October 15, 2009

शहाणपणा!

पल्याला कोण, कधी आणि केव्हा शहाणपण शिकवून जाईल हे आपण खरंच कधीच सांगू शकणार नाही!! तशी माझी कामवाली बाई मला रोजच शहाणपण शिकवत असते.. ’वैनी, हे मिक्सरमध्ये कशाला वाटत बसलाय? विकत न्हाई आनत? स्वस्त असतंय तसं’- हे इडली, डोस्याचं पीठ वाटत असले की शिकवलेलं शहाणपण असो, की तांब्यांच्या भांड्यांना ’पितांबरी कशाला, नेहेमीची चिंचच बरी आणि स्वस्तही’ असा शहाणपणाचा सल्ला असो.. माझं कसं प्रत्येक बाबतीत चुकत असतं ह्यावर तिचं बारीक लक्ष असतं आणि मला शहाणं करायचा चंगच तिने बांधलेला असतो..

तसंच मधे धुलाईयंत्राचं सर्व्हिसिंग करणार्‍या माणसाने माझी अक्कल काढली.. खरंतर चूक माझीच होती.. त्याने सर्व्हिसिंगला यायच्या आधीच सांगितलं होतं की बिलाची फोटोकॉपी करून ठेवा.. पण मी अष्टभुजा ना.. माझ्या आठही हातात काही ना काही.. त्यात बिलाचा कागद कोणत्याच हातात मावला नाही, त्यामुळे विसरले! झालं! सर्व्हिसिंगला आल्याआल्या यंत्राला हातही लावण्याअगोदर त्याने मला विचारलं, "झेरॉक्स काढलीये ना?"
मी प्रचंड दचकत, "अहो नाही! विसरले!! आणते आत्ता दोन मिनिटांत.."
हे बोलून माझी अक्कल काढायचं ’लायसन’च दिलं ना मी त्याला.. लगेच बोललाच तो.. "काय मॅडम!! तुमच्यासारखे लोक असे विसरायला लागले तर काय बोलणार.. मला पुढच्या कॉलला उशीर होतो.. की तो कस्टमर बोलणार.."
हो रे बाबा.. चूक झालीच, विसरले मी.. स्वत:शीच चरफडत, कसंबसं दादापुता करत त्याला शांत करून एकदाची ’झेरॉक्स’ आणून दिली त्याला..

मात्र परवा तर कळसच! कहरच!! हाईटच!!!
अर्थात नेहेमीप्रमाणे चूक माझीच, त्यामुळे माप माझं निघणार होतंच.. फक्त ते ’असं’ निघेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं!!

तर, झालं काय, की यंदा ठरवलं होतंच की ’दिवाळी पहाट’च्या कोणत्या ना कोणत्यातरी कार्यक्रमाला जायचंच. सहाजिकच सोमवारपासून जाहिराती आल्याबरोब्बर मी बालगंधर्वला हजर. ह्या ’दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांचं मला जाम कुतूहल आहे.. सर्वात पहिलं कारण हे की हे कार्यक्रम खरोखर पहाटेच असतात हो! इतक्या लवकर, अंघोळ वगैरे उरकून, सुंदर सुंदर साड्या-दागिने घालून सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित रहाणं म्हणजे एकदम ग्रेट वगैरे.. मंद सनईचा आवाज, सुगंधी अत्तरं फवारलेली, बरोबर असेच रसिक मित्र किंवा परिवारातील सदस्य, थोडासा फराळ, मैफिलीनंतर चहा किंवा कॉफीवर रंगलेल्या गप्पा, हास्यविनोद.. आणि त्यात एकसे एक दिव्य आवाज!! मधूनच गंभीर असे निवेदन, कलाकारांचा प्रसन्न सहवास.. वाह!! काय वातावरण असेल ते.. आत्तापर्यंत हे मी केवळ कल्पनेने रंगवलेलं चित्र, या वर्षी प्रत्यक्षात उतरणार ह्या आनंदात मी हवेत तरंगतच बालगंधर्वला पोचले..

उत्सुकतेने ’मैं फूली नहीं समायी थी’ वगैरे स्थितीत मी.. त्याच भरात तिकिटं काढली आणि तिथल्या माणसाला विचारून बसले, (का? का?? का???)
"कार्यक्रमाची रूपरेषा काय असते हो?"

त्या माणसाने बोलायला उघडलेले तोंड चक्क बंद केले आणि काही सेकंद शांतच बसला.. मी चक्रावले! म्हटलं, असं काय काहीच्याकाही विचारून बसले की काय मी?

"फारच अवघड प्रश्न विचारलात!! गाण्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय?
अहोऽऽऽ (हे जाम ठसक्यात बरंका!) गाण्याच्या कार्यक्रमात गाणंच असणार, नाहीतर सकाळच्या वेळी काय लावणी असणार??? काय पण प्रश्न विचारता!!!" असं म्हणत त्याने मला मोडीत काढलं अणि पुढच्या माणसाकडे सरकला..

हे उत्तर होतं का? मला कळायलाच काही सेकंद लागले! खरंय, गाण्याच्या कार्यक्रमात लावणी नसणार हे मला कळायला हवं होतं. मी आपलं सुधीर गाडगीळांचं नाव वाचून विचारायला गेले हो.. कशाला विचारायचं? कळलं असतंच ना आपोआप! हे नको तिथे प्रश्न विचारणं हमखास अंगलट येतं हे ठाऊक असूनदेखील... जीत्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही!!

तर, असा हा पुणेरी चिमटा मला बसला!! नुस्ताच बसला नाही, टाणकन मी उडालेदेखील :-)

तर तुम्हाला असे चिमटे बसू नयेत, येईल-जाईल त्याने शहाणपणा शिकवू नये आणि आजूबाजूला केवळ शुद्ध विनोदांचंच वातावरण राहो, अशी या मंगल सणानिमित्त प्रार्थना! शुभ दीपावली!!

11 comments:

अनिकेत said...

हा हा.. लेख आवडला :-)

प. प्र. आचरेकर said...

रिएलिटी आहे लेखनात. खरोखर आपली अक्कल काढणारे कधीकधी आपल्या भल्याचच सांगत असतात पण आपला मान म्हणजेच अहंकार मानेल तर नं !- प प्र आचरेकर

SUSHMEY said...

sundar

Sarang said...

Nehami pramane sunder lekh! Agadi lahan sahan ghatanahi tu ashya lihites ki hatat ghetaleli katha sampeparyant chain padat nahi!! Pan ascharyachi gosht mhanje tu poonyat rahun dekhil 'Balgandharva'chya karmacharyachi pratikriya aikun dachakalis! :-) Diwalichya Hardik Shubhecha!

सर्किट said...

:)

Anonymous said...

changla lekh.

Anonymous said...

आवडलं :) दुसरे शहाणपण शिकवतात ते शिकवतात पण त्यासाठी समोरच्याला मूर्खात का काढतात काही समजत नाही बुवा :)

Anonymous said...

अगं, घाईघाईत माझं नावच टाकायला विसरले. ही वरची पोस्ट अश्विनी गोरे ह्यांची आहे :)

poonam said...

धन्यवाद अनिकेत, आचरेकरजी, सुषमेय, सारंग, सर्किट,अश्विनी आणि अनॉनिमस!

हो न, बालगंधर्वमध्ये हा बाऊंसर येईल अशी अजिबातच कल्पना नव्हती ना! असो, पण मैफल अ प्र ति म झाली!! पंडितजी सलग २ तास गायले.. आवाज झकास तापला होता त्यांचा.. आम्ही अक्षरश: मंत्रमुग्ध!! आणि हो, बालगंधर्वला दिवाळीचं वातावरणही सही उभं केलं होतं- रोषणाई, रांगोळ्या, कंदील, पणत्या- एकदम सुरेख!!

Bhagyashree said...

हेहे भारी लिहीलेस.. आपणच बावळटासारखे प्रश्न विचारून आपलीच अक्कल काढण्याबद्दल सहमत. तोंडात मारल्यासारखे होते राव! :(

Parag said...

hehehehe sahi lihilays.. :)