February 25, 2010

तुझ्या नसानसांत मी (भाग ३)

३.

त्यानंतरचं तिला धड आठवतच नव्हतं.. जाग आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती.. डोक्याला, पायाला, कंबरेला- सगळीकडे बॅन्डेजेस होती.. अंग कमालीचं दुखत होतं, तरी मनातलं दु:ख भळभळत होतंच.. समोर बाबांचा चेहरा दिसला मात्र, आक्रोश करून ती परत रडायला लागली..

देवाच्याच दयेनं तिला खूप इजा झाली असली तरी गंभीर काही नव्हतं. रस्त्यावरच्या लोकांनी तिला अ‍ॅडमिट करून घेतलं.. तिच्याकडे तिचं ओळखपत्र होतं त्यावरून रेडीयो स्टेशनवर फोन केला.. सगळे तत्परतेनं पळत आले.. तिच्या घरीही कळवलं..

हॉस्पिटलमध्ये भेटायला सतत लोक येत होते.. पोलिसही सारखे येत होते.. अपघात झाल्याने पोलिसकेस झाली होती.. फोन तर सतत चालूच होता.. पण अमृताला कोणातच रस नव्हता.. तिला सतत गौरवची अनुपस्थिती जाणवत होती.. मोठ्या कष्टाने दोन-चार शब्द बोलायची ती दिवसाकाठी. तिच्या आई-बाबांना तिची अवस्था बघवेना. त्यांनाही इथे रहायला धड जागाही नव्हती.. शेवटी पोलिस पंचनामा झाल्यानंतर बाबांनी तिला सातार्‍याला नेण्याचा निर्णय घेतला..

ते दिवस एकंदरीतच अमृताचे अतिशय वाईट गेले.. शरीराच्या जखमा होताच, शिवाय मनही घायाळ! जागी असताना टक लावून कुठेतरी बघत जुने दिवस आठवत बसे आणि रडे. नाहीतर औषधाच्या ग्लानीत पडून राही. जखमा हळूहळू भरू लागल्या, पण मन कोमेजलेलंच राहिलं.. एक दिवस मात्र तिने आई-बाबांना बोलताना ऐकलं- 'बरी झाली की तिचं लग्न करून देऊया, तोवर राहिल इथेच. बास झाली नोकरी!'

हे ऐकलंन मात्र आणि अमृताला वास्तवाचं भान आलं. गौरवच्या आठवणी तिला आयुष्यभर पुरला असत्या.. अजून कोणाशीतरी लग्न, संसार.. छे! अशक्य! ज्या लग्नाच्या हट्टामुळे हे सगळं झालं, ते दार आता कायमचं बंद केलं तिने. मग काय इथेच रहायचं? सातार्‍यात? आणि काय करायचं? तिकडचं करीयर, चिरपरिचित वातावरण, आजी-आजोबांबरोबर निर्माण झालेले अनुबंध?- सगळे तोडायचे? नाही नाही!! आणि रणधीर ऑफर देतोय तोवरच परत जायला हवं, नाहीतर कॉम्पीटीशन टफ आहे.. सहज रीप्लेसमेन्ट मिळेल त्याला..

गौरव नाही तर नाही, पण बाकी आयुष्याची वाट लावायची नाही असं तिने ठाम ठरवलं आणि आधी आई-बाबांना तिने गौरव आणि तिच्याबद्दल सगळं सांगून टाकलं.. आणि परत इकडे यायचा निर्णयही. अवाक झाले ते काही वेळ! आपली छोटी, मुलगी, राजरोसपणे शहरात हे काय करत होती? आणि आता परत तिथेच जाणार आहे? परत ठेचा खायला? लग्न करणार नाही म्हणते, करीयर करणार म्हणते? आहे तरी काय हे? पण अमृताने त्यांना समजावलं.

"आई-बाबा, प्लीज मला वेळ द्या थोडा.. गौरवचं बाजूला ठेवा.. पण काम हाच माझा प्राण आहे आता! इथे मी नाही राहू शकत अशी नुसतीच. आता कुठे मला ते विश्व कळायला लागलंय, समजायला लागलंय.. लोक माहिती झालेत.. एक मोठी ठेच खाल्लीये मी, पण आता नाही त्या वाटेला जाणार मी, शप्पथ सांगते. पण प्लीज मला नोकरी करायला परवानगी द्या.. रणधीरचे फोन ऐकलेत तुम्ही.. ईमेल्स दाखवल्यात मी तुम्हाला जमेल तशा.. (गौरव नसला, तरी) लोक वाट पहात आहेत माझी.. प्लीज आई.."

*****

आणि अतिशय निग्रहाने शरीराने बरी होऊन, पण मनाने पांगळीच होऊन ती परत आली होती आज.
"अम्रिता, यू ओके ना?" अचानक प्रियाच्या आवाजाने खडबडून ताळ्यावर आली ती..
"अं? हो, या.. अ‍ॅम फाईन, थँक्स.. जस्ट रीलॅक्स होत होते.. कितने बजे? ओह! बारा वाजत आले.."
स्टेशनमध्ये सगळ्यांचीच गडबड चालली होती.. रात्रीच्या प्रोग्राम्सचे आरजे, त्यांचे को-ऑर्ड्ज, उद्याच्या ट्रॅक्सची तयारी करणारे लोक, चुकार प्रोड्यूसर्स सगळे कामं आटोपून घरी निघाले होते..
"तू घर कैसे जायेगी? कहाँ रेहती हो अब तुम?' प्रियाने सहजच विचारलं, तरी अमृता ठेचकाळली.. तिच्याही नकळत ती गौरवची गाडी शोधत होती- तिला घरी घेऊन जायला.. हळूच ती म्हणाली,
"मी एका रीलेटीव्हकडे रहातेय थोडे दिवस.. मग परत पेईंग गेस्ट म्हणून राहिन.. अभी जाना है मुकुंदनगर.."
मग अचानकच सगळे जमलेले तिच्या मदतीला पुढे आले.. तिची नाजूक अवस्था सगळ्यांनाच ठाऊक होती ना.. 'तिने एकटीने जाता कामा नये, तिला कोणीतरी सोडले पाहिजे' यावर एकमत झाले आणि शेखरच्या बाईकवर ती बसली. शेखर तिचा चांगला मित्र होता.. त्यामुळे ती तशी ओके होती.. पण अचानक तिला स्वतःचीच लाज वाटली! "किती परावलंबी झालोय आपण! सुमाआत्याकडे तिच्या मनाविरूद्ध रहातोय- कारण अजून पूर्ण शक्ती नाही म्हणून आई-बाबांना मी एकटीनं रहाणं पसंत नाही.. गाडीही चालवायची नाही म्हणे- पण रात्री रिक्षा तरी कुठे मिळते धड? आता काय रोज लिफ्ट मागत बसायचं लोकांकडे? शी! हे असले प्रश्न गौरव असताना कधी पडलेच नाहीत.. दिवस-रात्र-अपरात्र कशाचाच हिशोब नव्हता तेव्हा.. ते काही नाही. उद्या १०ला बाहेर पडायचं म्हणजे पडायचं. तेव्हा मिळतात रिक्षे. आज आत्याकडचे कटाक्ष झेलायला लागतील ते वेगळंच.. पण तिचीही चूक नाही ना.. साडेबाराला कोणी दार वाजवणार असेल तर कोणीही वैतागेल.. छे! पटपट बरं होऊन इन्डीपेन्डन्ट व्हायला हवं.."

कसेबसे अमृता दिवस ढकलत होती. घरी असताना पुण्याला गेल्यानंतर गौरवचं नाव काढायचं नाही असं तिने ठरवलं होतं. 'गौरव आणि आपले मार्ग आता वेगळे आहेत. गौरवला विसरायचं आहे. त्याच्याशिवाय भक्कम जगायचं आहे. तो बरोबर नसला तरी मोडून पडायचं नाहीये' हे तर ती सतत घोकतच होती. तरी पण तिचं अचपळ मन त्याच्यापाशी पळत होतंच. त्या मोठ्या भांडणानंतर त्याचा मागमूस नव्हता. ना हॉस्पिटलमध्ये तो कधी आला, ना त्याचा फोन, ना ईमेल, ना एसेमेस! 'आपण त्याला इतकं दुखावलं की आता आपलं तोंडदेखील पहायची त्याला उत्सुकता नाहीये' हा विचार अमृताला प्रचंड दुखवायचा. 'त्याला आपण नको असू, तर कशाला त्याच्याकडे जायचं? कशाला त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची? त्याने आयुष्यभर पुरेल इतकं सुख, आठवणी दिल्या आहेत, त्या बळावरच जगू' असं एक मन म्हणतंय तोवरच त्याच्या ठावठिकाण्याची उत्सुकता वाटायची. 'कुठे असेल तो? काय करत असेल? माझी आठवण खरंच येत नसेल त्याला?' दुसरं मन विचारायचं.. त्याच्या कंपनीथ्रू अ‍ॅड्ज तिच्या कार्यक्रमाला तरी नव्हत्या. पण इतर कुठे आहेत का हे चाचपून पहायचं तिचं धाडस झालं नाही.

दुपारी दोन ते रात्री दहा कामाची वेळ होती तिची, तरी ती अकराच्या सुमारासच जायची स्टुडीयोत. रविवारीही एका स्पेशल प्रोग्रामसाठी आता ती स्टेशनवर जायला लागली. कामात संपूर्णपणे झोकून दिलंन तिने स्वतःला. इतके श्रम तिला झेपत नव्हते.. औषधं होती, त्यापेक्षाही शारीरिक आणि मानसिक श्रम इतके व्हायचे तिला, की थकून झोप यायची. सिंगलरूममध्ये पेईंगगेस्ट म्हणून रहात होती. कशीबशी रात्री तिथे पोचायची. रात्री अशी झोप लागायची की सकाळी नऊ वाजल्याशिवाय जाग यायची नाही. कामाव्यतिरिक्त ना कोणाशी बोलायची, ना बाहेर जायची. ऑफिसमध्ये व्हेंडींग मशीनचा कॉफीचा वास यायचा गौरवची आठवण काढत, त्यामुळे पॅन्ट्री, कॅन्टीनमध्ये तिनं जाणं सोडलं. काम करताना टीमशी तेवढ्यापुरती देवाणघेवाण व्हायची. कॉल्समध्ये आजी-आजोबांशी जे काही बोलणं व्हायचं तेच मात्र मनापासून. त्यांचे प्रोग्राम करता करता तीही त्यांच्यासारखीच व्हायला लागली हळूहळू. निस्तेज, खंगलेली, आताची अमृता आणि अगदी काही महिन्यापूर्वीची अमृता यांत जमीन-आस्मानाचा चटका लावणारा फरक होता.

त्या दिवशी सकाळपासूनच अमृता अतिशत अस्वस्थ होती. आज गौरवचा वाढदिवस. नको नको म्हणता सगळं सगळं मन ढवळून टाकत होतं. तिला स्वस्थ बसवेना. किमान त्याच्या घरावरून तरी चक्कर मारावी अशी तीव्र इच्छा तिला झाली. झटपट आवरून तिने रिक्षा पकडली.

गौरवचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर होता. रस्त्यावरून खिडक्या आणि गॅलरी दिसायची. त्याचं घर जवळ आलं तशी तिच्या काळजातली धडधड वाढली. कसाबसा धीर गोळा करून तिने वर पाहिलं.. पण... पण खिडक्या ओढून घेतलेल्या, गॅलरीचं दारही बंद! तिला फार आश्चर्य वाटलं! 'इतक्या सकाळी कुठे गेला? ऑफिसला गेला असेल? जाऊया तिकडे? असंच, एक झलक दिसली तरी पुरे आजच्यादिवशी..' असा विचार करून तिने रिक्षा तिकडे वळवायला सांगितली. तसं लवकरच होतं. साडेनऊ जस्ट होत होते. हे सगळे लोक उशीरापर्यंत काम करायचे रात्री त्यामुळे इतक्या लवकर ऑफिस उघडलं तरी असेल का शंकाच होती. तिने त्याच्या ऑफिसच्या अलिकडे रिक्षा सोडली अन् चालतच जायला लागली..

किती दिवसांनी येत होती इथे.. ती पार्किंगमध्ये शिरली.. आपसूकच नजर त्या नेहेमीच्या पार्किंगलॉटमध्ये गेली.. गौरवची गाडी नव्हती.. पण एक नवीन कोरी गाडी उभी होती. 'अरे वा! वाढदिवसाला नवीन गाडी घेतली वाटतं! पण आता काय करायचं? वर जायचं? त्याच्यासमोर उभं रहाता येईल? त्याचा हात धरून त्याला विश करता येईल? त्याच्या डोळ्यात बघण्याचं धाडस होईल? त्याला 'कसा आहेस' विचारता येईल?' क्षणात आलेलं अवसान गळालं आणि अमृता घामेजली.. 'इतके धक्के खाऊनही विचार न करता कृती करायची सवय कधी जाणार आपली?'

ती परत फिरणार इतक्यात समोर विनय दत्त म्हणून उभा राहिला! थेट समोर. की त्याला चुकवताही येईना. त्यालाही अमृताला तिकडे बघून मोठाच धक्का बसला.. त्याहीपेक्षा मोठा धक्का त्याला तिची अवस्था पाहून बसला.
"अरे! अमृता!! इथे?" त्याने गोंधळून विचारलं..
"अं? हो. अशीच.." तिला काय सांगावं कळेनाच.
"वर चल ना."
"नाही, नको... मी अशीच आले होते.. जाते.."
विनयला एका क्षणात परिस्थितीचा अंदाज आला. विनय आणि गौरव पार्टनर्स आणि उत्तम मित्र होते. अमृता त्याला परकी नव्हती. ती अर्थातच इथे का आलीये त्याला समजलं. त्यांच्या ब्रेकअपचा अमृतावर फार वाईट परिणाम झालेला दिसतच होता.
"प्लीज. वर ये. बोलूया."

ऑफिसला कुलूपच होतं. विनयने कुलूप काढलं, दोघेही आत शिरले. तो खिडक्या उघड, लाईट लाव असं काही करत होता तोवर अमृताची नजर ऑफिसावरून फिरत होती. विनय सरळ गौरवच्या केबिनकडेच जायला लागला, तसे तिच्या मनात बारिक प्रश्न फेर धरू लागले? गौरव ऑफिसात येत नव्हता की काय? त्याचं आणि विनयचंही काही वाजलं होतं? विनय तसा चांगला होता.. गौरवसारखाच टॅलेन्टेड होता..

विनय आत गौरवच्याच खुर्चीवर जाऊन बसला, मग मात्र अमृताची खात्री पटली.. काहीतरी गडबड आहे. केबिनचा लूकही थोडा बदलला होता. ती गौरवची नक्कीच वाटत नव्हती.. त्याचा फील नव्हता त्या खोलीला.. तिने मोठा श्वास घेतला..
"बस ना.. पाणी?"
त्याने पाण्याचा ग्लास तिच्यापुढे केला.
"तब्येत फार खराब झालीये तुझी.."
ह्याला किती माहित आहे, किती सांगावं, अमृताचा गोंधळ उडाला. शेवटी सरळ काय ते सांगावं हेच तिने ठरवलं.
"मला अ‍ॅक्सिडेन्ट झाला होता काही महिन्यांपूर्वी.."
"हो.. I know.. बरंच लागलं होतं ना.. but it was good to hear you over the radio once again.. great comeback.."
'ह्याला माहित आहे? सगळं माहित आहे- अ‍ॅक्सिडेन्टचं, मी परत आल्याचं? म्हणजे गौरवला १००% ठाऊक असणार! तरी. तरी त्याने चौकशीचीही फिकिर केली नाही ना! त्रयस्थ, अनोळखी माणसासारखा वागला मी मरणाच्या दारात असताना? आणि मी? मी इथे तडफडत्ये त्याच्यासाठी!! त्याने एकदा बोलावं, मला माफ करावं म्हणून झुरत्ये!!' अमृताला सहन होईना..
"गौरव कुठंय विनय?"
विनयच्या चेहर्‍यावर 'आता हिला काय सांगू?' भाव आले. तो एकदम गप्प झाला. त्याच्या मनातली चलबिचल त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती.. अमृताला त्याचं गप्प बसण्यानं अचानक भीती वाटली.. काही बरंवाईट झालं होतं का? गौरव सुखरूप होता ना?
"गौरव कुठंव विनय? कसा आहे? प्लीज काहीतरी बोल.. प्लीज!"

"ह्म्म ओके. I guess आता मी बोललंच पाहिजे. ऐक. पॅनिक होऊ नकोस. Gaurav is fine. Relax. त्याला मी एक प्रॉमिस दिलं होतं ते आता मला मोडावं लागणार आहे, कारण अमृता you shocked me! म्हणजे वीकनेस असतो, मी समजू शकतो. पण तुझी अवस्था हॉरिबल झालीये. तू स्वतःची हेळसांड करत्येस, लक्ष देत नाहीयेस हे उघड आहे. But you can't do this to yourself. You can't do this for Gaurav's sake damn it!" तो बोलता बोलता एकदम ईमोशनल झाला..

अं? काय बोलतोय? अमृताला नीटसं समजलं नाही. पण ती थांबली.
विनयने पाणी प्यायलं आणि तो बोलायला लागला.
"त्या दिवशी तुमचं भांडण झालं आणि तू घराबाहेर पडलीस. गौरव ऑलरेडी बाहेर पडला होता. तुला काही वेळाने अ‍ॅक्सिडेन्ट झाला.. चिकार लोक जमा झाले. त्यातल्याच काही लोकांनी तुला अ‍ॅडमिट केले. तुझ्या आयकार्डवरून रेडीयो स्टेशनला कळवलं आणि तुझ्या मोबाईलवरून लास्ट डायल्ड कॉल केला. तो गौरवचा होता. He was the first one to reach the hospital. तू क्रिटीकल अवस्थेत होतीस. तुझा खांदा डिसलोकेट झाला होता.. कानशिलातून, कपाळातून, हात-पाय सगळीकडून रक्त वहात होतं ऑलमोस्ट. You didn't have time till your parents came. You needed blood immediately. ते अव्हेलेबल नव्हतं. दुसर्‍या पेढीतून यायला वेळ लागत होता. गौरवने पटापट सगळे निर्णय घेतले. He told the Hospital that you were his wife! He authorised them to put you through all medication immediately. He dealt with the police. हेच नाही, तर त्याने तुझ्यासाठी रक्तही दिलंय अमि. Only when he was sure you wer safe, he disappeared from the scene. आज तुला हे आयुष्य दिसतंय ते फक्त गौरवमुळे. आज तुझ्या शरीरात जे रक्त वहातंय ते गौरवचं आहे अमि. Don't waste it for God's sake!!" विनयचा स्वर हेलावला.

"त्यानंतर तो थेट इकडे आला. He was shattered! त्याने मला हे सगळं सांगितलं. तुमच्या भांडणाबद्दलही. त्याला वाटतंय तोच कारणीभूत आहे तुझ्या अ‍ॅक्सिडेन्टला. तो सतत स्वतःला शिव्या देत होता. मी त्याला खूप शांत करायचा प्रयत्न केला, समजवायचा प्रयत्न केला. पण तो हेच बोलत राहिला- You didn't deserve this. You went through the trauma because of him. त्या दुपारी तो दिल्लीला जायचा होता. आमची एक क्रूशियल मीटींग होती. तिकडच्या एका एजन्सीसोबत एक मोठा क्लायंट मिळायची शक्यता होती. तो मिळाला असता, तर संपूर्ण महाराष्ट आणि साऊथचं मार्केटींग आपल्याकडे येणार होतं. त्याही अवस्थेत गौरव तिकडे गेला, he clinched the deal for us! For this company and.. and along with the papers he put his papers too. त्याने पार्टनरशिपमधून रीझाईन केलं. तो परत आला ते जाण्यासाठीच. त्याने दिल्लीतच आमच्या सहयोगी एजन्सीत जायचा निर्णय घेतला. He simply ran away from here. जाण्यापूर्वी आम्ही एकदा भेटलो. त्याचं गिल्ट जात नव्हतं. मी सतत तुझा फॉलो-अप घेत होतो. तू ठीक आहेस, रीकव्हर होत्येस हे ऐकून he was very much relieved. तुझ्या आयुष्यात तो असता कामा नये, तो नसला तरच तू सुखी होशील, तुझ्यासारखाच कोणी चांगला साथीदार तुला मिळेल असं त्याचं म्हणणं होतं. हे सगळं मी तुला कधीही सांगणार नाही असं वचन त्याने माझ्याकडून घेतलं आणि तो इकडून गेला."

"आज माझा आणि त्याचा कॉन्टॅक्ट आहे, आम्हाला तो ठेवावाच लागतो कारण आम्ही एकत्र काम करतो. पण आता आम्ही strictly professionals आहोत. We don't discuss anything apart from work as a rule. त्या दिवसानंतर त्याने तुझं नाव घेतलेलं नाही. He doesn't want to spoil your life. पण तो बरा आहे. त्याचं आवडतं काम करतोय. आणि तूही आता बरी आहेस, तुझं आवडतं काम करत आहेस. So, here we are. This is it."

अमृता ऐकता ऐकता जागच्याजागी थिजली. सुन्न झाली. 'हे इतकं सगळं केलंस माझ्यासाठी? तुझ्या प्रेमाला समजण्यात मीच तोकडी पडले रे! एकमेकांचे नवरा-बायको होण्यासाठी लग्नाचा उपचार गरजेचा नसतो हे मला कळलंच नाही कधी! मग गौरव, इतकं एकमेकांवर जीव तोडून प्रेम केल्यानंतर, शेवटी आपल्या वाट्याला हे भोग का यावेत रे?

ओ गौरव! तू माझ्या आयुष्यात असलास तर माझं काही चांगलं होणार नाही असं म्हणतोस? नाहीयेस तू आत्ता. काय चांगलं चाललंय मग माझं? सांग! मला कोणी चांगला साथीदार मिळेल म्हणतोस? कोणाला तुझ्या नखाचीदेखील सर असेल का रे? का नाही पुन्हा एकत्र येऊन एक नवीन जीवन सुरू करायचं? का तडफडायचं असं मनाविरूद्ध? मी नाही रे कोणताच हट्ट करणार आता. मला फक्त तू हवायेस. तुझ्याविना एक एक क्षण नकोसा होतोय मला. आणि तुलाही. मग का हे दु:ख सहन करायचं? का असे एकमेकांविना दिवस काढायचे?

पण हेच जर प्राक्तन असेल, तर मी ते स्वीकारते गौरव. नसेल नशीबाला आपलं एकत्र येणं मंजूर, तर नसूदे. आज माझं जीवन तुझं देणं आहे. आज माझ्या नसानसांत तू आहेस. तुझा सळसळता उत्साह, तुझी बुद्धीमत्ता, तुझं झोकून देणं- सगळं सगळं आता माझंही आहे गौरव. ते तर कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही ना? आता मला नाही कोणाची पर्वा. मला आयुष्य दिलं आहेस तू, ते तुझ्यासाठीच जपेन मी. फक्त तुझ्यासाठी.'

*****

"हाऽऽऽऽऽय ऑल माय यंग ऍंड लव्हली फ्रेन्ड्ज!! कसे आहात? फोक्स, आज तुम्हाला काही सांगावसं वाटतंय.. तुम्ही तर सगळे सीनीयर्स.. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर किती mixed feelings असतील ना तुमच्याकडे? खूप खूप प्रेमाची माणसं जवळपास असतील, तर काही आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे दुरावलेली, दुखावलेली नातीही असतीलच.. ह्या अशा सुटलेल्या नात्यांकडे पाहून आपण नेहेमीच दु:खी होतो.. असं वाटतं, अरे का हे असं झालं? आपण हे टाळू शकलो नसतो का? हा दुरावा यायलाच हवा होता का? पण फ्रेन्ड्ज, हाच दुरावा आपल्याला कधीकधी खूप काही शिकवून जातो.. आपण कसं वागायला नको होतं, काय चुका करायला नको होत्या.. ह्यावर विचार करायला भाग पाडतो.. मग आपण फक्त एकच करू शकतो- मनापासून त्या दुरावलेल्याची माफी मागू शकतो.. देवापाशी प्रार्थना करू शकतो, की देवा एकदातरी माझी माफी त्याच्यापर्यंत पोचूदे.. त्यालाही कळूदे माझा पश्चात्ताप. बाकी लाईफ गोज ऑन.. वी ऑल नो.. सुरूवात करूया अशाच एका गाण्याने, 'जीवनगाणे गातच जावे..' ही आहे अमि, तुमच्यासोबत, तुमच्यासाठी.."


-समाप्त.

9 comments:

aativas said...

Interesting story. :)

Dhananjay said...

chaan

गौरी said...

chhan katha ahe. barech diwsanni tujhya blogwar chhan wachayla milale. Mala tujha blog khup awdato likhanachi paddhat sahaj sopi ahe tyamule manala bhidate. ashich lihit raha

ArchANA said...

gauri la anumodan .. khup chaan aahe katha :) ,

Sarang said...

सुन्दर लेख!! शेवट गोड असता तर अजुन बर वाटल असत!

पूनम छत्रे said...

sarv vaachakaanche manaapaasoon aabhaar.. 'close to my heart' ashi katha ahe hee.. tumhala awaDali, mhanun malahi Chaan vaaTala.. thanks :)

Savangadi (सवंगडी) said...

उत्कृष्ट कथा!
आपली (ओघवती)लिहिण्याची शैली वाखाणण्या जोगी आहे. फार आवडली.
धन्यवाद!

Prajakta said...

atishay sundar....baryach divsani evdhi chan katha vachayala milali...thanks...waiting for more stories like this...:)

Pallavi Sawant said...

Nice!