September 21, 2010

नावानंतर काय आहे?

साहेबाची भाषा कशी आहे पहा-

"Hi, I am John Abraham, you can call me John.."
"Yes John, sure..."

आता मराठी पाहूया-
"नमस्कार, मी जनार्दन अगरवाल.. मला जनार्दन म्हटलंत तरी चालेल.."
"बरं बरं, तर जनार्दनराव.."

अर्र! राव? बरं, राव नाही, तर जनार्दनाला पुढे 'दादा', 'जी', 'भाऊ' असं काहीतरी लागणारच.. त्याला नुसत्या त्याच्या नावानं हाक मारणं आपल्या 'संस्कृतीत' बसणारं नाही ना.. अगदीच दोस्तीखातं असेल, तर जनार्दनचं 'जन्या' होणार. पण पालकांनी जे नाव ठेवलं आहे, त्याच नावात किंचितही बदल न करता, त्याला कोणतंही बिरूद वा शेपूट न जोडता त्याला संबोधणं हे आपल्या संस्कृतीत कदापि बसत नाही! आदर दाखवायचा म्हणून, नुसतंच कसं नावानी हाक मारायची म्हणून, अशी काही ना काही कारणं देऊन नावानंतर काहीतरी लागतंच.

बरं, हे नावानंतर काय लागतं, त्यावर आपला स्वत:चा काहीच कन्ट्रोल नसतो हो.. म्हणजे नाव आपलं, पण ते कसं म्हणायचं हे समोरचा ठरवणार. तो समोरचा आपल्या वयाचा, हुद्द्याचा, मानाचा, समाजातल्या त्याच्या आणि आपल्या स्थानाचा सारासार विचार करणार आणि मग ठरवणार आपली लायकी- मग कधी पुढे लागणार दादा, कधी काका, कधी सर! हे अर्थातच स्त्रियांनाही लागू आहे..त्यांना तर अनंत शेपटं- ताई, मावशी, काकू, वहिनी, आजी वगैरे.. एखादा रिक्षावाला 'अगं ए मावशे, नीट बघ की समोर' असं म्हणेल,तर त्याच स्त्रीला ऑफिसमधले लोक 'मॅडम' म्हणतील.. आजकालच्या फॅशनीप्रमाणे झोपडपट्टीत रोज एक नेता निर्माण होत असतो.. सहाजिकच त्याचे अनुयायी त्याला 'दादा' म्हणतात, आणि तो ज्यांच्या प्रभावाखाली आहे ते सगळे 'साहेब' आपोआपच होतात!

लग्न झाल्यानंतर मुलींना अपरिहार्यपणे चिकटणारं शेपूट म्हणजे 'काकू'! जणू काही लग्न करणार्‍या सर्व जणी ह्या 'काकूबाई' कॅटॅगरीच असतात! पण त्याला इलाज नाही! कालची 'ताई' आज लग्न झाल्यावर 'काकू' होते.. हे मी माझ्यावर गुदरलेल्या त्या हृदयद्रावक प्रसंगानंतर शपथपूर्वक सांगू शकते! लग्न झाल्याच्या दुसर्‍या दिवशी मला सासरच्या शेजारणीची चांगली कॉलेजमध्ये जाणारी कन्या 'काकू' म्हणली होती! आणि कहर म्हणजे ज्याच्यामुळे मी 'काकू' झाले, त्याचं प्रमोशन नाही झालं! तो मात्र 'दादा'च!! आम्ही काही मैत्रिणींनी मात्र आमच्या मुलांना ट्रेन केलंय- ते आम्हाला संबोधतांना 'मावशी' म्हणतात, 'काकू' नाही! 'मावशी' कसं गोड वाटतं, जवळीक दाखवतं आणि वयदर्शकही मुळीच नाही.. शिवाय ते नातं आईकडूनचं आहे. 'काकू' म्हणजे अगदी 'वडिलांच्या भावाची/ मित्राची बायको' असा लांबचा वळसा घालून येतं आणि अजूनच नकोसं होतं!

लहान मुलं मात्र समोरच्याचं बरोब्बर मूल्यमापन करतात- ते त्यांच्या अँगलने लोकांकडे बघून त्यांचं वय ठरवून हुद्दाही ठरवतात. आम्ही लहानपणी वाड्यात रहात असताना वाड्यातल्या ताईच्या २ वर्षीय मुलानी सर्वप्रथम माझ्या आईला 'आजी' केलं होतं! आम्हांला तेव्हा फार गंमत वाटली होती.. पण हेच मी चांगल्या कळत्या वयात केलं होतं!! मी पेईंग गेस्ट म्हणून ज्या बाईंकडे रहायला गेले त्या टिपिकल गोर्‍या, घार्‍या आणि पांढर्‍या केसांच्या अंबाडा घालणार्‍या एकारांत होत्या. सहाजिकच मी त्यांना 'आजी' म्हटले.. मी असं म्हटल्याबरोब्बर तिथल्या आधीचा मुली फिस्सकन हसल्या.. मला कारण कळलं नाही! सत्तरीच्या बाईला 'आजी' नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तर त्या म्हणल्या त्यांना सगळे 'काकू' म्हणतात. तूच पहिली 'आजी' म्हणणारी! त्यांनाही ते आवडलं नव्हतंच.. 'आजी?? बरं बरं. झालेच आहे आता वय! आजीच म्हण हो!' असा शेलका आलाच होता, पण मी त्यांना तिथे असेपर्यंत 'आजी'च म्हणत राहिले!

असं थेट वयदर्शक बिरूद लागलं की एकट्या बायकांनाच वाईट वाटतं असा समज असेल तर काढून टाका.. पुरुषही आपल्या इमेजबद्दल किती 'हळवे' असतात हे नुकतंच समजतंय.. आमच्या इथे गाड्या धुणारे, इस्त्रीचे कपडे नेणारे, दूधवाला, पेपरवाला हे सगळे जसे मला 'काकू' म्हणतात, त्याच ओघात माझ्या नवर्‍याला राजरोसपणे 'काका' म्हणतात आणि दर वेळी ते त्यांच्याकडून निमूटपणे ऐकून घेताना त्याच्या हृदयाला घरंबिरं पडतात! दरवेळी त्याने 'काका' ऐकलं की तो स्वत:चीच समजूत काढतो-"आजकाल मला सगळे 'काका' म्हणतात चक्क! मी काही इतका मोठा दिसत नाही.. अजूनही मला लोक विचारतात, 'इंजिनिअरिंग करून पाचसात वर्षच झाली असतील नाही तुम्हाला?' म्हणून! ह्या लोकांना काही कळत नाही! काका म्हणतात शहाणे. शहाणे कसले वेडे आहेत झालं!' मीही 'च्च, खरंच लोक ना..' असं म्हणत त्याच्या समर्थनार्थ मान हलवते, असा विचार करत, की नक्की कोणाला जास्त कळतं ते दिसतंच आहे की!!

तसंच, आमचे काही अविवाहित मित्र आहेत, त्यांचा असा आग्रह आहे, की जोवर त्यांचं लग्न होत नाही, तोवर त्यांना 'काका' म्हणण्यात येऊ नये.. जोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं! त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हाटल्यावर तर चक्क 'अंकल मत कहो ना..'चा टाहोही फोडतात ते! आता ह्यांनी चाळिशी गाठेस्तोवर लग्न नाही केलं तरी 'दादा'च रहाणारेत की काय!! त्यांचं पाहून मला माझ्या आजीचं वाक्य आठवतं- माझ्या बहिणीला मुलगा झाल्यानंतर कोणीतरी माझ्या वडिलांना गंमतीनं म्हणालं- "तुम्ही आजोबा झालात, म्हणजे म्हातारे झालात आता!" त्यावर आजी लगेच, "जोवर मी जिवंत आहे, तोवर माझ्या मुलाला कोणी म्हातारं म्हणायचं नाही!" काहीकाही गोष्टींना लॉजिकच नसतं हेच खरं!

थोडक्यात, एखादा आपलं नाव कसं प्रेझेन्ट करावं हे ठरवू शकतो- आडनाव लावायचं की नाही, आईचं नाव मध्ये लावायचं की वडिलांचं, नावामागे श्री. लिहायचं की रा.रा., सौ., की कु., की श्रीमती. की काहीच नाही, पण आपल्या नावानंतर लागणारं शेपूट मात्र अपने हाथमें नही बाबा. लोकांना काही सांगायला जावं, तर 'आँटी मत कहो ना' सारखा विनोद होतो आणि जे नकोय ते हट्टानं मागे चिकटतं. त्यामुळेच शेक्सपियरही इतकंच म्हणून गेला, की 'नावात काय आहे?' 'नावापुढे काय आहे?' हा प्रश्न मात्र ऑप्शनलाच टाकला त्यानेही!

ही तर साध्या माणसांची कहाणी झाली.. खुद्द गणरायाला तरी आपण कुठे सोडलंय? गजाननाच्या स्तुतीपर शेकडो श्लोक आहेत, आरत्या आहेत, गाणी आहेत, विशेषणं आहेत आणि सगळी अगदी यथोचित आहेत. तरीही प्रेमाने हाक मारायची असता, आपण 'बाप्पा' च म्हणतो ना! ह्या 'बाप्पा' मधून आपल्याला वाटणारा सर्व आदर आणि प्रेम अगदी स्वच्छपणे दिसतं.. पण खुद्द बाप्पाला आवडत असेल का बरं असं आपण त्याला एकेरी हाक मारणं? त्याची इच्छा असेल की त्याच्या भक्तांनी त्याला आदरार्थी हाक मारावी, तर? दरवर्षी गणपतीउत्सव 'श्रीमान विघ्नहर्ता, लंबोदर, रत्नजडित, मुकुटमंडित गजाननराव ह्यांचा उत्सव' ह्या भारदस्त नावाने साजरा झाला असता तर? छे बुवा! काहीतरीच वाटतं, नाही? 'बाप्पा' ही आमची लाडकी उपाधी आहे.. आम्ही तेच वापरणार!

तर, जिथे खुद्द गणपतीलाही चॉईस नाही देत आपण, तिथे आपणासारख्या मर्त्य मानवांना काय असणार? जे काही शेपूट लागेल ते निमूट ऐकून घेऊ, अगदीच काहीच्याकाही असेल, तर दोन सेकंद हसू आणि सोडून देऊ.. बोला 'गणपती बाप्पा, मोरया!'

7 comments:

सागर said...

मस्त झालं लेख...
साधीच गोष्ट पण छान लिहिलंय आपण.आवडल

aativas said...

ब-याचदा आपल्याला choice नसतोच. जे कोणी जी काही नावं ’ठेवतील’ त्याच्यासह जगावं लागत... पण नात्यांनुसार नावांपुढचा भाग बदलतो हे मात्र सगळीकडेच आढळतं.

Sharvu [Amala] said...

पुनम "ताई" खूपच छान!

Rahul Takale said...

agdi halke fulke

Kanchan Karai said...

जेव्हा ऑफीसमधे सर्वांना पहिल्या नावाने (First Name) हाक मारावी लागायची तेव्हाही थोडं अवघडल्यासारखं वाटतंच कारण एकाच हुद्‍दयावर काम करत असलो तरी एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने सिनियर आहे म्हटल्यावर नावासोबत सर किंवा मॅडम सोबत जोडून आदर द्यायची आपली सवय असते.

आज तुमच्या ब्लॉगबद्दल ईसकाळमधे माहिती आली आहे. हार्दीक अभिनंदन. तुमच्या ब्लॉगबद्दल ऐकलं होतं पण कधी वाचन झालं नव्हतं. यापुढे वाचत जाईन.

poonam said...

धन्यवाद आतिवास, सागर, अमला, राहुल, कांचन :)

कांचन, तुमच्या ब्लॉगबद्दलही येऊन गेलंय ना? तुमचेही अभिनंदन..

phdixit said...

good one
chhan lihile aahes