August 5, 2009

फ्रेन्डशिप डे!

नुकताच फ्रेन्डशिप डे मोठ्या धामधुमीत सगळीकडे साजरा झाला. ’मैत्री दिवस’- काय मस्त संकल्पना आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींना ’आपली मैत्री अशीच अखंड राहो’ असं म्हणणं माझ्या दृष्टीने खूपच गोड कल्पना. आता ते फॅड आहे, की अजून काही, हा प्रत्येकाचा प्रश्न. पण ज्यांना मित्र लाभत नाहीत, काही ना काही कारणाने दीर्घ मैत्रीत खंड पडतो, अशा लोकांना विचारा मैत्रीदिनाचे महत्त्व.. मित्र-मैत्रिणींशिवाय जीवन अपूर्ण. कितीही नातेवाईक असले, गोतावळा असला, तरी या कम्पूची जागा तितकीच स्पेशल. आज माझे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. कालापरत्वे नवे नवे होतही आहेत, पण मैत्री दिवसाच्या दिवशी मला तीव्रपणे आठवतात ते माझे दुरावलेले मैत्र.

असं म्हणतात की योग्य तो शेजारी आणि उत्तम असा मित्र ज्यांना मिळतो ते लोक भाग्यवान. मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत मी थोडी सुदैवी आणि दुर्दैवीही. सुदैवी अशासाठी, की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला अनेक मित्र-मैत्रिणी भेटले, त्यांच्या सहवासात ते ते दिवस अगदी मजेत गेले.. पण दुर्दैवी अशासाठी, की अशी माझी एकही मैत्रीण नाही, एकही मित्र नाही जो मला खरोखर एक व्यक्ती म्हणून ओळखतो. a friend is supposed to know you inside out and still love you as a friend . पण माझ्या मित्र-मैत्रिणी होत गेल्या, तश्याच दुरावतही गेल्या.. भांडणामुळे नाही, तर कालौघातच.. कोणाशीच ती नाळ इतकी घट्ट बांधली नाही गेली दुर्दैवाने, जी काळाच्या कसोटीवर परखली गेली.. शाळा संपली, त्या बरोबरीने तेव्हाच्या मैत्रिणीही. कॉलेज संपलं आणि करीयरच्या मार्गी लागता, तोही ग्रूप सुटला.. नोकरीमध्ये सगळीच नाती तेवढ्यापुरती. तिथे निरपेक्ष मैत्रीची काय अपेक्षा ठेवणार? बिल्डींगमध्ये, कचेरीत, मुलाच्या शाळेनिमित्त झालेल्या ओळखीत, आंतरजालावरच्या ओळखी- रोज अनेक लोकांशी बोलणं होत, प्रसंगी हास्यविनोदही.. पण ह्या सगळ्यांशी माझी खरंच मैत्री आहे का, की काही काळापुरती झालेली ओळख? यातल्या जवळजवळ सगळ्यांशीच माझे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत, तरी यातली कोणती ’मैत्री’ टिकेल- खरंच माहीत नाही.

कॉलेजजीवनात जेव्हा आपण आपल्या मित्र-मैत्रिणिंबद्दल सर्वात जास्त हळवे, पझेसिव्ह असतो, त्याच वेळी माझ्या बेस्ट फ्रेन्डने तिच्या तेव्हा नवीनच झालेल्या मित्रावरून वाद घातला होता.. अजून एक मैत्रीण जिच्यासोबत मी अक्षरश: ’इनसेपरेबल’ होते, ती बघता बघता कोणत्याच ठोस कारणाशिवाय दुरावली ती दुरावलीच. त्यानंतर आम्ही आमची मैत्री पुन्हा जोडण्याचे अगदी जाणूनबुजून प्रयत्न केले, पण एकडा तडा गेला तो गेलाच. ह्य दोन्ही अनुभवांनंतर माझ्या जीवश्चकंठश्च मैत्रीच्या संकल्पनेवरचा विश्वासच उडाला. निरपेक्ष मैत्री, घट्ट मैत्री, बेस्ट फ्रेन्ड्ज वगैरे माझे तरी कोणी होऊ शकत नाही, ही खूणगाठ मी मनाशी बांधली.. आणि पुढच्या आयुष्यात वेळोवेळी ती गाठ पक्कीही झाली.. एखादीशी जरा सूर जुळताहेत असं वाटलं, की काही ना काही होणारच हे ठरलेलंच. बरं, ह्या दुराव्यामागे माझे भलतेच हट्ट, अपेक्षा आहेत, तिचं विचित्र वागणं आहे, असंही नाही! मग ती मैत्रीही तितकीच तकलादू होती का? तर, तसंही नाही. त्या वेळात आम्ही त्या मैत्रीच्या नात्यामध्ये पूर्ण गुरफटलो होतो. आणि तरीही, दुरावा आला हेही तितकंच खरं. तरी पण स्वभाव! निखळ मैत्रीची भुरळ कोणाला नाही पडत? नकळतपणे नवीन नवीन गुंत्यात अडकायला, आणि न चुकता त्यात ठेचकाळायला अजूनही नेमाने होतंच. आता वयाच्या ह्या टप्प्यावर इतके अनुभव आल्यानंतर त्याच ओढीने मैत्री होणंही मुश्किल.. अनुभवाने एक अलिप्तता आलेली आहे, पण एक सल ठेवूनच.

अजून एक अपेश आहे, ते कधी होऊच न शकलेल्या मैत्रांचं.. आपल्या सभोती अनेक लोक असतात, त्यांचा सहवास, मैत्री ही आपल्याला हवीहवीशी असते.. आपल्या नकळतच आपण त्यांच्याशी मैत्री करायची इच्छा बाळगून असतो.. पण कोणासमोर आपण मैत्रीचा हात पुढे केल्यावर त्याला तितका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असेही नाही. ती नातं तसंच अर्धवट राहतं- ना धड मैत्रीचं, ना परकंही.. ओळख-अनोळखच्या सीमेवर. नकळतच विचार केला जातो, की आपली मैत्री असती, तर आपलंच आयुष्य किती समृद्ध झालं असतं.. पण म्हणतात ना, मैत्री ’केली’ जात नाही, ती ’होते’ आपोआपच.

कथा-कादंबर्‍यांमध्ये, सिनेमात, आसपास बालमैत्रिणी, बालमित्र, फॅमिली फ्रेन्ड्ज वगैरे पाहिले, की मला फार छान वाटतं.. त्या लोकांच्या नशीबाचा मला हेवा वाटतो. त्यांचा स्वत:चा असा हक्काचा ग्रूप असतो जो फक्त मौजमजेसाठी नाही, तर अडी-अडचणीलादेखील हक्काने त्यांच्या मागे उभा असतो.. कित्येक असे प्रश्न असतात जे आपले आई-वडील, नातेवाईक समजून घेऊ शकतीलच असं नाही, त्यासाठी मित्रच हवेत.. ते त्यांना लाभलेले असतात.. त्यांची मैत्री चिरकाल टीको, ही माझी मनापासूनची सदिच्छा.. अजून कोणतातरी असाच एखादा दिवस मला कदाचित फॅड वाटेलदेखील, पण मनातला हळवा कोपरा ज्या मैत्रीसाठी आसूसलेलाच राहिला, त्यासाठी ’मैत्री दिवस’ माझ्यासाठी तरी फॅड नाही! Cheers to the spirit of friendship!

5 comments:

mugdha said...

:)
happy friendship day!!

Bhagyashree said...

wah mast lihlays.. !

Deep said...

Hmmm touchy post! maitree hote ti tasheech tikun trahate hi kadhee naahi rahat pan mhnun jo kshan aahe to aanadaat ghaalwnyaat majja aahe.

Good one!!

Anonymous said...

खूप सुंदर लिहिलं आहेस ...आणि अगदी माझ्या मनातलंच लिहिलं आहेस ! माझ्या बाबतीतही असंच घडत आलं आहे. भांडणं नाही झाली तरी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे बंध मागे सुटतच गेले. आता वाईट वाटते त्या बद्दल पण वास्तवाचा स्वीकार मी ही केला आहे.
-अश्विनी.
ता.क. : पुण्यात आल्यावर तुला एकदा भेटले पाहिजे ( अर्थात मैत्रीच्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊनच -:) )

Himani said...

तुझा लेख वाचला. खुपच मनापासून लिहिला आहेस असा वाटत आहे. खुप छान लिहिला आहेस. पण काही मतांशी मी सहमत नाही.
शेजारी आणि मित्र यांच्या बाबतीत अगदी खरा लिहिलं आहेस. मी मग स्वतःला भाग्यवान समजीन.

एकदा तुकडा पडला की जोडता येत नाही असा काही नाही ग. प्रयत्न केला तर का शक्य नाही? माझा अनुभव आहे कि जर मैत्री पक्की असेल तर तेही शक्य आहे. थोड्या गैरसमजा साठी मैत्री सारखी मौल्यवान गोष्ट का गमवावी? ती खुणगाठ सोडून तर बघ.

वयाच्या ह्या टप्प्यात म्हणजे काय? मैत्रीला वय नसत ग!! अजूनही चांगले मित्र होऊ शकतात.
उत्स्फूर्त प्रतिसादा बद्दल पण बरोबर आहे...........पण मग आपण हा प्रतिसाद देऊ शकतो का? कदाचित त्या व्यक्तीला सुधा असच वाटत असेल. कोणी विचारल आहे?