April 2, 2009

फिटींग!

मचे ’हे’ अलिकडे कपडे शिवून घेत नाहीत.. नाही, शिंप्याचं नाव अली नाहीये, अलिकडे म्हणजे आताशा हे कपडे शिवून घेत नाहीत, सरळ विकतच घेतात.. इतके मॉल्स शहरभर उभे राहिल्यानंतर आणि त्यांच्याकडे अक्षरश: हजारो तयार कपडे तयार असताना कपडे शिवून घ्यायचे म्हणजे अंमळ औट ऑफ फ्यॅशनच! त्यातून, आजकाल पॅकेजिंग आणि ब्रँडींगला किती महत्त्व आलंय, ठाऊकाय ना? कपड्याच्या लेबलवरून माणसाच्या स्टेटसचा अंदाज घेतात आजकाल, आहात कुठे? तात्पर्य काय, की सध्या ह्यांची कपडे खरेदी मॉल्समध्ये होते.. आणि ती आमच्या- म्हणजे मी आणि आमच्या संसारवेलीवरच्या गोमट्या फुलाच्या दृष्टीने प्रचंड कंटाळवाणी असते.. कंटाळवाणी का? कारण शर्टाची खरेदी त्या मानाने पटकन उरकते.. मापाप्रमाणे शर्टांचे ढीग असतात, त्यातले आवडतील ते घ्यायचे. पण पँट खरेदी होईस्तोवर आमची जांभया देऊदेऊन तोंड फाटायची वेळ येते.

पहिली गोष्ट म्हणजे पँट घ्यायची, म्हणजे पोटाचे माप उघड उघड तिथल्या ’हेल्पर’ला सांगायचे! हे माप दर सहा महिन्याने वाढत असल्याने, ते असं उघड बोलायची वाटते लाज. त्यामुळे तो तत्परतेने पुढे आला, तरी त्याला ’मी बघतो’ असं मारे तोर्‍यात त्याला सांगितलं जातं. ’मी जाड झालेलो नाहीये’ हे पटवण्यासाठी जुन्या मापाची एक पँट ट्रायलसाठी म्हणून हे ट्रायल रूममध्ये घेऊन जातात. आत गेलं की, आधी पायातले बूट काढायचे, मग अंगावरची पँट उतरवायची. मग ही नवी घालायचा प्रयत्न करायचा. ती होत नाही. मग चरफडत ती उतरवायची. पुन्हा लाजेकाजेखातर जुनी पँट चढवायची. बूटात पाय सरकवायचे. उगाचच गोंधळलेला चेहरा- की घरी आहेत त्या या मापाच्या पँट तर मला होत आहेत, हीच कशी होत नाही बरं?- असा करून बाहेर यायचे. मग नवीन (मोठ्या) मापाच्या ढीगाकडे वळायचे. त्यातली एक घ्यायची. पुन्हा ट्रायल रूममध्ये हे सगळं करायचं. ती मात्र पहिलीच्या मानाने फिट्ट होते. मग ’अरेच्च्या, मला आता हे माप लागतं? काहीतरी घोळ आहे ह्यांच्याच मापात’ असं त्या विदेशी, बड्या, जिच्यामागे हे स्वत:च धावत आलेत त्या कंपनीचं माप काढायचं. मग एकूणच या कंपनीबद्दल मन थोडं कलुषित होतं- कारण ती कंपनी ह्यांना जाड ठरवते. म्हणून हे दुसर्‍या कंपनीकडे वळतात.

दुसर्‍या कंपनीच्या पँट ट्राय करताना, हेच सगळं घडतं. आधी जुनं माप, मग नवीन माप. किती वेळा ट्रायल रूममध्ये जायचं, पँट बदलायच्या.. देवा! आणि मी आणि आमच्या मुलाने काय करायचं या वेळात? तर हे बाहेर कधी येतात याची वाट पहायची. बर्‍याचदा तर ट्रायल रूमसाठीही नंबर असतात. तेव्हा तर आमची तोंडं बघण्यालायक असतात. बरं, ’तुमचं चालूदे, मीही माझ्यासाठी काहीतरी बघते’ असं म्हटलेलंही खपत नाही. ’नाही, तू थांब, सीलेक्शनसाठी’. मग काय, एक कोपरा गाठून मी येणारेजाणारे निरखत बसते. लेक मात्र भयंकर कंटाळतो.. ’आई, मी काय करू?’, ’बाबांना इतका वेळ का लागतोय?’, ’मी तिकडे एक चक्कर मारून येतो’, ’आई, भूक’, ’कंटाळा आला’ हे आळीपाळीने माझ्या कानावर आदळत रहातात. मी ’हो रे, झालंच हां’ असं काहीतरी बडबडत त्याला धीर देते. एकदा तर तो इतका वैतागला की बाबांना म्हणाला, ’बाबा, तुम्ही तिकडे जाऊन काय करता? मलाही आत यायचंय’. हे ऐकून मला इतकं हसायला आलं आणि बाबांनाही, की ते खरंच घेऊन गेले त्याला ट्रायलरूममध्ये! बाबा काही भारी करत नाहीयेत हे पाहिल्यावरच त्याचं कुतुहल शमलं.

तर अश्या रीतीनी कंपनी कोणतीही असो, माप वाढीवच आहे अशी एकदाची यांची समजूत पटते. मग निवड. नेमके यांना आवडलेले रंग त्यांच्या मापात नसतात. जे असतात, ते यांच्याकडे आधीच असतात. (मुळात पुरुषांच्या कपड्यात रंग असतात तरी किती???) मग पुन्हा तिसरी कंपनी. आताशा कापडातही पन्नास प्रकार आलेत असं कंपन्यांचं म्हणणं हं. ’चिनोज’, ’अँटी रिंकल’, ’कूल फॅब्रिक’, ’टेरिकॉट्स’ वगैरे वगैरे.. मग ही घेऊ? का ती बरी? वगैरेत वेळ जातो.. सुरकुत्या न पडणारं ’कॉटन’ कसं काय बरं असू शकतं हे मला कळलेलच नाहीये.. माझा समज की चुरगाळलं की सुरकुत्या पडणार ही तर कॉटनची खासीयत.. पण विदेशी कंपन्यांचं कॉटन असेल बाई अँटी रिंकल असं म्हणून मी पुन्हा विघ्न आणत नाही. अश्या रीतीने बराच उहापोह झाला की एकदाची पसंती होते. मग पुन्हा एकदा खात्री म्हणून अजून एकदा ट्रायल रूम गाठून प्रत्यक्ष चाचणी होते, आणि माल पक्का केला जातो.

किंमत मी विचारतच नाही. (म्हणजे ह्यांनी घेतलेल्या कपड्यांची पहात नाही.. ढीगातल्या कपड्यांची हळूच पाहून घेते.) ती बघून माझे डोळे पांढरे होऊन, मला चक्कर येऊन मी पूर्ववत झाले की मगच हे ट्रायल रूम्मधून अवतीर्ण होतात. माझ्या एका आख्ख्या पूर्ण सहावारी, पार्टी वेअर साडीची, जी मी किमान दहा वर्ष तरी वापरू शकेन जी किंमत असते, ती यांच्या एका य:कश्चित दुटांगी वस्त्राची असते!!! एक तर हे सर्रास ती पँट वापरणार.. माझी साडी मी जपूनजपून वर्षातून एखाददोनदा वापरते.. परत ही मोलामहागाची पँट त्यांना कितीशी वर्ष होणार? एक? फारतर दोन.. तरी त्याला चार आकड्यात पैसे मोजायचे?? नाही, नकोच ते.. असले विचार करून माझं बीपी वाढतं, आणि ’शेवटी तू टीपीकल मध्यमवर्गीय वातावरणातून बाहेर कधी येणार???’ असा कटाक्ष तेवढा मिळतो मला.. त्यापेक्षा जाऊचदेना.. मी किंमत विचारत नाही. मन शांत करण्यासाठी मॉलमधल्या इतर विभागांना (नुसतीच) भेट देऊन येते.. इतकी महाग खरेदी झाल्यानंतर अजून काय विकत घ्यायची माझी टाप?

कथा इथे संपत नाही. या विकतच्या पँटना खालून शिवणी नसतात. त्या घालणार्‍याच्या उंचीप्रमाणे नंतर मारून घ्यायच्या. त्यासाठी कपडे आल्टर करणारा ’स्पेशालिस्ट’ शोधायला लागतो. घराच्या आसपास जे असतात, त्यांच्या टपर्‍या छोट्या.. ते हे कपडे खराब करतील, म्हणून त्यांच्याकडे टाकायचे नसतात ह्यांना. त्यांना लांब गावातल्या लोकांकडेच जायचं असतं, पण वेळ कोणाला असतो? या शनिवारी, पुढच्या शनिवारी करत करत किमान दोन महिने उलटल्यानंतर तो मुहूर्त लागतो.. मी दरम्यानच्या काळात ह्यांचं ह्यांच्याच नकळत डायट फूड सुरू करते.. त्या नव्या पँट घालण्यायोग्य होईपर्यंत पुन्हा न घालण्यायोग्य व्हायच्या आणि पुन्हा आम्हाला मॉलवारी करावी लागायची, या भीतीने!

10 comments:

Unknown said...

khupach chhan aahe lekh... anubhavach 'fitting' agadi fitt baslay lekhat...

Mastach lekh. :-)

सर्किट said...

हा..हा..हा.. मस्तच!

पुलं नी बायकांच्या कापडखरेदीविषयी लिहीलेलं कायम पटत आलं. पण पुरूषांची कापडखरेदी बायकांना बोअरिंग होत असेल असं वाटलंच नव्हतं कधी!

खूप दिवसांनी लिहीलंत. लिहीत रहा. मराठी ब्लॉगविश्वावर सध्या सगळंच उबगवाणं झालंय जुने ब्लॉगर नाहीत तर.

Ulhas said...

khupach chhan

Anonymous said...

नमस्कार,
तसा आपला परिचय नाही पण मी तुमचा ब्लॉग आधून मधून वाचतो.
तुमच लिखाण खूप छान आहे,
आणि तुमचे निरीक्षण सुद्धा तुमचे हे लिखाण पु. ल. ची आठवण करून देणारे आहे.

पूनम छत्रे said...

पल्लवी, सर्किट, उल्हास आणि अनामिक, धन्यवाद :)

पल्लवी, स्वानुभवच आहे ;)

सर्किट, हो, खूप दिवसांनी लिहिलं.. सुचतं बरंच काही, पण लिहायला लागले की बंडल वाटायला लागतं! :)

अनामिक, तुमचं नाव कळलं असतं तर बरं झालं असतं, पोस्टखाली नाव लिहिणार का? खूपच मोठी पावती दिलीत तुम्ही.. पुन्हा एक्दा धन्यवाद!

Dk said...

hehe good one!!

manaatlya manaat milya la shaabaaski! (asa ha ekch virla maanus mi paahaatoy jo aaplya khereddee saathee evdha vel laavto!) :D :D

विद्या said...

हो हे वर्णन अगदी खरे आहे. खर म्ह्नणजे उगीचच बायकाना ह्या बाबतित बदनाम केले जाते की साडी घ्यायला खुप वेळ लावतात आणि महागड्या साड्या घेतात पण पुरुषही ह्या बाबतित कमी नाहि, पण आजपावेतो त्यान्च्यावर अस कुणी लेखन केले नाहि. एक नविन विषय हाताळ्ला आहे, खुपच छान लेख..!

Anonymous said...

tumache likhan agadi mast aahe/aste..tevva lihit raha..khup diwasanantr wachtoy tumhi lihilela..
swapnil

Nash said...

हे सही आहे!! मस्त लिहिलंय आणि निरिक्षणही मस्त!!

Mahendra said...

अहो...
हे काय हलकं फुलकं लेखन आहे कां? हे तर लै भारी..

अगदी अस्संच होतं बघा माझ्या बाबतित पण. वाचतांना मला वाटलं कदाचित तुम्ही मला पाहिलं तर नाही ना दुकानात पॅंट घेतांना?
मस्तंच आहे पोस्ट. मनापासुन आवडलं..