October 4, 2011

काबीज

(ही कथा मेनका प्रकाशनाच्या ’माहेर’च्या मार्च, २०११ च्या ’महिलांचे राजकारण’ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेली आहे. )

रात्री साडेनऊ पावणेदहाच्या सुमारास मी 'Eden Garden'मध्ये शिरले. दार बंद केल्याक्षणीच आतले डीजे मिक्सचे आवाज कानावर आदळले. वातावरण नेहेमीप्रमाणेच धुंद होतं, डान्सफ्लोअर भरला होता, कर्कश्श गाणी आणि भरगच्च क्राऊड- कोणत्याही डिस्कोमध्ये असतं तसंच वातावरण इथेही होतं. ह्याआधी मी तीनचारवेळा आले होते इथे, त्यामुळे जागा थोडीफार माहीत होती. दारात उभं राहूनच मी नजर फिरवली. आरूषी लगेचच डोळ्यात भरली माझ्या.. एक तर तिचे लूक्स, तिचा तंग वाईन रेड ड्रेस आणि जरा जास्तच जोरात खिदळणारे तिचे सोकॉल्ड कूल फ्रेन्ड्ज! सर्वाधिक आवाज तेच करत होते डान्स फ्लोअरवर. इन्डस्ट्रीमधले चिरपरिचित, नवोदित, थोडे जुने असे तुरळक चेहरेही आसपास त्यांच्यात्यांच्या क्राऊडबरोबर ’चिल’ करत होते! आरूषी दिसल्याबरोब्बर मझं कुतूहल परत जागृत झालं!! आज आरूषीनी मला आपणहोऊन इथे भेटायला बोलावलं होतं, नक्कीच खळबळजनक खबर असणार होती! काय होतं नक्की? आरूषीला कसला गौप्यस्फोट करायचा असेल? जबरदस्त असणार काहीतरी. मी काहीतरी भन्नाट स्कूप नेल्यानंतर निकीचे डोळे कसले चमकतील! ’धिस इस अ सोल्ड आऊट’, ’यू आर अ जिनियस’, ’लव्ह यू स्वीटहार्ट’च्या तिच्या पेटन्ट आरोळ्याही कानावर जवळजवळ पडल्याच माझ्या! मी चेहर्‍यावर आमचं पेटन्ट हसू आणलं आणि बारकडे निघाले. आरूषीचं काही लक्षं नव्हतं, त्यामुळे एक ड्रिन्क घेऊन, फ्रेश होऊन मगच आरूषीला हाक मारावी..

इतक्यात डीजेने आरूषीचा ,’हम, तुम और ये समाँ’ हा हिट नंबर लावला आणि एक उत्साहाची लाटच पसरली. आरूषी त्या गाण्याच्या सिग्नेचर स्टेप्स करायला लागली आणि लोक टाळ्या, शिट्ट्या वाजवत तिला चियर करायला लागले- एकच धमाल सुरू झाली!! डिस्कमधले जवळपास सर्व डोळे तिच्यावर होते आणि ती ते मस्तपैकी झेलत स्वत:ला एन्जॉय करत होती. तिला हे काही नवीन नव्हतंच म्हणा! वयाच्या दीड वर्षापासून आरूषी कॅमेर्‍यासमोर होती. चौथ्या वर्षापासून ती सिनेमात चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम करत होती. निरागस चेहरा, बोलके डोळे, उपजतच असलेला अभिनय आणि तिच्या कामावर सुनयनाचं असलेलं बारिक लक्ष! त्यानंतर मधली काही वर्ष ब्रेक घेऊन सुनयनाने तिला एकदम योग्य वेळेला इन्डस्ट्रीत आणलं होतं! आरूषीचा डेब्यू ’सुपरस्टार सुनयनाच्या मुलीच्या’ मरातबाला शोभेल असाच झाला होता! ग्रेट होत्या ह्या मायलेकी!

सुनयना गेल्या पिढीची ह्या फिल्म इन्डस्ट्रीची अनभिषिक्त सम्राज्ञी! देखणा चेहरा, बर्‍यापैकी अभिनय, हुशारी आणि बलवत्तर नशीब ह्यांच्या बळावर हिटमागून हिट देणारी आणि लोकांच्या कायम स्मरणात राहणारी नायिका! तिच्या काळातल्या हीरॉईन्स आता कुठल्याकुठे गडप झाल्या, ज्या आहेत त्या बघवतही नाहीत, पण सुनयना आजही घट्ट उभी आहे इन्डस्ट्रीत, तेही तिचा आब, सौंदर्‍य शाबूत ठेवून. अभिनय, सिनेमा जणू रक्तात भिनलेला. तिच्या वेळेच्या तमाम डिरेक्टर्स आणि हीरोजबरोबर तिने काम केलं. कमर्शियलबरोबर आर्टसिनेमातही चमकून गेली. बोलायला एकदम मीठी, उत्तम पीआरओ मेन्टेन केलेली. बाकी हीरॉईन्सशी मात्र मैत्री वगैरे नव्हती तिची. स्वत:चा मान, ताठा जपून असायची कायम! पस्तिशी आल्यावर, फारसं ग्रेट काम मिळेनासं झाल्यावर तिने सुरेश खोसला नावाच्या स्वत:च्या नावावर दोन बरे आणि एक फ्लॉप पिक्चर असलेल्या खानदानी, देखण्या डिरेक्टरबरोबर लग्न केलं आणि थोडा काळ बॅकग्राऊंडला गेली. आरूषी एक-दीड वर्षाची असेल, तेव्हा सुनयनाने तिच्याकडून पहिली जाहिरात करून घेतली- बेबी पॉवडरची.. त्यात ती इतकी गोड दिसली की बस्स! त्यानंतर भरपूरच ऍड्ज केल्या तिने, साताठ वर्षाची होईपर्यंत. मधल्या काळात सुनयनाला ’अजेय’ झाला. मग आरूषीचं ग्रूमिंग, शिक्षण वगैरे चालू असताना सुनयनाने पुनरागमन केलं, एकदम थाटात! ’कतरा कतरा’मध्ये तेव्हाचा सेन्सेशन रोहनच्या ’भाभी’च्या रोलमध्ये. पण ही भाभी एकदम डॅशिंग होती- दिराला सूड वगैरे घ्यायला सांगणारी, नेहेमीची रडू भाभी नाही! एक तर ’सुनयना’चं पुनरागमन, त्यात अशी भूमिका! प्रचंड गाजला तिचा रोल आणि सुरू झाली सेकन्ड इनिंग!- जी अजूनही चालू होतीच. भाभी, दीदीची आता माँ झाली, पण ग्लॅमरस माँ! खंगलेली, पिचलेली माँ तिने आजपर्यंत नाही केल्ये! आणि आता एकूण पिक्चर्सचं बजेट बघता, करेल असंही वाटत नाही! आयला! सहज गणित केलं, तर today Sunayanaa is sixty five! Wow! विश्वास नाही बसत, खरंच! आत्ता बसल्याबसल्याच तिचे कित्येक सिनेमे, कित्येक भूमिका आठवतायेत. कॉमेडी, व्हिलनिश, टिपिकल मॉम- सगळे केलेत आणि करत्येही अजून. कॅमेर्‍याच्या पॅशनशिवाय हे शक्य नाही!

मी आपली फ्लॅशबॅकमध्ये मस्त गुंगले होते, इतक्यात गाणं संपलं आणि खूप जोरात चिअरिंग झालं. लोक एकमेकांच्या गळ्यात पडत होते, चित्कार उठत होते. आरूषीला लोकांनी घेरलं होतं! शेवटी दमून ती बारकडेच यायला लागली. Time to meet her! मी जागेवरच उठून उभी राहिले आणि तिला हात केला. आरुषीही माझ्याकडे पाहून हसली. तिच्याबरोबर रणजीत होताच, अजूनही दोघंतिघं होते. सगळेच आमच्या इन्डस्ट्रीतले. चला! बसल्या जागी चार इन्टर्व्ह्यूज, फोटोज, कॉलम्सची सोय झाली! मी अलर्ट झाले. नेमका माझ्याबरोबर आत्ता फोटोग्राफर नव्हता, कारण ही भेट अनऑफिशियल होती, पण ह्या लोकांना काय, कुठलाही कॅमेरा चालतो. सेलचा कॅमेराही काही वाईट नव्हता, त्यावरच आरूषी-रणजीत, त्यांचा सगळा ग्रूप, एकटा रणजीत, एकटी आरूषी असे अनेक फोटो झाले. रणजीत आणि आरूषीचे गेले दोन पिक्चर फ्लॉप गेले होते. आता सर्वेश शेट्टीचा ’एक अकेला’ चालू होत्या त्यावरच त्यांच्या रिलेशनची भिस्त होती.. त्याबद्दलच रणजीतशी गप्पा झाल्या. खरंतर मनातून तो घाबरलेला होता. एक तर पिक्चर चालत नव्हते, ’एक अकेला’ही बुडला, तर आरूषी त्याला कधीही लांब करणार होती, कदाचित त्या आधीच! "Of course I am confident that 'Ek Akela' will be a superhit.. we are working quite hard on it.. and partying hard too, see!" म्हणत त्याने माझ्याकडे पाहून डोळा मारला आणि विषय संपवून टाकला! पण मी काय ते समजलेच! पठ्ठ्या, पंधरा वर्ष आहे म्हटलं इन्डस्ट्रीत!

आता उशिर व्हायला लागला होता, पण मला आणि आरूषीला बोलायलाच संधी मिळत नव्हती. सतत लोक येत होते तिला भेटायला, दोन शब्द बोलायला, फोटो काढायला वगैरे. ती आणि मी दोघी अस्वस्थ व्हायला लागलो होतो. इतक्यात परत डीजेने तिचा अजून एक हिट नंबर लावला आणि तिने सगळ्यांना डान्सफ्लोअरवर पाठवलं. आम्हाला जरा उसंत मिळताच माझ्याकडे मोर्चा वळवत म्हणाली,"थँक्स मीरा, लगेच आलीस!"

"मॅडम, आप कहे और हम ना आये? सुपरस्टार हीरॉईन स्वत:हून बोलावत असेल, तर मी तिला ’नाही’ म्हणण्याइतकी मोठी नाही झाले अजून! कहो तो जान हाजिर कर दू!" आम्ही दोघीही हसलो. वातावरण जरा औपचारिक झालं.

"एक सिक्रेट तुला सांगायचं आहे.." तिने सुरूवात केली!

ह्यॅ! फिल्म इन्डस्ट्रीत सगळीच ओपन सिक्रेट्स असतात! मी थोडी हिरमुसले. हिच्या आणि रणजीतच्या ’होणार्‍या’ ब्रेकपबद्दल असणार! ते तर मी कधीच ओळखलंअय बच्चू! अर्थातच वरवर मी म्हणाले, "बोल ना? ऑल इयर्स फॉर यू डार्लिंग!"

एक सेकंद आरूषी घुटमळली. नक्की कसं सांगावं म्हणजे जास्तीतजास्त परिणाम होईल, असा विचार कर असावी बहुतेक. पण मी अस्वस्थ झाले! झालंय काय नक्की? ओ गॉड! लग्नबिग्न करतेय की काय रणजितशी?

"I am in Shashank Khanna's next! Lead Role!!

तिने एकदाचा तोफगोळा डागला आणि मी जागच्याजागी उडालेच! आईशॉट!! धिस वॉज बिग!! शशांक खन्ना म्हणजे एस्केने नुकतीच प्रेस कॉन्फमध्ये त्याचा नवीन फिल्मची घोषणा केली होती. ऍज यूज्वल, अफाट पैसे ओतून ती प्रचंड मोठी, फॉरेन लोकेशन्सवर शूट केलेली, सर्व मोठे स्टार्स असलेली, श्रीमंत फिल्म असणार होती. त्याने आम्हाला फक्त ’ती एका आई-मुलीची कहाणी असणार आहे, व्हेरी टचिंग, ऍज सीन नेव्हर बिफोर’ इतकंच सांगून, आईच्या रोलसाठी त्याची पेटन्ट ’सुनयनाजी’ असणार आहे हे सांगितलं होतं. बाकी सगळंच सिक्रेट होतं! आणि आरूषी लीड रोल. म्हणजे मुलीचा? म्हणजे खर्‍या आई-मुलीलाच पडद्यावरचे आई-मुलीचे रोल्स? आईशॉटच! कारण ह्या आई-मुलीच्या भांडणाने तर आख्खी इन्डस्ट्री हादरवून टाकली होती! त्या एकमेकींच्या कट्टर म्हणतात तशा शत्रू होत्या!

दहा वर्ष तरी झाली असतील! आरूषीच्या डेब्यू फिल्मनंतर तिला खूप फिल्म्स ऑफर झाल्या. तिने सुरूवातीला सुनयना कॅम्पच्या, सुनयनाच्या ओळखीच्या डिरेक्टर्स-प्रोड्यूसर्सच्याच फिल्म्स घेतल्या. अर्थातच सुनयनाच्या आग्रहामुळे. त्या दोनतीन फिल्म्स टिपिकल रोमँटिक, गर्ल नेक्स्ट डोअर अशा होत्या. सगळे बडे बडे प्रोड्यूसर-डायरेक्टर्स. त्या सगळ्या आपटल्या! त्यामुळे त्यानंतर आरूषीला फिल्म्स येईचनात! ज्या येत होत्या, त्या तशाच टिपिकल होत्या- गोड गोड दिसायचं काम फक्त. अजून एका सुपरस्टारची फ्लॉप मुलगी म्हणून शिक्का बसतो की काय इतकी वेळ आली! गंमत म्हणजे मधल्या काळात सुनयनाच्या कॅरॅक्टर रोल्स, त्याच प्रोड्यूसर-डायरेक्टर लोकांपैकी असलेल्या फिल्म्स मात्र चालत होत्या! तिला पहिलं नॅशनल अवॉर्डही त्याच दरम्यान कधीतरी मिळालं होतं, for her role in 'Yuddh'. म्हणजे आईची घोडदौड चालू, आईचा करिष्मा, ग्लॅमर अजूनही लोकांना आवडतंय, पण तरूण, सुंदर मुलीला कोणीच विचारेना! नो वन्डर दोघींचेही ईगो उफाळून वर आले. तेव्हा आरूषीने सुनयनाला न जुमानता एक अगदी नवीन डायरेक्टरचा- लोकेशचा डेब्यू सिनेमा घेतला. त्यात तिची इमेज एकदम वाया गेलेल्या मुलीची होती. सुनयना नाराज असतानाही तिने पूर्ण फिल्म शूट केली- त्यावेळी मोठ्या स्टोरीज झाल्या होत्या त्या. सुनयनाचे इन्टर्व्ह्यूज, आरूषीचे, लोकेशचे, फिलम्च्या इतर क्रूचे, हां, तेव्हा नीरज हीरो होता- त्याचे- केवढेतरी इन्टरव्ह्यूज आलेले. सुनयनाने कधीच कोणाबद्दल वाईट शब्द काढला नाही अर्थात- मुरलेली बाई ती, पण एकूण ’नवे लोक, हे असले रोल मला पसंत नाहीत’ असा सूर. कसंबसं शूट संपलं आणि रिलीजच्या दहा दिवस आधी चक्क आरूषीने सुनयनाचं घरच सोडलं! आत्तापर्यंतचा खळबळजनक स्कूप होता तो. आजही त्या आठवणी, ते इन्टरव्ह्यूज वाचले जातात. ’सूपरस्टार आई आणि लेकीचं पटत नाही’, ’दोघी एकमेकींच्या कट्टर दुश्मन आहेत’, ’दोघी एकमेकींचं तोंडही पाहत नाहीत’, ’सुनयनाने सर्व इन्डस्ट्रीत आपला शब्द पणाला लावून आरूषीला एकही सिनेमा ऑफर न करण्याच्या धमक्या दिल्या आहेत’, ’सुनयानाने मुलीला वार्‍यावर सोडलं’-बापरे! केवढ्या बातम्या!! तो सिनेमा चाललाच हे सांगायला नको! पण त्या पुण्याईवर आरूषीने स्वत:ला मस्तपैकी एस्टॅब्लिश केले इन्डस्ट्रीत. पब्लिक ’सुनयनाची मुलगी बघूया तरी काय करते?’ असं म्हणत सिनेमा बघायचे आणि आरूषीचा नॅचरल अभिनय पाहून तिने फॅन्स बनायचे!

त्या दोघींचंही वागणं म्हणजे गूढ होतं खरंच. त्या स्कूपवर कधीच धूळ बसली नाही. दरवेळी सुनयना किंवा आरूषीचा नवीन सिनेमा आला, चालला, पडला, ठीकठीक गेला, तरी प्रत्येक वेळी ह्याचा उल्लेख कुठेतरी व्हायचाच. आम्ही रिपोर्टर तर कायम पाळतीवर, वासावर असायचो- समेट झाला का मायलेकींचा? काय म्हणत आहेत एकमेकीबद्दल, वगैरे? पण दोघी चांगल्या पक्क्या. एकमेकीचा विषय आला की कटाक्षाने ’नो कॉमेन्ट्स’ म्हणायच्या. तशी त्यांनी स्वत:ची प्रायव्हसी जीवापाड जपली होती. सुनयनाचे सिनियर को-स्टार्सही अधूनमधून म्हणत असत, की ह्या दोघींनी एकत्र यायला पाहिजे वगैरे. पण तेवढ्यापुरतंच. कोणाचं थेट हा विषय दोघींकडे काढायचं धाडस झालं नव्हतं. शिवाय, सुनयना काम करत असलेले लोक आणि आरूषीचा कॅम्प दोन्ही यशस्वी असले, तरी वेगवेगळे होते. उगाच हा विषय काढून मॅडमची खप्पा मर्जी झाली तर काय घ्या? -म्हणून कोणीच रिस्क घेत नव्हतं. अगदी अगदी आतली कुणकुण अशी होती, की माय-लेकी रेग्युलर टचमध्ये असतात. पण ह्या बातमीला काही पुरावा नव्हता. सगळाच मामला ’तेरी भी चूप..’चा होता.

आणि आरूषी आणि सुनयना दोघीही एस्केच्या फिल्ममध्ये एकत्र? आणि ही खबर स्वत: आरूषीकडून!! ओह्ह माय गॉड!! आईशॉटच!!

माझ्या डोक्यात उसळेले शेकडो प्रश्न आणि माझे विस्फारलेले डोळे पाहून आरूषीच पुढे म्हणाली, "हो, दोन दिवसांपूर्वीच झालंय कॉन्ट्रॅक्ट, बिलिव्ह मी."

"अगं पण, सुनयना आणि तू..."

आरूषी जराशी गंभीर झाली. की विचारात पडली होती? की नाखुश होती? की अजूनही तिचा मनात काही शंका होत्या? मी सुनयनाचा उल्लेख करायला नको होता का? मला अंदाज येईना. "ह्म्म. अजून एक बातमी आहे. ही ममाची लास्ट फिल्म असणार आहे. She's gonna stop working after this."

अगंगंगं! ही असे बॉम्ब का फोडत होती आज? आता तर मागचं म्युझिकही मला ऐकू येईनासं झालं!

"मला ह्या सगळ्याचीच पब्लिसिटी एकदम प्रॉपर हवी आहे मीरा. In a very positive manner. I am entering the SK camp for the first time after these many years and also Mama and me will be working for the first time and all.. I want to handle it carefully. आमचे डिफरन्सेस वगैरे सगळे पुसून टाकायचेत आता पब्लिक मेमरीमधून. ममा खरंच रिटायर होणार आहे. त्यामुळे तिचा ग्रॅन्ड सेन्डऑफ असणारे ही फिल्म. ह्या फिल्मच्या निमित्ताने आम्ही एकत्र येणार आहोत. फिल्मची स्टोरीही खूप एक्सायटिन्ग आणि टची आहे. मला आणि ममाला एकत्र सीन्सही खूप असणार आहेत. एस्केने स्वत: इन्टरेस्ट दाखवल्यामुळे हे जमू शकलं. ही अशी कथा आणि ममाचा डिसिजन- मी नाही म्हणूच शकले नाही. It was high time already आणि ह्यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही परत एकत्र यायची. म्हणजे एस्केची टीम असेल, पब्लिसिस्ट असतील, पण मला तू आणि तुझे मॅगझिन माझ्या एक्सक्लूझिव इन्टर्व्ह्यूज आणि फोटो सेशन्सना हवेत. ममा आणि माझे शूट्स. विल यू ऍक्सेप्ट?"
---

 
कशीबशी दुसरा दिवस उजाडेपर्यंत थांबले आणि बरोब्बर ११ला निकी यायची त्या वेळेला निकीच्या केबिनमध्ये मी हजर झाले. पोचल्याबरोब्बर एक क्षणही उसंत न घेता मी आणि तिला सगळं सगळं सांगितलं, तेव्हा कुठे मला जरा बरं वाटलं! माझी अपेक्षा होती निकीपण एक्साईट होईल माझ्यासारखीच. निकी माझ्यापेक्षा खूपच सिनियर. आख्खा जन्म फिल्म लाईनमधला. जुनं आणि नवं काही तिला माहित नाही असं नाहीच! एकदम मुरलेली. इतकी महत्त्वाची बातमी मी आणली, तर ही फक्त "आय सी."

इतकंच? माझी सगळी हवाच निघून गेली! चुळबुळत बसून राहिले आपली नुसतीच. बर्‍याच वेळानं तिनं विचारलं, "मीरा, तुला काय वाटतं? आपलंच मॅगझिन आणि तुलाच का निवडले असतील आरूषीनं?"

आईशॉट! मी हा विचारच केला नव्हता!! आयला, हो की! आमचंच मॅगझिन का?- फिल्म मॅगझिन्समध्ये वी वेअर नॉट द लीडर्स हे उघड सत्य होतं! वी वेअर ऍट नंबर टू. मग इतकी मोठी बातमी, एक्सक्लूजिव्ह फीचर्स वगैरेची मेहेरबानी आमच्यावर का? आणि हो! मीच का? येस. हा प्रश्न सिरियस होता. मी एक साधी रिपोर्टर होते. हां, पहिल्यापासूनच ह्या लाईनमध्ये असल्याने आता हे नवे जुने स्टार्स ओळखत होते मला. शिवाय लिहून लिहून लोकांनाही माझं नाव माहित होतं. पण ते काही खूप ग्रेट वगैरे नव्हतं. आरूषी काही माझी मैत्रिण वगैरे नव्हती. मग मीच का? करेक्ट! निकी वॉज करेक्ट.

मग अचानक मान हलवत हसत म्हटली, "सुनयना इज ग्रेट! वाहव्वा! मान गये! तुला गेम कळली की नाही मॅड?"

"निक्की, सुनयना कुठे? माझ्याशी तर आरूषी बोलली!" माझं अगदीच बावळट उत्तर.

ह्यावर निक्की खदाखदा हसली. अगदी डोळ्यात पाणी येईस्तोवर."Seriously, you are so stupid, yet innocent! त्या आरूषीला इतकी अक्कल आहे असं वाटतं का तुला? अर्थातच ह्या मागचं डोकं सुनयनाचं आहे."

मला काहीही झेपत नव्हतं हे माझ्या चेहर्‍यावरच्या मद्दड भावावरून कळतच होतं. अखेर निकीला माझी दया आली.

"तुला सगळं नीटच समजावून सांगायला लागेल असं दिसतंय! आठवतायेत ते सुनयना-आरूषी वॉरचे दिवस? कसला स्कूप होता तो! द बिग्गेस्ट इन माय करियर सो फार. तोपर्यंत काय सीन होता? सुनयना एकीकडे तिच्या सेकन्ड इनिंगला सुरूवात करत चाचपडत होती आणि त्या बरोबरच आरूषीला सेटल करायच्या मागे होती. आरूषीला लाँच केल्यानंतर काय झालं? एक लाट आली, बास. She did not 'arrive' as such. ती ज्या प्रकारचे सिनेमे करत होती- सगळ्याच हीरोईन्स करतात ते- दोन वर्षात कोणाच्या लक्षातही राहिली नसती ती. एक्झॅक्टली ह्याच वेळेला सुनयना-आरूषीचं भांडण झालं, ती बाहेर पडली आणि नंतर काय झालं? सांग.."

"त्यानंतर बिग बॅनर्स बरोबर सुनयना कम्फर्टेबल झाली. त्यांची फेवरेट कॅरक्टर आर्टिस्ट. आणि आरूषी हिट झाली, नवीन लोकांमध्ये. नविन, एक्स्पेरिमेन्ट करणार्‍या डायरेक्टर्सचा चॉईस..." माझ्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला लागला होता..

"कळतंय? कळतोय का गेमप्लॅन? गेली आठ वर्ष मायलेकींनी इन्डस्ट्रीवर काय होल्ड मिळवलाय तो? ज्या कॅम्पमध्ये सुनयना नाही, तिथे आरूषी. जिथे आरूषी नाही, तिथे सुनयना! आणि आता सुनयनाला काम झेपत नाहीये, तर..."

"..तर समेट! आणि एलिट कॅम्पमध्ये आरूषीचा प्रवेश!" मी साक्षात्कार व्हावा तशी ओरडले!

’देअर यू आर’चा भाव आणत निकीने माझ्याकडे पाहून डोळा मारला.

"तुला काय वाटलं? सुनयना आज इतकी वर्ष इथे का आणि कशी टिकून आहे? एकाही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये ही बाई अडकलेली नाही, एकही लफडं नाही, एक चुकीचं अक्षर नाही. त्यांच्या भांडणातही हिने फक्त स्वत:ची बाजू ठामपणे मांडली. कोणाला एक शब्द वाकडा नाही बोलली. मीडियाशी संबंध कायम कॉर्डियल. मात्र सगळे टॉपचे रिपोर्टर, टॉपचे डायरेक्टर, प्रोड्यूसर, हीरो, हीरोईन्स- ओळखीचे. पार्टीजमध्ये भेटली तर आवर्जून भेटणार, बोलणार वगैरे. इतकं सगळं असूनही मध्ये ’आपल्या’ शिखा रामाणीशी वाजलेलं आठवतंय ना?" डोळे बारीक करत निकीने मला विचारलं..

आता मीही हसले. अर्थातच! शिखा रामाणीच आमची टफेस्ट कॉम्पेटिटर! ’फिल्मी जगत’ची एडिटर! तिने मध्यंतरी ’सुनयना आता म्हातारी झाली आणि तिने काम सोडावं’ टाईपचा एक लेख सुनयनाच्या त्याच त्या भूमिकांना उद्देशून लिहीला होता, जो अर्थातच सुनयनाला सहन झाला नव्हता. ओह! मला निकीच्या बारीक डोळ्यांचा अर्थ आत्ता कुठे उमजला. ओह! शिखा नाही, तर मग कोण? निकीच. ’फिल्मी जगत’नंतर आमच्या ’सितारा’चाच नंबर! आणि सध्या ’सितारा’ची सिनियर रिपोर्टर मीच. अच्छा! आता सगळे उलगडे व्हायला लागले.

"मग? आता काय प्लॅन आहे?" मी एक्साईट होत निकीला विचारलं.

"प्लॅन म्हणजे? मॅड. शीलाच्या दुर्दैवाने संधी आपल्याकडे चालत आलेली आहे लिटरली. नाहीतर आपल्याला कोण एक्स्क्लूजिव कव्हरेज देतंय? आपण कायम पन्नास लोकांच्या प्रेस कॉन्फमधून बाईट्स उचलणार! तर ह्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा. आरूषीशी मैत्री कर. तिचे सगळे मूड, टॅन्ट्रम्स सांभाळ. एस्के ग्रूपमध्ये शिरकाव करून घे. रणजितला पकड. ’एक अकेला’साठी थोडे कष्ट घे, म्हणजे तो आरूषीबद्दल पोपटासारखा बोलायला लागेल. आता आरूषीचा हीरो कोण असेल? एस्केचा पेटन्ट युवराज संधू तर नव्हे? माहिती काढ. आणि हो, तो कोण बरं... मोहन? फिल्मी जगतचा? हां मोहनच. त्याला आपल्यालडे आणायचं, ऍट एनी कॉस्ट. ते काम विपुल करेल. एका तासात मीटिंग अरेन्ज कर. सगळ्यांना बोलावून घे. डिटेल प्लॅन आखू. मार्केट काबीज करायच्या संधी सारख्या येत नसतात.. शिकलीस की नाही काही सुनयना मॅडमकडून?"


निकीने परत हसत हसत मला डोळा मारला!
---


2 comments:

aativas said...

तुम्ही ही कथा आधी एकदा या ब्लॉगवर प्रकाशित केली होती का? वाचल्यासारखी वाटते आहे आधी ..मी 'माहेर' मासिक वाचत नाही त्यामुळे तिथे वाचली असण्याची शक्यता नाही.

poonam said...

बरोबर आतिवास, ही कथा आधी एकदा प्रकाशित केली होती, पण नंतर लगेच अप्रकाशित केली होती.