July 14, 2012

पत्रनुकतंच एक पुस्तक वाचलं. कथासंग्रह होता. पुस्तक तसं जुनं. त्यातली एक कथा पत्ररूपाने उलगडत जाते.. कथेतल्या दोघी जणी खूप जुन्या मैत्रिणी. त्यामुळे पत्रामध्ये जाणवणारी चिरपरिचित ओळखीची भाषा, नवीन अनुभव एकमेकींबरोबर वाटायची ओढ, एकीनं जे लिहीलं आहे त्यावर दुसरी काय म्हणेल हे पहिलीला पुरेपूर माहित असणं आणि इतक्या जुनी मैत्री असूनही एकमेकींकडून अजूनही खूप शिकण्यासारखं आहे ही जाणीव.. हे सगळं त्या छोटेखानी कथेमधून हळूहळू उलगडत जातं.. आणि वाचता वाचता खरंच आपल्या हातात एक पत्र असल्यासारखं वाटायला लागतं. पत्रातून कथा पुढे न्यायची- हा साहित्यप्रकार काही नवीन किंवा अभिनव नाही. हे सूत्र धरून पुस्तकं आली, नाटकं आली. सुनिताबाई- जीएंची पत्र तर अतिशय प्रसिद्ध आहेत. तसंच प्रकाश नारायण संतांच्या ’वनवास’मध्ये लंपनचं आख्खं कुटुंब पत्राच्या माध्यमातून आपल्यापुढे उभं त्यांनी केलं आहे. हे यश लेखकांचं की ’पत्र’ ह्या लेखनप्रकाराचंच? 

आज ती छोटीशी कथा वाचताना मला जाणवलं ते हे, की पत्रलेखन हा प्रकारच किती सशक्त आहे! शाळेत असताना मार्कांच्या भीतीने/ ओढीने त्यातले मायना, मुख्य पत्र, शेवट, पत्ता, पाकीटावरची चौकट हे प्रकार मनावर पक्के ठसतात. शिवाय, वयाने मोठ्या, आदरणीय व्यक्ती, संस्था, मित्र, समवयस्क इत्यादी लोकांशी कसा लिखित संवाद साधता येतो ह्याची उदाहरणंदेखील आपला शालेय हात आणि बुद्धी गिरवते. ही थियरी तर पाठ होते, पण प्रॅक्टिकलसाठी भिडू मिळाला की ह्या मध्यमाची खरी मजा यायला लागते. ’पेन फ्रेन्ड’ ही संकल्पना मी शाळा/ कॉलेजमध्ये असताना प्रचंड लोकप्रिय होती. परदेशातल्या मुला/ मुलीशी, जिला आपण कधी भेटलो नाही, तिच्याशी पत्रमाध्यमातून संवाद वाढवायचा. कल्पना अतिशय रम्य होती. त्या वयात ती ’एक्सायटिंग’ ही वाटायची. पण बहुतांश वेळा, हा उत्साह लवकरच सरायचा. काहींची पत्रमैत्री मात्र अनेक वर्ष चालू रहायची. पण का कोण जाणे, मला हा प्रकार फारसा भावला नाही. मी आपली माझ्याच एका ग्रूपमधल्या मैत्रिणीला पत्र लिहायचे! आणि तीही मला तितक्याच उत्साहाने उलट पत्र लिहायची. दोघी क्लासला, कॉलेजला, नंतर टीपी करत सतत एकत्र. तरीही एकमेकींना पानंच्यापानं पत्र लिहायचो, त्यासाठी स्टिकर, लेटरपॅड, विविध रंगांची पेनं आणायचो! पत्र लिहीलं की द्यायचोही एकमेकींना समोरासमोरच! इतरांसाठी म्हणलं तर हा वेडेपणा, पण आम्ही फार सिन्सिरिटीने एकमेकींना पत्र लिहायचो. त्यामुळे आमची मैत्री अधिक घट्ट झाली असा माझा समज. अनेक वर्ष, अगदी कॉलेज संपल्यानंतरही ही पत्रापत्री चालू होती. नंतर अर्थातच संपली. पण ती पत्र त्यानंतर माझ्याकडे अनेक वर्ष होती. अधूनमधून वाचायचे त्या वेळेच्या आठवणीही आपसूक जाग्या व्हायच्या. 

पत्रलेखनाचेही कितीतरी प्रकार! नातेवाईकांमध्ये ख्यालीखुशाली, एकमेकांची आठवणीने केलेली चौकशी, आपले स्वत:चे दिलेले अपडेट्स, सारं काही त्या दोन पत्रांमध्ये मावत असे. शिवाय वडिलधार्‍यांनी लहानांना लिहीलेली वरवर उपदेश असलेली, पण ’बिटवीन द लाईन्स’ मायेने भरलेली पत्र वेगळीच. प्रेमपत्र ही ही स्पेशल कॅटेगरीच! काय त्या गुलाबी चिठ्ठ्या, ती थरथर, ती धडधड, ती कोणातर्फेतरी द्यायची धडपड, मग ते कोणाला सापडणार नाही ना, म्हणून वाढीव धडधड आणि गोड उत्तराची प्रतीक्षा! एक प्रकारचा निरागसपणा ह्या सगळ्यातच. आताचे प्रेमवीर पत्र, चिठ्ठ्य़ा वगैरे पाठवत नसतील खचितच. त्यांचं प्रेम काही कमी आहे असं नाही, पण त्यांच्या प्रेमात प्रेमपत्राची कमी आहे हे नक्की! 

पत्र म्हणलं की मनाला अजूनही उल्हसित वाटतं. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मैत्रिणींना लिहीलेली पत्र, भाऊ नोकरीच्या गावी असताना त्याला लिहीलेली पत्र, बहिणीचं लग्न होऊन ती लांबच्या गावाला गेली म्हणून तिला लिहीलेली पत्र.. आणि त्यांच्या असंख्य आठवणी इनलॅन्ड आणि 25 पैशाच्या कार्डाच्या हातात हात घालूनच फेर धरतात. घरोघरी फोन आल्यानंतर पत्रापत्री कधी संपली हे समजलंही नाही. त्यानंतर झपाट्याने मोबाईल आणि ईमेल क्रांती होऊन त्याची सवय लागूनही काही वर्ष उलटल्यानंतर अचानक मध्येच पत्रलेखनाची आठवण यायला लागते. 

आजकाल कोणीच एकमेकांना पत्र पाठवत नाही, म्हणून मग ईमेली सुरू झाल्या. मोठाच्या मोठ्या ईमेली- अगदी पत्रांसारख्याच. शिवाय, त्यावर शब्दमर्यादा नाही, की अक्षर चांगलं वळणदार येण्याचं टेन्शन! शिवाय पत्रासारखं सर्व मुद्दे आठवून सर्व काही एकाच पत्रात सांगून टाकण्याची घाईही नाही! सावकाश, दर एक मुद्द्यासाठी नवीन ईमेल केली तरी चालते. अशा सर्वसोयींयुक्त पर्याय असूनही, ईमेलवर पत्रलेखन काही फारसे जम बसवू शकले नाही. कुठे एवढ्या लांबलचक ईमेली टंकत बसायच्या? मग आपसूक ईमेली छोट्या झाल्या, फक्त कामापुरते लिहीले जाऊ लागले, ईमेलवर शॉर्टकट आले, ईमोटीकॉन्स आले. शिवाय, ऑफिसातही सतत ईमेल्स चालू असतात. बॉसलाही ईमेल करायची आणि मैत्रिणीलाही? तेच माध्यम दोघांनाही? बरोबर नाही वाटत. ’ईमेल काय करतेस, त्यापेक्षा फोन कर!’ असे सल्लेही यायला लागले! त्यामुळे सगळेच जण ’पत्र’ ह्या प्रकाराला एक ’एक्स्क्लूजिव्ह’ चष्म्यातून बघतात हे नव्याने जाणवले. पत्र पाठवायचे असेल तर सरळ पत्र लिहावे. उगाच ईमेलीवर पत्रलेखनाचा आव आणू नये! ’क.लो.आ’ची मजा जी लिहीताना जाणवते, ती त्या स्क्रीनवर लिहीण्यात/ वाचण्यात येत नाही असं माझं वैयक्तिक मत! 

कोणी असंही म्हणेल, की शेवटी काय, की एकमेकांची खुशाली, प्रगती, बातम्या कळल्याशी कारण! मग माध्यम कोणते का असेना? उलट ईलेक्ट्रॉनिक आणि संगणक क्रांतीमुळे माणसं जास्त जवळ आली आहेत. ज्यांच्याशी संपर्क सुटून पंधरा-वीस वर्ष झाली आहेत, तेही आज एका क्लिकसरशी भेटतात. अजून काय हवे? उगाच जुन्या गोष्टी उकरून काढून का ’आमच्या वेळी..’ पद्धतीच्या गप्पा मारायच्या? पण कसं आहे, एखादा बिकट आर्थिक परिस्थितीत असलेला माणूस शिकून सवरून बक्कळ पैसा कमवायला लागतो, त्यानंतर त्याला सुखासीन आयुष्याची सवय लागते आणि मग अचानक सुख बोचल्यागत आपले जुने दिवस आठवतात.. आपण कसे होतो, आपलं घर, आपली परिस्थिती कशी होती, ह्याचं स्मरण होतं. आपण कोण होतो आणि काय प्रवास करत कुठवर आलोय हे तो प्रेमाने आठवतो..तसंच आहे हे! ईमेल, ट्विटर, फेसबुक, मोबाईल असे सर्व हाताशी असूनही आठवण येत राहते ती पत्राचीच! कपाटभरून डिझायनर ड्रेस, साड्या, पार्टीवेअर वगैरे कपडे असले, तरी खास कार्यक्रमांसाठी हमखास वरच्या कप्प्यातली भरजरी शालू किंवा पैठणीच नेसली जाते.. तसंच! 

2 comments:

केदार said...

नमस्कार, पोस्ट सुंदरच. मी गेली पंधरा वर्षे पत्रलेखनाचा सराव ठेवलेला आहे. क.लो.अ., ता.क.ची मजाही मेलमध्ये नाही. पेन कागदाला टेकवल्यावर जे सुख मिळते ते कीबोर्डवर बोटे बडवताना मिळत नाही.

shashankk said...

तुझ्या ब्लॉगवरील फिनॉमेनल वूमन -ही माझी खूप आवडती कविता -तुझा भावानुवादही खूपच आवडला मला. आज, २९ जुलै २०१२, गंधर्वमधे भेटल्याबरोबर माझ्या मनात ठाण मांडलेल्या त्या कवितेची एकदम आठवण झाली. तुझा ब्लॉगही छानच आहे, बरेच लेख मी वाचलेले आहेत.
मनापासून शुभेच्छा.
धन्यवाद.
शशांक पुरंदरे.