February 25, 2010

तुझ्या नसानसांत मी (भाग २)

२.

गौरव एक वादळ होतं.. तिचा होता, तेव्हा तिचा आणि तिचाच. पण काम, बिझनेस, एखादी कॅम्पेन, डोक्याला खाद्य असलं की तो एकटा असायचा, झपाटल्यागत. त्यावेळी तो कोणाचंही मन राखणं, मान देणं वगैरेच्या भानगडीत पडत नसे. गप्प गप्प स्वतःच्याच विचारात हरवून जाई, किंवा फोनवर, नेटवर असे.. त्याचे हे अटॅक अमृताला झेपायचे नाहीत..
'गप्प का गौरव? काही झालंय का? कॉफी करू मस्त? किंवा काही मदत करू तुला? मी आहे ना, मला सांग..'
'च्च! nothing. just leave me alone, I am thinking something..' तो आपल्याच नादात..
'मला सांग तर, कदाचित मी काही सुचवेन.. मला पण येतं अरे यातलं..' ती समजूतदारपणाकडून चिडचिडीकडे आपसूक जायची..
'अरे हो.. पण हे तुझ्यासाठी नाहीये.. जेव्हा असतं तेव्हा बोलतोच ना.. कमॉन.. can't I have some space here??'

आपल्याला असं का होतंय हे अमृतालाही समजत नव्हतं. संशयी नव्हती ती, पण गौरवच्या आसपास सतत रहावं, त्याचं सगळं आपल्याला माहित असावं आणि त्यालाही आपल्याबद्दल सगळं माहित असावं अशी अपेक्षा मात्र होती तिची. नेमकं हेच गौरवला पसंत नव्हतं..

’वेळीच सावर, इतकी पझेसिव्ह होऊ नकोस’- तो समजवायचा तिला. 'हे बघ, मी खूप जास्त मनस्वी आहे.. आणि माणसांच्या बाबतीत बेपर्वा! मला कोणी बांधून ठेवू शकत नाही, कोणी प्रयत्न केला, तर मी त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करतो.’ त्याच्या पारखी नजरेने एका झटक्यात तिचंही अवलोकन करून टाकलं होतं. ’तुला नाही जमायचं अमू.. तू ना एखाद्या घारीसारखी आहेस, तुला तुझी माणसं, तुझ्या वस्तू सतत तुझ्या पंखांखाली लागतात, तुझ्या घरट्यात, तुझ्या उबेत.. ती नाही आली, तर तु अस्वस्थ होतेस.. तुला ना रीपोर्टींग लागतं सगळ्यांचं, if I may put it that way.. नसते हट्ट धरू नकोस.. be normal and sporting about people and things."

अमृताला तिच्या स्वभावाचं इतकं अचूक विश्लेषण तिच्या तोंडावर सांगणारा असा पहिलाच भेटला होता.. त्यामुळे ती तर जास्तच प्रेमात पडली त्याच्या!

दिवस पळत होते.. दोघेही हळूहळू कामात बस्तान बसवत होते.. अमृता स्टेशनवर आता प्रॉडक्शनही करायला लागली. एका अ‍ॅनिमेशन स्टुडीयोमध्ये तिथल्या कार्टून्सला, छोट्या फिल्म्सना आवाज द्यायचे कामही करत होती. रेडीयोवर स्वतःच्या कार्यक्रमाबरोबरच नवीन काही सुरू करत होती, शिकत होती. बाहेर फिरत होती. तिच्या दादा-दादींसाठी थोडा वेळ घालवत होती, जमेल त्या पब्लिक ईव्हेन्ट्समध्ये 'आजी-आजोबांवर प्रेम करा, त्यांचे प्रश्न समजून घ्या' असं सांगत असे ती.. मनासारखं आयुष्य चालू होतं अगदी.. गौरव तर पदोपदी तिला लागायचाच. त्याचा बिझनेस तर दुप्पट वेगानं पळत होता. आणि त्याचबरोबर त्याच्या मुंबईच्या वार्‍याही. अजून दोन पार्टनर, अजून अनेक ज्युनिअर्स, कदाचित मुंबईतच अजून एक पार्टनरशिप, त्याशिवाय पुण्यातल्या आजूबाजूच्या छोट्या शहरातले कस्टमर्स.. वेळ म्हणून पुरत नव्हता कशाला..

अशी जवळजवळ चार वर्ष गेली. तिच्या घरून आता लग्नासाठी छेडाछेडी सुरू झाली. तिचे आई-बाबा सुशिक्षित होते, त्यांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.. आणि गौरवमध्ये तर नाव ठेवायला जागाच नव्हती! त्यामुळेच गौरवबद्दल त्यांना सांगून पटकन लग्न करूनच टाकू असा तिचा विचार होता.. पण गंमत म्हणजे गौरवशी अजून ती एकदाही ह्या विषयावर बोलली नव्हती.. ते लग्न करणार हे काळाच्या ओघात कधीतरी होणार होतंच.. त्यावर आता तारखेचं शिक्कामोर्तब हवं होतं.. लवकरात लवकर त्याला विचारायचं ह्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली.

त्या रात्री चार दिवसांच्या अंतराने ते एकत्र होते.. अजूनही नात्यातलं ताजेपण टिकवून होते ते.. खरंतर बिझी शेड्यूल्समुळे जेवढा वेळ मिळेल तो सत्कारणी लावायची ओढही होती.. तो जवळ असताना जितकं रीलॅक्स्ड वाटायचं, तितकं कधीच वाटायचं नाही अमृताला.. त्याच्या शरीराची ऊब, त्याचा मजबूत स्पर्श, त्याचे मधाळ श्वास.. गौरव असताना परत एकदा स्वतःच्याच अस्तित्त्वाची खात्री जणू तिला पटत असे..

नंतर तो नुसताच पहुडलेला असताना तिने त्याला आवडते तशी कॉफी करून आणली.. कप त्याच्या हातात देत तिने बिचकतच तो विषय काढला..
"गौरव, आपण लग्न कधी करायचं?"
"काय??" त्याला पूर्णपणे हे अनपेक्षित असल्यामुळे तो दचकलाच.. कॉफीही थोडी सांडली..
"हंऽऽ लग्न.. इतकं दचकायला काय झालं?" ती थोडी सरकून बसली.. "लग्न करायचंय ना आपण? 'आता तरी कबूल कर, तुझ्या नसानसांत मी'"- ती खोडकरपणे म्हणाली..
.."'फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी!'"- त्याने पूर्ण केलं.. "अरे, दुनिया जानती है, यह नाचीज किसके आगे झुकता है, किसकी आहें भरता है.. पण लग्न...? इतकं छान चाललेलं आहे आपलं, कशाला लग्नबिग्न?" अगदी कॅज्यूअली म्हणाला तो..
अमृताला धक्काच बसला.. "म्हणजे??? तू माझ्यावर प्रेम करत नाहीस???"

त्याला हसूच आलं! त्याने तिला जवळ ओढत तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं अन् म्हणाला, "प्रेमाचा आणि लग्नाचा काय संबंध? I love you more than anything.. you know that sweetheart.." एक मिनिटभर दोघेही गप्पच होते.. अमृता शॉक्ड, तर गौरव तिचा अंदाज घेत..

नंतर एक मोठ्ठा श्वास घेत तो म्हणाला, "अमू, प्लीज जरा शांतपणे ऐक. माझं चुकलंच.. आपण खरंतर ह्यावर बोललोच नाही कधी.. ओके, ऐक.. माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. माझं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे, पण लग्न केल्यानेच ते सिद्ध होईल असं आहे का? लग्न करून सुखी झालेले लोक असतीलही, पण मी लग्न करून दु:खी झालेलेच लोक जास्त पाहिलेत.. I myself have come from a broken family.. माझे आई-वडील विभक्त झालेत, माझ्या बहिणीला मी अनेक वर्ष भेटलेलो नाहीये.. माझ्या दोन मैत्रिणी लग्न होऊन परत आलेल्या मी पाहिल्या आहेत, एका मित्राचं रखडत चाललेलं लग्न पहातोय .. आपण वावरतो ती इन्डस्ट्री- टीव्ही, कॉर्पोरेट्स.. लोकांना वेळच नाही लग्नबिग्न करून ते टिकवायला.. ज्यांनी केलंय, ते त्यातल्या कमिटमेन्ट्सना वैतागलेत, फ्रस्ट्रेट झालेत.. I have seen enough to experience.. तूही विचार कर अमू.. We are better this way.. seriously..तू माझ्या जवळ आहेस, आपण एकमेकांबरोबर खुश आहोत, समाधानी आहोत, आहोत ना?"
"अं? हो.." अमृता अजूनही सुन्नच होती..
तिला हाताने परत वेढून घेत तो म्हणाला, "मग? अजून काय पाहिजे?" त्याचे डोळे तिच्यात रुतवत त्याने विचारले आणि अमृता त्यात परत एकदा वाहून गेली.. कॉफी अर्धवटच राहिली..

पण ते तिच्या मनात राहिलंच. 'ह्याचं आपल्यावर नुसतंच प्रेम आहे, पण लग्न केलंच पाहिजे असं नाही' हे पचायलाच अमृताला खूप वेळ लागला. किंबहुना ते नाहीच पचू शकलं तिला.. प्रेम असलं की लग्न करतातच ना लोक? जे करत नाहीत त्यांच्या प्रेमात काहीतरी खोट आहे ही समजूत तिची इतकी पक्की झाली, की त्या दोघांचे संबंध अचानक खूपच तणावपूर्ण झाले.. वरवर पाहता सगळं ठीक होतं, पण आता सगळ्यातच अमृताला इनसेक्यूरिटी वाटायला लागली.. हा लग्नच करणार नाही, म्हणजे कधीही मला सोडून जाऊ शकेल!- ह्या विचाराने खरोखर भयभीत व्हायची ती! गौरवशिवाय आयुष्य? छे! त्यापेक्षा मरून जाऊ आपण!

शिवाय 'लोक काय म्हणतील' होतंच. घरी काय सांगणार होती ती? बिचार्‍या आई-बाबांना हे सहन झालं असतं का? पुण्यात तर ती उघड त्याच्याबरोबर रहात होती. तिच्या-त्याच्या ऑफिसमधल्या सगळ्या लोकांना माहित होतं.. आणि का नाही करायचं लग्न? दोनचार लग्न नाही झाली ठीक, म्हणजे सगळीच तशी होतात का? आख्खं जग चाललंय ना तसंच? काहीही बोलतो हा. त्याचं मन वळवायचंच..

मग तर तो तिच्या जगण्यातलाच जणू वन-पॉईंट अजेंडा झाला. हरप्रकारे गौरवला लग्नासाठी राजी करणं! तिच्या कामावर त्याचा परिणाम होऊ लागला, आजकाल आजी-आजोबांशीही प्रेमाने बोलायची नाही ती.. त्यांची ४०-५० वर्ष जुनी झालेली लग्न, कोणाचे जोडीदाराविना चाललेले दु:खी दिवस तिला अजूनच डीप्रेस करायचे. नवीन प्रॉडक्शनबद्दल तर ती विचारही करत नव्हती- सगळा मोकळा वेळ 'गौरवशी लग्न' यातच!

एके सकाळी गौरव ऑफिसला जातानाच्या गडबडीत तिला म्हणाला
"अमू, आज पार्टी वेअर काहीतरी घाल. रात्री स्टेशनवरून तसंच देवेनच्या पार्टीला जाऊ.."
"ओह! आज आहे? ए मी नाही येत.."
"का? तुला तर आवडतं ना.. चल ना.. सगळे ओळखीचे लोक आहेत, शिवाय आपल्या ऑफिसचा ग्रूपही आहे.. किती दिवस झाले we haven't chilled out!"
"सगळे ओळखीचे आहेत, म्हणूनच नको.."
"अं? का?"
"आपल्याकडे विचित्र नजरेने पहातात ते.. लग्न न करता तसेच रहाणारे म्हणून.."
"काय? काहीही काय????" गौरवचा विश्वासच बसला नाही! "कमॉन अमृता! असं कोणीही नाहीये. आपल्या आयुष्यात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही! नाही केलं लग्न आपण तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे? आणि त्यांना असला, तरी तुला का आहे? We make a good couple, म्हणून जळतात ते.." तिला खुलवायचा प्रयत्न करत तो म्हणाला..
"हो न? मग लग्न करून त्यांची तोंडं बंद करून टाकू ना?"
"Oh God! You are impossible! आलीस का परत तिथेच?" गौरव चिडलाच. मोठ्या मुश्किलीने स्वतःवर ताबा मिळवत तो म्हणाला, "हे बघ, साधा प्रश्न आहे- पार्टीला येणारेस की नाही?"
"लग्न करायचं प्रॉमिस करणार असलास तर येईन.." तीही हटवादी!
"What? This is ridiculous!!! Fine! यापुढे विचारणार नाही, तूही असले मूर्खासारखे प्रश्न मला विचारू नकोस!" संतापातच तो निघून गेला.
अमृता त्यानंतर रड रड रडली.. पण काय उपयोग होता?

तिलाही समजत होतं, आपण असं वागून-बोलून त्याला दुखावतोय, दुरावतोय त्याच्यापासून. पण लग्नाचं भूत इतकं मानगूटीवर बसलं होतं की दुसरं काही सुचतच नसे. कधी आई फोनवरून विचारतेय म्हणून, कधी कोण्या मैत्रिणीने त्याच्यावरून चिडवलं म्हणून.. कुठूनही विषय वळून तिकडेच जाई. गौरवही वैतागायला लागला होता.. 'लग्न'हा नुसता विषयच काढला तर हे असं, केलंच असतं तर??? आपला निर्णय योग्य आहे हे पुन्हापुन्हा पटत होते त्याला.. त्याचं खरंच अमृतावर प्रेम होतं.. सुंदर दिवस चालले होते.. तिची अवस्था पाहून त्यालाही तुटायचं.. पण तिचं ते जणू ऑब्सेशन झालं होतं.. समजावायला गेलं की ती लिटरली लग्नाची भीक मागायची त्याच्याकडे, इतकी, की त्याला तिटकारा यायचा, आणि निश्चय दृढ! तो विषय सोडून काहीही बोललं, तर अमृता त्याला रीस्पॉन्सच द्यायची नाही.. त्यामुळे त्याने एकट्याने कितीही प्रयत्न केले तरी दरी रूंदावतच होती!

त्या सकाळी तो नेहेमीच्या वेळी ऑफिससाठी निघाला नाही. उलट सावकाश आवरत होता.. मध्येच उठून बॅग भरायला लागला.. अमृता इतका वेळ नुसतं बघतच होती.. बॅग पाहून मात्र तिला राहवलं नाही..
"कुठे बाहेरगावी चाललायेस?"
"हो. दिल्ली. संध्याकाळची फ्लाईट आहे."
"यावेळी मला विचारलं नाहीस..."
"आपलं लग्न झालेलं नाहीये. असं एकत्र बाहेरगावी जाणं चांगलं दिसत नाही- असं ऐकवलं होतंस ना? येणारेस का?"
"माझा दादादादींबरोबर ओल्डएजहोमच्या भेटीचा प्रोग्राम आहे उद्या सकाळी..."
".. नसता तर आली असतीस का?"
"मी येणार नाही ही खात्रीच आहे तुला.. म्हणून मला जमणार नाहीये, तेव्हाच जातोयेस का मुद्दाम? म्हणजे मी हो म्हणण्याचा चान्सच नाही!.." सटासट तोंडाला येईल ते बोलत चालली ती..
"करेक्ट! पर्फेक्ट ओळखलंस! काय रीडींग केलंयस माझं! ग्रेट!" उपहासाने तो म्हणाला.. इतक्यात त्याचा सेल वाजला.. "हेय! हाय!.." बोलत बोलत तो बाहेर गेला.. पुसटसे ऐकू येत होते तिला.. मनात संताप धगधगत होता.. आता हा आपल्याला साधं विचारतही नाही??? इतक्यात त्याचे.. "..ए सोनाली, ऐक, ते प्रिन्ट्स आण, नक्की.. नायतर कत्लेआम होईल.. चल, सीयू अ‍ॅट थ्री, दोन तास आधी चेकईन आहे.. ओके, बाय.." आणि हसल्याचे आवाज आले.. सोनाली?? ही असणारे बरोबर?

"सोनाली येत आहे तुझ्याबरोबर?"
"हो"
"मला सांगितलं का नाहीस?"
"काय संबंध तुझा?"
"बरोबर! मला का सांगशील तू? मी काही तुझी लग्नाची बायको नाही!"
"There you go!! हो, नाहीस तू माझी लग्नाची बायको. कधी होणारही नाहीस. I am fed up of you now! सारखं तेच तेच.. I am glad की आपण नाही केलं लग्न..."
"असंच म्हणणार रे तू.. लग्न केलं नाही की बरं असतं, काल प्रीती, आज अमृता, उद्या सोनाली.." तिने मुद्दामच अतिशय हीनपणे त्याच्या आधीच्या गलफ्रेन्डचा उल्लेख केला..
"Shit! Shit!! I don't believe this! You know well.. I have loved you like anything Amruta.. तरी हे असं????? Gosh!! Just get lost! आत्ता या क्षणी माझ्या डोळ्यासमोरून जा.. नाहीतर माझा ताबा सुटेल.. Just GO!!" तो ओरडला!

असं म्हणला खरं आणि तोच ताडताड घराबाहेर पडला!

अमृता 'आपण हे काय बोलून बसलो' म्हणत रडतरडत खाली कोसळली. स्फूंदून स्फूंदून रडल्यावर 'आपण आपल्या हाताने ह्या नात्याचा शेवट केलाय' हे उमगलं तिला. ज्या एका गोष्टीवर ती कॉम्प्रोमाईज करायला तयार नव्हती, नेमकी तीच गोष्ट गौरवला क्षुल्लक वाटत होती. स्वतःलाच दोष देत राहिली ती.. 'गौरव, गेलास तू? मला सोडून गेलास.. I am sorry.. फार दुखावलं मी तुला.. मी हा हट्ट धरला नसता, तर आजही आपण तसेच आनंदात असतो.. मला हक्क नाही तुझ्या आयुष्यात रहायचा आता..' एका क्षणात निर्णय घेऊन ती उठली.. भराभरा जमेल तसं तिने दोन बॅगांत तिचं सामान कोंबलं आणि तडक घर सोडून निघाली. जाण्यापूर्वी त्या घरावरून तिने नजर फिरवली.. कधी नवखं वाटलंच नव्हतं ते तिला.. गौरवसारखंच त्याचं घरही तिला नेहेमीच आपलंसं वाटलं होतं.. रडतरडतच तिने आपल्यामागे दार ओढून घेतलं आणि बाहेरच्या कुंडीखाली किल्ली ठेवली- शेवटचीच. खिन्नपणे तिने तुळशीकडे पाहिलं आणि जिना उतरायला लागली..

जाण्यापूर्वी गौरवची माफी मागायची अनिवार इच्छा झाली तिला.. डोळे पुसत तिने त्याला फोन लावला.. नुसत्या रिंग्ज्स.. त्याने फोन उचलला नाही.. 'बोलणार नाहीस का रे कधीच आता? माझा शब्दही ऐकवत नाहीये तुला?' पुन्हा एकदा हुंदके द्यायला लागली ती.. तसंच सामान टूव्हीलरवर टाकलं आणि निघाली ती.. शरीर अजूनही हुंदक्यांनी गदगदत होतं.. डोक्यात गेल्या सहा महिन्यातले कटू प्रसंग फिरत होते.. आणि हे आत्ताचं भांडणही.. कुठे जायचं, काहीच ठरवलं नव्हतं.. गाडी भरधाव मात्र निघाली होती.. 'पेईंग गेस्ट म्हणून क्लेम आहे तिथेच जाऊ' असं तिने ठरवलं आणि लक्षात आलं की हा रस्ता भलताच आहे..'सगळे मार्ग चुकतच आहेत..' तिने खेदानं मान हलवली आणि तंद्रीतच रस्त्याच्या उजवीकडे आली.. आता वळणार.. त्या समोरच्या ट्रकचा अंदाजच तिला आला नाही.. आणि!!! क्रॅश!!!

एका क्षणात तिच्या दुचाकीचं चाक ट्रकच्या मागच्या चाकात अडकलं आणि तिची दुचाकी उजवीकडे पडली.. पाय सामानात अडकल्याने तिला धड सुटकाही करून घेता आली नाही.. डीव्हायडरच्या दगडवर तिचं डोकं आपटलं आणि तत्क्षणी तिची शुद्ध गेली..

****

0 comments: