October 30, 2008

नवर्‍याचं आडनाव!

"जी, तुझं नाव काय?"
"माझं? का रे?" कौतुकानी नातवाला जवळ घेत आजीनी विचारलं.
संध्याकाळची जेवण्याआधीची वेळ होती, सगळे घरी होते, थोडा निवांतपणा अनुभवत.. अर्णवचा अचानक प्रश्न ऐकून सगळ्यांनाच कुतुहल वाटलं..
"सांग ना आधी.."
"बरं बाबा, माझं नाव कुसुम.."
"आणि आडनाव?"
"आडनाव? जे तुझं आहे तेच.. तुझं काय आहे आडनाव, सांग बरं?"
"अं? माझं आडनाव आहे.." अर्णव आठवत म्हणाला, "अर्णव महेश दैठणकर."
"अगंबाई, एवढं सगळं आडनाव आहे?" आजी हसत म्हणाली.. "तुझं फक्त आडनाव आहे ’दैठणकर.’ माझंही तेच आहे.. कुमुद दैठणकर."अर्णवचं समाधान झालं.

आता त्याने अजोबांकडे मोर्चा वळवला. त्यांच्या मांडीवर चढत तो म्हणाला, "आजोबा, तुमचं नाव काय आहे?"
"आजोबा!" आजोबा गंमतीनी म्हणाले.
"असं काय हो आजोबा? ’आजोबा’ काय नाव असतं? तुमचं नाव आहे ’काशीनाथ आजोबा’. मला माहीत आहे, आईनी सांगितलंय.."
"बरोब्बर, माझं नाव आहे काशीनाथ कमलाकर दैठणकर."
आजोबांच्या मोठ्ठ्या नावानी अर्णवचं समाधान झालं. आता बाबा."बाबा, तुमचं?"
महेशला त्याच्या पेपरवाचनात मुळीच खंड नको होता, त्याने चटकन उत्तर दिलं, "महेश काशीनाथ दैठणकर’ आणि पेपरात डोकं खुपसलं..

अर्णवला खूपच आनंद झाला! "आजी बघ ना, आपल्याकडे सगळेच दैठणकर. आपण एक फॅमिली आहोत ना, म्हणून!" आजी नातवाकडे पाहून कौतुकानी हसली खरी, पण तिने सूनेकडे एक कटाक्ष टाकलाच. मनातल्या मनात म्हणाली, ’सगळे कुठे दैठणकर बाबा? आईला विचार तुझ्या..’

आणि आईचा नंबर आलाच.. "आई, तुझं नाव काय आहे?"मधुच्या हातात तिची कामाची डायरी होती आणि ती पुढच्या तारखा बघत कसल्याश्या नोंदी करत होती. तिचं या सगळ्या बोलण्याकडे संपूर्ण लक्ष नव्हतं. अर्णवचा प्रश्न ऐकताच ती चटकन सवयीनी म्हणून गेली, "मधुमिता औरंगाबादकर."

अं? हे कसलं नाव? अर्णवला एकदम रागच आला. गाल फुगवून तो म्हणाला,"ए असं कसं गं आई? हे असं कसं नाव गं तुझं? आपण एक फॅमिली आहोत ना? आणि एका फॅमिलीमधल्या लोकांचं एकच ’सरनेम’ असतं असं प्राचीटीचरनी सांगितलंय आम्हाला." आईचं वेगळंच आडनाव ऐकून पावणेतीन वर्षाच्या अर्णवला प्रचंड इन्सेक्यूरीटी वाटायला लागली.. तो जवळजवळ रडकुंडीला आला.

आता कुठे मधुचं नीट लक्ष गेलं लेकाकडे. आणि बाकीच्यांचे डोळे तिच्यावर रोखले गेले. एरवी या बाबतीत ठाम असणारी मधु स्वत:च्या लाडक्या लेकाला कसं समजावते याची उत्सुकता सगळ्यांच्याच चेहर्‍यावर होती. आजी-आजोबा ’बरी खोड मोडली, बघू तरी काय सांगते याला.. इतकी वर्ष सांगून थकलो, पण ही आजकालची मुलं ऐकतात कुठे? कसलीतरी फॅडं एकएक.. पैसे कमावतात म्हणजे हातच स्वर्गाला टेकले जणू..’ असे सगळे भाव घेऊन सूनेचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागले, तर महेश नेहेमीप्रमाणे, ’झालं यांचं सुरु’ असा टीपीकल चेहरा करून..

मधुमिता एक कर्तबगार, स्वत:च्या पायार उभी असलेली उद्योजिका होती. आणि तिला या गोष्टीचा रास्त अभिमान होता. तिच्या आई-वडीलांचा एका पापडाच्या कारखान्याला पापड पुरवण्याचा उद्योग होता. त्यांच्याकडे आजूबाजूच्या आठ-दहा बायका पापड लाटायला यायच्या. मधु हा उद्योग बघताबघताच मोठी झाली, आणि तिने हाच उद्योग पुढे न्यायचं तिने ठरवलं. तिच्या मोठ्या भावाला रीतसर नोकरी लागली होती आणि धाकटा अजून शिकत होता. वडीलांनी प्रोत्साहन दिले आणि बघता बघता दहाच्या जागी पन्नास बायका मधुकडे कामाला यायला लागल्या. उद्योग पापडांपुरता मर्यादित राहिला नाही, लोणची, चटण्या, सॉस, जॅमही तयार व्हायला लागले. मोठी जागा घेतली. लोकांच्या ’सगळं विकत’ घ्यायच्या वृत्तिमुळे हिच्या उद्योगाला भरभराट आली.

मधुच्या दोन्ही भावांनी या ’बायकांच्या’ कामातून अंग काढून घेतलं होतं..आई-वडीलांचं मार्गदर्शन होतंच, पण ते थकत चालले होते. मधु कारखान्याची सर्वेसर्वा झाली. वडीलांचा सल्ला ती घ्यायची, पण अंतिम निर्णय तिचा असायचा. व्यवसायाची नाडी तिला कळली होती, कारखान्यातल्या बायकांना तिला व्यवस्थित मॅनेज करता येत होतं. बायकांना सांभाळून घेणं, त्यांना अडीअडचणीला पैसे देणं, कारखान्याचे विविध परवाने काढणं, सरकारी अडथळे पूर्ण करणं, बँकेमधे क्रेडीट मागणं, बँक गॅरंटी वगैरे बघणं.. सगळं एकटीनीच करत होती. तिच्या कष्टांमुळे त्यांच्या उत्पादनाला निश्चित असं नाव आणि बाजारपेठ मिळायला लागली होती. त्यामुळे झालं काय होतं की स्वभाव जरा तडकफडक, ’मी म्हणेन ती पूर्व दिशा’ झाला होता. अश्यातच तसं ’लग्नाचं’ वय थोऽऽऽडं उलटून गेलं होतं.

महेशची वेगळीच त-र्हा! त्याच्या अंगी जात्याच कंटाळा ठासून भरला होता. एका जागेवरून कामाशिवाय उठायलाही त्याला आवडायचे नाही. मस्तपैकी बैठक जमवावी, पेपर नाहीतर कसलीशी अभ्यासाची पुस्तकं वाचावी ही आरामाची त्याची कल्पना. डोक्याला कोणत्याच गोष्टीचा ताप न करून घेणारा माणूस तो. शिकून, सवरून बँकेत लागला होता, त्या कामात त्याला गतिही होती, त्यामुळे पगार, बढती वगैरे बरं चाललं होतं. ’आपणही लग्न करावं, संसार थाटावा’ असं आतून त्याला काही वाटत नव्हतं, का कोण जाणे, कदाचित ’कुठे ती अजून एक कटकट’ असाही विचार असेल. त्याच्या आई-वडीलांनी त्याच्यापुढे हात टेकले. ’कंटाळा आला’ म्हणून मुलगी बघायलाही जायचे कष्ट घेत नसे तो. त्याचे लग्न कधीकाळी होईल, आपल्यालाही एखादं नातवंडं खेळवायला मिळेल अशी आशाच सोडली होती त्यांनी.

अश्या या चळवळ्या मधुची आणि शांत महेशची भेट महेशच्या बँकेतच झाली होती. मधुला व्यवसायासाठी कर्ज हवं होतं आणि महेश योगायोगानी तेव्हा तेच खातं बघत होता. मधुची तडफ, हुशारी, तिचं स्वयंपूर्ण असणं त्याला आवडलाच, आणि तो चक्क तिच्या प्रेमात पडला! मधुलाही हुशार आणि तंद्रिष्ट महेश आवडला. ’काम एके काम, बाकी सब आराम’ असा त्याचा खाक्या असल्यामुळे तो कशातच ढवळाढवळ करत नसे. मधुच्या मते ही महेशमधली अगदी ’न-नवरा’ अशी दुर्मिळ बाब होती. त्यामुळे महेशनी प्रेमातला ’प’ उच्चारायच्या आधीच तिने त्याला ’होकार’ देऊन टाकला. अर्थातच, लग्नाच्या तीन अटी होत्या:
१) ती तिचा व्यवसाय सोडणार नाही.
२) घरात स्वयंपाकाला बाई असेल, ती तिची तीच शोधेल, कारखान्याच्या निमित्ताने तिच्या अनेक बायका ओळखीच्या होत्या. (या अटीला सुरुवातीला सासूबाईंचा विरोध होता, पण अनायसे स्वयंपाकघरातून सुटका मिळतीये, तर का सोडा, असा विचार करून त्यांनी पटकन ’हो’ म्हणून टाकलं! ’ब्राम्हणाची बाई शक्य असेल तर बघ हो..’ अशी पुस्ती जोडायला मात्र त्या विसरल्या नाहीत!)
३) तिसर्‍या अटीने मात्र मिनी महाभारत घडवलं! तिची तिसरी अट होती- ती आपलं माहेरचंच आडनाव लग्नानंतरही लावेल!

यामागे तिची भूमिका अगदी सोपी होती- ’मधुमिता औरंगाबादकर’ हे नाव कितीही मोठं आणि लांबलचक असलं तरी आज या नावाला गृह उद्योगामधे वट होती. तिची एक ओळख ज्या नावानी सिद्ध झाली होती ते ’औरंगाबादकर’ नाव ती खचितच सोडणार नव्हती. बर, ’दैठणकर’ म्हणजेही दणदणीत आडनाव. ’मधुमिता औरंगाबादकर दैठणकर’ अशी लांबलचक नावाची आगगाडी म्हणेस्तोवर एखाद्याला धाप लागयची, म्हणून दोन आडनावं लावायची कल्पनाही सोडून द्यावी लागली. आणि मग शेवटी, ’राहूदे जे आहे तेच, तुला मी आवडते, का माझं आडनाव?’ अशी लाडीगोडी लावत तिने महेशलाही पटवले.

मात्र तिचे आई-वडील आणि सासू सासर्‍यांनी प्रचंड विरोध केला! आई तर तिचा निर्णय ऐकून हबकलीच! आधीच आपल्या मुलीचं लग्न होत नाही, त्यातून कसंबसं एक बरं स्थळ आपणहोऊन आलंय, तर लगेच लग्न करून टाकावं, अटी-बिटी कशाला? आणि अट ही ही असली? नाव न बदलण्याची? भलतंच! त्यांनी मधुला समजावायचा प्रयत्न केला, "मधु, सोने, अगं लोक काय म्हणतील? तुझे सासू-सासरे काय म्हणतील? अगं, मुलीच्या जातीनी जरा कलाकलाने घ्यायचं असतं सासरच्या लोकांच्या, उगाच त्यावरून त्यांचं बिनसायला नको बाई. ऐक माझं, नसते हट्ट करू नकोस!"

इकडे सासू-सासर्‍यांना एरवी मधुमितामधे नावं ठेवायला जागा सापडत नव्हती, ती या निमित्ताने मिळाली. यथेच्छ नाकं मुरडून, ’आमच्यावेळी असं नव्हतं बाई. ऐकावं ते एक एक नवीनच. नवर्‍याचं आडनाव लावणार नाही म्हणे. वर्षानुवर्ष ज्या रीतीभाती चालत आल्या आहेत त्यांना अजिबातच जुमानायचं नाही म्हणजे काय! आमच्या पूर्वजांनीही असं केलं असतं म्हणजे? कोण कोणची लेक आणि कोण कोणची सून हे कळलंच नसतं, यादवी माजली असती सगळी! आणि काय वाईट काय आहे आमचं आडनाव? चांगलं भारदस्त ’दैठणकर’ आहे म्हटलं.. त्यांच्या आडनावापेक्षा निश्चितच चांगलंय.. कसलं औरंगाबादकर अन काय! औरंगजेबाचं औरंगाबाद! आमचं आडनाव लावायला मुली पुढेपुढे येत होत्या, आता आमच्या महेशाला कोणी पसंत नाही पडली म्हणून.. नाहीतर एकापेक्षा एक स्थळं येत होती महेशाला.. हसत हसत कोणीही आमच्या महेशाचं आडनाव लावायला तयार झाली असती.. हिनं काय अशी जादू केली आमच्या गुणी मुलावर कोण जाणे! चार-सहा महिने झाले भेटून, पण आमचे सगळे संस्कार विसरला! ती नाचवतीये, हा नाचतोय! ते काही नाही, आमचं आडनाव लावलंच पाहिजे!" वगैरे म्हणून त्यांनी तिचं माहेरचंच नाव ठेवायला सक्त विरोध दर्शवला.

आईची ही सततची बडबड ऐकून महेश मात्र कंटाळला. त्याने शेवटी आईला सांगितले, "आई, जाऊदे ना.. तिला ते नाव ठेवायचं तर ठेवू दे ना.. काय फरक पडतो?"
"अरे, नाही कसं महेश? आज ती हे म्हणाली, तू लगेच ऐकलंस.. उद्या ती काहीही म्हणेल, तू लगेच ऐकणार का?"
"ते मला माहीत नाही आई. नाहीतर जाऊदे मग, मी लग्नच नाही करत. एका आडनावावरून काय वाद! लग्न केलं तर मधुशी तिच्या आडनावानीच करेन, नाहीतर जाऊचदे मग!"

मग मात्र त्याचे आई-बाबा चपापले. कसंही असो, पण महेशचं शेवटी लग्न होतंय ना, म्हणून चरफडत का होईना, त्यांनी तो निर्णय मान्य केला. पण जातायेता त्यावर टीप्पणी करायला ते विसरत नसत.

तिचं नाव कसं असावं हा चर्चा करण्याइतका मोठा प्रश्न का होतोय हे मधुला समजतच नव्हतं! शेकडो वर्ष बायका लग्नानंतर आडनाव बदलतात म्हणून तिनेही ते बदलायला हवं याला काही लॉजिकच नव्हतं. जर काही असलं तर ते समजावणारं कोणी नव्हतं! ती स्वत:ला ’विवाहीत’ म्हणवून घेत होती, नवर्‍याचं नाव कोणी विचारलं तर सांगत होती. तिचं नि तिच्या नवर्‍याचं आडनाव एकच नाहीये, याबद्दल अनेकांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया तिने अनुभवल्या होत्या, आणि तिला त्याची गंमतच वाटायची. अजून पर्यंत तरी कोणीही तिला पटेलसं कारण सांगू शकलं नव्हतं. जी काही थोडीफार स्थावर मालमत्ता तिची आणि महेशची होती, तिथे दोघांचीही नावं होती, अर्थातच वेगवेगळ्या आडनावांची, पण त्याने फारसं काही अडलं नव्हतं. महेशला कायदेशीर बाबी अगदी व्यवस्थित समजत असत, आणि यात काहीच गैर नाही याचा त्याने निर्वाळा दिला होता, त्यामुळे तीही काळजी नव्हती.

त्यांचा संसार सुरु झाला. बाकी तिला काहीच त्रास नव्हता. सासू-सासरे प्रेमळ होते, बोलायला तडकफडक असली तरी बाकी चांगली होती ती हे त्यांना हळूहळू पटायला लागलं. तिच्यामुळे महेश संसाराला लागला होता, स्थिरावला होता, हे ते विसरू शकत नव्हते. सहवासाने ते तिच्यावरही माया करायला लागले होते. यथावकाश बाळ अर्णवचा जन्म झाला. सासूबाईंना तेव्हा मात्र भिती वाटत होती, ’माझ्या मुलाच्या मुलाला हिच्या माहेराचंच नाव लावते की काय! म्हणजे वंश चालू असून खुंटल्यासारखाच झाला की दैठणकरांचा!!’ पण मधुने ते संकट आणलं नाही. अर्णवला महेशचंच नाव अन आडनाव लावायला तिने उदार मनाने परवानगी दिली आणि दोन्हीकडच्या आजी-आजोबांनी सुटकेचा श्वास टाकला. अर्णवच्या बाललीलांमधे, ’महेशाच्या मुलामधे’ आजी-आजोबा रमले आणि सूनेच्या आडनावाची ठुसठुसणारी जखम थोडी वाळायला लागली. आजच्यासारख्या प्रसंगांमधून ती डोकं वर काढतच असे, हा भाग वेगळा!

आता ही एवढी मोठी पार्श्वभूमी होती तिच्या ’औरंगाबादकर’ आणि घरातल्या बाकीच्यांच्या ’दैठणकर’ आडनावाला! ती बाळ अर्णवला कोण समजावून सांगणार? त्याचं आपलं एकच, ’एका घरामधे एकच सरनेम!’

मधु आता त्याला समजावायला सरसावली,"अरे, माझंही आडनाव तसं ’दैठणकर’च आहे, पण मी ’औरंगाबादकर’च लावते."
"का? तुला आपलं सरनेम आवडत नाही का? आई, आमच्या क्लासमधे सगळ्यांची वेगळी वेगळी सरनेम्स आहेत, मीच एकटा ’दैठणकर’ आहे, माहित्ये? तेव्हा टीचर म्हणाल्या, की क्लासमधे सगळे वेगळ्या सरनेम्सचे असले तरी घरी सगळे एकाच सरनेमचे असतात, विचारा आज आई-बाबांना. पण.. पण आपल्या घरी नाहीयेत सगळेच दैठणकर, तू काहीतरी वेगळंच सरनेम सांगतेस!" अर्णवला जवळजवळ रडू फुटायला लागलं होतं..

"तसं नाही रे बाळा!" मधुला काय सांगावं कळेना. आता त्याला कुठे वेगळी ओळख अन अस्मिता, कारखाना, वट, ब्रँडनेम आनि व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे सांगत बसणार? तेवढ्यात तिला एक सुचलं. ती उत्साहाने म्हणाली,"हे बघ, आता तुझं सरनेम आहे दैठणकर हं? आता उद्या तू खूप शिकलास, मोठा झालास, मस्तपैकी स्वत:चा बिझनेस सुरु केलास, आणि मग तुला कोणीतरी सांगितलं की ’हे बघ, आजपासून तू या एका वेगळ्याच फॅमिलीमधे रहायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं आणि त्यांचच सरनेमदेखील लावायचं’ तर चालेल का तुला? तुला नाही किनाई आवडणार तुझं सरनेम बदलायला?"

अर्णव विचारात पडला.."पण का रहायचं मी त्या फॅमिलीत? मी नाही जाणार उगाच कोणाकडे तुला सोडून!"
"उगाच नाही रे, ती लोकं चांगली असतील, तुला त्यांच्या मुलासारखंच वागवतील, तुझ्याशी प्रेमानी बोलतील, छान छान खाऊ देतील, तुझं कौतुक करतील, पण सांगतील, की तुझं हे सरनेम सोड, आमच्या सगळ्यांचं हे सरनेम आहे, तर तूही आमचं सगळ्यांचं सरनेमच लाव, तर चालेल तुला? तू करशील का तसं?"

अर्णव एक मिनिट गप्पच झाला. मधुला खात्री होती, ’आपण जिंकली!’ या मुद्द्याला तोडच नव्हती. आता कोणत्याही क्षणी तो ’नाही, मी नाही बदलणार माझं सरनेम’ असं म्हणेल आणि त्याला तिचा मुद्दा पटेल अशी खात्री होती तिची.

इतक्यात अर्णव म्हणाला, "पण आई, त्या फॅमिलीमधले सगळे माझ्यावर प्रेम करत असतील, माझ्याशी छान वागणार असतील, तर मी त्यांचं सरनेमही लावीन की.." त्याच्या चेहर्‍यावर ’त्यात काय मोठंसं?’ असे भाव होते!

मधु आणि सगळेच अवाक झाले! कौतुकाने अर्णवकडे बघताबघता मधुच्या डोक्यात चक्र फिरली! ’खरंच की. कायद्याच्या बडग्यापेक्षा, समाजाच्या अपेक्षांपेक्षा, प्रेमाची ताकद किती मोठी आहे! लग्न होऊन एखादी मुलगी आपल्या सासरी जाते तेव्हा नवीन घराने तिचा मुलगी म्हणून स्वीकार करताना, आपलं नावही तिला देऊ केलं, तर तिने ते का घेऊ नये? प्रेमानी महेश जर तिला म्हणला असता, "मधु, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला माझं सगळं तुझ्याबरोबर शेअर करायचं आहे, माझ्या नाव-आडनावासकट!’ तर कोण जाणे, तिला ते पटलंही असतं आणि तीही आज ’मधुमिता दैठणकर’ हेच नाव लावत असती! पण ना वडीलधार्‍यांकडे इतके स्पष्ट विचार होते, ना महेशकडे आग्रही वृत्ति! अर्णवच्या निरागसपणापुढे मात्र ती विरघळली!

तिने त्याला जवळ घेऊन त्याची पापी घेतली. "खरंय रे बाळा. असंच करायला पाहिजे. ज्या फॅमिलीमधे सगळे एकमेकांवर प्रेम करतात, तिथे एकच सरनेम असतं हं सगळ्यांचं! मी मघाशी कामात होते ना, चुकून वेगळंच सरनेम बोलून गेले. माझं नाव आहे ’मधुमिता महेश दैठणकर’. सांग हं तुझ्या प्राचीटीचरना, की आमच्या घरात सगळेच ’दैठणकर’ आहेत म्हणून!"

अर्णव खुशीने हसला. त्याच्या डोक्यातलं एक वादळ शांत झालं. चुटकीसरशी आपण किती मोठा प्रश्न सोडवला आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. उड्या मारतमारत तो खेळायला गेला देखील!

9 comments:

Atul Ghate said...

Good story.

Parag said...

arre arre arre.. kuthe geli asmita, swatantra astitva ani olkah..?????
"Tikade" taak hi goshta.. :D :D

Chan lhilyas goshta.. Nehmi sarkhich ekdam aju bajula ghadtye asa vatnare.. :)

poonam said...

अतुल, पराग धन्यवाद!

या गोष्टीवर चक्क तीन तीन अनॉनिमस कमेन्ट्स! :) अनॉनिमस, गोष्ट तुम्हाला आवडली नसेल, हे मान्य. तसं तुम्ही सांगाही मला. तुमच्या काही सूचना असतील, तर त्याही द्या, मी जरूर विचार करेन. पण हे सगळं नावानिशी सांगा की. मी ’विचार न करता’ लिहीते, हे एक मान्य, पण तुम्ही तरी विचार करून लिहिताय ना? मग, हे तोंडावर सांगायचं धैर्य नाही का? इन्टरनेटच्या माध्यमाचा किती दुरुपयोग कराल?

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपली कथा आवडली. असे प्रसंग यापुढे वरचेवर येणारच आहेत. लग्नापूर्वी मिळवलेल्या डिग्र्या, बॅंक अकाउंट, पासपोर्ट, पॅनकार्ड या सर्वांमध्ये फार खटपट करून बदल करून घेण्यापेक्षा स्त्रियानी माहेरचेच नाव (ते आता बदलत नाहीच!) व आडनावहि कायम ठेवावे अशी सूचना हल्लीच वाचनात आली होती. आडनावच न लावणे असा एक प्रकारहि प्रचारात येऊ पाहत होता. बदल होत राहाणे हे जिवंत समाजाचे लक्षण मानले पाहिजे.

प्राची कुलकर्णी said...

nehamipramaanech mast...

Dinesh A. Wagh said...

छान आहे.
मी पहिल्यांदा वाचतो आहे तुमचा ब्लॉग मला
आवडल तुमच लिखान आणि विशेष म्हणजे
ते मराठीतून आहे.

kalyani said...

खूप छान आहे कथा..तुमचं ब्लॉग पहिल्यांदा वाचते आहे..सगळ्या कथा मस्त आहेत..keep posting nice stories

Anonymous said...

अप्रतिम......तुमचे लेखनकौशल्य नुसतच प्रभावी नसून त्या लेखातुने एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे असा वाटते...

Ketaki Abhyankar said...

Mast story