September 30, 2009

आणि चित्रकार जन्मला!!

खोटं नाही सांगत, अगदी देवाशप्पथ! गेले काही दिवस घरात जे चित्रमय वातावरण होतं, ते पाहून नक्कीच आपल्या घरी पुढ्च्या पिढीचे ’राजा रविवर्मा’ किंवा ’रवि परांजपे’ जन्मलेत अशी आमची धारणा होत चालली आहे! आज घरातला एकही असा पाठकोरा कागद नाही, ज्यावर ’सीनसीनरी’ चितारली गेलेली नाही! आधी अशा प्रत्येक कागदाची होडी व्हायची, तेव्हा मला वाटायचं, की लेक नेव्हीत जाणार वाट्टं.. मग हरेक कागदाचं विमान व्हायला लागलं, तेव्हा वाटलं, छे! नेव्ही काय, वायूदलच! आता मात्र खात्री पटलीच आहे- चित्रकार!

हे सगळं झालं पुण्यात आणि जगभरात धिंगाणा घालणार्‍या स्वाईन फ्ल्यूमुळे!! त्याचा उद्रेक झाला, शाळेमधल्या मुलांच्या माध्यमामधून तो भराभर पसरतोय असं लक्षात आल्यानंतर शाळा साधारण दहा दिवस बंद केल्या. त्याच दरम्यान पाळणाघरही बंद झालं, सिनेमागृहही बंद, सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका, बाहेरगावी जाऊ नका असे सल्ले!! शेवटी अक्षरश: आग्र्यात अडकलेल्या संभाजीराजेंसारखी अवस्था झाली माझ्या मुलाची (आणि समस्त बालचमूचीही). बिल्डींगमध्येही मुलं खाली येईनात खेळायला.. दिवसभर करणार तरी काय? टीव्ही जो एरवी कितीही पाहिला तरी अजून हवा असतो, तो अशावेळी मुळीच नको असतो, किंवा पाहिला तरी जेमतेम तासभर. अभ्यास तर कधीच नको असतो, तरी अगदीच वेळ जाईना, म्हणून उत्साहाने तोही करून झाला थोडावेळ. आता पुढे?

इतक्यात एक ’बालमित्र’ हाती आलं, आणि टाईमपास म्हणून त्याने ते रंगवलं! कर्मधर्मसंयोगाने त्यात फारच सुरेख रंग भरले गेले.. आम्हीही उत्साहाच्या भरात त्याचं भरपूर कौतुक केलं! हीच ती वेळ आमच्या चित्रकाराच्या जन्माची!! (छ्या! नक्की वेळ पहायची राहून गेली, नाहीतर पत्रिकाच केली असती ;)) मग विचारू नका.. रद्दी उपसून सर्व ’बालमित्र’ बाहेर आले.. ’आज संध्याकाळी कोणतं, उद्या सकाळी कोणतं’ वगैरे वाटण्या करून झाल्या आणि स्वारी गुपचूप रंगवायला बसलीही!

जिथे आमच्या घरात सतत माझे लेकाला उद्देशून ’हे करू नकोस’, ’ते काय करतोयेस आता?’, ’काय उद्योग चाललेत रे?’ आणि त्याचे सतत कोणतेनाकोणतेतरी आवाज असायचे- त्याच्या उद्योगांचे किंवा मी नकारघंटा वाजवल्याने रडण्याचे तरी नक्कीच- तिथे घरात शांतता नांदू लागली. बराच वेळ घर शांत राहिलं की पक्कं समजावं- स्वारी चित्रकलेत बुडालीये! घरातली सर्व पुस्तकं, वर्तमानपत्र अशा पद्धतीने रंगली. आणि आता पुन्हा ’आता मी काय करू’च्या पाढा सुरू होणार, अगदी त्याच वेळी ’मायबोली’वर गणेशोत्सव सुरू झाला आणि त्यात चक्क लहान मुलांची चित्रकला स्पर्धा होती. चला! आमचे अजून ३-४ दिवस तरी नक्की गुंतले ह्या समाधानात मी असतानाच एकदम जाणवलं की हा मुलगा आत्तापर्यंत केवळ रंगकाम करतोय.. स्वत: चित्र काढून मग ते रंगवायचं इतकं मन अजून रमत नाहीये!

मग काय! त्याला ’तू चित्र काढ’ हे पटवून देण्यातच २ दिवस गेले! स्वत: चित्र काढणं अवघड ना! दिलेलं चित्र रंगवणं सोपं आणि लेकाला बरोब्बर तेच हवं! पण अनेक आमिषं दाखवून केलं एकदाचं तयार चित्र काढायला! पण चित्र काढायचं तरी कशाचं? गहनच प्रश्न! तेव्हा बाबांनी एन्ट्री घेतली रिंगणात! ’बघच कसं फर्स्टक्लास शिकवतो तुला’ असं म्हणाले ते, आणि मी तिथून निघालेच. बाबांचं शिकवणं म्हणजे एकदम सिस्टीमॅटीक!! पुस्तकामधून बघून चित्र काढायचं. त्यासाठी वीस पुस्तकं पाहिली, त्यातलं एकच बरं वाटलं ते निवडलं. ते निरखून, पारखून घेतलं. त्यात टेकडी, तलाव. नाव, घर, देऊळ वगैरे होतं- त्यात त्यांनी किती जागा कुठे सोडलीये वगैरे पट्टीने मोजून ते चित्र काढायचं असं त्यांनी याला बजावलं! इथे मुलाला पट्टीने सरळ रेघ ओढता येत नाही, तो अंतर कसलं मोजतोय? पण बाबा हार थोडीच जातात? त्यांनी त्याला पट्टी वाचायला शिकवली.. इतके सेंटीमीटर, तितके मिलीमीटर वगैरे.. (काय करणार? स्वाईन फ्ल्यूमुळे बाबाही घरीच होते. चार दिवस त्यांचाही वेळ जात नव्हता) लेकाने निमूटपणे सगळं ऐकलं, बाबा म्हणतात तसं चित्र काढलं, रंगवलं आणि गप्प बसला. छानच काढलं होतं, त्याच्या मानाने तर उत्तमच, अगदी योग्य अंतर, उत्तम रंगसंगती, जे जिथे पाहिजे तिथे आणि तसंच. मी त्याला विचारलं ’हेच देऊया ना स्पर्धेला?’ तर हळूच म्हणाला, ’थांब, मी अजून एक चित्र काढतो..’

दुसर्‍या दिवशी एक चित्र काढून रंगवलं आणि म्हणाला, ’आई, हेच चित्र द्यायचं स्पर्धेला..’. मी चित्रावरून नजर फिरवली.. साधंच चित्र होतं- डोंगर, तळं, झाडं, सूर्य आणि पक्षी- त्याचं तर पेटंट चित्र! पण तरीही थोडं निराळं होतं.. ह्या चित्रात प्रपोर्शन तर चुकलंच होतं, पार गंडलं होतं म्हणूया.. पण तरीही त्यातला साधेपणा आकर्षित करत होता. रंगही छान भरले होते. एक प्रकारचा शांतपणा जाणवला मला त्या चित्रात.. हे असं चित्र जे त्याच्या मनातलं होतं, त्याची स्वत:ची अभिव्यक्ती होती. बाबांना अजूनही वाटत होतं की ते पहिलंच शास्त्रशुद्ध चित्र स्पर्धेला द्यावं, शेवटी हो-नाही करता हे नवं चित्रच दिलं.

’मायबोली’वरचे लोक जितके talented, त्यांची मुलं त्यांच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे.. एकसे एक चित्र सगळी.. यापुढे आपल्या चित्राचा टीकाव लागणार नाही हे माहित असूनही, हौस म्हणून लेकाचं चित्रही दिलं.. धाकधुक होतीच.. आणि एक सुखद धक्का बसला.. ते चित्र खूप जणांनी उचलून धरलं.. खूप लोकांनी ह्या छोट्या चित्रकाराचं मनापासून कौतुक केलं.. कोणी त्या चित्राची खिल्ली नाही उडवली, उलट त्याला शाबासकी दिली.. लेक तर हरखलाच, पण आमचे डोळे मात्र पाणावले.. साधेपणा, सच्चाई, निरागसता हे कोणत्याही माध्यमात उठून दिसतात हेच खरं!!



इतकं प्रोत्साहन बघता आता लेकाला चित्रकलेच्या शिकवणीला घातलं आहे.. बघूया पुढे काय होतं ते.. माझ्या दृष्टीने सध्या तो किमान काही वेळ एका जागी कोणतेही लांडे उद्योग न करता बसतो हे सुद्धा खूप दिलाश्याचं आहे.. त्यासाठीतरी त्याला चित्रकलेची गोडी लागावी अशी प्रार्थना मी देवाकडे करते!

9 comments:

अनिकेत said...

पोस्ट आणि चित्र दोन्ही छान.
लेखनासाठी तुम्हाला, आणी चित्रकलेसाठी लेकाला मनापासुन शुभेच्छा :-)

Anonymous said...

अनिकेतलाच दुजोरा माझाही.....चित्र खरच छान आहे....मुलांना त्यांनी केलेल्या गोष्टींमधुनच जास्त समाधान मिळते....

Mahendra said...

.चित्र फारच छान झालंय. मुलांना ड्रॉइंगचे क्लासेस लावले की पुढे अभ्यासात डायग्राम काढायला फार सोपं पडतं. क्लासेस बंद करु नका कमित कमी ४-५ वर्षं तरी.कॉन्संट्रेशन पण छान वाढतं अभ्यासात.. शुभेच्छा..

aativas said...

चांगला झाला आहे लेख तुमचा. वाचायला मजा आली. फक्त आता लेकाला क्लासला घातलय म्हणून काळजी वाटली ... म्हणजे तेथे त्याला मनासारख चित्र काढता येईल की नाही या आशंकेने :)

poonam said...

धन्यवाद सगळ्यांना! :)

अतिवास, शंका नको.. क्लासमध्येही बाईंनी अमूक रंग द्या असं सांगितलं की तो त्यांना विचारतो, ’त्यापेक्षा तमूक देऊ का?’ असं :) चित्रकलेचा क्लास हाताला वळण मिळावं आणि एका जागी बसण्याची अभ्यासाव्यतिरिक्तही सवय लागावी यासाठी फक्त!

पर एकदा आभार!

भानस said...

पूनम लेकाचे चित्र आणि तुझा लेख छान झालाय.बाकी कोणतेही लांडे उद्योग न करता एका जागी बसतो हे मस्तच गं.

Abhi said...

vA chhAn!! nachi lA manApAsUn shubhechchhA!!

bAbA - gajalkAr, aai - kathA lekhikA ani mulagA chitrakAr.. vA kyA Family hai!!!

Dk said...

Wa sahii aahe chitr :) aani babache shikvnyache pdht pan mast :)))))

Vaishali said...

Chitra n lekh donhi kharach khup chan aahe...khup nit-netak kadato ki to chitra...n kharach khup shant bhav aalet tyat...:)