August 25, 2008

मंगळागौर

भाग १

जू महिना सुरु झाला आणि सुधाला, सीमाच्या बहिणीला कृत्तिकाच्या मंगळागौरीचे वेध लागले. पहिला पाऊस होतोय तोवरच तिचे बेत सुरु झाले. पहिला फोन अर्थातच सीमाताईला.."ताई, पहिलाच मंगळवार ठरवलाय.. अनायसे जमतोय तिला. मग उगाच पुढे कशाला ढकलायचं ना? मुलीही बघायला सांगितल्यात तिला. तिचा मैत्रिणी वगैरे कोणाला बोलवायचं असेल तिला तर.. आणि सोसायटीचा हॉलही मिळेल रात्रीसाठी. ताई, फुलं आणशील ना तू फूल मंडईमधून? आणि रांगोळीही तूच बघशील. बरं, मी तुला मुद्दाम इतक्या आधी का सांगून ठेवतीये, कारण विदुलाची मंगळागौर तू त्याच दिवशी ठेवू नकोस हं. माझ्याकडे तुम्ही त्या आणि दुसर्‍या दिवशी रहायलाच या. जागरण वगैरे करूया. का दोघींची एकत्रच करूया गं? चालेल का तिला? विचारून बघ बाई, तुझ्या सूनेचं सगळंच वेगळं. नशीब कृत्तिका थोडी तरी हौशी आहे.."

सुधाची गाडी सुरु झाली की थांबायची नाही, त्यातून पहिल्या सूनेची पहिली मंगळागौर- भले तिला अजून दोन महिने का असेनात, बेत आत्तापासून तयार करणार.. मनातल्यामनात सीमाने सुस्कारा टाकला. हौशी तर तीही होती, सुधाइतकीच. पण समोरची व्यक्तिही तितकीच हौशी नको का? समीर विदुलाला घेऊन पहिल्यांदा घरी घेऊन आला होता, तेव्हाच सीमाला जाणवलं होतं- तिच्या चेहर्‍यावर एक अलिप्त भाव असायचा. उत्सुकता, हुरहूर वगैरे तेव्हाही नाही, आणि नंतर लग्न झाल्यावरही दिसली नाही कधी. आपण विचारलं तर उत्तर देई, पण आपणहोऊन काही बोलत नसे. नंतर समीरही म्हणला की तिचा स्वभावच अबोल आहे.

लग्नाच्यावेळी विदुलानी नोंदणी पद्धतीनी लग्नाचा हट्ट कायम ठेवला होता. बडेजाव किंवा पैश्याची उधळपट्टी नको म्हणून नाही, तर ’उगाच कशाला ते धार्मिक विधी करत बसायचे आणि भटजींना पैसे द्यायचे? परत चार दिवस आधीपासूनच एकेक कार्यक्रम सुरु होतात. इतकी उस्तवार कोण करत बसणार?’ हे कारण! विदुला पूर्ण नास्तिक होती, आणि त्याबद्दल ठामही होती. तिच्या घरचं वातावरणही तसंच होतं. तिची आई थोडी धार्मिक होती, पण वडीलही कट्टर नास्तिक. त्यामुळे घरात देवच नव्हते, पूजा कसली आणि नैवेद्य कसला? कोणत्याच प्रकारचे धार्मिक संस्कार झाले नव्हते तिच्यावर, त्यामुळे रोजची साधी देवाची पूजाही तिच्या दृष्टीने ’कटकट आणि वेळ जात नसलेल्या लोकांची कामं’ होती. लग्नानंतर वाद नकोत म्हणून त्यांच्या लग्नाचा सत्यनारायणही केला नव्हता..

बाकी, मुलगी हुशार होती. कर्तृत्त्ववान होती. घरकामातही टापटीप होती. सकाळी ऑफिसला जाण्याआधी सगळ्यांचा नाश्ता करून जायची, शनिवार-रविवार जमेल तशी सीमाला मदत करायची. कामाला ’ना’ नव्हती. राजीवही म्हणाले सीमाला, ’चांगल्या गोष्टींकडे बघ, बाकीचं सोडून दे, किमान समीर लग्न झाल्यावर आपल्या बरोबर रहातोय, बोलतोय यात समाधान मान’. सीमाला काही हे पटलं नव्हतं, पण तिने ते स्वीकारलं. ती मुळात हौशी होती. तिच्या मुलीचे- सरिताचे सगळे सणवार तिने हौसेने आणि कलात्मकतेने केले होते. सरिताच्या सासरचे तिच्यावर खुश होते. तिने ताईच्या अनुष्कासाठी केलेल्या बाळंतविड्याची आठवण आता इतकी वर्ष झाली तरी ते काढत. सरिताकडेही सीमाचे कलागुण आले होते. तिची मंगळागौरही दणक्यात झाली होती. घरात कर्मठ वातावरण नव्हतं. गणपती, गौरी, नवरात्रही नव्हतं. पण उठल्यावर देवाला नमस्कार, रोजची पूजा, वर्षाकाठी एक सत्यनारायण यात आपण काही गैर करतोय असं सीमाला कधी वाटलं नाही. आणि घरातल्यानाही ते वावगं वाटत नव्हतं. पण ही अशी देवघराकडे अजिबातच लक्ष न देणारी, धार्मिक गोष्टी ’कटकट’ वाटून घेणारी विदुला पाहून तिला आधी धक्का बसला होता, आणि मग अचंबा वाटत राहिला.

इतकी सगळी कल्पना असूनही सुधाचा फोन आल्यावर सीमाला राहवले नाही. त्याच रात्री तिने विदुलाला विचारले, "सुधामावशीकडे कृत्तिकाची मंगळागौर आहे. वेळ आहे अजून, ऑगस्ट महिन्यातला पहिलाच मंगळवार. तू पण पुजशील ना तिच्याबरोबर?"
विदुलाच्या चेहर्‍यावर सूक्ष्मशी आठी पडली. "पुजायची म्हणजे?"
"अगं, पुजायची म्हणजे पूजा करायची- मंगळागौरीची", सीमाचा संयम सुटत चालला. इतकंही माहित असू नये एखाद्या मुलीला??
"पूजा?" विदुला विचारात पडली. "आई, सॉरी, पण तुम्हाला माहितीये ना? माझा नाहीये विश्वास. मला नाही आवडत असले घोळ. परत मंगळवारी म्हणजे रजा घ्यावी लागेल. तेही जरा अवघडच पडेल." असं म्हणून तिने विषयच संपवला आणि ती तिथून सटकली.

सीमाला खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं, तोंडावर कोणी अपमान करावा असं झालं. ’ठाऊक आहे ती नाहीच म्हणेल, मग कशाला आपण विचारायला गेलो?’ असं वाटत राहिलं. कुठेतरी मनात एक आशा होती की फटकन तोंडावर तरी विदुला ’नाही’ म्हणणार नाही, आपण तिचं मन वळवू शकू, तिला सगळं शिकवू वगैरे.. पण या मुलीची धिटाई, इतका स्पष्टवक्तेपणा पाहून ती स्तंभित झाली. तिचा मूड पार बिघडला, डोकं चढलं. ती बाहेर येऊन बसली.

समीरचं आधी लक्षच गेलं नाही. पण त्याने काहीतरी आईला विचारलं, तर आईचं उत्तर नाही, म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं.."आई, काय झालं गं? बरं नाही वाटत?"
"अं? नाही, काही नाही.. डोकं दुखतंय थोडं."
"मग झोप ना, इथे अशी का बसली आहेस? गोळी देऊ का? विदुलाऽऽ.. जरा सॅरिडॉन आण गं..
"एकदम भानावर येऊन सीमा म्हणाली, "अरे नको, तिला नको सांगूस.. मी घेते गोळी आणि झोपते.."

समीरनी हाक मारलेली ऐकून विदुला बाहेर आली, तोवर सीमा गेली होती झोपायला..
"काय झालं गं आईला, माहित आहे तुला?"
"नाही, मगाशी काही बोलल्या नाहीत.."
"काय बोलणं चालू होतं तुमचं?"
"अरे ते.. कृत्तिकाची मंगळागौर आहे.. मला विचारत होत्या तू पण पूजा करणार ना?"
"हं, मग?"
"मग काय? मी ’नाही’ म्हणाले.. मला नाही आवडत पूजाबिजा.. वेळ जात नसलेल्या लोकांची कामं. काय मिळतं ती पूजा करून?"
पण मंगळागौर म्हणल्यावर समीरमधे एकदम उत्साह संचारला, "ए एक मिनिट थांब. मंगळागौर? सहीच. वेडे, तुला मंगळागौर म्हणजे काय, ती कशाला करतात हेच माहित नाहीये.. पूजा वगैरे निमित्त गं.. मैत्रिणी वगैरे बोलावून ते अमेझिंग खेळ खेळायचे, पुरणपोळी हाणायची, सगळ्यांबरोबर जागरण करत गप्पा हाणायच्या.. पूजा is just a small part of it. ताईच्या मंगळागौरीला असली धमाल आली होती माहित्ये? तुला फोटो सापडले तर दाखवीन. भाऊजी, तिचे सासरे वगैरे सुद्धा खेळले होते. आणि आई तर जबरी खेळ खेळते ते आणि ताईही. तिच्या झाडून सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. मी पण फुगडी वगैरे ट्राय केली होती, पण काय जमलं नाही बुवा. पण ताई नुसती नाचत होती सटासट.."
ऐकता ऐकता विदुलाला त्यात रस वाटायला लागला..
"तू का नाही म्हणालीस पण? ती अंजिरी साडी नेसून मस्त दिसशील तू.. खेळ खेळताना मात्र जीन्सच. आयला, त्या काळात त्या बायका नऊवारी वगैरे साड्या नेसून कसं मॅनेज करत असतील ना? आईही साडीवरच खेळते सगळे खेळ.."
"ए, अंजिरी नाही, कॉफी कलरची आहे ती पैठणी.."
"तेच गं, पण पूजा करताना झकास साडी नेसायची, आई तुला नवीन पण घेईल हवी असेल तर.."
"नको हं, मी कुठे नेसते साड्या? त्यापेक्षा दोन ट्राऊझर्स घेईन मी. आणि मला नाही त्या पूजेत इन्टरेस्ट काही"
विषय तिथेच संपला.

सीमानी आता विदुलाशी धार्मिक विषयावर बोलण्याचं पूर्णपणे थांबवलं. मनात ठरवलेले सर्व बेत तर कधीच पुसून टाकले होते. हौसेनी तिने कृत्तिकासाठी सगळं केलंच असतं, पण विदुलाची, ’तिच्या सूनेची’ मंगळागौर असती तर तिला जास्तच उत्साह वाटला असता. कितीतरी ठिकाणी तिला मुद्दामहून बोलावलं जायचं आरास करायला, खेळ खेळायला, शिकवायला.. असेल त्या साहित्यात पूजा सजवण्यात हातखंडा होता तिचा.. ती अगदी तरूण असताना तर सासूबाईंनी तिला पाचव्या वर्षी उद्यापनही करू दिलं नव्हतं. ’काय घाई आहे, कर सावकाश’ असं म्हणाल्या होत्या. अंगणातली, शेजारपाजारची पत्री, फुलं तिच्यासाठी मुद्दाम आणून ठेवत, सगळीकडे तिच्या कलात्मकतेचं कौतुक करत. त्या काळाच्या मानानी ते खूपच पुढारल्याचं लक्षण होतं. सूनेचं असं उघड कौतुक कोणी करत नसे.. तिला फार संकोचल्यासारखं व्हायचं. आणि आता, ती कौतुक करायला तयार होती, पण....

बघता बघता श्रावण आला. त्या आधीच सुधाबरोबर तुळशीबाग गाठून, कृत्तिकाला विचारून तिने कोरडी तयारी केली होती. घरातल्या देव्हार्‍यात जिवतीचं चित्रं लावताना एक क्षणभर विचार आला मनात की संध्याकाळी विदुलाला जिवतीची कहाणी सांगावी, किमान चातुर्मासातली वाचायला तरी सांगावी, पण महत्प्रयासाने तिने ती उर्मी दाबली. विदुलाचं संध्याकाळी देव्हार्‍यात लक्षही गेलं नाही, हे बघून ती पुन्हा खट्टू झाली.

सोमवारी रात्री जेवताना तिने समीर-विदुलाला दुसर्‍या दिवशी सुधामावशीकडे येण्याचे सांगितले. स्वत: पुजली नाही, तरी निदान सुधाकडे हळदीकुंकवालातरी विदुलानी आलेच पाहिजे असा तिचा आग्रह होता.
"उद्या दिवसभर आणि रात्रीही मी सुधाकडे असेन. तुमची ऑफिसं आटपून तुम्हीही तिच्याकडे या. कृत्तिकाची मंगळागौर आहे, संध्याकाळी हळदीकुंकू, खेळ सगळं आहे. जेवणही तिच्याकडेच. आणि जागरणाचं कारण देऊ नका.. जास्त थांबू नका एकवेळ, पण मावशीकडे यायचं आहे नक्की." तिने अगदी ठामपणे सांगितले.

दुसर्‍या दिवशी सकाळी विदुला उठली तेव्हा तिला सीमाची लगबग जाणवली. सीमाची आंघोळ कधीच झाली होती. देवपूजाही झाली होती कारण उदबत्तीचा सुवास दरवळत होता. एरवी ते दोघंही घराबाहेर गेल्यावरच सीमा आंगोळ, देवपूजा करायची. विदुलाला खूप प्रसन्न वाटले. तिने प्रथमच देवघरात थोडंसं निरखून बघितलं. सुबकपणे फुलं वाहिलेली, मूर्त्यांना, फ्रेम्सना गंध लावलेलं, जिवतीच्या चित्राला हार, फुटाणे, नैवेद्याच्या दूधाची वाटी, रेखीव रांगोळी, निरांजन आणि उदबत्ती.. तिला कळलं नाही नक्की काय ते, पण देवघर खूपच पवित्र आहे असं जाणवलं तिला. अर्थातच स्वभावाप्रमाणे ती काही बोलली नाही. मनात ते साठवून घेत ती तिच्या नेहेमीच्या कामांना लागली.

सीमाची लगबग पाहून तिने आपणहोऊन पटकन नाश्ता केला. सीमा तोवर तयार होऊन आलीच. विदुलाचं पटकन लक्ष गेलं तिच्याकडे. गर्द हिरवी काठापदराची जरीची साडी, मोत्याचे दागिने आणि माफक परफ्यूम.. दोन क्षण सासूचं सोज्ज्वळ रूप तिने मनात साठवून घेतलं.
"आई, छान दिसताय. नाश्ता करून जा.. उपमा झालाय.. चहा टाकू?"
सीमाला सुखद धक्का बसला. इतकं अनौपचारिक बोलणं? तेही विदुलाकडून?
"चहा नको अगं, सुधाकडे होईलच. ९ला गुरुजी यायचेत, त्या आधी मला पोचलं पाहिजे." ती उपम्याची डिश हातात घेत म्हणाली. "तुम्हीही वेळेवर गरम आहे तोवर घ्या. अहो, मला येताय ना सोडायला? तशी फुलं आहेत भरपूर, पण गजरे मिळाले तर घ्यायचेत.." निम्मं स्वत:शी आणि उरलेलं जे ऐकेल त्याच्याशी बोलत सीमा म्हणाली.. तिला आता पूजेचे वेध लागले होते. पटकन उपमा संपवून ती उठलीच. "मी येते गं, या तुम्ही संध्याकाळी. फार रात्र करू नका. सरिता पण येत आहे, तीही भेटेल.."

क्रमश:

9 comments:

Anonymous said...

लवकर येऊ दे गं बाई पुढची पोस्ट. एक तर ब-याच दिवसांनी लिहिलयंस. :-)
मला वाटतं लिखाणाची वेगळी स्तुती करायची गरज नाहीयेच. तुझी नेहमीची ओघवती शैली आहेच.

Anonymous said...

लवकर येऊ दे गं बाई पुढची पोस्ट. एक तर ब-याच दिवसांनी लिहिलयंस. :-)
मला वाटतं लिखाणाची वेगळी स्तुती करायची गरज नाहीयेच. तुझी नेहमीची ओघवती शैली आहेच.

Anonymous said...

हम्म्, छान रंगलाय पहिला भाग...

- मंजू

Unknown said...

mast! yeude pudhacha bhag lawkar..

Anonymous said...

Masstach
Chaan jamlaay.......
pudhchee post lavkar taak
waiting......

पूनम छत्रे said...

माझी दुनिया, माझी मराठी, मन्जू, भाग्यश्री आणि ऍनॉनिमस- खूप खूप धन्यवाद. कथेचा पुढचा भाग टाकला आहे, आवडेल अशी आशा आहे. :)

ऍनॉनिमस- एक विनंति- तुम्ही तुमचं नावही प्रतिक्रियेनंतर लिहिलंत तर समजेल, कोणी प्रतिक्रिया लिहिली आहे ते! :)

Unknown said...

vainee , tya vidulat mala saarkhi Madhura disat hoti , Madhura mazi baayko , maajhya aaine haat tekle tichya samor , ti devala bilkul manat nahi , ti ek varshachi astana tichi aai geli mhanun :( , aso ata tila hi katha vachayla deto :) , baghu kahi +ve farak padla tar :)

Anonymous said...

khoop chan....savita rode

Anonymous said...

Sahaj, sopi pan arthapurna katha. pudhachi goshta lavkar sanga.
Mulani pan anand ghyava ashi samajdar katha.