July 21, 2011

..and they lived happily ever after

इतक्यातच तीन मैत्रिणींची लग्न झाली- वयाची तिशी ओलांडल्यानंतर, पस्तिशीच्या जवळपास. ह्या तिघींची लग्न (समाजमान्य चाळणीनुसार) तशी लांबलेलीच. त्यांचं लग्नाचं लग्नाळू वय सरल्यामुळे मनात कुठेतरी आता ’बहुतेक करतच नाहीत ह्या लग्न’ असं परस्पर तात्पर्य लावूनही त्यांच्या आसपासचे मोकळे झालेले. कधीही कोणत्याही वर्तुळात भेटल्यावर त्यांच्यापैकी कोणा एकीचा विषय निघाला, की ’नाही अजून’ म्हणून जमलेले लोक सुस्कारे टाकायचे. क्वचित उलटसुलट चर्चा करताना तर ’बरंय नाही केलंय लग्न ते.. आम्हाला विचारा त्यातल्या कटकटी’ म्हणून कोणीकोणी हेवेभरले उद्गारही टाकले.

ह्यांची लग्न झाली अशी बातमी कळल्यानंतर अर्थातच खूप खूप बरं वाटलं, आनंद झाला.

थोड्या मोठ्या वयात केलेलं लग्न हे जास्त डोळसपणे केलेलं असू शकेल का, असा विचार मनाला चाटून गेला. आजकाल, मुलींचं शिक्षण झालं, मुलांना नोकरी लागली, की उरकून टाक लग्न- असा ट्रेन्ड कमी झालाय. मुली आणि मुलं दोघंही जरा सेटल होईपर्यंत थांबतात. ’लग्न म्हणजे बेडी’ वगैरे समज (अजूनही) रूढ असल्यामुळे त्याच्याआधी थोडं स्वतंत्र जगू, मौजमजा करू, हिंडूफिरू, ’स्वत्व’ जाणून घेऊ, जोपासू.. लग्न काय आहेच नंतर- असा विचार करणारे अनेक आहेत. त्यांना त्यांच्या घरच्यांचाही पाठींबा मिळतो, हे महत्त्वाचं. चोवीस-पंचवीस वर्षाच्या मुला/मुलीने कितीसं जग पाहिलेलं असतं? जग सोडा, ’आपण स्वत: कसे आहोत, काय आहोत’ हे तरी त्याला कळलेलं असतं का? एका समाजमान्य चौकटीत बसण्यासाठी घाईघाईने, आपल्या नक्की आवडी, दृष्टीकोन ह्याचा विचार न करता, ’सगळं बरं असलेल्या’ मुला/मुलीबरोबर लग्न उरकून टाकायचं आणि नंतर मग काही बिनसलं तर आयुष्यभर पस्तावायचं. (एकवेळ अगदीच वेळ आली, तर घटस्फोट घेऊन तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता, पण त्यामुळे त्या एका चुकीच्या जखमा तुम्हाला आयुष्यभर सोबत करतातच)

अशी घाई करण्यापेक्षा, थोडा सबूरीचा निर्णय मला जास्त बरा वाटतो. ह्यातल्या दोघी, ’मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत लग्न करणार नाही’ ह्या विचारावर ठाम होत्या. वय वाढतंय, लोक टोमणे मारत आहेत, ’वेळ निघून चालली आहे की काय’ अशा insecurities त्यांना आल्या असतीलही. पण त्या त्याला बळी पडल्या नाहीत. आपल्या विचारावर थांबून राहिल्या. त्यांच्या घरच्यांकडूनही सहकार्य मिळालं, जिथे मिळालं नाही, तिथे त्यांनी दुर्लक्ष केलं, पण लग्नाची घाई केली नाही, हे मला सर्वात जास्त आवडलं. कित्येकदा, समाजाच्या दबावाला- ह्यात नातेवाईक हा एक मोठा गट आहे, स्वत:वरच नसलेल्या विश्वासाला, ईमोशनल ब्लॅकमेलला अनेक तरुण/ तरुणी बळी पडतात. मनात नसूनही लग्न करतात, होणार्‍या जोडीदाराच्या वागणूकीविषयी मनात काही पाल चुकचुकत असूनही, भीड किंवा संकोचापायी ती उघड बोलत नाहीत आणि सगळे पत्ते उघडे होईपर्यंत वेळ गेलेली असते.

’तुमचं वय वाढतंय, लग्न कधी करणार, सेटल कधी होणार आणि तुम्हाला मुलं कधी होणार?’ हा काळ्या यादीतला असलेला सर्वात वरचा प्रश्न आहे. With due respect to their emotions, पण अहो, विज्ञान इतकं पुढे गेलंय, तरूणांच्या तब्येती व्यवस्थित धडधाकट आहेत- आता खरंच ’तिशीच्या आत दोन मुलं’ ह्याची गरज आणि घाई राहिलेली नाही. योग्य औषधं, काळजी घेतली, तर मुलं होण्यात काहीच अडचण नाही. सध्या तर कित्येक जोडपी डोळसपणे ’मुलं नको’ हाही निर्णय घेतात. आणि ही जोडपी आनंदातही असतात. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की त्यांना उद्या नातवंडं हवं म्हणून आज ह्यांनी लग्न करायचं? न पटणारं लॉजिक नाही वाटत?

मी पंशविशीत लग्न करणार्‍यांच्या विरोधात आहे असं समजू नका :) मी स्वत: त्याच वयात लग्न केलं आणि मला त्याचा पश्चात्ताप वगैरेही कधी झाला नाही. पण ते वय सरलं की ’संपलं सगळं’ असा जो सूर निघतो, तो थोडा अनाठायी असं आहे माझं मत आहे. लग्न हा एक मोठा टप्पा आहे एखाद्याच्या आयुष्यातला. तो गाठायचा म्हणजे पुरेसा वेळ, मनाची तयारी आणि खात्री नको? एखाद्याची जोडीदाराबद्दलची खात्री टीनएजमध्ये पटेल, एखाद्याला वीशीत आणि एखाद्याला त्यानंतर. एखादा कधीही त्या वाटेलाही जाणार नाही. पण ह्या त्याचा निर्णय असायला हवा, बाकीच्यांचा नाही. शेवटी, ते म्हणतात ना, ’शादी का लड्डू- जो खाए वो पछताए, जो ना खाए वोभी पछताए!’ माझ्या ह्या मैत्रिणींच्या चहर्‍यावरचं लग्न झाल्यानंतरचं सलज्ज हास्य, मनापासून आनंदी चेहरा, नवपरिणीत वधूंचे टिपिकल किस्से असतात- ह्याच्या ना अशा सवयी आहेत, आणि तो ना तसा बोलतो वगैरे अगदी तेच, एखाद्या अठरा वर्षाच्या वधूसारखं! त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळाला आणि त्या सुखी आहेत, ह्यापेक्षा अजून काय हवं?

6 comments:

Yogini said...

nehamipramane uchch.. :)

इंद्रधनू said...

आवडलं..... :)

श्रद्धा said...

उत्तम मांडलेय विचार! मी तुमच्याशी १००% सहमत आहे.

do said...

:)

Nisha said...

absolutely agree with you - agadi patala manala :)

भानस said...

एकदम पटेश. समाजाला व खास करून नातेवाईक व शेजारपाजाराला बळी पडून लग्न करून मोकळं होण्याची चूक करताच नये.