November 7, 2013

अंतरीच्या गूढ गर्भी

सुमारे तासभर वेटिंग रूममध्ये थांबल्यानंतर अनुया आणि तिच्या सासूबाईंना डॉ. म्हात्रेंच्या खोलीत प्रवेश मिळाला. त्यांचा दवाखाना तसा दवाखाना वाटावा असा नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे तिथे शांतता होती खूपच. इतर पेशंट नव्हते, त्या दोघीच होत्या. काऊन्टरवर एक त्या वातावरणाला शोभून दिसेल अशी शांत हसतमुख रिसेप्शनिस्ट होती. अनुया वेळेच्या आधीच पंधरा मिनिटं आली म्हणून तिने तिला बसायला सांगितलं होतं. नंतर आतल्या पेशन्टला वेळ लागायला लागला, तशी त्यांची माफीही मागितली होती. बसायला प्रशस्त जागा, वाचायला ताजी मासिकं आणि कोरे कागद असलेलं एक पॅडही होतं. टेबलच्या पायाला बांधलेली दोन पेनंही होती. अनुयाला त्यांची गंमत वाटून तिनं बसल्याबसल्या उगाचच एक खरेदीची यादीही करून टाकली होती. सगळा वेळ सासूबाई अगदी शांत बसून होत्या. एक शब्दही न बोलता.

डॉ. म्हात्रे त्या वातावरणाला शोभेलसेच होते. शर्टावर टाय बांधलेला, सोनेरी चष्मा, पांढरे केस.. त्या आत गेल्यागेल्या ते त्यांच्याकडे पाहून हसले.
"नमस्कार, बसा. पहिल्यांदाच येताय ना तुम्ही?"
अनुया पुसटसं हसली. सासूबाई काहीच बोलल्या नाहीत. मात्र आता त्या अलर्ट होत्या. हातातली पिशवी गच्च पकडून ठेवली होती त्यांनी.
"आम्हांला टिळक रोडवर असलेल्या डॉ. पाठकांकडून तुमचं नाव कळलं. ते आमचे, म्हणजे यांचे डॉक्टर आहेत पहिल्यापासून."
"ओह, अच्छा. बरं. तुमच्याबद्दल सांगा मग आजी. तुम्ही बोलत असताना मी हा फॉर्म भरून घेतो. अधूनमधून मी वहीत काही लिहून घेईन. पण माझं लक्ष असेल तुमच्या बोलण्याकडे हं, तेव्हा बोलत राहा. काय त्रास आहे? काही रिपोर्टस् आणलेत डॉ. पाठकांकडून किंवा त्यांनी काही चिट्ठी दिली आहे का माझ्यासाठी?

"मी सांगते सगळं नीट", सासूबाई अचानक संभाषणात घुसल्या. "पेशंट मी नाही. हे आहेत, म्हणजे माझे मिस्टर. गेल्या तीन वर्षांपासून पॅरॅलिसिसनं अंथरुणाला खिळले आहेत हो ते. रिटायर होऊन तीन वर्ष झाली आहेत-नाहीत तोवर हे असं. नाहीतर ते इतके अ‍ॅक्टिव्ह आहेत. रोज फिरायला जातात. तब्येत ठणठणीत. बीपीची गोळीही आत्ता पाच वर्षांपूर्वी लागली. रिटायर झाल्यावर यांचं लग्न केलं आम्ही एकदम थाटात. आणि एक दिवस रात्रीचे झोपेतच मला म्हणाले, डावी बाजू जड लागतेय. मला वाटलं हार्ट अ‍ॅटॅकच आला की काय. त्यात होतं ना असं.. डावी बाजू दुखते. झटकन हिला, महेशला उठवलं. पण छातीत दुखत नव्हतं. महेशनं हात चोळून दिला. मग बरं वाटतंय म्हणाले. अपरात्र होती. म्हणले, झोपतो आता. थोडा वेळ झाला आणि यांच्या तोंडातून काहीतरी अभद्र आवाज आला! बघते तर काय ओठ एका बाजूला कललेले, डोळे काहीतरी विचित्रच. हातही वाकडा झालेला.. डावा. फार घाबरलो आम्ही. मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलंही महेशानं. पण काही उपयोग झाला नाही. ते अपंग झालेच.." बोलताबोलता शारदाबाई उत्तेजित झाल्या.

डॉक्टर लक्षपूर्वक ऐकत होते. अनुया मात्र खिळून ऐकत होती. शारदाबाईंनी समोरच्या ग्लासमधलं दोन घोट पाणी प्यायलं. त्या पुढे सांगायला लागल्या.

"तेव्हापासून आमचं आयुष्यच बदललं हो. हे कध्धी अंथरुणावर झोपलेले नव्हते पाहिले आम्ही. तापबिप असला तर किरकोळ. पण हे असलं दुखणं म्हणजे काय हो... मला तर दुसरं काही सुचत नसे. सतत त्यांची चाहूल घेत असे मी. मसाज, व्यायाम करवून घ्यायला एक मुलगी आली. मग आठ दिवसांनी तिनं सांगितलं, की तुम्ही करून घ्या. म्हणजे तेही काम आलं मला. एक क्षण उसंत नाही. त्यात महेशला फिरती. ही घर बघते सगळं, पण मी त्यांच्यापाशीच. अंथरुणातच ना सगळं. तुम्हांलातर माहीतच आहे. तुम्ही डॉक्टर आहात. सुरुवातीला हे करून घेत होते सगळं हो. पण नंतर मला जवळपास जबरदस्तीच करावी लागायची. सूप पिणार नाहीत. व्यायाम करणार नाहीत. आमच्या खोलीत टीव्ही बसवून घेतला. तो पाहणार नाहीत. अंग पुसायला एका कुशीवरही होत नाहीत हो. विनवण्या करते मी अक्षरश:. काही बोललं तर शून्यात नजर ठेवून बघतात. काही उत्तर देत नाहीत. नुसते पडलेत एका कोपर्‍यात. आणि त्यांच्यामुळे मीही अडकले आहे. डॉ. पाठक म्हणाले, औषधं मी देतो, पण बाकी तुम्ही बघाल. डॉक्टरसाहेब करा हो काहीतरी. सोडवा मला यातून. बघवत नाही मला त्यांच्याकडे."

"अच्छा. बरं ते रिपोर्टस् पाहू मला."

शारदाबाईंनी भली मोठी फाईल डॉक्टरांकडे दिली. तिचं पहिलंच पान त्यांनी पाहिलं आणि विचारात पडले. त्यांचं लक्ष आता कुठे अनुयाकडे गेलं. तिच्या थिजलेला चेहर्‍याकडे पाहतच त्यांनी शारदाबाईंना सांगितलं, "मी आता जरा यांच्याशी बोलतो. तुम्ही पाच मिनिटं बाहेर बसाल का? ही फाईल राहूदे माझ्याकडे, मी देतो पाहून हं..."
त्यांचं बोलून झाल्यानंतर शारदाबाई ऑफचं बटण दाबल्यासारख्या परत शांत झाल्या होत्या. त्यांनी फक्त मान डोलावली आणि त्या बाहेर निघून गेल्या.

"मिसेस राजवाडे.. तुम्हांला काही सांगायचं आहे?"

"त्या जे काही बोलल्या आत्ता ते साफ खोटं आहे डॉक्टर!!" अनुया जवळजवळ ओरडलीच. "माझे सासरे एक्स्पायर झालेत तीन महिन्यांपूर्वीच..."
डॉक्टरांनी थेट अनुयाकडे पाहिलं. एक क्षण तिथे शांतता पसरली.

"हं. त्या फायलीत पहिलाच कागद म्हणजे डेथ सर्टिफिकेट आहे. मला तेव्हाच शंका आली. आता तुम्ही मला पहिल्यापासून सांगा जरा. या सर्रास असा खरंखोट्याचा मेळ घालतात का? एरवी कशा वागतात, बोलतात?"

"अ‍ॅक्च्युअली, त्यांना असं बोलताना मी पहिल्यांदाच पाहिलं, त्यामुळे मला जरा शॉकच बसलाय. अधूनमधून त्या सासर्‍यांचं नाव घेतात. पण ते घरी. असं डॉक्टरसमोर किंवा त्रयस्थ व्यक्तीसमोर पहिल्यांदाच... सासर्‍यांना पॅरॅलिसिस कसा झाला ते सर्व अगदी पर्फेक्ट सांगितलं त्यांनी. पण ते शेवटपर्यंत खूप स्ट्राँग होते मनानं. कधीच खचले आहीत. खचल्या त्या या. माझे सासरे गेले हार्ट अ‍ॅटॅकने. पण पॅरॅलिसिसशी त्यांनी झुंज दिली. त्या म्हणत होत्या, तसं कधीच केलं नाही त्यांनी. खाणं, औषधं, व्यायाम, आमच्याशी गप्पा- जमेल तसं सगळं करायचे. अर्थात, ते बेडरिडन होते. पण तरीही एखादा पॅरॅलिटिक बेडरिडन माणूस जितका हालचाल करू शकतो, तितके ते आवर्जून करत असत. त्याचा त्यांनी कधी कंटाळा नाही केला. ही जी सगळी लक्षणं सासूबाईंनी सासर्‍यांची म्हणून सांगितली, ती त्यांची स्वत:ची आहेत. म्हणूनच मला धक्का बसलाय! त्या खात नाहीत काही. त्या दिवसचे दिवस गप्प असतात. त्या टीव्ही बघत नाहीत. त्या कोपर्‍यात बसून असतात. हरवलेल्या असतात. आणि मग कधीतरी इतकं बोलतात, की धाप लागते त्यांना. कधीकधी दिवसभर बाहेर जातात. सासरे गेल्यानंतर त्यांना रिकामपण आल्यासारखं झालं आहे. काय करावं हे सुचत नाही. त्यांनी ते गेलेत हे मान्यच केलेलं नाहीये. फोनवर, शेजारी वगैरे मधूनच ’मला जायला हवं, त्यांना औषध द्यायचंय’ वगैरे म्हणतात. मला त्यांचं हे वागणं काही ठीक वाटलं नाही. म्हणून मी पाठकांना सांगितलं आणि त्यांनी तुमच्याकडे रिफर केलं. म्हणजे त्यांना समजतंय, की त्या विचित्र वागत आहेत, पण ते मोकळेपणानं अ‍ॅक्सेप्ट न करता, त्या सासर्‍यांवर ब्लेम टाकत आहेत.. असं काही आहे का? डॉक्टर त्यांना मदत करा, प्लीज हेल्प हर.."

"आय सी. आता आलं लक्षात. त्यांना अचानक रिकामपण आलं आहे, त्याचा परिणाम असावा हा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू कधीकधी स्वीकारला जात नाही पटकन. त्यातून तुम्ही म्हणलात तसं दीर्घ काळ त्यांना तेच एक काम होतं. त्या स्वत:ही म्हणाल्या मघाशी, की त्यांना अडकल्यासारखं वाटत होतं आणि आता ते गेल्यानंतर त्यांना दुसरा उद्योगच नाही, असं झालंय असं वरवर वाटत आहे. हरकत नाही. औषधं देतो मी. पण त्या गोळ्या त्या नीट वेळेवर घेतील याकडे लक्ष द्या तुम्ही. शिवाय, त्यांचं मन कशात गुंततंय का ते पाहा. पण त्यांच्यावर काही उद्योग करण्यासाठी मुळीच जबरदस्ती करायची नाही. एकदा सुचवून पाहायचं. केलं काही तर ठीक आहे. नाहीतर दुसर्‍या दिवशी परत विचारायचं. त्यांचे काही नातेवाईक, क्लब वगैरे होते का आधी? तिथे जमलं तर घेऊन जा. मन रमवणं हे महत्त्वाचं आहे त्यांचं. आणि मी देतो ती औषधं आहेतच. आपण अजून दोनतीन सिटिंगही घेऊ त्यांची. म्हणजे त्यांच्या मनात काही साचलेलं दु:ख असेल, त्रास असेल तर त्याचाही निचरा होईल. ठीक आहे?"

"थँक्स डॉक्टर! अं.. तुम्हांला अजून एक सांगायचं होतं आमच्याबद्दल. माझे मिस्टर महेश - त्यांची फिरतीची नोकरी आहे. घराबाहेर असतात महिन्यातले पंधरा दिवसतरी. त्यांना एक बहीण आहे, जी जळगावला असते. तिची फॅमिली मोठी आहे आणि ती सहजपणे इकडे येऊ शकत नाही. आणि मी प्रेग्नन्ट आहे. मला सहावा महिना आहे. मी माहेरी जाणार आहे दोन महिन्यांनी. मला खूप काळजी वाटतेय डॉक्टर त्यांची. तशा त्या आणि मी खूप क्लोज नाही, कारण आमचं लग्न होऊन मी घरात रुळेस्तोवर सासरे आजारी झाले आणि त्या त्यात गुंतल्या. पण मनानं त्या खूप चांगल्या आहेत. त्यांनी न थकता त्यांची सेवा केली. नर्ससुद्धा लावली नाही मदतीला. आता सासरे गेल्यानंतर त्यांनी शांत, आनंदी असावं असं वाटतं मला. त्यांनी सासर्‍यांची अफाट सेवा केली, त्यामुळे मी म्हणतेय, की आता त्यांनी पूर्ण आराम करावा. पण त्या असं काहीतरी वेगळंच वागायला लागल्यात, याचं मला प्रचंड टेन्शन आलंय. सध्या मी घरी असते सोबतीला त्यांच्या. मग मीही जाईन. माझी आई मला इकडे या अवस्थेत राहू देणार नाही. मगतर त्या पूर्ण एकट्या पडतील. मग त्यांची तब्येत अजूनच बिघडली तर? बरं, त्या इतक्या विचित्र वागतात, की माझं बाळंतपण त्यांच्याच्यानं निभावणारही नाही. मी गर्भार आहे, हेच मुळात विसरल्या आहेत त्या.." बोलताबोलता अनुयाला हुंदका अनावर झाला.

"आय सी. आय सी. हे बघा. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तेही महत्त्वाचं आहेच. डोन्ट वरी. आपण औषधांचा कसा उपयोग होतोय बघू. ओके? या गोळ्या घ्या. आणि तीन आठवड्यांनी मला दाखवायला आणा."
***

अनुया लक्षपूर्वक त्यांना गोळ्या देत होती, त्याचा परिणाम असावा, किंवा ते एका मानसोपचारतज्ज्ञाकडे गेले, त्याचा असावा, पण शारदाबाईंचं वागणं बरचसं नॉर्मलला एका आठवड्यातच आलं. मुळात त्या दुपारी दोन तास आणि संपूर्ण रात्रभर शांत झोपायला लागल्या. त्यामुळे त्यांचं मन शांत झालं. अर्थात, अधूनमधून त्या हे जग विसरायच्या. अजूनही त्या बाहेर पडून भजनी मंडळात किंवा शेजारीपाजारी जात नव्हत्या. घरातच असायच्या, पण शांतावल्या होत्या. तिच्याशीही थोड्या गप्पा मारायला लागल्या जेवताना वगैरे. त्यांच्या गेल्या काही महिन्यांच्या काळजीमुळे अनुयाचं बीपी मात्र वाढलं होतं. तिच्या डॉक्टरनं तिला सक्त तंबी दिली होती स्ट्रेस कमी करण्यासाठी. थोडी विश्रांती होईल, थोडा विरंगुळा होईल म्हणून अनुयानं सासूबाईंच्या बहिणीला, संगीतामावशींना फोन केला. त्या चार दिवस राहायला यायला तयार झाल्या.

"आई, संगीतामावशी येणार आहेत उद्या आपल्याकडे राहायला."
"कशाला?" शारदाबाईंनी अचानक तीव्र, टोकदार शब्दात आक्षेप नोंदवला, तशी अनुया गडबडली.
"अहो सहजच. आपल्या दोघींनाही विश्रांती आणि विरंगुळा."
"मला काय झालंय? आणि तुला तरी काय झालंय? ठणठणीत आहोत की दोघी. सारखी विश्रांती काय घ्यायची असते गं तुम्हा मुलींना? संगीताची अघळपघळ बडबड यांना मुळीच आवडत नाही! मागे एकदा मी तिला जवळपास परतच पाठवलं होतं इतका यांना त्याचा त्रास झाला. कळव तिला, काही यायचं नाही म्हणून!"
त्या एकदम निर्वाणीचं बोलून तिथून गेल्याच आणि अनुया परत घाबरली.

परत ’यांचा’ उल्लेख? कुठली दुखरी तार छेडली गेली होती का नकळत? तिनं त्यांच्या गोळ्या तपासल्या. सकाळची गोळी घेऊन झाली होती. म्हणजे हे अजून काही वेगळं होतं, की गोळ्यांचा परिणाम होत नव्हता? म्हणजे मावशींना बोलवायचं की नाही? त्यांना यांनी घरातच येऊ नाही दिलं तर? किंवा अपमान केला तर? ती सैरभैर झाली. तिनं सासूबाईंचा कानोसा घ्यायचा ठरवला. त्यांच्या खोलीत ती गेली, तर सासूबाई मूकपणे रडत होत्या. अनुयाला पोटात गलबललं अगदी.

"आई, काय झालं? का रडता?" तिनं अगदी मृदूपणे त्यांना विचारलं.
"अगं तुला माहीत नाही ही संगीता. ती पहिल्यापासूनच पुढेपुढे करणारी, जादा स्मार्ट माझ्यापेक्षा. यांच्या सारखंसारखं पुढेपुढे करायची. लाडंलाडं बोलायची. धाकटी ना माझ्यापेक्षा. आमचं लग्न झाल्यावरही माझ्याकडे राहायला म्हणून महिनामहिना यायची. आणि हेही तिच्याशी अगदी कौतुकानं बोलायचे हो! आम्हांला असलं काही जमलं नाही कधी. आम्ही पडलो मुखदुर्बळ. मला हे म्हणायचेही, तुझी बहीण चांगली स्मार्ट आहे तुझ्यापेक्षा..."
"आई, पण ही कधीची गोष्ट आहे? कारण मावशी तर कित्येक वर्ष इंदूरला होत्या ना?"
"माझ्या लग्नानंतरची असेल. तिचं लग्न झालं आणि ती इंदूरला गेली म्हणा वर्षा-दोन वर्षानं.. मग बाळंतपणं, लग्नकार्य यांतच झाल्या भेटी.. मग राहायला आलीच नाही माझ्याकडे.." त्या बरंच मवाळपणे म्हणाल्या..
अनुयानं सुस्कारा सोडला. पस्तीस छत्तीस वर्षांपूर्वीच्या एखादा जुना प्रसंग यांना आठवतोय, पण याच मावशी बाबा आजारी असताना आईंच्या आधार होत्या. असह्य झालं की त्यांच्याशीच बोलायच्या त्या फोनवर. ते कसं विसरतात त्या? त्या येतील तेव्हाचे चार दिवसतरी गोड जावेत, अशी तिनं मनोमन प्रार्थना केली.
***

साधारण एका महिन्यात शारदाबाईंच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली. त्या दोनदा डॉ. म्हात्रेंकडेही जाऊन आल्या. त्यांनीही त्यांना थोडंफार समजावलं, त्यांचं ऐकून घेतलं. आजार शारीरिक नव्हताच, मानसिक होता. त्यामुळे मन स्थिर रहाणं आवश्यक होतं. गोळ्यांनी फरक पडत होता. मावशी येऊन गेल्या ते दिवस बरे गेले. महेशही त्या सुमारास घरी होता, त्यामुळे घरात जरा गप्पा, वेगळं खाणं वगैरे झालं. मावशींनी अनुयाला पूर्ण आराम करू दिला. शारदाबाई मधूनच गप्प व्हायच्या किंवा त्यांचा मूडऑफ व्हायचा. ते सोडता, एकंदर दिवस बरे गेले. त्या मावशींच्या सोबतीनं बाहेरही पडल्या, जवळपास चक्कर मारून आल्या. मात्र अनुयेवर त्या खूपच अवलंबून राहायला लागल्या होत्या. तिनं काही सांगितलं, तरच काम करणार, तिनं दिल्या कीच गोळ्या घेणार, काही शोधायचं असलं की तिलाच सांगणार... ही एक नवीच समस्या अनुयासमोर उभी राहिली होती. तिला सातवा कधीच लागला होता. आठवा लागायच्या आत माहेरी जायचं होतं. सासूबाई बाकी ठीक वागत असल्या, तरी तिच्या प्रेग्नन्सीची मात्र मुळीच दखल घेत नव्हत्या. तिचं आकारमान तर आता लपत नव्हतं, हालचाली मंदावल्या होत्या... आणि कोणत्याही बाईला गर्भार बाई उमजतेच. पण या जाणूनबुजून असो वा नकळत, तिच्या या अवस्थेविषयी मात्र चकार शब्द काढत नव्हत्या.

अचानक तिच्या नणंदेचा फोन आला.
"अनुया, कशी आहेस गं?"
"बरी आहे."
"आणि आई?"
"स्टेबल आहेत बर्‍यापैकी."
"खूपच करतेस गं तू तिचं.. मी इथे बसून फक्त प्रश्न विचारू शकते तुला.." ती एकदम भावूक झाली.
"अहो, असं काही नाहीये.. पण खरं सांगायचं तर, आता मी गेल्यावर काय होईल, याची चिंता आहे मला.."
"होईल गं काहीतरी. तू नको चिंता करूस. मी महेशशी बोलते. नर्स किंवा बाई ठेवू आपण. बरं, मी हे सांगायला फोन केला, की मी परवा येत आहे.."
"अरेच्चा! अशा अचानक?" अनुयाला थोडा आनंद झालाच. घरातलं वातावरण नाही म्हणलं तरी उदास होतंच. कोणी आलं तरच काय ते हसणंबोलणं व्हायचं.
"अचानक म्हणजे? आईनं तुझ्याकडे दुर्लक्षच केलं, नाही म्हणलं तरी.. तुझं घरच्याघरी डोहाळेजेवण करायचं असं म्हणतेय मी.."
"अहो, पण.."
"आता नाही म्हणू नकोस. मी सगळं ठरवलंय.."
"पण आई.."
"मी समजावेन तिला.. तू नको काळजी करूस. आईला सांग, मी येतेय. ठेवू आता फोन?"
अनुया मनातून आनंदली. तशी कौतुकाची अपेक्षा कोणाकडून नव्हती, पण मनातून आपल्या बाळाचे लाड घरातूनच होत नाहीत, याची बोच होतीच. महेश असला की त्याच्याबरोबर काहीतरी खाणं होई, इतकंच. सासूबाई आपली विचारपूसही करत नाहीत याचं मात्र तिला मनोमन वाईट वाटे.
***

शोभा आली, तसं घरातलं वातावरणच बदललं. तिच्याबरोबर तिची मुलंही आली होती, शाळा बुडवून. त्यामुळे घरात एक चैतन्य पसरलं आपोआप. शोभा आली तेव्हा शारदाबाई तटस्थच होत्या. नंतर तिनं हळूच विषय काढला..
"आई, अगं तुझ्या लक्षात आलं नाही का, तू आता आजी होणारेस ते?"
"हो. आलंय माझ्या लक्षात. पण त्याचं काय?" त्या अत्यंत कोरडेपणानं म्हणाल्या..
शोभाला धक्काच बसला.
"म्हणजे आई, तुला माहीत होतं. मग अशी का वागलीस तू तिच्याशी? तिच्याशी दोन गोड शब्द बोलली नाहीस याबद्दल, की तिला दोन पदार्थ खायला करून दिले नाहीस.. माझे तर किती लाड केले होतेस.."
"त्यात काय! मुलं होतच असतात बायकांना.. मला काही विशेष नाही वाटलं.." त्यांनी झटकूनच टाकलं..
मग मात्र शोभानं पवित्रा बदलला..
"ते बरोबर आहे आई.. पण अनुयाच्या पोटी बाबाच जन्म घेणार असतील तर...?"
हे ऐकल्यावर शारदाबाई चमकल्या..
"बघ हं आई, बाबा गेले आणि अनुयाला दिवस गेले.. तसंच असेल का गं?"
"अगंबाई, हे माझ्या लक्षातच नाही आलं! असेल का गं असंच? अरे बापरे! मगतर मी त्यांची काहीच सेवा नाही केली..."

तरातरा त्या उठून बाहेर आल्या. अनुया पुस्तक वाचत बसली होती. अचानक त्या तिच्या पायाशीच बसल्या..
"अहो! मला माफ करा. माझ्याकडून दुर्लक्ष झालं तुमच्याकडे. अनुया! मला माफ कर.. मी तुझ्याकडे लक्षच दिलं नाही. काय पाप घडलं हे माझ्याकडून?" असं म्हणत त्या रडायलाच लागल्या.

अनुया हबकली. ’आता हे काय?’ असे भाव तिच्या चेहर्‍यावर आले. इतक्यात शोभानं ’सगळं ठीक आहे’ अशी खूण केली तिला.

शोभानं तिचं डोहाळेजेवण साधंच पण सुरेख केलं. ती तिच्याबरोबरच बरंच काही सामान घेऊन आली होती. अनुयाचे माहेरचे काही नातेवाईक, संगीतामावशी, तिच्या सुना, काही गावातल्या बायका अशा सगळ्या मिळून दहाएक जणी होत्या. शिवाय कात टाकल्यासारख्या शारदाबाईंनी सगळ्यांत पुढाकार घेतला. अनुयासाठी आदल्या दिवशी जाऊन साडी घेऊन आल्या. बाजारातून पेढे, बर्फी घेऊन आल्या. ’तू काही करायचं नाहीस आता’ असं तर तिला येताजाता बजावत होत्या. अनुयाचा सातवा दोन दिवसांनी संपून तिला आठवा महिना लागणार होता. त्या दिवशी त्यांनी तिच्या आईला विनंतीच केली जवळपास..

"अनुयाला अजून एक महिना राहूदे ना.. तिला नववा लागला की पाठवेन. मी करंटी स्वत:तच मश्गूल राहिले. या निमित्तानं येणार्‍या बाळाची, म्हणजे यांची सेवा होईल माझ्या हातून. आणि तुम्ही खरंच काळजी नका करू. मी अनुयाला काही काम करू देणार नाही. इतके महिने वाया घालवले की हो मी. आता एकच महिना द्या. धष्टपुष्ट करून टाकते सुनेला. खरंतर मी बाळंतपणही करेन तिचं. पण पहिलं होऊदे तुमच्याकडे. तिला राहूचदे हा एक महिना. नंतर हवंतर मी स्वत: घेऊन येईन तिला तुमच्याकडे.. हे एवढं मागणं ऐका माझं.."

कोणाला यावर युक्तीवादच करता येईना. बरं त्या चारच दिवसात इतक्या सुधारल्या होत्या, की त्या मनापासून बोलत होत्या हेही समजत होतं. अनुयेला सासूचं मन मोडवेना.

त्या दिवसापासून जुन्या शारदाबाई परत आल्या. त्यांनी अक्षरश: अनुयाला ताटावरून पाटावर ठेवलं. एक मात्र होतं, की सर्व लाड ’ह्यांची सेवा तेवढीच माझ्या हातून’ असं म्हणत चालली होती. त्या भरात ’त्यांना आवडणारे पदार्थ’ही अनुयाला खायला लागत होते. पण ती ते चालवून घेत होती. त्यांचं वागणं विलक्षण सुधारलं. त्या गोळ्या व्यवस्थित घेत होत्या. चार ठाव स्वयंपाक करत होत्या. एकट्या बाजारात जात होत्या. अनुयाला शोभा-महेशच्या लहानपणच्या कित्येक गोष्टी त्यांनी सांगितल्या. येणार्‍या बाळासाठी काय काय बेत त्यांनी केले होते, हेही अनुयाला सांगून झाले. महेशला ’आता फिरतीची नोकरी नको’ असेही हक्कानं बजावलं त्यांनी. महेशही खटपट करत होताच. आईचं बदललेलं रूप पाहून दोघांच्याही मनावरचं मोठं ओझंच उतरलं. अनुयाची तर मोठी चिंता मिटली. सुमारे चार महिन्यांनी राजवाडेंचं घर नॉर्मलला आलं.
***

कबूल केल्याप्रमाणे शारदाबाईंनी अनुयाचे सर्व लाड पुरवून तिला महिन्याने तिच्या आईकडे सोडलं. तिला सोडून जाताना दोघीही भावूक झाल्या होत्या. त्या आता बर्‍याच अंशी ठीक वाटत होत्या, तरी अनुयाला मनातून एक अनामिक भीती वाटत होती. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट झाली होती, की महेशची फिरती कमी झाली होती. शारदाबाईंना आता कधी एकदा नातूदर्शन करते आहे असे झाले होते. जड अंत:करणानेच त्यांनी तिला निरोप दिला. त्यानंतरही दर दिवसाआड फोन, सूचना त्या करत राहिल्या तिला. एक-दोनदा येऊनही गेल्या. मनाला स्वास्थ्य आणि शरीराला आराम मिळाल्यामुळे अनुयाची तब्येतही चांगली झाली. पूर्ण नऊ महिने आणि तीन दिवसांनी तिची सुखरूप प्रसूती झाली.

त्यांना मुलगी झाली.
***

"काय? मुलगी? अरे देवा! आता सासूबाईंना काय सांगू? कशा रीअ‍ॅक्ट होतील त्या? सासरे पोटी जन्म घेणार हे सांगितल्यानंतर त्या सुधारल्या. आता काय होईल? परत त्या घुम्या होतील का? माझ्यावर रागावतील का? आई, काय झालं गं हे?"

तिच्या आईला तिचं हे बोलणं बिलकुल आवडलं नाही.

"अगं काय ते तुझं बोलणं? त्या चिमणीकडे बघ तरी. बर्‍या आहेत आता त्या. त्यांना काही धक्काबिक्का बसणार नाही. तू कशाला नसते विचार करत्येस? बाळंतिणीनं कसं मन प्रसन्न ठेवायचं असतं. घे छोटीला जवळ.. बघ तरी किती गोंडस आहे बाळ!.." आईने विषय बदलला.

तरी अनुया ही भीती मनातून काढू शकली नाही. सासूबाईंना आता काय तोंड दाखवायचं? त्या सहन करतील का हे? मुलीचं काही बरंवाईट तर नाही ना करणार? अनेक प्रश्न तिच्या मनात फेर धरू लागले.
तिची आई आणि महेश तिच्याबरोबर सतत दवाखान्यात होते. पहिला दिवस गेला आणि सासूबाई काही आल्या नाहीत. दुसर्‍या दिवशी महेशही आला नाही. त्यानं तिच्या आईकरवी ’फिरतीवर जावं लागत आहे दहा दिवस’ म्हणून निरोप घेतला फक्त. अनुयाला अर्थातच हे अजिबात आवडलं नाही. फिरती कमी झाली होती. मग ही लेकीच्या जन्माच्या दुसर्‍याच दिवशी कशी फिरती आली? तीही दहादहा दिवस? मुलगी झाली म्हणून तोही नाराज झाला की काय सासूबाईंसारखा? त्यानं आपल्याला टाकून दिलं की काय? आता आपलं काय होणार? तिची आई सतत म्हणत होती, की विशेष काही नाही, पण तिला दुष्ट शंका येत होत्या.

हॉस्पिटलमधले अनुयाचे सर्व दिवस हे रडत गेले. तिला अचानक तिचं भवितव्य अंध:कारमय वाटायला लागलं. तिचं मुलीकडेही लक्ष नसायचं. बाळ खूप रडलं की कशीबशी ती त्याला घ्यायची, तेही नर्स किंवा तिची आई हातात ठेवायची तेव्हाच.

आनंदात हॉस्पिटलमध्ये गेलेली अनुया घरी आली तीच उदास आणि निस्तेज. बाळ छान होतं, तिची तब्येत व्यवस्थित होती, पण तिच्या मनाला क्षणभरही चैन पडत नव्हतं. का नाही आल्या सासूबाई? महेश का गेला असं सोडून? आता माझं काय होणार? बाळाकडे कोण बघणार?- हेच आणि हेच प्रश्न सतत! आईबाबांना काहीही विचारलं, तरी त्यांचं एकच उत्तर- तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस. तसं काहीही नाहीये. तू बाळाकडे आणि स्वत:कडे बघ फक्त.

अखेर, एक आठवड्यानं महेश तिच्या आईकडे उगवला. आल्याआल्या त्याने लेकीकडे धाव घेतली. अनुयाकडे बघून हसला. हे पाहिल्यावर अनुयाला बरं वाटलं जरा.
"कुठे होतास इतके दिवस?"
"अगं, अचानक फिरतीवर जावं लागलं, सो सॉरी!"
"पण एक फोनही नाही केलास.."
"तू तरी कुठे केलास?"
"आईबाबा मला फोनजवळ फिरकूही देत नाहीयेत. मोबाईल तर बंदच आहे माझा!"
"असूदे. नाहीतरी फोनपेक्षा छकुलीकडे बघायला हवंस तू."
"तूही अगदी आईसारखं बोल हं. बरं, आई कशा आहेत? त्या एकदाही नाही आल्या. तब्येत ठीक आहे ना त्यांची?"
"अं...." महेश घुटमळला.. "ठीक आहे की आई. तब्येतही ठीक आहे. औषधं घेत आहे.."
"मग येत का नाहीत त्या मला आणि बाळाला बघायला?" अनुया काकुळतीला आली..
"येईल गं. घाई काय आहे? आणि तू येणारच आहेस की घरी.."
"ते वेगळं महेश. तुला समजतंय मी काय विचारते आहे ते. मुलगी झाली म्हणून नाराज आहेत का त्या?"
"छे गं! काहीही काय! अजिबातच नाही. उलट बातमी समजल्याबरोबर तिनं मला सांगितलं की शोभाताईचे पैंजण ठेवले आहेत तिनं लॉकरमध्ये ते द्यायचे छकुलीला."
"खरं?"
"मग! बरं बास आता प्रश्न तुझे. मला खेळूदे माझ्या मुलीशी जरा.."

महेश येऊन गेल्यानंतर आणि पैंजणांचे ऐकल्यानंतर अनुयाच्या मनाला स्वस्थता मिळाली बरीच. तसे भेटायला खूप लोक येऊन गेले. शोभा येऊन गेली, मावशी येऊन गेल्या, सासर-माहेरचे अनेक लोक.. पण सासूबाईंची वाट ती बघतच राहिली. त्यांचा विषय सगळेच टाळत होते हे तिला आता स्पष्ट समजत होतं आणि अघटित काहीतरी घडलं आहे हेही जाणवत होतं. त्याला शब्दरूप मिळत नव्हतं इतकंच.
***

बाळ सव्वा महिन्याचं होणार होतं. आता देवदर्शनाला कधी जायचं वगैरे चर्चा महेश आलेला असतानाच चालली होती.
"आई, मी अनुयाला आणि छकुलीला घेऊन जाऊ का परत?"
"अहो, असं लगेच?"
"नाही, तसं नाही. स्वयंपाकाला बाई आहेच अनुयानं लावलेली.. बाकी कामांनाही आहेच. पण आता तिनं लवकर घरी यावं..मला अजिबात करमत नाही तिथे आता.."
"महेशरावांचंही बरोबर आहे.."
"ती देवाला बाहेर पडली, की तशीच घरी येऊदे.. तिथूनच घेऊन जाईन मी.. अं, अजून एक रिक्वेस्ट होती.. तुम्हीही आठेक दिवस याल का बरोबर ती सेट होईपर्यंत?"
"का? सासूबाई आहेत की. आई कशाला? त्यांना नाही आवडलं तर? आज महिना होऊन गेला, तरी माझ्याशी बोलल्याही नाहीयेत त्या. महेश, खरं सांग, त्या ठीक आहेत ना? त्यांची तब्येत बिघडली आहे का? त्या औषधं घेतात ना? परत डॉ. म्हात्रेंकडे जायची वेळ आलीये का? आणि आता मला लवकर न्यायची भाषा! सासूबाई तर म्हणाल्या होत्या, चांगली दोन-तीन महिने रहा. तू आत्ताच मला घेऊन चाललास. काय चाललंय काय? तुम्ही मला काही सांगत का नाही? मला जाणवतंय की काहीतरी घोटाळा आहे. महेश. मला सांग काय झालंय ते नक्की. तुला छकुलीची शपथ आहे!" अनुयाचा आवाज बोलताबोलता चढला..
"अनु, अनु शांत हो आधी..."
"महेशराव, मला वाटतं, वेळ आलीये की तिला सगळं सांगून टाकावं.."
महेशनं एक मोठा श्वास घेतला. "अनु, आई नाहीये. आई गेली. ज्या दिवशी छकुलीचा जन्म झाला, त्याच दिवशी.."
"अं? काऽऽऽऽऽऽय? काहीही काय? कसं शक्य आहे हे? काहीतरीच काय! हॅ! हे शक्यच नाही! महेश, काहीही काय बोलतोयेस तू?"
"होय अनु. प्लीज काम डाऊन. हो, हेच खरं आहे. पण, पण ऐक. ती डिप्रेशनमधून पूर्ण बाहेर आली होती. ट्रीटमेन्ट तिनं पूर्ण केली अनु. तिचा अतिशय दुर्दैवी अ‍ॅक्सिडेन्ट झाला. तू इथे आल्यानंतर तिचा पूर्ण कन्ट्रोल होता स्वत:वर. ती नॉर्मलला येत होती. गप्प बसणं, अबोला, काही काही नव्हतं. घरात काम करत होती, बाहेर पडत होती, मला डबा देत होती. टीव्ही बघत होती.. एकदम ठीकठाक. आपल्या छकुलीची बातमी तिला सांगितली, तेव्हा मीही थोडा घाबरलो होतो.. बाबांचं काय तिच्या मनात आपणच भरवलं होतं ना.. पण ती एकदम खूश झाली होती. ’छोटी बाहुली आली घरी’ असं म्हणाली आणि हॉस्पिटलमध्येच येत होती तुला भेटायला.. पण वाटेत बसखाली...." महेशला रडू आवरलं नाही.

ओह! आता एकेक अर्थ कळायला लागले अनुयाला. महेशचं दुसर्‍याच दिवशी गायब होणं, शोभानंही स्वत:च्या आईचा विषय टाळणं, तिच्या आईनं तिला फोनपासून दूर ठेवणं, महेशला दर दोन दिवसाआड डबे भरून देणं, तिला लवकर घरी नेणं.. सासूबाई नव्हत्याच. सासूबाई गेल्या होत्या. देवाघरी. कधीच परत न येण्यासाठी. तिनं शर्थीनं त्यांना आजारातून वर आणलं होतं. त्या बर्‍या झाल्या होत्या. पण शेवटी गेल्याच त्या. या या कार्टीपायी! अचानक तिला छकुलीचा भयंकर संताप आला!

"ही जन्मली ती आजीला मारायलाच! मी त्यांची काळजी घेतली, त्यांना बरं केलं आणि माझ्या कष्टांवर पाणी फिरवलंन मेलीनं! एक क्षण मी स्वस्थतेनं घालवला नाही. स्वत:कडे दुर्लक्ष करून त्यांच्याकडे पाहिलं. आणि ही! जन्मली आणि आजीच्या जिवावर उठली! घृणा येते मला या मुलीची. मुलगी तरी कशाला म्हणू मी हिला? ही माझी मुलगी नाहीच. माझी मुलगी अशी असूच शकत नाही! माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा तिला.." ती किंचाळायला लागली आणि छकुलीकडे धावून गेली.

महेश, आई आणि बाबांना तिच्या वागण्याचा अर्थ कळेपर्यंत तिनं छकुलीला उचलून घेतलंही होतं आणि गदागदा हलवत होती आणि संतापानं काहीबाही बडबडत होती... तिचा आवेश इतका होता की तिघांनाही ती भारी पडली. फार मुश्किलीनं त्यांनी तिला आवरलं. आणि अचानक, "आई, हे काय झालं गंऽऽऽ" म्हणत ती हमसाहमशी रडायला लागली आणि कोसळली.
***

"आई-बाबा, तुम्ही तरी किती दिवस राहणार इथे? मी बघेन मला जमेल तसं छकुलीकडे.."
"अगं, खरं का? तुला झेपेल का? आम्हांला काही त्रास नाही. राहतो अजून पंधरा वीस दिवस.."
"जावयाकडे इतके दिवस राहणं शोभतं का तुम्हाला अं?"

वरवर जरी खेळकर प्रश्न होता, तरी अनुयाच्या आईला तो तितका साधा नाही वाटला. त्या दिवसानंतर त्या जरा घाबरल्याच होत्या. पण अनुयाला बरं वाटेल म्हणून आधी ठरल्याप्रमाणे ते सगळेच देवाला जाऊन महेशकडे राहायला आले होते. अनुयावर त्यांची कडक नजर होती. ती छ्कुलीला काही करत नाही ना, हे त्या डोळ्यात तेल घालून बघत होत्या. घरी आल्याआल्या अनुया सासूबाईंच्या खोलीत पळत गेली होती. महेशनं तिथे त्यांचा एक फोटो ठेवला होता. त्यापुढे उभी राहून हुंदके देत रडली होती खूप वेळ. त्यानंतर निचरा झाल्यासारखी हळूहळू नॉर्मलला येत होती. तिला घेऊन ते तिच्या डॉक्टरकडे जाऊन आले. छकुलीलाही इन्जेक्शनं वगैरे देऊन झाली. गाडी पूर्वपदाला येते आहे असं वाटत होतं खरं. पण अनुया आता पुढाकार घेऊन त्यांना परत पाठवत होती, ते त्यांना काही बरं वाटलं नाही इतकं खरं.

"असं म्हणतेस? पण राहशील ना गं नीट? छकुली अजून लहान आणि नाजूक आहे. तिला मायेची गरज आहे. महेशरावही खूप पोळलेत. त्यांना तूच धीर द्यायला हवास. आम्हीही आहोत. कधीही काहीही लागलं तरी फोन कर किंवा ये. जमेल का बाळा तुला हे सगळं? सासूबाईंच्या आजारपणाचा खूप ताण सोसलास तू. खूप केलंस त्यांचं. पण दैव आहे. त्याचा राग या छोट्या जीवावर काढू नकोस.. समजतंय ना तुला?"

"हो गं आई. समजलं मला सगळं. मी शप्पथ नीट करेन सगळं."
***

हा दवाखाना एकदम वेगळाच आहे हे महेशला आत पाय ठेवल्याक्षणी जाणवलं. पहिली गोष्ट म्हणजे तिथे शांतता होती खूपच. इतर पेशन्ट नव्हते, ते दोघंच होते. काऊन्टरवर एक त्या वातावरणाला शोभून दिसेल अशी शांत हसतमुख रिसेपशनिस्ट होती. पाचच मिनिटं बसल्यानंतर तिनं त्यांना आत जायला सांगितलं.
डॉ. म्हात्रे त्या वातावरणाला शोभेलसेच होते असं महेशला वाटलं. शर्टावर टाय बांधलेला, सोनेरी चष्मा, पांढरे केस.. ते आत गेल्यागेल्या ते त्यांच्याकडे पाहून हसले.

"नमस्कार. आपली ही पहिलीच भेट, पण मिसेस राजवाडेंची भेट झालीये यापूर्वी. कशा आहात मिसेस राजवाडे?"

"मी? मी एकदम मस्त आहे. तुम्हांला आठवतेय का मी? मी सासूबाईंना घेऊन आले होते काही महिन्यांपूर्वी. तुमची औषधं एकदम लागू पडली हं त्यांना. पण अहो त्या गेल्या. गेल्या म्हणजे समजलं ना? गेल्या? पण तुमच्या औषधांमुळे नाही बरं का. मी त्यांना वेळच्या वेळी औषधं दिली, बिझी ठेवलं, स्वत:कडे दुर्लक्ष करून एकटीनं त्यांचं आजारपण निभावलं. पण मला मुलगी झाली आणि त्या गेल्या! बसखाली सापडून गेल्या! मग काय उपयोग असतो हो आपण इतकं रक्त आटवण्याचा? मी अक्षरश: रात्ररात्र त्यांच्या चिंतेनं झोपू शकत नव्हते. पण त्या छान झाल्या नंतर. अगदी पूर्वीसारख्या. पण सांगा ना, उपयोग काय? शेवटी गेल्याच त्या. संपलंच सगळं. मी गेल्या वेळी सांगितलं ना, मी प्रेग्नन्ट आहे ते? मला मुलगी झाली. पाच महिन्याची आहे. पण अहो, ती इतकी लहान आणि नाजूक आहे, की मला तिला हातही लावायची भीती वाटते. आपण मारे जागरणं करावीत, त्यांना दूध पाजावं, गोड बोलावं आणि तरीही ती पडतातच आजारी. मला भयंकर भीती वाटते. तिच्यासाठीही खस्ता खायच्या आणि तीही गेली तर? म्हणून मी तिला घेतच नाही जास्त. कटकटच नको. उगाच आपण त्यांच्यात गुंतायचं आणि तरी ती आजारी पडणारच. आणि आमची छकुलीही ग्रेटच आहे. लहान बाळं असतात ना चळवळी? ही नुसती झोपूनच असते सतत. ही सतत पेंगुळलेली असते. जागी असली की एकटक बघत बसते नुसती. हातही हलवत नाही, हो न महेश? सासूबाई कशा घुम्म बसून रहायच्या, अगदी तश्शीच बसून असते. ही जन्मली आणि सासूबाई गेल्या. त्यामुळे होत असेल का असं? सांगा आता हिचं काय करू? आता इतक्या छोट्या बाळाला का मानसिक आजार होणारे? पण हा ऐकतच नाही. म्हणाला, इथेच दाखवून घेऊ.. म्हणून आलो. पण छकुली आहे माझ्या आईकडे. आत्ता तिला तपासता नाही येणार तुम्हाला.."

"अनु, अनु शुद्धीवर ये! काय खोटंनाटं सांगते आहेस तू डॉक्टरांना? डॉक्टर प्लीज! हेल्प हर. ती आत्ता जे काही बोलली ते संपूर्ण खोटं आहे डॉक्टर. छकुली, टचवुड, एकदम नॉर्मल आहे. पेशंट आहे ती ही. छकुली खरंच तिच्या आईकडे आहे. कारण ही भयंकर वागते तिच्याशी. ही तिला कसलंतरी औषध देऊन झोपवून ठेवते दिवसचे दिवस. मग ती झोपाळलेली आणि पेंगुळलेली असणारच ना. मला हे समजलं तेव्हा मी हादरलो होतो डॉक्टर. माझ्याशीही ही धड वागत नाही की बोलत नाही. माय गॉड अनु. मला तुझी भीती वाटायला लागली आहे. काहीही काय बडबडतेस? छकुलीकडे नीट पाहिलं तरी आहेस का तू? इतका निरागस गोड जीव तो. जेव्हा जागी असते तेव्हा हात पाय हलवत, पालथं पडत तुझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असते ती आणि दुर्लक्ष करतेस तू तिच्याकडे संपूर्ण. घरात नुसती घुम्म बसून असतेस ती तू. माझ्याशी बोलत नाहीस, की तिला कुशीत घेत नाहीस. सतत आईच्या खोलीत असतेस, तिचं सामान उचकटत. मी फिरतीला गेलो असताना तिला घरी झोपवून तू सिनेमाला गेली होतीस, आठव! तिला तीन दिवस ताप होता आणि तू तिला औषधही दिलं नाहीस! कामवाल्या बाईंच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी तुझ्या आईला बोलावून घेतलं. मरणाच्या दारातून परत आली ती. आणि तिलाच भलतंसलतं बोलत्येस? त्या बिचारीला? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय.. पण तुझी मजल इथवर गेलीये हे मला माहीत नव्हतं. डॉक्टर प्लीज हेल्प हर डॉक्टर. पेशंट छकुली नाही, ही आहे. ही. अनुया...डॉक्टर प्लीज हिला बरं करा..." महेशचा अगतिक आवाज केबिनभर घुमू लागला..

समाप्त

8 comments:

Vaishali said...

Mast lekh. Nav agadi samarpak aahe.

Unknown said...

my god, bhayankar ahe goshta.
I hope it is not based on true story.
Pan nehami pramane chan jamali ahe.

poonam said...

धन्यवाद वैशाली आणि अननोन :)
कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. मानवी मन हे फार गुंतागुंतीचं असतं. आपल्या मनावर असलेले ताण- मग ते काल्पनिक असोत वा सत्य, खरे असोत की भासमान हे आपल्या मेंदूवर दीर्घकालीन परिणाम करतात. त्यातून दोन भिन्न स्वभावाची माणसं एकाच घटनेला वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जातात. एक जसा रीअ‍ॅक्ट होईल तसाच दुसरा रीअ‍ॅक्ट होईल असे नाही. त्यामुळे एका व्यक्तीच्या डोक्यात नक्की काय चालू आहे हे दुसरी व्यक्ती ओळखू शकेलच असे नाही, अगदी ती व्यक्ती आपली सुहृद असली तरी. ती लढाई आपली आपणच लढायची असते. त्याला उपचार असतात आणि उपचारांनी माणूस बराही होऊ शकतो. पण ती लक्षणं वेळीच ओळखणंही महत्त्वाचं.
हे असं बरंच काही मनात होतं ही कथा लिहीताना. ते काही अंशी तरी तुमच्यापर्यंत पोचलं असेल अशी अपेक्षा करते :)

केदार said...

काही कथा धक्कातंत्राच्या असतात. त्यात ही कथा बसते. अपेक्षेपेक्षा खूप निराळा धक्का आहे. चांगले लेखन.- केदार

Geetanjali Shelar said...

छान आहे ...

arvind nadkarni said...

anuradha diwali magazine has sent you a link to a blog:

can we take the story अंतरीच्या गूढ गर्भी in coming diwali issue 2014

poonam said...

Arvind Nadkarni Sir, please send me your email address or phone number where I can contact you. Thanks.

vishal kamath said...

Khup chhan...