February 25, 2010

तुझ्या नसानसांत मी..

१.
"हाऽऽऽऽऽय ऑल माय यंग ऍंड लव्हली फ्रेन्ड्ज!! ओळखलात ना आवाज? येस्स! यूअर अमि इज बॅक! मला किती आनंद होतोय इथे परत यायला, तुमच्याशी बोलायला, मी सांगू शकणार नाही फ़्रेन्ड्ज.. पण तुम्हाला कळेल नक्कीच.. गेला एक-दिड महिना मी टोटल झोपून काढला, इतकं फ्रस्ट्रेटींग असतं ते माहित्ये, पण तुमच्या, केवळ तुमच्यामुळे मला परत यावंसं वाटलं.. फ्रेन्ड्ज, आय कान्ट रियली थँक यू फॉर यूअर सपोर्ट, तरी पण मनापासून मनापासून थँक्स.. थँक्स त्या असंख्य ईमेल्स आणि मेसेजेससाठी, त्या प्रार्थनांसाठी, आशीर्वादासाठी आणि शुभेच्छांसाठी!!

चला, आता फार बोलत नाही.. सुरू करूया आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ’सूरोंके साथसाथ’.. आज मी थोडीशी ईमोशनल झालेय, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरूवात एका अतिसुंदर गाण्याने करूया- ’चलते चलते’.. हे गाणं खास तुमच्या सगळ्यांसाठी फ्रेन्ड्ज- 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना'.. फॉर ऑल माय दादादादीज ऍंड नानानानीज.. एन्जॉय!!"

इतकंसं बोलूनही अमृताला थकल्यासारखं झालं.. पाण्याचा एक घोट घेऊन तिने मोठा श्वास घेतला.. थकली, तरी बरं वाटत होतं या परिचित वातावरणात यायला, अत्यंत आवडतं काम करायला.. आजचं बोलणं थोडं कृत्रिम झालं का? पण हरकत नाही.. किती दिवसांनी थेट संवाद साधत होती ती तिच्या आवडत्या आजोबा-आजींशी!

खास तिचा असलेला हा स्लॉट- रात्री ८ ते १०.. खरंतर प्राईम स्लॉटमधला एक तास काढून दिला होता तिला रणधीरने, केवळ तिची अफाट लोकप्रियता, फोनवर श्रोत्यांशी बोलायची हातोटी आणि कौशल्य आणि तिच्या प्रोग्रामचं कायमच असलेलं प्रचंड मोठ टीआरपी! हा तिचा प्रोग्राम अगदी वेगळा होता- एरवी दिवसभर यंग न पेप्पी लोकांसाठी गाणी सगळे चॅनेल लावायचे.. पण अमि ह्या प्रोग्राममध्ये खास फक्त सीनीयर सिटीझन्सशी बोलायची.. सीनीयर सिटीझन्सना त्यांचं ऐकायला हवा असतो एक श्रोता, आणि ते काम अमि अगदी न थकता, मनापासून करायची.. मग ती गार्‍हाणी असोत, तक्रारी असोत, एकूण व्यवस्थेवरचा राग असो, की जुन्या आठवणींना उजाळा असो.. अमि सगळ्यांशी दोन मिनिटं प्रेमाने बोलायची आणि त्यांच्या काळातली गाणी ऐकवायची.. ह्या सीनीयर सिटीझनसचा भरभरून प्रतिसाद मिळत होता प्रोग्रामला.. त्यांच्या जेवणाची, किंवा सीरीयल्सची वेळ असली तरीही. त्याचं बरचंसं श्रेय अमिचं होतं, हे रणधीरला मान्य करावंच लागलं होतं..

म्हणूनच तब्बल दोन महिने अमि जेव्हा नव्हती, तेव्हा कसाबसा दुसरा कार्यक्रम चालू ठेवून, सीनीयर्सच्या अनेक प्रश्नांना थोपवत, अमि परत येईल हे आश्वासन देत तिची वाट बघण्यात दिवस काढले त्याने. ती जॉईन झाल्यानंतरच त्याने निश्वास टाकला आणि खुशीने तिच्याकडे सूत्र सोपवली.

अमिने सर्व ट्रॅक्सवर नजर टाकली..आज फक्त तिच्या आवडीची गाणी होती.. जुनी, पण तरल, हळूवार, खेळकर अशी.. कटाक्षाने तिने विरहगीतं, दु:खी गीतं विचारातही घेतली नव्हती.. तो कप्पा बंदच केला होता, बंद करायला लागला होता.. आजचा कमबॅक मस्त गाण्यांनी करायचा हे ठरवलेलंच होतं.. आधी जाहिरात करून 'अमि येणार' अशी हवा केली होतीच.. प्रोग्राम सुरू झाला आणि कॉल्सची रीघच लागली. श्रोत्यांच्या सगळे प्रश्नं आज तिच्या तब्येतीच्या काळजीचे, तब्येतीच्या चौकशीचे होते.. आज फॉर अ चेंज, त्यांना कोणीतरी सापडलं होतं काळजी करायला.. आपल्या असलेल्या लोकप्रियतेपुढे, अगदी त्रयस्थ लोकांच्या आपुलकीमुळे भारावून गेली ती.. हेच तिच्या जगण्याचं टॉनिक होतं आता..

शेवटचा कॉल पावणेदहाला घेऊन अमृता तिच्या क्यूबमध्ये परत आली.. आता थकवा मात्र खरंच जाणवत होता.. खुर्चीत ती जवळजवळ शिरलीच आणि डोळे मिटून स्वस्थ बसून राहिली.. या क्षणी कॉफी प्यायची जबरदस्त इच्छा होत होती. पण ती तिने महत्प्रयासाने दाबली. एक तर आजारपणामुळे पथ्य बरीच होती.. आणि कॉफी! अंहं, कॉफी सोडली होती तिने.. निग्रहाने तिने मऊ दहीभाताचा डबा उघडला आणि तिला परत भरून आलं! प्रकर्षानं आईची आठवण आली.. ती रोज सांभाळत असलेलं तिचं पथ्य-पाणी आठवलं.. पण एका जिद्दीने, आईची समजूत घालून ती आली होती परत इथे तिच्या कर्मभूमीत.. एकटी.

आणि अचानक हा एकटेपणाच एकदम अंगावर धावून आला तिच्या.. भोवंडून गच्च डोळे मिटून बसली ती.. वरवर कितीही ठरवलं की आता एकटीनेच रहायचंय, एकटीनेच उभं रहायचंय आणि निभावून न्यायचंय, तरी नको नको म्हणत असतानाही खोल कप्प्यातून उफाळून वर आली ती गौरवची आठवण! ओ गौरव!! ’कुठे आहेस तू? कसा आहेस? माझं हे असं झालेलं नक्कीच माहित असणार तुला.. तरी एकदाही मला भेटावंसं वाटलं नाही का रे?’ अमृताच्या गालावरून अश्रू आठवणींबरोबरच कधी ओघळू लागले, तिला समजलंही नाही. ते भांडण, वाद, तिची अस्वस्थ मन:स्थिती, तो ताबा सुटून झालेला अपघात, हॉस्पिटलमध्ये आणि घरी सहन करायाला लागलेल्या वेदना.. सगळं सगळं जणू अंगावर धावून आलं.. आणि ह्या सगळ्या उजळणीनंतर नेहेमीप्रमाणे परत मनभरून उरला तो फक्त गौरव! न थोपवता येणार्‍या हुंदक्यांनी ती थरथरू लागली..त्या क्षणी गौरवची नितांत गरज होती तिला.. त्याचे मजबूत बाहू, त्याची आश्वासक मिठी, त्याचा हळूवारपणे समजावणारा स्पर्श.. खूप, खूप जास्त गुंतली होती ती त्याच्यात.. आणि म्हणूनच कदाचित एकटी होती आज..

******
काय मखमली दिवस होते ते! They were beautiful.. their coming together was magical..

गौरवचं व्यक्तीमत्त्व अतिशय लोभसवाणं होतं.. राजस होतं.. त्याच्या अंगात भरपूर धमक होती, प्रचंड कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास होता आणि झोकून द्यायची तयारीही. पण तो तितकाच सणकी, वेळप्रसंगी तुसडा आणि माणूसघाणाही होता- पण त्याच्या अगदीच खराब मूडमध्ये असला तर.. एरवी समोरच्याला आपल्या बोलण्याने, चतुराईने बांधून टाकायचा तो. स्वतःची एक अत्यंत हटके, उत्तम आणि चमकदार कल्पना सामोरी आणणारी अ‍ॅड-एजन्सी असावी असं त्याचं स्वप्न होतं. आपण जे करू ते उत्तमच असेल असा एक रास्त अभिमान होता.. आपण कसे आहोत याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच नोकरीत फक्त प्राथमिक अनुभव मिळवण्याइतका राहिला तो आणि नंतर नोकरी सोडून स्वत:ची जाहिरात संस्था काढली होती. त्यात त्याच्यासारखेच वेडे लोक घेतले होते त्याने- क्रियेटीव्ह कल्पनांनी ओसंडून वाहणारे. त्यांच्यावर कोणतंच बंधन नव्हतं कामाचं, बंधन असलंच तर फक्त उत्तम कामगिरीचं होतं.

अमृताचेही ते उमेदवारीचे दिवस होते.. ती ज्या रेडीयो स्टेशनला जॉईन झाली होती ते शहरातलं पहिलं प्रायव्हेट एफएम स्टेशन होतं.. त्यामुळे रोज शिकायला मिळत होतं काहीतरी. रेडीयोवर प्रोग्राम चालू असताना शहरातल्या मॉल्समध्ये जा, तिथल्या लोकांशी बोल, स्टुडीयोमध्ये ट्रॅक्ससाठी मदत कर, आलेले फोनकॉल्स घे अशी उमेदवारी चालू होती. ऍड डिपार्टमेन्टमध्ये तिला रस होता.. काही इन-हाऊस ऍड्जसाठी स्क्रिप्ट लिही, काही थेट, लोकल कस्टमर्सच्या ऍड्जसाठी आवाज दे असं चालू असताना तिची आणि गौरवची भेट झाली होती..

झालं काय होतं की गौरवच्या क्लायंटची एक ऍड होती.. तेव्हा रागिणीच्या हाताखाली अमृता काम करत होती.. त्या ऍडमध्ये एक अत्यंत द्वयर्थी शब्द होता.. ती ऐकल्याबरोब्बर रागिणी म्हणालीही- ’काय शब्द वापरतात, शी!शी!.. गौरवनेच लिहिलं असणार हे स्क्रिप्ट! नॉटी बॉय’! ऍड परतपरत ऐकताना अमृताला तो शब्द सारखा खटकायला लागला.. तिने रागिणीला विचारलेही, "रागिणी, फारच ऑड वाटतंय हे ऐकायला.. बदलायला सांगूया का?"

"बदलायला? कोणाला? गौरवला? त्याचा शब्द? वेडी आहेस की काय? गौरवला इतकासाही बदल खपत नाही, आणि उद्या ही ऍड एअर होत्ये.. आता कसले बदल करतेस बाई? फर्गेट इट.. जाऊदे तसंच, थोड्या दिवसांनी कोणी ऑब्जेक्शन रेझ केलं, तर बदलू.."

रागिणीने खांदे उडवले, पण अमृताला स्वस्थ बसवेना.. एक तर ती नवीन होती, आणि रक्त सळसळत होतं! त्या भरात तिने केला एक शहाणपणा! तिने चक्क गौरवच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि त्याच्याशी बोलायची पृच्छा केली.. रेडीयोस्टेशनवरून फोन असल्याने, ताबडतोब कनेक्ट झाली ती.. गौरवचा रूबाबदार ’हॅलो’ कानावर पडताच, तिने त्याची ऍड म्हणायला सुरूवात केली.. त्या ऍडमध्ये ग्रामीण ढंगाचं बोलणारी एक बाई होती.. अमृता हुबेहूब आवाज काढत होती.. आणि अगदी शेवटाला जिथे ’तो’ शब्द होता, तो तिने बदलला, आणि एक नेहेमीचा शब्द टाकला..

आणि गप्प बसली.

इकडे गौरव अवाक! कोण होतं हे? हा काय शहाणपणा होता? रागावूनच त्याने विचारले, "काय आहे हे? व्हूज थिस?"

एकदा बोलून झाल्यानंतर अमृताला कापरं भरलं! हे काय करून बसलो आपण? कोणी सांगितला होता जादापणा करायला? तिने भीऊन धाडकन फोन ठेवूनच दिला.

ताडताड पावलं टाकत, गौरव पुढच्या अर्ध्या तासात जेव्हा रागिणीच्या ऑफिसमध्ये येऊन थडकला, तेव्हा क्षणभर अमृताचा थरकाप झाला! एक तर रागिणीलाही तिने काही सांगितलं नव्हतं.. अविचाराने फोन उचलून मोकळी झाली होती! गौरव अर्थातच थेट रागिणीच्या केबिनमध्ये शिरला होता.. इतक्यात तिचा इन्टरकॉम वाजला आणि रागिणीने तिला बोलावलं.. ’गेली आपली नोकरी’! तिने मनाची तयारी केली, आणि ती आत गेली.

"अमृता, तुझी ओळख करून देते.. हे मिस्टर गौरव अध्यापक. ’मॅड आय’ ह्यांची. ह्यांच्याकडूनच ती शेव्हिंग प्रॉडक्टची ऍड आली होती.. आत्ता अर्ध्या तासापूर्वी कोणीतरी ती ऍड बदलून त्यांना अप्रूव्हलसाअठी फोन केला होता.. आपलं बोलणं झालं होतं यावर.. तू केला होतास तो फोन?"

अमृताने अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. रागिणी रागावली होती का? गौरवकडे पहायची तिची हिंमतच नाही झाली. रागिणी कूल होती, पण चूक तिची होतीच. तिने मान्य करून टाकावे आणि विषयाला पूर्णविराम द्यावा असे ठरवले. ती बोलायला लागली तेव्हा तिच्या आवाजातली थरथर लपत नव्हती..
"I am extremely sorry Ragini. मीच केला होता फोन. मला अगदी राहवेना. किमान तुला आधी विचारायला तरी हवं होतं, खरंतर मी असं करायलाच नको होतं. I understand. I am really sorry Mr. Adhyapak." मान खाली घालून गप्प उभी राहिली ती. मध्ये दोन क्षण गेले..

"हे सगळं त्या ग्रामीण आवाजात आणि त्या ढंगाचे हेल काढून म्हणा.." गौरवचा आवाज आला.
अं? तिने गौरवकडे चमकून पाहिलं. तो चक्क हसत होता, त्यामुळे रागिणीही.

"Ragini, this is great! मला ह्या मुलीचे गट्स आवडले. And you are right.. बदलूया आपण तो शब्द. mind you, हे असं पहिल्यांदाच होतंय.. जनरली मी असं ऐकत नाही कोणाचं, but I liked your daring. रॅग्ज, मी नवीन डबिंग करून देतो तुला. पण मला हा- हिचा आवाज पाहिजे. अमृता, तुम्ही कराल ही ऍड डब?" गौरवचे पिंगट डोळे तिच्यावर स्थिरावले, आणि ती आंतरबाह्य थरथरली.

एकतर हे सगळं तिच्या कॉलच्या शहाणपणापेक्षाही अनपेक्षित होतं. ’आ बाबा रागावला नाही? उलट ऍडची ऑफर? अं? आणि ही नजर? वॉव! काय डोळे आहेत, अथांग!’ ती बघतच राहिली त्याच्याकडे.

"सांगा ना.. any problem? रॅग्ज, तुला चालेल ना? Of course, you will be paid.. as a proper commercial artist..."

तरी अमृता गप्पच. रागिणीने ओळखले बरोब्बर. "ya ya, she'll do it. मी करते तुला फोन थोड्यावेळने.. she'll be there at your studio."

"ओके." गौरवने दोघींकडे हसून पाहिलं आणि तो उठला..

ते डोळे, तो कॉन्फिडन्स, ती चूक सुधारण्याची तयारी, नव्या अननुभवी लोकांचंही म्हणणं ऐकून घ्यायची तयारी... एकाहून एक सगळे गुणच होते गौरवकडे.. सहवासात आल्यानंतर हळूहळू अजून काही पैलू उलगडत गेले.. सहवासही वाढत गेला.. आणि तिला कळायच्याही आत ती गौरवमध्ये गुंतत गेली. आणि तोही.

आधी ऍडनिमित्त, मग ’ही ऍड बरी वाटतेय का गं?’ असे सल्ले विचारणं, तिच्याकडून नव्या आयडीया घेणं, ’तुझा आवाज फार छान आहे अमू.. Voice modulation course करून रेडीयोवर एअर हो ना..’हा आग्रह, अधूनमधून लंचेस, जमतील तेव्हा, जमतील तशा गाठीभेटी, फोन्स, मेसेजेस.. वाफाळणारी गरम कॉफी हाही त्यांच्यातला दुवा होता.. अगदीच काही नाही, तर कॉफीसाठी अर्धा तास तरी ते काढायचेच.. भराभर जवळ आले ते एकमेकांच्या.. अमृतावर तर गौरवची धुंदीच पसरली होती जणू.. त्याचे सल्ले किती अचूक आहेत, त्याचं माणसांचं रिडींग किती पर्फेक्ट आहे, हे तिला स्वत:वरूनच समजलं होतं. आता तर गौरवच्या सल्ल्याशिवाय एकही निर्णय घेऊच शकत नव्हती ती- कामासंबंधी तर ते बोलायचेच, पण त्याहीपलिकडे त्यांची मैत्री सरकली.. शॉपिंग, छोट्या ट्रीप्स, सिनेमे, नाटकं.. एकमेकांच्या आवडी जपत चालू झालं होतं..

पुढेमागे तिला रेडीयोवर एअर होण्याची संधी मिळणार होतीच, पण आवाजाची फेक, पट्टी, समतोल कसा साधायचा यासाठी तो कोर्स तिला अतिशय उपयुक्त ठरला होता.. बिचकत बिचकत तिने सुरूवात केली.. आधी अजून एका आरजेबरोबर आणि मग स्वतंत्र. तोपर्यंत अजून चार एफेम चॅनेल सुरू झाले होते, त्यामुळे स्पर्धाही वाढली होती. जुने, चांगले आरजे टिकून रहावेत यासाठी रणधीर कायम प्रयत्न करायचा.. त्याशिवाय, नवनवीन कल्पना, प्रोग्रामसनाही संधी द्यायचा.. तिच्या ’सूरोंके साथ’ला तो परवानगी देईल का ह्याची मात्र तिला शंकाच होती. पण अर्थातच गौरवने तिला ओके दिला होता आणि रणधीरने टेस्ट बेसिसवर ३ महिन्याची परवानगी दिली होती तिला..

ह्या काळात अर्थातच गौरव प्रचंड व्यस्त होता.. कधीकधी रोज त्याची आणि अमृताची गाठभेट व्हायची आणि कधीकधी आठाठ दिवस ठावठिकाणाही माहित नसायचा तिला.. त्याच्याकडे फक्त रेडीयोच्याच जाहिराती नव्हत्या, खरंतर रेडीयोच्या अगदी मोजक्याच होत्या. जास्त करून प्रिन्ट मीडीयामधल्या होत्या, आणि टीव्हीमधल्या काही. पण टीव्हीसाठी तो जोरदार प्रयत्न करत होता. एखादाच मोठा नाव असलेला क्लायंट मिळावा यासाठी झटत होता तो. सहाजिकच शहराबाहेर जाणे, टूअर्स, सतत लोकांना भेटणे, पार्ट्या अरेंज करणे, अटेंड करणे, क्लायंट ऑफिसच्या चकरा मारणे हे चालू होते, शिवाय रोजचे काम होतेच.. त्यामुळे त्याला सतत चाकं लागलेली असायची..

अमृताला तो प्रथम भेटला तेव्हाच तिच्यातलं आकर्षक आणि साधं व्यक्तीमत्त्व त्याने जोखलं. नंतर भेटी होत राहिल्या, तेव्हा मात्र त्याला प्रकर्षाने जाणवलं की ती खरंच इतर ढोंगी, मतलबी मुलींपेक्षा खूपच वेगळी आहे. तिला तिच्या कामात मनापासून रस होता, त्यासाठी पडेल ते काम करायची, शिकायची इच्छा होती आणि तरीही ती स्वत:मधला एक निरागसपणा टिकवून होती. अमृताच्या निमित्तानं तो दूर राहिलेला निरागसपणा, फ्रेशेनेस परत त्याच्या आयुष्यात आला आणि ह्याच कारणामुळे तोही झपाटल्यासारख्या तिच्या जवळ आला..

तिच्याबरोबर असताना तो ’तो’च राहू शकायचा. त्याला मोजूनमापून बोलायची, समोरच्याचा अंदाज घ्यायची, तोलूनमापून वागायची गरज नव्हती. त्यामुळे त्याचा दिलखुलास, गमत्या स्वभाव तिच्यासमोर मोकळा व्हायचा.. अमृता तर ते एन्जॉय करायचीच, पण खुद्द गौरवलाही ती सगळी जोखडं तिच्यासोबत असताना उतरवायला मनापासून आवडायचं.

ती समोर आली की एक लहर त्याच्यामधून फिरायची.. झटकन पुढे होऊन तिला जवळ घेऊन कुठेतरी लांब जावंसं वाटायचं.. जिथे फक्त ते दोघे असतील अशा निर्व्याज जगात.. त्याला नक्की समजत नव्हतं हे नुसतंच नेहेमीचं आकर्षण आहे, की खरंच तो त्याच्यापुढे गेलाय.. तिच्याशिवाय त्याला चैन पडत नव्हतं हे खरं. अमृताच्या मात्र डोळ्यातून, बोलण्यातून, हालचालीतून कळायचं, ती किती ओढली गेली होती गौरवकडे.

’सूरोंके साथ’चे तीन महिने यश्वस्वी झाले आणि रणधीरने कार्यक्रमाचा स्लॉट ’अमि’च्या नावे केला.. त्यादिवशी अमृता खरंच हवेत होती.. इतकी खुश याआधी कधीच नव्हती झाली ती, कारण ह्या निमित्ताने तिच्या आत्मविश्वासावर केवढं तरी मोठं शिक्कामोर्तब झालं होतं. जे करीयर आपण करू शकू का, मोठ्या शहरात आपला टीकाव लागेल का ही शाश्वती नव्हती, तिथे एक आख्खा कार्यक्रम एकटीच्या बळावर यशस्वी करून दाखवण was a big leap for her. एकटीने? अंहं. गौरवशिवाय ते शक्यच नव्हतं. रणधीरने ओके दिल्यावर ऑफिसमध्येच कलीग्जबरोबर एक छोटं सेलेब्रेशन झालं, केक कापला, अमृताचं ’पोती’ असं नामकरणही झालं.. थोडी पांगापांग झाल्यानंतर तिने गौरवला फोन केला, आजच्या सेलेब्रेशनचं सांगितलं आणि विचारलं, "गौरव, आज तुझ्याशिवाय हे शक्य नसतं झालं. You mean a lot to me. आज ही मोमेन्ट मला तुझ्याबरोबरही शेअर करायची आहे. आज डिनरला भेटणार? तू म्हणशील तिथे जाऊया.."
"जाऊया की, गूड आयडीया.. अं? कुठे जायचं? चल, तुला आधी पिकप करतो, मग ठरवू, ओके?"

संध्याकाळी सातच्या सुमारास गौरव रेडियोस्टेशनला आला. अमृता लगबगीने गाडीत शिरली..
"Hearty Congrats अमि" असं म्हणत गौरवने एक छोटासा फ़ुलांचा गुच्छ तिच्या हातात दिला आणि खांद्यावर नेहेमीप्रमाणे थोपटलं. आज मात्र अमृता त्या स्पर्शाने शहारली..
"Thanks.."
"आज छान दिसत्येस.. is that a promotion glow or just me?" त्याने नेहेमीप्रमाणे मजेने विचारलं..
"अंऽऽऽ" मनापासून हसत अमृताने उत्तर टाळलं.. "खूप खूप खुश आहे मी आज. सातार्‍यासारख्या छोट्या शहरामधून पुण्यात झक्क बस्तान बसवू शकले.. मस्त वाटतंय.. आणि ही तर फक्त सुरूवात आहे. जम तरी बसलाय. आता या पुढचा विचार करू शकेन. पण आज मोकळा श्वास घ्यावासा वाटतोय.. इतक्या दिवसांची इनसेक्युरिटी होती, ती कमी झाली.. आता जास्त फ़ोकस करू शकेन. Thanks Gaurav. जितका सपोर्ट रणधीर, रागिणी, माझे आई-बाबा, स्टेशनवरचे सगळे यांनी दिला, त्यापेक्षाही जास्त तू दिलायेस मला.. तुला कल्पना नसेल, पण दिलायेस. तू इतका established आहेस, मोठा आहेस.. पण मला अजूनही आठवतंय, मी किती वेळा डाऊन झाले की तुला फोन केला असेल, रडले आहे अनेकदा, आणि सल्ले तर कसकसले विचारलेत मी.. you were always there, I can't thank you enough really!"

इतकी स्तुती ऐकून गौरव थोडा embarass झाला. ""बापरे! अगं इतकं काय? you deserve it! मी फक्त इन्पुट्स देत गेलो, बस. आता इथेच थांबू नकोस पण.. सतत काहीतरी नवीन विचार कर. हा प्रोग्राम, त्यात अजून काय करता येईल, अजून कोणते प्रोग्राम करता येतील, स्क्रिप्ट रायटींग, प्रोड्युसिंग, डबिंग.. मग झालंच तर आमचं जाहिरात क्षेत्र.. काय?" मनापासून बोलत होता तो..
"येस सर."
गौरव जरा चपापला.."ओह! मी सुरूच झालो का? सॉरी.. एक आयडीया आली की मला पुढे इतकं काय काय सुचायला लागतं, की मी बोलतच बसतो. सॉरी! कान पकडतो. आजचा दिवस तुझा. तू बोल..कॉफी प्यायला जाऊया आधी, की लाँग ड्राईव्ह आणि मग डिनर?" असं म्हणत त्याने तिच्याकडे पाहिलं..

तेव्हा मात्र अमृता स्वतःला थांबवू शकली नाही. त्याच्या त्या पिंगट डोळ्यात डोकावत तिने पटकन त्याच्या ओठावर ओठ टेकवले..

आणि पुन्हा एकदा, तो क्षण गेल्यावर तिला भान आलं.. चटकन तिने त्याच्याकडे पाहिलं.. गौरवचे डोळे वेगळंच काही बोलत होते.. एका क्षणात त्यांनी तिच्या अंतरंगाचा वेध घेतला.. "you sure?"
तिने कळतनकळत मान हलवली.. आणि त्याचा उष्ण श्वास तिच्यात मिसळला..

ते सगळं आठवून अमृताला आताही पुसटसं हसू आलं! छोट्या गावातून आलेली ती साधी मुलगी.. एक टीपीकल शहरी मुलाची अशी काही मोहिनी पडली की सर्वार्थाने त्याची होताना मनात किंतूही शिवला नाही.. It was so natural, as natural as pieces of jigsaw puzzle falling into their places perfectly..

त्यानंतरचा प्रत्येक दिवस-रात्र ते एकत्र होते.. कसंबसं काम उरकून ते एकमेकांकडे धाव घ्यायचे. स्टेशनला अमृता दुपारी जायची. एरवी जमेल तशी दुपारपासून त्याच्या ऑफिसलाच असायची. तिथे ती गेली की आपोआप त्याच्या ऑफिसमधल्या मुली उगाच गौरवभोवती रेंगाळणार नाहीत असं तिला उगाचच वाटत असे. पण सगळे लोक कूल, ईझीगोईंग होते. कोणालाच तिच्यामध्ये वा गौरवमध्ये तसा इन्टरेस्ट नव्हता.. तरी अमृता गौरवबद्दल कमालीची पझेसिव्ह झाली होती. हळूहळू त्याच्या ऑफिसमधल्या इतर लोकांशीही छान ओळख, मैत्री झाली होती तिची.. तिथे ती तिला जमेल ते, सुचेल ते करायची किंवा जस्ट गौरवला बघत बसायची.. तिची शिफ्ट संपली की गौरव तिला घ्यायला येई. पेईंग गेस्ट म्हणून अमृता जिथे रहात होती, तिथे फक्त क्लेम म्हणून दर महिन्याला पैसे देण्यापुरती आणि गौरव गावात नसेल तेव्हा रहायची ती. एरवी गौरवचं तीन खोल्यांचं छोटं घर तिचंही झालं होतं..

1 comments:

माझी दुनिया said...

पुढचा भाग टाक बाई लवकर...उत्सुकता ताणू नकोस. :-)