February 12, 2009

'होम मिनिस्टर' नंतर..

'बाळे चाळी'मधल्या त्या दोन रूम पाहुण्यांनी खचाखच भरल्या होत्या.. बाहेरच्या गॅलरीतही लोक चहा पीत उभे होते. आतबाहेर करून, सगळ्यांचं चहा-पाणी नीट होतंय ना हे बघता बघता सीमाची कोण धावपळ चालू होती.. रात्र व्हायला लागली, तसे हळूहळू एकएक जण गेले, तरी घरात चिकार मंडळी होती. पण सगळ्यांनाच थोडा मोकळेपणा आला..

बाहेरच्या रूममध्ये सगळे जागा मिळेल तिथं कोंडाळं करून बसले.सीमाच्या नणंदेनी तिला हाक मारली, "वैनी, अगं ये की, बस तरी दोन मिनिट.."
"आले, आले" म्हणत सीमाही टेकली.
"बघू तरी वैनीबाईंची पैठणी..."
सीमा मनातून हरखली. तिनेही तिच्या नव्या कोर‍या पैठणीवरून हळूच हात फिरवला..
आज संध्याकाळीच तिने 'होम मिनिस्टर'मधे पैठणी जिंकली होती.. ते क्षण तिच्या डोळ्यापुढे झरझर सरकायला लागले... तिने नवर‍याच्या मोबाईलवरून सहज म्हणून होम मिनिस्टरला फोन केला काय, आणि आठच दिवसात होम मिनिस्टर घरी येणार म्हणून उलट फोन आला काय! आधी तर विश्वासच बसला नाही, पण नंतर जाम तारांबळ उडाली.. नवरा जरासा रागावलाही होता, दोघांनाही नोकरीचा एक दिवस बुडवावा लागणार होता.. आणि आज तर- सकाळपासून नातेवाईक, चाळवाले, कल्ला करून होते. पलिकडच्या चाळीमधल्या शेवाळे वहिनींबरोबर तिची स्पर्धा होती. प्रत्यक्ष आदेशभाऊजी दिसल्यानंतर सगळेच खुश झाले, अगदी नवराही. तिला तर काय बोलू, कसं बोलू असं होत होतं.. घरात काही खेळ झाले, त्यात तिला फक्त दोनशे रुपये बक्षिस मिळालं, घरच्यांची कसलीच मदत तिला नाही झाली, नवर‍याचीही, याचा तिला मनातून खरंतर रागच आला होता.. पण पैठणीच्या खेळात मात्र तिने बाजी मारली. खेळ सोप्पाच होता.. मोगर‍याची फुलं होती, ती ओवून गजरा करायचा होता. हा तर तिच्या डाव्या हातचा मळ. एका मिनिटातच तिने पैठणी पटकावली.

ती जिंकली आणि एकच जल्लोष झाला सगळीकडे. नवर‍यानी चक्क उचलून घेतलं, सासूबाई आणि नणंदेनी ओवाळलं, चाळीमधल्या, कारखान्यातल्या मैत्रिणींनी कौतुक केलं.. त्या सगळ्यांचं चहापाणीच बघत होती आतापर्यंत. चहा आणि एक एक वडा दिला सगळ्यांना.. आदेशभाऊजींनाही तेच दिलं. चांगले होते बिचारे. खेळात मिळालेले दोनशे रुपये नक्कीच या खर्चापायी गेले असं वाटून मनात हिरमुसली जराशी ती..

"छानच आहे ना पैठणी.." नणंदही त्यावरून हात फिरवत, काहीश्या हेव्यानेच म्हणाली. "बदलायची नाही का? झाली मिरवून बरीच.."
हे नणंदेचं लागट बोलणं नेहेमीचच होतं. आज मात्र सीमानेही उत्तर द्यायचं ठरवलं, "काय बोलू आता आक्का? अहो, बघताय ना.. आत्तापर्यंत चहा-पाणी झालं, आता जेवणाची तयारी, घरात-बाहेर माणसं- साडी बदलू तरी कुठे? मघाशीही शेजारी मोरे वहिनींकडे जाऊनच पैठणी नेसून आले.. आता रोजची साडी नेसायलाही त्यांच्याकडेच जाऊ म्हणता?"
नणंद जरा वरमली, "तसं नाही, नवी कोरी पैठणी खराब होईल ना, म्हणून म्हटले.. माझं काय, रात्रभर का नेसेनास?"
"बदलते बदलते.. तेवढ्यात कूकरच्या शिट्ट्या झाल्या तर गॅस तेवढा बंद करा.." सीमा बाथरूममध्ये शिरली..

थोड्या वेळाने जेवायला पुरुष मंडळी बसली आधी. अर्थात, विषय तोच होता.. नव-‍याचे दोन मित्रही होते..
"काही म्हण सु-या.. पण वहिनींना उखाणा घ्यायची तरी प्रॅक्टीस द्यायची राव, तसे आठ दिवस होते मधे..."
सीमाला उखाणा घेता आला नव्हता.. त्याला उद्देशून होतं हे..
सासूनेही री ओढली, "तर काय गं सीमे.. एरवी इतकी चुरुचुरु बोलत असतेस, तुला साधं नाव घेता येईना, हो?"
सीमा गोरीमोरी झाली, "अहो, काय करू? ते मला असे कायकाय प्रश्न विचारत होते, की मी गांगरलेच.. काही सुचेनाच बघा.. त्यात शब्द काय तर 'खडीसाखर'!! मला तर जुळवायलापण सुचलं नाही काही.. म्हणून राहिलं.."
"त्यात काय वहिनी.. घ्यायचं नाव- ’आवडतो मला खडीसाखर आणि पेढा आणि सुर‍या झाला माझ्यासाठी वेडा’.." एक मित्र बोलला... हास्याचा एकच फवारा उडला.. सीमा झक्क लाजली.. पण सुरेशचा चेहरा जरासा आखडलेलाच..
"तू काय आणि सगळ्यांसमोर मला सुमोचा ड्रायव्हर बोलली.. 'आपली सुमो आहे' इतकंच बोलायचं असतं, कळत नाही काही तुला.."
"त्यात चूक बोलली का काही पण? ड्रायव्हर तर ड्रायव्हर.. लपवायचं काय? सगळ्यांना माहीते तुम्ही सुमो चालवता ते.." सीमाने झटकून टाकले.."काही सांगू नका आणि.. तुम्हाला पापडाचा डबा तरी कुठे मिळाला? सारखे पापड मागत असता खायला.. पण डबा नाही आणलात.. माझे शंभर रुपये बुडाले, त्याचं काय?" सीमाच्या तोफगोळ्यापुढे सुरेशही गप्प बसला..

कारण त्या धावपळीमध्ये त्यालाही गडबडल्यासारखेच झाले होते.. त्यातून तो बांदेकर तिकडून सारखे उलट आकडे मोजत होतात.. सीमापण काहीबाही बडबडली होती- तो ड्रायव्हर होता, तापट होता, फिरायला नेत नाही कुठे- अरे जमत नसेल, म्हणून कॅमे-‍यासमोर बोलायचं का? तो बांदेकर लागला लगेच पिळायला.. 'लवकर घरी येईन, फिरायला नेईन' असं कबूल करून घेतलं! आयला, असं फिरायला म्हणून लवकर आलं तर ड्यूटी कोण करणार? पैसा कोण देणार? लांबलांबच्या ट्रिपा मारल्या, सलग ड्रायव्हिंग केलं तर पैसे भेटतात जराजरा.. आये आजारी असतेय, पोरांचे खर्च, एक आहे का? याचं काय जातंय बोलायला? सीमीला काय माहीत नाही का हे सगळं? उगाच कायच्याकाय बडबडायचं!

त्याचा उतरलेला चेहरा पाहून सीमाला कसंतरीच झालं.. उगाच जगासमोर रडगाणी गायली की काय असं वाटायला लागलं.. पण आदेशभाऊजींनी "हे वेळ देतात का घरात?" असं विचारल्याबरोब्बर मनातलं बाहेर पडलंच सगळं.. दिवसरात्र घरी नाहीत हे.. नाईटला जातात, तर घरी येईपर्यंत लक्ष लागत नाही कुठे.. परत मित्र हे असे टवाळखोर.. तरी बरं, दारूबिरूच्या नादी अजून तरी लागले नाहीयेत.. पोरं लहान, म्हातारी बघते, म्हणून नोकरी तरी करता येते.. नायतर ह्यांच्या एकट्याच्या कमाईत काय भागतंय? पण यासगळ्यात मन मारावंच लागतंय, फिरणं, सिनेमा, हॉटेल.. काहीच नाही करता येत.. सगळा वेळ धबडग्यातच जातो.. मग कोणीतरी विचारलं की असं बोलून टाकायला होतंय..

इतक्यात नणंदेच्या मुलीने विषय काढला, "मामी ते तू काय करत होतीस गं? हात लांब करून?"
सगळेच हसायला लागले.. सिनेमाच्या नावांचा अभिनय करायचा होता.. आधी सिनेमा, त्यातून अभिनय! सगळाच खडखडाट!! काय तरी सिनेमे आणि- गाढवाचं लग्न, लेक चालली सासरला, मुंगी उडाली आकाशी, इश्श्य आणि काय बरं, हां- एक डाव धोबीपछाड! यात कशाचा अभिनय करायचा? आणि ओळखणारेही सगळे एकसे एक! सीमाला नीट काही करता येत नव्हतं, त्यात ती जे करत होती, ते त्यांना समजत नव्हतं.. हां, 'इश्श्य'चा मुरका मात्र झ्याक मारला तिने.. पण तोही सासूने ओळखला! सुरेश नुसताच बघत बसला होता! आठवूनही हसू आलं तिला..

"अगं ते नव्हतं का.. मुंगी ऊडाली आकाशी- मी आकाशात उडण्याचा अभिनय करत होते.." ती हसतच म्हणाली..
"असंय होय.. मी म्हटलं ही अचानक हातवारे काय करायला लागलीये आणि.." सुरेशही तिची मस्करी करायला लागला..
"वैनी, मग गाढवाचं लग्न दाखवताना सु-‍याकडे का नाही बोट केलंस? आम्ही लग्गेच ओळखलं असतं.." "ए, माज्या लेकाला बोलायचं नाही हा काही.." सीमाच्या सासूने लेकाची बाजू घेतली..एकूण वातावरण मोकळं झालं थोडं..

बाहेरची पंगत आटोपल्यावर आत सीमा, तिची सासू, नणंद आणि तिची मुलगी असे जेवायला बसले. नणंद कधीपासून याच संधीची वाट पहात होती.. हळूच ती म्हणाली,"वैनी, आता पुढे काय करणार पैठणीचं?"
पुढे काय म्हणजे? सीमाला नणंदेचा रोखच समजला नाही.. "म्हणजे?"
"अगं म्हणजे, पैठणीची काय निगा राखावी लागते, ठाऊके ना? बयो, मोलामहागाची साडी ही.. जपून ठेवावी लागती.. ब्लाऊजला अस्तर लागतंय, शिवाय घरी धुता येत नाही.. ड्रायक्लीन करावी लागती- अन त्याला बरेच पैसे पडतात.. इस्त्री पाहिजे नेहेमी.."
सीमा विचारात पडली, "हो की.. मी विचारच नव्हता केला.."
"तेच म्हणतेय मी.. पैठणी मिळवलीस खरी- नाही, त्याबद्दल कौतुकच आहे, पण ती आता टिकवायलाही हवीये.."
सीमाच्या डोळ्यासमोर त्या पैठणीचे खर्च उभे राहिले.. अस्तर, नेट, इस्त्री, ड्रायक्लीन.. एका साडीमागे एवढा खर्च! पण काही म्हणा, तिने ती पटकावलेली होती, तिचं बक्षिस होतं ते.. ती नाहीतर बाजारात जाऊन कधी पैठणी घेणार होती? पण हा पांढरा हत्ती सांभाळावा तरी कसा? कसेबसे पैसे पुरत होते.. त्यात आजच्यासारखं जेवण-बिवण घालायचं, सणवार, मुलांचे खर्च- सीमाच्या डोळ्यापुढे खर्चाचे आकडे फेर धरून नाचायला लागले..नणंद हे सगळं हेरत होतीच.. तिने आपलं घोडं दामटवलं पुढे..
"मी काय म्हणते वैनी, माझ्या घरी आता बरेच कार्यक्रम आहेत.. मोठ्या दीराकडे लग्न आहे, झालंच तर अजून एका पुतण्याच्या बायकोला सातवा चालू आहे.. ते बारसं असेलच.. तर मी नेऊ का ही पैठणी?"
सीमा डोळे मोठे करून तिच्याकडे पहायला लागली, "अहो.. पण.."
"सीमे, दे की आक्कीला.. तू तरी कुठे मिरवणार आहेस? कार्यात कोरी साडी उठून दिसती.." सासूने लेकीची री ओढली.
"आणि मी तरी नेहेमीसाठी कुठे मागत्ये? दोनचार वेळा नेसायला दे म्हटलं.. कार्यात नेसेन, आणि ड्रायक्लीन करून पुन्हा नव्यासारखी करून आणून देईन बघ.."

सीमा यावर काही विचार करणार, बोलणार इतक्यात सुरेश आत आला.."तुम्ही आजून पैठणीतच का? बास करा आता, संपवा ते.. सीमे, डबा करून दे उद्यासाठी. आत्ताच फोन आला होता.. शिर्डीला निघायचंय अर्जन्ट.. अर्ध्या तासात पोचायचंय पार्टीकडे.. उद्या परत येईन.."
"अहो पण, तुम्ही इतके दमलेले.. आज या गडबडीत झोप नाही झाली, की विश्रांती.."
"च्च! झोप काय, काढीन उद्या गाडीत. तसेही आजचे पैसे बुडले, आत्ता ड्यूटी मिळतेय तर खोटी करू नकोस. डबा दे चटकन.." असं म्हणत तो आंघोळीला गेलाही..

सीमाचं तोंड उतरलं.. सकाळपासून वाटणारा आनंद, उत्साह, पैठणी जिंकल्याचे क्षण या जणू स्वप्नातल्या दुनियेतून खाडकन प्रखर वास्तवात आली ती. 'होम मिनिस्टर' बनून काय तीर मारले? काय वाटलं, टीव्हीवर आलं की सगळ्यांची तोंडं बंद होतील? उलट घरातले जास्तच बोलतायेत- कोणी चिडवतायेत, कोणी हेवा करतायेत.. कोणी आडून, कोणी समोर.. कसली पैठणी अन काय! ती गंमत, तो आनंद तेवढ्यापुरताच.. आपल्यासारखी हातातोंडाची गाठ असलेल्यांसाठी असली थेरं काय कामाची? जी पैठणी मिळाली, त्यावर नणंदेचा डोळा, ते पैसे मिळाले, ते खातीरदारीत गेले.. नवरा करवादलाय, पोरं झोपेला आलीत, कामाचा हा ढीग पडलाय.. दोन घटकेची विश्रांती आणि चार घटकेची विकतची उस्तवार!

जाऊदे, पैठणी असो कोणाला लखलाभ, पण आपल्याला ही साधी साडीच बरी असं मनात म्हणत, एक सुस्कारा टाकत सीमाने देवाला नमस्कार केला. नेहेमीप्रमाणेच नव-याला, पोरांना उदंड आयुष्याचं दान मागितलं आणि आजचं सगळं विसरायचं असं मनाला बजावलं. मग तिने नुकत्याच घडी केलेल्या पैठणीवरून हात फिरवला, तिला एकदा डोळेभरून मनात साठवली आणि पिशवीत भरली. ती पिशवी तिने नणंदेच्या सामानाशेजारी ठेवली आणि आत येऊन डबे धुंडाळू लागली. पीठ संपत आलं होतं आणि उद्या कारखान्यातून येताना भाजी आणायलाच हवी होती...

समाप्त.
(टीप: संपूर्णपणे काल्पनिक)

12 comments:

Anonymous said...

अप्रतिम.

Anonymous said...

Kautuk karayala shabd nahit........

Vidya Bhutkar said...

Woww....very well written and very realistic. But kinda feel sad for Seema. :-(
-Vidya.

निल्या said...

कथा काल्पनिक आहे की अनुभवलेली. काही का असेना जबर आहे. खूप मस्त.

Anonymous said...

katha kalpana hi sundar aahe ani lihiley pan mast...

aaj ch pahila tumcha blog...asech lihit raha..

केदार जोशी said...

क्या बात है!. तुझ्या सर्व कथेत ही सर्वात जास्त आवडली. भिडली. बरं झाल तू इतके दिवस काही लिहीले नाहीस ते. जियो. भेटल्यावर खास ह्या कथेसाठी काहीही माग. नेहमीचेच संवाद, पण गुंफन जमून आलीये.

त्या आदेशला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच. मी देखील तो कार्यक्रम पाहतो. ज्यांना पैठनी घेणे शक्य आहे व नाही त्या दोघांच्याही चेहर्‍यावरचा आनंद पाहल्यावर काय फिलींग येते ते सांगता येत नाही.

Monsieur K said...

absolutely fantastic!! ekdam mast lihili aahe kathaa... at the end, one does feel sorry for Seema :(
c'est la vie...

Sachin said...

Very nicely written. I like your style. I felt like the scene has come alive while reading your story.

zelam said...

पूनम भिडली गं कथा एकदम.
प्रसंग छान रंगवलायस.

झेलम

Anonymous said...

सुंदर!

Dipali said...

मायबोलीवरुन नेहमीच तुमच्या कथा मी वाचते...छान लिहिता तुम्ही...मी माझा ब्लॉग नवीन च चालु केला आहे..तुम्हांला follow करत आहे..धन्यवाद...

Unknown said...

mi pahilyandach marathi blog la bhet det ahe ani tyatli tuzi pahilich katha vachali, khupach chhan lihtes.