April 25, 2008

ईंटीरीयर पहावं करून..

रंतर असं म्हणतात की, ’घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून’.. यातलं लग्न आपण हो-नाही करत, सगळे ’दुष्परिणाम’ माहीत असूनही कधी ना कधी करतोच.. राहता राहिलं घर! सध्याच्या जमिनीच्या आभाळाला भिडलेल्या किमती पाहून घर ’बांधणं’ तर काही आपल्यासारख्या नोकरदार माणसाला शक्य होणार नाही हे आम्ही वेळीच जाणलं आणि शांतपणे एका आवडलेल्या ’स्कीम’ मधे रेडीमेड फ्लॅट विकत घेतला..

आणि मग घर न बांधण्यात जे कष्ट वाचवले ते ईंटीरीयर करताना घेतले! याच अनुभवानी जन्मली ही म्हण - ईंटीरीयर पहावं करून!!

फ्लॅट घेतलाच आहे तर तो थोडातरी सजवावा, नटवावा अशी हौस आम्हाला होती. आम्हाला डेकोरेशनमधलं ओ का ठो कळत नाही, हे कटू सत्य आम्ही पचवलं, आणि सर्वप्रथम शोध सुरु केला एका चांगल्या ईंटीरीयर डेकोरेटरचा! हा ’चांगला’ शब्द चांगलाच व्यक्तिसापेक्ष आहे बरंका.. एखाद्याला साधंसुधं, चौकोनी फर्निचर चांगलं वाटेल, तर कोणाला धबधबे, कलाकुसरी, नक्षीकामाशिवाय काही पसंत पडणार नाही! मग करायचे काय? कसा शोधायचा चांगला डेकोरटर? आम्ही एक सोप्पा मार्ग निवडला! आम्ही धडाधड अश्या लोकांच्या घरांना भेटी द्यायला लागलो ज्यांनी नुकतंच घराचं काम करून घेतलं आहे.. आता सांगायला थोडसं लाजिरवाणंच होतं, पण तेव्हा आम्ही ’अमुक अमुक यांनी आत्ताच ईंटीरीयर केलं आहे’ असं समजलं की बेधडक कोणाकडेही जायचो आणि त्यांच्या डेकोरेटरचा नाव आणि फोन नंबर घेऊन यायचो.. ओळख हवी, रेफरन्स हवा अश्या भानगडीच नाहीत! वर, त्याच बिल्डींगमधे (हो, ’बंगले’वाल्यांपर्यंत आमची झेप गेली नाही!) अजून कोणाकडे ’ठॉकठॉक’ आवाज आला तर तिथेही जायचो- भीडभाड न ठेवता सुतार, गवंडी जो कोणी भेटेल त्याला विचारायचो घराबद्दल, डीझाईनबद्दल, मटेरीयल्बद्दल, लागलेल्या वेळाबद्दल.. अक्षरश: काहीही चालू होतं आमचं!

मग सुमारे १० डेकोरेटर्सची बोलणी झाल्यावर आम्ही रीतसर गोंधळलो आणि शेवटी ज्या पहिल्या डेकोरेटरचे काम पाहिले आणि आवडले होते त्यांनाच हे काम दिले. आणि सुरु झाले आमचे ईंटीरीयर पर्व!

पर्व अश्यासाठी की या निमित्तानी मला अनेक गोष्टींचा साक्षात्कार झाला. सर्वात पहिला दणका साक्षात्कार असा होता की फ्लॅट आपला असला तरी त्याची सजावट, त्यात काय हवं, काय नको हे आपण ठरवत नसतो, तर ते ठरवतो आपला डेकोरेटर! आपल्याला स्टोअरेज हवंय की नको, कपाटं कुठे हवीत, आपलं अभ्यासाचं टेबल कुठे असायला हवं, कुठे नक्षीकाम हवं, कुठे साधंच राहूदे वगैरे हे ते ठरवतात. आपण त्यांना फक्त एक यादी द्यायची- घरात आम्हाला कपड्यासाठी ३ कपाटं, डबे, भांडी यासाठी २, एक सोफा, झोपायला दोन कॉट, एक टीव्ही, एक पीसी, एक अभ्यास असे टेबल हवे आहे. मग ते ’डिझाईन’ करणार. त्यात आपण केलेला काडीचाही बदल ते स्वीकारणार नाहीत. खरंतर आपण काहीही सूचनाच केलेल्या त्यांना चालत नसतात. पण आपण फार जोर धरलाच तर करतात ते थोडेफार किरकोळ बदल. ’फार जोर’ मधे प्रचंड चिकाटी, पेशन्स आणि फ्रस्ट्रेशन लेव्हल हाय लागते हां- आधीच सांगते.

अजून एक- सिगारेटच्या पाकिटावर असतो तसा वैधानिक इशारा- कामाला किती वेळ लागेल असं चुकूनही डेकोरेटरला विचारायचे नाही! अहो, सण म्हणून सुताराला गावी जायचे असते, दिवाळी म्हणून बाकी कामांना जास्त महत्त्व असतं, ’तुम्हाला घाई नाहीये’ असं त्यांनी ठरवलेलंच असतं, मग कामाला अमुक एक वेळ लागेल असं कसं सांगता येईल बरं? आणि जरी सांगितलं तरी ते तेव्हाच पूर्ण व्हायला पाहिजे असं थोडीच आहे? सुरु केलंय म्हणजे कधी ना कधीतरी होणारच, त्यात काय? सारखे तगादे लावून त्यांच्या कामात व्यत्यय मुळीच आणायचा नाही, ओके?

आता, ईंटीरीयरची पहिली पायरी- ’कलरस्कीम’!!! मला सांगा, तुम्हाला ’कॉफी’, ’क्रीम’,’ ’बेज’ आणि ’ऑफव्हाईट’ शेड लीलया ओळखता येतात? मला तर बुवा सगळेच सारखे दिसतात! माझ्या छोट्याश्या स्वयंपाकघरात किमान ३ वेगवेगळे ’क्रीम कलर’ आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी खरोखर दिग्मूढ वगैरे झाले होते! इतकंच काय, तर लॅमिनेटचे जवळजवळ हजार प्रकार आणि रंग पाहिल्यानंतर माझं जे किमान रंगज्ञान होतं तेही डळमळीत झालं! लाल हा लाल नसून ’स्ट्रॉबेरी रेड’, ’चेरी रेड’ अश्या विविध प्रकारात असतो. ’ग्रे’ या रंगापुढे तर मी हात टेकले आहेत. ते सोडा, साधा काळा रंग ही काळा नसून, ’चारकोल ब्लॅक’, ’स्टील ब्लॅक’, ’डीप ब्लॅक’ असतो तर!!! आणि मला अगदी खरं सांगा, खरंच आपल्यासारख्या सामान्य माणसाला फरक पडतो का हो- तुम्ही ’क्रीम’ वापरला आहे की ’बेज’, ’स्पॉटलेस व्हाईट’ की साधाच ’व्हाईट’?? इतकी घारीची नजर आपली असती तर आणखी काय हवं होतं? पण डेकोरेशन करताना हे रंगांच्या बाबतीत पर्फेक्ट ज्ञान असणं आत्यंतिक गरजेचं असतं! आणि ते आपल्याकडे नसेल तर आपण ’किस झाड की पत्ती’ वगैरे..

बर, तुम्हाला हे माहीत आहे का, की डिझाईन उठावदार होण्यासाठी दोन अगदी परस्पर विरोधी रंग वापरणं किती महत्त्वाचं असतं ते? मग ते दोन परस्परविरोधी रंग फारच विरोधी असतील तरी पर्वा करायची नाही. महत्त्वाचं काय आहे- डिझाईन दिसणं! त्यामुळेच एका खोलीत रस्ट, ब्राऊन, पिवळा, पिस्ता, शाई निळा आणि आकाशी असे चार भिंतींना मिळून सहा रंग आले तरी गांगरायचं नाही! डिझाईन उठावदार दिसण्यासाठी करावं लागतं असं! मी घाबरत घाबरत ’ही खोली जरा जास्तच रंगीत होतीये, नाही?’ असं विचारल्यावर एक कटाक्ष माझ्या दिशेनी आला, ज्याचा अर्थ होता, ’हे काम तुमचं आहे की आमचं? आम्हाला कळतंय. अशीच फॅशन आहे सध्याची’. पण माझं मन राखण्यासाठी म्हणून एखादा रंग झाला कमी त्यातला.. मलाही समाधान, आणि त्यांच्याही फारसं मनाविरुद्ध नाही..

सामान्य म्हणताना आठवलं- आपण खरोखरीच सामान्य. राजकारणापासून शेकडो कोस दूर. तरी पण आपला काहीही थेट संबंध नसताना राजकारण्यांचा खेळीचा फटका आपल्यासारख्या सामान्य माणसालाच बसतो, ते लोक मात्र निवांतपणे पुढच्या खेळीत गुंतलेले असतात. अचानक एके दिवशी राजसाहेबांच्या मनात मराठी मनाची अस्मिता जागृत झाली आणि ’बिहार-यूपी हटाव’च्या घोषणे आणि दहशतीमुळे आमचे सुतार हातातले काम सोडून पळून गेले! त्या वेळी या मराठी बाण्याचा अभिमान बाळगायचा की कसे या संभ्रमात आम्ही पडलो! जे काम झोकात आणि जोरात चालू होतं ते संपूर्णपणे ठप्प झालं! फ्लॅट समोर तयार दिसत होता, पण अजून रहाण्यालायक झाला नव्हता.. कधी होईल हेही सांगता येत नव्हते! ’हताश’ ह्या एकच भावनेनी तेव्हा मन व्यापून टाकलं होतं!

काम हे असं हळूहळू चालू होतं आणि अचानक जाणीव झाली, की वास्तूशांतीची तारीख तीन आठवड्यावर आली आहे. ती पुढे ढकलणं तर शक्यच नव्हतं, कारण पुढचे मुहूर्त थेट श्रावणात आहेत असं गुरुजींनी आधीच सांगितलं होतं. तेव्हा तीच तारीख पक्की होती. पण काम तर सगळंच धेडगुजरी! सुतारकाम तर अर्धवट होतंच, पण रंगकामातला ’रं’ही आम्ही उच्चारलेला नव्हता. फर्निचरचे पॉलिश, ईलेक्ट्रिकचे फिटींग, पडदे, दिवे हे तर वेगळंच. भरीसभर हे की नवरा माझ्यावर ’संपूर्ण विश्वास’ टाकून ’तू बघशीलच गं सगळं नीट’ असं म्हणून ऐन मौक्याच्या वेळी परदेशी निघून गेला. त्या ’विश्वासाच्या ओझ्याखाली’ आणि ’कर्तृत्व गाजवण्याच्या खुमखुमीखाली’ मी खिंड लढवायला सज्ज झाले! ’आपलेच घर आणि आपलेच ईंटीरीयर’ म्हणत प्रचंड टेन्शन घेत का होईना, पण मला ’बाजीप्रभू मोड ऑन’ करावा लागला! अश्या वेळी आपली पूर्वपुण्याई कामी येते, देवही आपली फार परीक्षा घेत नाही- कुठून ना कुठूनतरी मदत पाठवतोच असा माझा अनुभव आहे. डेकोरेटरनी माझी अडचण समजून घेऊन सुतारांकडून जास्त वेळ थांबून काम करून घेतलं, रंगारीही दोन तास जास्त थांबले, ओझं उचलायला अचानक मदत मिळाली, मन मोकळं करायला मित्र-मैत्रिणींनी कान दिले आणि मी ’डेडलाईन’ गाठायच्या बरंच जवळ आले.

पण नंतरही सगळं सुरळीतच झालं असं नाही बरंका! मला आवडलेल्या पडद्याचं कापड नेमकं कमी भरलं, जे दुसरं कापड आवडलं ते भयंकर, काहीच्याकाही महाग निघालं, तिसरं जे आवडलं ते मधेच विरलेलं होतं वगैरे असे क्षुल्लक प्रॉब्लेम होते. मग मी तडजोड केली.. ती तर आयुष्याच्या गाठीशी बांधलेली आहेच! त्यामुळे सवयीने थोडीशी चिडचिड झाली इतकंच. थोडे पडदे महाग, थोडे स्वस्त असं ते ऍडजस्ट केलं. तेच झुंबराच्याबाबतीतही.. जे आवडलं होतं ते बसत नव्हतं, जे बसत होतं ते आवडत नव्हतं! ’प्रत्येक आवडलेल्या गोष्टीसाठी आपल्याला इतकं झगडावं का लागतंय’ असा मनोमन विचार करून मी ’त्या’ आवडलेल्या झुंबराची आशा सोडलेली होती आणि अचानक तो दुकानदार ते झुंबर काहीतरी फिटींगचा जुगाड करून चक्क घरी घेऊन आला!!

असं धडपडत, ठेचकाळत, अनेक ’वैचरिक मतभेद’ झाल्यानंतर शेवटी एकदाचा आमचा ’ईंटीरीयर अध्याय संपूर्णम’ झाला! ’झालं आता सगळं’ असे अमृतासारखे शब्द कानी पडले आणि आम्ही धन्य झालो. आता घर ’तयार’ झालेलं होतं. ’फायनल प्रॉडक्ट’कडे नजर टाकल्यावर आधीचे सगळे वाद आणि मन:स्ताप आपोआपच विसरले गेले. लॅमिनेट, शोभेचे दिवे, नवा रंग, सुंदर पडदे लेऊन आमचं घर आमच्या स्वागतासाठी सज्ज झालं होतं आणि त्याच्याकडे नव्याच नजरेनी बघता बघता त्याच्याबद्दल एकदम आपुलकीच वाटायला लागली! त्या चार विटांच्या भिंती अदृष्य होऊन त्याची एक वास्तू झाली होती.. हे सगळं खरंतर आमच्या डोळ्यासमोरच झालेलं होतं, पण तरीही विश्वास बसत नव्हता! त्या घरातली एकन एक वस्तू पाहिली की तिच्याबरोबर जोडलेली एक तरी आठवण उफाळून वर येतंच होती आणि समाधानानी आम्ही आमचंच घर बघत होतो!

मग, तुम्ही कधी करताय घराचं ईंटीरीयर? It will be an affair to remember, guaranteed!

12 comments:

Meenakshi Hardikar said...

masta jamalaya ga punam. ajun masta jhala asatacha khara mhanaje. :D

Unknown said...

wow मस्तच! खुप पुर्वी मी शाळेत असताना आम्ही 'इन्टेरिअर डेकोरेटर' ला आमच्या फक्त हॉलचं इन्टेरिअर डिझाइन करायला दिलं होतं.. त्याने जे काय प्रकार केले ते अजुन लक्षात आहेत!! टीपॉय असा आहे आमच्या कडचा : पुढे त्रिकोण, मागे चौकोन, आणि वर एक गोल काच!! :D
neways.. decorator कडुन आपल्या सोयी प्रमाणे घर करने खूप अवघड आहे! त्या मानाने architects जरा सोय पाहतात!!
मस्तच लेख! जुने दिवस आठवले ! :)

सर्किट said...

आयला, डेंजर अनुभवातून गेलेली दिसतेयेस तू. मला गवंडी, सुतार आणि रंगारी यांचे अनुभव आहेत पाठीशी. म्हणजे ते आपलं काम घेऊन अर्धवट (१०%) सुरु करुन, घरभर / अंगणात पसारा करून गायब होतात. आणि लय चिडचिड होते. पण निदान जेव्हा करतात तेव्हा आपल्या सांगितल्यासारखं तरी करतात.
हे इन्टेरिअर डेकोरेटरचं प्रकरण आपल्याला काही आयुष्यात झेपणार नाही असं दिसतंय..
सावध केल्याबद्दल धन्स! :)

नाईस पोस्ट.. हरकत नसेल तर फोटोही चिकटव नां. पाहू तरी तुझ्या कष्टाची फ़ळं. :)

Anonymous said...

Chhanach zalay. Konitari mhantalya pramane photo jod sobat, nakki aavdel sagalyanna.

संदीप चित्रे said...

>>मला ’बाजीप्रभू मोड ऑन’ करावा लागला! --LOL
>> मग मी तडजोड केली.. ती तर आयुष्याच्या गाठीशी बांधलेली आहेच! -- vaakya khoop aavaDale.

baakee Poonam khoopach dhaav-paL jhaalelee disatey aaNi tee lekhaat vyavasthit utarleey !!

Anonymous said...

poonam,
lihinyachi shaili masta ahe tujhi!
maja ali vachun.ata ghar baghaychi utsukta vadhliye:)
monali

Amol said...

मस्त! हे एकूण १-२ महिने चालणारे काम दिसते. सुतारकाम, इलेक्ट्रिक ची कामे वगैरे प्रमाणे हे करणारे लोक समजा १५ दिवसाचे काम असेल तर २५ दिवस सांगा पण एकदा सांगितले की त्याप्रमाणे करा असे कधीही करत नाहीत ना? पुन्हा काही वेळा तर असे बघितले की पैसे अडवले तर त्याची ही फारशी पर्वा नसते त्यांना.

आणखी एक अनुभव आला का- एकदम चांगली टेस्ट असणार्‍या लोकांनी इंटिरियर केले आहे असे कळल्यानंतर जाउन बघितले तर ते एकदम अ. आणि अ. निघाले? :)

poonam said...

सर्वांचे खूप धन्यवाद- माझ्या धावपळीत सहभागी झाल्याबद्दल :)
सुतार, रंगारी, प्लंबर ह्या कधी ना सुधारणार्‍या जाती आहेत आणि डेकोरेटर तर त्यांचे प्रमुख! :))
पण चिकाटी धरली ना, तर सगळं ’क्या बात है’ असतं :)
फोटो टाकणार आहे नक्की :) मलाही सगळ्यांबरोबर शेअर करायचं आहेच.. कधी? hmm, good question! :)

Monsieur K said...

yes, thts the 1st thing that came to my mind - photos chi link taak - tujhi mehnat aamhaala pan disu dey :)

mast lihila aahes anubhav - jevha majhya kade kinva olkhi-paalkhi madhe interiors ch kaam nighel, tevha project tulaach deu - tu mast manage karshil - ekdam "baji prabhu mode" madhe; harkat naahi na? :D

vivek said...

छान लिहिलं आहेस पूनम. जणू काही माझेच अनुभव शब्दांकित केल्यासारखं, कारण याच दिव्यातून २ वर्षांपूर्वी मी देखील गेलो आहे. पण तुमचं घर पाहिल्यावर मी तुझ्या आधी तुझ्या डेकोरेटरचं अभिनंदन केलं होतं हे आठवतंय ना ? :-) अग इतकं छान डेकोरेशन करणार असतील तर यापेक्षा पाचपट त्रासांना सामोरं जायला सुद्धा मी तयार आहे.

असो, नवीन घर तुम्हाला शुभदायी ठरो हीच सदिच्छा

vivek said...
This comment has been removed by a blog administrator.
vivek said...
This comment has been removed by a blog administrator.