January 27, 2010

मुद्दागुद्दी!

गुद्दागुद्दी’ हा शब्द आपण ऐकलाय.. ही मुद्दागुद्दी काय आहे? तर, मुद्दागुद्दी म्हणजे भांडण सुरू करायचं मुद्यावरून आणि संपवायचं गुद्दागुद्दीवर! आपण साधं नळावरचं भांडण घेऊया.. वाद होतो सुरू.. का? कारण मध्येच कोणीतरी घुसलेलं असतं. हा मूळ मुद्दा. पण ह्यावरून जी ’बाच्याबाची’ सुरू होते की बस रे बस.. पार चारित्र्यहननच!! त्या अवधीत सहज पन्नास लोक बादल्या भरून जातात.. सो, मुद्दा राहतो बाजूला.. उगाच एकमेकांची उणीदुणी काढायची, पार वाडवडीलांच्या कुळाचा उद्धार करायचा, पोराबाळांचं अपयश उगाळायचं, कधीतरी पाच वर्षापूर्वी झालेल्या एकमेकांच्या चुका उकरून काढायच्या... आणि शेवटी बोलायला काही उरलं नाही की हात उगारायचा!! मूळ मुद्द्यातलं पाणी एव्हाना येऊन गेलेलं असतं बिचारं.. पुढच्यामागच्या लायनीतल्या लोकांचं पाणीही भरून झालेलं असतं आणि ते भरता भरता टीपीही बरा झालेला असतो.. भांडणारे बसतात उद्यापर्यंत बोंबलत! (खरंच!!) (आता लोक सूज्ञ झालेत.. पाणी ठरलेल्या वेळात जातं हे ठाऊक झालंय, त्यामुळे ते गेलं की मग भांडतात! भांडण सोडायचं नाही- त्या मुद्द्याला मात्र चिकटून आहेत!)

नळावरचं भांडण मेटॅफॉरिकली घेऊया.. अशी अनेक उदाहरणं सगळीकडे दिसतात.. बस/लोकल/रांगेत घुसणारी माणसं- तेवढ्यापुरतं सोडून देतो का आपण? घुसणारा माणूस मागे गेला तरी त्याच्याकडे डेडली कटाक्ष, ’नकोच मिळूदे त्याला तिकिट’ सारख्या इच्छा.. आपण तरी कुठे लिमिट पाळतो? डोक्यात एकदा रक्त उसळलं की उतरायचं नाव घेत नाही लवकर.. मग उगाच खुसपटं काढत रहायची काही ना काही.. अशाने मग समोरच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? का त्याने केली ती चूक? आणि आपण करतो तो शहाणपणा?

हीच गम्मत लहान मुलांच्या भांडणात पडणार्‍या पालकांची.. मुलं एकमेकांशी भांडतात आणि त्याच्या तक्रारी पालकांपर्यंत पोचतात.. मग मुलांचं भांडण रहातं बाजूला आणि खेळ रंगतो पालकांचाच! ’तुझ्या पोराकडून काय अपेक्षा करणार रे! बापच असा, तर तो तरी काय करणार? खानदानाची सवय!’ ’आई घरात मुलाला काही शिकवेल तर मूल धड वागेल ना? संस्कारच नाहीत ह्यांना काही! आमच्या लोकॅलिटीत अगदी शोभत नाहीत!’ वगैरे वगैरे! पार इज्जत के फालुदे- दोन्ही बाजू एकमेकांच्या करतात.. त्यांचं भांडण संपेस्तोवर पोरांनी आपसातलं भांडण मिटवून पुढच्या भांडणाची तयारी केलेली असते! मुलांचं एकेकाळी भांडण झालं होतं म्हणून वर्षानुवर्ष एकमेकांचं तोंड न पाहिलेले पालक मला ठाऊक आहेत! नको त्या वेळी नको त्या गोष्टींचा बादरायण संबंध लावून आयुष्यभराचं एकमेकांसमोर हसं करून घेतात हे लोक.. त्याऐवजी पोरांच्या भांडणात न पडण्याचा सूज्ञणा वेळीच दाखवला असता तर??

आणि आंतरजालावरच्या भांडणाचं तर काय सांगावं! ही तर भांडण उकरून काढण्याची एक आयतीच सोय झालीये! इथे आपण एकमेकांना दिसत नाही, भेटायची शक्यता नाही! समोरासमोर असू, तर कसं भांडण करायच्या आधी थोडा तरी सारासार विचार करायला वेळ असतो.. आंतरजालावर भीतीच नाही कशाची! जे मनात आलं, लिहून टाकलं.. त्याचा आणि लिहिलेल्या मुद्द्याचा काहीच संबंध नसतो.. काढायची असते ती चिडचिड बाहेर.. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडून ’तुझ्याकडून बाकी काय अपेक्षा करणार म्हणा, तुला विचारण्यातच काही अर्थ नाही’ अशी वाक्य पडतात.. अजून एक अचाट प्रकार म्हणजे आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळावर दोन तथाकथित मित्र असतात. ते एकमेकांना नुस्त्या आयडीनेच नाही, तर थोडेफार पर्सनलीही ओळखत असतात.. त्यातल्या एकाला दुसर्‍याचं काहीतरी पटत नसतं.. पण ते तो त्याला मोकळेपणाने नाही सांगत.. तो काय करतो? ते सांगण्यासाठी अजून एक आयडेंटीटी निर्माण करतो.. आणि त्या आयडीने पहिल्या त्याच्या सोकॉल्ड मित्रावर वाट्टेल ते शरसंधान करतो.. वरताण म्हणून त्याच्या परिचित आयडीने मित्राला सहानुभूतीही देतो -’काय लोक तुला सतावतात ना?’ म्हणून!!!! म्हणजे एकच व्यक्ती त्रास देते, आणि खांद्यावर हातही ठेवते! विकृत लोक असतात हे, जाऊदे..

तर, मुद्दा असा होता, की तुम्हाला मुद्दा पटत नाही की माणूस पटत नाही? प्रत्येकाचं प्रत्येकाशी घट्ट कसं जमेल? प्रत्येक न प्रत्येक मत कसं जुळेल? थोडे मतभेद, मतांतरे असणारच.. आणि मैत्री जर तितकीच मोकळी असेल तर ती आमनेसामने कळवावीत.. त्यात कोणीच वाईट वाटून घ्यायचे किंवा ईगो प्रॉब्लेम करण्याचे काय कारण? मतभेद आहेत ते व्यक्त करण्याच्याही रीती आहेत, संकेत आहेत.. ते व्यक्त करावेत, समोरच्याचं ऐकून घ्यावं- त्याने आपली स्वत:ची मतंही तपासून होतात आणि विषय संपवावा.. पण तसं होत नाही.. एकदा रसवंती वाहू लागली, की कायकाय जुनंपानं बादरायण संबंध लावूनही न जुळणारं असं काहीतरी बोलण्याबोलण्यातून बाहेर पडतं आणि मतभेदाचे वाद आणि वादाचं भांडण होऊन संबंध मात्र चिघळतात.. आणि एकदा हे संबंध बिघडले की मात्र ते सांधूनही सांधत नाहीत..

मतभेदांच्याही पुढे जाऊन मैत्री करता येते- हे ज्यांना कळले ते खरे सुखी.. इन्ग्रजीमध्ये दोन सुप्रसिद्ध वाक्य आहेत- A friend is the one who knows everything about you and still loves you आणि We may agree to disagree! वकीलांचे तसे असते म्हणतात- कोर्टात जे वकील एकमेकांसमोर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात, तेच संध्याकाळी एकत्र गप्पा मारताना दिसतील. अशीलातर्फे भांडण हा त्यांच्या व्यवसाय आहे.. एकमेकांशी भांडण असायलाच पाहिजे असं नाही!

पण मुद्द्यावरून गुद्द्यावर घसरलं की समजायचं आता सगळं संपलं.. कदाचित एरवी काही तोडगा निघूही शकला असता, पण गुद्दागुद्दी आली- मग ती शारीरिक असो वा शाब्दिक की कोणालाच सारासार विचार रहात नाही, आणि मुद्दे बासनात गुंडाळून पडतात. तर पुन्हा एकदा मुद्दा असा, की मुद्दा सोडू नका, शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे! पण तो प्रतिष्ठेचाही करणं इतकं आवश्यक आहे का याच्या विचार करूया.. सौहार्द्राचे अनेक मार्ग खुले असताना कशाला ह्या मुद्दागुद्दीत परस्परमैत्रीला चूड लावायची?

5 comments:

aativas said...

तुमचा लेख वाचताना ’मतभेद होनेपर भी मनभेद हो न पाये’ या तुकडोजी महाराजांच्या ओळी आठवल्या.. कठीण आहे हे जमण कारण जिथेतिथे आपला अहंकार आड येतो...

Anonymous said...

kahi jamale nahi yavelela

poonam said...

अतिवास, सहमत आहे!
अ‍ॅनॉनिमस -धन्यवाद.

Deep said...

मतभेदांच्याही पुढे जाऊन मैत्री करता येते- हे ज्यांना कळले ते खरे सुखी.. >>> hmm kya baat hai! very true. prtyekaalaach as jamle tar..

Anonymous said...

पूनम,अगदी शंभर टक्के पटले तुझे विचार. सुंदरच लिहिलं आहेस. आधीच वाचला होता हा लेख पण त्या वेळी मराठी फॉंट नसल्याने प्रतिक्रिया द्यायचे राहून गेले.
-अश्विनी गोरे