April 12, 2013

क्यू नही करते Q?




Queue या शब्दाची एक गंमत आहे. एक तर त्यात u आणि e एक आड एक येतात आणि एकाक्षरी उच्चार असलेल्या ’क्यू’ चे पाचाक्षरी स्पेलिंग होते!! अजून एक गंमत म्हणजे हमखास शालेय बालवर्गातल्या पुस्तकात जेव्हा आपली या अक्षराशी ओळख होते, तेव्हा माणसांची मोठीच्या मोठी वळणदार रांग 'Q' आकारात उभी असलेली दाखवलेली असते. इतकं गोड, चित्रदर्शी असं अक्षर हे. पण तरीही प्रत्यक्षात रांग लावायची वेळ येते, तेव्हा बोंबच हे सांगणे न लगे. आणि इथे अशिक्षित/ सुशिक्षित/ गावातले/ शहरी असा काही दुजाभावच नाहीये. इथे लिहितेय तो आणि तसे अनेक प्रसंग अगदी तद्दन सुशिक्षित पैसेवाल्यांचे.

स्थळ: पुण्यातले आघाडीचे नाट्यगृह. कार्यक्रम- दिवाळी पहाटचा. हे कार्यक्रम तसेही नाटकांपेक्षा वरच्या दर्जाचे समजले जातात. दिवाळीच्या दिवसात भल्या पहाटे उठून पारंपरिक कपडे घालून नटूनथटून सुजन शास्त्रीय/ उपशास्त्रीय संगीताच्या मैफिलींना आवर्जून हजर असतात. पहाटे सहाच्या आतच कार्यक्रम सुरू होतो. वातावरण प्रफुल्लित असते. गायकाचाही मूड आणि सूर सुरेख लागतो. मैफिल रंगायला लागते. साधारण तासाभर सभागृह मैफिलीचा आनंद घेतं, मात्र नंतर हळूहळू चुळबुळ सुरू व्हायला लागते. गवईबुवांच्या तानेबरोबर बटाटेवड्याचा खमंग वासही यायला लागतो. पहाटे साडेचारला चहा झालेला असतो. आता परत चहाची तलफ येते आणि मग मैफिलीतले स्वारस्य संपून मध्यांतर कधी होतंय याकडे पोटातले कावळे लक्ष द्यायला लागतात. आणि इथे सुरू होतो एक लाजिरवाणा प्रकार. 

मान्य आहे, भूक लागलेली आहे. मान्य आहे, चहाची तलफ आली की बाकी काहीही सुचेनासं होतं. तरी पण आपण सुसंस्कृत माणसं आहोत, पुरेसे मॅच्युअर आहोत, शेवटी ते खाद्यपदार्थच आहेत.. हे सगळं सगळं विसरून लोक वय विसरून मध्यांतराची घोषणा होताच बाहेरच्या ’वडावाल्या’कडे धाव ठोकतात. आणि मग त्याच्यासमोर जो काही गलका होतो की ज्याचं नाव ते. नोटा पुढे पुढे नाचवत, तोंडाने ऑर्डर सोडत किमान दोनशे माणसं अहमहमिकेने एकाच टार्गेटच्या मागे लागतात- चहा आणि वडापाव! चहू बाजूने त्या माणसाला असं घेरायचं की धड त्याला एकाचंही ऐकू येऊ नये आणि धड काही सुधरू नये. आणि त्या गोंधळात वडापाव हस्तगत केल्यानंतर लोकांचे चेहरे कृतार्थ वगैरे होतात, एखादी विजयी पताकाच जणू तो वडापाव म्हणजे. चहाचा कप म्हणजे क्रिकेटचा वर्ल्ड कपच जणू! या सो कॉल्ड सुशिक्षित लोकांची ही धडपड सिरियसली केविलवाणी आणि कीव करण्याजोगी वाटते मला. अहो, रांग लावा ना. इतकं साधं का लक्षात येत नाही? असं कोंडाळं करून ’आधी मी’ ’आधी मला दे रे’  करण्यापेक्षा चटकन एक रांग नाही करू शकत? ’रांगेचा फायदा सर्वांना’ हे शब्द फक्त पाटीवर वाचण्यासाठी? का, तो संस्कारच कधी झालेला नाही मनावर? का, मैफिलीचे मध्यांतर हा तो संस्कार झुगारून देण्याची जागा आहे? 

सिनेमा/ नाटकाची तिकिटं करताना रांग लावता, बॅंकेत/ पोस्टात/ सरकारी कार्यालयात रांग लावावीच लागते, लग्न आणि तत्सम समारंभात बुफे पद्धतीने जेवण असेल तर रांग लावता, अगदी सोन्याच्या दुकानातही गुरुपुष्यामृत योगावर सोन्याचं वेढणं खरेदी करताना रांग लावतात लोक. मग चहावाल्याकडे काय कमीपणा वाटतो नक्की? दहाची नोट त्याच्या तोंडावर फेकता येते म्हणून? की त्याला स्टेटस नाही म्हणून? की बायकोसमोर इमेज अबाधित रहावी म्हणून? की पटकन खाऊन मैफल चुकू नये म्हणून? पण आपणा सर्वांनाच असा अनुभव असेल की गलक्यातल्या दोनशेव्या माणसाचाही चहा आणि वडापाव खाऊन झाला कीच मैफल परत सुरू होते. म्हणजे, तेवढा वेळ आयोजकांनी दिलेला असतो. मग हा हावरटपणा का? कोणतंही लॉजिक लावलं, तरी मला याचं उत्तर सापडतच नाही. एकदा असाच एक महापूर ओसरल्यानंतर आम्ही त्या चहावाल्यालाच विचारलं होतं, की रांग लावायला का नाही सांगत तुम्ही लोकांना? तर त्यावर तो म्हणाला होता, ’काय सांगणार तुमच्यासारख्या लोकांना?’ इथे ’तुमच्यासारख्या’ हे भयंकर टोचतं. म्हणजे तुमच्यासारख्या सुशिक्षित, भक्कम पैसे मोजून मैफिलींना हजर राहणार्‍या सो कॉल्ड शहाण्या लोकांना, तुमच्यासारख्या ’जन्टलमन’ लोकांना! यावर काय बोलणार? क्यूं नही लगाते क्यू? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे! 

10 comments:

Aditya Patil said...

हा समर्थन करण्याचा प्रयत्न नाही. परंतु आपल्या मेंदूला लहानपणापासून प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची सवय झाली आहे. त्यामुळे ज्यावेळी अनेक लोक आपणास एकाच गोष्टीसाठी संघर्ष करताना दिसतात त्यावेळी आपली असुरक्षिततेची भावना जागृत होते, आणि आपण मग सुसंस्कृतपणा सोडतो. वडापाव सोडा घर, नोकरी, बढती, रस्त्यावरील वाहतूक ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा तीव्र होते त्यावेळी हेच दिसून येते

raju said...

good one

poonam said...

Thanks Aditya Patil, Bob.

Aditya: may be. पण याला संघर्ष म्हणायचा की असंस्कृतपणा?

Mohana Prabhudesai Joglekar said...

विमानाची वाट बघताना हे अगदी असंच होतं. खरंतर रांगेप्रमाणे ते क्रमांक पुकारतात. पण विमानावर तुटून पडल्यागत गलका करतात आपली लोकं. त्यात एक दोन परदेशी प्रवासी असतात ते शांतपणे मागे उभे राहतात आपल्या क्रमांकांचा पुकारा कधी होतो आहे याची वाट बघत तेव्हा आपल्या मनोवृत्तीची किव येते. कुणालाही सोडून विमान जाणार नसतं तिथे ही तर्‍हा तर इथे तर बटाटेवडे संपले तर... ही भिती म्हणायची का? :-).

poonam said...

Exactly मोहना! आणि ’विमानाने’ प्रवास करणारे म्हणजे पैसा बाळगणारे लोक. तेही इतके insecure का असतील? विमानच काय, मल्टीप्लेक्सात सिनेमा पाहून निघाल्यानंतरही एक्झिटपाशी हीच ढकलाढकली!! अरे, शांतपणे एकामागे एक जा ना!! काय मनोवृत्ती आहे, कळत नाही खरंच!

Anyways, thanks for the comment! :)

इंद्रधनु said...

कोणीतरी सांगितल्याशिवाय रांग लावण्याची पद्धत नाहीये आपल्याकडे. वर तुम्ही जिथे जिथे रांग असते असा उल्लेख केला आहे त्या सर्व ठिकाणी रांगेत थांबा असं सांगणारं कोणी ना कोणी असतं. थोडक्यात शिस्तीचा बडगा घेऊन कोणी उभे असेल तरच आमच्यामध्ये शिस्त असते, "स्वयंशिस्त" वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत, त्यामुळे आम्ही त्या मानत नाही.

तृप्ती said...

:) इंटरव्ह्युला गेल्यावर सुद्धा लोक रांग न मोडण्याचे तारतम्य बाळगत नाहीत. इतर ठिकाणी तर विचारुच नका.

Parag said...

Kay funde zadtes aan ? ;)

poonam said...

धन्यवाद इन्द्रधनू, तृप्ती, पराग.

"स्वयंशिस्त" वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत, त्यामुळे आम्ही त्या मानत नाही. >> अगदी खरं आहे :(

Mandar Kulkarni said...

Good article...