February 27, 2008

आईच्या हातचं!

सागर अधीरतेनी घरात आला.. त्याला प्रचंड भूक लागली होती. निधीनी आज प्रॉमिस केलं होतं त्याला.. ती आज त्याच्यासाठी खास असं त्याला आत्यंतिक प्रिय असं ’गोळ्याचं सांबार’ करणार होती जेवायला.. आहाऽऽ! गोळ्याचं सांबार!! आठवूनच त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. आईच्या हातची खास डिश होती ही आणि त्याची विशेष लाडकी.. निधीलाही त्याचं हे गोळ्याचं सांबार प्रेम ठाऊक होतं. म्हणूनच आज सुट्टीचा सकाळचा वेळ खास ते करण्यासाठी ठेवला होता..

"निधी.. आलो मी.. झालं? तयार आहे? बसायचं जेवायला?" सागरची उत्सुकता लपत नव्हती.
"हो, चला, मी घेतेच वाढायला.."

अक्षरश: दोन मिनिटात तो आलाच.. पानावर बसला.. बाऊलकडे त्याने आशेनी पाहिले आणि तो थबकला.. हे? हे काय केलंय?
"निधी.. ’हे’ गोळ्याचं सांबार आहे?"
निधीचाही चेहरा थोडा साशंकच होता.. सावरून घेत ती म्हणाली,
"हो, म्हणजे काय? हेच की. मी पुस्तकाप्रमाणे अगदी तंतोतंत केलंय हां.. असंच होतं त्यात.."
"बर बर असेल, खाऊन बघतो.. पण आईच्या सांबाराला असा रंग येत नाही काळपट म्हणून विचारलं गं.." सागर वरकरणी म्हणला खरा, पण मनात किडा वळवळाच.. हे कसलं सांबार? आईचं कसलं होतं सोनेरी.. त्यावर मस्त कोथिंबीर.. हे काय लाल दिसतंय चिकन सारखं? जाऊदे, बघूया तरी काय आहे ते.. त्याने पोळीचा तुकडा तोडला आणि सांबारात बुडवून खाल्ला.. बापरे!! तिखट, आंबट चवीनी त्याच्या जीभेवर हल्ला बोल केला.. आणि गोळे तर कच्चेच होते चक्क आतून.. हे काय आहे? हे सांबार? गोळ्याचं सांबार? इतकं भीषण?? आई! आईची प्रकर्षानी आठवण झाली त्याला..

इकडे निधी त्याच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत त्याच्याकडेच पहात उभी होती..
"कसं झालंय?" तिनी हळूच विचारलं.

सागरला तिचं मन मोडवेना.. इतकं खपून तिने हा प्रकार केवळ त्याला आवडतो म्हणून केला होता.. पण शेवटी ते गोळ्याचं सांबार होतं ना.. हे जे काही होतं त्याला सांबार म्हणणं म्हणजे जीभेलाही त्रास देणं होतं.. अखेर धीर करून तो म्हणाला,
"ह्म्म. हे वेगळ्याच पद्धतीचं गोळ्याचं सांबार झालंय गं.. म्हणजे असं नसतं मी खाल्लेलं..आई कसं करते माहिते का.."
त्याचं बोलणं अर्धवटच तोडत निधी म्हणाली, "माहिते मला तुझी आई कसं करते ते, पुन्हा सुरु करू नकोस.. मी कधीही कसंही काहीही केलं तरी तुला आवडतच नाही. तरी मी पुस्तकात बघूनच करते. अगदी तंतोतंत. आज फ़क्त चिंच आणि तिखट थोऽऽडंसं जास्त घातलंय.. तसंही तिखट खायची सवय असावी.. पचनाला बरं असतं.. पण तुला माझे चांगले हेतू कळतच नाहीत. सारखी तुलना करत असतोस.. इतकं सकाळपासून खपून केलं, त्याचं काही आहे का तुला?" निधीची गाडी रागावरून हळुहळु मुसमुसण्याकडे वळायला लागली..

हीनदीन झालेला सागर कसाबसा म्हणाला, "अगं पण राणी, तू खाऊन पाहिलंस का आहे? बरंच तिखट झालंय.. आणि गोळेही नीट शिजायला हवे होते अजून.. आपण असं करू, या पदार्थाचं नामकरण करू ओके?.. अं?.. हं! आपण याला म्हणू ’रस्सा-गोळे’!! चालेल? याला गोळ्याचं सांबार हे नाव नको गं प्लीज.. आयला.. बघता बघता सुगरण झालीस की तू निधी.. नवे नवे पदार्थ बनवायला लागलीस.. ग्रेट!"

निधीला यातली खोच कळली, तरी सागरची कोणत्याही प्रसंगात कॉमेडी आणण्याचं कसब पाहून तिला पुसटसं हसूही आलं! तिला स्वत:ला तिच्या पाककौशल्याचा अंदाज होताच की. सांबार खरंच काही खास नव्हतं झालं.

"असं का होतं रे? मी खरंच अगदी सांगितलं आहे तस्संच करते" निधीला स्वत:च्या पाककौशल्याची शंका यायला लागली..
"आता मी कसं सांगणार का चुकतं ते.. बरं, तू आईलाही विचारत नाहीस काही.. त्यांचे अनुभव असतात.. त्यात कमीपणा काय वाटतो तुला काय माहीत! बरं, पण आजच्या पोळ्या फर्स्टक्लास हां.. त्या रश्श्यामुळे सांगायचं राहिलंच.. चक्क तीन बोटानी तोडता आल्या.. मी म्हणलं नाही, तू एक्स्पर्ट होणार लवकरच.. ते ’सांबार’ एकदा जमलं की..." सांबार फसल्यामुळे सागर आज जास्तच हळवा झाला होता, न घाबरता निधीला मनसोक्त (शाब्दिक) चिमटे काढत होत..

त्यानंतरचं त्यांचं जेवण हे (पुष्कळ वेळा होई तसंच) पोळी-सॉस आणि पोळी-जॅम बरोबर झालं.
----------------------------------------------------------------------------------------------
पण हे दरवेळी असं का होतं तिला समजत नव्हतं. एखादा पदार्थ हौसेनी करायला घ्यावा आणि तो बिघडावा! किंवा, जमावा, पण त्याला ’ती’ चव येऊ नये! एकतर तिच्यापाशी वेळ कमी असायचा. त्यातून हौसेनी करतीये, तर तो पदार्थ पटकन जमून जावा अशी इच्छा असायची मनात. त्या घाईत, धांदलीत काहीतरी बिनसत होतं! तसं तिला तिच्या आईला, सासूबाईंना, गेलाबाजार शेजारणीला तरी नक्कीच विचारता आलं असतं याबद्दल, पण नेमका स्वत:चा ’ईगो’ आड येत होता! ईंजिनीयर झालेल्या हुशार मुलीला रोजचा स्वयंपाक जमू नये? छे! फारच लाजिरवाणी गोष्ट होती. आजकाल मुलगेही उत्तम स्वयंपाक करतात, मग तिला न जमण्यासारखं काय होतं त्यात? ’फ़ोडणी, मसाले, वाटण आणि मीठाचं प्रमाण जमलं की आलाच स्वयंपाक. त्यात काय मोठसं?’.. हे लाडकं मत होतं तिचं-’ अर्थातच लग्नाआधीचं!! फोडणीचं तेल, मसाल्यातले असंख्य घटक पदार्थ, वाटणासाठी लागणारे कष्ट आणि ’मीठ चवीप्रमाणे’ या दोन शब्दांनी तिची झोप उडवली होती!

नवीन सुरुवात असतांना सगळे सावळे गोंधळ अगदी साग्रसंगीत झाले.. आमटीला तूरीच्या डाळीऐवजी हरभर्‍याची डाळ शिजवणे, पोह्याची खीर बनवणे, कणिक एकतर सैल, किंवा अगदीऽऽऽ घट्ट (कडककडे झुकणारी) भिजणे, कूकरमधे पाणी घालणे, पण तांदूळात पाणी न घालणे, मीठाशी तर दुश्मनी असल्यासारखं ते विसरणे, किंवा दुप्पट घालणे हे तर रोजचच! पण बया धीराची. आणि हो, मुख्य म्हणजे सागर धीराचा. बायकोनी स्वयंपाकघराचं रणांगण केलेलं असतांना तो तिथून पळून गेला नाही हे विशेष. तो बिचारा तिच्या खांद्याला खांदा लावून तिनेच केलेले पदार्थ कसेबसे गिळत होता, पण तो होता तिथे. या त्याच्या पाठींब्यामुळे आणि स्वभावातल्या जिद्दीने निधी आता कुठे जरा रोजचा स्वयंपाक खाणेबल करायला लागली होती.

मग एके दिवशी निधीनी ठरवलं की आता ’नवी शिखरं पादाक्रांत करायची’. दोन-चार भाज्या, आमटी, पोहे-उपमा तिच्या मते तिला आता येत होता. आता काहीतरी गोड करायला पाहिजे.. काय करावं बरं? अचानक तिची ट्यूब पेटली! येस्स.. बेसनाचे लाडू! तिला प्रचंड आवडत असत. आणि त्यात ती एकतारी अन दोनतारी पाकाची कटकटही नव्हती! सोप्पा आणि आवडणारा पदार्थ. निधी तयारीला लागली. पुस्तक पाहिलं, तयारीही विशेष नव्हती. तूप विकत आणलं, बेसन होतं घरी.

मग एका शनिवारी दुपारी निधीबाई राहिल्या ओट्यापाशी उभ्या- बेसन ढवळत. भाजतीये, भाजतीये- त्याचा काही रंग लाल होईना. तिचा पेशन्स संपला आणि त्या कच्च्या बेसनातच दूध आणि साखर घातले. झालं, लाडू घडले, पण कच्चे आणि चिकट!

पण अशी हार मानेल ती निधी कसली?

पुढचा शनिवार. निधी पुन्हा बेसन भाजतीये. यावेळी हात लाल झाले तरी चालतील, पण बेसन(ची) लाल होईपर्यंत भाजायचं हे मनात ठामपणे ठरवलं होतं. बराऽऽऽच वेळ भाजल्यानंतर त्याचा रंग थोडाऽऽऽ बदलू लागला. पुस्तकातली ती ’गुलाबी होईपर्यंत भाजावे’ भानगड तिला काही उमजली नव्हती. पिवळं बेसन कितीही भाजलं तरी गुलाबी कसं होईल? काहीही! असो, पण रीझल्ट तरी उत्साहवर्धक होते. रंग पालटायला लागला होता. आता निधीला कळेना की किती लाल करायचे हे? आचेमुळे ते पटापट रंग बदलू लागले की! ’कच्चं नको’ असा विचार करत ती तसाच झारा हलवत राहिली आणि व्हायचं ते झालंच!!!!!!! गेल्या वेळी कच्चे म्हणून आणि या वेळी करपलेले म्हणून.. आस्वाद घेत खाता येतील असे बेसनाचे लाडू काही घडेनात.

आता मात्र निधी निराश झाली. ’इतकं मेलं राब राब राबतो त्या ओट्यापाशी, पण निर्धास्त होऊन जेवता येईल असं काही घडत नाही तिकडे.’ तिनी मधेच स्वत:चे हातही निरखले. ’या हातांनी मी ऑफिसमधे लीलया काम करते, तेच हात इकडे इतकं अपयश का देतात?’ विचार करकरूनही हाती उत्तर येईना. शेवटी तिने ठरवले, ’आपण एक ब्रेक घेऊया. खूप दिवस झाले, आईकडे गेलो नाही.. आता वीकेंडला रहायलाच जाऊ.." विचारानीच तिला थोडं बरं वाटलं.
--------------------------------------------------------------------------------------

लाडकी लेक आल्यामुळे आईचा उत्साह बघण्यासारखा होता. निधी शुक्रवारीच ऑफिसातून परस्पर आईकडे आली. आई, बाबा, धाकटी बहीण निशा सगळे कसे तिच्या आसपास होते, गप्पांना रंग चढला होता. इतक्यात आईनी शिर्‍याची बशी हातात ठेवली. निधी चकितच झाली. ती गप्पांत इतकी रंगली होती की आईनी रवा कधी भाजला आणि शीरा कधी केला, तिला कळलंच नाही!!
तिने चमचाभर खाल्ला.."आई, काय मस्त शीरा झालाय गं, अगदी नंबर वन! नेहेमीप्रमाणेच!"
बाबा आणि निशानीही निधीची ’री’ ओढली."लाडकी लेक आल्यामुळे बदाम-काजूही सढळ हातानी पडलेत हो.. नाहीतर आम्हाला नुस्त्या वेलदोड्याचा पुडीवर समाधान मानावे लागत होते इतके दिवस, काय निशा?"
"बघा ना बाबा.. ताई, बरं झालं तू आलीस.. आता आम्हाला मस्त मस्त खायला मिळेल एकएक.."
"चला! जसं काही अगदी वनवासातच आहात की नाही? तुमच्याही फर्माईशी करतेच की पूर्ण.. आता लेक माझी इतक्या दिवसांनी भेटतीये.. शीराच काय, ती म्हणेल ते करून घालीन.." आईनी प्रेमानी निधीच्या केसांवरून हात फिरवला..

त्या रात्री निधी आईशेजारी ओट्यापाशी उभी राहून आईच्या हालचाली निरखत होती. तिचं ते सगळं निगूतीनी करणं डोळे भरून पहात होती. शेवटी तिने न राहवून आईला विचारलंच,
"आई, आता मी पण स्वयंपाक करते, पण माझा कोणताच पदार्थ तुझ्यासारखा होत नाही, असं का गं?"
"अगं, केलं की येतं.. होईल सवय हळूहळू.. त्यात काय मोठंसं?"
"नाही गं आई.. मीही असाच विचार केला.. पण नाहीच होत.. रोजचा स्वयंपाक पण ठीकठीकच होतो.. भात, आमटी, कोशींबीरी असं किरकोळ जमतं, पण भाजीचं विचारू नकोस.. रोज वेगळी बनते.. स्पेशल पदार्थ करायला तर मी घाबरतेच." निधीचा चेहरा पडला.. "एकतर मला इतका कमी वेळ असतो. संध्याकाळची तयारी सकाळीच करून ठेवते. तरी काही ना काही कारणानी ऑफिसमधून यायला उशीर होतोच. आणि मग धावपळ नुसती. काहीतरी विसरतं तरी, नाहीतर जास्ती तरी होतं. पोळ्या बर्‍या झाल्या तर भाजी नाही, ती बरी तर पोळ्या करपल्या.. तरी सागर खूपच चांगला आहे गं, काहीच तक्रार नाही करत.. मधून मधून चेष्टा करतो, पण काय करणार.. कौतुक करावं असं नाहीच केलं मी काही अजून. तरी मी पुस्तकात बघूनच करते, आणि स्वत:चं डोकं थोडंच वापरते.. पण आई, बोटं चाटून खावं असं नाहीच जमत.. तुला कसं जमतं गं इतकं पर्फेक्ट सगळं? आज शीरा बघ.. कसला पटकन केलास.. आणि किती चविष्ट.."

आई मनोमन हसली. निधीचा अधीर स्वभाव तिला परिचित होताच. प्रत्येक गोष्टीत घाई आणि गडबड. पेशन्स नाही आणि चिकाटीही. अभ्यासात नेहेमी पुढे, नोकरी पण लगेच लागली आणि लग्न तर तिचं तिनेच ठरवलं होतं.. कुठे कशासाठी थांबायला लागलंच नाही.. आणि आता स्वयंपाकासारख्या ’क्षुल्लक’ गोष्टीसाठी इतकी धडपड करावी लागते म्हणजे काय?

ती म्हणाली, "सोना, अगं स्वयंपाक हे देखील शास्त्र आहे बाळा. तुझ्या अभ्यासाइतकंच क्लिष्ट. जो पदार्थ आपण करणार आहोत, त्याच्या आत्म्यात शिरावं लागतं, त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं.. हे घटक पदार्थ जितके महत्त्वाचे असतात, तितकंच असतं ते आपलं मन त्यात असणं. बघ, आज तू आलीस.. मी शीरा करत असताना तू आजूबाजूला होतीस, बाबा होते, निशू होती.. ह्या सगळ्या माझ्या माणसांवरचं प्रेमही त्या शिर्‍यात साखरेबरोबर पडलं, आणि शीरा आपोआपच गोड झाला.. एरवीपेक्षाही गोड.. आता तू पोळी-भाजी करतेस, पण निवांतपणा असतो का मनाला? ’आज तरी नीट होतंय का?, आज काय चुकणार आहे, आज तरी नको करपूदे बाबा, काय काय घालावं लागतं एका भाजीमधे, शी..’ असे मनात उद्गार काढत ते करणार.. करणार कसलं, उरकणारच. मग तुझं मनच त्यात नसेल, एक ड्यूटी, एक चॅलेंज म्हणून तू स्वयंपाक करत असशील तर तो सुरेख होईल का सोना? ही पाककला आपण आपल्या माणसांसाठी करतो, आपलं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून, त्यांनी पोटभर जेवावं म्हणून करतो.. त्यासाठी मनाचं समाधान आणि शांती हवीच.. आपण समाधानी असलो तर आपोआप ते जेवणही चविष्ट बनतं- मग ती साधी रोजची भाजी का असेना.. असा माझा आजवरचा अनुभव आहे.."
आईचं बोलणं ऐकून निधी काही न बोलता नुसती तिला बिलगली.
---------------------------------------------------------------------------
या नंतर साधारण पंधरा दिवस गेले असतील मधे. शनिवार सकाळ होती..सागर बँकेची वगैरे कामं उरकून आला घरी. घरात येताच एक मस्त वास आला कशाचातरी.. एक सुपरिचित वास.. आजकाल निधीचा स्वयंपाक बराच सुधारला होता.. म्हणजे चक्क चार दिवस झाले होते त्या अंबाडीच्या भाजीची वाट लागून.. "निधी, क्या पक रहा है? जबरी वास येतोय.."
निधीच्या चेहर्‍यावर पण हसू होते..
"ह्म्म. सरप्राईज! बघूया जमलंय का.."
तिने बोलता बोलता ताट वाढले..
"काय आहे काय? आयला! हे तर आईच्या हातच्या गोळ्याच्या सांबारासारखं दिसतंय!"
निधी नुसतीच गालतल्या गालात हसत होती.. सागरनी खाऊन पाहिले..
"आई शप्पत! सहीच.. निधी.. you have done it! मस्त झालंय.. खरंच.. म्हणजे आईच्या हाताच्या टेस्टच्या खूपच जवळ जातंय! थँक्स माय डियर! कसं काय जमलं तुला?"
"अंऽऽ.. थोडं माझ्या आईनी सांगितलं आणि थोडं तुझ्या!"
"काय? तू चक्क माझ्या आईला फोन केला होतास? याच्यासाठी? आज काय सूर्य पश्चिमेकडून उगवलाय की काय?"
लटके रागावत निधी म्हणाली,"इतकं काही नकोय हं बोलायला.. मी काय तुझ्या आईशी बोलत नाही का? केला मी त्यांना फोन आणि विचारली तुझ्या आवडत्या पदार्थाची कृति तर काही बिघडलं का? त्या गोड आहेत हां पण. त्यांनी मला अगदी डीटेलमधे सांगितलं कसं करायचं ते.. जमलंय ना?"
"अगदी! बर, आता तुला थोडंसं काढून ठेव आणि प्लीज ते पातेलंच इकडे दे मला.. आज बरेच दिवसांनी खूप आवडीचं असं काहीतरी मिळलंय.. ह्म्म्म! वा!" सागर बोटं चाटत म्हणाला..

निधी त्याच्याकडे प्रेमभरानी पहात होती. त्याला तसं मनापासून जेवतांना पाहून एक विलक्षण आनंद होत होता तिला. कधी एकदा आईला फोन करून हे सांगते असं झालं तिला..

समाप्त.

25 comments:

Anonymous said...

खूप छान लिहिलय. मला पण स्वयंपाक करायला आवडत नाही. पण कधी कधी काही काही पदार्थ चांगले बनतात आणि माझा नवरा लगेच स्तुती करत ते खातो तेव्हा मनाला नक्कीच एक वेगळ समाधान मिळत. पण तरीही स्वयंपाक करणे हा माझा पिंड नाही असेच मला वाटते. कदाचित संध्याकाळी थकल्यानंतर स्वयंपाक करण्याची ईच्छा नसते म्हणूनही असेल. असो प्रयत्न नक्की करेल चांगला स्वयंपाक करण्याचा. :-)

Abhi said...

"समानता.." आणि "पुरुषांचा...." वरुन कथेचं बीज सापडलं की काय?? का तुला कुणी विचारले इतक्यात "काय स्वयंपाक करता येतो का??" :D

Jokes apart..

पण असतात हं काही पदार्थ अगदी "आईच्या हातचे" च.. :) आणि "आईच्या हातच्या" धर्तीवरच ही गोष्ट सुद्धा "पूनम"च्या इतर गोष्टींसारखीच एकदम फक्कड :)

सर्किट said...

मग निधी ने फ़क्त तिच्या आई ला फोन केला, की सागरच्या आई ला ही? ;-) नाही, ते क्लिअर कळलं नाही म्हणून विचारलं हो.

छानच आहे कथा. एकदम नो टेन्शन टाईपची.

Vidya Bhutkar said...

मस्त आहे कथा. आवडली. :-) निशाच्या आईचं म्हणणं पटलं. ही कलाच आहे, मनापासून केलं नाही तर मजा येत नाही. I like to cook n eat. So I could enjoy the story more. :-))
-Vidya.

Abhi said...
This comment has been removed by a blog administrator.
Bhagyashree said...

amchyakade hich katha roj ghadat ase..pan mazya aai ne hi mala exactly ha ch salla dila.. ki man lawun kar.. ani kharach farak padto ! positive vichar karun swaypak kela ki to changla hoto ch hoto!! khup maja ali hi post vachayla !! as always!! keep writing!

Abhijit Dharmadhikari said...

"Aai" wishayeechya tumchya sagalyaach posts chhan astaat:-)

chhan lihilay.

Jaswandi said...

ekdum sanjeev kapoor athavala. tyachya khana khajana madhe ekhadya recipechya shevati to sangaycha

"aur isame Daaliye, thoDaasaa pyar" :)

संदीप चित्रे said...

व्वा ! पूनम…
आईच्या हातच्या पदार्थाची चव वेगळीच असते. माझ्या सुदैवाने आई छान स्वैपाक करतेच आणि सासूबाई तर लॉ कॉलेज रोडला केटरिंग क्लास घेतात ! पर्यायाने बायकोकडून तिचे पदार्थ, तिच्या आईचे पदार्थ आणि माझ्या आईचे पदार्थही मिळतात. एकंदरीत काय तर तक्रार करायला स्कोप नाही !! लेख तर छानच, नेहमीप्रमाणे ! LoL for ’मीठ चवीप्रमाणे’ या दोन शब्दांनी तिची झोप उडवली होती !

Anonymous said...

पून्नूडी, झकास एकदम!!

'मम आत्मा गमला' स्टाईलने झालीये कथा. मस्त एकदम.

अवांतर : आमच्या घरी 'बायकोच्या/ सूनेच्या हातचं' अशी परीस्थिती आहे गं. मग कधी कधी 'माझे पदार्थ एवढे का चांअले होतात' असं फ्रस्टेशन येतं मला. ;-)

- मंजूडी

पूनम छत्रे said...

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद! :) ’स्वयंपाक’ ही खरंच एक अवघड कला आहे :)

सर्किट :( तुमने मुझे निराश किया.. वाच की नीट..

अभि.. lol! खरंच अरे! त्यावरूनच सुचली :)

विद्या, भाग्यश्री, जास्वंदी, अभिजित- धन्स!

संदीप, भाग्यवान आहेस! तुझे ’चोचले’ पुरवायला सगळ्या अगदी तत्पर आहेत :)

मन्जूडी, आता ’पदार्थ बिघडवण्याची कला’ यावर लिहू का मग? ;)

ships09 said...

Hi Poornima
Mala mazich goshta vachate ahe ase vatale :)
Looking forward to read more and more from you

Love
Shilpa

rakesh said...

Katha chhanach aahe.

aajun baykocha anubhav naslyane mes, canteen v hotel chi aaishi tulna hote. pan tuzya kathe pramane aaichya hatchi chav vegalich aaste.

tuzya purvichya kathe pramane pratyekala tyachya aaichi mahati vegalich aaste.

prachi said...

khup awadali katha. kharach evadhe khapun padarth banavaycha aani shevati 'aaichya hatachi chav nahi' ase aikale ki vait vatate.pan mi mahnte, kahi padarth je amhi banvato ,te kuthe aaila banvata yetat ? pan yacha koni vichar karat nahi. aso, hehi maany karaylach pahije ki kitihi receipe vachun banavale tari pratyekachya hatachi chav hi vegali aste. agadi aplya aaila vicharun sagale banvale tari padarth tichyasarakha banat nahich ho na??

Anonymous said...

humm tuzi hatakhanda katha ahe. :-)

Meenu

Sanghamitra said...

mast Ahe g kathA. kitIhI bhAjalaM tarI pivaLaM besan gulAbI kasaM hoIl? LOL
sanghamitra

Rupali said...

khupach chhan katha ahe poonam.........

vaishali said...

पूनम, आजचं तुझी "आईच्या हातचं" ही कथा वाचली. फारच सुंदर कथा आहे. ब-याचश्या लोकाना हि कथा आपल्याच आयुश्यात घडलेली कथा वाटु शकेल, खरोखरचं जेवण करणं हि एक कला आहे आणि ती फार कमी लोकाना जमते, नाही का?

....वैशाली

दीपिका जोशी 'संध्या' said...

खूपच छान...आईच्या हातच्या जेवणाची म्हण किंवा आईचीच सर नाही गं कशालाच...पण तू लिहीलंस तसं होतच असतं....मी पोहे केलेत तरी ...छे...आई करायची तसे काही होत नाहीत..हे वाक्य पोहे खातांना पहिल्या घासानंतर मी बोलूनच जाते....खरंय नं...आणि जेवण बनविणे ही कला तर नक्कीच...

दीपिका जोशी 'संध्या'

sameer said...

kharacha far chan katha aahe. aaj 4 mahene mi UK la aalo aahe. bharatat ma kadhi kaanda hi kapala nahi pan ithe halu halu shikat aahe...survatila khupse padartha bighadale ghai mule pan aata jasa jasa man lavun kartoy tas tas jeven hi kaala aahe ani too ek mast timepass aahe he hi kalu lagala

sameer sawant

पूनम छत्रे said...

सर्वांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक आभार! स्वयंपाकासारखी साधी गोष्ट खरंच इतकी साधी नसते नाही? :) आणि ’आईच्या हातची’ चव तर कशालाच येणार नाही :) आपण सगळेच कुठे ना कुठे ही कथा आपल्या आयुष्यात रेलेट करू शकलो, शकतोय.. हेच खूप आहे माझ्यासाठी. सगळ्यांचे धन्यवाद :)

अनु said...

katha manala bhidali..

Anonymous said...

I liked it

Anonymous said...

doghehi kamawar jatat mag swaypak ka ti ekta karate. To ka nahi karat thdasa aaisarakha..

Eat & Burpp said...

itka chan zalay lekh ki dolyatun pani ala..mastach!!