May 17, 2010

माझी आई आणि तिची आई

मी माझ्या आईवर खूप जास्त अवलंबून आहे. आधीही होतेच, पण लग्न, स्वतःचा संसार, स्वतःचं मूल झाल्यानंतरही आई अजूनही सारखी लागतेच. जरा कुठे खुट्ट झालं, एखादा पदार्थ करायचा असला, चार लोक येणार असले, लेक आजारी पडला, ऑफिसात/ घरी वाद झाले की सगळे आईच्या कानात ओतल्याशिवाय चैन पडत नाही! प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फोनचं प्रमाण अर्थातच जास्त. कारण फोन कानाला लावणं सोपं. आता एकाच गावात रहातो, सर्व सुविधा हाताशी आहेत म्हणून आईशी सतत बोललं जातं असंही नाही. ती सवयच आहे, किंवा नैसर्गिक ओढ- सगळं आईला सांगायची. त्यात्या वेळेला ती जेजे सांगेल तेही १०० टक्के पटतं असंही नाही, पण तिच्याशी मोकळेपणाने वादही घालता येतो, चिडता येतं, तिच्यापाशी रडता येतं, हताश होता येतं हे ठाऊक असल्याने सहाजिकच सगळं सगळं तिला सांगितलं जातं.

माझ्या आईचीही मी तशी मैत्रिणच (अशी माझी समजूत). म्हणजे कशी, की ती मुळातच मितभाषीच. घरात तिच्या सासूपुढे आणि माझ्या वडिलांपुढे गप्पा वगैरे मारायची टापच नाही. आता इतक्या काळानंतर वडिलांशी बरंच मोकळेपणाने बोललं जातं, पण सासूशी अजूनही नाहीच. माझ्या बहिणीचं लग्न मी दहावीत असतानाच झालं आणि ती खूप लांब गेली रहायला. ना तिच्याकडे ना आमच्याकडे फोन होता तेव्हा. पत्र हे एकच साधन, त्यात ती तिची खुशाली कळवत असे पण रोजच्या समस्या, फोडणी कशी करू, अमक्यात काय घालू टाईप प्रश्न (जे मी अजूनही विचारते ते) पत्रामधून कसे विचारणार? त्यामुळे ती तशी लांबच गेली. रोजच्या सुख दु:खाच्या गप्पा मारायला तिला मी न् मला तीच. त्यामुळे आई माझा हक्काचा श्रोता. कॉलेजच्या गंमती, मैत्रिणी, अभ्यासाचं टेन्शन, वेळापत्रकं, चैन, सिनेमे सगळं तिला विचारून. मी इतकी भरभरून बोलत असताना आई मात्र फक्त छोटं हसायची किंवा दोनचार वाक्यांचे योग्य असे प्रतिसाद द्यायची इतकंच. सासूशी मात्र तणाव असह्य झाला किंवा वडिलांच्या अफाट रागाची तोफ डागली गेली की मात्र आई बोलायची काहीबाही. पण ती प्रचंडच खंबीर. मी तर सगळं ठीक असतानाही थोडंस्स्संही काही बिनसलं की येताजाता रडायला सुरूवात करणारी. पण आई माझ्यासमोर तरी रडली नाही, हताश झाली नाही, कधीच.

माझंही लग्न झालं आणि वाटलं आता आई खरंच एकटी पडली असेल. कोणी न सांगताच आपणहोऊन मी आई-वडिलांच्या काळजीचा मक्ता मी माझ्याकडे घेतला. मुद्दाम त्यांना फोन करणं, काहीही विषय नसताना गप्पा उकरून काढणं, मुलाच्या निमित्तानं त्यांच्याकडे चक्कर तरी मारणं, काही नवीन पदार्थ केला तर तो पोचवणं असं काहीबाही..

मात्र आईचं तिच्या आईशी, म्हणजे माझ्या 'त्या' आजीशी कसं नातं होतं? ही माझी 'ती' आजी ग्रेट होती. सोळाव्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेऊन तिने तीन महिने तुरुंगात राहूनबिहून आलेली. सुटका झाल्यानंतर तिच्या पालकांनी मात्र तिचं लगेचच लग्न लावून दिलं. माझे आजोबा टिपिकल त्या काळातले सरकारी नोकर. दोन वेळा खायला मिळेल, ल्यायला मिळेल, मुलांना माफक शिकता येईल इतपत कमाई, अगदी मध्यमवर्गीय. मुलांचे फाजिलच काय, साधेही लाड नाहीत अगदीच क्वचित. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न त्यांनी झटपट ओळखीतली स्थळं पाहून लावून दिली. सण, रितीरिवाज, बाळंतपणं वगैरे केली आणि मुलींच्या संसारामधून अलिप्तता स्वीकारली. गावात, चालत जाण्याच्या अंतरावर माहेर असूनही आईही सारखी तिच्या आईकडे येताजाता जायची नाही आणि तिच्या आईचीही तशी अपेक्षा नव्हती. 'ती' आजी फक्त काही सण, पूजा, कार्य असलं की आमच्याकडे आलेली आठवतेय मला. ते आजोबा तर कधी आले असतील का, शंकाच आहे! घरातले मतभेद, वाद, इतकंसं खुट्ट झालं की ते घेऊन माझी आई कध्धीच तिच्या आईकडे गेली नाही. खूपच जास्त झालं, तर देवळात जाऊन यायची. आल्यानंतर परत रोजचं काम सुरू. गाडंदेखील आपोआप मागील पानावरून पुढे चालू.

हळूहळू काळाची पानं उलटली, हे सगळेच लोक म्हातारे झाले, त्यांची वयं झाली, तसतसे संसारात अनेक बदल आपोआप होत गेले. ज्या गोष्टी आधी महत्त्वाच्या वाटत नव्हत्या, त्या आता वाटायला लागल्या, कोपरे बोथट झाले, काही तर हळवेही. आता माझी आई तिच्या आईची खुशाली, काळजी फोनवरून तरी घेऊ लागली, तिच्याकडे औषधं, खाऊ घेऊन जायला लागली. आता त्यावरून तिची सासू तिला बोलली तरी त्याची फारशी खंत ती करेनाशी झाली. पण मी माझ्या आईशी मारत असे, तशा खळखळून गप्पा, सुटसुटीत ऐसपैस वागणं असं ते नसायचं, नुसताच अबोल ओलावा, अनुभवण्यासारखा.

दोन वर्षांपूर्वी माझे 'ते आजोबा' गेले. वृद्धापकाळाने. पुण्यवान आत्मा. खितपत पडले नाहीत की कोणाला, अगदी आजीलाही त्यांची सेवा करायला लागली नाही. थकले मात्र होते खूप. तापाचं निमित्त झाले आणि तीन दिवसात गेले. त्यांचं जाणं हे त्या आजीला धक्कादायक नव्हतं, कारण काळाने आपले हातपाय तिच्यावरही पसरले होते, पण ते गेले, तशी 'आता आपण सुटलो' ही भावना तिने मनात धरली. 'आपल्यामागे त्यांचं कसं होईल?' ही प्रचंड भीतीदायक चिंता कोणत्याही वृद्ध जोडप्यात असते, तशी त्यांच्यातही होती. आजोबा गेले, तसं मात्र आजीने सगळ्यातूनच अंग काढून घ्यायला सुरूवात केली. आता आईला, मावशीला कधी फोन करायला, भेटायला जायला उशीर झाला, तरी तिने रागावणं बंद केलं. तिच्याकडची जी काही जमापूंजी होती, ती तिने मुलांना, नातवंडांना वाटायला सुरूवात केली. हे तिचं असं वागणं फार विचित्र वाटायचं, तिच्याकडून काही घेताना अगदी लाजल्यासारखं वाटायचं. पण 'घ्या गं, मी जिवंत आहे तोवर घ्या. आता माझे किती दिवस राहिलेत?' असं म्हणायची आणि यावर निरुत्तरच व्हायचो आम्ही. नंतर नंतर ऐकायला कमी येतं, समोरचा काय बोलतो हे पटकन कळत नाही म्हणून तिने बोलणंच बंद केलं होतं.. तिला भेटलं की एक अनामिक भीतीच वाटायची..

'ती' आजी १५ दिवसांपूर्वी गेली. अगदी अचानक. कोणताही आजार नाही, दु:ख नाही. एका टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं होतं, दुपारी १ च्या सुमारास. टेस्टला थोडा वेळ होता, म्हणून खोलीत नेलं आणि चारच्या सुमारास कार्डीयॅक अरेस्टमुळे अजून एक पुण्यात्मा पंचतत्वात विलीन झाला.

आमच्या सर्वांसाठीच हा प्रचंड मोठा धक्का होता. वार्धक्य आलं, माणूस जाणार हे सगळं माहित असतं, तरीपण त्याचं जाणं असं अंगावर येणं आपण थांबवू शकत नाहीच कधी. मला वडिलांचा फोन आल्याबरोब्बर मी आईकडे धाव घेतली. अजून ते सगळं सिन्क इन होत होतंच. मी आईच्या मिठीत शिरले. आज माझ्या आयुष्यात मी आईला प्रथमच रडताना पाहिलं. आई थरथरत होती. "पूनम, मी पोरकी झाले गं आज.." ती म्हणाली आणि मी शब्दशः शहारले!! "आई, नको ना असं बोलूस.. अगं आम्ही आहोत ना सगळे.. मी आहे.. "

"पण आई नाही ना गं.. आता मी एकटी पडले.." आई कोसळली.

आणि मीही.
इतकी वर्ष मी प्रचंड गर्वात होते. आईला फक्त मीच समजून घेऊ शकते. आईची मीच बेस्ट फ्रेन्ड. मला आई आणि तिला मी. जे ती माझ्या वडिलांशी बोलू शकत नाही, माझ्या बहिणीशी बोलू शकत नाही, ते ती मला सांगते. फक्त मला.

पण किती चूक होते मी. त्या क्षणी मी त्या आजूबाजूच्या गर्दीत जशी एकटी पडले तशी कधीच पडले नसेन. ती माझी फक्त आई होती. पण तिलाही एक आई होती. जे नातं माझं आणि तिचं होतं, तसंच तिचं आणि तिच्या आईचंही होतंच. भले त्या रोज बोलत नसतील, गप्पा मारत नसतील. मी जे माझ्या आईशी वागते, तशा त्या वागत नसतील, पण शेवटी ते एका आई-मुलीचंच नातं होतं. ते मी माझ्या मापदंडात बसवायचा फुटकळ आणि चूकीचा प्रयत्न करत होते. मी असल्यावर आईला कोणी नसलं तरी चालेल असा वृथा अभिमान गोंजारत होते, तो असा एका क्षणात गळून पडला. माझे हात, माझी कूस माझ्या आईला सामावून घेण्यासाठी असमर्थ होती. परत एकदा मीच तिचा कुशीत शिरले, हमसून हमसून रडत... आजीच्या जाण्याच्या दु:खाने, आईच्या मोडून पडण्याने आणि माझ्या तोकडेपणाचं सत्य जाणवून.

12 comments:

मन कस्तुरी रे.. said...

फार छान! अगदी मनातलं लिखाण!
आई मुलीच्या नात्याचे हळुवार पदर अतिशय सुरेख उलगडले आहेत तुम्ही!

Maithili said...

Apratim...khoopach sunder lihiley...!!!

हेरंब said...

:( :( :(

शेवटच्या परिच्छेदाने तर पाणी आलं डोळ्यात :((

साधक said...

हम्म्म. काय बोलणार. छान लिहिलंय.
माझी आई आणि आजी आठवली. त्यांचं असंच चालतं. माझी आई अजूनही तुमच्या रोल मध्ये आहे. माझ्या शिवाय कोणी नाही तिचं असं म्हणत काळजी घेते.

Naniwadekar said...

लेख खूप प्रभावी आहे. साधी, ओघवती, मनाला पटणारी भाषा आहे.

पु भा भावे त्यांच्या 'त्या' आजीलाच 'आजी' म्हणत. त्यांची आई ते ६-७ वर्षांचे असतानाच गेली, म्हणून ते आजीकडेच शिकायला होते. वडिलांच्या आईबद्‌दल त्यांना फारसं प्रेम नव्हतं; तिला ते 'आजीबाई' म्हणत आणि अहो-ज़ाहो करत. (सावत्र आईला ते 'अहो' नावानीच हाक मारत.) हे वाचल्याची आठवण झाली.

कॅथरीन व्हाइटहॉर्न ही माझी आवडती लेखिका आहे. तिचा एक लेखही आठवला. तिच्या आईची आई वारली तेव्हा तिची आई म्हणाली : "So we are the elder generation now." अल्पाक्षरी, प्रभावी वचनाचा हा एक नमूना आहे.

अभिलाष मेहेन्दळे said...

अप्रतिम!

THEPROPHET said...

अगदी भावपूर्ण! शेवटचा परिच्छेदाबद्दल शब्दच नाहीत माझ्याकडे!

माझी दुनिया said...

अस्तित्वात नसलेल्या आईचे, नसलेले अस्तित्व प्रकर्षाने जाणवून देणारा लेख. अप्रतिम!

poonam said...

आभारी आहे सगळ्यांची.

नानिवडेकर, आवडले हे लिहिलेलं, धन्यवाद

Anonymous said...

Khupach sunder , dusare kahi shabdach nahit


ships09

aativas said...

मनाला भिडणारा अनुभव लिहिलात तुम्ही.

Dr. Sayali Kulkarni said...

khuup suNdar liheela aahes!!!