August 26, 2008

मंगळागौर

भाग २

रात्री सुधाकडे बरीच गडबड होती. त्यांच्या सोसायटीच्या हॉलमधे डिश आणि पुढे खेळ होते. नातेवाईक, शेजारणी, मैत्रिणी, सासरच्या, माहेरच्या अश्या बर्‍याच बायका होत्या. हळूहळू बायका जमत होत्या. सीमा दारापाशीच थांबली होती.. सकाळी पूजा आणि आत्ता सजावट अगदी मनासारखी झाली होती. संपूर्ण पांढरी सजावट केली होती.. भाताची पिंड, लोकरीचे आसन आणि जुई-मोगर्‍याची फुलं बाजूनी. मधेच एखादं अबोलीचं फूल, बाजूनी मुख्यत्वे पांढरी रांगोळी आणि पिवळा-लाल रंग.. सुंदर दिसत होतं खरंच. कृत्तिकानी तीनचार वेळा सांगितलंही तिला तसं, तिला जमेल तशी मदतही केली.

इतक्यात सीमाला विदुलाची आई येताना दिसली. समीर-विदुलाचा अजून पत्ता नव्हता. सीमा जराशी अवघडली. त्यांच्या तसं ओळखीचं कोणीच नव्हतं. किमान विदुला येईपर्यंत तिलाच त्यांच्याशी बोलणं भाग होतं.
"या. सापडला ना हॉल?"
"हो, तसं माहित होतं साधारण.."
"विदुला आली नाही अजून.. येईलच आता.. तोवर हळदीकुंकू घ्या.."
त्या दर्शन घेऊन पुन्हा सीमाच्या शेजारीच येऊन उभ्या राहिल्या, तसं सीमाला समजेना, आता बोलावं तरी काय? पण त्यांनीच सुरुवात केली,"कशी झाली पूजा? किती मुली होत्या?"
"४ जणी होत्या, त्याही कश्याबश्या मिळाल्या.. आपल्यावेळसारखं राहिलं नाही आता." थोडसं हसून ती म्हणाली..
"हो ना. आपल्या वेळी ८-१० जणी तर सहज जमायच्या नाही? वेगळं बोलावणं असं लागायचं नाही कोणाला.."
"बघा ना.. आत्ताच्या मुलींना वेळ नाही आणि आवडही.." बोलता बोलता सहजच सीमाच्या मनातला सल बाहेर पडला आणि तीच चमकली. विदुलाच्या आईवर राग काढायचं काय कारण होतं? विदुलाच्या आईलाही रोख समजला. त्या थोड्या ओशाळल्या.

"विदुला पूजेला नाही म्हणाली ना.. मी मनापासून माफी मागते त्याबद्दल. गैरसमज करून घेऊ नका आई, पण मी नाही देऊ शकले तिला हे संस्कार.."
अवघडत सीमा म्हणाली, "माफी मागू नका अहो.. सध्याची मुलं स्वतंत्र विचारांची आहेत.. चालायचंच"
पण त्या पुढे म्हणाल्या, "विदुलाच्या बाबांना त्यांच्या अगदी लहानपणी जवळच्या नातेवाईकांचे, घरातल्यांचे मृत्यू बघावे लागले. त्यांची आई होती पुष्कळ वर्ष पुढे, पण त्यांचेही खूप हाल झाले. तेव्हापासून देवावरचा त्यांचा विश्वास उडाला. ’देव असेल तर त्याने माझ्या माणसांना माझ्यापासून का दूर केलं’ असं विचारतात नेहेमी.. त्यामुळे मलाही त्यांनी काही कधी करू दिले नाही, पहिले सणवार माझ्या आईने केले तेवढेच. पण देवधर्म म्हणजे केवळ पूजा, अवडंबर नाही हे त्यांना कधी पटलंच नाही. देवाच्या माध्यमातून थोडा विरंगुळाही मिळू शकतो, मनाला शांती लाभते, त्या निमित्ताने घरी नातेवाईकांचं येणं-जाणं होतं हे त्यांना जाणवलं नाही. आणि विदुलावर त्यांचा खूपच प्रभाव आहे. जे बाबांना आवडत नाही ते मी करणार नाही असं तिने ठरवलं. त्यामुळे छोट्याछोट्या गोष्टीही मी तिला नाहीच सांगू शकले. ही मंगळागौरीची पूजा किती साधी सोपी असते, त्यात उलट देवाधर्माचं कमी, आणि मुली-सूनांना मजा असं रूप आहे तिचं, पण विदुलानी त्यात कधी रसच नाही घेतला. माझ्याबरोबर ती कुठल्या समारंभांना, हळदी-कुंकवालादेखील आली नाही. सतत हे सगळं टाळतच आली. हे एक सोडलं तर बाकी तक्रारीला जागा देणार नाही ती.." त्या थोडं भावनावश होत म्हणाल्या..

"अहो, तक्रार नाहीच. खरंच मनानी चांगली आहे ती. या बाबतीत मला खटकलं होतं हे मीही मान्य करते. बरं झालं त्या मागचं कारण कळलं आता. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आपण अश्या गप्पा मारल्याच नाहीत आधी.." सीमाला खरंच थोडं मोकळं वाटायला लागलं. इतक्यात समीर-विदुला आलेच.

सीमानी पाहिलं, विदुलानी एक चांगल्यापैकी पंजाबी ड्रेस घातला होता. आणि चक्क गळ्यात मोठं मंगळसूत्रही होतं. केस बांधून एक गजराही होता. किती वेगळी आणि चांगली दिसत होती विदुला. एरवी ऑफिसच्या कपड्यात पाहून असं वाटायचंही नाही, ही एक नवीन लग्न झालेली मुलगी आहे..
"आई, थोडे गजरे आणलेत.. सकाळी म्हणाला होतात ना, मिळाले का?"
सीमाला एकदम आश्चर्यचकित झाली. तिने सकाळी एक ओझरता उल्लेख केला होता तर संध्याकाळी विदुलानी गजरेच आणले! तिला खरंच अपेक्षा नव्हती. "सकाळी मिळाले, पण आताही चालतील की. तुला कुठे मिळाले?"
"माझ्या ऑफिसच्या बाहेर मुलं असतात विकायला फुलं वगैरे, तिथून..""बरं, तूच जा कृत्तिकापाशी आणि विचार तिला.. सुधामावशीलाही विचार.. गजर्‍याला कोणी नाही म्हणणार नाही.."

विदुला कृत्तिकाजवळ गेली. साधारण एकाच वयाच्या, एकाच प्रकारचं काम करणार्‍या, एकाच वेळी लग्न झालेल्या असलेल्या या दोघींच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक होता.. कृत्तिका खूप हौशी, अतिशय बडबडी, लोकांमधे रमणारी, मस्करी करणारी अशी होती. विदुलाला ती आवडायची, तिच्या हसर्‍यानाचर्‍या स्वभावाचं तिला कौतुक वाटायचं.
"हाय कृत्तिका, गजरे हवेत?"
"ए हाय! गजरे! सही.. मी घातलेत गं ऑलरेडी चार.. पण आईंना देऊया, त्यांना राहिलेच नव्हते मगाशी. ए, बघ ना ही हेअरस्टाईल.. त्या पार्लरवालीनी ३ तास घेतलेत माझे दुपारचे.. आणि मेंदी बघ.."
"वा! मस्त रंगली आहे. कधी काढलीस?"
"अगं रविवारी.. आणि साडी आवडली? शंतनूच्या पसंतीची म्हणून घेतली, नाहीतर मला नाही आवडली इतकी.." कृत्तिका लटके रागावत म्हणाली.
"छान आहे. शंतनूच्या आवडीची आहे म्हणूनच तुला इतकी चांगली दिसतीये.." विदुला बोलली आणि तिचं तिलाच आश्चर्य वाटलं.. असलं भावनिक, गोडगोड बोलायची नाही ती कधीच. समीरनी तिला साडी, ड्रेस आणला असता आणि तो तिला आवडला नसता तर तिने परत करून तिच्याच आवडीचा आणला असता नक्की! दोन सेकंद तिला का कोण जाणे पण कृत्तिकाचा हेवा वाटला.

नंतर पुष्कळ बायका येत गेल्या. सीमानी तिची ओळख खूप जणींशी ’तिची सून’ म्हणून करून दिली. दोन-चार जणींनी सीमाला तिच्यासमोरच विचारलं, "सीमा, तुझ्या सूनेची कधीये गं मंगळागौर?"
यावर पटकन सीमा म्हणली, "मोठी नाही करणार हो. विदुलाला ऑफिसमधे महत्त्वाची कामं असतात. तेवढ्यासाठी रजाही काढणं शक्य नाही होणार तिला. बघू नंतर.."

तिला अशी सारवासारव करतांना ऐकून विदुलाला कसंतरी झालं. सीमाला किती वाईट वाटलं होतं याची कल्पना होती तिला, पण तिने तो कडवटपणा जाहीर केला नाही, उलट बायकांसमोर तिची बाजूच घेतली हे बघून तिला कृतज्ञ वाटलं.

हळूहळू सगळ्यांचं खाणं आटोपलं आणि हास्यकल्लोळात मंगळागौरीच्या खेळांना सुरुवात झाली. सीमा, सुधा, सरिता, स्वत: कृत्तिका आणि त्यांच्या माहेरच्या सगळ्याच उत्साही होत्या. सीमाने विदुलाच्या आईलाही आग्रहानी फेरामधे ओढलं. त्याही आनंदानी सामिल झाल्या. साधा झिम्मा, किस बाई किस, फुगड्या, गाणी, टाळ्या जोरात चालू झालं. सगळं वातावरण खूप उत्साही झालं. शंतनू व्हिडीयो शूट करत होता. पुरुष अगदी घरातलेच होते. विदुला खुर्चीवर बसून सगळं पहात होती. तो आनंद आपल्यातही झिरपतोय असं वाटलं तिला.

सीमा, ताई तर मस्त नाचत होत्या. एक लय होती त्यांच्या हालचालींना. नवल तिला वाटलं कृत्तिकाचं आणि तिच्या मैत्रिणींचं. ती कधी शिकली होती हे सगळं?

सूपं घेऊन बायकांनी फेर धरला..
तांदूळ सूपात,
सूप माझ्या हातात
लक्ष्मी कशी घरभर फिरे
ये गौरी ये,
माझ्या अंगणी ये
असशील तशी ये पण लवकर ये

मग दिंड्यांचं गाणं घेतलं
दिंड्या मोड गं पोरी
दिंड्याची लांब दोरी
दिंड्या मोडू कशी
दिंड्याला खाज भारी

तिखट-मीठ-मसाला तर विदुलाला खूपच आवडलं. अगदी आधुनिक गाणं केलं होतं त्याचं
तिखट मीठ मसाला
फोडणीचे पोहे कशाला
जावई यायचेत जेवायाला

तिखट मीठ मसाला
पाव-भाजी कशाला
नणंद यायचीये जेवायला

तिखट मीठ मसाला
बिर्याणी कशाला
भाऊ यायचेत जेवायला

यानंतर सीमा-सुधानी गाठोडं घातलं.
काथवट काणा, म्हशी गेल्या राना
म्हशी कधी येतील दूध कधी देतील

बापरे, बघतनाच विदुलाला टेन्शन आलं.. काय बॅलन्स होता.. साडीमधे असलं काही करणं म्हणजे?! पडल्या असत्या तर? आणि आश्चर्यात आश्चर्य, तिच्या आईनीही चक्क कृत्तिकाच्या आईबरोबर गाठोडं घातलं! आपल्या आईलाही असलं काही येतं याच कल्पनाच नव्हती तिला. आई मस्तपैकी एन्जॉय करत होती सगळंच. आज इतका उशीर झाला तरी घरी जायची घाई नव्हती तिला. जमेल तसं सगळं करत होती.

एवढ्यात पुरुषांच्या खेळांची टूम निघाली. शंतनूकडून कृत्तिकानी कॅमेरा घेतला. समीर-शंतनूनी झकास फुगडी घातली. लगेच त्या दोघांचे बाबा, कृत्तिकाचे बाबा, भाऊ, चिल्ली-पिल्ली सगळीच रिंगणात उतरली. टाळ्या वाजत होत्या, हास्याचे फवारे उडत होते. एक क्षणभरच विदुलाला वाटलं, ’आपले बाबा इथे असायला हवे होते. सगळ्यांबरोबर हसणारे, नाचणारे बाबा किती वेगळे दिसले असते!’

मग, नवरा-बायको खेळ खेळायला सरसावले. समीरनी विदुलाला डोळ्यानीच आत बोलावलं. विदुलाला आता सगळ्याचीच इतकी गंमत वाटत होती, की लाजत-बुजत ती समीरच्या शेजारी जाऊन उभी राहिली. त्या दोघांनी फुगडी घातली. सीमाच्या ते लक्षात आलं आणि ती समाधानानी हसली.

-----------------
दोनतीन दिवस गेले.. धावपळ संपली. सीमाचं रूटीन सुरु झालं.
शनिवारी ती आणि विदुला दोघी काहीतरी काम करत असताना हळूच विदुलानी विचारलं,
"आई, आपण पण करायची मंगळागौर?"
सीमाला प्रचंड आश्चर्य वाटलं आणि चेहर्‍यावर हसू पसरलं,
"अगं, नवीन लग्न झालेल्या मुलींचीच असते मंगळागौर.. पण तुला तर..." तिने मागची आठवण येऊन वाक्य अर्धवट सोडलं..
"ह्म्म, मी म्हणले होते, नको म्हणून.. पण कृत्तिकाच्या मंगळागौरीनंतर सगळंच बदलल्यासारखं वाटतंय मला. तो आनंद, ते समाधान किती सहजपणे तुम्हा सगळ्यांमधे होतं. कदाचित ती मंगळागौर खरंच तुम्हाला प्रसन्न झाली होती. आणि मी तशीच होते, एकटी, कोरडी.. मी थोडं ऍनॅलिसिस केलं. मी हे सगळं टाळतच आलेय आत्तापर्यंत.. जोवर मला कळत नाही पूजा म्हणजे काय आणि कशी असते, तोवर मी कसं ठरवणार की ते चूक आहे की बरोबर? आईच्या, तुमच्या चेहर्‍यावर मला एक समाधान दिसतं, ते यामुळेच असेल का? मी कधी विचारच नाही केला.. देवापाशी फिरकायचं नाही इतकंच ठरवलं होतं लहानपणापासून.आई मी पाहिलंय तुम्हाला, साधी पोथी वाचतांनाही किती शांत दिसता तुम्ही. आणि मंगळागौरीत तर काय मजा आली. मला मनापासून वाटलं की आपलाही यात सहभाग असावा. आपणही ती पूजा करावी. तीच का, रोजच एखादा नमस्कार तरी करावा देवाला, रांगोळी काढावी, तुमच्याकडून स्तोत्र, ओव्या शिकाव्या.. मी तुम्हाला पूजेला ’नाही’ म्हटले आणि नंतर मी विचार केला तर माझं मलाच आठवेना, मी नक्की का नाही म्हटले? मला तर कुठेच अवडंबर दिसलं नाही, ना पसारा. उलट मनाची शांतीच दिसली. आणि ती जर पूजा करून मिळत असेल, तर ती पूजा मला करायची आहे आई. तुम्ही, माझी आई किंवा समीर म्हणतो म्हणून नाही, तर मला आतून वाटतंय म्हणून.. करू मी?"

मनातलं सगळं बोलून टाकल्यामुळे विदुलाला मोकळं वाटलं. पण आपण योग्य ते बोललो का हे तिला समजेना. सीमाच्या चेहर्‍याकडे ती पहात राहिली.

सीमाला खूप भरून आलं. तिला काय बोलावं सुचेना. आपली सून वाटते तितकी रूक्ष नाही, उलट विचारी आणि मॅच्यूअर आहे याचं तिला मनापासून कौतुक वाटलं. मुलाची निवड चुकली नाहीये याची तिला आज प्रथमच खात्री पटली.

"अगं, विचारतेस काय? नक्कीच करूया. मी सगळं सांगीन, शिकवीन तुला. तिसरा किंवा चौथा मंगळवार धरू. तुझ्या सवडीचा सांग. मुली पण पहाव्या लागतील, पाऊस फार नसला तर बरं होईल.. आणि सजावट कशी करूया? तुझ्या काही आयडीया असतील तर सांग हं मला..." उत्साहाने तिचे पुढचे बेत सुरुही झाले..
आणि यावेळी विदुलाला त्यात ’कटकट’ किंवा ’त्रास’ वाटला नाही. उलट सीमाच्या बेतांमधे तीही तितक्याच उत्साहानी सामिल झाली.

मंगळागौरीची गाणी मंजिरीनी सांगितली आहेत. मनापासून आभार मन्जू :-)

समाप्त.

6 comments:

Anonymous said...

veeeeeeeeery nice..!!
mala aawadli aani patlihi..

Anonymous said...

veeeeeeeeery nice..!!
mala aawadli aani patlihi..

Shraddha V said...

khup chan .. mala khup aavadli..

Bhagyashree said...

mast jamli ! vidula ch matparivartana chhan ghetlas..

ships09 said...

chan lihili ahe , mastach

Gayatri said...

Poonam,
Tula kho dilay