July 28, 2010

स्मिता, स्मितं आणि मी..

'स्मिता पाटील' हे नाव घेतलंय आणि हिंदी-मराठीमधल्या प्रत्येक चित्रपटरसिकाच्या हृदयात कळ उठली नाहीये असं होणार नाही! जबरदस्त व्यक्तीमत्त्व असलेली स्मिता!! तिचं नाव घेताच डोळ्यासमोरून काय काय सर्रकन सरकून जात नाही? सर्वप्रथम तिचे डोळे- बंदिस्त करून ठेवणारे, तिचा सावळा रंग- तो पाहिला की 'मेरा गोरा अंग लईले, मोहे शाम रंग दईदे..' आठवतं, तिचा शेलाटा बांधा, तिने अविस्मरणीय करून ठेवलेली हरेक भूमिका, तिचं कमर्शियल चित्रपटातही राखलेलं अस्तित्व, राज बब्बरसोबत असलेलं तिचं नातं, तिचा अकाली आणि दुर्दैवी मृत्यू आणि प्रतीक!



ज्येष्ठ सिनेपत्रकार ललिता ताम्हाणे यांनी स्मितावरचे त्यांचे सर्व लेख एकत्र बांधून केलेलं पुस्तक 'स्मिता, स्मितं आणि मी..' आपल्याला स्मिताच्या जमान्यात घेऊन जातात.. मुखपृष्ठापासूनच स्मिताचे एकेक ब्रेथटेकिंग फोटो आपल्याला खिळवून ठेवतात. ह्या पुस्तकात ललिताताईंनी स्मिताशी वेळोवेळी मारलेल्या गप्पा, तिच्या मुद्दाम घेतलेल्या मुलाखती, तिची केलेली फोटोसेशन्स असे सगळे कम्पायलेशन आहे. जवळजवळ प्रत्येक पानावर स्मिताचा श्वास रोखून धरायला लावणारा एक तरी फोटो आहे.. ते पुस्तक लांबून जरी दिसलं, तरी त्यावरचा स्मिताचा फोटोच तुम्हाला त्याच्यापर्यंत खेचून नेतो आणि नंतर ते पुस्तक आपण हातातून खाली ठेवूच शकत नाही..

पुस्तकाचा काळ साधारण १९७८-७९ ते १९८३ (स्मिताच्या मृत्यूपर्यंत आणि थोडा नंतरचा) असा आहे. १९८०मध्ये तर स्मिता टॉपला होती.. (अर्थात ती बॉटमला होती कधी? :) तिने जितकी वर्ष जे जे काम केलं ते ते टॉपचंच तर होतं!) स्मिता एक व्यक्ती म्हणून किती साधी होती ह्याची साक्षच ह्या लेखांमधून दिसते. त्या काळी नॉन-कमर्शियल सिनेमा, पॅरलल सिनेमा, आर्ट फिल्म्स- हे सर्व करणार्‍या लोकांची एक टीम होती. हे लोक वेगळे विषय, वेगळे सिनेमे, वेगळी रूपकं दाखवायला उत्सुक होते, आणि स्मिता त्यात आघाडीवर होती.. कोणतीही भूमिका करताना तिला वेगळा विचार, ओढूनताणून बेअरिंग घ्यायची वेळच नाही आली कधी.. स्क्रिप्ट ऐकता ऐकताच तिला ती भूमिका समोर दिसायला लागायची- मग तिचं वागणं, बोलणं, तिचे कपडे, तिच्या हालचाली- स्मितात ते सगळं भिनायचं, ती ती व्यक्तीरेखाच व्हायची.

स्मिताचं आणि दिग्दर्शकांचं ट्युनिंग, तिचं आणि इतर सहकलाकारांचं ट्युनिंग मात्र कसं होतं, मैत्री होती का, की सुप्त चढाओढ होती, दिग्दर्शक तिलाच का कास्ट करायला उत्सुक असायचे ह्याबद्दल ह्या पुस्तकात मात्र काही नाही.. मुख्यत्वे अर्थातच लेखिका आणि स्मिताच्या वेळोवेळी झालेल्या भेटी, गप्पा असे ह्या कम्पायलेशनचे स्वरूप आहे. त्यामुळे एक विवक्षित विषय घेतलाय, त्याबद्दल बोलल्या आहेत, किंवा एकापाठोपाठ प्रश्न आणि उत्तरं असं मुलाखतवजा स्वरूप नाही. त्यामुळे त्यात्या वेळी स्मिता काय करत होती हे एरवी कुठे वाचायला न मिळणारं आपल्याला वाचायला मिळतं.. पण त्या वेळी आलेले स्मिताचे सिनेमे, त्या भूमिका, ते पुरस्कार ह्याबद्दल त्या नेमक्या वेळी तिला काय अन् कसं वाटतंय हे वाचायला निश्चितच आवडलं असतं..

स्मिता गेल्यानंतर शबाना आणि रेखाच्या मात्र मोठ्या मुलाखती घेतलेल्या पुस्तकात आहेत.. त्या दोघी खूपच मोकळेपणाने बोलल्या आहेत स्मिता आणि त्यांच्या नात्याबद्दल.. स्मिता आणि शबाना तर कॉम्पेटीटर्स! 'अर्थ'च्या वेळी त्यांच्यात गैरसमज झाले आणि दुर्दैवाने ते तसे राहिले.. मध्ये त्यांनी ते दूर करायचा प्रयत्न केला, पण तो तात्पुरता झाला.. स्मिता असेपर्यंत तिच्यात अन् शबानात मैत्री होऊ शकली नाही- शबानाने खूपच मनमोकळेपणाने लिहिले आहे- कसे संबंध ताणले गेले, तिचा स्मिताबाबत काय दृष्टीकोन होता, तिने आर्टिस्ट म्हणून कसे डेव्हलप व्हायला हवे होते- सगळेच. वाचता वाचताच चटका लागतो. स्मिता गेली आणि शबानाच्या मनात असलेले सर्वच किंतू मागे पडले.. भावनिक होऊन शबानाने प्रतीकला दत्तक घ्यायचीही इच्छा केली होती, खरंतर इतके ते वरवरचे होते. पण ते त्याच वेळी त्यांनी संपवले नाहीत, हेही सत्यच. 'आज स्मिता असती तर तिने कशा भूमिका केल्या असत्या?' ह्याचं उत्तर काहीसं शबानाने आज रंगवलेल्या वेगळ्या भूमिका देतात. कमर्शियल आणि पॅरलल दोन्हीत शबाना कायमच काम करत आलीये.. स्मिता असती तर ह्या दोघींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बघणं आपल्यासारख्यांना म्हणजे मेजवानीच झाली असती, नाही?

रेखाचं तर स्मिताला एक वेगळंच आकर्षण होतं. स्मिताच्या दृष्टीने रेखा सौंदर्याचं परिपूर्ण रूप होतं.. तिच्या काळ्या, दाट केसांचं, अगदी तिच्या काहीशा अबोल, इन्ट्रोव्हर्ट स्वभावाचंही स्मिताला आकर्षण होतं.. रेखाशी फार प्रयत्नपूर्वक मैत्री केली होती तिने.. शबाना-रेखाची मैत्री होती, पण ह्या दोघींची नव्हती, तशीच ह्यांची व्हावी असे प्रयत्न स्मिताने केले.. पण त्याला गहिरं रूप यायच्या आधीच स्मिताने जगाचा निरोप घेतला.. योगायोगाने 'वारिस' ह्या स्मिताच्या शेवटच्या प्रदर्शित सिनेमाचं डबिंग रेखाने केलं.. ती म्हणते, सुरूवातीला स्मितासारखा आवाज काढणं, तिच्या ढबीत बोलणं, ते एक्सप्रेशन्स देणं अजिबात जमत नव्हतं, घडोघडी स्मिताची आठवण येत असे आणि आवाजच फुटत नसे! पण तिने प्रयत्नपूर्वक स्वतःला सावरलं आणि नंतर 'वारिस' जणू तिचाच चित्रपट असल्यासारखा तिने डब केला.

स्मिता आणि तिच्या 'माँ' ह्या नात्याबद्दलही पुस्तकात फार हृद्य लिहिलं आहे.. खरंतर स्मिताची आई ही सामाजिक कार्य करणारी आणि पेशाने शिक्षिका, तिचे वडिलही आधी समाजसेवक आणि नंतर मंत्री. थोडक्यात त्या काळातले राजकारणाशी संबंधित असले, तरी दोघेही अगदी साधे लोक. तिच्या माँना अर्थातच तिचा सिनेमा करणं पसंत नव्हतं. फार क्वचित त्या सेटवर यायच्या, तिच्या भूमिका पहायच्या, तिला शाबासकी द्यायच्या.. तिची नाटकं मात्र त्यांनी आवर्जून पाहिली.. कधीकधी सेटवर अचानक हजेरी लावून तिचा अभिनय पाहून 'चांगलं काम करतेस' म्हणून जायच्या आणि त्यांच्या ह्या कौतुकानं स्मिताच्या अंगावर मूठभर मास चढायचं. स्मितावर माँचा खूप प्रभाव होता. ती स्वतः 'आई' होण्यासाठी आसूसली होती, ते बहुधा तिला माँसारखंच व्हायचं होतं म्हणून. स्मिता गेल्यानंतर माँ मोडून पडल्या.. तरूण, गुणी मुलीचं निधन कोणत्या आईला सहन होईल? पण त्या जिद्दीनं सावरल्या ते केवळ प्रतीकसाठी.. 'साठीतली मी, आज परत आई बनले बघ, परत स्मितासाठीच..' हे त्यांचं वाक्यच बरंच काही बोलून जातं.. प्रतीकला 'आई' कशी होती, काय होती हे समजावं म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. स्मिताचे मोठाले फोटो, तिच्या सिनेमांच्या कॅसेट्स, तिच्या आवडी सगळ्यांसोबत प्रतीकला त्यांनी मोठं केलं.. त्यांच्याबद्दल आणि स्मिताबद्दल वाचताना भडभडून येतं अक्षरशः.

पुस्तकात एक गोष्ट मात्र नसलेली अगदी खुपते! मला तरी खुपली.. हे सर्व ज्यापायी झालं- राज बब्बर आणि स्मिता ह्यांचं नातं नक्की कसं होतं? ते कसे जवळ आहे, लग्नाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना काय मानसिक उलथापालथ झाली, नंतर नक्की काय अन् कसं बिनसत गेलं? ह्या सगळ्याबद्दल ललिताताई फार वरवरचं वा गूढ बोलल्या आहेत.. त्याकाळी त्या घटना ताज्या असताना कदाचित ह्याबद्दल लिहिणं उचित ठरलं नसतं, पण आता नवी आवृत्ती काढताना त्याबद्दल त्यांनी विस्तृतपणे लिहायला हवं होतं असं तीव्रपणे वाटतं!

ललिताताईंनी एके ठिकाणी लिहिलंय की एरवीची स्मिता स्वतंत्र बाण्याची होती, तिचं अस्तित्व पन्नास लोकांतही उठून दिसायचं, पण राज समोर आला की स्मिता स्वतःला विसरून जायची, सतत त्याच्या पुढेमागे करायची, तो म्हणेल तसंच वागायची.. जिने कायम एका कणखर, स्वतंत्र बाण्याच्या स्त्रीचं प्रतिनिधित्व स्वतःच्या भूमिकांमधून उभं केलं, तिचं असं वागणं होतं ह्यावर विश्वास बसत नाही! पॅरलल, कलात्मक सिनेमे सोडून तद्दन कमर्शियल सिनेमेही स्मिताने राजच्याच सांगण्यावरून केले.. त्याचं म्हणणं की तिचं टॅलेन्ट सामान्य माणसापर्यंतही पोचलं पाहिजे.. पण असे चित्रपट करून स्मितामधल्या अभिनेत्रीला समाधान मिळालं असेल का? असा काय जबरदस्त होल्ड राजने तिच्यावर प्रस्थापित केला होता, की ती स्वतःचा पिंडच विसरली? लग्न झाल्यानंतरचा भ्रमनिरास नक्की कशामुळे झाला? कसा झाला? स्मिता गेल्यानंतर अक्षरशः तिच्या टेलिफोनचं बिल भागवयालाही घरात पैसे नव्हते असा उल्लेख आहे. म्हणजे नक्की काय होत होतं? तिच्या तिच्या पैशांवरही हक्क नव्हता, इतकी ती हिप्नोटाईझच झाली होती? लग्नानंतर बरेच भ्रम मोडीत निघाल्यानंतर स्मिता सतत अस्वस्थ असायची. केवळ 'आई होणं' ह्यासाठी ती ते लग्न टिकवण्याची पराकाष्ठा करत होती असं ललिताताई म्हणतात पण अशा वेळी ती त्यातून बाहेर का पडू शकली नाही? स्वत्वच विसरण्याची वेळ तिच्यावर का यावी?- ह्याची उत्तरं मिळत नाहीत, एलापाठोपाठ नुसती प्रश्नचिन्ह समोर उभी ठाकतात.. ह्या दृष्टीने पुस्तक संपल्यानंतर प्रचंड रुखरुख लागून रहाते.. मान्य, की कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात सामान्य रसिकाने नाक खुपसू नये, जुन्या जखमा उकरू नयेत.. पण सलाईनची अ‍ॅलर्जी असताना जिला प्रकृती ढासळल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याआधी सलाईनच दिले जाते, तिच्या आयुष्यात नक्की काय बिनसत गेले ह्यावर थोडा तरी प्रकाश पडायला हवा होता, असे राहून राहून वाटतं..

बाकी, पुस्तकभर आणि पुस्तक वाचून झाल्यानंतरही स्मिता आपल्याला भारूनच टाकते.. स्मितं मात्र जास्त येत नाहीत, उदासी व्यापून रहाते for all it could have been.. only if.....!!! :-(

4 comments:

aativas said...

हं!! वाचून बघायला हवं हे पुस्तक... पण कदाचित काही गोष्टी दुस-यांकडून समजत नाहीत. खुद्द स्मितानेच लिहिल असतं तर... पण या ’जर तर’ ला काही अर्थ नसतो!!

Jaswandi said...

मी चुकुन जुन्या पोस्ट्वर कमेंट केली... तुला खो दिलाय

Dk said...

good one :) Feels like you'e started reading more or writing more about the stuff you've read?

I can't read this book! :(

Aditi Rajhans said...

Apratim ! Tumchi hee link majhya eka bahinine mala pathavli.. khupch chhan lihita tumhi.. Tumcha naav, patta kalu shakel ka.. tumhala bhetayla awadel...