July 12, 2010

हेमा मालिनी- द ड्रीमगर्ल!



हेमा मालिनी हे नाव, तिचं ’ड्रीमगर्ल’ हे विशेषण तसं पाहिलं तर जुनंच झालेलं.. तरीही त्या नावाची, त्या चेहर्‍याची मोहिनी मात्र अजूनही कायम आहे. चित्रपटसृष्टीत अजूनही सौंदर्य, ग्लॅमर टिकवून ठेवलेल्या जुन्या काळातल्या फार कमी अभिनेत्रीपैकी ही गुणी अभिनेत्री. तिच्या सुंदर चेहर्‍यामुळे, नाचातल्या नैपुण्यामुळे, तिच्या टिपिकल ’सौदिंडीयन’ हेलातल्या हिंदीमुळे आणि सर्वात जास्त धर्मेद्रबरोबर थाटलेल्या संसारामुळे आणि आता ईशा देओलच्या फसलेल्या कारकिर्दीमुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेली हेमामालिनी! तिचं आत्मचरित्र वाचून बरेच दिवस झाले, ते आधी इंग्रजीत, त्यानंतर मराठीत येऊनही तीन आवृत्त्या झाल्या.. खूपच सुंदर आणि प्रांजळ आत्मनिवेदन आहे ’हेमा मालिनी’. खरंतर चकचकीत बॉलीवूडमध्ये काम करणारी टिपिकल मेनस्ट्रीम हीरॉईन होती हेमा.. तिच्या आत्मकथनात काय वेगळं असणार? तरीही, तिचं अन्य अभिनेत्रींपेक्षा वेगळंच असलेलं आयुष्य पानापानातून डोकावतं, आणि वाचकाला गुंतवून ठेवतं..

पुस्तकाचा सुरूवातीचा भाग हेमाच्या बालपणाचा आहे, अर्थातच. हेमाला दोन मोठे भाऊ होते. तिची आई लक्ष्मीची परमभक्त. त्यांच्या घरी लक्ष्मीची मोठी मूर्ती होती.. लक्ष्मीच्या गळ्यातल्या माळेला म्हणतात- ’हेमामालिनी’. तिच्या आईला पक्की खात्री होती, की तिसर्‍या वेळी मुलगीच होणार, आणि झाली, तर देवीचा प्रसाद म्हणून तिचं नाव ठेवायचं ’हेमामालिनी’ आणि तसंच झालंही.

हेमाचे वडील एक कर्तव्यदक्ष नोकरदार मध्यमवर्गीय तमीळ ब्राह्मण होते. त्यांना तमीळ साहित्य, वाचनाची खूप आवड होती. घरात नेहेमीच साहित्यिक वातावरण असे. घराची, मुलांची सर्व जबाबदारी त्यांच्या बायकोची होती. त्या स्वभावाने अतिशय कडक. मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत. त्यांनी तिन्ही मुलांना, आणि खासकरून हेमाला अत्यंत कडक शिस्तीत वाढवलं. हेमा वयाच्या पाचव्या वर्षीपासूनच नृत्य शिकायला लागली. कोवळ्या वयात गुरूंकडे नाच शिकायचा, घरी येऊन परत रियाज़ करायचा, अभ्यास, खेळ यात बिचारी दमून जायची. पण कशातूनच आई सूट द्यायची नाही. बालसुलभ स्वभावाप्रमाणे हेमा आईला कधीकधी चकवायचा प्रयत्न करायची, पण मूळ पापभिरू स्वभाव तिला ते जास्त काळ करू द्यायचा नाही.. ती आपणहोऊनच आईकडे न केलेल्या रियाज़ाबद्दल कबूली द्यायची. हेमाचं आईवर आदरयुक्त प्रेम. आईचा धाक लहानपणापासूनच वाटायचा. आई जे म्हणेल ते ते आणि तसंच करायचं असतं ह्यावर हेमाची नितान्त श्रद्धा. आई आपलं वाईट कसं चिंतू शकेल? त्यामुळे आईवर हेमाने स्वत:पेक्षाही जास्त विश्वास टाकला..

पुढे सिनेमासृष्टीत आल्यानंतरही आईने हेमाची साथ सोडली नाही. प्रोड्यूसर्स, एजंट्स ह्यांना हेमाच्या आईलाच आधी तोंड द्यावं लागे. ह्याचा अनेकांना त्रास, अगदी जाच झाला. कारण अम्मांच्या अटी खूप असत. त्याही लेकीला ह्या असुरक्षित आणि अनिश्चित दुनियेत प्राणपणाने जपत. अनेक जण सेटवर हेमाकडे अम्मांविषयी तक्रार करत. पण हेमानेही त्यांना कधी एन्टरटेन केले नाही. जी रूढ पद्धत होती तीच चालू ठेवली.. ह्याने तिचे काही नुकसान झाले असे नंतरही तिला कधी वाटले नाही, की पश्चाताप झाला नाही- कारण हेच- आईवर ठाम आणि संपूर्ण विश्वास.

आधी केवळ नृत्याचे कार्यक्रम करता करता, हेमाचे मुंबईत आगमन झाले. पहिल्या हिंदी सिनेमात काम केल्यानंतरही आपण मुंबईतच स्थाईक होऊ, इथे, तेही केवळ नृत्यात नाही, तर थेट हिंदी सिनेमातच करीयर करणार आहोत, ह्याची नीटशी कल्पना माय-लेकींना आलेली नव्हती. त्या चेन्नई-मुंबई वार्‍या करतच होत्या. मात्र हेमाला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळायला लागला, ऑफरवर ऑफर यायल्या लागल्या, तसा हेमाच्या वडिलांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला- मुंबईत स्थाईक होण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करायचा. त्यांचं चेन्नईचं घर तसंच ठेवून त्यांनी हेमाला मिळणार्‍या पैशातून जुहूला जमीन घेतली आणि तिथे बंगला बांधला.

एव्हाना हेमाचं चांगलंच बस्तान मुंबईत बसलं होतं.. तिचा चेहराच प्रोड्यूसर्सना खेचून आणायचा, तिच्यासाठी सीन लिहिले जात होते, तिचं नृत्यकौशल्य दाखवणारी गाणी चित्रित केली जात होती, तिची एखाद्या हीरोबरोबर जोडी हिट झाली, की परत त्याच जोडीसाठी प्रोड्यूसर कितीही वेळ थांबायला तयार होत होते.. कामावर श्रद्धा आणि अफाट कष्ट घ्यायची तयारी ह्या दोन दुर्मिळ गुणांवर ती त्या काळची ’मोस्ट वॉन्टेड हिरॉईन’ ठरली.. ह्याच सुमारास, तिच्या आईमुळे अनेकांची कुचंबणा होत होती. अम्मा सिलेक्टेड लोकंच हेमापर्यंत घेऊन जात होत्या. कधीकधी तिलाही वाटायचं की अम्मा जास्त करतात. क्वचित त्यांच्यात वादही होत- हेमाला एखाद्या डायरेक्टर-प्रोड्यूसरबरोबर काम करायचं असे, पण अम्मांना ते पसंत नसे, वगैरे. पण ते कधी विकोपाला गेले नाहीत. कदाचित अंगभूत आज्ञाधारकपणामुळे हेमा अम्मांचं ऐकत असेल.

हेमाने एका बाबतीत मात्र कटाक्षाने सगळ्यांनाच नकार दिला- ते म्हणजे शरीरप्रदर्शन. ’कहानी की मांग’, ’सीन की मांग’ करत अनेक दिग्दर्शक हेमाला शरीराचा भाग उघडा टाकणारे कपडे, उगाचच तंग कपडे घालायचा आग्रह करत. अर्थातच हेमा नकार देत असे, पण कधीकधी तोडून टाकणं शक्य नसे. मग ती काय युक्ती करायची, की ऐन सेटवर तसले पोशाख घालायलाच नकार द्यायची! इकडे दिग्दर्शक, कॉशच्यूम डिझायनर हवालदिल व्यायचे! सेट रेडी, शॉट रेडी, बाकी लोक रेडी, पण मॅडम नॉट रेडी. का? कारण मनासारखे कपडे नाहीत! सगळ्यांना असं वेठीला धरायला अर्थातच हेमाला मनापासून वाईट वाटत असे, तरी त्या वेशभूषेत स्वत:ला पसंत पडेपर्यंत योग्य असे बदल करून घेई ती आणि मगच शॉट देई.

जशी हेमा हीरॉईन म्हणून गाजत होती, अर्थातच, तिची जोडीही अनेक हीरोंबरोबर गाजत होती.. तिची धडाकेबाज सुरूवातच ’जॉनी मेरा नाम’च्या देवानंदबरोबर झाली. त्यानंतर अर्थातच धर्मेन्द्र, जितेन्द्र, अमिताभ होते. स्वत:च्या आणि धर्मेन्द्रच्या प्रेमकहाणीची फार प्रांजळ कबूली हेमाने पुस्तकात दिली आहे. हेमा आणि धरमपा जवळ आले ते ’शोले’ दरम्यान. शोलेचं शूटिंग खूप काळ चालू होतं, त्या वेळात अर्थातच हेमा आणि इतर सर्व कलाकार त्यांच्या इतर चित्रपटात व्यस्त होते, पण दरवेळी शोलेच्या निमित्ताने एकत्र आले, की हेमाला ती ’फायर’ जाणवायची. तिच्यापासून कधीच लपलेलं नव्हतं की धरम विवाहित आहे, चार मुलं आहेत त्याला.. तरीही त्या आकर्षणापासून ती स्वत:ला आटोकाट प्रयत्न करूनदेखील लांब ठेवू शकत नव्हती. धरमने तर कोणाचीच पर्वा न करता स्वत:च्या प्रेमाची कबूली दिलेली होतीच. पण हेमाचे धाडस होत नव्हते. त्याच वेळी जितेन्द्र, संजीवकुमार ह्यांसारखे हीरोही तिच्या प्रेमात पडले होते आणि त्यांच्याकडूनही विवाहाचे प्रस्ताव हेमाला आले होते. हेमाच्या आई-वडिलांच्या दृष्टीने आणि खुद्द हेमाच्याही नजरेत, हे प्रस्ताव धरमपेक्षाही जास्त विचार करण्याजोगे होते- कारण एकच- जितेन्द्र आणि संजीवकुमार दोघेही अविवाहित होते! एक वेळ अशी आली होती, की जितेन्द्र हेमासोबत लग्न करण्यासाठी अडूनच बसला होता.. हेमाची परिस्थिती द्विधा- जितेन्द्र अगदी ’जण्टलमन’ माणूस, खोट काढण्यासारखं काही नाही, शिवाय लोकप्रिय स्टारही. तरीही तिचं मन ग्वाही देईना.. तिने फायनली मनाशी स्वीकारलं की धरमशिवाय ती नाही कोणाशी लग्न करू शकत आणि शेवटी तो विवाह (निकाह) झालाच. इथे हेमा म्हणते की ’मी अशा विवाहाचा पुरस्कार कधीही करणार नाही की असे विवाह करणार्‍यांची मला रोल मॉडेलही व्हायचे नाही. मलाही शक्य असतं तर मी हे लग्न टाळलं असतं, पण कधीकधी आपण परिस्थितीपुढे शरण जातो, आपल्याकडे दुसरा मार्गच नसतो.’ आत्तापर्यंत कायम अम्मा म्हणेल तसंच वागणारी हेमा, ह्या आयुष्यभराच्या निर्णयाच्यावेळीच त्यांच्या मनाविरुद्ध गेली ह्याचं अजून दुसरं स्पष्टीकरणही काय असू शकेल? खरंच, ते विधिलिखितच होतं!



ह्यानंतर पुस्तकात हेमा-धरमचं माफक वैवाहिक जीवन, इशा-अहानाचा जन्म, त्यांचं बालपण, हेमाने त्यांचे केलेले अनेक लाड, तिचे अनेक सिनेमे, पुरस्कार, नंतर केलेले बी ग्रेड सिनेमे, बॅले ह्यांचं कथन आहे, जेही वाचायला छान वाटतं. पण का कोण जाणे, संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर, आणि आताही सुमारे वर्षा-दिडवर्षानेही, जाणवत रहातं ते हेमाचं एकटेपण, किंवा तिचा ’वन-वूमन शो’! घरामधल्या तीव्र विरोधामुळे धरमपांना त्यांचं आणि हेमाचं लग्न झाल्यानंतरही नीटसं एकत्र रहाता आलं नव्हतं. कालांतराने इशा, अहानाच्या जन्मानंतर विरोधाची धार बोथट होत गेली, तरी धरमपा सतत हेमाकडेच राहिलेत असं फार कमी वेळा घडलं.

एकाच घरातले पती-पत्नी कितीही व्यस्त असले, अगदी दिवसदिवस एकमेकांचं तोंड पाहू शकले नाहीत, तरीदेखील तो/ ती ’आहे’ हा मानसिक आधारच पुरेसा असतो. इथे धरमपाजी होते, पण दूरच. तेही चित्रपटसृष्टीतले मोठे हीरो, त्यांचं शूटिंग, नंतरचे शेकडो व्याप, त्यांचं आधीच मोठं असलेलं कुटुंब आणि ही वाढीव जबाबदारी! वेळ पुरवणार तरी कसा? पण हेमाने ह्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. आपल्या नशीबात पतीसहवास किती आहे ह्याची जाण ठेवून तिने धरमपांकडे कधी अवास्तव मागण्या केल्या नाहीत. पर्यायाने, मुलींसाठी आणि मुख्यत्वे स्वत:साठी तिला खंबीर होणं क्रमप्राप्तच झालं! ह्याउप्पर जेव्हा जेव्हा प्रसारमाध्यामांमधून ती स्वत:-धरम-मुली ह्या नात्याबद्दल बोलली, तेव्हा तिने कायम धरमपांचा मान जपला, त्यांना कधी कोसलं नाही, की उघड तक्रार केली नाही. उलट आजही ती धरमपांबद्दल खूप प्रेमानेच बोलते. एकदा ह्या नात्याचा स्वीकार केल्यानंतर हेमाने स्वत:ला त्यात पूर्ण विरघळवून टाकलं, एक समजूतदार नातं उभं केलं त्यांनी ह्याबद्दल त्यांचं कौतुक वाटतं. आज आपण फार सहजपणे अनैतिक संबंध म्हणून लेबल त्यांना चिकटवून टाकतो, पण हे असं नातं टिकवून नेणं, निभावून नेणं म्हणजे काय दिव्य असतं हे त्यांचं त्यांनाच ठाऊक!

जितकी हेमा तिच्या अथक कष्टांसाठी नावाजली गेलेली आहे, तितकीच ती आज तिच्या ठामपणासाठीही ओळखली जाते. कदाचित आई-वडिलांनंतर आणि धरमपांच्या लिमिटेड साथीनंतर तो तिला अटळपणे स्वीकारावा लागला असेल. पण एक ’स्ट्राँग वूमन’ म्हणून ती ओळखली जाते. सतत फिल्मी लोकात, वातावरणात एका एकट्या बाईने रहाणं किती मुश्किल असेल, आपण कल्पनाच करू शकतो. त्यातून ही एकटी बाई अशीतशी नव्हे, तर ’स्वप्नसुंदरी’! किती प्रलोभनं आली असतील, किती कसोटीचे क्षण आले असतील, पण त्या सर्वांवर मात करून ताठ मानेने जगतेय हेमा मालिनी. साठीत पोचल्यानंतरदेखील आपलं सौंदर्य अजूनही टिकवून ठेवलेली, आपली ’डिग्निटी’ जपलेली हेमामालिनी. काहीशी गंभीर, अबोल, स्वत:च्या कोशात असणारी ’नो-नॉन्सेन्स’ हेमा, आज जेव्हा ’इन्डियन आयडॉल’सारख्या कार्यक्रमात गेस्ट म्हणून हजेरी लावते, स्पर्धकांबरोबर हसते, त्यांना गाण्यात साथही देते, तेव्हा तिचं ते दर्शन मनाला निश्चितच सुखावणारं असतं. पुण्याच्या गणेशोत्सवात आजही ती मुलींबरोबर नृत्याचे पदन्यास टाकते, तेव्हा तिचं ग्लॅमर, तिची ऐट लक्ष वेधून घेते. एक अभिनेत्री म्हणून ती उच्च नसेलही, पण एक व्यक्ती म्हणून ती मला आवडते.. आयुष्यात जे काही बरे-वाईट अनुभव आले ते पदरी बांधून, पचवून परत ताठ मान करत डौलाने जगणं हेमाला अगदी शोभून दिसतं. एखादी ’स्वप्नसुंदरी’ असावी तशीच ती होती आणि आजही आहे. She deserves every bit of that accolade- Hema Malini, the Dreamgirl!

9 comments:

शर्मिला said...

छानच लेख झालाय पूनम. पुस्तक वाचलेलं नसल्याने असं सविस्तर परिक्षण वाचायला आवडलं. हेमा तिच्या ग्रेस आणि डिग्निटी मुळे मलाही आवडते. इतकी ग्लॅमरस इमेज डिसेन्सी जपूनही मेन्टेन करणे खरोखरच कठीण आहे.

केदार said...

फारच छान हेमामालिनीच हे पडद्यामागच रुप दाखवल्याबद्दल धन्यवाद. आता तिचं आत्मचरित्र वाचण्याची उत्सुकता आहे.

Dk said...

Poonam, i loved the way you've wrote. If you have a copy of this book pls pass on :)

महेंद्र said...

पुस्तक वाचलेले नाही, पण परिक्षण खूपच छान झालंय.

तृप्ती said...

tujhe parixaN vachUn pustakAviShayE utsukatA vATate aahe. chhAn lihiles.

Unknown said...

e mast g ! vachavese vatate ahe..

Anonymous said...

Chhaan lihile aahes :)
Vaachale paahije he pustak aata
-Ashwini

Meenal Gadre. said...

मला खूप आवडते हेमा!
ती मॉडर्न ड्रेसपेक्षा पारंपारिक वेषातच छान दिसते.

Aditi Rajhans said...

Surekh lihilay !!! Khupch khaas ... Aditi