे दडपण खूप जास्त असतं. कसं सावरतो तो स्वत:ला या काळात?  

आजच्या बाजारात न चालणारं अडीच हजार वर्षापूर्वीचं एक नाणं निमित्तमात्र ठरतं ते प्रतीक, मीनल आणि अनिकेतचं आयुष्य बदलून टाकण्यासाठी. 

या नाण्याची गोष्ट आणि या तिघांचीही आयुष्य एकमेकांमध्ये मृणालिनी यांनी इतकी सुरेख गुंतवली आहेत की पुस्तक अतिशय रंजक होतं. मृणालिनी यांचा छोटासा परिचय चांगलाच इम्प्रेसिव्ह आहे. गेली पंधरा वर्ष त्या निसर्गशिक्षण आणि नैसर्गिक साधनसंपतीचं व्यवस्थापन या क्षेत्रात काम करतात. ’पर्यावरणीय तत्त्वज्ञान’ ही पदवी पुणे विद्यापीठातून तसंच, ’संस्कृत’ आणि ’इंडॉलॉजी’ या विषयात त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्यांच्या या विषयातील ज्ञानाची तसंच विस्तृत कार्याची पावतीच या पुस्तकामधून मिळते. एकही preachy शब्द न वापरता त्या आपल्यासमोर आपणच निर्माण केलेला प्रश्नांचा भस्मासूर उभा करतात. विद्यापीठ पातळीवर चालणारे राजकारण, नामवंत प्राध्यापकांचे ईगो सांभाळणे इथपासून ते गावपातळीवरचं राजकारण यावर त्यांची मार्मिक टिप्पणी त्यांच्या अनुभवविश्वाची झलक दाखवते. 

ही कहाणी कोण्या एका प्रतीकची नसून, नाणं हेच एक प्रतीक आहे. बदललेल्या जीवनशैलीचं. निसर्गनियमांविरुद्ध जाऊन निसर्गावर अतिक्रमण करून ताठ उभं राहिलेल्या मानवजातीचं. -हास झालेलाच आहे. तो अजून होत राहणारच आहे, की त्यातून आणखी काही वेगळंच निष्पन्न होणार आहे? त्यासाठी वाचायलाच हवी ही प्रतीकची गोष्ट.


0 comments: