March 21, 2011

At home, (but working!)

सं कोणी म्हणालं, की "सध्या मी ’घरीच असतो’" तर ऐकणार्‍याचा मनात ना ना शंकाकुशंका लगेच डोकं वर काढतात! ’घरीच असतो’ ह्या दोनच शब्दांना एक जबरदस्त ’धस्स’ करणारा ध्वनी आहे! त्याचा अर्थ, ’सध्या काहीच कामधंदा करत नाही, निरुद्योगी आहे, घरात रिकामा बसलेला असतो नुस्ता’ हे सगळं आलं त्यात. बाई घरी असली, तर त्यात नवलविशेष नाही काही. पुरुष मात्र घरी असला, की संपलंच!

मला नक्की आठवत नाही, पण मी दहावी-अकरावीत असताना माझे वडील असेच काही काळ ’घरी होते’. त्यांनी त्या आधीच पाचेक वर्ष ’नोकरी सोडून ऑफिस थाटण्याचं’ कमाल मध्यमवर्गीय धाडस केलेलं होतं. त्यानंतर थाटलेल्या ऑफिसातल्या भागीदारांबरोबर काहीतरी मतभेद झाले होते आणि त्यामुळे ते सगळंच संपुष्टात येऊन, त्यानंतर ते घरी होते चक्क. घरातल्यांची त्यांना तेव्हा (आणि अजूनही) विचारण्याची प्राज्ञा नव्हती, की बाबा, नक्की काय झालंय? त्यांनी आपणहोऊन आईला जे काही सांगितलं असेल तेवढंच. पण त्या काळात साहजिकच ते अस्वस्थ असायचे. खूप विचार करत बसलेले असायचे, किंवा पेशन्सचा डाव मांडून तासनतास वेळ घालवायचे. घरी पैसे येत नाहीयेत, प्रपंच तर चालवायचाय, काम करायचंय, पण तत्वांविरूद्ध करायचं नाही- अशा प्रसंगात नक्की करायचे तरी काय आणि कसे ह्याबद्दल विचार करत असावेत बहुतेक. घरी ते बोलायचेही नाहीत जास्त. माझं वय अगदी ’अडनिडं’- टीन एज. नुकतीच कॉलेजमध्ये जायला लागलेली. नुकतेच ’मित्र’ही झालेले. घर मध्यवर्ती भागात असल्याने, सतत मित्र-मैत्रिणी घरी यायचे. पण, एक तर घर लहान. त्यात वडील घरी. मला अगदी चोरट्यासारखं वाटायचं. वाटायचंही, की काय वाटत असेल ना माझ्या ’फ्रेन्ड्ज’ना? की हिचे वडील घरीच असतात. तेव्हा तर ’आपण आता खूप गरीब झालेलो आहोत, आणि कॉलेजमध्ये वायफळ खर्च करणं योग्य नाही’ असंही मी स्वत:च ठरवून टाकलं होतं. कालांतरानं अर्थातच सगळं ठीक झालं. त्यांनी घरातूनच पत्रव्यवहार वगैरे करून महाविद्यालयांशी संपर्क साधला असावा. थोड्या दिवसांनी ते पूर्णवेळ प्राध्यापकी करायला लागले. त्यांना अनेक मॅनेजमेन्ट महाविद्यालयांमधून विचारणा करण्यात आली, ते तिथे शिकवायला वगैरे लागले आणि गाडं पूर्वपदावर आलं. मीही कॉलेजात रोज कॅन्टीनला जायचा ’वायफळ खर्च’ करू लागले :) घरादारही सैलावलं.

आज चित्र किती बदललंय. सध्या अनेक तरूण लोक मध्येच ’कंटाळा आला’ म्हणून नोकरीतून ब्रेक घेतात, क्लेम ठेवून चक्क सुट्टी घेतात सहा सहा महिने, दुसरं काही करता येईल का ह्याची चाचपणी करून बघतात. पंधरा-वीस वर्षापूर्वी ही चैन कुटुंबप्रमुखांना शक्य नव्हती. एक तर नोकरीतून मिळणारे उत्पन्न बेताचे होते. शिवाय, ’डबल इंजिन’ सर्रास नसायचं. त्यामुळे सतत उत्पन्न-खर्चाचा मेळ साधण्याची टांगती तलवारही असायचीच. त्यामुळे बाप्यामाणूस घरात दिसला, की संशयित भुवया वर उडायच्याच. ’आता ह्यांचं कसं होणार? ह्याला नैराश्य येऊन ह्याने पुढे काहीच नाही केलं तर? व्यसनी झाला तर? बायको-मुलांचं कसं होईल? आपल्याकडे पैसे मागितले तर काय?’ न संपणारे प्रश्न! उलट, आताच्या बदललेल्या काळात घरी बसा, बसू नका, काम करा, करू नका- कोणीच काही विचारत नाही. ही पिढीही बर्‍यापैकी हुशार आणि विचारी असल्यामुळे रॅश निर्णय घेत नाही. ’घरी बसण्याचा’ निर्णय हा विचारपूर्वक घेतलेला असतो. पुष्कळदा त्यांना घरून पाठींबाही असतो.

ह्या ’घरीच असतो’ ह्या दोन शब्दांना पुढे ’..घरूनच काम करत असतो’चं शेपूट लागलं, की त्या ’धस्स’चं ’हुश्श’ होतं. हां, मग हरकत नाही. घरून का असेना, ऑफिसचं काम चाललंय ना? मग ठीके. नोकरीबिकरी सोडून घरी तर नाही ना बसला? अशा ’घरनं काम करणार्‍याला’ सर्व काही माफ असतं मग! उलट थोडी सहानुभूतीही जास्त मिळते. अलिकडच्या काळात ’वर्किंग फ्रॉम होम’ची सवलत मिळायला लागल्यापासून हे ’घरनं काम करणं’ खूप प्रचलित झालंय. अनेक सॉफ्टवेअर कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना ही सवलत देऊ करतात. तुमच्याकडे लॅपटॉप आणि इन्टरनेट कनेक्टीव्हिटी असली की झालं! एक तर ह्या सगळ्या कंपन्या शहरापासून दूर. जायला-यायला दोन ते अडीच तास सहज मोडणार. कमीतकमी नऊ तास काम. गेलेला मनुष्य किमान बारा तास घराबाहेर. त्याउलट, घरून काम करताना, हा जायचा-यायचा वेळ तर नक्की वाचतो. शिवाय, घरीच आहे म्हटल्यावर वेळच्यावेळी खाणं, जेवण होतं, घरच्यांबरोबर थोडा वेळ मिळतो. अर्थात, ते ऑफिसचं वातावरण, मित्र, टपरीवरचा चहा वगैरेवर पाणी सोडायला लागतं. पण आठवड्यातून दोनदा जरी घरून काम केलं, तरी बरंच मन:स्वास्थ्य लाभतं- त्या माणसालाही आणि त्याच्या कुटुंबीयांनाही. ’Working from home’ म्हणजे सुवर्णमध्य आहे. आपलं माणूस डोळ्यासमोरच दिसतंय, पण रिकामटेकडं नाही.. सगळी टेन्शन्सच जातात ना.

माझा लेक तर बाबा घरी असले की खुश असतो. कारण मग त्यांना घरी यायला उशिर वगैरे होते नाही, उलट त्याच्याबरोबर खेळायला त्यांना वेळ आणि उत्साह असतो. आणि इथे, काही वर्षांपूर्वी, माझे बाबा जेव्हा घरी होते, तेव्हा मला ते अजिबात आवडायचं नाही! कोणाला काय, तर कोणाला काय! कालाय तस्मै नम:!!

7 comments:

aativas said...

काळाबरोबर संकल्पना पण बदलतात म्हणून ठीक आही.. नाहीतर काही करायचं म्हणजे 'इतिहासाच' ओझ घेऊनच कराव लागल असत आपल्याला :-)

vaishali said...

sahich ekdum, me pan software enginer ahe, ani majh pan 1 week pasun "working from home" chalu ahe :)

प्रशांत दा.रेडकर said...

खुप छान लिहिले आहे.
मी देखिल मध्यांतरी पुढे शिकता यावे साठी घरी बसलो होतो. :-)
माझ्या अनुदिनीचा पत्ता: http://prashantredkarsobat.blogspot.com/

Naniwadekar said...

> कालाय तस्मै नम:!!
>
खरं आहे.

नेहमीप्रमाणेच हा सुद्‌धा उत्तम लेख.

- डी एन

Vinayak Pandit said...

अगदी बरोबर आहे तुमचं निरीक्षण आणि मार्मिकपणे मांडलंय तुम्ही ते! कालाय तस्मै नम: असं म्हणतात ते पटतं.पोस्ट आवडली!

poonam said...

धन्यवाद आतिवास, वैशाली, प्रशांत, नानिवडेकर आणि विनायक :)

अपर्णा said...

मस्त लेख...सध्या मी पण WFH आहे. फक्त खर सांगू? आता वाटत हापिसात गेलेलं बर... निदान काम संपतं तरी..घरी काही वेळा सारखं काम सुरूच असतं असही होतं....अर्थात यातून सुवर्णमध्य साधता आला तर मात्र nothing like it....